या सिनेमाचं नाव ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’च्या ऐवजी ‘फिरंगी मल्ला’ असं असतं तरी चाललं असतं!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
विवेक कुलकर्णी
  • ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ची पोस्टर
  • Sat , 10 November 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie ठग्ज ऑफ हिंदोस्तान Thugs of Hindostan आमीर खान Aamir Khan अमिताभ बच्चन Amitabh Bachchan कतरिना कैफ Katrina Kaif फातिमा Fatima

‘लगान’च्या निर्मितीच्या वेळी जेव्हा वेशभूषाकार भानू अथैय्या यांना दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरांनी कथा सांगितली, तेव्हा त्यांनी त्याचा काळ गोवारीकरांनी सांगितलेल्या काळापेक्षा थोडा आधीचा ठेवायला सांगितला. असं का? कथानकासाठी ब्रिटिश कलाकार जे कपडे घालणार होते, ते विविध रंगाचे असतील, पण गोवारीकरांनी सांगितलेल्या काळात ब्रिटिश लोक सूतक पाळत होते. कारण त्यावेळी राणी व्हिक्टोरिया वारली होती. म्हणून गोवारीकरांनी कथा १८९३ साली घडते, असं दाखवलं. हे सविस्तर सांगायचं कारण सिनेमाची कथा ऐतिहासिक पार्श्वभूमीवर घडत असली तरी तिला वास्तवाचा आधार घ्यायचा असतो. इतिहास हा त्या वेळच्या वास्तवावरच आधारित असतो. त्याचं कथन काल्पनिक असलं तरी त्याला वास्तवाच्या आधाराचं भान सोडता येत नाही. सोडलं तर त्याची काल्पनिकता जाणवायला लागते.

‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’मध्ये १७९५ साली घडणार्‍या घटनेत पुढे पंचावन्न वर्षांनी उभ्या भारतात उपलब्ध होणार्‍या चहाचा उल्लेख करून दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य हे भान सोडून देतात, तेव्हा कथेची काल्पनिकता उघडी पडायला लागते.

मिर्झासाब (रोनीत रॉय) हा रौनकपूरचा संस्थानिक ब्रिटिशांच्या अत्याचाराला कंटाळलेला. ब्रिटिश अधिकारी जॉन क्लाईव्हला (लॉइड ओवेन) मात्र लवकरात लवकर ते संस्थान ईस्ट इंडिया कंपनीत सामील करून घ्यायचं आहे. एके रात्री तो मिर्झासाबला भेटायला येतो. येताना त्याच्या मुलाला बांधून आणतो. त्या बदल्यात संस्थान कंपनीत सामील करून घेतो. धोक्यानं त्याला व त्याच्या परिवाराला मारतो. पण त्याची मुलगी जफिराला (मोठी फातिमा सना शेख) मिर्झासाबचा विश्वासू खुदाबक्ष आझाद (अमिताभ बच्चन) वाचवतो व आपल्यासोबत घेऊन जातो. फिरंगी मल्ला (आमीर खान) हा परिस्थितीचा अंदाज घेऊन स्वतःची दिशा ठरवणारा ठग ब्रिटिशांच्या आझादला पकडण्याच्या प्रस्तावाला नाकारू शकत नाही. त्यासाठी आपला मित्र शनिचर (मोहम्मद झिशान अय्युब) याला सोबत घेऊन आझादच्या कंपूत घुसण्याची तयारी करायला लागतो.

कथानकाची त्रोटक कल्पना येण्यासाठी हा परिच्छेद पुरेसा आहे. पण त्यावरून सिनेमा खूप उत्तम असेल अशी अपेक्षा केली तर अपेक्षाभंग होण्यास थोडाही वेळ लागणार नाही. कारण पटकथाकार-दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य यांना आपल्याला एक चांगला सिनेमा करायचा आहे, हेच मुळी नको आहे असं दिसतंय. त्यामुळे ते काय करतात तर ‘पायरेट्स ऑफ द कॅरबियन : द कर्स ऑफ द ब्लॅक पर्ल’ आणि ‘अव्हेंजर्स’ या दोन सिनेमांचा प्रभाव आपल्या इथं कसा वापरायचा याचा विचार करतात. कारण या दोन्हीत व्यावसायिक सिनेमात वापरता येतील अशा असंख्य जागा आहेत. त्याच पद्धतीचं कथानक आपण कुठे वापरू शकतो याचा विचार करताना त्यांच्या लक्षात येतं ‘अरेच्या, ब्रिटिशांनी आपल्या इथं राज्य केलंय की!’ मग त्यानुसार काय कथानक लिहिता येईल याचा विचार करताना त्यांना क्रांतिकारकांचा इतिहास आठवतो, पण तो नेमका कोणत्या काळातला हे मात्र आठवत नाही. तरीही अठराव्या शतकाच्या शेवटी क्रांतिकारकांनी भारताला ब्रिटिशमुक्त करायचं ठरवलेलं असतं असं त्यांना सुचतं. मग वरील दोन आवडत्या सिनेमांचे आवडते भाग कसे व कुठे वापरायचे याचा विचार सुरू होतो.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा -

https://tinyurl.com/yajwg4nj

.............................................................................................................................................

‘कॅप्टन जॅक स्पॅरो’सारखं जबरा पात्र यात असायला हवं असं त्यांना वाटतं. थोडी इतिहासाची चाचपणी करताना ‘फिरंगी मल्ला’सारखे ठग लोक आपल्या इथं होते याचा साक्षात्कार होतो. मग ते त्याचा गेट अप, बोलणं, चालणं कसं असेल याचा विचार करून चमत्कृतीपूर्ण पात्ररचना करतात. ‘खुदाबक्ष आझाद’ हा उघडच क्रांतिकारी असायला हवा. कारण त्याच्या आयुष्याचा उद्देशच ब्रिटिशांना हाकलून देणं हा असतो. त्याला मानणारा एक संस्थानिक असतो. संस्थानिकाची मुलगी डेअरिंगबाज असायला पाहिजे आणि तिच्या लहानपणी घडलेली घटना मोठी झाल्यावर सतत झोपेत तिला आठवायला हवी असं त्यांना वाटायला लागतं. त्यामुळे कथेची चौकट तयार झाल्यावर ते व्हीएफएक्स वगैरे गोष्टींचा विचार करायला लागतात.

पण मुळात कथानकात दम नसल्यावर वरील गोष्टी सिनेमा उभा करायला तोकड्या पडतात, हे दिग्दर्शकाच्या खिजगणतीत नाही. त्यामुळे आपल्या आवडत्या सिनेमांचा प्रभाव सुचलेल्या कल्पनेत कसा भरता येईल इतकाच विचार ते करतात. आपण इतिहासाच्या पार्श्वभूमीवर कथा मांडतोय म्हटल्यावर ती किमान प्रेक्षणीय व विश्वसनीय वाटेल याचा थोडाही विचार त्यांच्या मनाला शिवत नाही. ‘फिरंगी मल्ला’ ही एकमेव द्विमिती पात्र सोडलं तर बाकीची पात्रं एकमितीच राहतात. त्यामुळे दिलेले सीन्स निभावून नेणं इतकंच अभिनेत्यांच्या हातात उरतं. पात्रांना फुलायला वावच पटकथेत नसल्यामुळे ती कमालीची अप्रभावी झाली आहेत. तसंच सिनेमात व्हीएफएक्सचा वापर खूप असेल तर दिग्दर्शकाचं कथानक, पात्र यांच्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता होते. ते इथं झालेलं आहे. फ्रेम कशी सुंदर दिसेल याचा सतत विचार करताना ते दिसतात. कथानकात वेळ खाणारी गाणी वापरतात. त्यामुळे त्यात थोडीफार जान येतेय म्हणत असतानाच गाणं येतं. ज्यानं रसभंग होतो. पण दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य यांना त्याची तमा नाही. तसंच ‘गोर वरबिन्स्की’ होण्याच्या नादात आपण एक स्वतंत्र दृष्टीचे दिग्दर्शक आहोत हेच विसरून जातात. त्याचा परिणाम अप्रभावी मारामारीचे प्रसंग चित्रित करण्यावर होतो.

या सिनेमात निदान गाणी तरी चांगली असतील अशी आशा करावी तर तीही फोल ठरते. संगीतकार अजय-अतुल व गीतकार अमिताभ भट्टाचार्य असून एकही गाणं निदान गुणगुणण्या इतपत असावं असं होत नाही. इतकी ती असून नसल्यासारखी आहेत. अभिनयात मोहम्मद झिशान अय्युब, शरत सक्सेना व इला अरुण यांना वाया घालवलंय. त्यातही अय्युबनं ही भूमिका का स्वीकारली हे कोडंच आहे. ‘शनिचर’ हे पात्र खरंतर फिरंगी मल्लाला तुल्यबळ व्हायला हवं, पण त्याच्या वाढीला पोषक वातावरण कथानकात नसल्यामुळे हे पात्र वाया जातं. कतरिना कैफ नृत्य करते तेव्हाच अभिनय करते. ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या भूमिका करणारे इंग्लिश अभिनेते हिंदी मात्र उत्तम बोलतात.

फातिमा सना शेखनं ‘दंगल’मध्ये गीता फोगाटची भूमिका केल्यावर इतकी साधी सरळ भूमिका का निवडावी हा प्रश्नच आहे. पटकथेची निवड करताना ती यापुढे सजग राहिली तर तिची कारकिर्द फुलायला वाव राहील. अमिताभबद्दल काय बोलावं हे समजत नाही. भूमिकेत असणारे काही महत्त्वाचे संवाद त्यांच्या तोंडी असल्यामुळे असेल किंवा तत्सम काही कारणामुळे त्यांनी ही भूमिका स्वीकारली असावी. लक्षात राहण्याजोगा प्रसंग म्हणजे ते त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी वाळूत शेती करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी एके दिवशी लाकडाचा ओंडका ओढून जमीन एकसारखी करत असतात. फक्त तेवढ्या एकाच प्रसंगात त्यांच्या डोळ्यात ‘आझाद’ दिसून येतो.. ज्याला ब्रिटिशांचा मनातून तिटकारा आहे. दुर्दैवानं पुढे असे प्रसंगच येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या या जीव ओतण्याला अर्थच उरत नाही.

सिनेमातली सर्वांत भाव खाणारी भूमिका आमीर खानच्या वाट्याला आलीय. ती त्यानं नेहमीप्रमाणे समरसून केली आहे हे सांगणे न लगे. उलट या सिनेमाचं नाव ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’च्या ऐवजी ‘फिरंगी मल्ला’ असं जरी ठेवलं असतं तरी चाललं असतं. कारण संपूर्ण सिनेमा या पात्राभोवती फिरतो. आमीर खान मुळातच भरपूर मर्यादा असणारा अभिनेता. त्याची कारकीर्दच सामान्य दर्जांच्या सिनेमात उत्तम अभिनय करणं अशी राहिली आहे. इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये फक्त हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत भूमिकांची नावं घ्यावी लागणार असतील तर त्याला किती मर्यादा आहेत हे कळावं. त्यामुळे त्यानं केलेल्या चांगल्या भूमिका कोणत्या याची यादी केली तर ‘फिरंगी मल्ला’ हे नाव त्या यादीत टाकता येईल इतकंच.

जेव्हा दिग्दर्शक आपल्या आवडणार्‍या सिनेमांचा प्रभाव फक्त पडद्यावरील दृश्यांपुरताच घेतो, तेव्हा त्याची झेप कितपत असेल याचा अंदाज करता येतो. विजय कृष्ण आचार्य यांनी ‘टशन’, ‘धूम ३’मधून ते दाखवून दिलं होतं. ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’मुळे त्यांच्या अजून एक भर पडलीय एवढंच.

.............................................................................................................................................

लेखक विवेक कुलकर्णी सिनेअभ्यासक आहेत.

genius_v@hotmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................