‘शुभ लग्न सावधान’ : लग्नाचा तिटकारा असलेल्या तरुणाची गोष्ट 
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी
  • ‘शुभ लग्न सावधान’चं पोस्टर
  • Sat , 13 October 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie शुभ लग्न सावधान Shubh Lagna Savadhan सुमीर सुर्वे Sameer Surve सुबोध भावे Subodh Bhave श्रुती मराठे Shruti Marathe

‘शुभ लग्न सावधान’ या नव्या मराठी चित्रपटात प्रेम करूनही लग्नाचा तिटकारा असलेल्या एका तरुणाची कथा आहे. तरुण-तरुणींच्या प्रेमाची इतिश्री अखेर लग्नात होते. किंबहुना कायम एकत्र राहण्यासाठी लग्न करायचं असतं, अशीच आपल्या समाजाची समजूत आहे. आणि तीच रीत बनली आहे. त्यामुळे भारतीय समाजात विवाहसंस्थेला फार महत्त्व आहे. बदलत्या काळातही तरुण-तरुणी कितीही आधुनिक विचारसरणीचे असले तरी सामाजिक चालीरीतीनुसार त्यांना लग्नबंधनात अडकावंच लागतं. मात्र काही तरुणांना लग्न म्हणजे खऱ्या अर्थानं ‘बेडी’ असल्याची जाणीव होते. त्यामुळे त्यांची ‘प्रेम’ करण्याची तयारी असते, मात्र त्यानंतर ‘लग्नाच्या बेडी’त अडकून पडण्याची त्यांची इच्छा नसते. बदलत्या काळातील आजूबाजूचे काही अनुभव त्यांच्या या इच्छेला ‘प्रमाण’ असतात. त्यामुळे तरुणाईला हा विषय आवडणारा आहे. मात्र तो सादर करताना त्याला नेहमीप्रमाणे पारंपरिक कौटुंबिक मालमसाल्याची फोडणी देऊन लग्नसंस्था अनिवार्य आहे, यावरच शेवटी भर देण्यात आला आहे.

सुप्रसिद्ध लेखक व.पु.काळे यांच्या ‘पार्टनर’ या कथेवर त्याच नावानं चित्रपट तयार करून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेले लेखक-दिग्दर्शक समीर सुर्वे यांनीच लग्नासंबंधीचा तरुण पिढीचा हा नवा मतप्रवाह पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 

या चित्रपटात पाहायला मिळते ती दुबईस्थित अनिकेत देशपांडे (सुबोध भावे) या एका श्रीमंत, सुस्थित  तरुणाची कथा. ऋचा (श्रुती मराठे) ही त्याची प्रेयसी. दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम असतं. मात्र अनिकेतला लग्न ही संकल्पनाच मान्य नसते. तर आपल्या प्रेमाची परिणती अखेर लग्नातच व्हायला पाहिजे, याबाबत ऋचा आग्रही असते. ऋचांचे आई-वडील (निर्मिती सावंत आणि गिरीश ओक) अर्थातच ऋचाच्या या मताच्या पाठीशी असतात. मात्र अनिकेतला कोणत्याही परिस्थितीत लग्न करायचं नसतं. 

त्याच दरम्यान ऋचाच्या मावस बहिणीचं (इरा - रेवती लिमये) लग्न ठरतं. या लग्नाचं निमित्त साधून ऋचा अनिकेतला तिथं यायला भाग पाडते. इगतपुरीजवळील एका फार्म हाऊसवर होणारं हे लग्न आधुनिक पद्धतीनुसार साजरं केलं जात असताना अनिकेतला विवाहसंस्थेचे फायदे आणि तोटे दोन्ही कळून येतात. त्याचा त्यावर परिणाम होतो आणि शेवटी तो लग्नाला तयार होतो.  

या चित्रपटाची कथा अतिशय साधी आणि सोपी आहे. कथेत कसलंही नाट्य नाही व कथेला कोठेही गंभीर वळणही नाही. मध्यंतरानंतर तर पडद्यावर कौटुंबिक खेळाचं नाट्यच पाहायला मिळतं. गाण्यांवर आधारित ‘संगीत बॉल’चा खेळ पाहून ‘हम आपके कौन है’सारख्या चित्रपटातील प्रसंगाची आठवण झाल्याखेरीज राहत नाही. शिवाय चित्रपटाचा ‘अपेक्षित शेवट’ हा सुरुवातीला कळूनही चित्रपटाची कथा कोठेही कंटाळवाणी ठरत नाही. हा ‘अपेक्षित शेवट’ मात्र अकारण लांबवण्यात आला आहे. त्यामुळे उत्सुकता अकारण ताणल्याची जाणीव होते. हा ‘अपेक्षित शेवट’ दुबईऐवजी इगतपुरीच्या फार्म हाउसवरच केला असता तर चित्रपट आटोपशीर झाला असता. 

या चित्रपटाची कथा तरुण वर्गाला आवडू शकेल अशी आहे, मात्र विवाहसंस्थेसंबंधीचे त्यांचे विचार अधिक स्पष्ट करण्याऐवजी दिग्दर्शकानं कौटुंबिक नाट्यावरच अधिक भर दिला आहे. तसंच अनिकेतला लग्नाचा एवढा तिटकारा का? त्याचं कारणही सबळ वाटत नाही. मात्र कलाकारांचा अभिनय आणि सुंदर छायाचित्रण यांनी हा चित्रपट तारून नेला आहे असं म्हणावं लागेल. 

नायक-नायिका म्हणून सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांची केमिस्ट्री खूपच छान जुळून आली आहे. सुरेख अभिनयामुळे दोघांच्याही भूमिका उत्तम वठल्या आहेत. गिरीश ओक, विद्याधर जोशी, निर्मिती सावंत, किशोरी अंबिये आदी कलाकारांनी त्यांना उत्तम साथ केली आहे.

या चित्रपटाद्वारे रेवती लिमये आणि प्रतीक देशमुख ही नवी जोडी रुपेरी पडद्यावर अवतरली आहे, मात्र उभयतांना फारसं काम नाही. चिनार-महेश यांनी संगीतबद्ध केलेली गाणी श्रवणीय आहेत. छायालेखक मधुसूदन यांचं उत्कृष्ट छायालेखन ही या चित्रपटाची मोठी जमेची बाजू आहे. दुबई तसंच इगतपुरीजवळील निसर्गदृश्यांमुळे हा चित्रपट नेत्रसुखावह झाला आहे. 

.............................................................................................................................................

लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.

shree_nakul@yahoo.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................