‘लव्हयात्री’ : उथळ पात्रांची रटाळ कथा
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘लव्हयात्री’चं पोस्टर
  • Sat , 06 October 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie लव्हयात्री LoveYatri आयुष शर्मा Aayush Sharma वारीना हुसैन Warina Hussain

‘सलमान खान फिल्म्स’ या नावाच्या बॅनर अंतर्गत समोर येणाऱ्या चित्रपटाकडून तशा पाथब्रेकिंग प्रकारातील कथा, दिग्दर्शन किंवा एकूणच कुठल्याही कलात्मक प्रकारच्या अपेक्षा ठेवणं चूकच. ज्यात पूर्वग्रहदूषित मतं वगैरे गोष्टींपेक्षा या नावाशी जोडल्या गेलेल्या गेल्या काही वर्षांतील (अनेक) चित्रपटांचा मोठा वाटा आहे. तरीही ‘लव्हयात्री’नं एक बऱ्यापैकी बरी म्हणावी अशी कथा आणि एकूणच मनोरंजक प्रकारात मोडेल असं एक्झिक्युशन या किमान गोष्टी एक व्यावसायिक चित्रपट म्हणून पूर्ण करायला हव्या होत्या. तो त्यातही अयशस्वी ठरत असल्यानं त्याची ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’च्या काळातील कथा, त्यातील उथळ पात्रं आणि तितकंच सुमार दिग्दर्शन या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं अशक्य ठरतं.

सुश्रुत ऊर्फ सुसु (आयुष शर्मा) हा बडोद्यात राहतो. त्याला स्वतःची गरबा अकॅडमी सुरू करायची आहे. मिशेल ऊर्फ मनीषा (वारीना हुसैन) लंडनमध्ये असते. ती सध्या शिकत आहे आणि पुढे एमबीए करू इच्छिते. तर ही तुमची मुख्य पात्रं आहेत. ज्यांच्याभोवती ‘लव्हयात्री’ फिरतो, किंबहुना फिरवला जातो. ‘लव्हयात्री’चं कथानक फारच साधं आहे. ज्याची पूर्ण कल्पना त्याचा ट्रेलर पाहूनच येते. लंडनमधून भारतात आलेली मिशेल सुश्रुतच्या प्रेमात पडते. तिचे वडील- समीर (रोनित रॉय) अर्थातच, त्यांच्या प्रेमाच्या विरुद्ध आहेत. समीरच्या विरोधामुळे दोघांमुळे फूट पडते आणि त्यांच्या प्रेमाची परीक्षा (?) सुरू होते.

मुळातच बॉलिवुडनं गरीब मुलगा-श्रीमंत मुलगी किंवा व्हाईस वर्सा साचा किती रटाळ, नावीन्याचा अभाव असलेला आणि मुख्य म्हणजे कालबाह्य आहे, हे लक्षात घ्यायला हवं. जे झालं तर आपण कथाकथनाच्या पातळीवर सुमार दर्जाच्या असलेल्या अनेक बॉलिवुडी प्रेमकथांपासून वाचू. मात्र व्यावसायिक बॉलिवुड चित्रपट आणि त्यातही सलमान खानकडून कालबाह्य गोष्टी न करण्याची अपेक्षाही तशी निरर्थक आहे.

अर्थात अशा गोष्टीही चांगली ट्रीटमेंट दिल्यास चांगल्या किंवा किमान सहन करता येईल प्रकारे समोर येऊ शकतात. मात्र ‘लव्हयात्री’ फारच उथळ सहाय्यक पात्रं, काहीतरी काबीज करण्यासाठी कायम कुणाच्या तरी प्रेरणेची गरज भासणारी मुख्य पात्रं या आणि अशाच इतर गोष्टींमुळे अधिकच असह्य बनतो. म्हणजे सुश्रुतला प्रेमात पडायच्या आधी/पडण्यासाठी मामा रसिककडून (राम कपूर) कविता (?!) ऐकत, दिवास्वप्नं पहावी लागतात, प्रेमात पडल्यावर त्याला सतत मित्र आणि मामाच्या फिल्मी अॅनालॉजी, गुजगोष्टींची गरज भासते. ज्यामुळे त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या कुठल्याही गोष्टीबाबत त्याची स्वतःची अशी मतं, निर्णय आणि मुख्य म्हणजे पॅशन आहे की नाही हा प्रश्न पडतो. ज्याचं कारण मुख्यतः त्याच्या अवतीभवती असलेले लोक आहेत. म्हणजे दर थोड्या वेळानं कधी आई-वडील, तर कधी समीर किंवा इतर कुणा ना कुणाच्या तोंडून ‘फ्युचर के बारे में क्या सोचा हैं?’ किंवा ‘गरबा अकॅडमी भी कोई करनेवाली बात हैं!’सारखे प्रश्न/मतं तोंडावर फेकली जाणं एक व्यक्ती म्हणून त्यातील मुख्य पात्रं तसंच त्याच्या विश्वाला फारच बाळबोध, उथळ बनवतं. आता सुश्रुत या मुख्य पात्राला चित्रपटभर सुसु म्हणून संबोधलं जात असताना चित्रपटाकडून कुठल्याही प्रकारच्या तारतम्याच्या अपेक्षा का ठेवाव्यात?

हेच यातील नायिकेबाबत. शैक्षणिक कामगिरीत अव्वल ठरल्यावर तिचा श्रीमंत बाप तिला बऱ्याच किमतीची भेट करत, ‘तू फारच महत्त्वाकांक्षी आहेस’ अशा अर्थाचं वाक्य म्हणतो. जे फारच हास्यास्पद आहे. कारण पुढे तिची महत्त्वाकांक्षी प्रवृती किंवा एक इंडिपेंडंट, साक्षर स्त्री म्हणून अपेक्षित असलेला खंबीरपणा यातील काहीच दिसत नाही. तीही सुसु इतकीच उथळ आहे. विचित्र आणि विनोदी अंगानं पहायचं झाल्यास ते एकमेकांना आसपासची पात्रं आणि घटनांमुळे मॅनिप्युलेट होण्याइतकं बाळबोध असण्याबाबतच्या अशक्य साम्यामुळे चांगली साथ देतात.

त्याचे मित्र नागेश ऊर्फ निगेटिव्ह (पारेख) आणि राकेश ऊर्फ रॉकेट (गांधी) दोघेही राम कपूरच्या रसिकसोबत कॉमिक रिलीफ म्हणून काम करण्याचा प्रयत्न करतात. प्रयत्न यासाठी की यात विनोदी क्षण तसे नाहीतच. या तिन्ही पात्रांचं सुसुला वेळोवेळी मार्गदर्शन (?) करताना पाहणं, मुख्य पात्राच्या जीवनातील त्यांच्या विलक्षण हस्तक्षेपात भर घालतं. तसंच त्यांचे विनोदही चित्रपटातील प्रॉडक्ट प्लेसमेंट इतकेच खटकणारे आहेत.

बाकी मुख्य कलाकारांबाबत बोलण्याचं काही कारण नाही. कारण ते चित्रपटभर रोनित रॉयच्या गुजराती लहेजाइतकेच (किंबहुना त्याहून अधिक) खटकत राहतात. अपॅरंटली, भरपूर गोऱ्या रंगाची स्त्री म्हणजे सुंदरता अशी सौंदर्याची बॉलिवुडी संकल्पना असल्यानं तशीच नायिका आपल्याला (पुन्हा एकदा) पाहायला मिळते, आणि सलमान खान आपल्या ‘जिजाजी’ला यशस्वीपणे लाँच करतो, इतकंच काय ते ‘लव्हयात्री’बद्दल म्हणता येईल.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................