‘होम स्वीट होम’ : हरवलेल्या कथेतील शोधावं लागणारं ‘घरपण’!  
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी
  • ‘होम स्वीट होम’चं पोस्टर
  • Sat , 29 September 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie होम स्वीट होम रीमा लागू Reema Lagoo मोहन जोशी Mohan Joshi स्पृहा जोशी Spruha Joshi

काळाच्या ओघात चाळसंस्कृती नष्ट झाली आणि फ्लॅट संस्कृती आली आणि आता बदलत्या काळानुसार फ्लॅट संस्कृतीची जागा टोलेजंग टॉवर्सनं घेतलीय. परंतु शेवटी घर कुठंही असलं तरी त्याचं ‘घरपण’ महत्त्वाचं ठरतं. अशाच एका कवितेच्या संकल्पनेवर ‘होम स्वीट होम’ या नव्या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. लेखक आणि ताज्या दमाचा तरुण दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांचा या चित्रपटामागचा हेतू चांगला असला तरी मुळात त्यासाठी लागणारी कथाच फारषी ‘स्वीट’ नसल्यामुळे हरवलेल्या कथेतील घराचं ‘घरपण’ मोठ्या मुश्किलीनं शोधून काढावं लागतं. अनेक मान्यवर कलाकारांचा समावेश असूनही ‘या’ घराचा गोडवा हवा तसा जाणवत नाही. 

‘होम स्वीट होम’मध्ये पाहायला मिळते, ती एका प्रौढ महाजन दाम्पत्याची कथा. विद्याधर महाजन (मोहन जोशी) हे सेवानिवृत्त झालेले गृहस्थ पत्नी श्यामल (रिमा) हिच्यासह सुमारे ३५ वर्षांपासून एकाच फ्लॅटमध्ये राहत असतात. त्यांना मूलबाळ नसतं. त्यामुळे उर्वरित आयुष्य आनंदानं घालवणं एवढं एकच उद्दिष्ट दोघांसमोर असतं. महाजन यांच्या मानलेल्या बहिणीची एक मुलगी- देविका (स्पृहा जोशी) ही त्यांच्याकडे ‘पेइंग गेस्ट’ म्हणून राहत असते.

वयोमानानुसार श्यामलला जिनं चढून जाण्याचा त्रास होऊ लागतो. त्यामुळे आहे तो फ्लॅट मोठ्या किमतीत विकून लिफ्ट असलेल्या नव्या उत्तुंग इमारतीमध्ये राहायला जावं असा विचार त्यांच्या मनात येतो. मात्र आहे त्यात समाधान मानणाऱ्या विद्याधर महाजन यांचा त्याला विरोध असतो. कारण त्यांचं मन त्या घरात गुंतलेलं असतं. ओळखीचा झालेला सारा परिसर अचानक सोडून जाणं त्यांना नकोसं वाटते. तर ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे’ या वृत्तीमुळे आपल्या घर बदलण्याच्या इच्छेला त्यांचा विरोध आहे, अशी त्यांच्या पत्नीची भावना होती.

शेवटी पत्नीच्या इच्छेला मान देऊन ते तो फ्लॅट विकायला तयार होतात. इस्टेट एजंट म्हणून काम करणारा सोपान शिंदे (हृषिकेश जोशी) हा त्यांच्या घरातीलच एक माणूस. त्यालाही या फ्लॅटची विक्री व्हावी आणि मिळणाऱ्या कमिशनमधून आपणही आणखी मोठं घर घ्यावं असं वाटत असतं. त्या सर्वांचं स्वप्न साकार होतं का? त्यासाठी  ‘होम स्वीट होम’ पडद्यावर पाहायला हवा. 

चित्रपटाच्या कथेचा जीव फारच छोटा आहे. महाजन दाम्पत्य आणि इस्टेट एजंट सोपान या तिघांभोवतीच प्रामुख्यानं कथा फिरत राहते. मध्यंतरापर्यंत कसलंही नाट्य नसल्यामुळे कथाविषय पकड घेत नाही. अर्थात कथेची मांडणी अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीनं करण्यात आल्यामुळे ती थोडीफार सुसह्य होते. काही ठिकाणी शाब्दिक संवाद विनोदनिर्मितीचं काम करतात. विशेषतः सोपानच्या घरातील त्याच्या आई आणि पत्नीबरोबरचे काही प्रसंग मजा आणतात.

कथेला वैभव जोशी यांच्या आवाजात ‘नात्याचे रुटीन चेकअप’ या त्यांच्याच गाजलेल्या कवितेचीही  अधूनमधून जोड दिलेली आहे. त्यातून ‘घरा’चं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्या काव्यातून कथेतील असली ‘घरपण’ जाणवत नाही. कवितेच्या या ‘ठिगळा’ला शेवटी गाण्याचं (‘हाय काय नि नाय काय’) स्वरूप देण्यात आलं आहे.

कथेमधील देविका हे पात्र सध्याच्या तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी घेतलं आहे, हे खरं असलं तरी ती घराच्या संकल्पनेबाबत आपल्या स्वतःच्या भावना कधीच स्पष्ट करत नाही. त्यामुळे ते पात्र ‘उपरं’ वाटतं. आपलं घर (राहता फ्लॅट), त्याचा परिसर आणि घरातील वस्तू यासंबंधी आत्मीयता, जिव्हाळा वाटावा असे काही प्रसंग दाखवता आले असते तर ‘घरपण’ अधिक प्रभावी ठरले असते. ते काम शेवटी दिघे दाम्पत्यानं केल्यामुळे महाजन दाम्पत्याला त्यातून झालेली उपरती ही कथेच्या दृष्टीनं उणीव भासते.

दिवंगत अभिनेत्री रिमा यांच्या हा शेवटचा चित्रपट. त्यांचा ठसकेबाज अभिनय ही चित्रपटाच्या दृष्टीनं जमेची बाजू आहे. मोहन जोशी यांनीही त्यांना चांगली साथ केली आहे. इस्टेट एजंट झालेले हृषीकेश जोशी यांनी विनोदनिर्मितीची जबाबदारी चांगली सांभाळली आहे. विभावरी देशपांडे यांनीही कामवाल्या बाईची भूमिका प्रभावीपणे रंगवली आहे. स्पृहा जोशीची भूमिका लक्षात घेता कामाच्या बाबतीत ती ‘पेइंग गेस्ट’च ठरली आहे. मृणाल कुलकर्णी, सुमित राघवन, प्रसाद ओक आदी मान्यवरांचं दर्शनही पडद्यावर घडवण्यात आलं आहे. मात्र कथेच्या दृष्टीनं त्यांचा फारसा प्रभाव पडत नाही.

.............................................................................................................................................

लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.

shree_nakul@yahoo.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................