सत्यभामेचा पारिजात बहरला, रुक्मिणीच्या दारी!
कला-संस्कृती - कृष्णकथांजली
श्रीकृष्ण तनया
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Sat , 22 September 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti कृष्णकथांजली KrushnaKathanjli श्रीकृष्ण Shreekrushn सत्यभामा Satyabhama रुक्मिणी Rukmini पारिजात Parijat

भारतीय पुराणांतील मिथककथांची ओळख करून देणारं हे नवंकोरं साप्ताहिक सदर आजपासून दर शनिवारी प्रकाशित होईल. ‘Myth’ या मूळ इंग्रजी शब्दावरून मराठीत ‘मिथ’, ‘मिथक’ हे शब्द रूढ झाले. या मिथकालाच ‘प्राक्कथा’ किंवा ‘पुराणकथा’ असंही म्हटलं जातं. ज्येष्ठ समीक्षक मिथककथांना ‘व्याजविज्ञान’ म्हणतात. म्हणजे कार्यकारणभावरिहत, केवळ कल्पनेतून निर्माण झालेलं. मात्र या कथा अदभुत, अविश्वसनीय, सुरस आणि चमत्कारिक असतात. रंजकता हे त्यांचं मोठं वैशिष्ट्य असतं. आणि तेच या सदराचंही प्रयोजन आहे.

.............................................................................................................................................

हळदीच्या वाणाचं जरतारी कटिवस्त्र परिधान करून हिर्‍या मोत्यांचे ठळक अलंकार धारण केलेला श्रीकृष्ण आपल्याच नादात पट्टराणी सत्यभामेच्या प्रासादाकडे चालला होता. त्याच्या मस्तकावरील रत्नखचित मुकुटांत खोचलेलं मोरपीस त्याच्या पदन्यासाबरहुकूम स्पंदन पावत होतं. खांद्यावरील गर्भरेशमी निळं उत्तरीय भूमीवर अर्धेअधिक लोळत होतं, याचंसुद्धा कृष्णाला भान नव्हतं. डाव्या तळहातावर बासरीचा हलका ठेका धरत स्वारी चटपट पावलं टाकत चालली होती. दासदासींनी केलेल्या प्रणामाकडेही त्याचं लक्ष नव्हतं.

लगबगीनं जायचं विशेष कारण म्हणजे आज सत्यभामेनं श्रीकृष्णला भोजनाचं आमंत्रण दिलं होतं. पण कामाच्या गडबडीत महाराज विसरले. जेव्हा भामेकडून परत निरोप आला, तेव्हा स्वारीची तारांबळ उडाली. उशीर झाला खरा. राजकारणी माणसाला कुठला निवांतपण मिळणार! पण हे राणी सत्यभामेला पटायला हवं ना! नक्कीच ती रागावणार. रुसणार. अखिल सृष्टीवर सत्ता असणार्‍या कृष्णाचं राणीवंशात काही चालत नसे. आठही राण्यांत सत्यभामा अहंमन्य व हट्टी असल्यामुळे कृष्ण तिची इच्छा वा विनंती सहसा डावलत नसे. इतर राणीवसा त्या मानानं समंजस होता. आजही सत्यभामेचं आमंत्रण सहेतूक असणार, हे त्याला अनुभवानं ठाऊक होतं.

विचारांच्या नादांत कृष्णानं प्रासादात प्रवेश केला व तो दालनाच्या उंबर्‍यापाशी आला. दासींची एकच धावपळ झाली. सुवर्ण पिंजर्‍यातील काकाकुव्यानं मंजुळ शब्दानं त्याचं स्वागत केलं. सारीकेनंही त्याची नक्कल केली. पण भामेची कुठे चाहूल लागेना. त्यानं प्रश्नार्थक नजरेनं दासी लतिकेकडे पाहिलं. परंतु ती मान खाली घालून मूकपणे उभी राहिली. कृष्ण समजला. आता आपली धडगत नाही. उशीर झाल्याचं काय कारण सांगावं म्हणजे भामेला ते पटेल याचा तो विचार करू लागला. काष्ठाचा भुगा करणार्‍या पण कमलिनीच्या गंधगाभ्यांत गुरफटलेल्या भ्रमराप्रमाणे त्याची अवस्था झाली. आपल्या भार्यारूपी आठ कमळांच्या मुलायम पाकळ्यांत तो अगदी बंदिवान झाला होता. वज्राप्रमाणे कठोर कर्तव्य करणारा त्रिभुवनसुंदर श्रीकृष्ण राण्यांच्या सहवासात मात्र नवनीत होई.

श्रीकृष्णानं दबकतच दालनात प्रवेश केला. सर्वत्र शोधक दृष्टी टाकली. महालाच्या स्फटिकमय फरशीवर हिरवागार गालीचा पसरला होता. त्याच्यावर सशाची दोन गोजिरवाणी पिल्लं बागडत होती. जांबुवंतीनं ती पिल्लं जंगलातून खास भामेसाठी आणली होती. दालनाच्या चारी कोपर्‍यांत चंदनाच्या घडवंचीवर सुवासिक पुष्पांच्या रचना केलेल्या सोन्या-चांदीच्या रत्नजडीत सुबक फुलदाण्या ठेवल्या होत्या. वाळ्यांचे पडदे मंद हवेच्या झुळकीसरशी हेलकावे घेत होते. भिंतीवरील लावण्य रमणी अप्सरांच्या लोभस नृत्यमुद्रेतील तसबिरींमुळे प्रासादाला एक आगळीच शोभा प्राप्त झाली होती. चंदनाच्या मंचकावर पोपटी रंगाची मृदू मुलायम बिछायत घातली होती. मेंदीच्या पानांच्या व पाडाला आलेल्या कैरीच्या वर्णाच्या उशा व गिरद्या विशाल मंचकावर विखुरल्या होत्या. भामेची ही वास्तु भोगमंदिर म्हणूनच प्रसिद्ध होती. दालनात सुखद गारवा होता तरी बाहेरील वातावरणापेक्षा आतील हवा विशेष गरम आहे याचा कृष्णाला अंदाज आलाच. ते सगळं खरं, पण या साम्राज्याची सम्राज्ञी कुठे आहे? एरवी कृष्णाची वाट पाहात ती उंबर्‍यातच घोटाळत असते. इतक्यात त्याच्या कानावर पडद्याची सूक्ष्म सळसळ आली. तसं त्यानं त्या दिशेला पाहिलं, तो सत्यभामा! इतका वेळ कशी दिसली नाही? दिसणार कशी म्हणा! तिनंही हिरव्या रंगाचीच वस्त्रं परिधान केली होती. हिरव्या रंगाचा जरीबुट्याचा शालू व पिवळ्या वाणाच्या चोळीत तिचं आरसपानी सौंदर्य अप्रतिम दिसत होतं. सोन्या मोत्यांच्या सुबक अलंकारांनी तिचं मूळचं लावण्य द्विगुणित झालं होतं. पाचूंनी मढवलेल्या सुवर्ण कमरपट्टयामुळे तिचा शेलाटा बांधा अधिकच कमनीय दिसत होता. दासी बकुळेसह गवाक्षात उभी राहून ती महालाकडे येणारे मार्ग न्याहाळत होती. कृष्णाचीच वाट पाहात असावी. पण आज वेगळ्याच वाटेनं कृष्ण आला होता. कृष्णाचं आगमन कळताच बकुळा अदबीनं प्रणाम करून हलकेच बाहेर गेली.

.............................................................................................................................................

‘ब्रह्मेघोटाळा’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा - 

.............................................................................................................................................

एखाद्या मनोरम शिल्पाचा भास व्हावा तशा त्या सत्यभामेजवळ तो जाऊन उभा राहिला. तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी तो सहेतूक खाकरला. हलकेच खोकला. पण तिनं वळूनही पाहिलं नाही. ते पाहून तो हलकेच तिच्या पाठीशी उभा राहिला. आपल्या उत्तरीयाचं टोक त्यानं अलगदपणे तिच्या गोबर्‍या गालांवर फिरवलं, पण ती तीळमात्र हलली नाही. नंतर त्यानं कमळाची अर्धोन्मिलीत कळी तिच्यासमोर धरली. तरीही तिची कळी खुलली नाही. त्यानं चुटक्या वाजवल्या. टाळ्या वाजवल्या. गुलाब दाणीतील गंधजल शिंपडलं, पण भामेचा जणू काही पुतळाच झाला होता. तिला बोलतं करण्याचे सर्व उपाय थकल्यावर कृष्ण स्वत:शीच पण मोठ्यानं म्हणाला, ‘‘चला, कृष्ण महाराज, कालिंदीकडे वा सत्याकडे जावं झालं. भोजनही तिकडंच करावं.’’

हे अस्त्र मात्र तात्काळ लागू पडलं. गर्रकन वळत श्रीकृष्णाचे हात धरून तिनं जरा जरबेनंच म्हटलं, ‘‘काही जायचं नाही कुणाकडे, भोजनही इथंच व रात्रीचा मुक्कामही इथंच. कळलं? एक तर उशिरा यायच अन् वर राग येईल असं भाषण करायचं.’’ भामा कुरकुरली.

‘‘जशी महाराणींची आज्ञा. पण प्रिये हा रुसवा कशासाठी? म्या पामराकडून कसली आगळीक झाली काय?’’ त्यानं भोळेपणाचा आव आणून विचारलं. त्यावर एक नापसंतीदर्शक उद्गार काढून ती मूळपदावर आली. अखेर गोडी गुलाबीनं तिचं मन वळवून तिला बोलती करण्यात त्याला यश आलं. तिची मागणी ऐकून तो थक्क झाला. तिला इंद्राच्या नंदनवनातील पारिजातकाचा वृक्ष हवा होता. देवदानवांनी केलेल्या सागरमंथनातून निर्माण झालेला तो वृक्ष चौदा दिव्य रत्नांपैकी एक होता व तोच तिला हवा होता. ती लाडिकपणे कृष्णाला म्हणाली, ‘‘स्वतः देवेंद्रानं इंद्राणीसाठी तो वृक्ष अमरावतीला नेला. चंद्राला भगवान रुद्रानं मस्तकी धारण करून हलाहलही प्राशन केलं. कमलजा देवी लक्ष्मी व कौस्तुभरत्न यावर श्रीविष्णूंनी हक्क सांगितला. कल्पवृक्ष, कामधेनू, धन्वंतरी व अमृतकलश स्वर्गातच राहिला. चतुर्दंत शुभ्र ऐरावत व शुभलक्षणी उच्चैःश्रवा अश्व अनुक्रमे इंद्रदेव व सूर्यदेव यांनी घेतला. मदिरेचं एक जाऊ द्या. इथं हवी आहे कुणाला? आणि अन्य रत्नांशी मला कर्तव्य नाही. ते काही नाही. स्वामी, मला तो पारिजात वृक्ष हवा म्हणजे हवा. मी कधी मागते का आपल्याकडे? मी काही ‘इतरांसारखी’ हट्टी नाही. तुमची मुळी मजवर प्रीतीच नाही.’’

हा ‘इतरांसारखी’ शब्दप्रयोग अन्य राण्यांना उद्देशून आहे, हे कृष्णाच्या लक्षात आलं.

‘‘अहाहा! कसं हिरव्यागार वनराईत आल्यासारखं वाटतं. अशा प्रसन्न वातावरणात तुझ्यासारखी लावण्यसुंदर वनदेवता. पण राणी, आज या तबकांत गुलाबकळ्या कशा? वास्तविक दालनाच्या आणि तुझ्या साजशृंगाराच्या रंगसंगतीवरून इथं आज हिरवा चाफा किंवा मरवा हवा होता असं नाही का तुला वाटत?’’ श्रीकृष्ण भामेला खूष करू लागला, पण ती आपल्या पतीराजांना चांगलीच ओळखून होती. विषयांतर करण्याची ही क्लृप्ती होती. त्याच्या गळ्यांतील मौक्तिक हाराशी खेळत ती कृतक्कोपानं उद्गारली, ‘‘पुरे हं थट्टा आणि साखरपेरणी. मला नको चाफा अन् नको मारवा. माझा हा एकच हट्ट पुरवा. पुरवाल ना? काय?’’

भामेच्या मधाळ आर्जवी बोलण्यानं श्रीकृष्णाची कधीच खडीसाखर झाली. या राण्यांना कृष्णाला कसं खूष करावं याच्या खुब्या ठाऊक होत्या. थोडा रुसवा, थोडी नाराजी, क्वचित् अश्रुपात आणि मग गोऽड आर्जवी लाडिक बोललं की महाराज विरघळलेच म्हणून समजा. स्त्री हट्ट पुरा न करील तर तो पती कसला! त्यात कृष्ण म्हणजे द्वारकाधीश. त्यानं वृक्ष आणून देण्याचं वचन दिल्यावर तिची कळी खुलली. तिचा प्रसन्न व टवटवीत मुखचंद्रमा पाहून कृष्ण देहभान विसरला. त्यानं तिला बाहुपाशांत घेऊन तिच्या लालचुटूक ओष्ठद्वयांवरील मोहक स्मित आपल्या अधरांनी टिपलं. त्याच्या निकट सानिध्यानं तिची अवघी काया मोहोरली व ती त्याला अधिकच बिलगली. हिरव्या वस्त्रप्रावरणातील गौरगुलाबी सत्यभामा व पितांबरधारी सावळा बलदंड श्रीकृष्ण यांच्या मीलनानं भोवतालचा हिरवा रंग अधिकच गहिरा झाला. ‘‘आता तरी रुसवा गेला ना? भामा, नवर्‍याला इतकं धारेवर धरू नये. गरीब प्राण्याला किती छळावं तुम्ही बायकांनी.” त्याच्या नाटकी अविर्भावाला भामा दिलखुलास हसली. प्राजक्ताचा सडा पडावा तशी. त्या हास्यानं भरदुपारी चांदण्याचा शिडकावा झाल्यासारखं कृष्णाला वाटलं. नर्मविनोद करत एकमेकांना आग्रह करत उभयतांचं भोजन उरकलं.

सत्यभामेला वचन दिल्याप्रमाणे कृष्णानं नंदनवनातून वृक्षाचं रोप आणून दिलं. त्यासाठी त्याला देवलोकातील देवांशी युद्ध तर करावंच लागलं, पण राणी व इंद्राचा रोषही पत्करावा लागला. या वृक्षाच्या मुळाशी नारदमुनींचंच कारस्थान असावं व त्यांनीच तिच्या हट्टाला खतपाणी घालून तिची ईर्ष्या जागृत केली असणार असा कृष्णाला संशय होता. कारण ही तिची बुद्धी नाही. पूर्वी देवदानवांच्या युद्धप्रसंगी देवांचा विजय झाला. त्याप्रीत्यर्थ नारदमुनींनी कृष्णाला नंदनवनातील पारिजातकाचं सदासतेज गंधपुष्प सप्रेम भेट दिलं. ते पुष्प कृष्णानं मुनींसमोरच आपल्या लाडक्या राणीला-रुक्मिणीला दिलं. ‘माझ्या प्रत्येक यशात रुक्मिणी तुझाही सहभाग आहे’ असंही म्हटल्याचं त्याला स्मरत होतं. तेव्हा ही कळ त्यांनीच लावली असणार. असं असलं तरी भामेलाही धडा शिकवण्याचा मुनींचा इरादा असेल असा कृष्णानं कयास बांधला.

वास्तविक कृष्णानं रुक्मिणीला फूल दिलं ही गोष्ट भामेला रुचली नव्हती. वांरवार कृष्णापाशी तिनं पारिजातकाचा विषय काढावा व त्यानं तो चतुरपणे टाळावा असंच होत आलं. त्यामुळे आज कृष्णाला तो वृक्ष आणण्यासाठी राजी करून तसं वचन घ्यायचा निर्धार तिनं केला व तो जवळजवळ पूर्ण झाल्यातच जमा झाला होता.

श्रीकृष्णानं इंद्राबरोबर युद्ध करून तो वृक्ष हस्तगत केला. कृष्ण विजयी झाला व त्यानं दिव्य वृक्षाचं इवलंसं रोप भामेच्या हवाली केलं. भामेनं राजपुरोहितांच्या सूचनेनुसार तिथी, नक्षत्र व मुहूर्त पाहून रोप आपल्या प्रासादाच्या अंगणांत लावलं. बहुप्रसवा वसुंधरेनं ते रोप अबदारपणे आपल्या कुशीत घेतलं. आता भामेचा बराचसा वेळ त्या रोपाच्या निगराणीतच जाऊ लागला. कृष्ण तिला म्हणाला, ‘‘अग, त्याचा मोठा वृक्ष व्हायला खूप समय आहे. तासन्तास त्याची देखभाल नको करायला. द्यायचा तेव्हाच तो फुलं देणार. सत्यभामा तू म्हणजे...!’’

‘‘असू दे. तुम्हाला माझ्या भावना कळणार नाहीत. पारिजातक पुष्पांची पहिली माळ मी आपल्याच गळ्यात घालणार आहे. हसू नका. बघाच.’’

‘‘अरे वा! मी बराच भाग्यवान म्हणायचा.’’

सत्यभामा स्वतःच्या अपत्याप्रमाणे त्या रोपाची काळजी घेऊ लागली. येता-जाता त्याचं निरीक्षण करू लागली. दासी वर्ग रोपाचं कौतुक करून आपल्या स्वामिनीला खूष करू लागल्या. भामा मनात म्हणू लागली, ‘‘बाई रुक्मिणी, पतीप्रेमाचा उगाच टेंभा मिरवू नकोस. इकडच्या स्वारीनं तुला एकच पुष्प दिलं, पण हा दिव्य वृक्ष मात्र केवळ माझ्यावरील प्रीतीखातर नंदनवनांतून आणून दिला आहे. इकडचं खरं प्रेम मजवरच आहे. उगाच भ्रमांत राहू नकोस बरं. या दिव्य सुगंधी वृक्षामुळे माझ्या अंगणाला किती अद्वितीय शोभा येईल ते पाहातच राहा.’’

श्रीकृष्ण अंतर्ज्ञानी असल्यानं आपल्या पट्टराणीचं मनोगत त्याला समजून तो गालातल्या गालात हसला.

दिसामाशी रोप वाढू लागलं. मुळांनी बळकटी धरली. अंकुर, धुमारे फुटू लागले. पहाटेच्या दंवात ते न्हाऊ लागलं. कोवळ्या उन्हात चमकू लागलं. वार्‍याच्या झुळुकीसरशी डोलू लागलं. सर्व बाजूंनी त्यानं बाळसं धरलं. हळूहळू रोप कमरभर वाढलं. खांद्यांपर्यंत आलं. त्याच्या फांद्यांचा पसारा वाढू लागला. मुक्या कळ्या दिसू लागल्या. बघता बघता फुलं देण्यास योग्य झाला. सत्यभामेचा ऊर आनंदानं भरून आला. नवजात बालकाचा हुंकार, त्याचं कुशीवर वळणं, पालथं पडणं, रांगणं व नंतर एकएक पाऊल पुढे टाकणं या सर्व गोष्टी जशा मातेला स्वर्गसुखाचा आनंद देतात, तद्वत् त्या रोपाचं वृक्षांत रूपांतर होण्यापर्यंतची स्थित्यंतरं पाहून भामेला आनंद झाला. एखाद्या पहिलटकरणीसारखा तो वृक्ष कळ्यांच्या भारानं वाकू लागला. वृक्षाचं सुप्त वैभव फांद्यागणिक कळ्यांच्या रूपात नजरेत भरू लागलं. वार्‍याशी दंगामस्ती करत फांद्या डोलू लागल्या. वेगळ्याच सौंदर्यानं वृक्ष नजर लागावी असा देखणा दिसू लागला.

फुलं उमलण्याच्या रात्री मात्र चमत्कार झाला. रुक्मिणी व भामा यांचे महाल शेजारी शेजारी. त्यामुळे परसदारचं अंगणही शेजारीस. अंगणातील प्रत्येक वृक्ष व वेल आपापलं गंधवैभव जतन करत उभे होते. मध्यरात्री निवांतपणे निद्रिस्त झालेल्या पारिजातकाच्या अर्धोन्मिलीत कळ्यांवर खट्याळ वार्‍यानं हलकेच फुंकर मारल्याबरोबर कळ्या पूर्ण उमलून हसू लागल्या. वारा अधिकच चेकाळला. कळ्या, पुष्पांच्या भारानं वृक्ष रुक्मिणीच्या अंगणांत अर्धाअधिक वाकला. वार्‍याच्या झुळकीसरशी इवलीशी नाजूक केशरी दांड्याची पिवळसर पांढरी फुलं टपटप पडू लागली. माती व वातावरण गंधमय झालं. फुलांच्या मंद गंधानं रुक्मिणीची निद्रा चाळवली. अपरिचित गंधाच्या अनुरोधानं तिची सोनपावलं अंगणाकडे वळली. ते देखणं दृश्य पाहून ती विस्मयचकित झाली. तिच्या अंगणाचा एक कोपरा भामेनं लावलेल्या दिव्य वृक्षाच्या मुलायम पुष्पांनी गच्च भरला होता. जणू पुष्पशय्या अंथरली होती. मनात एक विचार येताच ती विलक्षण लाजली. कृष्णावरील श्रद्धेनं व प्रीतीनं तिचं मन भरून आलं. त्यानं पूर्वी एकच फूल दिल्यानं फुलाचं खरं स्वरूप कळलं नव्हतं, पण आज मात्र खरोखरीच निसर्गाचा चमत्कार म्हणावा तसं त्याचं गंधमय लावण्य अवलोकिता आलं. सागरमंथनातून निर्माण व्हावा अशीच त्याची योग्यता होती.

रुक्मिणीनं उलट पावली जाऊन मदनमुद्रेला हलकेच उठवलं. तिला गुपचूप आपल्या मागोमाग येण्यास सांगितलं. दोघीही खाली बसून फुलं वेचू लागल्या.

इकडे रुक्मिणीनं हलक्या पावलांनी अंगणात प्रवेश केला असला तरी तिच्या पैंजणाच्या परिचित आवाजानं भामाराणीच्या शयनकक्षांत सुख निद्रा घेणार्‍या कृष्णाला जाग आली. भामेची झोपमोड होणार नाही याची दक्षता घेऊन तोही हलक्या पावलांनी परसदारी आला. आपलं राणीपद विसरून मातीत बसून फुलं गोळा करणार्‍या द्वारकासुंदरीला त्याची चाहूलही लागली नाही, इतकी ती देहभान विसरून गेली होती. मदनमुद्रेला मात्र तो आल्याचं कळलं व तिनं हळूच तिला खूण केली. तिला स्वतःलाही कृष्णाचं अस्तित्व जाणवलं. ती एकदम भांबावली. बावरली. लगबगीनं ती उठली व ताज्या गंधमय स्वर्गीय पुष्पांची ओंजळ तिनं कृष्णाच्या शामल सहचरणांवर रिती केली. पहिली माळ कृष्णाच्या गळ्यामध्ये घालण्याचं पट्टराणी भामाचं स्वप्न स्वप्नच राहिलं. ते भाग्य मात्र लाडक्या राणीला मिळालं.

त्या मूर्तीमंत देखण्या दैवी युगुलावर तो स्वर्गीय पारिजातक देहभान विसरून आपलं पुष्पधनाचं अक्षय भांडार ओतीतच राहिला.

खुळ्यासारखा.

अविरत.

प्रसन्नपणे.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -