‘लव्ह सोनिया’त त्याचा थेटपणा सोडता विशेष काही नाही!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘लव्ह सोनिया’चं पोस्टर
  • Sat , 15 September 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie लव्ह सोनिया मनोज वाजपेयी Manoj Bajpai राजकुमार राव Rajkummar Rao रिचा चढ्ढा Richa Chadha फ्रेडा पिंटो Freida Pinto

‘लव्ह सोनिया’ त्या चित्रपटांच्या रांगेत बसतो, जे चांगल्या विषयाला रटाळ कथनामुळे असह्य बनवण्याच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवतात. त्यामुळे हा चित्रपट पूर्णतः वाईट ठरतो अशातला भाग नाही. कारण त्याचं स्पिरीट, विषयाची निवड या गोष्टी त्याच्या बाजूनं चांगल्या आहेत. मात्र चांगलं स्पिरीट आहे म्हणून चित्रपट चांगला ठरत असता तर फिल्म फेस्टिव्हलमधील चांगले, मूलभूत कथानक, पण सादरीकरणात फसलेले चित्रपट पाहून बोअर होण्याचे दिवस आले नसते. फार तीव्र शब्दांत व्यक्त होण्याचा अट्टाहास नसला तरी सत्यापासून फारकत घेण्याची वृत्तीही नाही. त्यातही पुन्हा सिनेमॅटिकली आणि सौंदर्यानुभवाच्या दृष्टीनं जवळपास अपरिणामकारक असणाऱ्या चित्रपटाची त्याच्या विषयामुळे केलेली पाठराखण करणंही नको.

गोष्ट साधी आहे. सोनिया (मृणाल ठाकूर) आणि प्रीती (रिया सिसोदिया) या महाराष्ट्रातील एका गावात राहणाऱ्या दोन बहिणी. शिवाजी (आदिल हुसैन) या त्यांच्या पित्याच्या कर्जाच्या भाराचा परिणाम प्रीतीची विक्री करण्यात होतो. ज्यातून पुढे जाऊन सोनियाही वेश्याव्यवसायात अडकते. परिणामी सोनिया देहविक्रय व्यापाराच्या मोठ्या रॅकेटमध्ये समाविष्ट होते. तिची गोष्ट म्हणजे ‘लव्ह सोनिया’.

या कथानकापर्यंत सर्व काही ठीक आहे. निर्माते काहीसा टॅबू विषय समोर आणत आहेत, जे कौतुकास्पद आहे. मात्र खरी ही आहे की, हा विषय निवडणं म्हणजेच आपण चांगलं काहीतरी निर्माण करत असल्याचा आणि विषयाच्या निवडीपुरतंच आपलं इतिकर्तव्य असल्याचा निर्मात्यांचा समज. कारण त्यानंतर या कथानकावर संस्कार करत, त्याला एक चित्रपट म्हणून समोर आणण्याचा विसर लेखक-दिग्दर्शकांना पडतो. ज्यामुळे समोर येणारी गोष्ट धाडसी विषय आणि त्याला काही प्रमाणात गरजेचा असलेला रफनेस यांचं मिश्रण असलं तरी त्याला सिनेमा या माध्यमाच्या भानाचा लवलेशही जाणवत नाही. ज्यामुळे पूर्वार्धात त्यातील पात्रं आणि काहीशा उत्सुकता निर्माण करणाऱ्या दृश्यांमुळे रंजक वाटणारी कथा पुढे रटाळ बनत जाते.

अलीकडेच आइसबर्ग स्लिमच्या ‘पिंप : द स्टोरी ऑफ माय लाईफ’ नामक पुस्तकाशी परिचय झाला. ज्यात पूर्वाश्रमीचा पिंप अर्थात दलाल असलेल्या लेखक स्लिमनं वेश्याव्यवसाय, त्यात स्त्रियांवर मात करत, नियंत्रित करण्यासाठी आजमावले जाणारे हातखंडे यांसारख्या गोष्टींवर लेखन केलं आहे. त्यात एक भाग आहे. ज्यात स्लिमनं शरीरविक्रय करणाऱ्या इतर महिलांना नियंत्रित करणाऱ्या, आपल्याकडे बहुतांशी आक्का म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्त्रीच्या फसवणुकीचं वर्णन केलं आहे.

‘लव्ह सोनिया’मध्ये उत्तरार्धात अशाच प्रकारचं एक उपकथानक आहे. ज्यामुळे जगभर सर्वत्र आढळणाऱ्या कित्येक संवेदनशील गोष्टींवर करू शकत असलेल्या संभाव्य भाष्याची झलक दिसते. मात्र अशी आंशिक दृश्यं वगळता अधिक विस्तृत पातळीवरील परिणाम करण्यास असफल ठरतो. कारण मुळातच तो या विषयाच्या टॅबू असण्याचं भांडवल करतो. ज्यामुळे त्याच्या दृष्टिकोन आणि एकूणच नजरिया दिखाऊ बनतो.

चित्रपट माध्यमभान विसरून डॉक्युमेंटरी किंवा डॉक्यु-ड्रामा बनण्याच्या दिशेनं वाटचाल करू लागतो. ज्याला पुढे जाऊन ‘क्राईम पॅट्रोल’ किंवा ‘सावधान इंडिया’ वा तत्सम कार्यक्रमांचं स्वरूप प्राप्त होतं. ज्यामुळे चित्रपट पुढे बी-ग्रेड वा तत्सम कार्यक्रमांच्या धर्तीवरील नाट्य-रूपांतरण बनत, या दोन्हींच्या मध्यात आपला तोल सांभाळत राहतो.

शिवाय चित्रपट त्याच्या कलाकारांवर अवलंबून राहण्यात धन्यता मानतो. मृणाल ठाकूर, रिचा चढ्ढा, मनोज बाजपेयी, आदिल हुसैन इत्यादी मध्यवर्ती भूमिकेतील पात्रांपर्यंत ठीक आहे. मात्र पुढे जाऊन राजकुमार राव, सनी पवारसारख्या कलाकारांचं काही एक सेकंदांचं दर्शन चित्रपटाच्या दिखाऊ प्रवृत्तीच्या प्रदर्शनात आणखी भर पाडतात.

दोन तासांची लांबी असलेला हा ‘सोनिया’चा प्रवास उत्तरार्धात दर सेकंदागणिक अधिकाधिक कंटाळवाणा ठरत जातो. ज्याला मुख्यतः एकसंध पटकथेचा अभाव कारणीभूत आहे. कारण दिग्दर्शक-लेखक सोनिया जिथं अडकलेली आहे, त्या मुंबईतील इमारतीमधील दृश्यं आणि सभोवतालाच्या प्रेमात पडल्यासारखे दिसतात. ज्यामुळे या चित्रणात एकापाठोपाठ एक दृश्यांची सरबत्ती केली जाते. जी मूळ कथानकाला पुढे नेण्यास फारशी सहाय्यक ठरत नाहीत. मात्र बहुधा हीच आजच्या काळातील ‘सेक्सी थिंग’ असू शकते, जी माझ्या समजण्यापलीकडे असेल. कारण ‘टिकली अँड लक्ष्मी बॉम्ब’, ‘टॅंजरीन’ आणि आता ‘लव्ह सोनिया’ असे बरेच चित्रपट मूळ कथानक, चित्रपटाची दृश्यभाषा इत्यादी गोष्टी सोडून फक्त त्याच्या गाभ्याशी असलेल्या विषयाशीच बांधिलकी दाखवताना दिसत आहेत.

कदाचित निर्माते सदर चित्रपटाच्या विषयाच्या इतके प्रेमात पडले नसते तर तो अधिक चांगला आणि परिणामकारक ठरला असता. एकूणच ‘लव्ह सोनिया’त त्याचा थेटपणा असलेला (श्लोक शर्माच्या ‘हरामखोर’ची आठवण आणणारा) सोडता विशेष काही नाही.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -