जे. पी. दत्तांनी स्पीलबर्गचं नावही ऐकलं नसावं, असं ‘पलटण’ बघून वाटतं!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
विवेक कुलकर्णी
  • ‘पलटण’चं पोस्टर
  • Sat , 08 September 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie पलटण Paltan जे. पी. दत्ता J. P. Dutta

दिग्दर्शक जे. पी. दत्तांचं भारतीय लष्कराचा इतिहास दांडगा दिसतो. त्यांना आम जनतेला माहीत नसलेल्या गोष्टींची, घटनेची माहिती असते. त्यासाठी ते सतत लष्करातील व्यक्तींशी संपर्कात राहत असतील किंवा त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी लष्कराची असावी. त्यामुळे एक फायदा असा की, इतिहासातल्या घटना पडद्यावर आणायचं मोठं काम आजपर्यंत त्यांनी केलं आहे. ‘बॉर्डर’ व  ‘पलटण’ ही त्याची उदाहरणं. वाळवंट असो की नथू ला नाही तर कारगिल दत्ता कायमच सीमेवर राहिलेले आहेत. ‘बॉर्डर’पासून त्यांच्या कथा सीमेवरच घडणार्‍या व त्याआधीच्या गुजरात-राजस्थानमध्ये. वाळवंटाची पार्श्वभूमी वास्तव चित्रणाला उत्तम जागा. उगाच सेट वगैरे उभे करायची फारशी गरज नाही. त्यामुळेच ‘गुलामी’, ‘बटवारा’ तसेच ‘बॉर्डर’ हे सिनेमे एकदा पाहण्यासाठी तरी चांगलेच होते. सोबत श्रवणीय गाणी ही जमेची बाजू असायची. ‘गुलामी’मधलं गुलज़ारांनी लिहिलेलं अमीर खुसरोच्या सुप्रसिद्ध सूफी कवितेच्या ओळींचा वापर केलेलं ‘जीहाल-ए-मिश्किन मकून-बरंजिश’ हे लता मंगेशकर-शब्बीर कुमारच्या आवाजातलं नितांत सुंदर गाणं, त्याचं चित्रीकरण, सोबत ‘बॉर्डर’ची दोन गाणी ‘संदेसे आते है’ व ‘तो चलूँ’ ही अनू मलिकनी संगीतबद्ध केलेली व अख्खा ‘रिफ्युजी’चा अल्बम यामुळे भारतीय सिनेरसिक कायमचे त्यांच्या ऋणात राहतील. दुर्दैवानं ‘पलटण’ मात्र सुरुवातीपासून एक जाहीरनामा घेऊनच घडलेल्या घटनेचं अवास्तव चित्र उभा करतो.

१९६७ साली सिक्कीम सीमेनजीक नथू ला पोस्टवर लेफ्टनंट कलोनल राय सिंग यादवची (अर्जुन रामपाल) पोस्टिंग होते. तिथं त्याला मेजर बिशेन सिंग (सोनू सुद), कॅप्टन पृथ्वी सिंग डागर (गुरमीत चौधरी), मेजर हरभजन सिंग (हर्षवर्धन राणे) भेटतात. १९६२ च्या भारत-चीन युद्धामुळे दोन्ही देशात तणाव तसाच राहिलेलं आहे. त्याची परिणती सीमेवर चिनी सैनिक काही ना काही खोडी काढून भारतीय सैनिकांना त्रास देत असतात. हा त्यांच्याच ग्रँड स्ट्रटेजीचा भाग असतो असं राय सिंग यादवला वाटत असतं. त्यामुळे एके दिवशी या त्रासाला सहन न झाल्यामुळे दोन्हीकडून सैंनिकांमध्ये तुफान घमासान मारामारी होते. अगदी हातातील बंदुकांऐवजी सीमारेषा म्हणून आखलेले दगडच उचलून ते एकमेकांवर फेकतात. परिणामस्वरूप भारतीय सैनिक एक लोखंडी जाळ्याची सीमारेषाच बांधायचं ठरवतात.

‘युद्धाच्या प्रकारामध्ये आजवर अनेक बदल होत गेले. शस्त्रसामग्रीत झाले, तंत्रज्ञानात झाले, पण माणसांनी माणसांना मारणं हे कधीच बदललेलं नाही. किंबहुना ती युद्धाची संक्षिप्त व्याख्याच आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे कोणत्याही संवेदनशील चित्रकर्त्यानं केलेला युद्धपट हा युद्धविरोधीच असणार हे उघड आहे.’ ‘रम्य नसलेल्या युद्धकथा’ (‘सिनेमॅटिक’) या लेखात ज्येष्ठ समीक्षक गणेश मतकरी त्यांचं मत मांडतात. जे. पी. दत्तांची आतापर्यंतची कारकीर्द बघितली तर ते गणेशच्या मतांशी बिलकुल सहमत नाहीत असंच दिसून येईल. कारण त्यांच्या युद्धापटांच्या या चित्रत्रयीत ‘बॉर्डर’, ‘एलओसी कारगिल’ व ‘पलटण’ या सिनेमांत वीरपुरुषांची शौर्यगाथा याच दृष्टिकोनातून कथेकडे बघितलं जातं. पहिल्या व दुसर्‍या महायुद्धाच्या काळात आलेले हॉलिवुडचे सिनेमेसुद्धा देशबांधवांना युद्धात उतरण्यास उद्युक्त करण्यासाठीच युद्धाच्या भयानकतेला बाजूला सारून देशासाठी प्राणार्पण करणं म्हणजे देशभक्ती, धीरोदात्तपणा दाखवणं अशा पद्धतीनं कथांनकांची रचना करायचे. चित्रण करतानासुद्धा विहंगम दृश्यात सैनिक युद्धावर निघालेत असे दाखवलं जायचं. जेणेकरून ते वीरश्री गाजावायला निघालेत असं प्रेक्षकांना वाटावं. त्यांच्यापासून प्रेरित होऊन लाखो तरुण देशासाठी सैनिक बनतील असा त्यांचा होरा असावा.

त्यामुळे हॉलिवुडच्या त्या सिनेमांसारखं दत्तांना ते मान्य आहे. त्यांना वाटतं लष्करात सामील झालेला तरुण हा वीरमरण प्राप्त करण्यासाठीच जन्माला आलाय. त्यांच्या कुटुंबीयांना आपला मुलगा देशासाठी प्राण देतोय म्हणजे खूप मोठं काम करतोय असं वाटतं. सैनिकांच्या (पुढे वीरपत्नी होणार्‍या) बायका या आपल्या पतीची वाट तर बघत असतात किंवा त्यांच्या आवडीचे पदार्थ तयार करून कधीतरी ते देशाला वाचवून परत येतील, आपलं गुणगान गात ते खातील असंच वाटत असतं. तिकडे प्रत्यक्ष समोर युद्ध ठाकलं असताना भारतीय सैनिकांना त्यांच्या पैशाच्या पाकीटातील पत्नी-प्रेयसीची छायाचित्रं बघून वीरमरण येण्याची प्रेरणाच मिळत असते. सैनिक जेव्हा विरोधी देशाची लढत असतात, तेव्हा ते भारत मातेवर आंच आणणार्‍या चिन्या नाही तर पाकिस्तान्यांचे कोथळे बाहेर काढल्याशिवाय चैनच पडत नसतं. बर्फाळलेल्या प्रदेशात, शरीर गोठवणार्‍या थंडीत उघड्या अंगाने व्यायाम करतात, तेव्हा त्यांचा ‘खून खौल उठता है’. जर लवकरच चिन्या नाही तर पाकिस्तान्यांचा खात्मा केला नाही तर रक्ताचं पाणी पाणी होऊन जाईल, सतत चिनी सैनिकांना तारसप्तकात ओरडून बोलल्याशिवाय आपण त्यांचे विरोधक आहोत, हे सिद्धच करता येत नाही असं वाटत असतं.

भारतीय सैनिक हा नेहमीच जीव हातात घेऊन सीमेवर लढायला जात असतो असं दत्तांना वाटतं. त्यामुळे एकही सैनिक युद्धाच्या विरोधात बोलत नाही. आपण जे करतोय ते फोलपणाचं आहे याचा थोडाही विचार ते करताना दिसत नाहीत. समोरचा शत्रू चिनी असो की पाकिस्तानी तेसुद्धा शेवटी माणूसच आहेत, हा विचार ना पटकथाकार-दिग्दर्शक करतो ना त्यांचे सैनिक. हे असं युद्धं, सैनिक, देश, देशप्रेम वगैरे गोष्टींचं अतिसुलभीकरण करणं हे दत्तांच्या तिन्ही सिनेमांचं वैशिष्ट्य आहे. मुळात त्यांच्या मानसिकतेत सैनिक व देशभक्ती ही शत्रूला चार शिव्या घालणं किंवा गोळ्या त्याच्या छाताडात उतरवणं म्हणजे युद्धांची इतिकर्तव्यता इतपतच आहे.

त्याचा परिणामस्वरूप ठोकळबाज पात्रांनी भरलेली सदोष पटकथा लिहिणं, तिला टाळ्यापिटू, भावनिक संवादांची जोड देणं, हे संवाद इतके बाळबोध की त्याला काही धरबंधच नाही. एकही पात्र वास्तवाचा विचार करून प्रगल्भ बोलेल असं कुठेच आढळून येत नाही. स्वतः दत्तांना ते आवडत नसावं, नाही तर तिन्ही सिनेमात एकदा तरी असे संवाद लिहिण्याचा प्रयत्न केला असता. त्यामुळे सिनेमा सुरुवातीपासून जो कंटाळवाणेपणाचा सूर घेऊन कथा मांडायला सुरुवात करतो, तो शेवटपर्यंत थांबत नाही. एकही प्रसंग गंभीर होऊ द्यायचा नाही जेणेकरून प्रेक्षक त्याच्याशी समरस होईल. कारण तो झाला तर उगाच आपण युद्ध विरोधी सिनेमा बनवू असा विचार त्यांचा मनात येत असावा. मग चित्रणात चुका राहणं दिसून येतं. एका प्रसंगात धो धो पाऊस पडत असतो. ज्यामुळे सर्वत्र चिखल झाला असणार, लगेच पुढील प्रसंगात दुसर्‍या दिवशीची सकाळ दाखवली जाते, तिथं चिखलाचा मागमूस नसतो. जमीन इतकी कोरडीठाक की, तिथं गेल्या कित्येक वर्षांपासून पाऊस पडला नसावा. अशा डोळ्यांना दिसणार्‍या चुकांपासून ते छोट्या छोट्या असंख्य चुका सिनेमात भरून राहिल्या आहेत. त्यामुळे वीरश्रीपूर्ण आवेशानं पण प्रचंड कृत्रिम वाटणारे सैनिक व त्यांचं कृत्य असं सिनेमाचं स्वरूप झालंय.

अशा या सिनेमात कुणी जर अभिनय करत असेल तर तो अर्जुन रामपाल. दुर्दैवानं पटकथेची साथ नसल्यामुळे त्यालाही खूप काही करता येत नाही. बाकीचे अभिनेते कानठळ्या बसवणार्‍या पार्श्वसंगीताच्या आवाजावर वरताण आवाज चढवून बोलतात. त्यामुळे ते नेमकं काय बोलतायत हेच कळत नाही. जावेद अख्तरांच्या शब्दांना अनु मलिकनी चाल लावलीय, हे सिनेमा संपल्यावर श्रेयनामावलीतच दिसून येतं फक्त. संपूर्ण सिनेमात ती ऐकू मात्र येत नाहीत.

‘बॉर्डर’ प्रदर्शित झाला त्याच्या नंतरच्या वर्षी स्पीलबर्गचा ‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’ प्रदर्शित झाला होता. त्यानं युद्धापटांची व्याख्याच बदलून टाकली. युद्धपट कसे असावेत याचा वस्तुपाठच घातला. त्या सिनेमातली सुरुवातीची तीस मिनिटं युद्ध काय असतं याची भयंकर चुणूक दाखवतात. ते बघूनच युद्धाबद्दल किळस निर्माण होते, हेच स्पीलबर्गचं यश आहे. ‘बॉर्डर’च्या यशात चुरचुर झालेल्या जे. पी. दत्तांनी ती पहिली तीस मिनिटं जरी बघितली असते तरी त्यांच्या मनात युद्धाबद्दल एखादा प्रश्न उभा राहिला असता. पण त्यांनी त्याचं नावही ऐकलं नसावं, असं ‘पलटण’ बघून वाटतं. या उपर आणखी काय बोलावं?

.............................................................................................................................................

लेखक विवेक कुलकर्णी सिनेअभ्यासक आहेत.

genius_v@hotmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -