‘टिकली अँड लक्ष्मी बॉम्ब’ : फुसका बार 
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘टिकली अँड लक्ष्मी बॉम्ब’चं पोस्टर
  • Sat , 11 August 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie टिकली अँड लक्ष्मी बॉम्ब Tikli and Laxmi Bomb नेटफ्लिक्स Netflix विभावरी देशपांडे Vibhawari Deshpande चित्रांगदा चक्रबर्ती Chitraganda Chakraborty

फेसबुक आणि व्हॉटसअॅपवरील आभासी जगात समस्त जगाचे आणि समाजाचे संस्कारवर्ग घेणाऱ्या भारतीय जनमानसाला आणि मुख्य म्हणजे इथल्या रोमारोमांत असणाऱ्या दांभिक मानसिकतेला धक्के देण्याचा चंगच ‘नेटफ्लिक्स’नं बांधला असावा. त्यामुळेच कदाचित ‘सेक्रेड गेम्स’मधील लैंगिक दृश्यांची निगेटिव्ह पब्लिसिटी झाल्यावर ‘टिकली अँड लक्ष्मी बॉम्ब’ या वेश्याव्यवसायाभोवती फिरणाऱ्या चित्रपटाच्या निमित्तानं आणखी एका ‘टॅबू’ विषयाला हात घातला आहे. मात्र या विषयाला फक्त स्पर्श करण्याखेरीज विशेष काही करण्यात हा चित्रपट अपयशी ठरतो. 

लक्ष्मी (विभावरी देशपांडे) आणि पुतुल ऊर्फ टिकली (चित्रांगदा चक्रबर्ती) या दोन सेक्स वर्कर्सच्या मध्यवर्ती पात्रांभोवती ही कथा फिरत राहते. मुंबईतील वेश्याव्यवसाय आणि त्यातील वर्षानुवर्षं चालत असलेल्या जाचक, अव्यवहारी अलिखित नियमांना अनभिज्ञ असलेली पुतुल ही तिऱ्हाईत मुलगी जेव्हा इथले नियम बदलू पाहते, तेव्हा त्याचं यशापयश आणि त्याचे परिणाम अशी छोटेखानी संकल्पना म्हणजे ‘टिकली अँड लक्ष्मी बॉम्ब’. 

समस्या अशी आहे की, इथं कागदावरची संकल्पना दृश्य स्वरूपात रूपांतर करताना कुठेतरी हरवून जाते किंवा खरं सांगायचं तर तिला चांगली बनवणारा तिच्यातील अर्कच नकळतपणे नाहीसा होतो. ‘ब्रिज मोहन अमर रहे!’नंतर हाही चित्रपट काही प्रमाणात या गोष्टीचा शिकार म्हणता येईल. कारण वेश्याव्यवसाय, त्यातील अंतर्गत गोष्टी असे बरेच अंडरकरंट्स घेऊन वावरणारी ही संकल्पना (जिला मुंबईचा कॅनव्हास लाभला आहे) तिच्या स्वतःच्या सामर्थ्यालाच कमी लेखते. ज्यामुळे त्यातील सकारात्मक आणि सामर्थ्य ठरल्या असत्या अशा बाबींचं पूर्णत्वास नेलं जाईल, अशा प्रकारचं अन्वेषणच होत नाही. 

याखेरीज घटनांचं भाकित करता येणं ही काहीशी नकारात्मक बाब मानता येईल. ज्यामुळे समोर येणाऱ्या घटनांचा (बहुतांशी वेळा खरा ठरणारा) अंदाज येऊन त्यातील कुतूहल नाहीसं होत जातं. ज्यामुळे एवढा सगळा बिल्ड अप यासाठी म्हणून करायचा होता का, अशी भावना निर्माण होते. जी कुठल्याही चित्रपटाकरिता नक्कीच सकारात्मक नाही. याखेरीज चित्रपट स्वतःचं विश्व उभं करत असला तरीही त्यात बऱ्याचदा अभिनय आणि संवादांबाबत एक खोटेपणाचा अंश जाणवत राहतो. अर्थात चित्रपटाचं चित्रीकरण, त्याचं बजेट आणि बहुतांशी बऱ्याच नंतर मिळालेलं ‘नेटफ्लिक्स’चं पाठबळ या गोष्टी समजण्यालायक असल्या तरी चित्रपटाच्या एकूण परिणामात या उणीवा अडथळा ठरतात आणि खटकतात. स्वतःचं पोटेन्शियल न ओळखता केवळ एक ढोबळ कथानक आणि एकापाठोपाठ एक अशा प्रकारे मारा केली जाणारी, बहुतांशी वेळा अपरिणामकारक ठरणारी दृश्यं यांमुळे चित्रपट कंटाळवाणा होतो. 

विभावरी देशपांडे नेहमीप्रमाणे उत्तम आहेच. सोबत चित्रांगदादेखील तिला गरजेची साथ पुरवते. उपेंद्र लिमये काही वेळा अपरिणामकारक आणि बनावट भासतो. जी खरं तर एकूणच पटकथा आणि पात्रांच्या लेखनातील उणीव म्हणावी लागेल. 

स्वतःच्याच कादंबरीचं पटकथेत रूपांतर करत, नंतर स्वतःच हा चित्रपट दिग्दर्शित करत, पुन्हा त्याला पार्श्वसंगीत देत, गीतलेखन करत इतरही बऱ्याच गोष्टी हाताळणारा दिग्दर्शक कृपलानी ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ या म्हणीवर खरा उतरतो. पार्श्वसंगीत चांगलं असलं तरी ते अहंमन्य, दिखाऊ वाटत राहतं. कारण चित्रणाच्या वास्तववादी पार्श्वभूमीवर ते अगदीच कलात्मक असल्याचा आव आणत राहतं. ज्यामुळे पात्रांमधील लहानसहान महत्त्वाच्या घटनाही चांगल्या होता होता राहून जातात. अदिती शर्माचं छायाचित्रण नैसर्गिक प्रकाशाच्या वापराकरिता उल्लेख आणि कौतुक करण्यासारखं असले तरी काहीवेळा त्यातील दृश्यांचे हँडहेल्ड खटकतात. 

त्यामुळेच अडीच तास लांबीचा हा चित्रपट केवळ एक प्रामाणिक प्रयत्न वगळता अन्य काही ठरण्यात अपयशी ठरतो. निषिद्ध मानल्या जाणाऱ्या विषयाला थेट हात घालण्याचं कौतुक असलं तरी केवळ चांगला प्रयत्न करणं आणि धाडसी असणं, एवढंच पुरेसं ठरत नाही.

थिएटर रिलीज न लाभलेली, मात्र वास्तववादी जग असलेली एक इंडी फिल्म ‘नेटफ्लिक्स’वर आली आणि तिला तिचा प्रेक्षक मिळाला, ही गोष्ट आनंददायी असली तरी सध्या तरी तिच्या केवळ असण्यावरच समाधान मानायला हरकत नाही. कारण तिचं अस्तित्व आणि तिला दिलेला वेळ निराशाजनक ठरण्याची शक्यताच अधिक आहे. 

टीप : ‘टिकली अँड लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट १ ऑगस्ट रोजी ‘नेटफ्लिक्स’ या ऑनलाईन स्ट्रीमिंग नेटवर्कवर प्रदर्शित झाला आहे. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -