‘पिप्सी’ : आशेबरोबरच दिलासा देणारं निरागस मुलांचं भावविश्व 
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी
  • ‘पिप्सी’चं पोस्टर
  • Sat , 28 July 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie पिप्सी Pipsi रोहन देशपांडे Rohan Deshpande

लहान मुलांचं भावविश्व खूपच वेगळं असतं. त्यामध्ये निरागसता तर असतेच, शिवाय परिकथेच्या कल्पनाही असतात. फक्त त्या मोठ्या माणसांना कधीच समजत नाहीत. लहान मुलांच्या भावविश्वाची वेगवेगळ्या मार्गानं ओळख करून देणारे अनेक मराठी चित्रपट अलीकडच्या काळात येऊन गेले. ‘पिप्सी’ हा नवीन मराठी चित्रपटही असाच लहान निरागस मुलांचं भावविश्व अधोरेखित करतो. मात्र चित्रपटाची कथा आणि तिचं सादरीकरण पाहता ती केवळ एखाद्या लहान मुलगी व मुलाच्या भावविश्वाची कहाणी होत नाही, तर ती कहाणी संपूर्ण बालविश्वाला सामावून घेऊ शकते. शिवाय सध्याच्या जगण्याच्या संघर्षाचा आलेखही ती मांडते. त्यामुळे ती अधिक भावते.

या चित्रपटामध्ये पाहायला मिळते ती चानी (मैथिली पटवर्धन) आणि तिचा बालमित्र बाळू (साहिल जोशी) यांच्या भावविश्वातील कल्पनारम्य कथा. चानी ही एका गरीब शेतकरी कुटुंबातील शाळकरी मुलगी. तिची आई खूप आजारी असते आणि ती फार फार तर तीन महिन्यांची सोबती आहे, असं डॉक्टरांनी घरातल्यांना सांगितलेलं असतं. डॉक्टरांचं हे सांगणं चानीनंही ऐकलेलं असतं. त्यामुळे ती साहजिकच अस्वस्थ होते.

त्याचदरम्यान ती एका कीर्तनकाराची कथा ऐकते. त्या कथेमध्ये एका माशाला जीवदान देऊन त्याला वाढवणारा राजा संकटात सापडला असताना तो मासा त्याचे प्राण कसे वाचवतो याची गोष्ट असते. निरागस चानीलादेखील आपण एखाद्या माशाला असंच वाचवलं तर तो आपल्या आईचे प्राण नक्कीच वाचवेल आणि आपली आई आपल्याला सोडून जाणार नाही असं वाटतं. योगायोगानं घरात खाण्यासाठी आणलेल्या माशांपैकी एक छोटा मासा तिला जिवंत आढळतो आणि ती त्याला जीवदान देण्यासाठी त्याला पाण्यानं भरलेल्या पेल्यात ठेवते. आणि केवळ आईसाठी नंतर त्या माशाला कोणत्याही परिस्थितीत जगवणं हाच तिचा एककलमी कार्यक्रम बनतो.

या कामात तिला तिचा शाळकरी मित्र बाळू हरतऱ्हेची मदत करतो. या माशाचं चानी कशा प्रकारे पालनपोषण करते आणि त्या माशाचं व तिच्या आईचं शेवटी काय होतं, यासाठी आणि विशेषतः चानी आणि बाळूसाठी हा चित्रपट पाहायला हवा.

चित्रपटाची संकल्पना खूपच चांगली आहे. आणि या संकल्पनेला साजेशी सौरभ भावे यांची कथा आणि पटकथा आहे. त्यामुळे चानी आणि बाळूच्या भावविश्वात रंगून जायला वेळ लागत नाही. माशाला वाचवण्यासाठी चानी आणि बाळूनं केलेल्या धडपडीचे काही प्रसंग खूपच छान जमले आहेत. मासा काचेच्या बाटलीत ठेवला तर अधिक चांगला म्हणून त्यासाठी बाळूनं आपल्याच दुकानातून चोरलेली बाटली आणि त्यामुळे नोकराची नोकरी गेल्यामुळे पश्चाताप होऊन चोरीची दिलेली कबुली.. त्यानंतर त्या माशाचा दारूच्या बाटलीतून झालेला प्रवास गंमतीबरोबरच अंतर्मुख करणाराही आहे.

मात्र चित्रपटाच्या कथेला विदर्भातील दुष्काळाची आणि त्यामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचीही जोड देण्यात आली आहे. परंतु हे उपकथानक दिग्दर्शकाला पाहिजे त्या क्षमतेनं हाताळता आलेलं नाही. (केवळ पाण्याचे दुर्भीक्ष दाखवण्यासाठी हे उपकथानक जोडण्यात आलं आहे की काय अशी शंका येते.)

केवळ चानीच्याच कथेवर पूर्ण भर दिला असता तर त्या कथेची पकड अधिक घट्ट झाली असती. गावाबाहेर रेल्वे रुळांच्या जवळ असलेला जुना रेल्वेचा डबा आणि त्यामध्ये बसून चानी आणि बाळूने पाहिलेले रेल्वेप्रवासाचं स्वप्न उभयतांच्या निरागस मनाचं भावविश्व अधिक गहिरे करून जातं. रेल्वे प्रवासात पेप्सी पिण्याची हौस आणि तो मासाही बाटलीतील पेप्सीसारखा काळ्या रंगाचा आणि गोड असल्यामुळे त्याला (आणि चित्रपटालाही) दिलेले ‘पिप्सी’ हे नाव समर्पक वाटतं. देबार्पितो यांनी संगीतबद्ध केलेली गाणीही कथिल पूरक आहेत.  

मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशी यांनी अनुक्रमे चानी आणि बाळूच्या भूमिकेत खूपच प्रभावी अभिनय केला आहे. यापूर्वी साहिलनं ‘रिंगण’ या चित्रपटातही अशीच छान भूमिका केली होती. याशिवाय अभिलाषा पाटील आणि अतुल महाले (चानीचे आई-बाबा), तसंच अजय जाधव आणि पूजा नायक (बाळूचे आई-बाबा) यांच्याही भूमिका चांगल्या वठल्या आहेत.

थोडक्यात ‘पिप्सी’च्या बाटलीतील हे पेय  आशेबरोबरच नक्कीच दिलासा देणारं आहे. 

.............................................................................................................................................

लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.

shree_nakul@yahoo.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................