‘मिशन इम्पॉसिबल : फॉलआऊट’ - परफेक्ट ओल्ड-स्कूल गुप्तहेरपट 
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘मिशन इम्पॉसिबल : फॉलआऊट’चं पोस्टर
  • Sat , 28 July 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti इंग्रजी सिनेमा Englishi Movie मिशन इम्पॉसिबल : फॉलआऊट Mission: Impossible – Fallout

आण्विक शस्त्रांचा महायुद्धांमधील सढळ हातानं झालेला वापर, पुढे शीत युद्धादरम्यान आणि नंतरच्या काळातही या शस्त्रांच्या अस्तित्वात असल्यानं कधी काय होईल, याच्या शाश्वतीच्या अभावामुळे, तसंच जागतिक पातळीवरील शस्त्रसज्जतेच्या निमित्तानं जवळपास सर्वच महत्त्वाची राष्ट्रं आण्विक शस्त्रांचा साठा करू लागली. याखेरीज पुढील दशकांत चीन, कोरियासारख्या देशांतील शासनकर्ते स्टॅलिन, हिटलर इत्यादी लोकांचा वारसा पुढे चालवतील असं वर्तन करत असल्यानं आंतरराष्ट्रीय पातळीवर कायम युद्धाच्या भीतीचं सावट पसरलेलं असतं. ज्याला अधूनमधून सीरियासारख्या रूपात तोंड फुटतं. 

सांगायचा मुद्दा असा की, ‘आण्विक हल्ल्यांची संभावना’ हा विषय चित्रपटांमध्ये वेळोवेळी दिसून येतो. त्यातही पुन्हा अॅक्शन-पॅक्ड थ्रिलर प्रकारातील चित्रपटांमध्ये हा विषय बऱ्याचदा दिसून आलेला आहेच. ‘मिशन इम्पॉसिबल : फॉलआऊट’च्या निमित्तानं याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा (जवळपास) अभेद्य नायकाच्या जगाला वाचवण्याच्या साहसी कामगिरीची अभूतपूर्व अनुभूती मिळते. 

‘आयएमएफ’चा स्टार एजंट इथन हंट ‘घोस्ट प्रोटोकॉल’नंतर परत आलेला असतो. सॉलमन लेन (शॉन हॅरिस) हा पूर्वाश्रमीचा एमआय एजंट, सिंडिकेटचा सर्वेसर्वा आणि सध्याचा देशद्रोही आरोपी त्याच्या ‘द अपॉसल्स’ या समूहाच्या सहाय्यानं आण्विक हल्ल्यांचा कट रचत आहे, हे या चित्रपटाचं वन लायनर, स्पॉयलर फ्री कथानक आहे. स्पॉयलर फ्री यासाठी की ‘एमआय 6’, ‘सीआयए’ आणि ‘आयएमएफ’मधील फितूर झालेल्या लोकांच्या अस्तित्वामुळे आणि उल्लेखामुळे कथानक बरीच अपेक्षित-अनपेक्षित वळणं घेत पुढे जात राहतं. ज्यामुळे त्याबाबत सविस्तर बोलणं स्पॉयलर्समध्ये रूपांतरित होऊ शकतं. 

याव्यतिरिक्त नेहमीप्रमाणे या मिशनमध्ये इथन हंटसोबत (टॉम क्रूझ) बेंजी (सायमन पेग) आणि लुथर हे दोन विश्वासू सहकारी आहेतच. शिवाय या चित्रपट मालिकेतील पहिल्या चित्रपटाचा, ‘रोग नेशन’चा दिग्दर्शक क्रिस्टोफर मॅक’क्वेअरीदेखील परतला आहेच. 

असं क्वचितच होतं की, एखाद्या चित्रपटातील जवळपास सर्वच गोष्टी जमून येतात. त्यातही थ्रिलर चित्रपट, फितूर लोकांचे सबप्लॉट्स, अचानक येणाऱ्या आणि गायब होणाऱ्या नायिका अशा बऱ्याच गोष्टी असलेल्या हेरपटात तर असं सर्व गोष्टींचं भान विसरू न देता केलेलं चित्रण तसं दुर्मीळच. त्यामुळे गुंतागुंतीची पटकथा असली तरीही त्यात लूपहोल्स नाहीत. एखादी उणीव सांगायचीच झाल्यास काही घटनांचं सहजपणे खरं ठरणारं भाकित करता येणं, हीच काय ती चित्रपटाच्या एकूण परिणामावर नकारात्मक परिणाम करेल अशी बाब आहे. 

अर्थात ही गोष्टही दुर्लक्ष करता येण्यासारखी आहे. ज्याचं कारण म्हणजे दिग्दर्शक-लेखक मॅक’क्वेअरीची तगडी आणि कथानकाला आवश्यक असलेल्या जलदगतीनं पुढे नेणारी पटकथा. तसंच रॉब हार्डीचं विशेष छायाचित्रण. 

सध्या विविध फ्रँचायजेसचा बहराचा काळ सुरू आहे. एकीकडे मार्व्हलचं विश्व आणि सुपरहिरो जॉन्रमधील चित्रपट एकीकडे बहरत, तर डीसीचं विश्व कोसळत असताना इतर ज्या काही मोजक्या फ्रँचायजेस शिल्लक आहेत, त्यात हेरपटांना विशेष स्थान आहे. त्यातही जेम्स बाँडनंतर उल्लेख करावी अशी चांगली चित्रपट मालिका म्हणून ‘मिशन इम्पॉसिबल’ ऊर्फ ‘एमआय’चा उल्लेख करता येतो. त्यातही आणखी चांगली बाब म्हणजे ही फ्रँचाइज उत्तरोत्तर अधिक उत्तम बनत चालली आहे. या मालिकेतील हा पाचवा चित्रपट याचंच द्योतक आहे. 

मॅक’क्वेअरीचं लेखन असो वा दिग्दर्शन, त्याला तणाव हाताळणे योग्यरीत्या जमतं. उदाहरणार्थ साधारण सव्वा दोन तास लांबीच्या या चित्रपटात दर वीसेक मिनिटांनी या ना त्या रूपात प्रेक्षकाला थरार अनुभवायला मिळेल याची काळजी तो घेतो. त्यामुळे समोरील वेगवान दृश्यांदरम्यान निर्माण होणाऱ्या नायकानं वाचण्याच्या इच्छेपुढे चित्रपटाचं अपेक्षित ठरणं नगण्य ठरतं. बाकी लॅलो शिफ्रिनची ओरिजनल थीम थरारक साहसदृश्यांची सोबत मिळाल्यास अजूनही अंगावर शहारे आणतेच. आणि इथं सदर दिग्दर्शक टॉमच्या सहाय्यानं ते हमखास साध्य करतो. 

‘क्वेंटिन टॅरंटिनो’च्या ‘जँगो अनचेन्ड’वरील रॉजर इबर्टच्या लेखाचे शीर्षक - फास्टर, क्वेंटिन! थ्रिल! थ्रिल! - असं होतं. इथं टॉम क्रुझच्या ‘मिशन इम्पॉसिबल : फॉलआऊट’बाबत बोलताना क्वेंटिनची जागा ‘टॉम’ हे नाव घेईल इतकाच काय तो फरक. अर्थात यात दिग्दर्शक क्रिस्टोफरदेखील तितकाच महत्त्वाचा भाग आहेच. 

एकूणच ‘शांती प्रस्थापित करण्यासाठी आधी विध्वंस करावा लागेल’ या तत्त्वाला जागू पाहणाऱ्या लोकांशी दोन हात करत जगाला वाचवणाऱ्या हंटची ही कामगिरी पाहता त्याबाबत एकच म्हणता येईल. ते म्हणजे हंट हा धोक्याच्या वेळी विश्वास ठेवता येईल अशी व्यक्ती आहे. ही इज द हिरो वुई नीड, द वन वुई कॅन रिलाय अपॉन!

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................