‘संजू’मधला संजय काढला तर शेवटपर्यंत लक्षात राहतो तो ‘रणबीर’!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
श्वेता वर्षा विजय
  • रणबीर कपूरच्या विविध मुद्रा
  • Mon , 02 July 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie संजू Sanju राजकुमार हिरानी Rajkumar Hirani रणबीर कपूर Ranbir Kapoor संजय दत्त Sanjay Dutt

काही लोकं जन्मतःच प्रतिभावंत असतात. पण जन्मतःच मिळालेली प्रतिभा ही टिकवावी लागते. वेळोवेळी दाखवावी लागते. त्याशिवाय तिला मान्यता मिळणं कठीण. आपल्यातले सुप्त गुण सतत धक्के देत बाहेर काढून जोरदार चपराक मारावी लागते, त्याशिवाय प्रतिभावंत असण्याला दर्जा मिळत नाही.

प्रतिभा आहे हे दाखवण्यासाठी प्रतिमा ही बदलावी लागते, त्याचंच ताजं उदाहरण म्हणजे रणबीर कपूर. कपूर घराण्याचा वारस. कपूर म्हटलं की अभिनय आलाच. त्याचं काहीही कौतुक नाही. याच कपूर घराण्यानं एकापेक्षा एक सरस अभिनेते बॉलिवुडला दिले. त्यात रणबीर कपूर या नावाची अजून एक भर.

‘सावरिया’मधून झालेलं सुपर फ्लॉप पदार्पण, त्यात त्यानं साकारलेला राज अगदी साधा, सरळ आणि तितकाच रोमँटिक, पण चित्रपटाच्या फ्लॉप सोबतच, अजून एक बिघडलेलं/ लाडावलेलं स्टारकिड येणार आणि जाणार अशी त्याच्याबद्दलची भावना. त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या अफेअर्सची जास्त होणारी चर्चा यावरून तो फक्त ‘कपूर’ आहे, इतकंच त्याच्याविषयीचं मत. दिसायला स्मार्ट, हँडसम असलेला पण अभिनयाच्या बाबतीत शून्य असा हा कपूर टिकणार नाही इथपर्यंतचा विचार. पण रणबीर टिकला, टिकला नाहीतर त्यानं दाखवून दिलं की, ‘अभिनय’ काय असतो. हे सगळं दाखवत असताना धक्के बसले, हिट-फ्लॉपमध्ये तोही अडकला, पण पाय रोवून उभा राहिला.

रणबीर त्याच्या समकालीन अभिनेत्यांसमोर फ्लॉप आहे, त्याच्याकडे फक्त कपूर हे बिरुद आहे, हे सगळं त्यानं मान्य केलं आणि बोलणाऱ्यांना आपल्या चित्रपटातून गप्प केलं. त्याचा कुठलाच चित्रपट हा जरी खान कंपनी इतका सुपरहिट नाही किंवा सिक्स पॅक अँब्स बनवून मारधाडीचे चित्रपट त्यानं केलेच नाहीत (याला अपवाद ‘संजू’). त्यानं निवडलेले चित्रपट हे त्याच्या दृष्टीनं योग्य होते, हे त्यानं पाहिलं आणि त्याच्या चाहत्यांनी त्याला स्वीकारलं.

‘वेक अप सिड’मधलं श्रीमंत बापाचं आळशी मुलगा ते स्वतःकडे नव्या नजरेनं, उमेदीनं बघणारा टीनएजरही त्यानंच साकारला. ‘राजनीती’चा राजकारणी समर. ‘राजनीती’सारख्या मल्टिस्टारर चित्रपटात त्यानं वठवलेला समर चलाखीनं लक्षात राहतो. तर तितक्याच ताकदीनं साकारलेला ‘जॉर्डन’. जॉर्डन जिवंत वाटावा इतकं जीव ओतून त्यानं केलेलं काम, पण तरीही ‘सुपरस्टार’ असा हा अभिनेता आहे, ही मान्यता त्याला मिळाली नाही. अर्थात इम्तियाज अलीच्या ‘रॉकस्टार’नं त्याला सशक्त, नैसर्गिक अभिनयाचे गुण असलेला अभिनेता ही ओळख दिली. त्यानंतरचा त्याचा ‘बर्फी’. त्यात त्यानं साकारलेली मूक-बधिर तरुणाची भूमिका उत्तम साकारली. त्याच्यात अभिनयाचे असलेले सुप्त गुण त्यानं म्युटमध्ये दाखवले. वेगळ्या धाटणीचे चित्रपट व त्यात साकारलेली प्रत्येक कलाकृती ही नैसर्गिक, जिवंत वाटावी हा त्याचा अट्टहास.

‘बर्फी’पर्यंतचा प्रवास सोपा नव्हता अनेक हॉलिवुडपटांची कॉपी असा लागलेला शिक्का असो की अभिनयासाठीची ‘वाह वा..!’ हे सारं त्यानं स्वीकारलं. यावेळेपर्यंत तो फक्त कपूर नव्हता राहिलेला. तर रणबीर कपूर म्हणून त्याचं एक वेगळं स्थान आहे, ही मान्यता त्याला जवळपास मिळाली होती. यानंतर आलेला त्याचा ‘ये जवानी है दिवानी’ने त्याला ‘सुपरस्टार’ हे स्थान देण्यास भाग पाडलंच. ‘बनी’ला तरुणाईनं अक्षरशः डोक्यावर घेतलं. स्वप्न पूर्ण करणारा बनी प्रत्येकाला आपल्यातलाच एक वाटू लागला. ‘सुपरस्टार रणबीर कपूर’ स्वतःला सिद्ध करण्यापर्यंतची घेतलेली मेहनत, हे शेवटपर्यंत टिकवावी लागते, अर्थात रणबीर यात काही अंशी मागे पडला. ‘सुपरस्टार बनण्याआधी मला सुपर अॅक्टर बनायला आवडेल...!’ हे त्याचं मत.

अनेक फ्लॉप चित्रपटानंतर त्याच्या सुपरस्टार पदावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. याला अपवाद ‘तमाशा’. त्यामध्ये त्यानं साकारलेला डॉन आणि वेद हे दोन्ही पात्र लक्षात राहतात. वेद असतानाचा गुदमरणारा रणबीर तर डॉन झाल्यावर मुक्त वावरणारा रणबीर ही दोन्ही पात्रं त्यानं अतिशय शिताफीनं हाताळली. ‘तमाशा’च्या वेळी, ‘रणबीरच एक वैशिष्ट्य आहे, तो त्याच्या कामाप्रति प्रामाणिक असतोच, पण त्याच्या इतका व्हर्सटाइल आणि नैसर्गिक अभिनय क्षमता असलेला अभिनेता मी पाहिला नाही,’ हे इम्तियाज अलीचम त्याच्याबद्दलचं मत खरं ठरतं, ते तमाशा बघितल्यावर.

सुपरस्टार असो की सुपरफ्लॉप, रणबीर हा ताकदीचा अभिनेता आहे, हे आतापर्यंत मान्य झालंच आहे. बाकी त्याच्या चित्रपटात अभिनयात दिसणारा तोचतोपणा अनेकदा त्याच्या त्याच अभिनयावर विचार करायला लावतो. रणबीर त्यालादेखील पुरून उरतो.

रणबीरचे सिनेमे, त्याचा प्रवास, अफेअर्स अशा अनेक गोष्टी सतत त्याच्या वरील चर्चेस कारणीभूत आहेत. अॅक्शन, हिस्टोरीकल सिनेमापासून तो दूरच तसे चित्रपट त्याला जमत नाही किंवा त्याला तसे रोल सूट होत नाहीत, अशा अनेक गोष्टी आहेत. पण त्याने निवडलेले चित्रपट प्रामाणिकपणे केले. स्वतःला यश-अपयशा सकट स्वीकारलं. सोशल मीडियावर त्याचा नसलेला वावर त्याला बऱ्याच प्रमाणात संशयी ठरवतो. याबाबतीत त्याचं सरळ मत आहे, ‘सोशल मीडियावर खोटेपणाचा आरसा आहे, अर्थात तो मला नकोय. म्हणून मी सोशल मीडियावर नाही.’

एकापेक्षा एक सरस नायिका रणबीर नावाच्या या एका गोष्टीमागे घुटमळताना दिसतात, यावरूनच त्याचं वलय लक्षात येतं. रणबीरच्या अभिनयात राज कपूरचा वारसा दिसतो, हे स्पष्ट झालंय. त्याच्या स्वतःच्या फिल्मी करिअर बाबतीत त्याच मत ‘अभिनयाच्या बाबतीत माझा कुठला खास फॉर्म्युला नाहीये, मी फक्त माझ्या हृदयापासून काम करतो, इतकंच...!’ त्याच्या याच कामामुळे त्याच्या हाती लागला ‘संजू’. अभिनेता संजय दत्तची बायोपिक. हा चित्रपट जरी संजय दत्तची बायोपिक असला तरी, त्यात रणबीर कपूर आपली छाप सोडतोय. तरुणपणीचा संजय तर पन्नाशी गाठलेला संजय. यात रणबीरने घेतलेली मेहनत. त्याला पुन्हा यशाच्या शिखरावर पोहोचवायला पुरेशी आहे.

स्वतःच स्टारडम, प्रसिद्धी, अभिनय या गोष्टीचं उत्तम मेळ साधलेला त्याने दिसतो. स्वतःच खासगी आयुष्य खूप कमी प्रमाणात जगासमोर आणणं. त्यातही विचारपूर्वक वागणं, अभिनेता असल्याचा इगो नसणं. कोणाच्या मागे न धावता, स्वतःच स्थान निर्माण करणं व बोलणाऱ्यांना चपराक मारणं. यासाठी त्याने केलेला विचार यावरून त्याची संवेदनशीलता समजते.

अभिनेता म्हटलं की, फक्त सिक्स पॅक अँब्ज नव्हे तर फक्त अभिनय करून, सुप्त गुणांच्या बळावर आपल्याला दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडणं. त्या भूमिकेत शिरणं महत्त्वाचं. स्वतःच्या चांगल्या- वाईट बाजू मांडणं व त्यावर बोलणं. आपल्यातला कलाकार खऱ्या अर्थानं पडद्यावर साकारणं, कास्टिंग काऊच असो वा इतर गोष्टी यावर बोलणं. त्यासाठी असलेली वैचारिकता. ‘संजू’मधला संजय काढला तर शेवटपर्यंत लक्षात राहतो तो रणबीर. आणि हेच लक्षात राहणं त्याला वेगळं ठरवतं. अर्थात तो सुपरस्टार आहे, हे तो खऱ्या अर्थानं सिद्ध करतो.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......