‘इन्क्रेडिबल्स २’ : द सीक्वेल वुई नीड, द सीक्वेल वुई डिझर्व्ह 
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘इन्क्रेडिबल्स २’चं पोस्टर
  • Sat , 23 June 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti इंग्रजी सिनेमा Englishi Movie इन्क्रेडिबल्स २ Incredibles 2

‘इन्क्रेडिबल्स’ (२००४) या चित्रपटानं अगदी सुपरहिरो चित्रपटांचं पुनरुज्जीवन किंवा तत्सम काही केलं नसलं तरी त्यानं अलीकडे स्तोम माजलेल्या या जॉनरमधील चित्रपटांच्या मानानं अगदी लेखन ते दिग्दर्शन अशा बऱ्याच (किंबहुना सगळ्याच) पातळींवर उत्कृष्ट कामगिरी करत, एका अभूतपूर्व विश्वाची रचना केली होती. आता तब्बल १४ वर्षांनी लेखक दिग्दर्शक ब्रॅड बर्डनं पूर्वीचा चित्रपट ज्या उपसंहारादरम्यान आणून सोडला होता, तिथूनच सुरू होत, १४ वर्षांचं अंतर अगदी कालचं वाटावं अशा प्रकारे सर्व रचना करत, ‘इन्क्रेडिबल्स २’ची मूलभूत मांडणी आणि प्रस्तावना करत एका अद्भुत सोहळ्याला सुरुवात केली आहे. 

बॉब पार ऊर्फ मिस्टर इन्क्रेडिबल (क्रेग टी. नेल्सन) आणि त्याची पत्नी हेलन ऊर्फ इलास्टिगर्ल (हॉली हंटर) हे ‘सिंड्रोम’ला हरवल्यानंतर त्याच्या कुटुंबासमवेत ‘द अंडरमायनर’ (जॉन रॅत्झेनबर्गर) या नवीन सुपरव्हिलनशी लढाई करत असतानाच पार्श्वभूमीवर आणखीही घटना घडत असते. जिच्या मदतीनं ‘इन्क्रेडिबल्स’च्या उपसंहाराच्या दृश्यात आणि त्यानिमित्तानं त्या विश्वात प्रवेश होतो. ज्यादरम्यान एक छोटेखानी, पण उत्कंठावर्धक दृश्य पहायला मिळतं. ज्याच्या शेवटी मूळ प्रश्न मात्र बाकी असतो, तो म्हणजे सुपरहिरोंच्या बेकायदेशीर असण्याचा. 

मग इथंच काही अंडरग्राउंड राहून, आपली ओळख लपवत जगण्याची गरज आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्या पार कुटुंबाच्या आयुष्यात, ‘फ्रोझोन’करवी (सॅम्युएल एल. जॅक्सन) दोन व्यावसायिक येतात. विन्स्टन डिवर (बॉब ओडेनकिर्क) आणि एवलिन डिवर (कॅथरिन कीनर) जे त्यांच्या आयुष्यातील वैयक्तिक कारणांमुळे सुपरहिरोंच्या बाजूनं आहेत. (ज्यानिमित्तानं एक फ्लॅशबॅकमधील छानसं दृश्य दिसतं.) आणि त्यांना या कुटुंबाला आणि ओघानंच सर्व सुपरहिरोंना मदत करत सुपरहिरोंवरील बंदी उठवत त्यांना कायदेशीर मान्यता मिळवून द्यायची आहे. ज्याच्या प्लॅनचा भाग आणि पहिली फेज म्हणून (इथं ‘मार्व्हल’च्या फेजेसची खिल्ली उडवण्याचा उद्देश असू शकतो) डिवर भावा-बहिणीच्या व्यावसायिक मेंदूतून निघालेल्या पीआर स्ट्रॅटजीसमान प्रसिद्धी तंत्राच्या माध्यमातून फक्त इलास्टिगर्लला एका मिशनवर जाऊन सुपरहिरोंची मलीन प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. ज्यामुळे ओघानेच बॉबकडे मुलांचं संगोपन आणि पालन करायची जबाबदारी आलेली आहे. 

‘इन्क्रेडिबल्स’च्या दोन्ही भागांबाबत (डिस्ने-पिक्सारच्या इतरही चित्रपटांप्रमाणेच) महत्त्वाची बाब अशी की, तो एकाच वेळी सुपरहिरोंचं विश्व, त्यात ‘सिम्पसन’वजा राजकीय अंडरकरंट्स आणि इतर सामजिक बाबी यांखेरीज ‘अमेरिकन फॅमिली'’ही जी संकल्पना आहे, तिचा उत्सव साजरा करतो. एक असं कुटुंब जे सुपरहिरोंचं कुटुंब असलं तरी त्यांच्या प्रत्येकाच्या समस्या आहेत, भावना आहेत, त्यांच्यातील उणीवा आहेत. मात्र त्या सर्वांना एकत्र आणत त्यांना बांधून ठेवणारा घटक म्हणजे त्यांच्यातील प्रेम आणि कुटुंब ही संकल्पना. 

त्यामुळे एकीकडे इलास्टिगर्लचा ‘स्क्रीनस्लेव्हर’ या सुपरव्हिलनशी लढा सुरू असताना दुसरीकडे बॉब हा त्याच्या मिडलाइफ क्रायसिसशी आणि मुलांच्या संगोपनात येणाऱ्या अडचणींना सामोरं जात असतो. तर डॅश (हक मिलनर ज्याने स्पेन्सर फॉक्सची जागा घेतली आहे.) त्याचा अभ्यास आणि नेहमीसारखा चंचलपणा आणि व्हायोलेट (सॅरा वॉवेल) तिच्या टीनेजमधील प्रेम आणि इतर समस्यांशी सामना करत असतात. ज्यामुळे हे इन्क्रेडिबल कुटुंब आणि त्यांचं विश्व वास्तविकतेशी आपली नाळ कायम ठेवून राहतं. कारण एरवी सुपरहिरो असणारं हे कुटुंब जवळ जाऊन पाहिल्यास सामान्य कुटुंबांइतकंच सामान्य आहे. 

याखेरीज ‘इन्क्रेडिबल्स २’ हा ‘स्क्रीनस्लेव्हर’च्या माध्यमातून का होईना पण समोरच्या पडद्यावर किंबहुना न्यूजवर आपल्याला काय आणि नेमकं कसं दाखवलं जात आहे आणि त्यातील ‘इमेज बिल्डिंग’ ही सर्रास वापरली जाणारी संकल्पना अगदी संयतपणे चितारत तिचा दुरुपयोग (किंवा किमान तशी शक्यता) समोर आणतो. 

तर त्याच वेळी जॅक त्याच्या सुपरपॉवर्स एक्सप्लोअर करण्याच्या एका आकर्षक आणि कल्पक दृश्यात त्याची एका रॅकूनशी सुरू असलेली लढाई सुरू असताना बर्डच्या अशक्यप्रायरीत्या कमालीच्या लेखनाचा आणि दिग्दर्शनाचा प्रत्यय येतो. 

वर्किंग वुमन, मिडलाइफ क्रायसिस, बायको काम करत असताना स्वतः घरात बसण्याच्या भावनेनं ग्रासलेला आणि ही गोष्ट म्हणजे एकप्रकारे पुरुषत्वाला आव्हान मानणारा पती या आणि इतरही बऱ्याच गोष्टींचा वेध घेत त्यानं कधी काळी ‘सिम्पसन’वर काम केलं असण्यामागील कारण आणि बुद्धिमत्तेची झलक पाहायला मिळते. बाकी चित्रपटात एडना (ब्रॅड बर्ड) परत आली आहे. 

अर्थात इथं पहिल्या चित्रपटातील ‘सिंड्रोम’इतका एखाद्या विशिष्ट कारणानं पुढे जात कृत्य करणारा खलनायक नसल्याची उणीव भासते. कारण इथला खलनायक ‘अल्टर इगो’समान सूत्रानं आपली ओळख लपवत आपलं काम करत असतो. ज्यामागील कारणही एकवेळ समजण्यासारखं असलं तरी हा खलनायक जरा कमकुवत वाटत राहतोच. हे सोडता चित्रपटात इतर काही उणीव भासण्याची शक्यता नाहीच. 

संगीताच्या बाबतीत हाही इतर पिक्सार चित्रपटांइतकाच परफेक्ट आहे. पिक्सार आणि बर्डचा फ्रिक्वेंट कॉलॅबरेटर असलेला अगदी ग्रॅमी ते ऑस्कर बरंच काही जिंकलेला कंपोजर मायकल जकिनो त्याच्या जेम्स बॉन्ड-वजा ओरिजनल स्कोअर ‘इन्क्रेडिबल्स २’ची शान वाढवतो. अगदी सुरुवातीलाच आलेल्या टिपिकल ‘इन्क्रेडिबल्स’ शैलीतील ट्यून थेट त्या विश्वात घेऊन जाते. शिवाय ‘एंड क्रेडिट्स’दरम्यान ‘इन्क्रेडिबल्स’ची ओरिजनल (आणि नॉस्टॅल्जिक) थीम वाजते ते वेगळंच. 

एकूणच मार्व्हलचं बऱ्याच वर्षांची तयारी करून उभं केलेलं युनिव्हर्स आणि टाइमलाईन, तसंच इतर नको त्या चित्रपटांचे नको तितके सीक्वेल्स यांना कंटाळला असाल तर या ‘The sequel we need, the sequel we deserve’ ही संकल्पना आणि त्यानिमित्तानं निर्माण होणाऱ्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या या केवळ मुलांकरिता नसलेल्या चित्रपटाकडे सिरियसली पाहायला हवं. 

टीप : अलीकडे डिस्नेच्या चित्रपटांचा एक भाग बनलेल्या फीचर फिल्मपूर्वी एक शॉर्ट फिल्म दाखवण्याचा अलिखित नियमानुसार ‘इन्क्रेडिबल्स २’च्या आधी डोमी शी दिग्दर्शित ‘बाओ’ (Bao) नामक एक शॉर्ट फिल्म दाखवली जाईल. ती चुकवू नये अशी आहे. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................