‘रेस ३’ : फक्त स्वतःची प्रतिमा जपणारा वलयांकित चेहरा असणारा ‘भाईजान का जलवा’!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
विवेक कुलकर्णी
  • ‘रेस 3’चं एक पोस्टर
  • Sat , 16 June 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie रेस 3 Race 3 रेमो डिसूझा Remo D'Souza सलमान खान Salman Khan

दहा वर्षांपूर्वी पहिला ‘रेस’ आला, तेव्हा त्यातली गाणी व अब्बास-मस्तानच्या अनुभवी दिग्दर्शनाने त्या अॅक्शन थ्रिलरला लोकांचा विश्वास जिंकायला बरीच मदत केली होती. सस्पेन्स मास्टर अशी बिरुदावली लावून घेणारे हे दिग्दर्शकद्वय मुळात धक्कातंत्राला सस्पेन्स म्हणून वापरतात. हे त्यांच्या ‘खिलाडी’ या यशस्वी सिनेमापासून दिसून आलय. ‘रेस’ अॅक्शन थ्रिलर असला तरी त्यात थ्रिलरपेक्षा पात्रांना व प्रेक्षकांना टप्प्याटप्प्यावर धक्का देणे हा मोठा भाग होता. त्याच्या यशस्वीतेवर त्यांनी ‘रेस २’ बनवला. तो ही धो धो चालला. त्याची गाणी हिट झाली. ‘अल्लाह दुहाई है’सारखं गाणं तर ब्लॉकबस्टर झालं, ज्याला परत ‘रेस ३’ही वापरण्याचा मोह दिग्दर्शक रेमो डिसुझाला टाळता आला नाही. इतका त्याचा प्रभाव दिसून येतो. दुर्दैवानं इतकं लोकप्रिय गाणं वापरूनही सिनेमा मात्र अतिसामान्य दर्जाच्या पातळीवर राहतो.

अल-सफा या सौदी अरेबियाच्या जवळ असणाऱ्या बेटावर शमशेर सिंगचा (अनिल कपूर) बेस आहे. तो आर्म्स मॅन्युफॅक्चरर आहे. त्याला तीन मुलं आहेत. सिकंदर सिंग (सलमान खान), जुळे बहीण-भाऊ सुरज (साकिब सलीम) आणि संजना (डेझी शाह). तिघेही मारपीट करण्यात माहीर आहेत. सिकंदर सिंगचा बॉडीगार्ड कम मित्र यश (बॉबी देओल) हा नेहमीच ऐनवेळी त्यांच्या मदतीला धावून येत असतो. शमशेर सिंगचा कट्टर दुश्मन राणा (फ्रेडी दारूवाला) हा त्याला पाण्यात पाहत असतो आणि त्याला कसे धुळीस मिळवायचे याचे कारस्थाने नेहमी रचत असतो. याचाच एक भाग म्हणून तो एकदा शमशेरवर जीवघेणा हल्ला करतो, पण शमशेर वाचतो. हल्ल्याचा बदला म्हणून सुरज-संजना प्रतिहल्ला करून राणाच्या अड्ड्यावर घमासान मारामारी करतात. त्यांना राणाच्या माणसांनी घेरलेलं असताना सिकंदर येऊन वाचवतो. यात यशसुद्धा त्याला मदत करतो. सुरज-संजना पंचवीस वर्षांचे झाल्यास त्यांच्या नावे काही प्रॉपर्टी त्यांच्या मेलेल्या आईनं केलेली असते. त्यानुसार त्यांना पन्नास टक्के मिळालेले असतात, तर सिकंदरला पन्नास टक्के. दोघांना ते आवडत नाही. आईनं सावत्र भावाला पन्नास टक्क्यांचा मालक का केलं याचं कोडं पडलेलं असताना ते सिकंदरला एकूण सर्व व्यवहारातूनच कसं हाकलून द्यायचं, याचे प्लॅन्स आखायला सुरुवात करतात.

एखाद्या सिनेमाचा सिनॉप्सिस वाचला की, त्याच्याबद्दल उत्सुकता निर्माण होते. त्यावरून तो सिनेमा नक्कीच चांगला असेल असे अंदाज बांधायला सुरुवात होते. वरील कथा वाचून असंच वाटायला लागतं की, कागदावर तर दमदार वाटणारा सिनेमा प्रत्यक्षात त्याहून चांगला असेल, पण सिनेमा कोण दिग्दर्शित करतोय व नायक म्हणून कोण आहे, यावर त्याचा चांगला-वाईट परिणाम अवलंबून राहतो.

रेमो डिसुझाचा हा पाचवा सिनेमा. ‘फालतू’ नावाच्या पहिल्या सिनेमापासून या यशस्वी नृत्य दिग्दर्शकाचं दिग्दर्शक म्हणून पदार्पण झालं. पहिल्याच सिनेमापासून पुढील सिनेमेही त्याच दर्जाचे बनवणारे रेमो इथंही स्वतःचा प्रभाव सोडल्याशिवाय राहत नाहीत. मुळात सलमान खाननं त्यांना दिग्दर्शक म्हणून स्वतः पाचारण करणं आणि अब्बास-मस्ताननं व सैफ अली खाननं भूमिका सलमानला समांतर असणं, या कारणासाठी सोडणं यातच त्याची गणितं दिसून येतात. ‘दबंग २’ साठी अभिनव कश्यपपेक्षा भाऊ अरबाज खानला घेणं यात सलमानचं व्यावसायिक चातुर्य लख्खपणे दिसून येतं. तसेच ‘ब्रँड सलमान’ असणंही या निवडीत दिसून येतं.

कसं? सिनेमाच्या सुरुवातीपासून कथेचा व कॅमेऱ्याचा फोकस हा सलमानवरच राहायला पाहिजे, अशा पद्धतीनं कथानकाची रचना केली आहे. जसं हॉलिवुडमध्ये नवख्या किंवा सामान्य दर्जाच्या दिग्दर्शकाला स्टुडिओ हेड्सच्या वर्चस्वाची टांगती तलवार घेऊन हाती आलेली स्क्रिप्ट धकवून न्यावी लागते, तसंच इथं रेमोचं झालंय. मुळात सामान्य कुवतीच्या या दिग्दर्शकाची निवड करून सलमाननं या सिनेमाचा खरा दिग्दर्शक कोण आहे हेच दाखवून दिलंय. त्यामुळे प्रेक्षकांना भाईजानचा चेहरा सतत दिसणं सुखावह वाटतं. त्यामुळे रेमोला यात फार काही करावं लागलेलं नाही.

जी बाब सलमान असण्याची तीच बाब पटकथा नसण्याची. ‘डंकर्क’ हा सिनेमा बनवतेवेळी दिग्दर्शक ख्रिस्तफर नोलन म्हणाले की, याची पटकथा हा सांगाडा आहे. ज्यावर इतर गोष्टींचा भरणा घालून दुसऱ्या महायुद्धाची कथा उभी राहते. रेमो डिसुझा नोलनला खूप मानतात बहुदा. ते पटकथेला चिमूटभरही महत्त्व देत नाहीत. त्यामुळे सांगाडा वगैरे बाबी तर दूरच राहतात. मग राहतं काय तर भरपूर बजेट, नेत्रसुखद अबू धाबीची श्रीमंती लोकेशन्स, बुगटी वेयरॉनसारख्या महागड्या कार, सलमानसारखा अतिप्रेक्षकप्रिय अभिनेता, दोन बॉम्बशेल असणाऱ्या नायिका, चांगला सिनेमॅटोग्राफर, संकलक, अध्येमध्ये गाणी, त्यांना चांगल्या नृत्य निपुण नृत्य दिग्दर्शकांनी दिलेली साथ. इतकं सगळं हाताशी असताना थोड्या वेळाकरता तरी सिनेमात गांभीर्य आणावं असं ना सलमानला वाटतं, ना रेमोला. त्यामुळे एका नंतर एक प्रसंगांची मालिका उभी केली जाते. त्याला संकलनाची भयंकरपणे जोड दिली जाते.

संकलन हे दिग्दर्शकासाठी उत्तम टूल आहे. पण बऱ्याचदा दिग्दर्शक त्यावर नको इतके भिस्त ठेवताना दिसतात. कथा-पटकथा-पात्रांची वाढ वगैरे गोष्टी हाताशी नसल्या की, भरपूर चित्रीकरण करून संकलनात त्याला जोडणं इतकंच काम करत असावेत असं दिसतं. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून हिंदीत काम करणाऱ्यांना हा प्राथमिक धडाच दिलेला असतो म्हणे! रेमो डिसुझा हेच करताना दिसतात. खासकरून अॅक्शन सिन्समध्ये संकलानाचा नको इतका वापर करतात.

अर्थात सलमान, डेझी किंवा इतर अभिनेते हे मार्शल आर्ट्सपटू वगैरे नसल्यामुळे संकलनात ते लीलया चार हट्ट्याकट्ट्या लोकांना लोळवू शकतात असा आभास निर्माण करतात. तसंच सलमान-बॉबीचं कमावलेलं डोल्लेशोले, सिक्स पॅक्स असणारं शरीर दाखवलं की, प्रेक्षकांना पैशे फिटल्याचा आनंद मिळतो.

त्यामुळे होतंय काय की, संकलनावर भिस्त ठेवल्यामुळे सिनेमात काही तरी भारी केल्याचं समाधान दिग्दर्शकाला मिळतं. या समाधानाचा मात्र सिनेमावर कमालीचा विपरित परिणाम झालाय याची त्यांना जाणीव राहत नाही. इतर गोष्टीही दिग्दर्शकाच्या हातातल्या टूल्स आहेत. त्यांचा वापर विचारपूर्वक होणं गरजेचं असतं, तरच तयार होणारी कलाकृती ही सकस होते.

इतक्या सगळ्या चर्चेनंतर अभिनय वगैरे बाबींवर बोलणं गरजेचं आहे का हा प्रश्न उपस्थित होतो. सलमान खान सोडला तर इतर अभिनेते सलमानच्या सिनेमात काम करायला मिळतंय याच उद्देशानं काम करत असावेत. इथं शरद सक्सेना, अनिल कपूर, दिवंगत नरेंद्र झा, मिलिंद गुणाजी, साकिब सलीम, डेझी शाह, जॅकलिन फर्नांडिस, बॉबी देओल, निशिगंधा वाड वगैरे असूनही प्रभावी वाटत नाहीत. कारण हे सर्व सहाय्यक अभिनेते वाटावेत अशीच त्यांची भूमिका रचण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी सलमानच्या संवादांना प्रतिक्रिया देणं आणि त्याच्या वलयांकित चेहऱ्याला पडद्यावर दिसण्यासाठी मदत करणं इतकंच काम इमानेइतबारे केलंय.

गाण्यांत ‘अल्लाह दुहाई है’चं रिमिक्स व्हर्जन तेवढं लक्षात राहतं. सलमान खाननं ‘वॉन्टेड’पासून स्वतःची प्रतिमा इतकी बदलली आहे की, तो खरंच अभिनय करतो का की त्याची प्रतिमा जपतोय, हे आता धूसर झालंय. ‘दबंग’मध्ये चांगलं काम केलं होतं व नंतर आलेल्या ‘बजरंगी भाईजान’ किंवा ‘सुलतान’मध्ये पण बरं काम केलं होतं. पण इतक्या वर्षांत त्याच्या अभिनयाचे पैलू बघायला मिळालेत असं म्हणायला फार सिनेमांचा आधार घेता येत नाही. प्रतिमा जपण्यासाठीच पटकथा लिहून घेणारा हा अभिनेता अभिनयापासून बराच दूर गेलाय हे मात्र नक्की.

सिनेमा म्हणजे शंभर कोटींची कमाई असं गणित मांडणाऱ्या सलमान खानसारखे वर्चस्ववादी अभिनेते दिग्दर्शकाच्या स्वातंत्र्याला दुय्यम मानतात, तेव्हा अशाच पद्धतीच्या सिनेमांची निर्मिती होते. जिथं एकाधिकारशाही असणारा अभिनेता स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी पटकथाकार-दिग्दर्शकाला दावणीला बांधतो, तेव्हा सकस निर्मितीची शक्यता शून्याच्याही खाली जाते. हा सिनेमाही त्याला अपवाद नाही. वर्षानुवर्षं प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवणारे सलमानसारखे अभिनेते जेव्हा ‘मागणी तसा पुरवठा’ याची पूर्तता करतात, तेव्हा उरतो फक्त स्वतःची प्रतिमा जपणारा वलयांकित चेहरा असणारा ‘भाईजान का जलवा’!

.............................................................................................................................................

लेखक विवेक कुलकर्णी सिनेअभ्यासक आहेत.

genius_v@hotmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................