महाराष्ट्राची ‘नाटकवेडा महाराष्ट्र’ ही पहिल्या क्रमांकाची ओळख पुसट तर होणार नाही ना?
कला-संस्कृती - नाटकबिटक
कीर्ती शिलेदार
  • ९८वं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, मुलुंड (मुंबई), १३ जून ते १५ जून
  • Fri , 15 June 2018
  • कला-संस्कृती नाटकबिटक ९८वं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 98th Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan कीर्ती शिलेदार Kirti Shiledar

९८वं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन १३ जूनपासून मुलुंड (मुंबई) इथं सुरू आहे. आज, १५ जून रोजी त्याची सांगता होईल. या संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ रंगकर्मी कीर्ती शिलेदार यांचं अध्यक्षीय भाषण...

.............................................................................................................................................

व्यासपीठावरील मान्यवर, ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनासाठी प्रचंड गर्दीनं जमा झालेल्या; रंगभूमीवर नितांत प्रेम करणाऱ्या सुहृदांनो, आपल्या सर्वांना माझं विनम्र अभिवादन!

महाराष्ट्राच्या मातीतल्या तुम्हाआम्हा सर्वांना अपरंपार आनंद देऊन रंगभूमीनं उपकृत केलं, उच्च अभिरुचीचं वरदान दिलं, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध केलं. त्याबद्दलचं ऋण व्यक्त करण्याचा हा आनंद सोहळा आहे. जन्माच्या आधीपासून आजतागायत मला या रंगभूमीबरोबर आयुष्याची वाटचाल करता आली, नव्हे मला जणू जन्मसिद्ध अधिकारच मिळाला... ही परमेश्वराची कृपाच समजते.

गावोगावी फिरणाऱ्या, मासिक पगारी, बिऱ्हाड स्वरूपाच्या नाटक मंडळ्यांमधली अखेरची म्हणता येईल अशी ‘मराठी रंगभूमी' ही संगीत नाट्यसंस्था. आठवड्यातून तीन दिवस नाटकं आणि इतर दिवशी तालमी, गाण्यांचे रियाझ... चोवीस तास फक्त नाटक, नाटक आणि नाटक! या वातावरणात बाळपण रमून गेलं. दहाव्या वर्षांपासून पूर्ण तालीम करून रंगमंचावर नाटक करण्याचा अनुभव हसत खेळत मिळाला. गाणं आणि संगीत नाटकाखेरीज इतर कलांमधील चांगलं काय ते टिपण्याची नजर मिळाली. उदार मतवादी आईवडलांमुळेच चौफेर निरीक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या मैफली ऐकणं, नृत्यांचे कार्यक्रम पाहणं, गद्य रंगभूमीवरील उत्तमोत्तम प्रयोग पाहणं, याबरोबरच शिक्षणात खंड न पडू देणं, भरपूर वाचन करायला मुभा अशा सुंदर जीवन शैलीमुळं मन समृद्ध होत गेलं.

मुंबईत आलो की, आमचे पाय नेहमी रंगमंदिरांकडेच वळायचे. लहानपणी परळच्या दामोदर हॉलमध्ये रंगलेली नाटकं आठवतात. दादरला किंग जॉर्ज हायस्कूलचा रंगमंच. छोटा गंधर्व, नाना, आई यांची संगीत नाटकं इथंच तुडूंब गर्दीनं ओसंडून गेलेली पाहिली आहेत. आलिशान बिर्ला मातोश्री सभागार! पुढं साहित्य संघाची वास्तू बनली. सर्व कलाकारांना आपलासा वाटणारा जणू विसावा! दादरच्या शिवाजी मंदिरानं तर हाऊसफुल प्रयोगांचा विक्रमच केलेला होता. प्रशस्त अंगण असलेली रवीन्द्र नाट्य मंदिराची देखणी वास्तू. इथंही प्रयोग करतांड़ना आणि इतरांचे प्रयोग बघताना प्रसन्न वाटत असे. पूर्वी पुण्यात महाराष्ट्र मंडळाचे एकमेव बांधीव नाट्यगृह होतं. भरत नाट्य मंदिराचं मंडप आच्छादित रंगमंदिर! खुर्च्या पक्क्या नसल्यानं गर्दी झाली की खुर्च्या इकडून, तिकडून वाढवल्या जायच्या. शेवटी मोकळ्या पॅसेजमध्ये बसकण मारलेले प्रेक्षक आणि अशा तोबा गर्दीत प्रचंड उत्साहात हशांचे गडगडाट, टाळ्यांचे कडकडाट…

दोन-तीन दिवस त्या रंगलेल्या प्रयोगांची धुंदी उतरस नसे. नागपूरचं धनवटे रंगमंदिरही सगळ्या नाटकवाल्यांचं आवडतं रंगमंदिर होतं. एका नाट्योत्सवाच्या वेळी सगळ्या नटमंडळींना रंगमंदिरातच एका हॉलमध्ये गाद्या घालून राहण्याची सोय केली होती. स्त्री कलाकारांची व्यवस्था मेकअपरूममध्ये! आचारी ठेवून जेवण नाश्ता, चहाची सोय… नाटकमंडळ्यांची आठवण झाल्याने सगळे आनंदात राहिले होते! गप्पांना रंग चढला होता! कमालीच्या साधेपणानं सगळी मंडळी रंगमंदिरात एकत्र आली होती! बेळगावंचं स्कूल ऑफ कल्चरचं खुलं नाट्यगृह प्रेक्षकांच्या अप्रतिम प्रतिसादानं लक्षात राहिलं आहे.

सांगलीचं भावे नाट्यमंदिर नुतनीकरणापूर्वी सगळ्या नाटकवाल्यांच्या फार आवडीचं होतं! कारण नवीन नाटकाचा पहिला प्रयोग असेल तर तिथं भाडं आकारलं जायचं नाही. या संधीचा फायदा अनेक नाटकवाल्यांनी घेतला आहे.

गोव्यात आणि कोकणात झापाची नाट्यगृहं असतं. त्यात काम करण्याचा अनुभवही वेगळा असे (नारळाच्या झावळ्यांपासून बनवलेली थिएटर्स).

आवर्जून उल्लेख करावासा वाटतो, तो कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहाचा. नूतनीकरणापूर्वी त्याला पॅलेस थिएटर म्हटलं जाई. राजघराण्यानं लक्ष घातल्यानं अख्ख्या महाराष्ट्रात या थिएटर इतकं सुबक, टुमदार थिएटर दुसरं नव्हतं. स्त्री कलाकारांसाठी स्वतंत्र रंगभूषा दालन, प्रशस्त स्वच्छता गृह महाराष्ट्रात काय भारतातसुद्धा तेवढं एकमेवं असावं असं मला प्रकर्षानं वाटतं. स्त्री कलाकारांसाठी स्वच्छता गृह वेगळी व स्वच्छ असायला हवी याचं भान त्या काळी कुठंही बघायला मिळत नसे. या नाट्यगृहात नाटक हमखास रंगत असे. प्रेक्षागृहातल्या गॅलरीला तीन भव्यं आरसे लावलेले होते. एरवी आपलं नाटक प्रेक्षकांना कसं दिसत असेल याचं कलाकारांना आपलंच प्रतिबिंब पाहण्याची एकमेव व्यवस्था या थिएटरमध्ये होती. नूतनीकरण झाल्यावर या सगळ्या दुर्मीळ गोष्टी नष्ट होऊन गेल्या. नानाआईंच्या तोंडून पूर्वीच्या गोष्टी ऐकताना कुतूहल वाटे. राजघराण्यातली मंडळी नाटकाला येणार असली की, खास स्वच्छता केली जायची. मातीच्या पटांगणावर पाण्याचे फवारे मारले जायचे. खाशास्वाऱ्यांनी नाटकाचा आस्वाद घेतला की, नाटकमंडळ्यांना काही बक्षिसं मिळत. सगळ्यात महत्त्वाचं की, एखाद्या नाटक मंडळींचा मुक्काम नुकसानीत गेला तर थिएटर भाडं माफ केलं जात असे. अर्जविनंत्या न करता नाटकमंडळींना संकटात मिळणार हा मदतीचा हात किती मोलाचा असेल याची कल्पना करावी. याला म्हणतात कदरदानी… याला म्हणतात राजाश्रय!

संगीत नाटक हा महाराष्ट्राच्या मातीतला एक अभिजात कलाप्रकार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संगीताच्या स्वरांनी कुठल्याना कुठल्या रूपात मराठी मनांवर अधिराज्य गाजवलं आहे. वारकरी संप्रदायामुळे भजन, कीर्तन, ओव्या, भारुड यातून बहुजन समाज समृद्ध झाला. लोकसंगीत, तमाशा, पोवाडा, गवळण, लावणी याही प्रकारांनी रसिक घडत गेले. शास्त्रीय संगीताची गंगोत्री महाराष्ट्रात आल्यावर रागदारी संगीताची आराधना महाराष्ट्रात मन:पूर्वकतेनं जपली जाऊ लागली. पूर्वी नायकिणींच्या कोठ्यांवर उत्तम संगीत, गझल, ठुमरी, कव्वाली या प्रकारातून ऐकायला मिळत असे.

समाजाचे तीन वर्ग वेगवेगळ्या प्रकारानं आपली संगीत अभिरुची जोपासत. अण्णासाहेब किर्लोस्करांनी या तिन्ही वर्गांना एका छताखाली एकत्र आणलं आणि तिन्ही वर्गाचं एकत्रित मनोरंजन करण्यासाठी ‘संगीत नाटक’ हा कलाप्रकार रूढ केला. सर्व प्रकारचे संगीत नाटकात ऐकायला मिळू लागलं. अनेक थोर कलाकार घडले ते याच काळात. थोर नाटककारांनी अप्रतिम नाटकं लिहीली. आणि संगीतकारांनी वेगवेगळ्या संगीत प्रकारांचा संगीत नाटकात उपयोग करून मराठी रसिक मनाला संगीताची जाणकारी बहाल केली. नाटकमंडळ्यांच्या शिस्तीत संगीत नाटक बहरत गेलं. संगीत नाटकांची लोकप्रियता कळसाला पोहोचली. ज्या जमान्यात रेडिओसुद्धा नव्हता, त्या काळात संगीत नाटकानं मराठी जनमानसाला उच्च दर्जाची करमणूक देऊन अभिरुचीपूर्ण रसिकता बहाल केली.

अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद बल्लाळ देवल या गुरुशिष्यांनी खच्या अर्थानं ‘संगीत नाटक’ हा कलाप्रकार सिद्ध केला. संगीत नटानं कसं गावं, किती गावं याचा वस्तुपाठ दिला. गायक नटांना प्रसन्नवदत असलं पाहिजे. वेड्यावाकड्या खोडी नसाव्यात. गीताचा भावार्थ जाणून रसपरिपोष साधेल असं गायन करावं. कथाभागाचा ओघ खंडीत होऊ नत देता पदं रंगवली पाहिजेत. संगीत नाटकाचा गद्य-पद्याचा तोल काटेकोर सांभाळला जावा यासाठी तालीम मास्तर (दिग्दर्शक) कडक शिस्तीचा असे.

बोलपटांच्या आक्रमणानंतर संगीत नाटक मंडळ्या बंद पडत गेल्या आणि तालीममास्तरांची करडी नजर हटल्यावर ‘संगीत नाटक’ डळमळलं. रंगभूमीची चळवळ क्षीण होत असताना तिला नवचैतन्य देण्यासाठी डॉ. अमृत नारायण भालेराव यांनी साहित्य संघाच्या मोठमोठ्या नाट्योत्सवांचं आयोजन केलं. चांगल्या चांगल्या गद्य आणि संगीत नाट्यकृती, उत्तम दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली नव्या प्रतिभाशाली कलाकारांना एकत्र आणून रसिकांसमोर सादर केल्या. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. मात्र त्यातून कंत्राटदारांनी, नाईट पद्धतीनं प्रत्येक प्रयोगाचं ठराविक मानधन, या स्वरूपात नाटकांचे प्रयोग करायला सुरुवात केली. इथून नाटकांची लय बिघडली, कलाकारांवर अंकुश राहिला नाही, चुकीच्या प्रथा पडत गेल्या. संगीत नाटक विस्कटलं ते या काळात.

याच काळात सुशिक्षित कलाकार रंगमंचावर येऊ लागले. त्यांनी उत्तम गद्य नाटकांचे बंदिस्त सुंदर प्रयोग सुरुवात केली. पण त्याचबरोबर भट्टी बिघडलेल्या संगीत नाटकांवर आणि कमी शिकलेल्या कलाकारांवर प्रच्छन्न टीकास्त्र सोडायाला सुरुवात केली. इथून पुढे संगीत रंगभूमी आणि गद्य रंगभूमी, हौशी, व्यावसायिक अशी दुही माजायला सुरुवात झाली. वक्तृत्त्व, पांडित्य असल्यामुळे गद्य रंगभूमीवरील रंगधुरिणांचा वरचष्मा प्रकर्षानं झळकू लागला. बेशिस्त गायक नटनटींच्या बेताल अदाकारीवरून अकारण संगीत रंगभूमीला वेठीला धरलं गेलं आणि एका चांगल्या अभिजात कलाप्रकाराला उतरती कळा लागली.

माझ्या आई-वडलांनी या पूर्ण प्रतिकूल परिस्थितीत संगीत नाटकांची जपणूक प्राणपणानं केली. दोघंही किर्लोस्कर नाटकमंडळींच्या शिस्तीत तयार झाले असल्यानं संगीत नाटकांची नजाकत त्यांनी जपून ठेवली. त्याच शिस्तीनं संगीत नाटकं सादर केलं. स्वत:ची कारकीर्द गाजवली. आणि नंतर आम्हां मुलींनाही विचारप्रवृत्त करून पुढच्या पिढीला संगीत रंगभूमीसाठी कार्यरत केलं. जुन्या संगीत नाटकांचं जतन, संवर्धन आणि नवीन संगीत नाटकांची निर्मिती अशा प्रकारानं ‘मराठी रंगभूमी' या संगीत नाट्य संस्थेचं काम एकोणसाठ वर्षं अव्याहत चालू आहे. कोणताही गाजावाजा न करता, एखादं व्रत अंगिकारावं त्याप्रमाणे प्रलोभनांना टाळून, सगळ्या संकटांना तोंड देत, संगीत रंगभूमीचं तारू संथपणं वल्हवत ठेवण्याचं काम एकांडे शिलेदार करत राहिले आहेत. उतलो नाही मातलो नाही, घेतला वसा टाकला नाही!

मी आणि लतानं संगीत नाटक हे स्वत:च्या आवडीनं केलं आहे. आई-वडलांचं संगीत नाटकांवरील प्रेम आम्ही पाहिलं, अनुभवलं आणि त्याच्या आनंदाचा साक्षात्कार आम्हाला घडला. त्याचबरोबर या व्रताची उपासना करण्यासाठी ऐहिक पैसा, प्रसिद्धीचा हव्यास टाळणं ही कठीण गोष्टही आम्ही साधू शकलो. कारण संगीत नाटकानं आम्हांला अपरंपार आनंद दिला आहे, तो आनंद आम्ही शब्दांत पकडू शकत नाही.

सुंदरतेचा शोध घ्यावा. विचार आमच्या रसिकांच्या अंतकरणापर्यंत पोचते. कलेचं अध्यात्माशी असलेलं नातं त्यांनी किती सोप्या शब्दात मांडलं. पूर्वकतेनं ती सुंदरता आपल्या अभिव्यक्तीतून परावर्तित करण्यासाठी मन:पूत श्रम करावे. यासाठी आई, वडील गुरुजन यांनी आमच्यातली जाणीव जागृत केली आणि सदैव पाठीशी राहिले, हे आमचं सदभाग्य! गुरु पार्वतीकुमारांनी एक श्लोक सांगितला होता -

यतो हस्तस्तो दृष्टी । यतो दृष्टिस्ततो मनः ।।

यतो मनस्ततो भावो । यतो भाव स्ततो रसः ।।

(जिकडे हस्तमुद्रा जाईल तिकडे आपली दृष्टी जायला हवी, दृष्टीबरोबर आपलं अंतरकरणही तिथं पोचायला हवं आणि असं झाल्यावर रसनिष्पत्ती निश्चित साधली जाईल.) रंगमंचावरील वावर जाणीवपूर्वक संपूर्ण देहबोलीतून व्यक्त झाला पाहिजे. कायावाचा मनानं भूमिकेशी समरस झालं पाहिजे. हे आपल्या भारतीय कलापरंपरांचं शुद्ध तत्त्व आहे. एकदा पं. बिरजू महाराजजी आपल्या नृत्यमुद्रांबद्दल बोलत होते. त्यांना प्रश्न विचारला होता की, ‘समेवर येताना इतका सहज सुंदर भाव आपण कसा व्यक्त करता?’ तेव्हा ते म्हणाले होते की, ‘आम्ही नृत्य करताना कधीही एकटे नसतो. सदैव आमच्याबरोबर भगवानजी (श्रीकृष्ण) असतात. सम येते तेव्हा समोर भगवानजी सस्मित समोर असतात. आपसूक आमच्याही चेहऱ्यावर प्रसन्नता येते.’

तीच प्रसन्नता करमणुकीच्या तोंडावळ्यावरून त्या त्या राज्याची, देशाची सांस्कृतिक ओळख होत असते. आमचा महाराष्ट्र संगीत वेडा आहे, तसाच नाटक वेडा आहे. संपूर्ण भारतात नाट्यवेडात पहिला क्रमांक महाराष्ट्राचा, तर दुसरा बंगालचा आहे. स्वत:च्या खिशातले पैसे खचून, तिकिट काढून मराठी माणूस नाटक पाहतो. प्रसारमाध्यमांच्या स्फोटामुळे घरबसल्या करमणुकीनं सर्व जिवंत कलाप्रकारांवर आक्रमण केलं आहे. नाटकवेडा महाराष्ट्र ही पहिल्या क्रमांकाची ओळख पुसट तर होणार नाही ना याची चिंता वाटते. पण त्रिनाट्यधारा पाहण्यासाठी प्रेक्षकांची रांग लागते, तेव्हा मन हर्षभरित होतं.

पूर्वी नाट्यव्यवसाय परस्परांच्या सहकार्यानं यथास्थित चालत असे. पण इतर व्यावसायिक नाट्यव्यवसायात शिरल्यावर झपाट्यानं परिस्थिती बदलू लागली. पैसेवाल्या, सधन लोकांनी व्यवसायाची गणितं पार पदलली. साधेपणानं व्यवसाय करू पाहणारे निर्माते अडचणीत येऊ लागले. एक पाय प्रसारमाध्यमात ठेवलेल्या सेलिब्रिटी कलाकारांच्या नाईटस आणि अटींनी निर्माते गांजून जाऊ लागले. आता तर प्रसारमाध्यमांनी नाट्य व्यवसायावर आक्रमण करण्याचा घाट घातला आहे. यावर कोणाचाही अंकुश नाही. अशानं मूठभर लोकांचंच कल्याण होणार आहे. पण एकूण नाट्यव्यवसाय ढवळून निघणार यात शंका नाही. प्रेक्षकांच्या खिशांवर किती बोजा पडणार तेही कोणी पाहत नाही. पूर्वी नाट्यसंमेलनात आचार संहितेवर बराच उहापोह झाला आहे. आता नव्यानं या बदलत्या परिस्थितीचं चिंतन करायला पाहिजे. नाट्य परिषद आणि सरकारनं यात महत्त्वाची भूमिका बजावणं जरुरीचे आहे. सर्व कलाकार, तंत्रज्ञ, निर्मात्यांनी एकत्र येऊ विचार मंथन केलं पाहिजे.

आमच्या लहानपणी बालरंगभूमीचं काम चांगल्या प्रकारं घडतं होतं. सुधाताई करमरकरांची ‘लिटिल थिएटर’ खूप प्रभावीपणे काम करत होती. रत्नाकर मतकरींची बालनाट्य संस्थाही अग्रेसर होती. पुण्यात सई परांजपे यांची ‘शेपटीचा शाप’, ‘पत्तेनगरी' इ. बालनाट्यं जोरात होती. अविष्कारचं ‘दुर्गा झाली गौरी' हा बालनाट्यातला मानदंड समजायला हवा. नानासाहेब शिरगोपीकरांनी ‘परीक्षेपूर्वीच्या सात रात्री' हे शालेय अभ्यासावर आधारित अभिनव नाटक लिहिलं होतं. ते नाटक पाहिल्यावर बाल प्रेक्षकांची मार्काची टक्केवारी हमखास वाढली असती. आजही कांचन सोनटक्के, देवदत्त पाठक बालनाट्याच्या चळवळीसाठी भरीव काम करत आहेत. त्यांच्या पाठीशी सरकार, परिषद आणि रसिकांनी भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे. नाटक हा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट असायला पाहिजे. काही शाळांमधून हा उपक्रम चांगल्या रीतीनं चालवला जात आहे. पण सर्वत्र हे चित्र समाधानकारक नाही. त्यात सुधारणा व्हायला हवी.

व्यावसायिक रंगभूमीला उत्तमोत्तम नाट्यकृती मिळवून देणारी हौशी रंगभूमीची चळवळ सशक्त व्हायला हवी. त्यांनाही प्रयोगांसाठी नाट्यगृह, तालमीसाठी हॉल अल्प दरात उपलब्ध होणं आवश्यक आहे. ठिकठिकाणी होणाऱ्या एकांकिका स्पर्धामधून वेगवेगळ्या विषयांवरच्या नाट्यकृती येतात. पुरुषोत्तम, फिरोदिया करंडक, सवाई इ.सारख्या स्पर्धामधून तरुण रंगकर्मीच्या कल्पक प्रतिभेचा प्रत्यय येतो तो सुखावणारा असतो.

नाटक म्हणजे रंगभूमीवरचा ‘जिवंत’ खेळ. कलाकार हा खेळ मन:पूर्वक खेळतात. त्यांना, उपस्थित प्रेक्षकांची तत्क्षणी मिळणारी चांगली/वाईट दाद उत्स्फूर्त असते. अदाकारी आणि रसिकतेची ही देवाणघेवाण चैतन्यदायी आहे. हा जिवंत अनुभव ‘खरा’ असतो. असा अनुभव कृत्रिम मिळत नाही. नाटक ही एकट्या कलाकाराची मिरास नसते. पडद्याच्या मागचे, समोरचे, प्रत्यक्ष रंगमंचावर काम करणारे... सर्व तंत्रज्ञ, संगीत साथीदार, नेपथ्य सहाय्यक आणि कलाकार या सर्वांनी एकचित्तानं घडवलेली कलाकृती म्हणजे नाटक. हा चाक्षुष यज्ञ डोळ्यांनी पहायचा, श्रुतींनी ऐकायचा आणि अंत:करणांनी अनुभवायचा सर्वोत्तम संस्कार आहे. प्रत्येक कला परंपरांना कार्लोद्याचे फटके बसलेले आहेत. वरलिया रंगाला भुलणाऱ्या प्रेक्षकांना पुन्हा अभिजात कलांकडे वळवून त्यांना रसिकतेचा हरवलेला सूर सापडून देण्यासाठी, सगळ्या प्रतिभावान लेखक, दिग्दर्शक, कलाकारांनी, तंत्रज्ञांनी एकत्र येऊ उत्तमोत्तम नाट्यकृती बनवाव्या. त्यांच्या पाठीशी धनवान रसिकांनी आणि शासनानं पूर्ण ताकदीनं उभं राहावं आणि रंगभूमी तेजानं झळाळून निघो. हेच माझं आवाहन रूपी भरत वाक्य नटेश्वराला आणि आपल्याला अर्पण असो.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................