‘ज्युरासिक वर्ल्ड : फॉलन किंगडम’ मनोरंजक ठरण्याची किमान अट पूर्ण करतो 
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘ज्युरासिक वर्ल्ड : फॉलन किंगडम’चं पोस्टर
  • Sat , 09 June 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti इंग्रजी सिनेमा Englishi Movie ज्युरासिक वर्ल्ड : फॉलन किंगडम Jurassic World : Fallen Kingdom

मूळ चित्रपट मालिकेतील तीन चित्रपट आणि २०१५ मधील ‘ज्युरासिक वर्ल्ड’च्या निमित्तानं झालेलं एक प्रकारचं पुनरुज्जीवन असा ‘ज्युरासिक’ चित्रपट मालिकेनं बराच मोठा प्रवास केला आहे. शिवाय या भागानं पार्क ते वर्ल्ड असा संकल्पनेचा विस्तारही केला आहेच. 

ज्युरासिक मालिकेतील सगळे चित्रपट नसले तरी गेलाबाजार पहिला ‘ज्युरासिक पार्क’ आणि त्यातही त्यातील डायनासोरचा पहिला शॉट पाहिला नाही, असा प्रेक्षक आणि चित्रपटांचा चाहता बहुतांशी कुणाच्याच पाहण्यात येत नसावा, किंबहुना येत नाही. कारण दोनेक दशकांपूर्वी आलेल्या स्पिलबर्गच्या या अचंबित करणाऱ्या सिनेमॅटिक रूपानं कल्ट स्वरूप धारण केलं आहे. आणि तो पाहणं टाळता येणं अशक्य बनलं आहे. 

दिग्दर्शक म्हणून तो या मालिकेपासून लांब गेला असला तरी भरघोस यश आणि नफा मिळवून देणाऱ्या चित्रपट मालिकांच्या हक्कांवरून मोठमोठ्या स्टुडिओजमध्ये होणाऱ्या वादांच्या काळात तो एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून बोर्डावर आहे, हेही नसे थोडके. 

‘ज्युरासिक वर्ल्ड’नं स्पिलबर्गच्या (आणि लेखक मायकल क्रिक्टॉनच्या) विश्वाला पुढे नेत पार्क प्रेक्षकांसाठी खुले करत, डायनासोर आणि मानव यांचं अस्तित्त्व एकाच विश्वात असण्याच्या दिशेनं प्रवास सुरू केला होता. ‘फॉलन किंगडम’नं याच कल्पनेला पुढे नेलं आहे. 

‘ज्युरासिक वर्ल्ड’च्या विध्वंसक घटनेनंतर ‘इस्ला न्युब्लर’ या आयलंडवर पुन्हा एकदा डायनासोर्सचं निर्विवाद वर्चस्व आहे. मात्र तेथील ज्वालामुखीच्या सक्रिय हालचालींमुळे तेथील जीवसृष्टीचं अस्तित्त्व धोक्यात आहे. खाजगी कंपनीनं केलेल्या पराक्रमामुळे सरकार त्यात हस्तक्षेप करून डायनासोर वाचवण्यास नकार देतं. सर बेंजामिन लॉकवुड (जेम्स क्रॉमवेल) या जॉन हॅमंडच्या पार्टनरचा खास व्यक्ती असलेला एली मिल्स (रेफ स्पॉल) डायनासोर वाचवण्यासाठी एक मोहीम आखतो. ज्यासाठी तो ‘ज्युरासिक वर्ल्ड’ची व्यवस्थापक क्लेअर डेअरिंग (ब्रायस हॉवर्ड) आणि पूर्वाश्रमीचा डायनासोर प्रशिक्षक ऑवेन ग्रॅडी (क्रिस प्रॅट) यांची मदत घेत आहे. 

केन व्हिटनी (टेड लेविन) हा ‘इस्ला न्युब्लर’वरील डायनासोर बचाव कार्याच्या मोहिमेचा प्रमुख आहे. ज्याच्या मदतीनं क्लेअर, ऑवेन आणि फ्रँकलिन वेब (जस्टिस स्मिथ), डॉ. झिया रॉड्रिग्ज (डॅनिएला पिनेडा) हे त्यांचे साथीदार आयलंडवर जाऊन डायनासोरच्या निवडक प्रजाती सुरक्षित स्थळी आणणार आहेत. 

यामुळे चित्रपटाला अर्थातच कॉर्पोरेट कंपन्या आणि व्यावसायिक कारणांमुळे सदर प्रकरणातील हस्तक्षेप आणि त्यामुळे नफ्याच्या हव्यासापोटी होत असलेली प्राण्यांची तस्करी, तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरील बाजारपेठ आणि युद्धास सज्ज राहण्याची वृत्ती अशा बऱ्याच मुद्द्यांचा समावेश आहे. सोबतच चित्रपटाच्या शेवटामुळे ‘ज्युरासिक वर्ल्ड’ ही संकल्पना अधिक स्पष्ट झाली आहे. 

या सर्व बाबींमुळे चित्रपटाला वैश्विक पातळीवर जाऊन बहुतांशी कलात्मक किंवा तत्सम क्षेत्रात होत असलेल्या कॉर्पोरेट कंपन्यांचं आक्रमणाबाबत लागू होण्याचं सामर्थ्य लाभतं. ज्यामुळे त्याला एकीकडे ‘हमखास उत्पन्न मिळवून देणाऱ्या मालिकेतील आणखी एक चित्रपट’ असं म्हणता येत असलं तरी तो त्याच गोष्टीवर आक्रमण करत भाष्य करतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. 

क्रिस आणि ब्रायस यानिमित्तानं पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. अर्थात इथंही पहिल्याइतकाच भावनिक नात्याचा अभाव असला तरी चित्रपटाचा गाभा त्याभोवती फिरणारा नसल्यानं, समोर घडत असलेल्या फास्ट पेस्ड घटनांमुळे त्याचा अभावही जाणवत नाही. याखेरीज आयलंडवरील मोहिमेसोबतच सुरू असलेलं लॉकवुडची नात, मेझी लॉकवुड (इसाबेला सर्मोन) हिचं उपकथानकही असल्यानं चित्रपटात कंटाळवाणी दृश्यं आणि जागा जाणवत नाहीत. 

जेफ गोल्डब्लुमचं पहिल्या ‘ज्युरासिक पार्क’मधील एकमेव पात्र, डॉ. इयान मॅल्कम, हे मुळातच उत्तम असून इथं मात्र कमी लांबीचा आणि काहीसं अनावश्यक कथन, यांमुळे एक चांगला अभिनेता वाया घालवला आहे असं वाटतं. तरीही शेवटी ‘ज्युरासिक वर्ल्ड’च्या अनुषंगानं येणारं त्याचं कथन समोरील दृश्यांना एक चांगली आणि पूरक बाब म्हणून काम करतं. 

आधी उल्लेख केल्याप्रमाणे स्पिलबर्ग ऐवजी जे. ए. बायोना हा दिग्दर्शक असल्यानं चित्रपटात त्याच्या ‘क्लासिक टच’ची उणीव भासत राहते. शिवाय सदर चित्रपट मालिकेतील पहिल्या तीन इंस्टॉलेशन्समध्ये भयाचीही चिन्हं दिसून येतात, तीही इथं काहीशी अभाव असलेली आहेत. 

तरीही चित्रपटाची स्वतःची अशी काही दृश्यं आहेत, आनंद घेता येतील असे क्षण आहेत. ज्यामुळे चित्रपट अगदी दुर्लक्ष करता येईल असा राहत नाही. शिवाय तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे व्हीएफएक्सबाबत चित्रपट अधिक सरस बनतो, हे सांगणे न लगे. याखेरीज मायकल गिएचिनोचं पार्श्वसंगीतही चित्रपटाला पूरक आहे. मात्र यातही स्पिलबर्गच्या चित्रपटांची खासीयत असलेल्या जॉन विल्यम्सची आठवण आल्याखेरीज राहत नाही. चित्रपटसृष्टीमध्ये क्लासिक आणि आयकॉनिक ठरलेले ठसे तसे पुसता येणं अशक्य असतं. त्यामुळे त्याबाबत विशेष तक्रार करता येत नाही. मात्र तो क्रायटेरिया वगळता चित्रपट उत्तम ठरतो का, हा प्रश्न उरतो. आणि या चित्रपटाबाबत तरी या गोष्टीचं उत्तर होकारार्थी आहे. 

त्यामुळे ‘ज्युरासिक वर्ल्ड : फॉलन किंगडम’ मनोरंजक ठरण्याची किमान अट पूर्ण करतो आणि सदर चित्रपट मालिकेत शोभूनही दिसतो. त्यात उणीवा असतीलही, किंबहुना आहेतही. मात्र त्या चित्रपटाच्या फास्ट पेस्ड ‘रोलर कोस्टर’ राइडमध्ये अडथळा ठरत नाहीत. त्यामुळे चित्रपट किमान एकदा बघावा असा बनतोच. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......