‘काँग - स्कल आयलंड’ : बऱ्याचशा अँटी वॉर आणि मॉन्स्टर चित्रपटांना मानवंदना
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘काँग - स्कल आयलंड’चं पोस्टर
  • Sat , 02 June 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti इंग्रजी सिनेमा Englishi Movie काँग - स्कल आयलंड Kong: Skull Island जॉर्डन व्हॉग-रॉबर्ट्स Jordan Vogt-Roberts

प्रत्येक चित्रपटाच्या व्यावसायिक व समीक्षात्मक यशाचं गणित आणि त्याचे परिणाम वेगळे असतात. काही चित्रपट एखाद्या झटपट तयार होणाऱ्या पदार्थाच्या रेसिपीसारखे असतात, ज्यांना तत्काळ यश लाभतं. तर काहींना प्रेक्षक आणि समीक्षकांवर त्यांचा प्रभाव वाढू देण्याकरिता काही काळ जाऊ द्यावा लागतो. बऱ्याच वर्षांपासून सुरू असलेल्या फ्रँचाइज आणि त्यांचे दर काही दशकांनी होणारे रिबूट्स यांना थोड्याफार फरकानं व्यावसायिक यश हमखास मिळत असलं तरीही समीक्षक-मान्यता मिळेलच असं नसतं. मात्र (‘गॉडझिला’ आणि ‘किंग काँग’ असलेल्या) ‘माँस्टरव्हर्स’ चित्रपट मालिकेतील ‘काँग : स्कल आयलंड’ला या दोन्ही प्रकारचं यश मिळून तो एक ‘इंस्टंट क्लासिक’ बनला आहे. इंटरनेट जगतात तर त्यानं स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे. 

असे चित्रपट बनवत असताना प्रामुख्यानं दोन गोष्टी घडत असतात किंवा किमान तशी शक्यता असते. ती म्हणजे ‘थिंग्ज डन राइट’ आणि ‘थिंग्ज डन राँग’. कारण अशा चित्रपटांच्या आणि चित्रपट प्रकारांच्या अनेक वर्षांतील अस्तित्वादरम्यान वा अनेक वेळा झालेल्या पुनरुज्जीवनादरम्यान अनेक अलिखित नियम तयार झालेले असतात. त्यामुळे अनेक गोष्टी भाकित करण्याच्या निमित्तानं अपेक्षित असतात. जे भयपटांबाबत दरवेळी दिसून येतं. त्यामुळे हा चित्रपटांचा जॉन्रदेखील या गोष्टींचा बळी ठरत असतो. त्यामुळे ‘काँग : स्कल आयलंड’बाबतही किती गोष्टी वेगळ्या आणि रूढ मार्गानं जाऊन वाईट रूपात समोर अवतरल्या असत्या ते दिसून येत राहतं. मात्र तसं न होण्यातही त्याच्या यशाचं एक मुख्य गमक आहेच. 

दिग्दर्शक जॉर्डन व्हॉग-रॉबर्ट्स या चित्रपटाच्या निमित्तानं व्हिएतनाम युद्धाच्या काळात घेऊन जातो. ज्याला डन गिलरॉय, मॅक्स बोरन्स्टैन आणि डेरेक कॉनलीची पटकथा अनेक रूपकं वापरून खुलवत जाते. 

‘मोनार्क’ या सरकारला माहिती असलेल्या आणि सरकारनं वेळोवेळी मदत केलेल्या गुप्त संशोधन संस्थेचा कारभार सांभाळणारा विल्यम ‘बिल’ रँडा (जॉन गुडमन) याला विक्षिप्तरीत्या विकसित प्राण्यांच्या अस्तित्वाची शक्यता असलेल्या एका बेटाच्या अस्तित्वाची बातमी मिळते. तो सरकारच्या सहाय्यानं तिथं शोध घेण्याचा प्रस्ताव ठेवतो. नियोजित कार्यक्रमानुसार एक पत्रकार, एक निपुण ट्रॅकर आणि सुसज्ज मिलिटरी एस्कॉर्ट, अशी टीम बेटाच्या दिशेनं वाटचाल सुरू करते. तिथं गेल्यावर दिसणारी विलोभनीय दृश्य, आक्राळविक्राळ प्राणी आणि या टीमच्या समस्या असं साधारण कथानक असलं तरी या काही ओळींच्या दरम्यान जे काही सुप्तरीत्या घडतं आणि रूपकांतून सूचित केलं जातं, त्यातून चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू दिसून येते. 

यात दोन तऱ्हेची रूपकं आहेत. एक म्हणजे युद्धाचे परिणाम आणि स्वरूप यांचं चित्रण, तर दुसरं म्हणजे निसर्गात मानवी हस्तक्षेपाचे परिणाम. युद्ध कुठलेही असो, त्यात - मग ती आर्थिक, सामाजिक व राजकीय असो की जैविक- दोन्ही बाजूंची हानी होत असते. प्रामुख्याने पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध ही दोन युद्धं जागतिक पातळीवर सर्वाधिक विध्वंसक मानली जात असली तरी त्याशिवाय घडलेली इतर अनेक युद्धंही तितकीच महत्त्वाची आणि विध्वंसक होती. ‘व्हिएतनाम युद्ध’ही अशाच युद्धांपैकी एक होतं. 

पहिली दोन्ही महायुद्धं आणि यात जवळपास तीस वर्षांचा काळ उलटून गेला होता. ज्या दरम्यान जागतिक स्तरावर अनेक बदल घडून आले होते. नवीन हत्यारं, तंत्रज्ञान सर्वांच्या परिचयाचं झालं होतं. ज्यामुळे हिंसा, मृत्यू यांच्यासाठी मुबलक व अधिक विध्वंसक हत्यारं तयार आणि उपलब्ध झाली होती. 

हा चित्रपट ‘काँग’ व माणूस किंवा ‘काँग’ व ‘स्कलक्रॉलर’ यांच्यातील लढा, त्यानिमित्तानं व्हिएतनाम युद्ध, एकूणच ‘युद्ध’ ही संकल्पना आणि त्यात होणारी जीवित व वित्त हानी विविध रूपकांतून दाखवत राहतो. 

याखेरीज कर्नल पॅकर्डच्या (सॅम्युअल एल. जॅक्सन) पात्राच्या अनुषंगानं युद्धाचे सैनिकांवर होणारे मानसिक आणि सामाजिक स्वरूपाचे परिणाम दिसून येतात. प्रत्येक बाबीला एकतर मित्र किंवा शत्रू म्हणून, किंबहुना प्रत्येक गोष्ट फक्त कृष्णधवल रूपात पाहून त्यावर जहाल प्रतिक्रिया व्यक्त करणं, ही ‘हॉरर्स ऑफ वॉर’ म्हणून ओळखली जाणारी संकल्पना पडद्यावर दिसून येते. 

याखेरीज व्हिएतनामची पार्श्वभूमी वापरून त्यावर तेथील बेटावरील मवाळ, शांत अशा आदिवासी जमातीचा भाग रंगवून ‘जपान विरुद्ध अमेरिका’ युद्धातील विध्वंसक प्रवृत्ती अधोरेखित केली जाते. ज्याला पुन्हा सुप्तरीत्या मानव विरुद्ध निसर्ग या बाबीचीही जोड आहेच. काँगच्या पूर्वजांच्या कबरी असणाऱ्या स्थळी केलेला ‘फ्लेमथ्रोअर’ उर्फ ‘झिप्पो’ या व्हिएतनाम युद्धातील अमेरिकन सैन्याकडून मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या गनच्या निमित्तानं युद्धाचं प्रतिबिंब दिसतं. नंतर याच बंदुकीच्या परिणामाला समांतर जाणारं, शेवटाकडील अमेरिकन सैनिकांचं जळणं पुन्हा हीच गोष्ट सांगतं. 

दिग्दर्शक रॉबर्ट्सनं यातून बऱ्याचशा अँटी वॉर आणि मान्स्टर चित्रपटांना मानवंदना (homage किंवा tribute) दिली आहे. ज्यात अगदी ‘ज्युरासिक पार्क’मधील डायनासोर्सच्या पहिल्या दर्शनापासून ते ‘गॉडझिला’ला समांतर असणाऱ्या एका अवाढव्य ‘लिझर्ड’चा वापर, तसंच ‘अपॉकलिप्स नाऊ’मधील व्हिएतनाममधील हेलिकॉप्टर्सचा लालसर आकाशातील ताफा, अशा अनेक गोष्टी दिसून येतात. 

विषारी वायुंमुळे काँगच्या पूर्वजांच्या हाडांच्या सापळ्यांचं तयार झालेलं दृश्य, काँगच्या आयकॉनिक ठरतील अशा लढाया, उत्तम व्हीएफएक्स आणि छायांकन यांच्या रूपानं पडद्यावर झळकून ‘किंग काँग’चा सीक्वेल या बिरुदाला न्याय देतात. 

हेन्री जॅकमनचा ओरिजनल स्कोअर, त्यातील साऊंडट्रॅकसोबत सत्तरच्या दशकाला आणि व्हिएतनामला अनुसरून असलेलं वातावरण तयार करतात. काहीएक डझन हेलिकॉप्टर्स आकाशात उडत असताना सोबतीला असलेलं ‘ब्लॅक सॅबथ’चं ‘पॅरानॉइड’ आणि इतरही बरीचशी गाणी या गोष्टीचं द्योतक आहेत. 

टॉम हिडलस्टन, सॅम्युअल एल. जॅक्सन, ब्राय लार्सन, जॉन गुडमन, जॉन रायली अशी बरीच मोठी आणि तगडी स्टारकास्ट घेऊन चित्रपट अर्धी बाजी आधीच मारतो. जॅक्सनचा वेळोवेळी डोळ्यात आग दिसणारा कर्नल पॅकर्ड एक अँटी हिरो म्हणून प्रभावीपणे उभा राहतो. त्यानं पाहिलेली युद्ध, नरसंहार यांचा विचार करता त्याच्या कृत्यांकरिता त्याला पूर्णतः दोष देणं कठीण जातं. त्यामुळे पात्रांना विशेष खोली नसणं, ही अशा चित्रपटांतील मुख्य उणीव या चित्रपटात बहुतांशी नाकारता येते. 

बाकी एक चित्रपट म्हणून यावर प्रभाव असणाऱ्या याच जॉन्रमधील इतर चित्रपटांचं चित्रण, ग्राफिक्स या बाबींचं कौतुकही करता येतं किंवा त्यांना सरळ टाकाऊ ठरवून द्वेषही करता येतो. मात्र त्यांचं अस्तित्त्व नाकारता येत नाही. याखेरीज पॉप कल्चरवरील त्यांचा प्रभावही नाकारता येत नाही. 

१९४० च्या म्हणजेच दुसऱ्या महायुद्धाच्या दशकात साकार झालेला ‘गॉडझिला’ किंवा मूळचा (जपानी भाषेतील) ‘गोजिरा’ हा जीव वेळोवेळी आण्विक हल्ले ते साम्यवाद, अशा अनेक गोष्टी, जागतिक पातळीवरील समस्या आणि धोक्यांना रूपक म्हणून वापरला गेला आहे. ‘काँग : स्कल आयलंड’च्या निमित्तानं भलेही रूप बदलून का होईना, पण त्यानं पुन्हा एकदा व्हिएतनाम युद्धाच्या काळात जाऊन मुख्यतः जपानवरील तत्कालीन संकटांना मूर्त स्वरूप देऊन ‘इशिरो होंडा’ या ‘गोजिरा’च्या मूळ निर्मात्याचा उद्देश सफल केला आहे हे मात्र नक्की. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................