‘लव्ह पर स्क्वेअर फूट’ :  क्लिशे वापरूनही उजवा ठरणारा सिनेमा
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘लव्ह पर स्क्वेअर फूट’चं पोस्टर
  • Sat , 26 May 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie लव्ह पर स्क्वेअर फूट Love Per Square Foot आनंद तिवारी Anand Tiwari नेटफ्लिक्स ओरिजनल Netflix Original

साधारण १९९७ ला स्थापन झालेली ‘नेटफ्लिक्स’ ही सुरुवातीला ‘डीव्हीडी रेंटल सर्व्हिस’ म्हणून कार्यरत असलेली कंपनी गेल्या दोन दशकात डीव्हीडी सोबत ब्ल्यु-रे रेंटल सर्व्हिस, पुढे जाऊन ‘ऑनलाईन स्ट्रीमिंग’ आणि नंतर २०१३च्या सुमारास चित्रपट आणि टीव्ही शो वितरण आणि निर्मिती असा मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेला बराच प्रवास करून आता जगातील दहाव्या क्रमांकाची सर्वांत मोठी इंटरनेट कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. या वर्षी, फेब्रुवारीमध्ये या कंपनीनं भारतातही ‘नेटफ्लिक्स ओरिजनल’ या नावानं चित्रपटांच्या निर्मितीला सुरुवात केली आहे. आनंद तिवारी दिग्दर्शित ‘लव्ह पर स्क्वेअर फूट’ या चित्रपटानं भारतात याची मुहूर्तमेढ रोवली आहे. ती मनोरंजक आहेच, मात्र या क्षेत्रातील नेटफ्लिक्सच्या वर्चस्वाचं कारणही स्पष्ट करणारी आहे. शिवाय येत्या जुलैमध्ये येणाऱ्या अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानीच्या ‘सॅक्रेड गेम्स’ या नेटफ्लिक्सच्या पहिल्या भारतीय सीरिजबद्दल उत्सुकता वाढवणारी आहे. 

आनंद तिवारी आणि सुमित व्यास या दोन्ही व्यक्ती इंटरनेट आणि त्यातही ‘युट्यूब’वरील बडे प्रस्थ नसल्या तरी प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या आहेत. त्यांनी लिहिलेली आणि आनंदनं दिग्दर्शित केलेली  ‘बँग बाजा बारात’ किंवा ‘पर्मनंट रूममेट्स’, ‘टीव्हीएफ ट्रिपलींग’ अशा बऱ्याचशा वेब सीरिज इंटरनेट विश्वात गाजत आलेल्या आहेत. शिवाय, या चित्रपटातील अभिनेत्री अंगिरा धर हीदेखील ‘बँग बाजा बारात’मधील गाजलेली अभिनेत्री आहे. त्यामुळे ऑनलाईन विश्वातील या ख्यातनाम लोकांच्या चित्रपटाला ‘नेटफ्लिक्स’नं प्रेझेंट केलं नसतं तरच नवल. 

संजय चतुर्वेदी (विकी कौशल) हा एका कंपनीत काम करतो. तर त्याचे वडील, भास्कर चतुर्वेदी (रघुवीर यादव) हे भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे ओघानंच त्यांचं रेल्वेनं दिलेल्या  क्वार्टर्समध्ये राहणं आलं. मग त्या लहानशा रेल्वे क्वार्टर्समध्ये लहानाचा मोठा झालेल्या संजयची महत्त्वाकांक्षा फार काही नाही. त्याला फक्त मुंबईमध्ये स्वतःचं घर घ्यायचं आहे. ज्यासाठी त्यानं केलेली तयारी, स्वतःच्या कंपनीचाच भाग असलेली बँक पाहून स्वीकारलेली नोकरी, यातून त्या एका स्वप्नाप्रती असलेली त्याची निष्ठा दिसून येते. 

तर करीना डि'सुझा (अंगिरा धर) ही त्या बँकेत काम करते. तिचंही घर थोड्याफार प्रमाणात वास्तव्याच्या किमान, किंबहुना कमाल समस्या असलेलं आहे. त्यामुळे तिलाही स्वतःचं घर घ्यायचं आहे. ज्याकरिता तिचा प्रियकर, सॅम्युएल मिस्क्विटा (कुणाल रॉय कपूर) आणि त्याच्याशी लग्न झाल्यानंतर त्यानिमित्तानं तिला मिळणाऱ्या घराप्रतीच्या तिच्या भावनाही संजयच्या भावनांना समांतर आहेत. 

मग पुढे जाऊन घडणाऱ्या काही घटनांमुळे एका कराराच्या आधारावर, एकत्र येऊन एका स्कीमच्या मदतीनं एक फ्लॅट घेतात. त्यामुळे एकूणच त्यांच्या लव्हस्टोरीचा प्रवास आधी घर, मग प्रेम अशा उलट रूपानं होतो. मग ते प्रेम त्यांना कुठवर घेऊन जातं, ते कितपत टिकतं, वगैरे गोष्टी पुढच्या ठरतात. 

‘लव्ह पर स्क्वेअर फूट’ची जमेची (आणि मजेचीही) बाब ही की, तो एक टिपिकल बॉलिवुड शैलीची कथा घेतो. मग त्यात स्वतःची अशी काही तत्त्वं घालून तिला मोठं करतो. मात्र सोबतीला टिपिकल बॉलिवुडपटात शोभतील अशी दृश्यं, समस्या आणि ट्विस्ट्स घेतो. आणि त्यांना आपलंसं करून कधी विडंबन म्हणून, तर कधी होमेज (homage) म्हणून समोर आणतो. 

त्यामुळे आपण एक फिल्म आहोत ही गोष्ट हा चित्रपट जाणतो. मात्र ही गोष्ट त्याच्या कथेच्या किंवा सादरीकरणाच्या आड येत नाही. उलट या गोष्टीला तो त्याचा प्लस पॉइंट ठरवत, काही फिल्मी नव्हे तर ‘सिनेमॅटिक’ ठरावी अशी दृश्यं चित्रित करतो. ट्रेलरच्या सुरुवातीला दिसणारं सुपरहिरोसारखा केप बांधून उभा असलेला नायकाचं दृश्य एका ‘सिनेमा’ला सुरुवात करून देतं. आणि शेवटी येणाऱ्या त्यालाच समांतर असलेल्या दृश्यानं या चित्रपटाच्या नायकाचा प्रवास पूर्णत्वास नेला जातो. 

कधी या नायकाला साथ देणारी, कधी त्याच्याशी रोमान्स करणारी तर कधी विरोध करणारी ही केवळ उथळ नायिका नाही. तिला स्वतःची अशी मतं आहेत, तिच्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षा आहेत. ती खरोखर एक ‘ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी वुमन’ आहे. मात्र म्हणून तिचं उदात्तीकरण होत नाही. तर तिच्या पात्राला योग्य तितका परीघ बहाल करून तिला स्क्रीनवर वावरू दिलं जातं. 

यासोबत रघुवीर यादव, सुप्रिया पाठक, रत्ना पाठक शहा, गजराज राव इत्यादींची पात्रं चित्रपटात कधी कॅरिकेचर म्हणून येतात, तर कधी जराशा प्रतिगामी स्वरूपाची आधीची पिढी आणि मग तिचा आताच्या जगाशी संबंध जोडत, त्यांना नवीन पिढीच्या विचारांशी जुळवून घेत, नव्या पिढीच्या नवीन संकल्पनांचा स्वीकार करणारी पात्रं म्हणून दाखवत जनरेशन गॅप कमी केती जाते. 

अलांकृता सहायचं पात्र किंवा तिचा पती अरुणोदय सिंह ही पात्रंही केवळ खलनायकी प्रवृत्तीची म्हणून समोर न येता त्यांनाही कॅरिकेचर्सची छटा येते. सोबत ब्रिजेश काला किंवा गोपाल दत्तची पात्रंही बॉलीवुड शैलीची कॉमिक रिलीफ म्हणून समोर येतात. बहुतांशी गोपाल दत्तनं लिहिलेली बरीचशी गाणी चित्रपटात येतात. मात्र तीही विशेष अडथळा ठरतात असं नाही. 

यात उणीवा नाहीत असं नाही. कारण उत्तरार्धात येणारा कन्फ्लिक्टचा शेवट जरासा फिल्मी वाटावा असा आहेच. मूळ कन्फ्लिक्टचं स्वरूप मराठीतील ‘डबल सीट’च्या धर्तीचं असलं तरी त्याचा विस्तार हा फिल्मी बाजाचा आहे. याखेरीज चित्रपटात ओघाने काही क्लिशे येतात. मात्र आधी उल्लेख केल्याप्रमाणे या सर्व गोष्टी नेमक्या खटकण्यालायक आणि ‘फिल्मी’ आहेत की, खास बॉलिवुड शैलीत चित्रपट बनवायचा म्हणून विचारपूर्वक आणि मुद्दामहून केलेल्या आहेत हे सांगता येणं अवघड आहे. 

अर्थात याचं उत्तर तसं सुमित व्यास आणि आनंद तिवारी यांच्या आधीच्या कामाचा परिचय असलेल्या लोकांकरिता सोपं आहे. ते उत्तर म्हणजे या गोष्टी उत्तमरीत्या आणि मुद्दामहून अंमलात आणलेल्या असण्याची शक्यता अधिक आहे. ज्यासाठी उदाहरण म्हणून ‘बँग बाजा बारात’ किंवा ‘पर्मनंट रूममेट्स’कडे पाहता येतं. 

एकूणच ‘लव्ह पर स्क्वेअर फूट’ हा त्याच्या स्वतःच्या ‘सिनेमॅटिक’ शैलीतून इतर चित्रपटांहून वेगळाच ठरत नाही, तर क्लिशे वापरूनही उजवा ठरतो. कारण क्लिशेजबद्दल बोलताना एक वाक्य वापरता येतं - ‘Clichés exists for a reason because when they're done well, they work.’ हीच गोष्ट या चित्रपटाला लागू पडते आणि त्यातील क्लिशेज फार ‘ओव्हर द टॉप’ आणि परिणामी टाकाऊ होत नाहीत. तर ते लक्षात रहावे असे आणि भारतीय चित्रटसृष्टीनं त्यांच्या योग्य तितक्या, संतुलित वापराबाबत धडा घ्यावेत असे बनतात. थोडक्यात, ‘नेटफ्लिक्स’च्या भारतीय चित्रपटसृष्टीत चित्रपट निर्मिती करण्याची सुरुवात करून देण्यासाठी या चित्रपटाहून अधिक चांगला पर्याय ठरला असता असं वाटत नाही. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................