‘न्यूड’ चित्रपटकलेकडे पाहण्याचं मौलिक भान जपण्याचं आवाहन करतो
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
श्रीराम मोहिते
  • ‘न्यूड’चं एक पोस्टर
  • Sat , 05 May 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie न्यूड Nude

‘न्यूड’सारख्या कलाकृतींना आपण भिडू शकतो का?

या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच अंशी आपल्या समकालीन अभिरुचीचं एक प्रातिनिधिक दर्शन घडवणारं ठरेल.

मार्केटनं पूर्णपणे ताबा घेतलेल्या आजच्या कलाविश्वात निखळ कलात्मकतेपुढे निकराची म्हणता येतील अशी आव्हानं उभी आहेत. कलात्मकतेला एखाद्या उत्पादनासारखं चकचकीत करून पेश करणं, ही हे मार्केट काबीज करण्याची अपरिहार्यता बनणं अनेक अर्थानं घातक आहे. उथळ रंजनाची रॅपर्स वापरल्याशिवाय कलेची आवाहकता वाढेनाशी झाली आहे.

कार्पोरेट पाठबळ आणि दिवाणखानी प्रॉडक्शन हाऊसच्या वरदहस्ताशिवाय तुमची उत्तुंग कलात्मकताही स्वीकारली जाईलच याची शाश्वती उरलेली नाही. बाजारू कलेच्या उन्मादासाठी आसुसलेला समाजातला एक मोठा प्रेक्षकवर्ग कलेच्या मौलिकतेपर्यंत पोहचण्याची शक्यता नसते.

हा प्रेक्षक ‘फॅन्ड्री’सारखा उत्तम चित्रपट ‘इंचू चावला’सारख्या तद्दन प्रमोशनल गाण्याच्या धुंद करणाऱ्या ठेक्याला भुलूनच पाहायला जातो. ‘सैराट’च्या मध्यंतरापर्यंतच्या ‘झिंगाट’ नशेत धुंदावणाऱ्यांचीच संख्या अधिक असते. त्याच्या उत्तरार्धातल्या भेदकतेला भिडणं अशांना शक्य होत नाही. कलाकृती निर्माण करू पाहत असलेल्या अर्थपूर्ण प्रश्नांपासून तो सतत पळत राहतो.

त्याला हवी असतात सोप्या प्रश्नांसाठी मुद्दाम घडवलेली तितकीच सोपी आणि आकर्षक उत्तरं. थोडक्यात त्याला डोक्याला ताप नको असतो. कलाकृती त्या त्रासातून जगण्याचा जो शोध घेऊ पाहते, तो शोध त्यांच्या रंजनाच्या गरजा भागवणारा नसतोच.

अर्थपूर्णतेपासून आणि ती शोधू पाहणाऱ्या कलाकृतीपासून सतत दूर पाळणारा असा पलायनवादी वर्ग मग आपल्या संख्येच्या बळावर आधी कलेच्या अभिरुचीवर प्रभाव टाकायला सुरुवात करतो. मग सत्ता आणि मार्केट यांच्या ताकदीवर कलेला नेस्तनाबूत करणं सोपं असतं. एक सजग प्रेक्षक म्हणून आपण काहीतरी मोलाचं आणि प्रामाणिकपणे सांगू पाहणाऱ्या वेगळ्या कलाकृतींना भिडू शकतो का, हा प्रश्न म्हणूनच महत्त्वाचा ठरतो.

दुर्दैवानं आज असं भिडू शकणाऱ्यांची संख्या वेगानं खालावत आहे. चांगल्या सिनेमाला चार दिवसही थिएटरमध्ये टिकून राहणं त्यामुळे शक्य होईनासं झालं आहे. आपल्या सांस्कृतिक भवतालातलं हे मोठं अपयश म्हणावं लागेल. एकीकडे प्रचंड भरताड आणि प्रेक्षकानुनयी सिनेमे कोटींची उड्डाणं घेत राहतात आणि दुसरीकडे चांगल्या सिनेमाला आलेले प्रेक्षक मोजायला मात्र हाताची बोटं पुरतात. कलात्मकतेकडे आणि जीवनाकडे पाहण्याचं भान कमावलेला प्रेक्षक आणि माणूस घडवणं, हे आज आपल्यापुढचं सर्वांत मोठं सांस्कृतिक आव्हान आहे.

‘न्यूड’ हा चित्रपटकलेकडे पाहण्याचं हेच मौलिक भान जपण्याचं अत्यंत भेदक आवाहन आपल्याला करतो. एरवीच्या जगण्यात ज्या अपरिहार्य सहजतेनं नग्नतेकडे पाहतो, तीच कलाकृतींमधून व्यक्त होताना मात्र आपण कसे दांभिक होत जातो, याचं प्रत्ययकारी चित्रण ‘न्यूड’मधून घडतं. खजुराहो आणि इतर अनेक ठिकाणच्या शिल्पकलेतून आपल्या पूर्वजांनी ज्या कलात्मकतेनं नग्नतेतल्या नितळ सौंदर्याचा, सौष्ठवाचा वेध घेतला, तो त्यांच्या प्रगल्भ कलादृष्टीचा आणि जीवनदृष्टीचा पुरावा आहे.

दुर्दैवानं आज स्वतःला आधुनिक वगैरे म्हणवून घेणारे अशा कलात्मकतेला भिडू शकत नाहीत. अस्सल कलेनं घडवलेल्या भेदकतेनं भयभीत झालेल्या तथाकथित संस्कृतीरक्षकांचे दंडुके मग कलेला ठोकून काढण्यासाठी सरसावतात. निर्बुद्धांच्या मस्तवाल टोळ्यांच्या बळावर कलेला वेठीला धरतात. तिला हद्दपार करण्याचे फतवे काढू लागतात. अशा वेळी मग कलेला काळं वगैरे फासणं अगदीच सोपं होऊन जातं. कारण दांभिकांच्या या भयंकर गदारोळात कलेचा संयत स्वर दाबून टाकणं अगदीच मामुली काम असतं. कुठल्याही धाडसी कलाकृतीला नाकारलं जाण्याच्या अशा टप्प्यातून जावं लागतं, ते यामुळेच. ‘न्यूड’च्या बाबतीतही कमी अधिक प्रमाणात हे घडलं हे आपल्याला माहिती आहेच. पण या साऱ्यामधून ‘न्यूड’सारख्या कलाकृती ज्या धाडसानं, ठामपणानं व्यक्त होतात, ते फारच मोलाचं आहे.

‘न्यूड’ ही कथा आहे यमुना (कल्याणी मुळे) नावाच्या एका आईची आणि तिनं पाहिलेल्या स्वप्नांची. तिचं पहिलं स्वप्न आहे आपला मुलगा, लहान्याला (मदन देवधर) शिक्षण देऊन त्याला घडवण्याचं. त्याच्यातील चित्रकलेची आवड लक्षात घेऊन ती त्याला चांगला चित्रकार बनवण्याचं ठरवते. दारिद्र्यामुळे येणारं अगतिकपण आणि नवऱ्याकडून होणारा विश्वासघात, अघोरी अपमान असह्य होऊन मुलाला घडवण्याचं स्वप्न घेऊन ती मुंबई नावाच्या एका अफाट महानगरात येते. इथं मावशी चंद्राक्काचा (छाया कदम) भक्कम आधार तिला मिळतो. लहान्याच्या शिक्षणासाठी नोकरी शोधतानाच तिला चंद्राक्काच्या खऱ्या कामाबद्दल समजतं. चंद्राक्का कला महाविद्यालयात ‘न्यूड मॉडेल’ म्हणून काम करते, हे तिच्यासाठी सुरुवातीला धक्कादायक असलं तरी या कामाचं महत्त्व आणि कलेचं मोल हळूहळू तिला कळत जातं. ‘अगं हे शिक्षणाचं काम हाय आणि इथं शिकणाऱ्या कुणाच्याही नजरेत वखवख नसती. असतो तो फक्त अभ्यास.’ हे चंद्राक्काचे शब्द तिला या कलेतलं मोलाचं काहीतरी सांगून जातात. महाविद्यालयात शिकणाऱ्या जयरामच्या (ओम भूतकर) रूपानं कलेचं असं भान असणारा विद्यार्थी यमुनाला भेटतो.

पुरुषी चौकटीच्या बाहेरच्या एका माणसाचं दर्शन तिला घडतं. कलेच्या मौलिकतेचा शोध घेऊ पाहणारे जगद्विख्यात चित्रकार मलिक (नासिरुद्दीन शहा) तिला कलेचं मर्म खूप तरलपणे सांगून जातात- ‘कपडा जिस्म को ढक सकता है, रुह को नहीं, और मैं अपने काम में रुह खोजने की कोशिश करता हूँ’. आपला लहान्याही शिक्षणानं असाच उन्नत माणूस आणि प्रगल्भ कलावंत होईल, हे तिचं स्वप्न मग अधिकच मोठं होत जातं. या स्वप्नाचं शेवटी काय होतं, ते पाहणं माणूस म्हणून आपल्याला हादरवून टाकतं. शरीराच्या नग्नतेपेक्षा हे मनाचं नागवेपण माणूस म्हणून आपल्याला कसं नेस्तनाबूत करत जातं, याचं विलक्षण दर्शन ‘न्यूड’ आपल्याला घडवतो.

दिग्दर्शक रवी जाधव यांच्या कारकीर्दीतला हा सर्वोत्तम चित्रपट म्हणावा लागेल. पटकथाकार सचिन कुंडलकर यांचीली सुरेख पटकथा, छायालेखक अमलेंदू चौधरी यांनी हा तरल आशय नेमका पकडताना निर्माण केलेल्या अदभुत चित्रचौकटी आणि कल्याणी मुळे, छाया कदम यांच्यासह इतर कलाकारांनी केलेला विलक्षण अभिनय ही या चित्रपटाची खरी बलस्थानं आहेत. पटकथाकार म्हणून सचिन कुंडलकर हे ज्या प्रगल्भपणे पूर्वार्धात व्यक्तिगत वाटणाऱ्या या संघर्ष कहाणीला कलेकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनाच्या एका व्यापक स्तराकडे घेऊन जातात, ते अनुभवण्यासारखं आहे. मराठी चित्रपटांच्या पटकथा लेखनातलं, हे सर्वांत यशस्वी उदाहरण आहे, हे आवर्जून नमूद करावं लागेल.

आपल्याकडे आपले हुकमी पटकथाकार सामाजिक वास्तव ज्या ढोबळ ऊरबडवेगिरीकडे सतत ओढून आणण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यासाठी ही पटकथा एक वस्तुपाठ ठरावी. वास्तवाच्या ढोबळ चित्रणातून वर उठून एखादी कलाकृती कलेच्या आणि जीवनाच्या मूल्यात्मक पेचांना कशी स्पर्श करू शकते, त्याचा ‘न्यूड’ हा उत्तम नमुना आहे. अमलेंदू चौधरीनी निवडलेल्या, आशयाचा पोत गडद करणाऱ्या चित्रचौकटी चित्रपटाला एखाद्या शिल्पाइतकाच ठाशीव परिणाम देतात. झोपडपट्टीचं दर्शन घडवणारी दृश्यं, न्यूड पेंटिंग करताना निवडलेल्या संयत फ्रेम्स, समुद्रावरील प्रसंगासाठी वापरलेला प्रकाशाचा पोत आणि कॅमेरा लेव्हल्स चित्रपटाच्या दृश्यानुभवाला खूपच उंचीवर नेतात. कल्याणी मुळेंनी या चित्रपटात केलेला अभिनय अपूर्व या प्रकारातला आहे. त्यांनी पहिल्यांदाच ‘न्यूड मॉडेल’ म्हणून बसताना चेहऱ्यावर दाखवलेले बारकावे विलक्षण आहेत. छाया कदम, ओम भूतकर, मदन देवधर, किशोर कदम यांनी आपापल्या भूमिकेत अतिशय सुंदर काम केलं आहे. नसिरुद्दीन शहांनीही आपल्या छोट्या पण महत्त्वाच्या भूमिकेत गहिरे रंग भरलेत.

चित्रपटात न्यूड पेंटिंग काढण्याच्या प्रसंगात पार्श्वभूमीला विद्या राव यांच्या स्वरात कबीराचा दोहा ऐकायला मिळतो- ‘रे साधो, अब ये ठाठ तंबुरे का’. शरीराचा थाट जणू एखाद्या तंबोऱ्यासारखा. पाच तत्त्वांनी आकाराला येणार हा देहाच्या तंबोऱ्याचा थाट असतो. तो त्यातून निर्माण होऊ शकणाऱ्या स्वरांच्या प्राणतत्वाकडे जाण्यासाठी. या तंबोरारूपी देहाचा गर्व आणि आसक्ती वाईट. स्वरांचा हंस त्यातून कधी उडून जाईल सांगता नाही यायचं. म्हणून कबीर म्हणतात ‘अगम पंथ इकसुरे का’. सगळ्या आखीव वाटा जिथं संपतात तिथं खरा प्रवास सुरू होतो. देहानं आखलेल्या वाटा ओलांडल्याशिवाय आपल्याला मुक्त नाही होता येत. आणि देहाच्या नितळ दर्शनातूनच देहाच्या पार जाण्यातली मौलिकता हाती लागू शकते.

‘न्यूड’ याच मौलिकतेकडे आपल्याला घेऊन जातो.

.............................................................................................................................................

लेखक श्रीराम मोहिते साहित्य आणि चित्रपट अभ्यासक आहेत.

shrirammohite@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......