‘शिकारी’ खुद यहाँ ‘शिकार’ हो गया!
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘शिकारी’चं एक पोस्टर
  • Sat , 21 April 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie शिकारी Shikari

२००३ मध्ये आलेल्या (आणि सुरुवात झालेल्या) ‘मस्ती’ चित्रपट सिरीजच्या निमित्तानं भारतात अडल्ट कॉमेडी चित्रपटांची निर्मिती सुरू झाली. त्यानंतर एकता कपूरच्या बालाजी प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या ‘क्या कूल है...’नं हा वारसा पुढे चालवला. मात्र मराठीमध्ये नव्वदच्या दशकात आलेले बी ग्रेड म्हणावे असे काही चित्रपट वगळता अडल्ट कॉमेडी हा प्रकार फारसा हाताळला गेला नाही. त्यामुळे विजू माने दिग्दर्शित ‘शिकारी’नं याला सुरुवात केली असली तरी एक चित्रपट म्हणून तो तितकासा प्रभावी ठरत नाही. 

‘शिकारी’ सुरुवातीला ग्रामीण पार्श्वभूमी दाखवत मुख्यतः रघु (सुव्रत जोशी), त्याची पत्नी फुलवा (मृण्मयी देशपांडे), सविता (नेहा खान) आणि भरत (प्रसाद ओक) या चार लोकांभोवती फिरतो. रघु हा मुंबईत मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सक्रिय असतो. त्याचा मामा (भाऊ कदम) त्याला गावात फुलवाचं स्थळ दाखवण्यासाठी बोलवतो आणि समोर घडणाऱ्या दुय्यम दर्जाच्या संवादांची जोड असलेल्या घटनांमुळे लैंगिकदृष्ट्या उत्तेजित होणारा रघु तिच्याशी लग्न करतो. 

मात्र प्राथमिक लैंगिक शिक्षणही न मिळालेली फुलवा त्याच्या गरजा पूर्ण करू शकत नाही. परिणामी तो सविता (भाभी) कडे आकर्षित होतो. ज्याचं रूपांतर सविताचं रघुसोबत मुंबईला जाणं आणि पुढे जाऊन कास्टिंग काऊचला बळी पडणं यात होतं. 

सुरुवातीला केवळ कामोत्तेजक दृश्यं आणि फारसे धड नसलेले द्विअर्थी संवाद यांच्यात गुंतलेला ‘शिकारी’ नंतर बराच सुकर होण्याच्या मार्गावर येतो. आणि खरं तर यामुळेच त्याचा मूळ विषय आणि ट्रेलरमधून प्रेक्षकांना ‘जे’ दाखवलं आहे, त्यापासून बराच दूर जातो. अर्थात हे सामाजिक स्तरावर भेडसावणारी एखादी समस्या सोडवणाऱ्या ‘प्रॉब्लेम प्ले’च्या दृष्टीनं चांगलं असलं तरी पटकथेचं एकसंध नसणं आणि एकाच वेळी अनेक विषयांना हात घालण्याचा (असफल) प्रयत्न करण्याचं द्योतक आहे. 

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406

.............................................................................................................................................

पूर्वार्धामध्ये लेखक त्याच्या टार्गेट असलेल्या प्रेक्षकांना खुश करेल असे संवाद, स्त्री शरीरावरील सर्रास वापरल्या जाणाऱ्या संज्ञा आणि (तथाकथित) मादक दृश्यं असा भरघोस मसाला घालतो. मात्र नंतर लैंगिक शिक्षणाचा अभाव व कास्टिंग काऊचसारखे संवेदनशील विषय घेऊन आपल्याला आऊट अँड आऊट अडल्ट कॉमेडी करायची नाही, असा उसना आव आणतो. त्यामुळे होतं काय की चित्रपट ना धड विनोदी बनतो ना गंभीर. अर्थात तो एकाच 'जॉनर'चा (genre) असावा असा (अतार्किक) आग्रह नसला तरी त्यानं त्याच्या मूळ कथानकापासून तरी नको तितकी फारकत घ्यायला नको. पण तेही होत नाही. 

ग्रामीण पार्श्वभूमी असली तरी यात कुणाचीही भाषा किमान एका लहेजाचीही नाही. कुणी अस्खलित मराठीमध्ये संवाद साधत आहे, तर कुणी ग्रामीण भाषेत. त्यामुळे नक्की पार्श्वभूमी काय आहे, तेच संवादलेखन करताना लक्षात घेतलं नसावं की काय अशी शंका येते. शिवाय यातील द्विअर्थी संवादही ‘मस्ती’ किंवा ‘क्या कूल...’प्रमाणे नाहीत. यांचा उल्लेख करण्याचं कारण हे की, यासाठी सध्या तरी हेच लघुत्तम आणि जास्त सोयीस्कर परिमाण आहे. त्यामुळे राजेश देशपांडेंचे संवाद त्यांचं अपेक्षित काम करतातच असं नाही. 

महेश मांजरेकरांनी लिहिलेली (किंवा किमान तसं क्रेडिट दिलेल्या) पटकथा सदोष आहे. पूर्वार्ध हा उत्तरार्धापेक्षा उजवा असला तरी विषयानुरूप मध्यांतरापूर्वीचा आणि नंतरचा चित्रपट या दोन्हींमध्ये बरीच तफावत आहे. 

सुव्रत जोशी आणि मृण्मयी देशपांडे हे दोघेही यातील पात्रं साकारताना अवघडल्यासारखे वाटत राहतात, जे खरं तर अगदी ट्रेलरपासून दिसून येत होतं. त्यामुळे अडल्ट कॉमेडीपटात अपेक्षित असलेला चीअरफुल आणि व्हल्गर परफॉर्मन्स इथं दिसण्याचा प्रश्न येत नाही. अगदी भाऊ कदम, वैभव मांगले, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव वगैरे लोकांनाही बहुतांशी वेळा टाळ्याखाऊ संवादाच्या अभावी फक्त चित्रपटातील तीन मुख्य अशा स्त्री पात्रांचे क्लिव्हेज (cleavage) आणि नितंब बघण्यात गुंग व्हावं लागतं. 

चित्रपटात भाऊ कदम एकदा बहुधा ‘शिकारी खुद यहाँ शिकार हो गया’ की तत्सम काहीतरी गाणं गात असतो (ज्यामुळे चित्रपटाला त्याचं हे नाव लाभलं असावं) आणि चित्रपटाची एकूण परिस्थितीदेखील याच गाण्यानं सांगता येते. कारण शेवटी हा ‘शिकारी’ त्याच्या पटकथेच्या गंभीरतेचा आव आणण्याच्या प्रयत्नात स्वतःच ‘शिकार’ होऊन बसतो. तो थोडंफार मनोरंजन करत असला तरी फारशा अपेक्षा पूर्ण करत नाही एवढं नक्की म्हणता येईल.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......