ती... सुपरस्टार! श्रीदेवी फक्त नायकाची नायिका नव्हती, स्वतंत्रपणे प्रेक्षक खेचू शकेल, अशा वकुबाची अभिनेत्रीही होती...
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
मुकेश माचकर
  • श्रीदेवी (१३ ऑगस्ट १९६३- २४ फेब्रुवारी २०१८)
  • Thu , 08 March 2018
  • कला-संस्कृती हिंदी सिनेमा मुकेश माचकर Mukesh Machkar श्रीदेवी Sridevi

तो भयंकर फाळणीचा काळ होता...

१९८८-९०चा सुमार...

...देशाचे दोन तुकडे झाल्यातच जमा होते... किमान तेव्हाच्या देशभरातल्या हिंदी चित्रपटप्रेमी तरुण पोरांच्यात तरी उभी दुफळीच होती... एक वर्ग होता श्रीदेवीला चाहणाऱ्यांचा आणि दुसऱ्याच्या दिलाची धडकन होती माधुरी दीक्षित... दोन्हीकडची मंडळी एकदम कट्टर.

चहाटपऱ्या आणि इराण्यांच्या हॉटेलांपासून ते गल्ली-कॉलेजांच्या नाक्यांपर्यंत सगळीकडे तुंबळ वाग्युद्ध सुरू असायचं... श्रीदेवी भारी की माधुरी? खरं तर त्या काळात मुळात श्रीदेवी विरुद्ध माधुरी अशी लढत रंगू शकली, हेच आश्चर्यकारक होतं... दोघींमध्ये सर्वच अर्थांनी फार अंतर होतं... दोघींच्या वयात चार वर्षांचं अंतर. श्रीदेवी माधुरीला सर्वार्थानं सिनिअर. १९८४ साली माधुरी ‘अबोध’मधून कोणत्याही गाजावाजाविना निस्तेज पदार्पण करत होती, त्याच्या एक वर्ष आधीच ‘हिंमतवाला’मधून श्रीदेवी हिंदी पडद्यावर चौथ्यांदा अवतरली होती... हे तिचं पुनरागमन भलतंच ज्वालाग्रही आणि स्फोटक होतं... ‘अबोध’ ते ‘तेजाब’ ही चार वर्षं माधुरी ‘बटाटावडा, दिल नहीं देना था, देना पडा’ छाप गाणी गात, अत्यंत निष्प्रभ पद्धतीने पडद्यावर चाचपडत होती. १९८८ साली तिनं ‘तेजाब’मध्ये ‘एक दो तीन’ गर्ल बनून खऱ्या अर्थाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं, तोवर श्रीदेवीनं हिंदी सिनेमावर राज्य प्रस्थापित केलं होतं, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या चार भाषा गाजवून ती इथंही सुपरस्टार बनली होती. ‘काँटे नहीं कटते ये दिन ये रात’मधून तिचा मेकओव्हर करणारा आणि गाडगी-भांडीकुंडी-मडकी-फुलं-संत्री यांच्यातून तिला माणसांत आणणारा ‘मिस्टर इंडिया’ही एक वर्ष आधीच, १९८७ साली येऊन गेला होता. हिंदीतल्या नायिकांच्या कारकीर्दीच्या हिशोबात श्रीदेवी आणि माधुरी यांच्यात एका पिढीचं अंतर होतं आणि बाकी गोष्टींमध्ये... कधीही न भरून येणारं अंतर होतं.

हिंदीत काही काळातच माधुरी पुढे आली, अप्रतिम सौंदर्य, कातिल हसू आणि झटकेबाज नृत्यकौशल्य यांच्या बळावर तिनं ‘धक् धक्’ गर्ल बनून किंवा ‘हम को आजकल है इंतजार’सारख्या गाण्यांमधून तरुणांची झोप उडवून टाकली; पण, तिचं यश अष्टपैलू अभिनेत्रीचं यश नव्हतं... सिनेमातल्या नायकाची ‘नायिका’ रंगवायला लागणारी सफाईदार आणि लिमिटेड अभिनयकुशलता तिच्यात होती... त्यापलीकडेही काही प्रसंगांमध्ये ती छाप सोडायची, तिच्यात सुप्त गुणवत्ता आहे, हे समजायचं, पण, आपल्याभोवती सिनेमा फिरवणारी मध्यवर्ती व्यक्तिरेखा साकारण्याची संधी तिला त्या टप्प्यात फारशी मिळाली नाही... तिच्या नंतरच्या ‘पिढी’तल्या मनीषा कोईरालानं जेवढ्या गहिऱ्या व्यक्तिरेखा रंगवल्या, तेवढ्याही माधुरीच्या वाट्याला आल्या नाहीत किंवा तिनं स्वीकारल्या नसाव्यात. व्यक्तिरेखाटनाच्या रेंजमध्ये तर श्रीदेवी या दोघींच्याही कैक योजनं पुढे होती. माधुरीचे हिट सिनेमे, तिच्या अभिनयासाठी गाजलेले सिनेमे, श्रीदेवीचे हिट आणि अभिनयकौशल्यासाठी गाजलेले सिनेमे एकमेकांसमोर ठेवले आणि दोघींचं त्या सिनेमांमधलं स्थान आणि योगदान यांचा ताळा मांडला तरी फरक लक्षात येतो. काही बाबतीत माधुरी कमनशिबीही असावी. मीनाक्षी शेषाद्रीसारख्या क्षणैक चमकून विझून गेलेल्या अभिनेत्रीलाही तिच्यासाठी प्रेमानं लिहिला गेलेला राष्ट्रीय पारितोषिक विजेता ‘दामिनी’ मिळाला. माधुरीनंही इंद्रकुमारच्या ‘बेटा’ आणि ‘राजा’मध्ये कपूर बंधूंना झाकोळून टाकलं; पण, त्या सिनेमांची नावं बहू किंवा रानी नव्हती. तिच्यासाठी खास लिहिलेला सिनेमा मिळण्यासाठी तिला ‘गजगामिनी’पर्यंत वाट पाहावी लागली. तोही ‘माधुरीचा सिनेमा’ नव्हताच, एमएफ हुसेनचा सिनेमा होता. ‘मृत्युदंड’सारखे घसघशीत डाग तिच्या नशिबात फारच उशिरा आले आणि तेही तुरळक.

श्रीदेवी आणि माधुरीची ही तुलना करण्याचं कारण काय?

एकतर हिंदी सिनेमामध्ये श्रीदेवीच्या अचंबित करणाऱ्या यशाचा आकार आणि आवाका समजून घेण्यासाठी तिच्या समकालीनांमध्ये माधुरीच्या यशापेक्षा मोठी दुसरी फुटपट्टी नाही... सोफिस्टिकेटेड आवडी असणाऱ्यांना माधुरी ही श्रीदेवीपेक्षा जास्त आवडायची... ती मेगास्टार होतीच... पण, श्रीदेवी सुपरस्टार होती!

वयाच्या चौथ्या वर्षी श्रीदेवी सिनेमात आली. तेव्हापासून तिची कॅमेऱ्याशी गट्टी होती. अभिनय तिच्या धमन्यांमधून वाहात होता. तिच्या चुणचुणीत व्यक्तिरेखांनी दक्षिणेच्या चारही भाषांमधले सिनेमे गाजवले होते. पौगंडवयात ती ‘ज्युली’मध्ये लक्ष्मीच्या धाकट्या बहिणीच्या भूमिकेत एकदा हिंदीत डोकावून गेली होती, हे तर सर्वज्ञात आहे. पण त्याही आधी ‘रानी मेरा नाम’ या पडेल सूडपटामध्ये श्रीदेवी बालभूमिकेत झळकली आहे. कोवळ्या वयाच्या नायिकेसमोर तिच्या सगळ्या कुटुंबाचा खून होतो आणि ती मोठी बनून त्याचा सूड घेते, अशी साधारण कथा. त्यातली कोवळ्या वयातली नायिका म्हणजे श्रीदेवी. हत्याकांडाच्या साचेबंद प्रसंगातही श्रीदेवीचा कमालीचा बोलका चेहरा आणि टप्पोरे, निरागस वेदनेने भरलेले डोळे लक्षात राहतात. ‘सोलवा सावन’ हा तिचा नायिका म्हणून पहिला हिंदी सिनेमा. १९७७ साली तामीळ सिनेमासृष्टी गाजवून सोडणाऱ्या ‘पदाहरेले वयथिनिले’ या जबरदस्त सिनेमाचा हा रिमेक होता. १५ वर्षांच्या श्रीदेवीनं मूळ सिनेमात १६ वर्षांच्या नायिकेची व्यक्तिरेखा साकारली होती. मूळ दिग्दर्शक भारतीराजा यानेच तो हिंदीतही दिग्दर्शित केला. पण, तामीळमध्ये श्रीदेवीला साथ होती, कमलहासन आणि रजनीकांत यांची. (या तिघांनी एकत्र काम केलेला हा दुसरा आणि अखेरचा सिनेमा, त्यानंतर त्यांनी जोडीजोडीनं हिट सिनेमे दिले.) हिंदीत या दोघांच्या जागी होते अमोल पालेकर आणि कुलभूषण खरबंदा. त्यामुळे, हा सिनेमा कधी आला, कधी गेला, हे कळलंच नाही, याचं फारसं आश्चर्य वाटत नाही. तरीही श्रीदेवी मात्र दक्षिणेत गाजत असल्यामुळे हिंदीतल्या निर्मात्यांच्या नजरेच्या टप्प्यात राहिली.

तेव्हाचा हिंदी सिनेमा असाही दक्षिणी निर्मात्यांच्याच कब्जातच होता... तेलुगूतले अनेक कौटुंबिकपट हिंदीत रूपांतरित होत होते. कठोर शिस्त पाळून निर्मात्याचं नुकसान न होऊ देणारा अभिनेता म्हणून जितेंद्रच्या खांद्यावर मुख्य भार होता. त्याच्याकडून अभिनयकौशल्याची ना निर्मात्यांची अपेक्षा होती, ना दिग्दर्शकाची, ना कथानकाची. ती जबाबदारी बरीचशी नायिकांवर किंवा चरित्र अभिनेत्यांवर असायची. कोणीतरी एक त्यागमूर्ती भाऊ, पती, पत्नी, आई, वडील, वहिनी कथानकाच्या केंद्रस्थानी असायची. सोबतीला नाकर्ती मुलं, कजाग किंवा पाताळयंत्री नातेवाईक, जोडीला विनोदवीर आणि विनोद-वीरांगना, थोडा रोमान्स, थोडा कौटुंबिक ड्रामा, बरीचशी रडारड, खटकेबाज उपदेशप्रधान संवाद असा या सिनेमांचा मेलोड्रामॅटिक बाज होता. कमालीच्या व्यावसायिक पद्धतीनं काम केल्यामुळे हिंदीतही हा यशाचा हिट फॉर्म्युला बनून गेला होता. अशा वेळी के. बालचंदर यांनी एक मोठा निर्णय घेतला... दक्षिणी नायक हिंदीत आणण्याचा. हे धाडस आधी कोणी फारसं करून पाहिलं नव्हतं. केलं तेव्हा, एखाददुसऱ्या पौराणिकपटाचा अपवाद वगळता, फसलं होतं. पंजाबी गोराचिट्टा नायक आणि दक्षिणी भरगच्च नायिका, हेच हिंदीतल्या प्रेक्षकांचं आवडतं कॉम्बिनेशन होतं. ‘एक दुजे के लिए’मधून कमलहासन आला तेव्हा तर मिशीवाल्या नायकाचीही फारशी सवय नव्हती प्रेक्षकांना. ‘एक दूजे के लिए’च्या रूपानं दक्षिणी सिनेमाची एक मोठी लाट हिंदीच्या किनाऱ्यावर आदळली. दक्षिणी नायकही हिंदीत स्टार बनू शकतो, हे या सिनेमानं दाखवून दिलं. कमलहासनच्या प्रयोगशीलतेनं त्याचा एक चाहतावर्ग निर्माण केला. पाठोपाठ रजनीकांतनंही ‘अंधा कानून’मधून दणदणीत पदार्पण केलं. मात्र, तामीळमधून आलेल्या या दोघांच्या आणि त्यांच्यानंतर तेलुगूतून आलेल्या चिरंजीवी, वेंकटेश, नागार्जुन यांच्यासारख्या तिथल्या सुपरस्टार्सच्या हिंदीतल्या इनिंग्जना चेहरेपट्टीच्या आणि संवादफेकीच्या मर्यादांनी ब्रेक लावला. श्रीदेवी या सर्वांची समकालीन. (ही आणखी वेगळी गंमत आहे. श्रीदेवी ही तेलुगूत अक्किनेनी नागेश्वर राव यांचीही नायिका होती आणि त्यांचा मुलगा नागार्जुन याचीही. हिंदीत तिनं धर्मेंद्र आणि सनी देओल या बापलेकांबरोबर नायिका साकारली. एरवी नायक मंडळीच विशीपासून साठीपर्यंत नायिकांच्या पिढ्या न् पिढ्यांशी रोमान्स करत राहतात. नायिकेची इनिंग्ज तेव्हा तर तिशीतच संपुष्टात यायची.) तर बॅक टु दक्षिण भारतीय सिनेमा- तिथले सुपरस्टार हिंदीत मर्यादित यश मिळवू शकले, मात्र, त्यांना समकालीन असलेल्या श्रीदेवीनं हिंदीत त्या सगळ्यांच्या एकत्रित यशापेक्षा मोठं यश कमावून दाखवलं, हे विशेष... म्हणजे, रजनीकांतच्या पुनरागमनाच्या आधीपर्यंत तीच हिंदीतली सगळ्यात मोठी दक्षिणी सुपरस्टार होती.

हे यश तिनं अपयशी सलामीनंतर मिळवलं. ‘सोलवा सावन’नंतर हिंदीत तिच्या पुनरागमनाचा स्फोट घडवून आणणारा सिनेमा थेट चार वर्षांनी आला. हा होता ‘हिंमतवाला.’

हिंदी सिनेमाच्या अध:पातामधला हा एक मैलाचा दगड.

ऐंशीचं हे दशक आणि त्यातले सडकछाप जितेंद्रपट हा हिंदी सिनेमातला एक भयंकर गदळ कालखंड मानला जातो. हिंदी सिनेमा इतका बेगडी, सुमार, भयावह लाउड आणि संवेदनाघाती कधीच झाला नसावा. या काळातले अमिताभ बच्चनचे सिनेमे पाहा; जिथं त्याला इतक्या कचरापट्टीत वावरावं लागलं, तिथं श्रीदेवीसारख्या नायिकांच्या वाट्याला वेगळं काय येणार होतं? सिंगल स्क्रीन थिएटर्सचा जमाना असल्यानं मनोरंजनाच्या सगळ्या कल्पना पिटातल्या प्रेक्षकांच्या सांस्कृतिक आणि कलात्मक कुपोषणाच्या लघुतम साधारण विभाज्याभोवती फिरत होत्या. के. बापय्यासारख्या दिग्दर्शकानं हिंदीत रिमेक्सची फॅक्टरी उघडली होती. बप्पी लाहिरीनं म्युझिक रूममध्ये अर्धी तांबट आळी आणून वसवली होती, उरलेली अर्धी या सिनेमांचे कलादिग्दर्शक गाण्यांसाठी घेऊन जायचे. (या काळात अनिल-अरुण हे बप्पीचे सहाय्यक होते, त्यांची त्या काळातली मराठी गाणी ऐकल्यावर बप्पीच्या त्या हिट संगीताचं मर्म उलगडून जायचं.) इंदिवरसारखा एकेकाळचा संवेदनशील गीतकार हिंदीतला राजेश मजुमदार प्लस दादा कोंडके बनून ‘झोपडी में चारपाई, मानुष बिना रोती पडी’ यांसारख्या क्रांतदर्शी कवित्वाचे नमुने सादर करत होता. या सगळ्यात चांदोबातल्या पुष्ट स्त्रियांसारखे तंग, तोकडे पोषाख किंवा साधारणपणे समग्र ऐवजाचा भरघोस अंदाज देणारे कपडे परिधान केलेली श्रीदेवी जितेंद्र किंवा जो कोणी नायक असेल, त्याच्याबरोबर यथेच्छ धिंगाणा घालत होती. तिच्या नखरेल आणि मादक अदांनी सगळा देश घायाळ झाला होता. अंगप्रदर्शन ही तोवर बिंदू-हेलनसारख्या पाश्चिमात्य पोषाखातल्या, कॅबेरेनृत्य करणाऱ्या खलनायिकांची मक्तेदारी होती. झीनत अमान आणि परवीन बाबी यांच्यासारख्या पाश्चिमात्य वळणाच्या नायिका तेच नेत्रसुख देत होत्या, पण मुळात देशी प्रेक्षकासाठी अशा आधुनिक, मुक्त विचारांच्या स्त्रिया या व्हॅम्पसारख्याच होत्या आणि नायकाशी लग्न हाच त्यांच्या सांस्कृतिक उन्नयनाचा मार्ग होता. ‘हिंमतवाला’सारख्या सिनेमांनी भारतीय पौराणिक वेषातली उत्तानता अचूक हेरली आणि नायिकेला उन्मादक बनवण्याचा संपूर्ण स्वदेशी मार्ग अवलंबला.

या सिनेमांनी आधीचा ‘मद्रासी’ फॉर्म्युला आणखी पॉलिश केला होता. त्यांत सहसा आदर्शवादी नायकाचं कथानक असायचं, सासूसुनेच्या, जावाजावांच्या, सवतींच्या संघर्षाची फोडणी असायची, खलनायकांचे कारनामे आणि विनोदवीरांचे, मूळ कथानकाशी काहीही संबंध नसलेले आचरट ट्रॅक असायचे. त्यांच्यात झोपेत चालल्यासारख्या सहजतेनं श्रीदेवी तिची कामगिरी चोख बजावून जायची.

तशी या सगळ्या सिनेमांमध्ये ती ‘नायकाची नायिका’च होती, पण, तिच्यात एक भलताच वेगळा स्पार्क होता. ती पडद्यावर असली की इतर कुणाकडे लक्ष जाणं अशक्य व्हावं, असा स्पार्क. एरवी ती टिपिकल दक्षिणी नायिका होती. कॅमेरा आणि प्रकाशझोत नसेल, तेव्हा बुजणारी, चाचपडत वावरणारी, जवळच्या माणसांव्यतिरिक्त इतरांशी फारसं न बोलणारी, खासगी प्रश्नांवर मौन धारण करणारी आणि कोणत्याही कळीच्या प्रश्नावर ‘अम्माला विचारा’ असं तेलुगूमध्ये उत्तर देणारी अत्यंत बोअरिंग व्यक्ती. लग्नापर्यंत तर तिचे सगळे आर्थिक व्यवहार तिच्या आईच्याच हातात होते, म्हणतात! तिनं फक्त आणि फक्त अभिनयावर लक्ष केंद्रित करायचं. हीच जत्रेत हरवलेल्या कोकरासारखी दिसणारी श्रीदेवी कॅमेऱ्याच्या समोर आल्यावर मात्र तिचा कायापालट व्हायचा, ती व्यक्तिरेखेत शिरायची की तिच्यात व्यक्तिरेखा शिरायची, हे कळायचं नाही. पण, क्लॅप वाजला की तिच्यात जणू वीज सळसळायला लागायची. प्रेक्षकांनी आपल्याकडेच पाहावं, यासाठी तिला दिलीपकुमारी क्लृप्त्या कराव्या लागत नसत (कमलहासननं नंतर सिनेमातल्या प्रत्येक फ्रेममध्ये आपण असलंच पाहिजे, असला हट्ट चालवून दिलीप कुमार शाखेचा विस्तार केला); ती पडद्यावर आली की आपोआप नजरबंदी व्हायची. वर्षानुवर्षं कॅमेऱ्यासमोर वावरून तिला त्याचं तंत्र उत्तम अवगत झालेलं होतं. टिपिकल व्यावसायिक सिनेमांमध्ये नायिकेच्या काही टिपिकल अदा लोकप्रिय होतात, विशिष्ट कोनातून तिचं हसणं, नाक मुरडणं, भुवया उडवणं अशा छोट्या छोट्या गोष्टी प्रेक्षकांना मोहिनी घालतात. त्या हमखास यशस्वी अदांच्या भात्यातला एकेक बाण काढून ती अचूक चालवायची आणि पब्लिकला हुकमी घायाळ करायची.

पण, श्रीदेवी फक्त नायकाची नायिका नव्हती, स्वतंत्रपणे प्रेक्षक खेचू शकेल, अशा वकुबाची अभिनेत्रीही होती... स्टार अभिनेत्री. ती दक्षिणी सिनेमांमध्ये काही फक्त शोभेची बाहुली नव्हती. सकस कथानकांमधल्या लांबीरुंदीबरोबर खोलीही असलेल्या व्यक्तिरेखांसाठी आवश्यक ठेहरावही तिच्यात होता. ज्या वर्षी ‘हिंमतवाला’ आला, त्याच वर्षी ‘सदमा’ही आला होता आणि श्रीदेवीची दोन्ही रूपं हिंदीतल्या प्रेक्षकांपुढे आणि निर्मात्यांपुढे आली होती.

‘सदमा’ किंवा मूळ ‘मूंद्रम पिरई’ हे श्रीदेवीच्या अभिनयाचं एक उत्तुंग शिखर मानलं जातं. सर्वसाधारणपणे प्रेक्षकांना वेड्याचा अभिनय, लहान मुलीचा अभिनय, अॅबनॉर्मल व्यक्तीचं रेखाटन वगैरे अभिनयाचे उच्चांक वाटतात. अभिनयाशी थोडाबहुत संबंध आलेला कोणीही हे सांगेल की, अशा हुकमी यश देणाऱ्या भूमिका अभिनयाचा कस लावत नाहीत, त्यांच्यात अभिनयापेक्षा ठाशीव लकबी उचलण्याच्या कौशल्याचा अधिक वाटा असतो. ‘सदमा’मध्ये अधिक अवघड भूमिका भावच्छटांचा कॅनव्हास रंगवणाऱ्या कमलहासनची होती, पण, कौतुक श्रीदेवीच होणार होतं. तसं ते झालंच. तिनं थेट हृदयाला हात घालणारी ती व्यक्तिरेखा जीव तोडून साकारली होतीच.

‘हिंमतवाला’नंतर श्रीदेवीची ‘थंडर थाइज’ची इमेज लोकप्रिय होणार होती आणि मसालापटांमध्ये ती गाजणार होती. तसंच झालं. जितेंद्रसारख्या उतरणीला लागलेल्या स्टारच्या मावळत्या करिअरला तिनं संजीवनी दिली... शिस्त हेच ज्याचं अभिनयकौशल्य होतं, त्या जितेंद्रनंही ही संधी बरोबर हेरली आणि श्रीदेवीबरोबर १६ सिनेमांची माळका लावून दिली. त्यातले १३ हिट झाले. हिंदी सिनेमाच्या नायकप्रधान परंपरेप्रमाणे हे सिनेमे तेव्हापासून आजतागायत ‘जितेंद्रचे सिनेमे’ म्हणून ओळखले गेले आणि जितेंद्रला पन्नाशीतला वर्ष-दोन वर्षांचा सुपरस्टार बनवून गेले... पण, हे सिनेमे जितेंद्रचे होते का? छ्या! तेव्हा मिसरूड फुटा हुआ बच्चा बच्चा जानता था की, ते फक्त आणि फक्त श्रीदेवीचे सिनेमे होते... काही सिनेमांमध्ये जयाप्रदाही होती. पण तिच्यासारखी देखणी, अभिनयकुशल नृत्यांगनाही तिथं ‘हीही होती’, एवढ्यापुरतीच असायची बहुतेक वेळा. लोक काही तिला किंवा जितेंद्रला पाहायला थिएटरात जात नव्हते. तनमन भारून टाकणारी श्रीदेवीची मनमोहक अदा त्यांना खेचत होती. श्रीदेवी ही तेव्हा बुडत्या सुपरस्टार मंडळींची संजीवनी बुटी होती. ज्याच्याकडे पाहून आरशानंही तोंड फिरवलं असतं, अशा सुजट आणि फिकट राजेश खन्नालाही तिच्याबरोबरच्या ‘मास्टरजी’छाप सिनेमांनी काडीचा आधार दिला होता... व्यावसायिक निर्मात्यांना हेमामालिनी आणि रेखाच्या पिढीनंतर आपल्या बळावर सिनेमा खेचणारी नायिका सापडताच त्यांनी ‘नगिना’सारखा तिच्याभोवती फिरणारा सिनेमा रचला. ‘चालबाज’सारख्या सिनेमात सनी देओल आणि रजनीकांत हे मेगास्टार होते. दोघांनाही तिनं सहायक भूमिकांच्या पातळीवर नेलं. ते त्यांनी खपवून घेतलं म्हणजे श्रीदेवीचं स्टारडम काय प्रतीचं असेल ते कळतं. ‘नगिना’चा सगळा डोलारा तिच्या व्यक्तिरेखेवर आधारला होता. ‘मिस्टर इंडिया’ हा नावापासून अनिल कपूरचा सिनेमा, त्याला सुपरस्टार म्हणून एस्टॅब्लिश करण्यासाठीच तो डिझाइन करण्यात आला होता. पण, त्यात सिझलिंग सेन्सेशन ठरली श्रीदेवी. तोच खेळ पुढे ‘लम्हें’मध्येही झाला. अनिल कपूरची अभिनयाची रेंज (१६ वर्षं वयाचा बिनमिशीचा कोवळा मुलगा ते चाळिशीपार मध्यमवयीन नायक) या सिनेमातून दिसलीच; पण, मनात ठसली ती दुहेरी भूमिकेतली श्रीदेवी. ‘खुदा गवाह’ हा साक्षात अमिताभ बच्चनचा सिनेमा. मुकुल आनंद या त्याच्या लाडक्या दिग्दर्शकानं अमिताभला लार्जर दॅन लाइफ बनवण्यासाठी केवढा भव्य बॅकड्रॉप घेतला होता. पण, दुहेरी भूमिकेच्या बळावर तिथंही श्रीदेवीच चमकून गेली. यश चोपडा, सुभाष घई, शेखर कपूर, फिरोज खान, मुकुल आनंद यांच्यासारख्या टॉपच्या दिग्दर्शकांनाही ती आपल्या सिनेमांमध्ये हवीशी झाली. यांच्या सिनेमांमधली श्रीदेवी आधीच्या श्रीदेवीपेक्षा किती वेगळी होती.

ही तिची आणखी एक खासीयत. गावरान ढंगाच्या जितेंद्रपटांमध्ये ती अस्सल खेडवळ दिसायची. त्या सिनेमांच्या अॅस्थेटिक्समध्ये मिसळून जायची. फिरोझ खान, मुकुल आनंद, यश चोपडा, शेखर कपूर ही सगळी सोफिस्टिकेटेड मंडळी. त्यांच्या सिनेमांमध्ये ती ‘त्यांच्या कल्पनेतली’ नायिका दिसायची. एकीकडे भरगच्च ‘गावठी’ फटाका आणि दुसरीकडे उठावदार पण आटोपशीर नजाकत, या दोन्ही टोकांमध्ये ती लिलया वावरायची. गाण्यांमध्ये ती स्वर्गलोकीची अप्सराच दिसायची... रोमँटिक किंवा खट्याळ गाण्यांमध्ये स्वप्नदोषकारक मदनिका बनायची. सणसणीत उंची, खास दक्षिणी गोलाईयुक्त भरदार शरीर, टपोरे डोळे आणि भारतीय पुरुषांचा वीक पॉइंट असलेलं अपरं नाक... हे डेडली कॉम्बिनेशन होतं. शिवाय तिच्यात हिंदीतल्या तेव्हाच्या नायिकांच्या ठायी असलेला शारीरिक जवळिकीतला अंगचोरपणा नव्हता. ज्या काळात नायिका पडद्यावरच्या पतीला एकांतात मिठी मारतानाही दोन्ही हात एकमेकांच्या मध्ये येतील आणि उरोस्पर्श टळेल याची काळजी घ्यायची, त्या काळात ‘अंगाला भिडू दे अंग’ म्हणजे काय ते ती बिनधास्तपणे दाखवून द्यायची पडद्यावर. तिचे आणि जयाप्रदाचे सगळे जितेंद्रपट हे यासाठीच लोकप्रिय झाले होते. जयाप्रदा ही पोक्त, परिपक्व आणि त्यामुळे बोअरिंग नायिका असायची, श्रीदेवी ही बिनधास्त, बडबडी, खट्याळ, चावट अशी चटपटीत सहनायिका. या काँबोच्या धमाक्यात जितेंद्र खपून जायचा आणि वर ज्युबिली स्टार म्हणून मिरवायचा. प्रेक्षकांनी या दोघींसाठी अन्य कोणताही माठ चालवून घेतला असता, ही झाकली मूठ जितेंद्रसाठी सव्वा लाखाची ठरत गेली. एका अर्थी श्रीदेवी ही राज कपूरसाठी आदर्श नायिका होती. खाली अंग उघडं टाकायचं किंवा नीट दिसेलसं झाकायचं आणि चेहऱ्यावर मात्र कायम पूजेला बसल्यासारखे पवित्र, निरागस भाव ठेवायचे, ही त्याची नायिकेची कल्पना तिनं पुरेपूर साकारली असती...

पण, नायिकेला केवळ रूप असून चालत नाही... अन्यथा बीना राय मधुबाला नसती का बनली? श्रीदेवीची कॅमेऱ्याशी दोस्ती होती. वयाच्या चौथ्या वर्षापासून जमलेली. लक्षवेधी रूपसंपदा आणि त्याला कॅमेऱ्यासमोरच्या कमालीच्या सहजतेची जोड, हे श्रीदेवीचं किलर काँबिनेशन होतं. अर्थात, या सगळ्या गुणांना दृष्ट लागू नये म्हणून एका उणिवेची तीटही लागली होती तिच्या व्यक्तिमत्त्वाला. अभिनेत्रीसाठी या सगळ्या गुणांची माती करण्याइतकी डेंजर त्रुटी... आवाज... किंबहुना आवाजाचा अभाव... ‘नायिका’ साकारण्यासाठी आवश्यक कोमल आणि मधुर आवाजाचा अभाव. तिचं वय चौथ्या वर्षानंतर वाढलंच नसावं, असं तिचा आवाज ऐकून कोणालाही वाटलं असतं. तिचे संवाद जोवर बेबी नाझ आणि रेखा यांच्या सुजाण डबिंगच्या माध्यमातून कानावर येत होते, तोवर सुसह्य होते. तिचा बालिकासदृश किनरा, खरं तर कर्कश्शच आवाज पहिल्यांदा कानावर पडला असेल, तेव्हा तिच्या चाहत्यांचाही स्वत:च्या कानांवरचा विश्वास उडाला असेल. यश चोपडांनी काय म्हणून तिला ‘चाँदनी’च्या टायटल साँगमध्ये ‘मेला शोना शोना, पकडो, पकडो’ वगैरे हास्यस्फोटक बडबड करायला लावली आहे आणि केजीमधल्या बडबडगीतासारखं गाणं गायला लावलं आहे, ते एक तिरुपती बालाजीच जाणे! अशा चिरक्या आवाजाची अभिनेत्री सुपरस्टार बनू शकली, हे केवढं मोठं आश्चर्य. तिनं या त्रुटीचाही लोकांना विसर पाडला? बोलणं, संवादफेक हे अभिनयाचं एक महत्त्वाचं अंग असताना? खासकरून त्या काळातल्या सिनेमांमध्ये कादर खान किंवा त्यांच्या भाऊबंदांनी लिहिलेले पल्लेदार नाटकी संवाद बोलण्याला गत्यंतर नव्हतं. हिंदीचा एक शब्दही कळत नसताना आणि बोलता येत नसताना श्रीदेवी या चित्रपटसृष्टीत नायिकेनं कधीच पाहिलं नव्हतं, अशा व्यावसायिक यशाच्या शिखरावर पोहोचली होती. ती दक्षिणेत चार भाषांमध्ये काम करत होती. वडिलांकडून तामीळ आणि आईकडून तेलुगू अशा दोन भाषा तिला अवगत असतील (तिची दैनंदिन व्यवहाराची मातृभाषा तेलुगू होती), पण कन्नड, मल्याळम या भाषाही तिला परक्याच होत्या. तिथेही तिनं डंका गाजवला. म्हणजे, मराठीतली एखादी अभिनेत्री गुजराती, भोजपुरी आणि बंगाली सिनेमातही सुपरस्टार बनावी आणि त्यानंतर हिंदीत जाऊन तिनं तेवढाच मोठा पराक्रम गाजवावा, इतकी मोठी ही कामगिरी होती ही. ते आपल्या नायककेंद्री सिनेपत्रकारितेनंही कधी स्वतंत्रपणे, ठळकपणे अधोरेखित केलं नाही.

‘रूप की रानी, चोरों का राजा’च्या अपयशानंतर तिच्याकडे फारसं करण्यासारखं काही उरलं नव्हतं. वय उतरणीला लागलं होतं, सिनेमा बदलू लागला होता, व्यक्तिगत आयुष्यातला लग्नाचा-संसाराचा निर्णायक क्षण जवळ आला होता... तिनं वेळेत गाशा गुंडाळला पण जाता जाता ‘जुदाई’सारखा अफलातून अभिनयाचा नमुना देऊनच तिनं मधली सुट्टी घेतली होती. व्यक्तिरेखा म्हणून थेट लोभी खलनायिका ठरू शकणारी, स्वत:च्या नवऱ्याचा सौदा करणारी लालची बायको तिनं मानवी पातळीवर आणून साकारली होती. नायक म्हणून अनिल कपूर आणि सहानुभूतीखेचक भूमिकेत उर्मिला मातोंडकर असतानाही ‘जुदाई’ हा श्रीदेवीचाच सिनेमा ठरला, तो तिच्या या अद्भुत अभिनयकौशल्याच्या बळावर. तिच्या कमबॅकच्या ‘इंग्लिश विंग्लिश’मध्येही खास तिची काही वैशिष्ट्यं दिसतात. अलीकडच्या परंपरेप्रमाणे भूमिका ऑथेंटिक वाटावी म्हणून मध्ये मध्ये त्या भाषेतले, लहेजातले शब्दप्रयोग करायचे, हिंदीला तो टोन द्यायचा, असा प्रयोग केला जातो (आठवा रणवीर सिंगचा बाजीराव). श्रीदेवी त्या सिनेमात कुठल्याच बाजूनं ‘शशी गोडबोले’ दिसली नाही. पण, इंग्रजीच्या ज्ञानाच्या अभावी आधुनिक जगात झालेली गोची आणि स्वत:च्या घरात आलेली पोतेऱ्याची कळा तिनं अशी काही आत्मसात केली की, तिच्या त्या व्हल्नरेबल, समजूतदार आणि गहिऱ्या प्रेमानं भरलेल्या व्यक्तिरेखेचा ‘गोडबोलेपणा’च अनावश्यक होऊन गेला.

...श्रीदेवी पंचेचाळिशीच्या पार असताना, मधल्या बऱ्याच मोठ्या काळात सिनेमापासून दूर असताना आणि ‘कोण श्रीदेवी’ असा प्रश्न पडणारी पिढी जन्मून मोठी झालेली असताना तिनं ‘इंग्लिश विंग्लिश’ आणि नंतर ‘मॉम’ हे सिनेमे केले. दोन्ही तिच्याभोवती फिरणारे. ‘मॉम’सारखंच मातृप्रेमाभोवती फिरणारं कथानक असलेले ‘मातृ’ आणि ‘जजबा’सारखे सिनेमे तिच्यानंतरच्या पिढीतल्या रवीना टंडन आणि ऐश्वर्या राय या नायिकांनी केले होते. या तिन्ही सिनेमांमध्ये ‘मॉम’ला लाभलेला प्रतिसाद डोळ्यांत भरणारा होता... कारण त्यात श्रीदेवी होती.

ती अचानक गेल्यावर तिच्या संशयास्पद मृत्यूवरून प्रसारमाध्यमांनी तिच्या आयुष्याचा पंचनामा करून घेतला... पद्मश्रीप्राप्त श्रीदेवीला तिरंग्यात गुंडाळल्यानं तिरंग्याचा अवमान झाला, असा जावईशोध काही महाभागांना लागला... तिच्या चारित्र्याचीही उठाठेव करणारे संस्कृतीरक्षक पिसाटून उठले होते... एका नटीचं एवढं काय कौतुक, अशी प्रतिक्रिया तर तथाकथित सुजाण मंडळींनीही दिली होती...

...यांचे नेते कलावंतांना ‘नाचनेवाले, गानेवाले’ म्हणतात आणि कलावंतांनी ‘फालतू सल्ले’ देऊ नयेत, असं सुनावू धजतात, यात आश्चर्य नाही...

...श्रीदेवीच्या या ओळखीतून तिच्याबरोबर त्या बाथटबमध्येच बुडालेल्या सुसंस्कृततेच्या कलेवरातून संवेदनशीलतेचे आणि कलाभानाचे काही बुडबुडे निघाले तरी तिच्या चेहऱ्यावर ते सुपरिचित खट्याळ हसू फुटेल आणि आकाशात एखादी बिनमोसमी वीज चमकून जाईल.

.............................................................................................................................................

लेखक मुकेश माचकर ‘बिगुल’ या न्यूज पोर्टलचे संपादक आहेत.

mamanji@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

SACHIN PATIL

Fri , 09 March 2018

Still we love her....


SACHIN PATIL

Fri , 09 March 2018

हा लेख म्हणजे निव्वळ कौतुक.... खुदा गवाह... लम्हे.... काय उजेड पडला होता? Typical obituary


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......