प्रेमगीतांतून कलेकलेनं उमलत गेलेला ‘शशी कपूर’
कला-संस्कृती - चलत्-चित्र
आफताब परभनवी
  • शशी कपूर - १८ मार्च १९३८ - ४ डिसेंबर २०१७
  • Sat , 09 December 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie शशी कपूर Shashi Kapoor

त्याचं वय झालं होतं. तो आजारी होता. तो जाणारच होता. पण गेला तेव्हा ‘मॅटनी शो’ची दुपार उदास करून गेला. मुंबईला या काळात कधी पाऊस पडत नाही. पण त्या दिवशी सर्वत्रच उदास ढग दाटून आले होते. पाऊसही कोसळलायला लागला होता. रवीच लोपला तेव्हा शशी दिसायचं, काही कारणच नव्हतं. शशी कपूर वयाच्या ७९ व्या वर्षी पंचत्वात विलीन झाला.

त्याचा पहिला चित्रपट होता ‘धर्मपुत्र’ (१९६१). एन.दत्ताच्या संगीतात साहिरचे शब्द शशी कपूरच्या तोंडी होते. तेव्हा दुय्यम समजल्या गेलेल्या महेंद्र कपूरचा आवाज त्याच्यासाठी वापरला गेला. इंद्राणी मुखर्जी त्याची नायिका होती. साहिरचे शब्द अप्रतिम होते, पण ना देखणी कुणी नायिका समोर होती, ना रफीसारखा मधाळ आवाज होता. 

भूल सकता है भला कौन ये प्यारी आँखे

रंग मे डूबी हुयी निंद से भारी आँखे 

हे गाणं रसिक खरंच विसरून गेले. पुढे हीच चाल जरा घासूनपुसून रवीनं साहिरच्याच शब्दांत ‘गुमराह’मध्ये वापरली, तेव्हा ती रसिकांच्या लक्षात आली. (आप आये तो खयाले दिले- नाशाद आया-महेंद्र कपूर) 

पुढे ‘चार दिवारी’ (१९६१) लगेच आला. याला सलिल चौधरीचं सुंदर संगीत होतं. शैलेंद्रचे शब्दही चांगलेच होते, पण यात शशी कपूरसाठी गाणंच नव्हतं. पुढे लोकप्रिय ठरलेल्या शशी-नंदा या जोडीचा हा पहिलाच चित्रपट. नंतर याच जोडीचा दुसरा चित्रपट आला ‘मेहंदी लगे मेरे हाथ’ (१९६२). याला संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. यात मुकेशचा आवाज शशीसाठी वापरला गेला होता. पण यातली गाणी विशेष नव्हती. आनंद बक्षीनं गीतकार म्हणून जो कारखाना पुढे सुरू केला, त्याची सुरवात इथून होते. ‘उडे पंछी टोली में, तुझे मैं ले जाऊंगा बिठलाके डोली में’ असली शब्दरचना असल्यावर काय होणार! 

शशी कपूरच्या वाट्याला आलेल्या पुढच्या चित्रपटातील अतिशय गोड गाण्यांनी रसिकांना रिझवलं. हा चित्रपट होता सलिल चौधरीच्या संगीतातला ‘प्रेमपत्र’ (१९६२). साधना कट नसलेली गोड साधना यात शशीची नायिका होती. अंध असलेल्या शशीच्या तोंडी तलतच्या मखमली स्वरातील गाणं आहे

ये मेरे अंधेरे उजाले न होते

अगर तुम न आते मेरे जिंदगी में

या ओळींना लताच्या गोड आवाजात साधना उत्तर देते

न जाने मेरा दिल ये क्यूं केह रहा है 

तुम्हे खो न बैठु कही रोशनी में

राजेंद्र कृष्ण यांची अतिशय सहज अशी शब्दरचना गाण्याला गोडवा प्राप्त करून देते. आधीचा संगीताचा अंधार मिटवून शशीच्या चित्रपट आयुष्यात मधुर संगीताचा उजेड इथून पडायला सुरुवात होते. 

यातील दुसरं गाणं मुकेश-लताच्या स्वरात आहे. इंद्राणी मुखर्जीला न शोभणारे शब्द इथं साधनासाठी मात्र अतिशय चपखल बसतात. मुकेशचा आवाज अतिशय थोड्या संगीतकारांना प्रेमगीतात चपखलपणे वापरता आलेला आहे. त्यात सलिल चौधरीचा क्रमांक वरचा लागतो. हे गाणं आहे

दो आखियां झुकी झुकी सी

कलियों से नाजूक होठों पे

कविता रूकी रूकी सी

आंघोळ करून आलेला बनियन घातलेला टॉवेल खांद्यावर असलेला मध्यमवर्गीय नोकरदार शोभणारा शशी आणि गाऊन घातलेली, न्हाऊन केस मोकळे सोडलेली साधना. शशी कपूरची घरगुती साधा माणूस हीच प्रतिमा पुढे घट्ट झाली. नंदा सेाबत त्याची जोडी जमली ती याच कारणाने. साधना-शर्मिला-राजश्री-बबिता-हेमा-राखी यांच्यापेक्षा नंदाचा साधेपणाच त्याच्यासोबत जास्त उठून दिसायचा.

‘जबसे तुम्हे देखा है’ (१९६३) मध्ये शम्मी सोबत ‘तुम्हे हुस्न दे के’ या कव्वालीत शशी कपूर होता. शशीसाठी रफीचा आवाज पहिल्यांदाच वापरला गेला. या कव्वालीत रफी-मन्ना-आशा सोबत लताचाही आवाज आहे. कव्वाली-मुजऱ्यांसाठी फारच कमी वेळा लताचा आवाज वापरला गेला.

याच वर्षी हैदराबादचा संगीतकार इक्बाल कुरैशीचा ‘ये दिल किसको दू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात शशी कपूरसोबत नृत्यनिपुण रागिणी नायिका म्हणून होती. रफीच्या आवाजातील 

फिर आने लगा याद मुझे प्यार का आलम

इकरार का आलम तो कभी इन्कार का आलम

हे गाणं चांगलंच गाजलं. या गाण्यात गायिका म्हणून रफीसोबत संगीतकार उषा खन्नाचा आवाज इक्बाल कुरैशीनं वापरला आहे. अर्थात उषा खन्नाला फक्त काही शब्दच आहेत. रफी-आशाच्या द्वंद्व स्वरातील ‘तेरा नाम मेरा नाम’ हे गाणं पण बऱ्यापैकी आहे. पण यावर शंकर जयकिशनच्या संगीताचा प्रभाव खूप जाणवतो. विशेषत: भरपूर व्हायोलिन्सचा वापर शंकर जयकिशनच्याच प्रमाणे करण्यात आला आहे. 

सचिन देव बर्मनचं संगीत, रफीचा आवाज, शकिलचे शब्द असा सगळा सुवर्णयोग शशीसाठी पहिल्यांदाच ‘बेनझीर’ (१९६४) मध्ये जूळून आला. पण इतकं सगळं होऊनही यातील गाण्यांची भट्टी जमलीच नाही. त्यातल्या त्यात ‘दिल मे एक जाने तमन्ना ने जगा पायी है, आज गुलशन में नहीं दिल मे बहार आयी है’ हे गाणं बऱ्यापैकी आहे. चित्रपटात अशोक कुमार-मीना कुमारी असे दिग्गज होते. त्यामुळे अपयश त्यांच्या खात्यावर जमा झालं इतकंच. 

पण पुढच्याच वर्षी शशी कपूरचे एक-दोन नव्हे तर तीन चित्रपट चर्चेत राहिले. पहिला चित्रपट गाजला तो म्हणजे ‘वक्त’ (१९६५). पण वक्त मध्ये बलराज साहनी, सुनील दत्त, राजकुमार, साधना सारखे तगडे कलाकार होते. पण या गर्दीतूनही शर्मिला-शशीच्या वाट्याला एक गोड गाणं आलं. बोटीवर तरुण-तरुणींची सहल निघालेली आहे. त्या प्रसंगी महेंद्र-आशाच्या आवाजात 

दिन है बहार के तेरे मेरे इकरार के

दिल के सहारे आजा प्यार करे

दुष्मन है प्यार के जब लाखो गम संसार के

दिल के सहारे कैसे प्यार करे 

हे गाणं पडद्यावर साकार झालं. तेव्हा शर्मिला-शशी कॉलेज तरुणांच्या गळ्यातले ताईत बनले होते. दिलीप-देव-राज यांचा उतरता काळ आणि राजेश खन्नाचा अजून न आलेला जमाना या संधीकाळातील हा चित्रपट आहे. ही मधली पोकळी शशी कपूरनं भरून काढली. 

खय्यामच्या संगीतानं नटलेला ‘मोहब्बत इसको केहते है’ याच वर्षी आला. रफी-सुमनच्या आवाजातील ‘ठररिये होश मे आ लू , तो चले जाईगेगा’ हे रसाळ गाणं आजही ऐकावं वाटतं. शशी कपूर-नंदा या जोडीचा राज-नर्गिस, देवआनंद-नुतन, दिलीपकुमार-वैजयंतीमाला, राजेंद्रकुमार-साधना यांच्यासारखा विचार झाला पाहिजे. 

१९६५ ला ‘जब जब फुल खिले है’ पडद्यावर आला आणि बघता बघता त्यानं बॉक्स ऑफिसवर धुम केली. हा पहिलाच चित्रपट आहे की, ज्यानं शशी कपूरच्या पदरात निखळ यश टाकलं. या यशात वाटा मागायला दुसरा कुठलाही तगडा कलाकार चित्रपटात नव्हता. या चित्रपटानं शशी कपूर सोबत अजून दोघांच्या पदरात यशाचं माप टाकलं. नायिका नंदाचा हा सर्वांत गाजलेला पहिलाच चित्रपट. तसेच संगीतकार म्हणून चाचपडणाऱ्या कल्याणजी आनंदजीची कारकीर्द इथपासूनच व्यवसायीक दृष्टीनं वेगवान झाली. (याच वर्षी कल्याणजी आनंदजीचा ‘हिमालय की गोद मे’ हाही बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता.)

‘जब जब फुल खिले’इतकी गाणी परत शशी कपूरला ‘शर्मिली’चा अपवाद वगळता कुठल्याच चित्रपटात मिळाली नाहीत. रफी-सुमनच्या आवाजातील ‘ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे’ या गाण्याला ‘बीना का गीतमाला’त स्थान भेटलं. याच चित्रपटात रफी आणि लताच्या आवाजात स्वतंत्रपणे ‘परदेसीयों से ना आखिया मिलाना’ हे गाणं आहे. पण यातील रफीच्या आवाजातील गाणंच जास्त गाजलं. ‘बिना का…’त त्या वर्षी हीट गाण्यांत हे पण होतं. पण लताच्या आवाजातील गाणं मात्र नव्हतं. ‘दो पेहलू दो रंग’ अशी जी गाणी आहेत. त्यात पुरुष गायकांनी गायलेली गाणी जास्त गाजली, पण त्या तुलनेत लताच्या आवाजातील गाणी मात्र गाजली नाहीत.

शशी कपूरच्या ‘बिरादरी’ (१९६६) मध्ये रफीच्या तोंडी एक अतिशय गोड गाणं चित्रगुप्तनं संगीतबद्ध केलं आहे. 

अभी ना फेरो नजर जिंदगी सवार तो ले

के दिल के शीशे मे हम आपको उतार तो ले

यात नायिका फरियाल पेक्षा शशी कपुरच जास्त देखणा दिसतो. विलक्षण हलता निरागस देखणा चेहरा, गालावरची खळी, एक थोडा पडका दात हे सगळे प्लस पॉइंट होते, शशी कपूरसाठी. याच चित्रपटात होळीचं एक भन्नाट गाणं चित्रगुप्तनं दिलं आहे. रफी-सुमन-मन्ना डे यांच्या आवाजात हे गाणं आहे. शशी कपूर-मेहमूद-फरियाल यांनी धमाल केली आहे पडद्यावर.

आ रा रा रंग दो सभी को इस रंग मे

आयी है रंगीली होली रे

या गाण्यापासून होळीची धिंगाणा असलेली गाणी पडद्यावर सुरू झाली. यापूर्वी ‘खेलो रंग हमारे संग’ सारखी शांत गाणी होळीची असायची होती. 

या सोबतच शशी कपूरचा ‘नींद हमारी ख्वाब तुम्हारे’ (१९६६) हा नंदासोबतचा चित्रपट पडद्यावर आला. या चित्रपटाला मदनमोहनचं संगीत होतं. रफीचा आवाज आता शशी कपूरसाठी रुजू लागला होता. यातही ‘यु रूठो ना हसिना’ हे गाणं रफीच्याच आवाजात आहे. पण यातलं दुसरं गाणं विशेष गाजलं. आशा-रफीचं हे गाणं होतं, ‘कभी तेरा दामन ना छोडेंगे हम’. 

याच वर्षी शशी कपूर-राजश्रीचा चित्रपट ‘प्यार किये जा’ बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. नुकतीच पदार्पपण केलेली लक्ष्मीकांत प्यारेलालची जोडी या चित्रपटाची संगीतकार होती. ‘पारसमणी’च्या गाण्यांना यश मिळालं, पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष चालला नव्हता. पुढच्या ‘दोस्ती’नं लक्ष्मी-प्यारे साठी कमाल केली. यानंतरचा त्यांचा गाजलेला चित्रपट म्हणजे ‘प्यार किये जा’. महेंद्र कपूर-लताच्या आजावातील ‘फुल बन जाऊंगा शर्त ये है मगर’ चांगलंच होतं. पण ‘बिना का…’त गाजलं ते ‘गोरे हाथों पर ना जुल्म करो’ हे तुलनेनं सामान्य गाणं. 

पुढे हळूहळू चित्रपट गीतांचा दर्जाच घसरायला लागला. संगीतासाठी विशेष लक्षात रहावा असा ‘शर्मिली’ (१९७१) हा सचिन देव बर्मनच्या शेवटच्या काळातला चित्रपट शशी कपूरला मिळाला. खरं तर बबिता सोबत ‘हसिना मान जायेगी’ (१९६९)- बेखुदी मे सनम, हेमा मालिनी सोबत ‘अभिनेत्री’ (१९७०)- गा रे मेरे संग मेरे साजना, अशी गाणी गाजतच होती. पण यांच्यातून अभिजातता हरवून गेलेली होती.

‘शर्मिली’ हा शशी कपूरचा गाण्यासाठीचा शेवटचा अभिजात चित्रपट. मुकेश-रफी-तलत-महेंद्र हे आवाज शशी कपूरसाठी वापरून झाले होते. पण यात किशोर कुमारचा आवाज शशी कपूरसाठी सचिनदांनी वापरला. यातली सगळीच गाणी गाजली. चित्रपटही हिट ठरला. ‘खिलते है गुल यहाँ’, ‘ओ मेरी ओ मेरी ओ मेरी शर्मिली’, ‘आज मदहोश हुआ जाये रे’ किंवा ‘कैसे कहे हम प्यार ने हमको क्या क्या खेल दिखाये’ सगळीची गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. 

इथून पुढे सुरू होतो तो संगीतासाठी रुक्ष असा ‘दिवार’ कालखंड. शशी कपुरचा सहाय्यक अभिनेता म्हणूनचा काळ. म्हणजे दिलीप-देव-राज यांचा अस्त आणि राजेश खन्ना-अमिताभ बच्चन यांचा उदय या मधल्या काळात मैदानावर येऊन बॅटिंग करण्याची नाईट वॉचमनची भूमिका त्याच्या नशिबी आली होती. ती त्याने मन:पूर्वक निभावली. थोडीशी गाणी त्याच्या वाट्याला आली. त्यातून समोर उलगडत जाते ती त्याची तरुण प्रेमिकाची भूमिका. 

.............................................................................................................................................

नोटबंदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक? - संपादन : राम जगताप

पाने - ११६, मूल्य – १२५ रुपये.

ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/323

.............................................................................................................................................

   

.............................................................................................................................................

लेखक आफताब परभनवी हिंदी चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.   

a.parbhanvi@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......