वडिलांची निळी हर्क्युलसची सायकल... केवढा अभिमान होता त्यांना!
ग्रंथनामा - झलक
चंद्रमोहन कुलकर्णी
  • ‘बिटविन द लाइन्स’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 14 August 2020
  • ग्रंथनामा झलक बिटविन द लाइन्स Between the Lines चंद्रमोहन कुलकर्णी Chandramohan Kulkarni

प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांचा ‘बिटविन द लाइन्स’ हा लेखसंग्रह नुकताच राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झालाय. काय आहे यात? या पुस्तकाचं स्वरूप कसं आहे? पत्रकार-अनुवादक अपर्णा वेलणकर यांनी या पुस्तकाचा ब्लर्ब लिहिलाय. तो असा - “कॅनव्हासवर शब्दांनी रंगवायला घेतलेली चित्रं पुस्तकाच्या पानांवर रंगांनी लिहिली गेली तर? - अशक्य असं जे घडतं, ते म्हणजे हे पुस्तक! रंगांनी भिजलेल्या ओल्या बोटांमधून शब्द वाहते राहतात, तेव्हाच त्वचेखाली धावणारया रक्तवाहिन्यांच्या रेषा उचलून आतल्या आयुष्याचे लखलखते तुकडे असे अलगद शब्दांत बांधता येतात! ही चित्रंच आहेत. शब्दांनी रंगवलेली. पोलिस लायनीतल्या खाकी बालपणाच्या हाती रंगांची पेटी देणार् या जन्मदात्याची, वेडयावाकडया तरुण रेषांना वळण देणार् या गुरूजनांची, भणाण डोळ्यातल्या धस्कटाचा ध्यास लागलेल्या रंगीत तारूण्याची, मोकाट उनाडलेल्या जिगरी दोस्ताची, धावत्या रेषेच्या वाटेत आलेल्या काही अर्धविरामांची, काही दुखऱ्या पूर्णविरामांची ... ही शब्द‘चित्रं’!”

या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...

..................................................................................................................................................................

फक्त सायकली विकणारं एक दुकान पुण्यात निघालंय. भारीभारी सायकली मिळणारं, तीनचार मजली दुकान. साध्या सायकलपासून ते अगदी दहाबारा गिअरवाल्या, चकाचक शायनिंगवाल्या. रंगीबेरंगी ग्राफिक्स, फ्लूरोसंट कलर्सवाल्या, रेसिंगच्या, सीट, हँडलची उंची कमी-जास्त करता येणाऱ्या, शेलाट्या अंगकाठीच्या, देखण्या, निरनिराळ्या ब्रँडच्या अतोनात सायकली. सायकलीच सायकली! मधल्या काळात सायकल हे महत्त्वाचं पात्र असलेले एकदोन सिनेमे पाहिले, परवाच ‘जागतिक सायकल दिन’सुद्धा झाला, त्यात पावसाळ्याचे दिवस.

मन बुडून गेलं सायकलमध्ये. सायकलची चाकं मेंदूत भराभरा फिरू लागली, जुन्या फाइल्स ओपन झाल्या नि मेंदूच्या एचडी स्क्रीनवर इमेज दिसू लागली, ती वडिलांच्या निळ्या सायकलची! निळी सायकल!!

आपलं सगळं शक्यतो ‘विशेष’ या कॅटॅगरीतलं असावं, असा माझ्या वडिलांचा स्वभाव होता. साहजिकच त्यांची सायकलसुद्धा ‘विशेष’ होती. निळी, डबल बार असलेली! तसल्या डबल बार असलेल्या सायकली आताच काय, तेव्हाही क्वचितच दिसत. डबलबार असलेल्या त्या आपल्या निळ्या सायकलचा केवढा अभिमान होता त्यांना!

अर्थात तो काळही तसाच होता. सायकलव्यतिरिक्त दुसरी वाहनं कमीच असायची. त्यामुळे आपापल्या या दुचाकी वाहनावर लोकांचं प्रेम असायचं. आमची निळी सायकल म्हणजे आमच्या घरातली दोन चाकाची एक व्यक्तीच म्हणा ना! नानांचं तर अतोनात प्रेम होतं तिच्यावर. फार जपत तिला, तिची काळजी घेत.

पोलीसकॉलनीतल्या घराला तेव्हा ‘रूम’ म्हणत. आमची रूम तळमजल्यावरची, कोपऱ्यातली होती. कोपऱ्यातली असल्यानं तिला जो व्हरांडा मिळाला होता, तो स्वतंत्र होता. सार्वजनिक, पण स्वतंत्र. लोकांची जा-ये कमीच असायची तिथं. जी काही वहिवाट असेल, ती आमच्या कुटुंबाचीच. हे व्हरांड्याचं तपशिलातलं वर्णन अशासाठी, की पापड-सांडगे-कुरडया वाळत घालणं आणि चार पाहुणे आले, की खुर्च्या टाकून बसण्याबरोबरच त्या व्हरांड्याचा मुख्य उपयोग म्हणजे - सायकल लावणे! आमच्या घराच्या या हक्काच्या एक्स्टेन्शनचं वैशिष्ट्य म्हणजे तीनचार पायऱ्या चढून यावं लागायचं तिथे. सायकलच्या पार्किंगसाठी सर्वार्थानं बेस्ट जागा. स्पेशल ना!!

खरं तर रोजच्या रोज दोन-चार वेळा सायकलची चढउतार करणं हे विशेष कटकटीचं नसलं, तरी कंटाळवाणं होतं, हे नक्की. पण वडील ड्यूटीवरून रात्री परत आले किंवा दुपारी जेवायला आले, की अक्षरश: प्रत्येक वेळी ती सायकल उचलून व्हरांड्यात आणत. कधीच ती खाली, ग्राऊंडमध्ये लावलेली मी पाहिली नाही.

सायकलीला साईड स्टँड होता. हे मुद्दाम सांगण्याचं कारण असं, की साईड स्टँड ही एक ‘मॉडर्न’ गोष्ट होती तेव्हा. बहुतेक सायकलींना मेन स्टँड असायचे. मेन स्टँडवर सायकल घ्यायची म्हणजे प्रत्येक वेळी एक छोटी कसरत असे. सायकलला एक चाट मारून, एका हातानं हँडल सांभाळून, दुसऱ्या हातानं कॅरियर उचलून चाट मारणाऱ्या पायानं स्टँड खाली ओढायला लागायचा.

आतासुद्धा टू व्हीलर मेन स्टँडवर घेताना ही कसरत करावी लागते. त्या वेळी ही कसरत सायकलसाठी करावी लागत असे.

नानांच्या सायकलला त्यांनी साईड स्टँड मुद्दाम बसवून घेतला होता. फक्त पाय वाकडा करून स्टँडला एक छोटासा धक्का दिला, की सायकल स्टँडवर यायची.

आज आपल्याला या गोष्टींची इतकी सवय झालीय, की ही क्रिया आपल्या नकळतच आपण करतो. आपल्या ते लक्षातसुद्धा येत नाही.

पण आज साध्या, किरकोळ वाटणाऱ्या गोष्टी ‘विशेष’ वाटण्याचे दिवस होते.

जिथे जिथे म्हणून सायकलीला रंग लावणं शक्य होतं, तिथे तिथे त्यांनी निळा रंग लावून घेतला होता! काय त्यांना ते निळ्या रंगाचं वेड होतं, कोण जाणे! त्यांचं काहीही विशेष असलं, की बहुतेकदा ते निळं असायचं. शेड कोणतीही चालायची, पण ती निळ्यापैकी असायला लागायची, हे महत्त्वाचं! विशिष्टच निळा असला पाहिजे असं काही नाही. डार्क असो, लाईट असो की डल्‌ किंवा ब्राइट असो, प्रशियन असो नाहीतर कोबाल्ट. ब्ल्यूच्या काय हजारो शेड्स! असतील नसतील तेवढ्या शेड्स त्यांच्या संग्रही असायच्या.

अगदी सायकलची सजावटसुद्धा शक्यतो निळ्या रंगातच. हौसेला मोल नाही म्हणतात ना! सायकलच्या हँडलला, ब्रेक्सना लावण्यासाठी रबरी ग्रिप्स मिळतात. त्या कटाक्षानं निळ्याच! पेडलकव्हर, चेनकव्हर जिथे ब्ल्यू, तिथे सीटकव्हर निळ्याच्या तावडीतून कसं सुटणार? सायकलच्या मागच्या मडगार्डवर एक छोटासा, गोल आकाराचा इंडिकेटर कम रिफ्लेक्टर बसवलेला असायचा, तो मात्र लालच असायला हवा, असा नियम असल्यानं त्यांना तो मात्र निळा वापरता आला नाही! आणि पोलीसच कसा नियम मोडणार?

पावसाळ्यातली विशेष काळजी म्हणून मडगार्ड्‌सना लावण्यासाठी वेगळी मडगार्ड्‌स मिळत. तीसुद्धा निळी असावीत, याकडे त्यांचा कटाक्ष असे.

चेनकव्हरसुद्धा निळं - साधंसुधं नाही, फुल चेनकव्हर. पायजम्याला किंवा पँटला चेनचं ऑईल लागू नये, म्हणून खरं तर चेनच्या वरती लावण्याची ही गोष्ट. पण त्यातही बरेच प्रकार. सिंगल, हाफ, फुल, बोथसाईड फुल असे! आमचं होतं, बोथसाईड फुल! आमची सायकल स्पेशल ना!! या फुल चेनकव्हरमुळे सायकलची चेन पडण्याचं प्रमाण जरा कमी व्हायचं हे खरं; पण एकदा का ती पडली, आणि घाईच्या वेळेला, भर रस्त्यात, चौकात, भर ट्राफिकमध्ये, तर मग मात्र ती बसवता नाकी नऊ येणार! साध्या सिंगल चेनकव्हरचं त्यामानानं हे सोपं काम, कारण सायकलवरनं उतरून पटकन तिथल्या तिथे चेन बसवता येते; पण या फुल चेनकव्हरचा मात्र कुटाणा फार! त्याचे सगळे छोटेछोटे पार्ट ढिले करून स्वतंत्र करून घेऊन चेन बसवण्याचा कार्यक्रम करावा लागत असे. पण आम्हाला ‘विशेष’ असण्याची हौस फार होती!

या निळावंतीचे नखरेही फार. दर आठ-पंधरा दिवसांनी तिला पॉलीश व्हायचं. विशेषत: वडिलांच्या परेडच्या दिवशी त्यांना त्यांच्या युनिफॉर्मच्या इस्त्रीबरोबरच बेल्ट, युनिफॉर्मची, टोपीची बटणं, शिट्टी अशा गोष्टींना पॉलीश करायचं असायचं. सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टच्या आदल्या दिवशी तर घरात हा पॉलीशचा कार्यक्रम जोरदारच चालायचा. त्याच वेळी सायकललाही पॉलीश केलं जायचं. कारला पॉलीश करण्यासाठी ‘कारपॉल’ नावाची पॉलिशची एक डबी त्यांनी सायकलच्या पॉलीशसाठी आणून ठेवलेली असायची.

विशेष चमकवण्याच्या किंवा हाय-लाईट करण्याच्या गोष्टी म्हणजे सायकलचे स्टीलचे पार्ट म्हणजे हँडल, पुढचे मागचे सपोर्ट बार, पेडलच्या मांड्या, घंटी आणि स्पोक्स!

चमकवण्याच्या गोष्टींमध्ये आणखी एका गोष्टीला महत्त्व असायचं, ते म्हणजे ज्या ब्रँडची आमची ती निळी सायकल होती त्या ब्रँडचा लोगो : ह र्क्यु ल स!

हँडलच्या मेन फ्रंटबारवर आणि मागच्या मडगार्डवरचा हर्क्युलसचा C आणि H या इंग्रजी अक्षरं असलेला लोगो आजही आठवतोय मला. सोनेरी रंगातली पुढे पुढे मोठी मोठी होत जाणारी सूर्यकिरणं मध्यभागी आणि त्यावरची ती लाल अक्षरातली C आणि H ही अक्षरं. हँडलबारवर जरी फक्त तो C आणि H या अक्षरांचा लोगो असला, तरी त्या (फुल!) चेनकव्हरवर मात्र त्यांनी हर्क्युलस या मूळ इंग्लिश कंपनीचा लोगो कुणा पेंटरकडून सोनेरी-लाल रंगात हौसेनं रंगवून घेतला होता. त्यावरची ती सी आणि एच या अक्षरांभोवतीची ‘द हर्क्युलस सायकल अँड मोटर कं. लि., नॉटिंगहॅम, इंग्लंड’ ही काळ्या पट्टीवरची सोनेरी अक्षरं आणि त्या सगळ्या अक्षरांना टेकून उभा असलेला बलवान, दाढीवाला आणि हातात कसला तरी भलामोठा दंडुका घेतलेला मनुष्य आजही मला आठवतोय. (सहज म्हणून इंटरनेटवर सर्च करून पाहिलं, तर सापडला गूगलवर!)

हर्क्युलसमधल्या H चा वापर मोठ्या कौशल्यानं हँडलच्या मुख्य बारवर डायनॅमो अडकवण्यासाठी केलेला असायचा. हा डायनॅमो आणि आर्मिचर ही एक विशेष गोष्ट होती. सायकलच्या मागच्या चाकाला बाटलीवजा एक छोटी बॅटरी जोडलेली असायची. चाक फिरताना या बॅटरीला गती मिळून घर्षणानं वीज निर्माण होऊन पुढे हँडलला जोडलेला दिवा लागायचा.

हा असला दिवा म्हणजे मोठी कौतुकाचीच गोष्ट होती, आमच्या निळ्या सायकलची! अर्थात सायकलला दिवा असावा, हा नियमच होता तेव्हा; पण या दिव्याचं विशेष कौतुक अशासाठी, की त्याच्या आधीच्या जनरेशनचे सायकलचे दिवे चक्क रॉकेलवर चालणारे असत! त्यामुळे हा आमचा फारच स्पेशल होता. आमचं कसं सगळं स्पेशल, विशेष!!

पावसाळ्यात या सायकलची विशेष आठवण होते, त्याचं कारण स्पोक्स!

सायकलचे स्पोक्स ही तर फारच मजेदार गोष्ट होती. हे स्पोक्स स्टेनलेस स्टील आणि ॲल्युमिनियम या दोन प्रकारचे मिळत.

सायकलचे जे जे स्टील पार्ट होते, ते सगळे अर्थातच चमकत. स्पोक्स तर विशेषच. सायकलच्या वेगाबरोबर प्रकाशाच्या रेघांचं मोठं मोहक काँबिनेशन होत असे. या स्पोक्सच्या संदर्भातली पावसाळ्यातली विशेष आठवण म्हणजे, स्पोक्स आणि चमकणाऱ्या इतर गोष्टी म्हणजे हँडल, सपोर्टबार्स, घंटी, पेडलच्या मांड्या, चाकाची रिमं या सगळ्यांना त्या गंजू नयेत, म्हणून पावसाचे दिवस संपेपर्यंत कसलातरी, घाणेरड्या रंगाचा एक लेप लावून ठेवत. हा लेप गंजप्रतिबंधक असायचा. पावसाळा संपला, की हा लेप काढून टाकून सायकल चमकायला सज्ज!!

स्पोक्स चमकवण्यासाठी वडिलांनी स्पोक्ससाठी स्पेशल असं कोणतंतरी एक पॉलीश आणून ठेवलं होतं. ते लावलं रे लावलं, की स्पोक्सच्या तारा झळाळत. सकाळच्या उन्हात सायकल बाहेर काढली, की बघत रहावा तो चमचमणारा खेळ!

सायकलच्या सुरुवातीच्या कमी असलेल्या वेगाबरोबर प्रकाशाच्या दोन दोन रेघा एकमेकींना छेदून जात. एकमेकींत मिसळत. वेग जसजसा वाढेल, तसतशा या रेघांच्या संख्येत भर पडून प्रकाशाच्या रेघांचा एक मनोहारी खेळ रंगात येई. सुंदरसुंदर रचना निर्माण होत. गोल मोठे त्रिकोण आणि छोटे त्रिकोण यांना प्रकाशाचे अत्युच्च बिंदू स्पर्श करीत अंतर्धान पावत आणि दोन्ही चाकांच्या गोलाकार मर्यादेत वेगाबरोबरचा हा खेळ काही मिनिटं माझ्या दृष्टीला खिळवून ठेवी. प्रकाशाच्या रेघांच्या त्या रचनांसोबत नाहीशी नाहीशी होत जाणारी माझ्या वडिलांची पाठमोरी आकृती आजही माझ्या दृष्टीसमोर तरळते.

स्पोक्सना ज्या दिवशी पॉलीश केलं जायचं, त्या दिवशी घरनं निघताना वडिलांच्या स्टाईलमध्ये विशेष भर पडायची. घरनं ड्यूटीवर निघतानाची त्यांची एक खास स्टाईल असायची. त्यांना काही नेहमीच युनिफॉर्मवर जायला लागायचं नाही. ड्यूटीव्यतिरिक्तचा त्यांचा नेहमीचा पोशाख म्हणजे लांब, फुल बाह्यांचा शर्ट आणि आखूड पायजमा! शर्ट-पँट क्वचित. भांगबिंग पाडून, दोन-तीन वेळा मान तिरकी करून निरनिराळ्या अँगलमधनं आरश्यात बघून झालं, की पायात चपला अडकवून स्वारी आधी एक चारमिनार पेटवायची. कुठलं तरी, कुणालाच ऐकू येणार नाही असं गाणं किंवा स्वगत पुटपुटत व्हरांड्यात जाऊन सायकलचं कुलूप काढून तीन-चार पायऱ्या उतरून सायकल ग्राऊंडवर काढून सीटखालच्या कापडाचा बोळा काढून एक-दोनदा सायकलवरची धूळ झटकून सीट पुसून घेऊन हँडल एका हातानं पकडून स्टाईलमध्ये कंटिन्युइटी ठेवून मग सिगारेटचा दुसरा झुरका! दीर्घ झुरका! मग हँडलवरचा हात तसाच ठेवून एका हातानं सायकलचा भार पेलत पंधरा-वीस-पंचवीस पावलं चालून झाल्यावर हातातल्या सिगारेटचा शेवटचा झुरका घेऊन ती टाकून देऊन पायाखाली टाकून, तिचं अस्तित्व संपेपर्यंत पायाखाली चिरडल्यानंतर एक मोऽऽठ्ठी टांग टाकून पायानं एक मोठं अर्धवर्तुळ काढून सीटवर बसून आपल्या रस्त्याला लागणार...

..................................................................................................................................................................

‘बिटविन द लाइन्स’ ​ ​- चंद्रमोहन कुलकर्णी

राजहंस प्रकाशन, पुणे

मूल्य - २४०, मूल्य - ३०० रुपये. 

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5219/Between-the-Lines

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......