सॅम हॅरिस- माजिद नवाझ यांच्या चर्चेत मुख्यत्वे इस्लाम व ख्रिश्चन धर्मांचे संदर्भ येतात, पण त्यांच्या चर्चेमागची भावना सर्वच धर्मियांना उपयुक्त ठरावी
ग्रंथनामा - झलक
करुणा गोखले
  • ‘इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 14 August 2020
  • ग्रंथनामा झलक इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य Islam aani Sahishnuteche Bhavitavya ख्रिश्चन Christian इस्लाम Islam इस्लाम अँड फ्यूचर ऑफ टॉलरन्स Islam and the Future of Tolerance सॅम हॅरिस Sam Harris माजिद नवाझ Maajid Nawaz

‘इस्लाम अँड फ्यूचर ऑफ टॉलरन्स’ हे सॅम हॅरिस-माजिद नवाझ यांच्यातील संवादाचे छाेटेेसे मूळ इंग्रजी पुस्तक. त्याचा मराठी अनुवाद ‘इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य : एक सुसंवाद’ या नावाने करुणा गोखले यांनी केला आहे. साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला अनुवादक म्हणून गोखले यांनी लिहिलेले हे प्रास्ताविक ...

..................................................................................................................................................................

हॅरिस आणि नवाझ या दोघांची विचारधारांच्या बाबतीत कोणे एके काळी ‘दोन ध्रुवांवर दोघे आपण’ अशी अवस्था होती. हॅरिस निरीश्वरवादी, अमेरिकन, गोरे आणि ख्रिश्चन, तर नवाझ पाकिस्तानी कौटुंबिक वारसा असलेले ब्रिटनचे नागरिक, धर्माने मुस्लीम आणि कट्टरतावादी. हॅरिस एक यशस्वी, उच्चशिक्षित, सुस्थित, व्यासंगी प्राध्यापक, तर नवाझ वयाच्या १६व्या वर्षी शाळा-कॉलेज सोडून कट्टर इस्लामवादींच्या प्रभावाखाली येऊन जगभर अतिरेकी संघटनेची सदस्य संख्या वाढवण्याच्या उद्योगाला लागलेला आणि त्यापायी इजिप्तमध्ये तुरुंगाची हवा खात बसलेला विशीतला तरुण. पण ‘अॅम्नेटी इंटरनॅशनल’ ही संस्था त्याच्या कोवळ्या वयाकडे बघून त्याला पंखाखाली घेते, त्याचे प्रदीर्घ काळ समुपदेशन करून त्याला कट्टरतावादाच्या विळख्यातून सोडवते आणि पुनश्च उच्चशिक्षण घेण्यास उद्युक्त करते.

अशा युवकाबरोबर सॅम हॅरिस का सुसंवाद साधतात असा आपल्याला प्रश्न पडू शकतो. त्याचे उत्तर आहे नवाझ यांच्यामध्ये घडून आलेल्या हृदयपरिवर्तनात. उच्चशिक्षण पूर्ण करून नवाझ यांनी इंग्लंडमध्ये ‘क्विलिअम’ ही संस्था स्थापन केली आहे व त्याद्वारे ते इस्लाममधील आणि मुस्लिमांमधील कट्टरता दूर व्हावी या दृष्टीने संघटित प्रयत्न करत आहेत. उदारमतवाद, मानवतावाद, स्त्री-पुरुष समानता, व्यक्तिस्वातंत्र्य यांना इस्लाममध्ये स्थान मिळावे, यासाठी ते झगडत आहेत. त्यांच्या या कार्याला पाठिंबा देण्यासाठी सॅम हॅरिस त्यांच्याबरोबर खुली चर्चा करत आहेत.

या चर्चेत हॅरिस इस्लाममधील कोणत्या संकल्पना मुस्लिमेतरांना अनुदार किंवा कडव्या वाटतात, हे कुठलाही आडपडदा न ठेवता नवाझ यांच्यासमोर मांडतात. ते करताना अपराधीही वाटून घेत नाहीत आणि इस्लामला आरोपीच्या पिंजऱ्यात उभेही करत नाही. त्यावर नवाझसुद्धा स्वसमर्थनाचा पवित्रा घेत चर्चा पुढे नेतात; बाजू उलटवण्याचा प्रयत्न करत ख्रिश्चन धर्मावर प्रतिहल्ला चढवत नाहीत. ‘इस्लाम अँड फ्यूचर ऑफ टॉलरन्स’ हे पुस्तक म्हणजे हॅरिस आणि नवाझ यांनी केलेल्या चर्चेचे शब्दश: परिलेखन आहे.

मला या चर्चेची चार वैशिष्ट्ये महत्त्वाची वाटतात –

१) आपल्यावर मुस्लीमद्वेषाचा आरोप होईल याची तमा न बाळगता हॅरिस इस्लाममधील त्यांना काय खटकते आणि जे खटकते ते उदारमतवादाच्या कसे विरोधात आहे, हे स्पष्टपणे नोंदवतात.

२) नवाझ त्यांच्यावर कुठलेही आरोप न करता, मुस्लिमांच्या रोषामागची आणि इस्लामच्या अतिरेकीकरणाची कारणे शोधू बघतात. पण ते करताना ख्रिश्चन धर्मीयांनीसुद्धा कसे खूप काही चुकीचे केले आहे, याची यादी देत बसत नाहीत.

४) इस्लामचे इतर धर्मांशी वितुष्ट का आले, याच्या इतिहासात फार काळ न अडकता यापुढे सर्वच धर्मांनी उदारमतवाद, परस्परसहकार्य, मानवतावाद, व्यक्तिस्वातंत्र्य, मूलभूत मानवी हक्कांचे पालन आणि स्त्री-पुरुष समानता यांना किमान सामायिक मूल्ये मानून आपापल्या धर्मांत ती अंतर्भूत करावीत, असे हॅरिस आणि नवाझ ठामपणे प्रतिपादन करतात.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : तुम्हाला ‘ब्र’ उच्चारायचाय? मग तुम्ही राहत इन्दौरी वाचा, पहा, ऐका, अनुभवा…

..................................................................................................................................................................

पुस्तक वाचल्यावर एक उणीव मात्र जाणवते. नवाझ मतपरिवर्तन होऊन इस्लामवादी भूमिकेपासून दूर गेले हे खरे आहे. तरीसुद्धा इस्लाममधील कोणते पैलू त्यांना भावतात, यावर ते स्वत:पण काही बोलत नाहीत आणि हॅरिसपण त्यांना बोलते करत नाहीत. तसे त्यांनी केले असते, तर हा संवाद अधिक अर्थपूर्ण झाला असता, असे वाटून जाते. अर्थात हॅरिस त्यांच्या इतर लेखनातून धर्मांच्या उपयुक्ततेविषयीच वारंवार प्रश्नचिन्ह उठवत असतात. त्यामुळे ते नवाझ यांना असा काही प्रश्न विचारतील हे थोडेसे असंभव आहे. परंतु नवाझ धर्मांची उपयुक्तता डावलत नाहीत. त्यामुळे ते आपणहून इस्लाममधील त्यांना काय पटते, याविषयी बोलले असते, तर ते भारतीय संदर्भात मोलाचे ठरले असते.

या पुस्तकात एक ख्रिश्चन धर्मीय एका मुस्लीम व्यक्तीसोबत इस्लामची चिकित्सा करतो आहे. साहजिकच त्यांच्या चर्चेत मुख्यत्वे इस्लाम आणि थोड्या प्रमाणात ख्रिश्चन धर्मांचे संदर्भ येतात. पण त्यांच्या चर्चेमागची भावना सर्वच धर्मियांना उपयुक्त ठरावी. (हे पुस्तक वाचताना आणि अनुवादताना शशी थरुर यांच्या ‘व्हाय आय अ‍ॅम अ हिंदू’ आणि कांचा इलैय्या यांच्या ‘व्हाय आय अ‍ॅम नॉट अ हिंदू’ या दोन पुस्तकांची वारंवार आठवण येत होती. या दोन लेखकांमध्ये हिंदू धर्माबाबत असाच खुला संवाद घडला, तर तो भारतीयांसाठी मौलिक ठरेल, असे तीव्रतेने वाटून गेले.)

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

भिन्न धर्मीय, भिन्न वंशीय किंवा भिन्न भाषिक समूहाविषयी अविश्वास आणि भीती वाटणे, ही उत्क्रांतीमधील आदिम मानवी भावना आहे. तीमागे अज्ञाताचे भय आणि स्वसंरक्षणाची प्रेरणा होती. म्हणूनच मानवाचा इतिहास हा भिन्न धर्मविचारांमधील, प्रदेशांमधील आणि भाषांमधील संघर्षाचा इतिहास राहिलेला आहे. पण आता उत्क्रांतीचा तो टप्पा आपण कधीच मागे टाकला आहे. आज, माहिती विस्फोटाच्या युगात, पृथ्वीतलावरील कुठलीच भाषा, वंश किंवा धर्म अज्ञात राहिलेला नाही. उपजत कुतूहलाच्या आधारे अपरिचित घटिताबाबत आवश्यक ती माहिती प्राप्त करून आपण आदिम भीतीवर मात करू शकतो. शिवाय परस्पर सहकार हेसुद्धा उत्क्रांतीत यशस्वी ठरलेले एक शाश्वत धोरण आहे. मानवाने आदिमतेपासून सुरू केलेला आणि आधुनिकतेच्या दिशेने जाणारा हा प्रवास अधिक सुकर, सुखकारक आणि सौहार्दपूर्ण व्हावा असे वाटत असेल, तर भिन्न धर्मियांमध्ये निकोप चर्चा आवश्यक आहे.

अशी चर्चा शक्य आहे, हे या पुस्तकातून फार प्रभावीपणे समोर येते. भारतात अशा चर्चांची विशेष आवश्यकता आहे, कारण आपण स्वत:ला धर्मनिरपेक्ष, लोकशाही राष्ट्र मानतो आणि विविधतेत एकता हे स्वत:चे वैशिष्ट्य समजतो. केवळ भारतातच नाही, तर जगात सर्वत्र विविध धर्म, पंथ, जाती, भाषिक समूह यांमध्ये शांतिपूर्ण सहजीवन शक्य करायचे असेल, तर नवाझ आणि हॅरिस यांमध्ये झालेल्या चर्चेपासून आपणही प्रेरणा घ्यायला हवी.

..................................................................................................................................................................

इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य : एक सुसंवाद – सॅम हॅरिस- माजिद नवाझ,

अनुवाद – करुणा गोखले,

साधना प्रकाशन, पुणे, पाने – १२८, मूल्य - १५० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5214/Islam-ani-Sahishnuteche-Bhavitavya

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......