सत्यशोधक चळवळ, ही आधुनिक भारतातील पहिली परिवर्तनवादी लोकचळवळ होती!
ग्रंथनामा - झलक
अरुण शिंदे
  • ‘सत्यशोधकीय नियतकालिके’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 10 May 2019
  • ग्रंथनामा झलक सत्यशोधकीय नियतकालिके Satyashodhkiy Niyatkalike अरुण शिंदे Arun Shinde

प्रामुख्याने महाराष्ट्रातील बहुजन पत्रकारितेचा आढावा घेणारे ‘सत्यशोधकीय नियतकालिके’ हे डॉ. अरुण शिंदे यांचे महत्त्वाचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाविषयी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे म्हणतात, “प्रा. डॉ. अरुण शिंदे यांचा ‘सत्यशोधकीय नियतकालिके’ हा नवीन ग्रंथ त्यांच्या व्यासंगाची आणि चिकित्सक द़ृष्टिकोनाची साक्ष देणारा आहे. आधुनिक काळात महात्मा फुल्यांनी भारताच्या सांस्कृतिक पर्यावरणात आणि इतिहासात आमूलाग्र बदल घडवले. त्यांच्या प्रेरणेतून महाराष्ट्रात इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच एक सत्यशोधकीय पत्रकारिताही बहरली. डॉ. शिंदे यांनी या पत्रकारितेचा चिकित्सक अभ्यास वाचकांना सादर करताना ‘दीनबंधु’, ‘दीनमित्र’, ‘शेतकऱ्याचा कैवारी’, ‘जागृति’, ‘विजयी मराठा’, ‘राष्ट्रवीर’, ‘प्रबोधन’, ‘हंटर’, ‘सत्यवादी’, ‘कैवारी’ अशा साठहून अधिक नियतकालिकांचा आढावा आपल्या या ग्रंथात घेतला आहे. माझ्या माहितीनुसार असा विस्तृत ग्रंथ मराठीत प्रथमच येत आहे. हा केवळ सत्यशोधकीय पत्रकारितेचा इतिहास नाही, तर गेल्या दीडशे वर्षांचा महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाचा अमूल्य दस्तावेज आहे.

.............................................................................................................................................

एकोणिसावे शतक हे आधुनिक भारताच्या इतिहासात सामाजिक व राजकीय बदलाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे शतक होते. ब्रिटिश राजवटीचा भारतीय समाजव्यवस्थेवर अंतर्बाह्य परिणाम झाला. पाश्चात्यांचे ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण व प्रगती यांनी प्रभावित झालेला नवशिक्षित वर्ग पाश्चात्यांच्या प्रगतीची व हिंदुस्थानच्या अधोगतीची चिकित्सा करू लागला. आत्ममंथन, आत्मपरीक्षण सुरू झाले. भारतीयांच्या अधोगतीचे मूळ येथील धर्मव्यवस्था, वर्ण-जातिप्रधान स्थितिशील समाज, कालबाह्य रूढी परंपरा, अंधश्रद्धा आणि पारंपरिक मानसिकता यांमध्ये आहे, हे सुधारकांच्या लक्षात आले. त्यांनी धार्मिक व सामाजिक पुनर्रचनेचा जोरदार आग्रह धरला. समाजसुधारणेचे कार्य संस्थात्मक पातळीवर करणारे ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज स्थापन झाले. त्यांनी आपल्या विचार व कार्याने समाजजीवन ढवळून काढले. यामध्ये सत्यशोधक चळवळीची तात्त्विक भूमिका व कार्य अधिक मूलभूत आणि व्यापक होते.

सत्यशोधक चळवळीने म. फुले यांच्या प्रेरणेतून जनसामान्यांच्या उत्थानाचा अभूतपूर्व लढा उभारला. शेतकरी, कष्टकरी, कामगार, बहुजन, दलित वर्गापासून डोंगरकपारीतील महादेव कोळ्यांपर्यंत सामान्य जनसमुदायाने उत्स्फूर्तपणे चालवलेली व शहरापासून खेड्यापाड्यातील वाड्यावस्त्यांपर्यंत पोहोचलेली सत्यशोधक चळवळ, ही आधुनिक भारतातील पहिली परिवर्तनवादी लोकचळवळ होती.

सत्यशोधक चळवळीने वैदिक धर्म व वर्णजातिप्रधान समाजव्यवस्थेची कठोर चिकित्सा केली. त्यांनी सर्वप्रथम प्रस्थापित ब्राह्मणी वैदिक परंपरेपासून स्वतःला अलग करून शेतकरी वर्गात अत्यंत आदराचे स्थान असलेल्या बळीराजाच्या परंपरेशी स्वतःचे नाते जोडून घेतले. शूद्रातिशूद्रांची अस्मिता व अभिमानाची गौरवशाली परंपरा म्हणून लोकसंस्कृतीचा पुरस्कार केला. धर्मग्रंथांची बुद्धिवादी समीक्षा करून त्यांचा सत्यशोधकीय दृष्टीतून अन्वयार्थ लावला गेला. बहुजन समाजाची मानसिक गुलामगिरी व अधोगती यासाठी हिंदू धर्म, शास्त्रग्रंथपुराणे व ब्राह्मणी वर्चस्व यांना जबाबदार धरण्यात आले. लोकसंस्कृतीतील परंपरा, प्रतीके, लोकदैवते यांना नवा अर्थ व आशय देऊन पर्यायी संस्कृतीचा विचार मांडला गेला.

सत्यशोधकांनी ग्रंथप्रामाण्य व शब्दप्रामाण्य मानण्यास नकार दिला. प्रत्येकाने व्यक्तिगत बुद्धीने संशोधन करावे, असा त्यांनी आग्रह धरला. पोथीवाद नाकारून बुद्धिवादाचा पुरस्कार केला. सत्यशोधकांनी सर्व प्रकारच्या मध्यस्थांना विरोध केला. देव व भक्त यांच्यामधील भटजी आणि धर्मव्यवस्थेवर कब्जा केलेली भिक्षुकशाही यांच्या समूळ उच्चाटनाचा विचार मांडला. सत्यशोधकांनी विविध धर्मांतील धर्मगुरूंच्या विरोधात जगभर चालू असलेल्या धर्मसुधारणा चळवळींना पाठिंबा देऊन त्यांच्याशी आपले वैश्विक नाते जोडले. सत्यशोधक चळवळीने धार्मिक स्वातंत्र्य, समता, मानवी प्रतिष्ठा, इहवाद, विवेक, सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता व बुद्धिवाद या आधुनिक मूल्यांची प्रतिष्ठापना करण्याचे प्रयत्न केले.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4809/Golda-_-Ek-Ashant-Vadal

.............................................................................................................................................

सत्यशोधक चळवळीने प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर सर्वाधिक भर दिला. म. फुले यांनी हंटर आयोगापुढे ‘झिरपण्याच्या सिद्धान्ता’स विरोध करून कनिष्ठ वर्गातील मुलांना प्राथमिक शिक्षण देण्याची मागणी केली होती. सत्यशोधक समाजाच्या प्रत्येक परिषदेमध्ये मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्याचे ठराव केले जात होते. सत्यशोधकांनी प्राथमिक शिक्षणाकडे समाजपरिवर्तनाचे साधन म्हणून पाहिले. लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन मुलामुलींना शिक्षण देण्यासाठी जागृती केली. सत्यशोधक चळवळीच्या प्रेरणेतून ‘मराठा शिक्षण परिषद’, ‘रयत शिक्षण संस्था’ यांसारख्या ध्येयवादी शिक्षणसंस्था सुरू झाल्या. त्यांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसाराचे फार मोठे कार्य केले. स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणप्रसारासाठी बहुजन समाजाच्या अनेक शैक्षणिक संस्था स्थापन झाल्या. सरकारने शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाची मोहीम हाती घेतली. भारतीय राज्यघटनेने प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले आहे. यामागे सत्यशोधक चळवळीने प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व व आवश्यकतेबाबत केलेली जागृती कारणीभूत आहे.

शेतकरी-कष्टकरी-श्रमिक वर्ग हा सत्यशोधक चळवळीचा केंद्रबिंदू होता. सरकार, सरकारी नोकर, सावकार, व्यापारी व भटजी यांच्याकडून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आर्थिक शोषणाचे स्वरूप स्पष्ट करून सत्यशोधक चळवळीने त्याविरुद्ध लढे उभारले. नियतकालिकांनी शेतकऱ्यांचे प्रश्न धसास लावले. कोकणातील जमीनदार व खोती प्रथेच्या विरोधात कुळांचा लढा उभारला. शेतकरी संघटना स्थापन केल्या.

२ डिसेंबर १८९४ रोजी बदलापूर, जि. ठाणे येथे ‘शेतकरी हितचिंतक मंडळी’ ही ग्रामीण भागातील पहिली सहकारी संस्था स्थापन केली. सत्यशोधक चळवळीने शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व शोषणापासून मुक्ततेसाठी सहकार चळवळीचा क्रांतिकारक विचार मांडला. सहकारी पतसंस्था स्थापन करून सावकारांच्या निरंकुश शोषणापासून शेतकऱ्यांना मुक्त करण्याचा प्रयत्न केला. सत्यशोधक चळवळीने सहकाराबाबत केलेल्या जागृतीमुळे पुढे ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थकारणाचा चेहरामोहरा बदलून टाकणारी व विकासाचे प्रतीक ठरलेली सहकार चळवळ उदयास आली.

भारतातील पहिली कामगार संघटना ‘बाँबे मिल हँड्स असोसिएशन’ ही नारायण मेघाजी लोखंडे यांनी १८८४ साली स्थापन केली. ‘दीनबंधु’ हे श्रमिकांचे पहिले मुखपत्र चालवले. कामगारांचे कामाचे तास कमी करणे, रविवारची साप्ताहिक सुट्टी, बालकामगारांना मनाई, स्त्रियांना रात्रपाळीस बंदी असे कामगारहिताचे निर्णय संघटनेच्या आंदोलनामुळे झाले. स्त्रीकामगारांचा सक्रिय सहभाग हे लोखंड्यांच्या कामगार संघटनेचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य होते.

‘अस्पृश्यता निर्मूलन’ हे सत्यशोधक चळवळीचे अंगीकृत कार्य होते. जन्माधिष्ठित उच्चनीचत्व व जातिभेदावर सत्यशोधक चळवळीने कठोर हल्ले चढवले. दलित चळवळीचे प्रारंभीचे पुढारी गोपाळ बाबा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे, किसन फागुजी बनसोडे वगैरे सत्यशोधक चळवळीशी जवळून निगडित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील दलित चळवळीला सत्यशोधकांनी सक्रिय पाठिंबा दिला. सवर्ण-दलितांमधील दरी कमी केली. सत्यशोधक चळवळीने दलितांच्या मुक्तिलढ्याचा पाया घातला.

म. फुले यांनी आपल्या कार्याचा प्रारंभ स्त्री-शिक्षणापासून केला. सत्यशोधक चळवळीच्या मुशीतून आधुनिक भारतातील पहिल्या स्त्रीवादी लेखिका ताराबाई शिंदे, संपादिका श्रीमती तानुबाई बिर्जे, महिला प्रकाशिका रत्नम्माबाई अय्यावारू, सत्यशोधक समाजाच्या सेक्रेटरी सावित्रीबाई रोडे यांच्यासारख्या विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिला निर्माण झाल्या. १९२५ नंतर स्त्रीपरिषदा भरवण्यात आल्या. त्यामध्ये मुलींच्या विवाहाची वयोमर्यादा चौदा वर्षे करण्याची मागणी करण्यात आली. परंतु कृतीच्या पातळीवर फारसे प्रयत्न झाले नाहीत. सामान्य शेतकरी-कष्टकरी स्त्रियांच्या प्रश्नांकडे सत्यशोधक चळवळीने दुर्लक्ष केले. त्यामुळे आजही बहुजन समाजातील स्त्रियांमध्ये पारंपरिक मानसिकता व मागासलेपण आढळून येते.

सत्यशोधक चळवळीने सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून मानवाच्या सर्वंकष मुक्ततेचा आग्रह धरला. स्वातंत्र्याची संकल्पना राजकीय क्षेत्रापुरतीच मर्यादित होती. सत्यशोधकांनी ती धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक वगैरे जीवनाच्या सर्वांगांपर्यंत विस्तारली. राजकीय स्वातंत्र्यापेक्षा जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक स्वातंत्र्याचा आग्रह धरला. १९१९ नंतर माँटफर्ड सुधारणा कायद्याच्या पार्श्वभूमीवर बदलत्या राजकीय परिस्थितीचा अचूक वेध घेऊन ‘ब्राह्मणेतर पक्ष’ स्थापन केला गेला. ब्राह्मणेतर पक्षाची सत्ता असलेल्या जिल्हा लोकल बोर्डांनी प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. ब्राह्मणेतर पक्षाच्या सभासदांनी लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमध्ये सार्वजनिक पाणवठे अस्पृश्यांना खुले करणे, सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास बंदी, जोशी वतन रद्द करणे, तुकडेबंदी, खंडबंदी यांबाबतीत शेतकऱ्यांचे हितरक्षण करणे, सरकारी नोकरीत कारकून भरती करताना ब्राह्मणेतरांना पन्नास टक्के जागा राखीव ठेवणे यांसारखे बहुजन समाजाच्या हिताचे कायदे करण्यास सरकारला भाग पाडले. ब्राह्मणेतर पक्षाने बहुजन समाजात राजकीय जागृतीचे पर्व निर्माण केले. त्यामुळेच आधुनिक महाराष्ट्राचे राजकीय नेतृत्व ग्रामीण भागातील बहुजन समाजाच्या हाती आले आहे.

सत्यशोधक चळवळीच्या प्रसारासाठी प्रबोधनपर वाङ्मय निर्माण झाले. त्यामुळे बहुजन समाजातून लेखक, अभ्यासक व वाचकांचा वर्ग उदयाला आला. सत्यशोधक जलसे, कीर्तनकार, फिरते प्रचारक, वक्ते यांनी प्रबोधनपर विचार महाराष्ट्रभर पसरवला. सत्यशोधक चळवळीच्या प्रचार-प्रसाराच्या भूमिकेतून नियतकालिके सुरू झाली. बहुजन समाजात ध्येयनिष्ठ व परिवर्तनवादी पत्रकारितेची दर्जेदार परंपरा निर्माण झाली. सत्यशोधक चळवळीने अठरापगड जातीतील सामान्य माणसांमधील ‘स्वत्व’ जागे केले. त्यांच्यामधून समर्थ लेखक, संपादक, शास्त्री, पंडित, शिक्षणतज्ज्ञ, संघटक, नेते, प्रचारक, कार्यकर्ते, कीर्तनकार, जलसाकार आदी कर्तृत्ववान व्यक्तींची पिढी निर्माण केली. त्यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचा पाया घातला. बहुजन समाजाच्या उत्थानाचे पर्व सुरू झाले.

एकोणिसाव्या शतकातील वृत्तपत्रे ही मतपत्रे होती. त्यांनी लोकजागृती व लोकमत तयार करण्याचे काम केले. या काळातील सर्व नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा व आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले असे. ‘ब्राह्मणी पत्रे ही पक्षपाती असून ती आपल्या जातीच्या लोकांविरुद्ध लिहीत नाहीत. ती शूद्रातिशूद्रांचे खरे प्रतिनिधित्व करत नाहीत’, असा म. फुल्यांचा आक्षेप होता. ‘निबंधमाला’, ‘विविधज्ञानविस्तार’ या पत्रांनी म. फुले व सत्यशोधक समाजाच्या विचार व कार्याचा विपर्यास करून निंदामूलक, गैरसमज पसरवणारी बेताल टीका केली. त्यामुळे सत्यशोधक समाजाच्या विचाराचा प्रचार करण्यासाठी व विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी एखादे पत्र असावे, असे सत्यशोधक मंडळींना वाटू लागले. या पार्श्वभूमीवर कृष्णराव भालेकर यांनी १ जानेवारी १८७७ रोजी ‘दीनबंधु’ हे सत्यशोधक समाजाचे पहिले नियतकालिक सुरू केले. ‘दीनबंधु’पासून बहुजन समाजाच्या पत्रकारितेची परंपरा सुरू झाली.

सत्यशोधक चळवळीच्या प्रचार-प्रसाराच्या हेतूने १८७७ ते १९३० या काळात सुमारे साठ नियतकालिके निघाली. त्यामुळे बहुजन समाजाच्या ध्येयवादी, प्रबोधनपर, समाजनिष्ठ पत्रकारितेचे नवे पर्व सुरू झाले. ‘दीनबंधु’ (१८७७ - कृष्णराव भालेकर, नारारण मेघाजी लोखंडे, वासुदेवराव बिर्जे, श्रीमती तानुबाई बिर्जे), ‘सत्सार’ (१८८५, म. फुले), ‘दीनमित्र’ (१८८८ - गणपतराव पाटील), ‘राघव भूषण’ (१८८८ - गुलाबसिंह कौशल्य), ‘अंबालहरी’ (१८८९ - कृष्णराव भालेकर), ‘शेतकऱ्यांचा कैवारी’ (१८९२ - कृष्णराव भालेकर), ‘मराठा दीनबंधु’ (१९०१ - भास्करराव जाधव), ‘दीनमित्य’ (१९१०, मुकुंदराव पाटील), ‘विश्वबंधू’ (१९११ - बळवंतराव पिसाळ), ‘जागरूक’ (१९१७ - वालचंद कोठारी), ‘जागृति’ (१९१७ - भगवंतराव पाळेकर), ‘डेक्कन रयत’ (१९१८ - अण्णासाहेब लठ्ठे), ‘विजयी मराठा’ (१९१९- श्रीपतराव शिंदे), ‘सत्यप्रकाश’ (१९१९ - नारारण रामचंद्र विभूते), ‘गरिबांचा कैवारी’ (१९२० - बाबूराव रादव), ‘भगवा झेंडा’ (१९२० - दत्ताजीराव कुरणे), ‘तरुण मराठा’ (१९२० - सखाराम पांडूरंग सावंत), ‘राष्ट्रवीर’ (१९२१ - शामराव भोसले), ‘प्रबोधन’ (१९२१ - के. सी. ठाकरे), ‘संजीवन’ (१९२१ - द. भि. रणदिवे), ‘सिंध मराठा’ (१९२४ - दत्तात्रेर वासुदेव अणावकर), ‘हंटर’ (१९२५ - खंडेराव बागल), ‘मजूर’ (१९२५ - रामचंद्र लाड), ‘कर्मवीर’ (१९२५ - शि. आ. भोसले), ‘नवयुग’ (१९२६ - बाबासाहेब बोले), ‘सत्यवादी’ (१९२६ - बाळासाहेब पाटील), ‘ब्राह्मणेतर’ (१९२६ - व्यंकटराव गोडे), ‘कैवारी’ (१९२८ - दिनकरराव जवळकर) वगैरे प्रमुख नियतकालिके सुरू झाली. मराठी भाषिकांच्या सर्व प्रदेशांपर्यंत ती पोहोचत होती. ‘जागृति’ हे साप्ताहिक बडोद्याहून तर ‘सिंध मराठा’ हे कराचीहून प्रसिद्ध होत होते. येवला, जि. नाशिक (राघव भूषण), तरवडी, जि. अहमदनगर (दीनमित्र) अशा ग्रामीण भागांतून सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेवर मात करत नियतकालिके प्रसिद्ध होत होती.

सत्यशोधक चळवळीच्या नियतकालिकांतून समकालीन घटना, घडामोडी, बातम्या, वृत्तसार, अग्रलेख, वैचारिक व स्फुट लेख, कथा, कविता, कादंबरी, नाटक इत्यादी ललित वाङ्मय, सत्याशोधक-ब्राह्मणेतर परिषदांचे वृत्तांत, नेत्यांची भाषणे, समाजजागृतीचे कार्य, विरोधकांचा समाचार, बाजारभाव, जाहिराती वगैरे मजकूर प्रसिद्ध होत असे. नियतकालिकांनी सत्यशोधक चळवळीचे विचारकार्य आणि प्रबोधनपर वाङ्मय सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहचवले. शेकडो कार्यकर्त्यांपेक्षाही अधिक परिणामकारकपणे लोकजागृती व लोकमत तयार करण्याचे कार्य केले. बहुजन समाजाचे दैन्य, दारिद्रय व शोषणाची मूलगामी मीमांसा करून त्यांच्या उत्थानाचे विचार मांडले. शेतकरी-कष्टकरी वर्गाचे प्रश्न व प्राथमिक शिक्षणाचा प्रसार यावर सर्वाधिक भर दिला. त्यामुळे हे दोन्ही प्रश्न ऐरणीवर आले. स्त्रिया, अस्पृश्य यांच्या दारुण अवस्थेचे दर्शन घडवून त्यांच्या दुःखांना वाचा फोडली. धार्मिक व सामाजिक पुनर्रचनेचा आग्रह धरला. सत्यशोधक चळवळीच्या नियतकालिकांनी समाज प्रबोधनाबरोबरच सर्वसामान्य शोषित, वंचित, उपेक्षितांच्या उत्थानाच्या लढ्याचे वैचारिक नेतृत्व केले.

नियतकालिकांचे संपादक सत्यशोधक चळवळीचे निष्ठावंत व धडाडीचे कार्यकर्ते होते. बहुतेक जण जेमतेम शिक्षण झालेले होते. वृत्तपत्रीय संपादनाची कसलीही पार्श्वभूमी, अनुभव, सुविधा व भांडवल त्यांच्याजवळ नव्हते. सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेत केवळ ध्येयवाद व जिद्द या भांडवलावर त्यांनी समाजप्रबोधनासाठी नियतकालिके सुरू केली. नियतकालिकांचे कामकाज एकखांबी तंबूप्रमाणे होते. कचेरी उघडणे, झाडणे, बातम्यांचे संकलन, संपादन, अग्रलेखाचे लेखन यांपासून अंकावर वर्गणीदाराचे नाव लिहून तो पोस्टात टाकण्यापर्यंत सर्व कामे संपादक स्वतः बिनपगारी करत असत. वर्गणीदारांची अल्पसंख्या, प्रस्थापितांचा विरोध, बहुजन समाजात साक्षरतेचा व वाचन संस्कृतीचा अभाव यांमुळे नियतकालिके तोट्यात चालत होती. कर्जाचा डोंगर व आर्थिक अडचणींना तोंड देण्यासाठी संपादकांना वेळप्रसंगी सोनेनाणे, घर, जमीन, पत्नीचे दागिने वगैरे विकण्याची पाळी आली. राजर्षी शाहू महाराजांनी अनेक नियतकालिकांना आर्थिक मदत करून जीवदान दिले. समाजप्रबोधन व समाजपरिवर्तनाच्या महान ध्येयासाठी प्रचंड कष्ट व त्याग करून समर्पित भावनेने ‘दीनबंधु’, ‘दीनमित्र’, ‘जागृति’, ‘विजयी मराठा’ यांसारखी नियतकालिके चालवण्याचे वृत्तपत्रीय इतिहासातील हे अपवादात्मक उदाहरण असेल! सत्यशोधक चळवळीच्या नियतकालिकांमुळे बहुजन समाजातून तत्त्वनिष्ठ, त्यागी, निर्भीड संपादकांची व ध्येयवादी पत्यकारितेची परंपरा उदयास आली.

सत्यशोधक नियतकालिकांमधून सामाजिक, धार्मिक, शेतकरी, कामगार, स्त्रिया, अस्पृश्य, शिक्षण, राजकारण, इतिहास वगैरे विषयांवरील वैचारिक वाङ्मय प्रसिद्ध झाले आहे. सामाजिक आशयप्रधान कथा, कविता, कादंबरी, नाट्यरूप वाङ्मय हे प्रबोधनपर ललित साहित्यही प्रकाशित झाले आहे. नियतकालिकांच्यामुळे बहुजन समाजामध्ये लेखक, कवी, संशोधक निर्माण झाले. बहुजन समाजात अध्ययन, संशोधन, लेखन, वाचन, वृत्तपत्रीय संपादन ही नवी वाङ्मयीन संस्कृती उदयास आली. बहुजनांच्या वाङ्मयनिर्मितीस चालना मिळाली.

समताधिष्ठित शोषणमुक्त समाजाची उभारणी हे सत्यशोधक चळवळीचे ध्येय होते. या ध्येयाच्या अनुषंगाने समाजाच्या अंगोपांगांची विवेचक चिकित्सा करणारे वैचारिक वाङ्मय मोठ्या संख्येने प्रसिद्ध झाले आहे. ग्रामकेंद्रित जनसमूह व त्यांच्या समग्र भौतिक विकासाची मांडणी करणारे लेख, अग्रलेख, निबंध वगैरे वैचारिक वाङ्मय प्रकाशित झाले आहे. समाजातील इष्ट-अनिष्ट परंपरांची वस्तुनिष्ठ व बुद्धिवादी दृष्टिकोनातून चिकित्सा करून नवा रचनात्मक पर्याय मांडला आहे. वैचारिक वाङ्मय वाचकाला विचारप्रवृत्त करते. विचाराप्रमाणे मत तयार होते. त्याप्रमाणे भावना बनवते व भावनेप्रमाणे व्यक्ती कृतीस उद्युक्त होते. म्हणून विचारजागृती करून कृतिशील बनवणाऱ्या वैचारिक वाङ्मयावर नियतकालिकांमधून भर दिला गेला आहे.

सत्यशोधकीय नियतकालिकांमध्ये धर्म व जातीविषयक लेखन प्रसिद्ध झाले आहे. लाखो देशबांधव अज्ञानांधकारात बुडून पशूतुल्य अवस्थेला पोहोचले असताना त्यांना माणूसपण आणण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रयत्न न करता परदेशात धर्मप्रसार करणाऱ्या उंटावरच्या शहाण्यांना, ‘स्वजनद्रोही कृतघ्नता’ म्हणून वासुदेवराव बिर्जे यांनी फटकारले आहे. ‘प्रबोधन’कार केशव सीताराम ठाकरे यांनी देव व धर्मव्यवस्था नाकारली आहे. ‘जगात गुलामगिरीचे फॅड जिवंत ठेवणारे नरक म्हणजे धर्म’ असे सडेतोड प्रतिपादन करून त्यांनी धर्माच्या समूळ उच्चाटनावर भर दिला आहे. धर्मामुळे झालेला अनाचार, अत्याचार, रक्तपात व हानीचे ऐतिहासिक दाखले देऊन त्यांनी आपले मत सप्रमाण मांडले आहे. मनुष्यत्वास बाधा आणणाऱ्या देव व धर्म कल्पनेस आव्हान दिलेले आहे. शोषणाधिष्ठित, विषमतामूलक, ग्रंथप्रामाण्यवादी व ब्राह्मण्रकेंद्रित हिंदू धर्म व रूढी-परंपरा यांची परखड चिकित्सा केलेली आहे. धर्माचे प्रचलित स्वरूप नाकारून माणूसकेंद्रित, समताधिष्ठित, प्रगतिशील व बुद्धिवादी विचारांचे प्रतिपादन केलेले आहे. इहवाद व मानवी प्रतिष्ठा यांवर भर दिला आहे. मानवजातीचा विकास व सुधारणा या धर्माच्या रूढी व शृंखला तोडून झाल्या आहेत. म्हणून धर्माचे कायमचे विसर्जन केल्याशिवाय मानवी ऐक्य होणार नाही, अशी धर्मातीत मानवी समाजाची संकल्पना दिनकरराव जवळकरांनी मांडली आहे. आध्यात्मिक व पारलौकिक सुखासाठी धर्माची आवश्यकता सांगितली जाते. वास्तविक मानवी कल्पनेने रंगवलेल्या एखाद्या वस्तूविषयाच्या निदिध्यासाने त्या वस्तूचा वरचढपणा कबूल करावयास लावणे व मानवी समाज कनिष्ठ आहे अशी भावना लोकांमध्ये उत्पन्न करून मनुष्याच्या कर्तृत्वशक्तीस गौण लेखण्याचा प्रयत्न करणे हा मानवद्रोह आहे, असे द. वि. प्रधान यांनी म्हटले आहे. देव व धर्माचे उच्चाटन करून आधुनिक समाजशास्त्राच्या आधारे आदर्श समाजरचना करण्याचा क्रांतिकारी विचार त्यांनी मांडला आहे.

धर्मग्रंथ व पोथ्यापुराणांची परखड चिकित्सा करणारे लेखनही मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झालेले आहे. धार्मिक ग्रंथांचे ब्राह्मणी स्वरूप आणि त्यामधील विषमता व शोषणकारी व्यवस्था बळकट करणारा आशय यावर प्रकाश टाकला आहे. वेदासारख्या ज्या ग्रंथांचे श्रवणही ब्राह्मणेतरांना वर्ज्य होते, त्यांचे अध्ययन व परिशीलन करून वेदांच्या अपौरुषेय निर्मितीच्या सिद्धांताला आव्हान दिले आहे. पोथ्या-पुराणांचे ब्राह्मणी स्वरूप व त्यांची कालबाह्यता सिद्ध केली आहे. ग्रंथप्रामाण्य व शब्दप्रामाण्य मानण्याच्या वृत्तीतून मानसिक गुलामगिरी येते. म्हणून बुद्धिप्रामाण्यवादाचा पुरस्कार केला आहे. धर्मग्रंथांच्या दास्यत्वातून मुक्ततेसाठी अध्ययन, चिकित्सकपणा व बुद्धिवाद यांचा स्वीकार करण्याचा विचार मांडला आहे.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची भागवत धर्मावर अभ्यासपूर्ण लेखमाला ‘विजयी मराठा’मधून प्रसिद्ध झाली आहे. त्यांनी भागवत धर्माची निर्मिती, स्वरूप, भक्ती व प्रेमाची परंपरा उलगडून दाखवली आहे. प्रस्थापित वैदिक धर्माला समांतर राहून बहुजन समाजाला भक्ती व मुक्तीचा सर्वजनसुलभ मार्ग दाखवण्याचे कार्य भागवत धर्माने केले आहे. आजही देशभर विविध संप्रदायाच्या रूपाने भागवत धर्म कार्यरत असल्याचे विठ्ठल रामजी शिंदे यांनी दाखवून दिले आहे.

सत्यशोधक चळवळीच्या नियतकालिकांतील वैचारिक साहित्याचा शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. म. फुले यांनी ‘शेतकऱ्यांचा असूड’ या ग्रंथामधून शेतकऱ्यांच्या दुःख-दारिद्रयाची मूलगामी मीमांसा करून त्यांच्या उत्थानाच्या उपाययोजना सुचवल्या आहेत. कृष्णराव भालेकरांनी ‘शेतकरी मालक देशाचे’ असे महत्त्वपूर्ण विधान केले आहे. भारतीय समाजव्यवस्थेतील शेतकऱ्यांचे मध्यवर्ती स्थान स्पष्ट करून ‘शेतकऱ्यांची प्रगती हीच देशाची प्रगती’ हे वास्तव अधोरेखित केले आहे. शेतकऱ्यांच्या अधोगतीची ही परखड कारणमीमांसा केली आहे. अज्ञान, दारिद्रय, रूढी-परंपरांचा पगडा, दैववाद, देवभोळेपणा, अंधश्रद्धा, उधळपट्टीचा स्वभाव, व्यसने वगैरे दुर्गुणांमुळे शेतकऱ्यांचा अधःपात झाला आहे. सरकार, नोकरशाही, सावकार, व्यापारी व भटजी यांच्याकडून शेतकऱ्यांचे आर्थिक व मानसिक शोषण केले जाते, याचे अनेक दाखले देऊन तत्कालीन शेतकऱ्यांच्या परिस्थितीची वस्तुनिष्ठ मीमांसा केलेली आहे.

सत्यशोधकीय नियतकालिकांमधून स्त्रियांविषयी प्रगमनशील विचार व्यक्त झाले आहेत. भारतीय समाजातील स्त्रियांचे दुय्यम स्थान, धर्मग्रंथांमधील स्त्रियांसंदर्भातील तुच्छतापूर्ण लेखन, पुरुषांची मानसिकता, रूढी परंपरांचा पगडा, शिक्षणाचा अभाव वगैरेंमुळे स्त्रियांची झालेली होरपळ नियतकालिकांमधील साहित्यातून चित्रित झाली आहे.

माणसाचे माणूसपण नष्ट करून, त्याला गुलाम बनवून त्याचे अमानुष शोषण करणाऱ्या अस्पृश्यतेच्या भयंकर प्रथेस नियतकालिकांतील साहित्यामधून कडाडून विरोध केला आहे. ब्राह्मणांनी समाजावर आपले वर्चस्व व श्रेष्ठत्व कायम ठेवण्यासाठी वर्णव्यवस्था व अस्पृश्यता निर्माण केली. जगाच्या पाठीवर विटाळाचे अवडंबर माजवणारा हिंदू हा एकमेव धर्म आहे, असे वा. चि. भानु यांनी म्हटले आहे.

अस्पृश्यता निर्मूलनाचा विचार नियतकालिकांमधील साहित्यामधून जोरदारपणे मांडला आहे. अस्पृश्यता निर्मूलनावर देशाचे स्वातंत्र्य, सुधारणा, प्रगती अवलंबून आहे. धार्मिक, सामाजिक व आर्थिक विषमता कायम ठेवून मिळालेले स्वातंत्र्य टिकाऊ होणार नाही, असे मत शिवराम जानबा कांबळे यांनी ‘दीनबंधु’ मध्ये १९०७ साली व्यक्त केले होते. आज स्वतंत्र भारतातील जातीय विद्वेष, संघर्ष व विषमता पाहिल्यानंतर शिवराम जानबा कांबळे यांच्या विचाराचे द्रष्टेपण प्रत्ययास येते.

राजकीय सत्तेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी ब्राह्मणेतर पक्षाची स्थापना करण्यात आली होती. ब्राह्मणेतर पक्षाची भूमिका, उद्देश व कार्यक्रमांचा प्रचार-प्रसार नियतकालिकांनी केला. बहुजन समाजात राजकीय जाणिवांची जागृती व राजकीय विचारांची पेरणी करण्याचे कार्य नियतकालिकांतील साहित्याने केले. सत्यशोधक-ब्राह्मणेतर चळवळीच्या राजकीय पर्वाचे वैचारिक नेतृत्व नियतकालिकांनी केले आहे. आज महाराष्ट्रात बहुजन समाजाने राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधिमंडळापर्यंत जे राजकीय वर्चस्व प्राप्त केले आहे, त्याची वैचारिक पायाभरणी सत्यशोधक चळवळ व नियतकालकांनी केली आहे.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......