बाळबोध मराठी चित्रपटाची परंपरा चालू ठेवणारा चित्रपट
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
रवींद्र कुलकर्णी
  • 'माचीवरला बुधा'चं पोस्टर आणि त्यातील नायक
  • Sat , 24 June 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie माचीवरला बुधा Machiwarla Budha गो. नी. दांडेकर G. N. Dandekar सुहास पळशीकर Suhas Palshikar

‘माचीवरला बुधा’ ही गो. नी. दांडेकर यांची फक्त १०६ पानांची कादंबरी. गेली ६० वर्षं ती सतत बाजारात आहे. यावरून तिच्या लोकप्रियेतची कल्पना कोणासही यावी. राजमाची हे आपलं गाव सोडून बुधा नावाचा एक माणूस शहरात येतो आणि नंतर आयुष्याच्या उतारावर शहरातल्या निरस व यांत्रिक जीवनाला कंटाळून परत आपली जमीन कसायला माचीला परत येतो, तेथल्या निसर्गाशी एकरूप होता होता तिथंच देह ठेवतो, असं साधं कथानक या कादंबरीचं आहे. ही चित्रमय कादंबरी आहे. त्यामुळे तिच्यावर आज ना उद्या चित्रपट होणार हे अपेक्षित होतं. त्याची ओढही होती. विजयदत्त दिग्दर्शित ‘माचीवरला बुधा’ हा चित्रपट आला. तो पाहिल्यावर या कादंबरीवरून चित्रपट काढला तर पाहण्याची जी ओढ व कुतूहल होतं ते संपून गेलं.

या छोटेखानी कादंबरीतली अतिशय मनोहर चित्रं गो. नी. दांडकेरांनी शब्दांनी काढली आहेत. त्यामुळे ‘माचीवरला बुधा’ या कादंबरीवर चित्रपट बनवण्याचा मोह चित्रपटाचं तंत्र ज्ञात असणाऱ्या कुणालाही होणं स्वाभाविक आहे. दांडकेरांनी कादंबरीत वापरलेली अतिशय प्रभावी चित्रमय भाषा व त्यात आलेली निसर्गाची वर्णनं हे त्यामागचं प्रमुख कारण आहे. या कादंबरीचं पहिलं पानच अतिशय दृश्यमय आहे.

१) “मनमाड पॅसेजने कर्जत सोडलं.”- येथे वाचक कर्जतच्या प्लॅटफॉर्मवर उभा आहे.

२) “तेव्हा उकाड्यामुळे गलबलत होते. सारा डबा हाय हाय करत होता.” - येथे वाचकाने गाडी पकडली आहे व तो आता आतलं दृश्य पाहतो आहे.

३) “तो दाराशी पोचला, अन उगवतीच्या अंगाला दारातून तोंड बाहेर काढून वाकून वाकून पाहू लागला.” - या ठिकाणी वाचक जे बुधा बघत आहे ते खिडकीतून बघण्याचा प्रयत्न करत आहे.

४) “गाडीवर चढत होती. बोगद्यात शिरत होती व बाहेर पडत होती.” - येथे वाचकाला क्षणभर गाडी बाहेर काढलं आहे. त्याला गाडी बोगद्यात शिरताना व बाहेर पडताना दिसते आहे.

५) “दर दोन मिनिटांनी गाडीतले पासिंजर रात्र अन दिवस अनुभवीत होते.”- येथे वाचकाला परत डब्यात घेतलं आहे.

६) “होता होता गाडी एका मोठ्या बोगद्यातून बाहेर आली, ती मावळतीकडे. उगवतीच्या अंगाला एक भला डांगळा डोंगर पलीकडले सगळे अडवून उभा राहिला.” येथे वाचकाने एक लांब अंधार अनुभवला आहे व तो गाडी बोगद्यात शिरताना ज्या दिशेकडच्या खिडकीतून बाहेर पाहत होता, त्याच दिशेकडच्या खिडकीतून प्रकाशाच्या अपेक्षेने पाहत आहे. पण प्रकाश नंतर विरुद्ध बाजूच्या खिडकीतून आत येतो, तेव्हा वाचकाची मान १८० कोनात विरुद्ध बाजूच्या खिडकीकडे वळलेली आहे.

चित्रपटात हे काहीच येत नाही. तो एकदम राजमाचीच्या वाटेवर सुरू होतो. दांडेकरांनी ही घाई न करता सावकाश आपल्याला बुधाबरोबर चालवलं आहे. बुधा हा शहरातून माचीवर आलेला आहे, हे समजायला काही वेळ जातो व ते संवादातून समजते. चित्रपटाने शब्दशरण व्हावं हे कॅमेराचं अपयश आहे.

माचीवरला बुधा - गो. नी. दांडकेर

मृण्मयी प्रकाशन, पुणे

पाने - १२०, मूल्य - १२५ रुपये.

हे पुस्तक ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3503

……………………………………………………………………………………………

खरं तर या कादंबरीच्या केवळ चित्रमय शैलीच्या मोहात पडून त्यावर चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करणं हेच धाडसाचं आहे. बुधाच्या निसर्गाबद्दलच्या ज्या हळव्या भावना आहेत, त्या कॅमेराने दाखवणं अवघड आहे. बुधा एखाद्या दृश्याकडे बराच वेळ पाहत राहिलेला दाखवणं आणि झाडाझुडपांबरोबर सतत बोलत असलेला दाखवणं, हा एकमेव उपाय दिग्दर्शकाच्या हातात राहिलेला आहे. साधी झाडावरची छोटी आळी उचलून ठेवतानादेखील बुधा तिच्याबरोबर किंवा तिच्यामार्फत प्रेक्षकांशी बोलतो. खरं तर त्याच्या कृतीतूनच त्याच्या भावना दिसतात. पण प्रेक्षकाच्या बुद्धिमत्तेवर दिग्दर्शकाचा विश्वास नसावा. संपूर्ण चित्रपटात हळव्या भावना प्रभावीपणे दाखवण्याची हाती असलेली संधीदेखील दिग्दर्शकाने घेतली नाही. बुधाचं बरंचसं आयुष्य शहरात गेलेलं आहे. तिथल्या यंत्रवत जीवनाला कंटाळून तो माचीवर आलेला आहे. शहरातलं जीवन सोडून माचीला कायमचं जाण्याचा निर्णय घेणं हे सोपं नव्हतं. त्या निर्णयाप्रत येताना बुधाला दाखवणं कदाचित जास्त शहाणपणाचं ठरलं असतं. तसंच शहरातल्या त्याच्या निरस जीवनाचं चित्रणही कुठं नाही. हे चित्रण कादंबरीत अगदी थोडक्यात आहे. पण चित्रपटात ते विशेषत्वानं दाखवून त्याच्या पार्श्वभूमीवर परत माचीला येणं व रमणं जास्त प्रभावी ठरलं असतं.

बुधा एकटा राहत असला तरी त्यालाही त्याचा ताण येतो. मुलगा व सून यांची आठवण येते. नातवंडे नसल्याची खंत असते. हा ताणही कुठं दिसत नाही. त्याचं चित्रण नाही. कॅम्पला आलेल्या सैनिकांचं परत जाणं व रोज येणारं विमान एक दिवस येत नाही. येथून बुधाच्या आत्मविश्वासाला धक्का पोचतो. विमानाचं रोज येणं व अचानक एक दिवस न येणं, हा चित्रणाचा विषय होता, जो प्रभावीपणे आला नाही, कारण त्याचं महत्त्वच लक्षात आलं नाही.

दांडेकरांच्या शब्दांनी निर्माण केलेल्या निसर्गाच्या वर्णनावर कॅमेऱ्याची सारी भिस्त आहे. दुश्यं सुंदर घेतली आहेत, पण तशी इंटरनेटवरर बरीच पाहायला मिळतात. हातात पिवळा चारा असताना बुधा त्याला हिरवा चारा म्हणतो, कुत्र्याने वेगवेगळे आवाज काढणं त्याच्या त्यावेळच्या शारीरिक हालचालीशी जुळत नाही. भारतातले सारे पक्षी एकाच वेळी माचीवर पाहायला मिळतात अशा तांत्रिक चुकाही आहेत.

कादंबरीवर जसाच्या तसा चित्रपट बनवणं हे कादंबरीच्या आत्म्यालाच धोका निर्माण करतं, तसं काहीसं इथं घडलं आहे. कादंबरी एखाद्या स्प्रिंगबोर्डसारखी वापरून तिच्या आत्म्याचा शोध तिच्या मजकुराला वगळून दिग्दर्शकानं घ्यायला पाहिजे होता. पण घरगुती वळणाचे चित्रपट बनवणाऱ्या आपल्या चित्रपटसृष्टीकडून हे असं मागणं लईदा झालंय.

kravindrar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......