चला, शास्त्रीय संगीत ऐकू या!
कला-संस्कृती - सतार ते रॉक
केशव परांजपे
  • संगीताच्या स्वरलहरी
  • Fri , 14 October 2016
  • मनापासून ऐकतात त्यात गुंग होऊन जातात

शास्त्रीय संगीताविषयी आपल्या सर्वांना आदर जरूर आहे, पण ऐकायचं म्हणताना, नाही जमत आपल्याला. हो ना? कोणाच्या तरी आग्रहानं, केव्हा तरी आपण एखाद्या मैफिलीला जातोही, पण आपल्याला काही कळत नाही हीच आपली प्रतिक्रिया असते. अगदी खरं खरं आपण सांगत नाही, कारण शास्त्रीय संगीत खूप श्रेष्ठ कला आहे, हे आपल्याला माहिती आहे. पण… नाही ऐकलं आपण शास्त्रीय संगीत तर काय बिघडणार आहे? काहीच नाही. पण जर ऐकलं आणि आवडलं तर? एक अमूर्त आनंदाचं आकाश आपल्यासाठी खुलं होईल. खूप लोक शास्त्रीय संगीत ऐकतात, मनापासून ऐकतात, त्यात गुंग होऊन जातात, वेडे होतात… आपल्याला वेडं व्हायला नाही आवडत, न आवडू दे, पण गुंग तर होऊ या.

संगीत शास्त्रनियम म्हणजे काही भाले धरलेले चिलखती सैनिक नव्हेत आणि शास्त्रीय संगीत म्हणजे काही लष्करी संचलन नव्हे. संगीतशास्त्र म्हणजे काही तांत्रिक कर्मकांड नव्हे आणि शास्त्रीय संगीत म्हणजे काही त्यातून प्रकट होणारी जेन नव्हे. संगीतशास्त्र हे पूर्वसुरींनी शोधलेली वाट बुजून जाऊ नये म्हणून रंगवलेले दगड किंवा ठोकलेल्या खुंट्या आहेत, मागच्या पिढीने पुढच्या पिढीकडे सुपूर्द केलेल्या वारशाचे बासन आहे. काही असलं तरी आपण बाचकावं, असं त्यात काही नाही. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे शास्त्र हे संगीत शिकणाऱ्यांसाठी आहे, ऐकणाऱ्यांसाठी ते बंधनकारक नाही. श्रोत्यांना अधिक सुंदर, समृद्ध संगीत ऐकायला मिळावं म्हणून संगीताचं शास्त्र बनवलं गेलं आहे.

शास्त्रीय संगीत सुरांची भाषा बोलतं, ते शब्दांच्या भाषेत बोलत नाही. खरं तर कोणतंही बोलणं, कोणताही संवाद हा अनेक प्रकारच्या भाषांनी मिळून साकारतो. अनेक प्रकारच्या भाषा म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी, फ्रेंच असा अनेक भाषा एवढाच अर्थ नाही, तर संवादाची अनेक माध्यमं या ठिकाणी अभिप्रेत आहेत. भाषा हे त्यांपैकी एक. शब्द, वाक्यं हे भाषेचे घटक. दुसरं माध्यम देहबोली, हालचाल, हावभाव आणि तिसरं माध्यम ध्वनी, उच्चारित शब्द, त्यांच्या उच्चारणांतील स्वर, लय, लहान-मोठेपणा, तसंच टाळी, टिचकी असे अन्य ध्वनी. या सर्व माध्यमांची सरमिसळ करून आपण संवादाची लज्जत वाढवतो-संवादाला पूर्णत्व आणण्याचा प्रयत्न करतो. यांतील प्रत्येक माध्यम स्वतंत्रपणे घेऊन शतकानुशतकांपासून माणसाने ते विकसित केलं आहे. या पार्श्वभूमीवर संगीत हे माध्यम कसं दिसतं? त्याची व्याप्ती किती आहे? सहज सोपेपणानं सांगायचं तर कविता म्हणण्यापासून ते तानेपर्यंत! कविता म्हणताना संगीताचा हलकासा मुलामा आहे, तर गायक ताना घेतो त्यात कवितेचा शब्द नसतो. संगीताच्या शक्यतांच्या या विस्तीर्ण पटावर आपण आपल्या परिचयाचे विविध संगीतप्रकार मांडून पाहू शकतो.गाण्यांची धून

आपल्याला सवय आहे ती शब्दप्रधान संगीताची. असं संगीत म्हणजे शब्दांनी व्यक्त होणारा भाव गहिरा करण्यासाठी संगीताची केलेली योजना. भावगीत, चित्रपटगीत, ग़ज़ल आपण ऐकतो ते लोकसंगीत. हे सर्व गानप्रकार शब्दप्रधान संगीतात येतात. या गीतांत सहज धरता येण्यासारखा ठेका असतो आणि ठेका व स्वर यांना शब्दांवर जडवलेलं असतं. शब्द हे माध्यम आपल्या अधिक जास्त परिचयाचं, अधिक भरवशाचं. आपण आपले सर्व स्तरांवरचे व्यवहार करण्यासाठी शब्द माध्यमातूनच संवाद करतो. शब्दांचा कलात्मक, सूचक आविष्कार – कविता – तोही आपल्या ओळखीचा, सरावाचा असतो. शब्दांनी सांगितलेलं आपल्याला कळतं. खरं तर कळणं या संकल्पनेची व्याख्याच आपण जणू शब्दांतून लक्षात येणं अशी केली आहे. आणि इथंच घोटाळा आहे, कळण्याचा भ्रम (Fallacy of understanding). त्यातून कळणं ही आपल्या बौद्धक अस्तित्वाची मूलभूत गरज आहे. या सगळ्या प्रक्रियांमुळे होतं असं की, भावगीत, चित्रपटगीत……………………………………………………..आणि रागदारी आलाप गायन आपल्याला कळत नाही असं आपण ठरवून टाकतो. शब्दप्रधान संगीत ऐकताना आपल्याला शब्द, त्यांचा अर्थ आणि त्यातून सूचित झालेला भाव कळतो. या शब्दाकलनाच्या मागे स्वरताल एक सुखद संवेदना तयार करतात, ती संवेदना आपल्याला आवडते आणि आपल्याला गीत कळतं, आवडतं.

आता याच वाटेनं आपण शास्त्रीय संगीत कळून आणि आवडून घ्यायला लागलो की, आपण बाचकतो. मग आपल्याला ते कळत नाही आणि आवडतही नाही. ‘आई म्हणून कोणी आईस हाक मारी’ या शब्दांचा अर्थ आपल्याला कळतो, पण शब्दांचा अर्थ समजला म्हणजे कळणं पुरे झालं असं होत नाही. शब्दार्थ आपल्याला कारुण्याकडे घेऊन जातो. कारुण्य हे अमूर्तच आहे, पण मूर्त शब्दांच्या श्रवणानं\वाचनानं तो अमूर्त भाव मनात जागा होतो. शब्द आणि भाव यांचं हे नातं आपल्या जाणीवेत खूप घट्ट असतं. मराठी भाषा या संवाद माध्यमाची आपल्याला सवय आहे. तशीच, आज नाही तर उद्या, ऐकत राहिलं तर संगीत या संवाद माध्यमाशी म्हणजे स्वरभाषेशीसुद्धा आपली गट्टी जमू शकेल आणि आपल्याला खूप कळू लागेल.

शास्त्रीय संगीत सुरांची भाषा बोलतं म्हणजे काय? मराठी भाषा शब्दांतून आपल्याला अमूर्त भावापर्यंत नेते. संगीत त्याच्या स्वर-लय या घटकांतून आपल्याला अमूर्त भावाचा अनुभव देतं. स्वर आरोही-अवरोही करून, लांबवून-तोडून आणि काही काही करून गायक स्वराकृती तयार करतो. (स्वरावली – म्युझिकल फ्रेझ) एकामागून एक अशा स्वरावली तो गुंफत जातो. या स्वरावली कानाला तर सुखावतातच कारण स्वर सौंदर्यरूपच आहे, पण त्यापलीकडे जाऊन त्या एक भावानुभव देतात. तो घेताना आपण त्या भावानुभवाचं शब्दरूप शोधू लागलो किंवा गायकाने उच्चारलेले शब्द आणि त्यांचे अर्थ शोधू लागलो की, सांगीतिक संवाद तुटतो. अर्थ लावण्याचा, अर्थ समजून घेण्याचा कर्तरि प्रयोग संगीताचा आपल्या मनाशी जो संवाद होऊ शकतो, त्या संवादाच्या आड येतो. समजण्याचा कोणताही अट्टाहास नसणं ही भूमिका ‘समजण्याला’ फार पोषक ठरते.

संगीत हा शब्दभाषेचा अनुवाद नाही. संगीत ही स्वतंत्र, स्वयंपूर्ण भाषा आहे. शास्त्रीय संगीत या स्वतंत्र स्वयंपूर्ण आणि सुंदर भाषेत बोलू बघतं. ते त्याच भाषेत ऐकावं, शब्दभाषेत त्याचं भाषांतर करत बसण्याची उठाठेव करू नये. संगीत हा श्रवणेंद्रियांनी घेण्याचा एक अनुभव आहे. शास्त्रीय संगीत हा अनुभव अधिक प्रगाढ देतं, कारण त्यात शब्दभाषेचा वापर कमीत कमी असतो. शब्दभाषेच्या प्रक्रियेनं चित्त विचलित होण्याची शक्यता कमी  असते.

शास्त्रीय संगीत ऐकताना मनाला स्वराकृतींच्या लहरींवर सोडून द्यावं, जे कळायचं ते मनाला कळतं. त्याला लगेच ‘काय कळलं रे?’ म्हणून टोकू नये. मनाला कळू लागलं की, ते तुमच्या कानाच्या मनात सगळं काही सांगणारच असतं. शास्त्रीय संगीत ऐकताना सहज असावं! आपल्याला कळतंय का, जे कळतंय ते चूक की बरोबर असे कोणतेच ताण ठेवू नयेत. संगीत ऐकून ज्याला ते कळेल – म्हणजे अनुभवाला येईल ते – त्याच्यापुरतं खरं आणि अगदी बरोबर असतं.

शब्दांचे फ्लोट लावून संगीताच्या उथळ पाण्यात आपण खूप रमलो, आता हे फ्लोट सोडून हळूहळू खोल पाण्यात जाऊ या…चला, शास्त्रीय संगीत ऐकू या!

 

लेखक शास्त्रीय संगीताचे जाणकार आहेत.

kdparanjape@gmail.com

Post Comment

Nilesh Pashte

Sat , 15 October 2016

Test Comment. टेस्ट प्रतिक्रिया.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......