सायरस मिस्त्री : औटघटकेचा 'टाटा'!
दिवाळी २०१७ - व्यक्तिचित्रे
महेश सरलष्कर
  • सायरस मिस्त्री यांची एक मुद्रा
  • Wed , 26 October 2016
  • महेश सरलष्कर सायरस मिस्त्री mahesh.sarlashkar cyrus mistry टाटा

चार वर्षांपूर्वी सायरस मिस्त्रींनी प्रचंड विस्तार असलेल्या टाटा समूहाची धुरा सांभाळायला घेतली, तेव्हा आपण 'नवा टाटा' घडवत असल्याचं स्वप्न रतन टाटांना पडलेलं होतं. वीस वर्षांची यशस्वी कारकिर्द संपवून रतन टाटांनी मिस्त्रींच्या हाती टाटा समूह दिला. पण, त्यांचं हे स्वप्न चार वर्षांत भंग पावलेलं आहे. कुणाच्याही ध्यानीमनी नसताना रतन टाटांनी मिस्त्रींची तडकाफडकी उचलबांगडी करून टाकली. टाटा समूहात अध्यक्षालाच काढून टाकण्याची नामुष्की कधी आली नव्हती. शंभराहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या उद्योगसमूहात असं आवाक होणारं काहीतरी घडावं हे नवलंच. मिस्त्रींच्या गच्छंतीची कारणं काहीही असोत, पण टाटा समूहाच्या कॅनव्हासवर डाग पडले ते पडलेच.

वास्तविक, चार वर्षांनीही सायरस मिस्त्रींची प्रतिमा अदृश्य माणूस अशीच होती. आता कदाचित ती तशीच राहील. अगदी त्यांचे वडील पालोनजी यांच्याप्रमाणं. पालोनजी यांना ‘‘बॉम्बे हाऊस’चा फँटम’ म्हणायचे. ‘बॉम्बे हाऊस’ म्हणजे दक्षिण मुंबईतलं टाटा समूहाचं मुख्यालय. फँटम कुणाला दिसत नाही, पालोनजींचंही फँटमसारखंच होतं. ‘बॉम्बे हाऊस’मध्ये ते फारसे कुणाच्या नजरेस पडले नाहीत, त्यांचं अदृश्य अस्तित्व जाणवत राहायचं. आता त्यांच्या मुलाचं अस्तित्वही जाणवणार नाही कदाचित. कारण त्यांना आता टाटा समूहाच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी नसेल. (सायरस न्यायालयात गेले आणि न्यायालयानं सायरस यांना हे पद पुन्हा बहाल केलं तरच तशी शक्यताही आहे.)

टाटा समूहाचं नेतृत्व हा काटेरी मुकुट असतो. हा केवळ देशातील सर्वांत मोठा उद्योगसमूहच आहे असं नव्हे तर या समूहामागं मोठा इतिहास आहे. देशाच्या उद्योग क्षेत्राची पायाभरणी टाटांनी केली. राष्ट्रउभारणीत टाटा समूहाचं अतुलनीय योगदान आहे. टाटा समूहाला प्रतिष्ठा आहे. जेआरडी आणि रतन टाटांनी या समूहाला ज्या उंचीवर नेऊन ठेवलं, ती उंची कायम राखणं हे काम कठीण आहे याची जाणीव सायरस मिस्त्रींना होती. त्यामुळेच अत्यंत धीम्या गतीनं त्यांनी टाटा समूहाला वळण द्यायला सुरुवात केली होती, पण, समूहाचे पूर्वाध्यक्ष रतन टाटांना त्यांची कार्यपद्धती पसंत पडली नाही.

असं नेमकं काय घडलं की मिस्त्रींची हकालपट्टी झाली? मिस्त्रींना सन्मानपूर्वक राजीनामा देण्याची संधी देता आली असती, पण तीही नाकारण्यात आली. १५ दिवसांची नोटीस देऊन त्यांना पायउतार व्हायला सांगता आलं असतं, पण टाटा सन्सच्या संचालक मंडळानं झटपट निर्णय घेऊन मिस्त्रींची नाळच कापून काढली. संचालक मंडळातील सहा सदस्यांनी मिस्त्रींच्या विरोधात मत टाकलं. दोन जण गैरहजर राहिले. रतन टाटा निवृत्त झाले तरी समूहावरची त्यांची पकड कमी झाली नाही, खरे सत्ताधारी तेच आहेत हे आता सिद्ध झालं!

अर्थात, मिस्त्री आणि टाटांमध्ये बेबनाव झाल्याची ही पहिलीच वेळ नव्हे. जेआरडी असताना शापुरजींनी मिस्त्री घराण्याची टाटा समूहातील हिस्सेदारी पद्धतशीरपणे वाढवत नेली. तेही जेआरडींच्या न कळत. जेआरडींना हे पसंत पडलं नाही. आपल्या हातून कंपनीच काढून घेण्याचीच ही खेळी होती असं जेआरडींचं मत बनलं. टाटा समूह ताब्यात घेण्याचे प्रयत्न अन्य उद्योजकांनीही केले, पण कोणालाच त्यात यश आलं नाही. शापुरजींनाही ते जमलं नाही. जेआरडींसारख्या अफाट व्यक्तिमत्त्वाशी टक्कर घेणं हे येऱ्यागबाळ्याचं काम नव्हे हे प्रत्येकालाच कळून चुकलं. पुढं रतन टाटांच्या ताब्यात समूह आला तेव्हा सायरस यांचे वडील पालोनजी यांनी मात्र त्यांच्याशी जुळवून घेतलं. टाटा समूहावर कब्जा करण्याच्या भानगडीत ते पडले नाहीत. उलट टाटांच्या मदतीनं त्यांनी आपला बांधकाम क्षेत्रातील उद्योग भरभराटीला आणला. जेआरडींनी आणि नंतर रतन टाटांनीही मिस्त्री घराण्याला टाटा समूहवर राज्य करू दिलं नाही. सायरस यांना बाहेरचा रस्ता दाखवून टाटांनी पुन्हा एकदा इतिहासाचीच पुनरावृत्ती केली असं म्हणता येईल.

नोव्हेंबर २०११ मध्ये रतन टाटांनी सायरस मिस्त्री हे आपले उत्तराधिकारी असतील, अशी घोषणा केली तेव्हा, ‘कोण हे मिस्त्री?’, असा पहिला सवाल आला. टाटांच्या उत्तराधिकारी म्हणून ‘पेप्सी’च्या प्रमुख इंदिरा नुयीचं नाव घेतलं जात होतं. त्यांचं नाव भारतातील सामान्य लोकांनाही नवं नाही. इतरही माहीत असलेली नावं स्पर्धेत होती, त्या तुलनेत सायरस मिस्त्रींना फारसं कुणी ओळखत नव्हतं. निदान उद्योगजगताबाहेर तरी! ‘एक वर्ष सायरस मिस्त्री टाटा समूहाचे उपाध्यक्ष राहतील आणि ते आपल्याबरोबर काम करतील. त्यानंतर ते स्वतंत्रपणे टाटा समूहाचं नेतृत्व करू लागतील,’ असं रतन टाटांनी जाहीर केलं होतं.

सायरस मुळातच शांत, धीरगंभीर, संयमित. प्रसिद्धीपासून चार हात लांब राहणं हे अनुवांशिकच. सायरस यांचे आजोबा शापुरजी, वडील पालोनजी या दोघांचेही टाटा घराण्याशी आणि समूहाशी अत्यंत घनिष्ट संबंध. टाटासमूहाच्या उभारणीत दोघांचाही मोठा वाटा आहे. मात्र त्याची वाच्यता मिस्त्री घराण्यानं कधीही केली नाही. ते त्यांच्या स्वभावातच नाही. सायरस हेच बाळकडू घेत मोठे झाले. आजोबांचा-वडिलांचा हाच कित्ता सायरस गिरवताना दिसतात. त्यांना टाटा समूहाच्या प्रमुखपदावर येऊन चार वर्षं झाली, पण ना त्यांनी कधी मीडियाशी गप्पा केल्या, ना अघळपघळ बोलणं केलं, ना समभागधारकांना मोठी आमिषं दाखवली. 

 

उलट, यंदा टाटा मोटर्सच्या वार्षिक सभेत त्यांनी समभागधारकांना स्पष्ट सांगितलं की, मोठ्या लाभांशासाठी प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही. गेल्या वर्षी टाटा मोटर्सला लाभांश देता आलेला नव्हता. यंदाही त्याचं प्रमाण अत्यल्पच आहे. सध्या टाटा मोटर्सच नव्हे तर टाटा स्टील आणि इतरही टाटा कंपन्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही. टाटासमूहाला पुन्हा धष्टपुष्ट बनवण्यासाठी सायरस यांना आव्हानात्मक निर्णय घ्यावे लागत होते, पण या निर्णयांची त्यांनी कधी चर्चा केली नाही. अनेकदा कंपनीचे सीईओ वा उच्चपदस्थ जाहीर भाषणांमध्ये, सभासमारंभात तर कधी पत्रकारांकडे कंपनीच्या भविष्यातील संभाव्य वाटचालीबद्दल, धोरणांबद्दल, निर्णयांबद्दल वाच्यता करत असतात. सायरस मिस्त्री मात्र ‘बॉम्बे हाऊस’च्या बाहेर फारच कमी वेळा पाहायला मिळाले.

रतन टाटांना उत्तराधिकारी म्हणून डाऊन टू अर्थ, मितभाषी, कामात स्वतःला बुडवून घेणारी व्यक्ती हवी होती. उगाच पार्ट्या झोडणारा, पेज थ्री क्ल्चरमध्ये रमणारा, पैसे उडवणारा फ्लॅम्बॉयंट, राजकीय उठाठेव करणारा माणूस टाटा संस्कृतीत बसत नाही. या सगळ्या दुर्गुणांपासून लांब असणारे सायरस मिस्त्री टाटांच्या अपेक्षांच्या चौकटीत चपखल बसले होते. २०१० मध्ये रतन टाटांनी आपला उत्तराधिकारी निवडण्यासाठी पाच दिग्ग्जांची समिती स्थापन केली. उत्तराधिकाऱ्याच्या शोधासाठी निवडसमिती हा भारतातील घराणेशाही असणाऱ्या जुन्या उद्योगसमूहासाठी नवाच प्रकार. ‘इन्फोसिस’सारख्या नव्या दमाच्या, बदलत्या काळातील विचारांच्या, व्यक्तीपेक्षा संस्थात्मक बांधणीला व्यावसायिकतेला अधिक महत्त्व देणाऱ्या कंपन्यांनी घराणेशाहीला फाटा दिला. या पाऊलवाटेवरून मोठ्या उद्योगसमूहांनी जाणं कायमच टाळलं, पण तसं करणारे टाटा पहिलेच!

वास्तविक, टाटांच्या निवडसमितीत ४३ वर्षांचे सायरस मिस्त्रींही होते. उत्तराधिकाऱ्याची शोधमोहीम वर्षभर सुरू होती. निवडसमितीनं १५ होतकरूंच्या मुलाखती घेतल्या होत्या, पण कुणावरही एकमत होईना. रतन टाटांनी या शोधमोहिमेत हस्तक्षेप केला नाही की, कुणाचं नाव दामटलं नाही. पण त्यांना हवा होता चाळीशीतील तरुण ज्याला टाटा समूहाचं नेतृत्व करण्यासाठी किमान पंचवीस वर्षं तरी मिळतील. समूहाचं प्रमुखपद हाती आलं तेव्हा रतन टाटांची पन्नाशी ओलांडलेली होती. त्यांना वीस वर्षं मिळाली. पंचाहत्तरी पूर्ण झाल्यावर २०१२ मध्ये ते पायउतार झाले. आपल्यापेक्षा जास्त काळ नव्या प्रमुखाला मिळावा असं रतन टाटांचं म्हणणं होतं. ‘नव्या टाटा’ला टाटा संस्कृतीशी जुळवून घेता आलं पाहिजे. टाटा समूहाचा वावर ग्लोबल आहे. त्यामुळे त्याला जगाचं भान तर हवंच, पण त्याबरोबरीनं आपल्या देशाची मुळंही त्याला माहीत हवीत... ही रतन टाटांची नव्या प्रमुखाच्या निवडीसाठी अप्रत्यक्ष मार्गदर्शक तत्त्वं होती.

शोधाशोध करून निवडसमिती थकली. कारभार आटपावा आणि रतन टाटांनीच अंतिम निर्णय घ्यावा असं समितीला वाटू लागलेलं होतं. एककाळ चर्चा होत होती ती, रतन टाटांचे सावत्र भाऊ नोएल टाटांची, पण रतन टाटांनीच त्यावर काट मारल्याने नव्या प्रमुखपदाचं गाडं अडून राहिलं. समितीचं काम सुरू होतं, पण टाटांची नजर सायरस मिस्त्रींवर होती. समितीच्या सदस्यांनाही सायरस पसंत होते. आपलं नाव चर्चेत आल्याक्षणी सायरस समितीतून बाहेर पडले. टाटांचा विरोध नसल्याचं स्पष्ट झाल्यावर समितीनं एकमतानं सायरस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.

सायरस मिस्त्री होते अवघे ४३ वर्षांचे. त्यांना पुढची ३० वर्षं प्रमुखपद सांभाळता येणार होतं. त्यांना टाटा समूह आत-बाहेरून माहिती होता. ते २००४ पासून म्हणजे वयाच्या ३८ व्या वर्षीच टाटा सन्सचे (टाटा समूहाची मूळ कंपनी) संचालक सदस्य बनले होते. मिस्त्री घराणं हे टाटा समूहाचे सर्वांत मोठे वैयक्तिक गुंतवणूकदार आहे. टाटा सन्समध्ये त्यांची तब्बल १८ टक्के हिस्सेदारी आहे. टाटा समूहाच्या नियमानुसार ७५ व्या वर्षी पालोनजींनी निवृत्त होताना आपलं संचालकपद सायरस मिस्त्री यांच्याकडे, आपल्या सर्वांत धाकट्या मुलाकडे सुपूर्त केलं होतं. त्यामुळे सायरस पाच वर्षं टाटा समूहाच्या कारभारात थेट सहभागी झालेले होते. त्यांना समूहातील काही कंपन्यांच्या संचालकपदीही नियुक्त करण्यात आलेलं होतं.

सायरस मिस्त्रींचा फायनान्सचा अभ्यास दांडगा आहे. रतन टाटांनी ‘कोरस’ ही युरोपातील जायंट पोलाद कंपनी (टाटा स्टीलपेक्षा आर्थिकदृष्ट्या चौपट मोठी) विकत घेतली. ‘जग्वार लँड रोव्हर’ ही ब्रिटिश कार कंपनीही टाटासमूहात आली.  टाटांसाठी हे दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्प होते. त्यासाठी आर्थिक व्यवहारांचं गणित मांडण्याचं जटील काम सायरस मिस्त्रींनी पडद्याआडून यशस्वीरीत्या पार पाडलं होतं. टाटा समूहाचं प्रमुखपद मिळण्यात रतन टाटांचं अनुकूल मत सायरस मिस्त्रींना फायदेशीर ठरलं. अर्थात, मोठी कंपनी चालवण्यासाठी फक्त वित्तीय ज्ञान वा निव्वळ बिझनेसचं अंग असून भागत नाही, त्यासाठी जिगर लागते. दांडगा आवाका लागतो. प्रचंड संयम लागतो. तासन् तास खेळपट्टीवर उभं राहून बॅटिंग करण्याची मानसिक क्षमता आणि धैर्य लागतं. या सगळ्या मोजपट्टींवर रतन टाटांनी स्वतःला सिद्ध केलं होतं. सायरसही त्यांचीच प्रतिकृती असल्याचं मानलं जात होतं. 

दीडशे वर्षांच्या वाटचालीत टाटा समूहाची धुरा सांभाळली ती फक्त पाच जणांनी. सायरस मिस्त्री सहावे. ते दुसरे बिगर टाटा. पहिले होते नौरोजी सकलातवाला. ते टाटा नव्हते. टाटांचे नातेवाईक होते. सायरसही टाटा नाहीत. मिस्त्री आणि टाटा नातेसंबंधात बांधले गेलेले आहेत. सायरस यांची बहीण आलू ही नोएल टाटांची पत्नी. टाटा आणि मिस्त्री दोन्ही घराणी मात्र पारशी. सायरस यांचा जन्म मुंबईत झाला, पण नागरिकत्व आयरिश. पालोनजींची पत्नी आयरिश असल्यानं सायरस यांचा पासपोर्टही आयरिशच आहे. भारत सरकार दुहेरी नागरिकत्व देत नसल्यानं सायरस आयरिश, पण ते मोठे झाले भारतातच. त्यांचं शाळा-कॉलेजचं शिक्षण मुंबईत झालं. पुढं उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. तिथं त्यांनी सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर नामांकित ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मधून व्यवस्थापन अभ्यासक्रमातील पदवी घेतली. मुलगा भारतात परतल्यावर पालोनजींनी त्याच्याकडे ‘शापुरजी पालोनजी ग्रूप’च्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी सोपवली.

टाटा मोटर्सचे प्रवेशद्वार

ही बांधकाम क्षेत्रातली कंपनी सायरस यांचे आजोबा शापुरजी यांनी थाटली. त्यांनीच टाटा समूहातील मिस्त्रींची हिस्सेदारी वाढवत नेली. शापुरजी आणि जेआरडींचं फारसं जमलं नसलं तरी, दोघांनीही एकमेकांना कधी बाधा आणली नाही. जेआरडींचं जबरदस्त व्यक्तिमत्त्व हे त्यामागचं प्रमुख कारण होतं. पालोनजींकडे कंपनीची सूत्रं आल्यावर त्यांनी जेआरडी आणि नंतर रतन टाटांशी जुळवून घेतलं आणि दोन्ही घराण्याचे संबंध दृढ केले. टाटांशी असलेल्या संबंधांमुळं मिस्त्रींच्या व्यवसायाचीही भरभराट झाली. त्यांनी अनेक संपन्न कुटुंबांसाठी संपन्न घरं उभी केली. ब्रेबर्न स्टेडियम, मुंबई सेंट्रल स्टेशन, ब्रिजकँडी हॉस्पिटल, स्टेट बँकेचं मुख्यालय, वर्ल्ड ट्रेड सेंटर अशा दक्षिण मुंबईतील अनेक मोठ्या-प्रसिद्ध इमारती ‘शापुरजी पालोनजी ग्रूप’नं बांधलेल्या आहेत. मिस्त्री हे देशातील सर्वांत मोठ्या बांधकाम व्यवसायिकांमध्ये मोडतात. पालोनजी हे देशातील मोजक्या सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. सायरस मिस्त्रींची पार्श्वभूमी सगळ्याच अर्थानं श्रीमंत आहे!

आजोबांनी आणि वडिलांनी नावारूपाला आणलेल्या कंपनीची सूत्रं हाती आल्यावर सायरस मिस्त्रींनी तिचा अब्जावधींचा विस्तार केला. भारतातच नव्हे तर अरब देशात कच्च्या तेलावर गब्बर झालेल्या शेखमंडळींचे आलिशान महाल ‘शापुरजी पालोनजी ग्रूप’नं बांधून दिले. भारतातील सर्वांत उंच निवासी इमारत बांधण्याचं श्रेय त्यांच्याकडेच. सर्वाधिक लांबीचा रेल्वे पूल बांधला तो याच कंपनीनं. परवडणाऱ्या घरांचा प्रयोगही त्यांनी यशस्वी करून दाखवला. कंपनीनं नवनव्या भराऱ्या घेतल्या, त्या सायरस यांच्या धाडसी धोरणांमुळेच. कंपनी चालवण्याचं, तिचा आवाका वाढवण्याचं कसब सायरस यांनी सिद्ध केलं. त्यामुळं सायरस टाटा समूह सांभाळून शकतील हा रतन टाटांचा विश्वास सार्थ होता. पालोनजींनी वयाच्या अटीमुळं टाटा सन्सचं संचालकपद सायरस यांच्याकडे दिलं. मोठा मुलगा, शापुरजीकडे आपल्या संपूर्ण बांधकाम कंपनीची जबाबदारी सोपवली. सायरस यांनीही व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा दिला आणि टाटा समूहाशी स्वतःला बांधून घेतलं. गेल्या दहा वर्षांत ‘बॉम्बे हाऊस’ हे त्याचं दुसरं घर बनून गेलं होतं.

कर्तृत्ववान असूनही सायरस यांच्या वागण्या-बोलण्यात कोणताही बडेजाव नसतो. त्यांना आपलं खासगी आयुष्य हे खासगीच ठेवायचं असतं. त्यांची पत्नी रोहिका म्हणजे नामांकित न्यायाधीश एम. सी. छागला यांची नात आणि विख्यात विधिज्ञ इक्बाल छागला यांची मुलगी. या जोडप्याला दोन अपत्यं आहेत. पूर्वाध्यक्ष रतन टाटांप्रमाणे सायरस यांनाही कारचा शौक आहे. त्यातही एसयूव्ही गाड्यांना त्यांची अधिक पसंती आहे. भारतीय मध्यमवर्गाचा विचार करून रतन टाटांनी नॅनो आणली, आता त्यांच्यासारखीच कारची आवड असणारे सायरस आपली ही आवड व्यावसायिक पातळीवर पुढे नेतील, अशी अपेक्षा होती.

कुणालाही युरोपमध्ये राहायला, भटकायला आवडतंच. सायरस यांचंही युरोपलाच प्राधान्य आहे. लंडन, दुबईत त्यांची घरं आहेत, पण त्यांचं कायमस्वरूपी वास्तव्य असतं ते मुंबईत वाळकेश्वरमध्ये असलेल्या बंगल्यात. माथेरान, अलिबागच्या घरांमध्येही त्यांना वेळ घालवायला आवडतं. पुण्यात दहा हजार चौ. फुटांच्या प्रचंड बंगल्यातही ते कधी कधी असतात. त्यांची आणखी एक आवड म्हणजे घोडेस्वारी. पुण्यात मांजरी भागात त्यांचं दोनशे एकरांचं स्टडफार्म आहे. सभासमारंभात कधी न दिसणारे, न रमणारे सायरस मिस्त्री या स्टडफार्मवर अनेकदा पाहायला मिळतात. मांजरीतलं त्यांचं हे स्टडफार्म देशातील सर्वांत जुनं स्टडफार्म आहे. देशातील सर्वांत मोठ्या उद्योगसमूहाच्या कप्तानपदाची जबाबदारी सांभाळतानाही कुटुंबवत्सल असणारे सायरस आपले छंदही तितक्याच खासगीपणे जोपासतात.

रतन टाटांप्रमाणेच अत्यंत खासगी आयुष्य जगणाऱ्या सायरस मिस्त्रींना टाटा समूहात हनिमुन पीरिअड मिळालाच नाही. टाटा समूहाची धुरा सांभाळायला लागल्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांचा परीक्षेचा काळ सुरू झालेला होता. आपल्या मानेवर अपेक्षांचं केवढं मोठं ओझं आहे, हे सायरस मिस्त्रींना माहीत नव्हतं असं नाही. मात्र काळच मोठा कठीण होता. रतन टाटांनी सायरस यांच्या हातात ठिकठिकाणी जखमी झालेल्या पेशंटचा वारसा दिला होता. हा पेशंट त्यांच्या हातात आला तोच ओल्या जखमा घेऊन. त्यामुळे तो धावण्याची शक्यता सोडाच, त्याचं चालणंही मंदावलं होतं. या जखमांवर निव्वळ मलम लावण्यापेक्षा काही ठिकाणी शस्त्रक्रिया करणंच अधिक उपयुक्त असल्याचं मिस्त्रींचं मत होतं. त्यामुळं मिस्त्रींनी कठोर निर्णय घ्यायला सुरूवात केली होती. तसे प्रयत्न त्यांनी गेल्या वर्षभरात जाणीवपूर्वक केले होते. टाटा समूह नावाचा हा पेशंट बरा होऊन मॅरॅथॉनमध्ये धावू लागल्यानंतरच त्याला शंभर मीटरच्या वेगवान शर्यतीमध्ये उतरवावं लागणार होतं, पण रतन टाटांना मिस्त्रींच्या शस्त्रक्रियाची पद्धत पसंत पडली नाही. शस्त्रक्रियेच्या पर्यायावरच टाटांचा आक्षेप आहे.

टाटा समूह १०० हून अधिक कंपन्या चालवतो. या कंपन्या एकूण ७ लाख १८ हजार कोटी रुपयांची (१०८ अब्ज डॉलर) उलाढाल करतात. त्यापैकी सुमारे ३० कंपन्या नोंदणीकृत आहेत. टाटा समूहाचं एकूण बाजारमूल्य ८ लाख ७३ हजार कोटी रुपये (१३० अब्ज डॉलर) आहे. त्यापैकी ७५ टक्के वाटा एकट्या टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस) या आयटी क्षेत्रातील कंपनीचा आहे. टाटांच्या एकूण उलाढालीपैकी निम्मी विदेशातून होते. त्यातही टीसीएसचाच वाटा सर्वाधिक आहे. ही एकमेव कंपनी टाटा समूहाला सध्या आर्थिकदृष्ट्या तारून नेताना दिसते. काही प्रमाणात ‘जग्वार लँड रोव्हर’ ही ब्रिटिश कारकंपनीही हातभार लावताना दिसते. टाटा समूहाच्या भात्यातल्या सुमारे दोन डझन कंपन्या प्रमुख मानल्या जातात. त्यातही टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, टाटा टेलिसर्व्हिस, इंडियन हॉटेल्स (ताजची साखळी), टीसीएस या कंपन्या अधिक महत्त्वाच्या. त्यांचा कारभार भारतासह सहा खंडांतील देशांमध्ये चालतो, पण टीसीएस वगळता या बहुतांश कंपन्या प्रचंड तोट्यात आहेत.

टाटा समूहाच्या विस्तारवादाला सायरस यांनी हळूहळू मर्यादा घालायला सुरुवात केली होती. ती अपरिहार्यताच होती. सायरस यांनी टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा केमिकल्स या कंपन्यांच्या आफ्रिका खंडातील काही फॅक्टऱ्यांचा कारभार कमी केला. टाटा केमिकल्सचा युरिया उत्पादनाचा बिझनेसही विकण्यात आला. इंडियन हॉटेल्सचा अमेरिकेतील ओरिएंट एक्स्प्रेस हॉटेल्स विकत घेण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पही बासनात गुंडाळून ठेवण्यात आला. तोट्यातील कंपन्या विकून कर्जाचं ओझं कमी करण्यावर सायरस यांचा भर होता.

रतन टाटासारखंच गाड्यांचं प्रेम सायरस मिस्त्रींनाही आहे

रतन टाटांच्या काळात हातपाय पसरवत टाटा समूह ग्लोबल झाला. या धोरणाअंतर्गत टाटा समूहानं ‘कोरस’ ही युरोपमधील स्टील कंपनी ताब्यात घेतली, पण २००८ नंतर जगभर मंदी आली. युरोझोन आर्थिक संकटात सापडला. स्टीलला मागणी कमी झाली. स्टील उद्योगाला चीनच्या स्वस्त स्टीलशी स्पर्धा करावी लागली. अशा असंख्य अडचणीत टाटांची युरोपातील स्टील कंपनी अडकून पडली. मलमपट्टी करूनही ती चालवणं अशक्य झालं नसल्याचं मिस्त्रींचं मत होतं. त्यांनी ही कंपनी विकून टाकण्याचा निर्णय घेतला. टाटा समूहाच्या प्रमुखपदी आल्यापासून घेतलेला सायरस यांचा हा सर्वांत महत्त्वाचा निर्णय होता. एका अर्थानं रतन टाटांचं स्वप्नच त्यांनी विकायला काढलं.

या निर्णयामुळं पहिल्यांदा रतन टाटा आणि मिस्त्री यांच्यात वादाची ठिगणी पडल्याचं मानलं जातं. कोरसच्या विकण्यावरून युरोपात राजकीय वाद निर्माण झाला. काही हजार कामगारांच्या नोकरीवर गदा येणार होती. ब्रिटिशातील राजकीय नेते, कामगार नेते टाटा समूहाच्या विरोधात बोलू लागले होते. टाटा नेहमीच स्वतःच्या प्रतिमेला जपतात. समूहावर कोणीही शिंतोडे उडवू नये याविषयी टाटा सदैव दक्ष असतात. ही दक्षता मिस्त्रींनी दाखवली नसल्याचं रतन टाटांचं मत झालं. कोरस विकत घेतल्यानंतर रतन टाटांनी कामगार कपात न करता ही कंपनी सुरू ठेवली. कंपनीच्या सीईओला निर्णयाचे अधिकार देण्यात आले होते. कोरस ही गळ्यातलं लोढणं असलं तरी ते तसंच वागवलं गेलं. ते काढून टाकण्याचं काम कुणालाही न दुखावता व्हायला हवं होतं, पण कोरसच्या प्रश्नाची हाताळणी रतन टाटांच्या अपेक्षेप्रमाणं झाली नाही असं आता दिसतंय.

रतन टाटांच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात जगभर तेजी होती. कंपन्या अधिक ग्लोबल करण्याचा, नव्या कंपन्या ताब्यात घेण्याचा, गुंतवणूक वाढण्याचा तो काळ होता. काळानुसार रतन टाटांनी निर्णय घेतले. आता काळ बदलला आहे. मंदी सतावत आहे. अशा वेळी सुस्ती काढून कंपन्यांना चपळ बनवण्याशिवाय पर्याय नाही. ज्या कंपन्या आधाराविना चालू शकणार नाहीत, त्यांना फाटा देण्याशिवाय गत्यंतर उरलेलं नाही, असं मिस्त्रींचं मत बनलं. समूहातील प्रत्येक कंपनी आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावी, यांबद्दल सायरस मिस्त्री आग्रही होते. तोट्यातील कंपन्यांना टाटा सन्सकडून आर्थिक रसद पुरवली जात होती, पण इथून पुढं संबंधित कंपन्यांनी नफा कमावून भांडवल गुंतवणूक केली पाहिजे आणि कंपनीचा विस्तार-विकास केला पाहिजे असं सायरस मिस्त्रींचं सांगणं होतं. त्यांनी सहा सदस्यांच्या समूह कार्यकारी समितीची नियुक्ती केली. या समितीनं ‘व्हिजन २०२५’ नावाचा आगामी दिशा-धोरणांचा आराखडा तयार केला. २०२५ पर्यंत टाटा समूहाचा समावेश जगातील पहिल्या २५ नामांकित ब्रँडमध्ये झाला पाहिजे आणि हा समूह बाजारमूल्यानुसार पहिल्या २५ ग्लोबल कंपन्यामध्ये असायला हवा, असं दुहेरी उद्दिष्ट या आराखड्यात मांडण्यात आलं आहे.

पण, हाच जुन्या आणि नव्या पिढीतला फरक होता. जेआरडींच्याही आधीपासून टाटा समूहाची ओळख निव्वळ एक उद्योगसमूह अशी कधीही नव्हती. रिलायन्स, अदाणी वगैरे समूह हे फक्त उद्योग समूह आहेत. टाटा समूहाची ओळख उद्योगांपलीकडे आहे. कुठल्याही कंपनीनं नफा कमावयचाच असतो, पण सचोटीनं काम करून, सामाजिक बांधीलकी न सोडता उद्योगानं स्वतःला विस्तारत नेलं पाहिजे, हे तत्त्व टाटांमध्ये भिनलेलं आहे. म्हणूनच त्यांनी राजकारणापेक्षाही समाजकारणाची कास धरली. बिर्ला राजकारणात उतरले. जेआरडींनी आणि नंतर रतन टाटांनी मात्र राजकारणाचा मार्ग नेहमीच टाळला. टाटांनी अनेक धर्मादाय संस्था सुरू केल्या. त्या अजूनही चांगल्याप्रकारे कार्यरत आहेत. या सगळ्याच संस्थांचे रतन टाटा अध्यक्ष आहेत आणि या संस्थांची म्हणजेच ट्रस्टची सुमारे ६५ टक्के हिस्सेदारी टाटा समूहाची मूळ कंपनी टाटा सन्समध्ये आहे. या सगळ्या ट्रस्टसहित टाटा समूह ओळखला जातो. त्यामुळे निव्वळ नफ्याचं गणित मांडणं टाटा समूहासाठी शक्यच नसतं. पण, दोन्ही पिढीतल्या विचारांमध्ये टाटा समूह कसा चालवायचा याबद्दल फरक पडलेला असावा असा तर्क काढायला जागा आहे. रतन टाटांनी मिस्त्रींबरोबरच त्यांच्या समूह कार्यकारी समितीचीही सांगता करून टाकलेली आहे.

रतन टाटांनी सायरस यांना अध्यक्षपदावरून हटवणं योग्य की अयोग्य, त्याचे देशात आणि देशाबाहेर उद्योगसमूह म्हणून काय परिणाम होतील, यावर चर्चा आणि मतमतांतरे होत राहतील. पण गेली चार वर्षं सायरस यांच्या ताब्यात टाटा समूहाची खरी सत्ता होती का? वास्तविक ते फक्त समूहाचे अध्यक्ष होते. खरी सत्ता रतन टाटांकडेच होती. टाटा समूह टाटा सन्सकडून चालवला जातो. या टाटा सन्समध्ये सर्वाधिक हिस्सेदारी दिनशॉ ट्रस्ट आणि टाटा ट्रस्टची आहे. या ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटाच आहेत. पूर्वीही जेआरडी ट्रस्टचे अध्यक्ष होते आणि टाटा समूहाचेही. हीच प्रक्रिया रतन टाटांच्याही काळात सुरू होती. रतन टाटा दोन्हीचेही अध्यक्ष होते. त्यामुळे टाटा समूहावर आणि टाटा सन्सवरही टाटांचंच राज्य होतं. सायरस यांच्याकडे समूहाची सूत्रं दिल्यानं टाटा सन्सचं अध्यक्षपद सायरस यांच्याकडं गेलं आणि ट्रस्ट रतन टाटांकडेच राहिला. ट्रस्ट ज्याच्या ताब्यात त्याच्या हातात टाटा सन्सच्या नाड्या हे समीकरण आहे. तोच टाटा सन्सचा खरा सूत्रधार. सायरस यांच्या नियुक्तीनं टाटा सन्सचे आणि पर्यायाने टाटा समूहाचेही दोन सूत्रधार निर्माण झाले.

रतन टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाले तरी टाटा ट्रस्टचा आणि पर्यायाने टाटा सन्सचाही ताबा त्यांनी स्वतःकडेच ठेवला. त्यामुळे टाटा समूहाच्या निर्णप्रक्रियेत त्यांचा अप्रत्यक्ष हस्तक्षेप राहिलाच. टाटा समूहाची काम करण्याची शिस्त, धोरणांवर रतन टाटांचाच पगडा कायम राहिला. टाटांच्या नावाला थोडाही धक्का लागता कामा नये यावर रतन टाटांचा कटाक्ष असतो. सायरस यांनी परंपरेची चौकट मोडण्याचा प्रयत्न केल्याचं रतन टाटांचं मत बनलं. रतन टाटांच्या विश्वासातील संचालक मंडळानं सायरस मिस्त्रींची हकालपट्टी केली. एका म्यानात दोन तलवारी बसू शकत नाहीत, तसा प्रयत्न केला तर काय होतं, हे प्रत्येकालाच माहिती आहे. टाटा समूहाचं नेमकं हेच झालं. सायरस मिस्त्रींच्या गच्छंती मागची खरी मेख हीच आहे!

टाटा समूहात जेआरडीचं स्थान ध्रूव ताऱ्यासारखं अढळ होतं. त्याकाळी टाटा समूहाची वीण विशविशीत होती. प्रत्येक कंपनी म्हणजे स्वतंत्र सवतासुभा होता. समूहातल्या कंपन्याच एकमेकांविरोधात कुरघोडी करत होत्या, पण तरीही जेआरडींमुळे त्या टाटा समूहातच बांधलेल्या राहिल्या. जेआरडींचा ऑराच तसा होता. त्यांच्याशिवाय टाटा समूहाची कल्पनाच करता येत नव्हती, पण आपण जेआरडी नव्हे, हे रतन टाटांना नीट माहीत होतं. जेआरडींकडून समूहाची सूत्रं घेतल्यानंतर विशविशीतपणा समूहाला मारक ठरू शकतो हे रतन टाटांनी ओळखलं. त्यांनी टाटा सन्सची हिस्सेदारी समूहातील कंपन्यांमध्ये वाढवत नेली आणि फुटिरतेची बिजं नष्ट केली. टाटा समूहाची वीण घट्ट केली. कंपन्यांना दिशा दिली. विस्तार केला. नवे प्रकल्प राबवले. नवी उत्पादनं बाजारात आणली. टाटा समूहाला ग्लोबल बनवलं. वीस वर्षांत रतन टाटांचाही ऑरा निर्माण झाला. कदाचित सायरस मिस्त्रींनाही स्वतःचा ऑरा निर्माण करता आला असता, पण त्यांच्या अकाली उचलबांगडीमुळे ही संधी आता त्यांच्या हातून निसटली आहे.

 

लेखक मुक्त पत्रकार आहेत.

mahesh.sarlashkar@gmail.com

टाटा उद्योग समूहावरील पुस्तके खरेदी करण्यासाठी खालील लिंक्स वर क्लिक करा.

टाटायन, लेखक : गिरीश कुबेर

टाटा : एका कॉर्पोरेट ब्रँडची उत्क्रांती, लेखक : मॉर्गन विटझेल