आहे हिंमत निसर्गाकडे जाण्याची?
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
महेंद्र तेरेदेसाई
  • ‘कॅप्टन फँटॅस्टिक’चं पोस्टर’
  • Sat , 29 April 2017
  • कला-संस्कृती इंग्रजी सिनेमा English movie कॅप्टन फँटॅस्टिक Captain Fantastic मॅट रॉस Matt Ross महेंद्र तेरेदेसाई Mahendra Teredesai

फक्त मनुष्यप्राण्यालाच दुसऱ्या प्राण्याचं दूध पाजून वाढवलं जातं. इथूनच त्याचं परावलंबित्व सुरू होतं. आपल्या नाळेपासून तोडत समाज त्याचा ताबा घेतो. समाजमान्य प्रथेप्रमाणे त्याला वाढवलं जातं. यात तो ज्या आईच्या उदरात जन्मला तिचा धर्म आणि जात याचा सर्वाधिक प्रभाव राहतो. इतर जाती-धर्माबद्दल त्याला निव्वळ अज्ञानीच ठेवलं जात नाही तर त्याचबरोबर त्याला आपल्या जाती-धर्माबद्दल अस्मिताही (Superiority Complex) दिली जाते.  आणि असे अनेक complexes दिले जातात.

कालांतरानं जाणता (?) झाल्यावर मग तो ते (Complexes) स्वतःहून घेऊ लागतो. इथं त्याचे पालक भरून पावतात आणि म्हणतात, “चला, पोर मार्गाला लागलं!” आता त्यांनी आयुष्यात फक्त त्या मार्गानं चालायचं असतं... कुठलाही विचार न करता. त्या मार्गावर येणाऱ्या समस्या वा अडचणींची उत्तरं गाईडमध्ये आधीच तयार असतात. ते गाईड फक्त वापरायचं.

पदोपदी त्याला सावध करणाऱ्या यंत्रणाही तयार केलेल्या असतात. “... This step of yours is subject to risk. So please read of relevant documents….” इतकंच नाही तर कुठल्या दिशेनं जायचं याबाबतही त्याला इशारे दिले जातात... “दरवाजे बायी ओर खुलेंगे....” “उतरते समय गाडी के पायदान...” हे इशारे मेंदूत फीड केल्याप्रमाणे माणूस वागत राहतो. गंमत म्हणून कधीतरी रेल्वे स्टेशनकडे येणाऱ्या लोंढ्याकडे तोंड करून उभे रहा आणि लोंढ्यातल्या प्रत्येक माणसाचा चेहरा न्याहाळा. सगळ्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला एकच भाव दिसेल- तो रोबोट झालेला. या लोंढ्यातला एक चेहरा तुमचाही असतो याची जाणीव जेव्हा तुम्हाला होते तेव्हा तुम्ही हादरता.   

काल मी Matt Rossचा CAPTAIN FANTASTIC पाहून असाच हादरलो. सिनेमा पाहून आपण आपल्या मुलाचं संगोपन करतो म्हणजे नेमकं काय करतो, हा मला प्रश्न पडला.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

प्रगत मानवी संस्कारांनी निराश झालेलं एक अमेरिकन जोडपं आपल्या सहा मुलांना घेऊन एका घनदाट जंगलात वस्तीला जातं. तिथं आपल्या मुलांना ते वाढवू लागतं. सगळ्या सिव्हिलाइज्ड कल्चरपासून दूर. यात त्यांना साथ असते नोम चोम्स्की आणि बुद्धाची. त्यात कधीतरी त्यातली आई एका दुर्धर आजारानं ग्रासली जाते आणि मुलांना वाढवण्याची जबाबदारी बापावर पडते. ती तो उत्तमरीत्या पार पाडत असतो. पुढे ती आई त्या आजारातच स्वतःला संपवते. ख्रिश्चन म्हणून जन्माला आलेली ही आई आपल्या मृत्युपत्रात लिहून ठेवते की, ती बुद्धाला मानत असल्याने तिचं दफन करू नये तर दहन करावं. तिची अस्थी कुठल्याही पवित्र नदीत न वाहता एखाद्या कमोडमध्ये टाकून फ्लश करावी. अर्थात  तिचा ख्रिश्चन बाप याला तयार होत नाही. पण आपल्या बायको आणि आईची अंतिम इच्छा पूर्ण करायचं मिशन बाप-लेक हाती घेतात. या प्रवासात ती मुलं, त्यांच्यावर झालेले आणि होत असलेले संस्कार तुम्हाला आकळत जातात. आणि या civilization च्या चक्रामुळे आपण किती साध्यासाध्या आणि सुंदर भावनांना मुकलो आहोत, याची आपल्याला जाणीव होत जाते.

एकच उदाहरण सांगतो. या प्रवासात असताना त्या कुटुंबातील तरुणाच्या सान्निध्यात एक मुलगी येते. आणि तो आयुष्यातलं पहिलं चुंबन अनुभवतो. त्या आनंदाचं वर्णन तो ज्या उत्कटतेनं करतो, ते ऐकून ती मुलगी आणि तिची आई चकित होतात. आणि आपण मात्र आठवू पाहतो आपल्या आयुष्यातलं पाहिलं चुंबन.

‘निसर्गाकडे चला..... निसर्गाकडे चला....’  अशी हाक देण्याची हल्ली फॅशनच आलीय. कारण त्याचा नेमका किंवा खोलवर जाणारा अर्थ आपल्याला किती माहीत असतो? आपल्यासाठी तो निव्वळ गड-किल्ल्यावर जाणं... ट्रेकिंग... काम्पिंग करणं... झाडं लावणं\जगवणं...  इतपतच मर्यादित असतो. खरं तर निसर्गाकडे जाणं म्हणजे सगळे समाजमान्य (Codified) संस्कार, रूढी, परंपरांपासून फारकत घेणं, माणूस म्हणून जगत पंचमहाभूतांशी नाळ जोडण्याचा प्रयास करणं हे असतं, हे CAPTAIN FANTASTIC पाहून कळतं. आणि मग आपल्याला प्रश्न पडतो, आहे हिंमत निसर्गाकडे जाण्याची?

.................................................................................................................................................................

लेखक महेंद्र तेरेदेसाई चित्रपट व नाट्यदिग्दर्शक आणि लेखक आहेत.

mahendrateredesai@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......