यशवंतराव श्रीपाद रास्ते : ग्रंथालय क्षेत्रातील यशवंत, कीर्तिवंत व्यक्तिमत्त्व
संकीर्ण - श्रद्धांजली
सतीश कृष्णा सूर्यवंशी
  • यशवंतराव श्रीपाद रास्ते
  • Tue , 24 June 2025
  • संकीर्ण श्रद्धांजली यशवंत रास्ते Yashawant Raste

सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयाचे माजी ग्रंथपाल यशवंत रास्ते यांचं नुकतंच निधन झालं. ग्रंथपाल रास्ते अतिशय प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि ग्रंथपाल या पदाच्या अर्थाचा विस्तार करणारे म्हणून ओळखले जात. त्यांच्याविषयीचा त्यांच्या विद्यार्थ्याचा हा एक लेख….

.................................................................................................................................................................

जवळपास २२ वर्षांपूर्वीची ही घटना मला अजूनही आठवते. मी सांगलीतील गणपतराव आरवाडे वाणिज्य महाविद्यालय येथे ग्रंथालय आणि माहितीशास्त्राच्या शिक्षणक्रमास प्रवेश घेतला. ‘ग्रंथालय वर्गीकरण : तात्त्विक’ या विषयाचा समावेश य.च. म. मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमात होता. याच विषयाचे शिक्षक एके दिवशी महाविद्यालयाच्या पहिल्या मजल्यावरून पायऱ्या उतरून खाली येत असताना मी विचारणा केली- ‘या शिक्षणक्रमासाठी अनिवार्य असणाऱ्या सूची प्रकल्पासाठी मार्गदर्शन करणारे तुम्हीच का सर?’ यावर सरांनी अगदी मृदुभाषेत अन् स्मितहास्य करत सांगितले- ‘हो.... तो मीच’. मग मला न राहवून त्यांचे पूर्ण नाव जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली. त्यांना पुन्हा प्रश्न केला, ‘सर, तुमचे पूर्ण नाव काय? आणि कोणत्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयात कार्यरत आहात?’ यावर पुन्हा सुहास्य वदनाने त्यांनी सांगितले, ‘मी यशवंत श्रीपाद रास्ते, विलिंग्डन महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून आहे.’

त्यानंतर सरांनी माझी पूर्ण चौकशी केली आणि सांगितले की, ‘सूची प्रकल्प’ करणे तितके सोपे काम नाही. तुम्हाला ते जमणार का? (वयाने लहान असो वा मोठे, त्याला नेहमी ‘आहो’ म्हणण्याची सवय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची पहिली झलक होती). मीही तितक्याच तत्परतेने उत्तर दिले- ‘हो सर, मला जमेल, मी हा प्रकल्प करेन’. असे म्हणताच सरांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

अशी ही माझी आणि सरांची पहिली संवाद भेट; जी पुढे माझ्या आयुष्यभर स्मरणात राहणारी आणि जिव्हाळ्याचे ऋणानुबंध निर्माण करणारी होती, याची मला कल्पनादेखील नव्हती.

श्री. रास्ते सर आणि सूची, हे समीकरणच जणू बनले होते. कारण १९९६साठी उत्कर्ष प्रकाशनातर्फे ‘सुप्रसिद्ध लेखक व्यंकटेश माडगूळकर समग्र वाङ्मय सूची’ पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेली पहिली सूची अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली होती. ही सूची करताना त्यांनी घेतलेली मेहनत आणि सूची तयार करण्याचे तंत्र त्यांनी आत्मसात केल्यामुळे पुढे अनेक विद्यार्थ्यांना सूची प्रकल्पासाठी मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचीच निवड होत राहिली.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मुंबई येथे प्रकाशित होणाऱ्या नामांकित आणि दर्जेदार त्रैमासिकामध्ये ‘नवी क्षितिजे’ हे त्रैमासिक होते. सुप्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत यांनीही त्यासाठी लेखन केले होते. याच त्रैमासिकाच्या १९६९ ते २००० पर्यंतच्या ५३ अंकांचा संच विलिंग्डन महाविद्यालयात सरांनी जपून ठेवला होता. सरांनी मला याच त्रैमासिकाची सूची तयार करण्याची संकल्पना सांगितली. त्याचेच फलित ‘नवी क्षितिजे : त्रैमासिक लेख सूची’ या शीर्षकाची सूची अगदी पुस्तकरूपाने २००२ साली प्रसिद्ध झाली. य. च. म. मुक्त विद्यापीठास सादर होणाऱ्या सूची प्रकल्पामधील प्रकाशित झालेला हा एकमेव सूची प्रकल्प होय. अर्थातच या सूची प्रकल्पाचे पुस्तकरूपाने प्रसिद्धीचे महत्त्वपूर्ण कार्य आदरणीय रास्ते सरांच्या सांगण्यानुसार या त्रैमासिकाचे संपादक श्री. पां. ग. तथा नाना जोशी यांनीच केले. याच सूची प्रकल्पामुळे माझ्या आयुष्यातल्या ऐन उमेदीच्या काळात जणू ‘नवी क्षितिजे’च निर्माण झाली.

ग्रंथ, ग्रंथालय आणि ग्रंथांवर निःसीम प्रेम करणाऱ्या व्यक्तींविषयी आदर, हा सरांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. ग्रंथालय क्षेत्रात तब्बल ४८ वर्षे निस्पृह, प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठेने काम करताना सरांनी ग्रंथांची जोपासना एखाद्या अपत्याप्रमाणेच केली, असे म्हटले तर वावगे ठरू नये. याच कर्तव्यनिष्ठेचे फलित म्हणजे विलिंग्डन महाविद्यालयातील ग्रंथालयात असणारी विविध विषयांवरील समृद्ध ग्रंथसंपदा होय. अनेक दुर्मिळातील दुर्मीळ ग्रंथांचा संग्रह करून एक दर्जेदार ग्रंथालय अशी ख्याती त्यांनी निर्माण केली.

श्री. रास्ते सरांनी मराठी विषय घेऊन पदव्युत्तर पदवी संपादित केली होती. मराठी भाषेतील प्रकाशित पुस्तकांवर त्यांचे नितांत प्रेम आहे, तसेच मराठीतील शुद्धलेखनाबाबतच त्यांचा आग्रह अनेकदा मी अनुभवला आहे. पीएच.डी. प्रबंध लेखनासाठी अनेक विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचा आधार घ्यावाच लागतो. त्यासाठी विलिंग्डनचे ग्रंथालय आणि ग्रंथपाल श्री. रास्ते सरांची स्नेहपूर्ण मदत आलीच. समृद्ध ग्रंथसंग्रहातून अचूक आणि तत्परतेने संदर्भ ग्रंथ काढून देण्याची सरांची किमया अनेकांनी अनुभवली आहे.

वक्तशीरपणा ही तर त्यांची विशेष ओळख होती. ग्रंथालयात येणाऱ्या वाचकांना कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त संदर्भ ग्रंथ प्रत्यक्ष हाती देण्याची त्यांची हातोटी सर्वश्रुतच आहे. सर केवळ ग्रंथालयशास्त्र शिकले नाहीत, तर एकनिष्ठेने, आत्मीयतेने, व्यासंगीवृत्तीने आचरणात आणून ग्रंथांवर प्रेम कसे करावे आणि कसे जगावे, याचा आदर्शच त्यांनी निर्माण केला.

एका संध्याकाळी राजवाडा चौकातील फुटपाथवरून आम्ही चालत जाताना, एका वृद्ध भिकारी व्यक्तीकडे त्यांची नजर गेली. ते क्षणभर स्तब्ध झाले आणि त्या व्यक्तीकडे जाऊन त्यांनी विचारपूस केली आणि खिशातून १०० रुपयांची नोट काढून त्या गरिबाच्या हाती दिली. शेजारीच हॉटेल आहे त्यात काही थोडे खाऊन घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. त्या क्षणी मी सरांना विचारले, ‘इतक्या सहजतेने तुम्ही त्या वृद्धास कसे काय पैसे दिलेत?’ त्यावर त्यांनी थोडे गंभीर होऊन त्यांचा भूतकाळ सांगायला सुरुवात केली.

त्यांच्या घरच्या बिकट परिस्थितीची कहाणी त्यांनी ऐकवली. वडिलांच्या निधनानंतर आई आणि धाकटा भाऊ श्री. वामन आणि ते स्वतः कोणत्या परिस्थितीत राहत होते, याची माहिती सांगितली. लहान वयात घराची जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रसंगी सधन कुटुंबाकडे वार लावून पोट भरल्याची त्यांची आठवण ऐकताना मला गहिवरून आले. मोठा मुलगा म्हणून घराला हातभार लावण्यासाठी गणपती पेठेतील पी. के. दांडेकर यांच्याकडे हमाली करून झाल्यावर पोटात पडणारी भुकेची आग विझवण्यासाठी २५ पैशांत खिमापाव खाऊन पुन्हा काम केल्याची आठवण सरांनी सांगितली. त्यामुळे अनेक गोरगरीबांना मदतीचा हात देऊन आपला भूतकाळ विसरण्याचा प्रयत्न ते करत असल्याचे सांगितले.

त्यातूनच त्यांनी ठरवून आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मदत करण्याचा ध्यास घेऊन प्रसंगी दानशूर व्यक्तींकडून मदत घेऊन अनेक विद्यार्थ्यांची शिक्षणाची तृष्णा भागवून त्यांची शिक्षणाची स्वप्ने साकार केली. केवळ आणि केवळ त्यांच्या उदार मनोवृत्तीमुळे हे शक्य झाले.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

इंग्रजी विषय म्हटले की, अंगावर काटे उभारतात, असे मी एकदा सरांशी बोलण्याच्या ओघात बोलून गेलो. आणि मग सरांनी त्यांच्या इंग्रजी भाषेवरीत प्रभुत्वाविषयी सांगायला सुरुवात केली. शालेय शिक्षण घेताना प्रा. दत्त नारायण आपटे यांच्यासारख्या इंग्रजी विषयाच्या थोर शिक्षकांची आठवण त्यांनी सांगितली. इंग्रजीचे पाठ शिकवताना पुस्तकातील घटना-प्रसंगातून उभारलेली व्यक्तिमत्त्वे विद्यार्थ्यांच्या आयुष्यभर लक्षात राहतील, अशा पद्धतीची त्यांची शिकवण्याची कला इंग्रजीवर प्रेम करायला लावणारी होती. प्रा. आपटे सरांनी शालेय जीवनात केलेली मदत अविस्मरणीय असल्याची गोष्ट सरांनी सांगितली.

त्यानंतर विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य सुप्रसिद्ध साहित्यिक आणि साक्षेपी समीक्षक प्राचार्य म. द. हातकणंगलेकर सर यांच्या कृपाशीर्वादामुळे मिळालेल्या नोकरीचा उल्लेख त्यांनी केला. घनिष्ठ संबंधामुळे हातकणंगलेकरसरांच्या संशोधनपर लेखांचे ‘स्टेन्सिल कटिंग’ (त्या वेळी सायक्लो स्टायलिंग करावे लागे) करून घेण्याची जबाबदारी रास्ते सरांनी स्वीकारली होती. हातकणंगलेकर सरांसारख्या चिकित्सक, ज्ञानी व्यक्तिमत्त्वाचा सहवास लाभल्यामुळे इंग्रजी लेखनातील अचूकता सदैव स्मरणात राहिली असल्याचे सरांनी सांगितले.

ग्रंथालयात काम करतानाचा अनुभव कथन करताना आलेल्या अडीअडचणींना कसे धीराने सामोरे जायचे, याचे अनेक धडे सरांनी गिरवले होते. याच ग्रंथालयात काम करताना सुविद्य पत्नी सौ. अनघा रास्ते (पूर्वाश्रमीच्या अनघा अतीतकर) यांची लाभलेली मोलाची साथ अनेकार्थी जीवनव्यापी असल्याचे ते सदैव सांगतात. ग्रंथालयातील कामकाजाबाबत ते सदैव वक्तशीर आणि शिस्तप्रिय असेच राहत. पत्नी सौ. रास्ते मॅडम यांच्यासाठींही इतर सहकाऱ्यांप्रमाणेच कामकाजाची शिस्त त्यांनी ठेवली होती. ग्रंथालयात काम करताना त्यांनी पती-पत्नीचे नाते कधीच कर्तव्यनिष्ठेच्या आड येऊ दिले नाही.

.................................................................................................................................................................

हेहीवाचापहा

यशवंत रास्ते सर : पुस्तकांवरील ‘अव्यभिचारी निष्ठे’ने त्यांनी जो उत्तमतेचा ध्यास घेतला, त्यामुळे ते ग्रंथपाल म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करू शकले

.................................................................................................................................................................

ग्रंथांवरील अतूट, अपार प्रेमापोटी त्यांच्या व्यक्तिगत ग्रंथसंग्रहात सुमारे ७०० ग्रंथांचा समावेश असून चरित्र, आत्मचरित्र, कोशवाङ्मय अशा विषयांवरील मराठी आणि इंग्रजी भाषेतील उत्तमोत्तम ग्रंथसंपदा त्यांनी संग्रहित केली आहे. त्याचबरोबर शास्त्रीय संगीताच्या आवडीमुळे सुमारे ४०० ध्वनीफितींचा (कॅसेटस्) संग्रह केला आहे.

ग्रंथालयात काम करत असताना दिलेली तत्पर सेवा, शिस्तप्रियता, मृदुभाषा, ग्रंथ आणि ग्रंथालयांविषयी असणारी प्रचंड आत्मीयता, निःस्पृह, निर्व्याज मनाने केलेली मदत, औदार्यपूर्ण स्वभाव असल्याने सरांनी अनेक विद्यार्थी घडवले आणि अनेक नात्यांमध्ये ओलावा निर्माण करून ‘आदर्श ग्रंथपाल’ ही बिरुदावली सार्थ केली, हे नि:संदेह.

‘चालता बोलता संदर्भग्रंथ’ अशीच त्यांची ओळख म्हणावी लागेल. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे तत्त्व त्यांनी जोपासले आणि एक आदर्शवत ग्रंथपाल म्हणून नावलौकिक मिळवला. म्हणूनच ते नावाप्रमाणे यशवंत, किर्तिवंत ठरले असे म्हणावेसे वाटते. आदरणीय रास्ते सरांच्या सहवासाने माझ्या जीवनातील अनेक गोष्टींना दिशा प्राप्त झाली आणि मीही ग्रंथालयीन क्षेत्रात कार्यरत झालो. सरांविषयी असलेला स्नेहबंध कधीच संपणार नाही. एक उत्तम मार्गदर्शक म्हणून माझ्या आयुष्यात हे बंध कायमच राहातील. आयुष्यभर त्यांच्या ऋणात रहाणे मी पसंत करीन.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......