यशवंत रास्ते सर : पुस्तकांवरील ‘अव्यभिचारी निष्ठे’ने त्यांनी जो उत्तमतेचा ध्यास घेतला, त्यामुळे ते ग्रंथपाल म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करू शकले
ग्रंथनामा - झलक
ओंकार थोरात
  • यशवंत रास्ते आणि त्यांच्या काही ग्रंथसूची
  • Mon , 27 February 2023
  • ग्रंथनामा झलक यशवंत रास्ते Yashawant Raste व्यंकटेश माडगूळकर Vyankatesh Madgulkar नाना जोशी Nana Joshi नवी क्षितिजे Navi Kshitije

सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयाचे माजी ग्रंथपाल यशवंत रास्ते यांचा कृतज्ञता सोहळा नुकताच त्यांच्या काही माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केला होता. ग्रंथपाल रास्ते अतिशय प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि ग्रंथपाल या पदाच्या अर्थाचा विस्तार करणारे म्हणून ओळखले जातात. या सोहळ्याच्या निमित्ताने ‘ग्रंथोपजीवी’ ही त्यांच्याविषयीच्या लेखांची पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे. त्यातील हा एक लेख….

.................................................................................................................................................................

“Reading is a conversation, all books talk but a good book listens as well.” मार्क हँडन या नामवंत लेखकाचे हे उद्गार म्हणजे पुस्तके किती तऱ्हांनी संवादी असू शकतात, याबद्दलचे भाष्य आहे. पुस्तकांसोबतचा हा संवाद सुरू होण्याची पहिली पायरी म्हणजे, वाचक आणि पुस्तके एकमेकांच्या संपर्कात येणे. हेच कार्य आदरणीय यशवंत रास्ते सरांनी त्यांच्या सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातील कार्यकाळात आणि नंतरही विविध मार्गांनी इतक्या आस्थेने आणि निष्ठेने केले आहे की; ज्यामुळे ग्रंथपाल या पदाला विविध आयाम लाभले. महाविद्यालयासाठी आवश्यक असणाऱ्या ग्रंथांची खरेदी करून आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांचे विशिष्ट शास्त्रीय व्यवस्थेच्या आधारे वर्गीकरण करणे, त्यांची सुयोग्य निगा राखणे, ती पुस्तके योग्य त्या वाचकांपर्यंत पोहोचवणे तसेच; या सर्व व्यवहारांची नोंद ठेवणे हे ‘ग्रंथपाल’ या पदाचे साधारणपणे प्राथमिक कार्य म्हणायला हवे.

ग्रंथपालासाठी असणारी ही व्यवसायनिष्ठ आचारसंहिता तर रास्ते सर त्यांच्या कार्यकाळात व्रतस्थ वृत्तीने जगलेच; पण नोकरीच्या कार्यकाळात आणि नंतरही बहुतांश वेळेस संस्थात्मक ध्येयधोरणांना साहाय्यकारी ठरत ग्रंथपाल या पदाच्या कक्षा रुंदावत त्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वालाही उन्नतता बहाल केली. रास्ते सरांचा वाचन व्यवहाराबाबतचा दृष्टीकोन आणि कार्यशैलीमुळे ग्रंथपाल या पदाचे कोणते नवे आणि स्पृहणीय रूप आपल्यासमोर साकार झाले, हे प्रस्तुत लेखाच्या मर्यादेत आपल्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने केलेला हा लेखनप्रपंच.

ग्रंथालय समृद्ध करणारे शिलेदार

महाविद्यालयांना मिळणाऱ्या अनुदानाच्या माध्यमातून दरवर्षी उपलब्ध होणाऱ्या निधीच्या प्रमाणात ग्रंथांची खरेदी केली जाते. या निधीच्या मर्यादेमुळे काही महत्त्वाच्या ग्रंथांची खरेदी ग्रंथालय करू शकत नाही; हे रास्ते सरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विविध मार्गांनी विलिंग्डन महाविद्यालयातील ग्रंथालयात निरनिराळ्या विषयांवरील पुस्तकांची उपलब्धता कशी होईल, यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. त्यांनी अनेक वर्षे महाविद्यालयातील पुस्तकांबाबतीत त्यांच्यासारखाच विचार करणाऱ्या प्राध्यापकांकडून स्वेच्छापूर्वक आर्थिक सहकार्य मिळवले आणि काही महत्त्वाच्या ग्रंथांची खरेदी केली. अशाच पद्धतीने सांगलीतील व्यापारी उत्तमभाई शहा यांच्याकडूनही आर्थिक मदत मिळवून संदर्भ ग्रंथांची खरेदी केली.

‘नवी क्षितिजे’ या तत्त्वज्ञानाला वाहिलेल्या नियतकालिकाचे आधारवड राहिलेले नाना जोशी यांच्याकडून सरांनी त्यांचा वैयक्तिक ग्रंथसंग्रह मिळवला. महाविद्यालयाच्या ग्रंथालयासाठी पुस्तके मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसोबतच, विद्वान संशोधक ग. वा. तगारे, तसेच सांगली संस्थांनच्या प्रतिनिधीच्या महाविद्यालयाला भेटस्वरूप दिलेल्या व्यक्तिगत ग्रंथसंग्रहाच्या नीटसपणे नोंदी करून महाविद्यालयात त्यांची यथायोग्य व्यवस्था केली. काही संस्थांमध्ये अशा भेटस्वरूप आलेल्या महत्त्वाच्या पुस्तकांची हेळसांड होते हे बघता, रास्ते सरांचे हे काम उल्लेखनीयच म्हणावे लागेल.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

सूचीकार, नोंदकर्ते आणि संपादक

अभ्यासकांना पुस्तके किंवा तत्सम माहिती सुलभपणे उपलब्ध होण्यासाठी विषयनिष्ठ सूची अत्यंत सहाय्यकारी ठरतात. ग्रंथपाल म्हणून रास्ते सरांना विविध प्रकारच्या सूचींचे महत्त्व लक्षात आल्यामुळे काही सूची त्यांनी स्वतः अत्यंत साक्षेपी पद्धतीने तयार केल्या. त्यांनी तयार केलेल्या सूचींमध्ये ‘व्यंकटेश माडगूळकर समग्र वाङ्मय सूची’ ही पुस्तक रूपाने उपलब्ध आहे. ग्रंथसूची कशी असावी, याबाबतीतले हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल.

रास्ते सर काही वर्षे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विषयाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी अध्यापन करायचे. त्यांच्या या कार्यकाळात इथल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये ग्रंथसूचीचे महत्त्व रुजण्यासाठी प्रकल्पाच्या निमित्ताने त्यांना ग्रंथसूची तयार करण्यासाठी रास्ते सरांनी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन केले. त्यांच्या सतीश सूर्यवंशी या विद्यार्थ्याने ‘नवी क्षितिजे’ या तत्त्वज्ञानाला वाहिलेल्या महत्त्वाच्या नियतकालिकाची सूची तयार केली, जी आता पुस्तक रूपानेही उपलब्ध आहे. रास्ते सरांच्या एका विद्यार्थिनीने अशाच प्रकल्पाच्या निमित्ताने मराठीतील स्त्री आत्मचरित्रांची सूची तयार केली होती. सूचींबाबत अशी अनेक उदाहरणे सांगता येतील.

रास्ते सरांनी महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये विशिष्ट कालावधीत स्वीकृत झालेल्या डि.लिट. तसेच पीएच.डीच्या प्रबंधांच्या सूचीसाठी संकलक सहाय्यक म्हणून काम केले आहे. डॉ. व. वि. कुलकर्णी यांनी संपादित केलेली ही सूची अभ्यासकांसाठी पुस्तकरूपाने उपलब्ध आहे.

पुस्तकांच्या अफाट दुनियेत जसे सूचींचे महत्त्व आहे, तसेच विविध कोशांमधल्या नोंदींचेही अनन्यसाधारण स्थान आहे. रास्ते सरांनी विख्यात समीक्षक आणि मराठी-इंग्रजी साहित्याचे अभ्यासक म. द. हातकणंगलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी वाङ्मयकोशाच्या ‘मराठी ग्रंथकार’ हे शीर्षक असलेल्या दुसऱ्या खंडाच्या संपादन मंडळामध्ये सहभागी होऊन काही नोंदीही केल्या आहेत.

रास्ते सरांनी सेवानिवृत्तीपश्चात मिरजेच्या ऐतिहासिक खरे मंदिर वाचनालयाला १९९९ ते २०१३ या काळात वेगवेगळ्या निमित्ताने भेटी दिलेल्या अभ्यागतांच्या अभिप्रायाच्या जवळजवळ १००० नोंदी केल्या आहेत. विशेष म्हणजे या अभिप्रायाच्या नोंदींसोबतच या अभ्यागतांच्या कार्याच्या माहितीच्या नोंदीही केल्या आहेत. जवळजवळ पाच वर्षे विशिष्ट वेळेत या वाचनालयात नियमितपणे जाऊन त्यांनी विनामूल्य हे काम केले आहे.

मदतीचा हात नेहमी पुढे

रास्ते सरांना ओळखणारे अनेक जण या अनुभवाशी सहमत होऊ शकतील की, त्यांना महाविद्यालयातील ग्रंथालयातल्या जवळजवळ प्रत्येक पुस्तकाच्या स्थानाबाबतचे स्मरण पक्के होते. प्रसंगी पुढाकार घेऊन रास्ते सर विनाविलंब ही पुस्तके इच्छुकांना मिळवून द्यायचे. त्यांना अनेक विषयांच्या संदर्भ ग्रंथांची माहिती असल्यामुळे, ते इच्छुकांना विषयानुसार पुस्तकांचे अनेक पर्यायही सुचवायचे. जर ते महाविद्यालयात उपलब्ध नसेल, तर प्रसंगी कुठे उपलब्ध होऊ शकेल, याबाबतची माहितीही पुरवायचे.

रास्ते सरांच्या विलिंग्डन महाविद्यालयातील कार्यकाळात ते महाविद्यालय आणि संस्थेशी संबंधित नसलेल्या, पण पुस्तकांची विलिंग्डनच्या ग्रंथालयातील उपलब्धता विचारण्यासाठी आलेल्या अभ्यासक संशोधकांसाठीही नेहमी स्वागतशील असायचे. नियमात राहून, विशिष्ट अटींवर ते ही पुस्तके त्यांना उपलब्ध करून द्यायचे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

निव्वळ नोकरी म्हणून ग्रंथपालपदाकडे पाहणारे, ११ ते ५ काम करून हात झटकून घरी जाणारे, कामाठी ग्रंथपाल न होता; रास्ते सरांनी या पदाकडे ज्ञानसंवर्धनाची गंभीर जबाबदारी म्हणून पाहून आपल्या पदाचा परीघ वाढवला, पर्यायाने वाचन संस्कृतीच्या विकासाला हातभार लावला.

रास्ते सरांच्या कार्यकाळात विलिंग्डन महाविद्यालयातील ग्रंथालयाचा अनुभव घेतलेले विद्यार्थी व प्राध्यापक सरांच्या व्यक्तिमत्त्वाच्या तिथल्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या कडक शिस्त आणि शांततेमुळे भारावून जात किंवा प्रसंगी दबकूनही असत. ग्रंथालयातील वातावरण अभ्यासासाठी पोषक असावे, याबाबतीत रास्ते सर अत्यंत दक्ष असत. विद्यार्थ्यांच्या अभ्यासकक्षामध्ये त्यांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित संदर्भग्रंथांची मांडणी करून ठेवलेली असायची; जेणेकरून विनासायास ही पुस्तके त्यांच्या हाताशी असतील.

ही सगळी पुस्तके विद्यार्थी नीट हाताळतील आणि त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी मिळालेली पुस्तके योग्य वेळेत परत करतील, याबाबतीतही त्यांचा कटाक्ष असायचा. प्रथमदर्शनी जरी ते कडक शिस्तीचे वाटत असले तरी, पुढे पुस्तकांच्या देवघेवीच्या निमित्ताने परिचय वाढल्यानंतर, त्यांच्याशी संबंध आलेल्यांना त्यांच्या स्वभावातला मिश्किलपणा आणि इतरांप्रतीचा जिव्हाळा, याचे प्रत्यंतर आल्याशिवाय राहायचे नाही.

कमकुवत आर्थिक गटातील विद्यार्थ्यांबाबत कळवळा

रास्ते सरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. त्या परिस्थितीत त्यांना आलेल्या अनुभवांचे स्मरण ठेवून महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापकांकडून स्वेच्छापूर्वक निधी जमा करून, त्यांनी अनेक कमकुवत आर्थिक गटातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी सहाय्य केले. दर महिन्याला त्या विद्यार्थ्यांच्या खात्यात विशिष्ट रक्कम जमा होईल आणि त्याच्या महत्त्वाच्या गरजा पूर्ण होतील, याची ते काळजी घ्यायचे. अशा पद्धतीने अनेकांनी आपले शिक्षण पूर्ण करून, त्यांच्या आवडत्या क्षेत्रात व्यावसायिक संधी शोधल्या आहेत. आयुष्यात पुढे स्थिरस्थावर झाल्यावर; यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी इतर गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

रास्ते सर ग्रंथालयातल्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या कौटुंबिक अडचणींपासून त्यांच्या व्यावसायिक प्रगतीपर्यंत सजग असत. आपल्या सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यापासून मदत करण्यापर्यंत त्यांच्या आयुष्याशी स्वतःला जोडून घेत असत. अशा प्रकारे त्यांच्या कडक शिस्तीच्या नेतृत्वाला प्रेमाची, आस्थेची किनारही होती. ग्रंथालयातील सहकाऱ्यांसोबतच त्यांच्या क्षेत्राशी संबंधित इतर लोकांच्या हिताचाही ते विचार करायचे.

१९८२ साली सांगली जिल्हा ग्रंथालय संघाच्यावतीने शासनाचा ग्रंथालय प्रशिक्षण कोर्स सुरू करणे असो किंवा मग शिवाजी विद्यापीठाच्या प्रौढ शिक्षण विभागाच्या ग्रंथालय व्यवस्थापन कोर्सला शासन मान्यता मिळावी, यासाठी उभ्या राहिलेल्या लढ्याला मार्गदर्शन करणे असो; रास्ते सरांच्या मनात इतरांप्रती असलेला कळवळा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता.

प्रामाणिकपणा आणि सजगपणा

प्रामाणिकपणा या मूल्याचा अंगीकार केल्यामुळे रास्ते सर त्यांच्या कार्यकाळात अनेक गोष्टी अत्यंत सचोटीने करू शकले. ग्रंथालयाशी संबंधित प्रत्येक गोष्ट ते अत्यंत निष्ठेने करायचे. पुस्तकांना नंबर देण्याचे काम असो अथवा आर्थिक हिशोब ठेवण्याचे काम असो, प्रत्येक बाबतीत अत्यंत दक्ष असत. त्यांच्या पत्नी अनेक वर्षे ग्रंथालयात त्यांच्या सहकारी होत्या, पण त्यांना कामाच्या ठिकाणी कोणतीही विशेष सवलत न देता इतर सहकाऱ्यांप्रमाणेच वागवायचे.

विलिंग्डन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात प्रवेश केल्यावर रास्ते सरांच्या केबिनच्या बाहेरच्या भागाला सफदर हाश्मी यांच्या ‘किताबें’ या कवितेचा दासू वैद्य यांनी केलेला मराठी अनुवाद पोस्टर स्वरूपात लावलेला दिसायचा. या कवितेच्या निवडीतूनच त्यांचे ग्रंथांवर किती प्रेम होते, हे पाहणाऱ्याच्या चटकन लक्षात यायचे. ग्रंथालयातील पुस्तकांवर त्यांचे जिवापाड प्रेम होते. त्यामुळे त्या त्या विभागात रेखीवपणे मांडलेली पुस्तके बघितली की, मन प्रसन्न व्हायचे. विलिंग्डन महाविद्यालयाच्या त्यांच्या कार्यकाळात ते कित्येक वर्षे सकाळी आठ ते संध्याकाळी सहा असे म्हणजेच नेमून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काम करायचे.

कोलकत्याच्या राष्ट्रीय संग्रहालयातील मराठी विभागात ग्रंथपाल म्हणून विशेष प्रकारे काम केलेल्या आणि आपल्या संदर्भ संपृक्त लेखनशैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या बहुश्रुत अशा श्री. बा. जोशी यांच्याबद्दल रास्ते सरांना नितांत आदर आहे. श्री. बा. जोशी लिखित ‘उत्तम मध्यम’ हे पुस्तक रास्ते सरांना प्रचंड प्रिय आहे आणि ते त्यांनी अनेकांना भेटस्वरूप दिले आहे. याच धाग्याला पकडून रास्ते सरांच्या संदर्भात म्हणावेसे वाटते की, आपल्या मध्यममार्गी व्यावसायिक आयुष्यात पुस्तकांवरील ‘अव्यभिचारी निष्ठे’ने त्यांनी जो उत्तमतेचा ध्यास घेतला, त्यामुळे ते ग्रंथपाल म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करू शकले.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......