अजूनकाही
महात्मा गांधींनी केलेल्या चंपारण सत्याग्रहाला आज १७ एप्रिल २०१७ रोजी १०० वर्षं पूर्ण झाली आहेत. हा गांधीजींचा पहिला सत्याग्रह होता. गांधीजींची दृढता व उद्दिष्टसिद्धीवरील विश्वास देशाने चंपारण्यात पाहिला. त्या निमित्ताने जयंत दिवाण यांनी लिहिलेलं 'कहानी चंपारण सत्याग्रहाची' हे पुस्तक अक्षर प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे. या पुस्तकाला राजकीय अभ्यासक डॉ. अशोक चौसाळकर यांनी लिहिलेली प्रस्तावना.
……………………………………………………………………………………………
बिहारच्या चंपारण्य भागात शंभर वर्षापूर्वी म. गांधींनी निळीच्या ब्रिटिश मळेवाल्यांविरुद्ध चळवळ उभी केली. इंग्रज मळेवाल्यांनी बंगाल आणि बिहारमध्ये निळीची शेती सुरू केली. रासायनिक रंगाचा शोध लागण्यापूर्वी जगभर रंग देण्यासाठी निळीचा वापर होत होता. त्यामुळे नीळ हे एक पैसे देणारे व्यापारी पीक होते. जागतिक स्तरावर साम्राज्यवाद स्थापन झाल्यानंतर साम्राज्यवाद्यांनी जगाची ‘कच्चा माल उत्पन्न करणारे देश’ आणि ‘पक्का माल उत्पन्न करणारे देश’ अशी विभागणी केली. संपूर्ण आशिया, अफ्रिका आणि द. अमेरिकेतील देश हे कच्चा मालाचा उत्पादन करणारे देश बनवण्यात आले. जागतिक बाजारपेठेत साखर, नीळ, कपडे, चहा, कॉफी, रबर या उत्पादनांना मागणी होती आणि त्यांची निर्मिती शेतांमधून होणाऱ्या उस, कापूस, नीळ इ. पदार्थांपासून होत होती. त्यामुळे जागतिक बाजारपेठेवर नियंत्रण ठेवू इच्छिणाऱ्या बड्या भांडवलदारांनी आणि त्यांचे हस्तक असणाऱ्या साम्राज्यवाद्यांनी या पदार्थांचे खात्रीशीर उत्पादन करण्यासाठी आशिया, आफ्रिका व द. अमेरिकेतील लक्षावधी एकर्स जमिनी ताब्यात घेतल्या. त्या जमिनीवर काम करण्यासाठी लक्षावधी गुलामांना व बंदिस्त कामगारांना आफ्रिका व आशियातून आणण्यात आले. त्यांना उस, नीळ, रबर, चहा, कॉफी यांच्या मळ्यात काम करावे लागे. या मळ्यांची मालकी युरोपीय मळेवाल्यांकडे होती. निळीच्या शेतीसाठी या मळेवाल्यांनी बंगाल व बिहारमध्ये हजारो एकर जमीन ताब्यात घेऊन शेतकऱ्यांना त्या जमिनी कसण्यास मजबूर केले. बंगाल आणि बिहार या भागात या इंग्रज मळेवाल्यांच्या मोठ्या वसाहती होत्या, तेथे ते एखाद्या मोठ्या राजासारखे राहत. जगभरच्या या वसाहती हे साम्राज्यवाद्यांच्या क्रूर शोषणाचे एक उदाहरण होते. या शोषणाच्याद्वारा वसाहतींना पूर्णत: नाडावण्यात आले. बंगालमध्ये १९ व्या शतकात या मळेवाल्यांविरुद्ध मोठी चळवळ उभी राहिली होती.
१९१५ मध्ये म. गांधी द. आफ्रिकेतून भारतात परतले. त्यांना गोपाळ कृष्ण गोखले यांनी संपूर्ण भारताचा दौरा करण्यास सांगितले होते. याच काळात लोकमान्य टिळक मंडालेवरून परतले होते, व पहिल्या महायुद्धास सुरुवात झाली होती. १९१६ मध्ये टिळक व बेझंट यांनी होमरुल चळवळ सुरू केली होती. १९१६ मध्ये युद्धाचे पारडे इंग्रजांच्या बाजूने झुकत होते. १९१५ मध्ये दादाभाई, गोखले व मेहता यांचे निधन झाले आणि मवाळ राजकारणाचा अंत झाला. या संधिकाळात म. गांधींनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. या काळातील राजकारण मुख्यत: मुंबई, कलकत्ता व मद्रास या तीन महानगरांभोवती फिरत होते. आणि दिल्ली, अलाहाबाद, पुणे, लाहोर इत्यादी शहरात राजकीय जागृतीस सुरुवात झाली होती. काँग्रेसच्या अधिवेशनात मात्र कार्यकर्ते मुख्यत: मध्यमवर्गातूनच आलेले होते. लोकमान्य टिळक वगळता जनतेच्या आंदोलनात्मक राजकारणाचा इतर नेत्यांनी अंगीकार केलेला नव्हता. या काळात म. गांधींनी बिहारसारख्या मागास प्रांतात चंपारणसारख्या मळेवाल्यांच्या शोषणाने त्रस्त झालेल्या भागात आणि मुख्यत: शेतकऱ्यांच्या प्रश्नाला समोर ठेवून; नव्या प्रकारच्या आंदोलनाची सुरुवात केली. आधीच राजकीयदृष्ट्या जागृत्व असलेल्या प्रदेशात चळवळ सुरू न करता त्यांनी एका मागास प्रदेशात सुरू केली. ही चळवळ सुरू करताना म. गांधींनी निळीची शेती, मळेवाल्यांचे विशेष अधिकार आणि ब्रिटिश सरकारचे त्याबाबतचे धोरण याचा अभ्यास केला.
म.गांधींनी भारतातील आपल्या राजकीय जीवनास चंपारण्यापासून सुरुवात केली. या चळवळीत गांधींनी जी पद्धत अंगीकारिली ती महत्त्वाची होती. कारण नंतरच्या काळात देशपातळीवर त्यांनी ज्या मोठ्या चळवळी उभ्या केल्या त्यात त्यांचा वापर केला. या चळवळींचा मुख्य उद्देश लोकांना निर्भय बनवण्याचा होता. कारण इंग्रजांचे राज्य हे भीती आणि दहशत यावर चाललेले आहे हे त्यांच्या लक्षात आले होते. चंपारण्यातील म. गांधींचा लढा हा द. आफ्रिकेतील लढ्याइतका व्यापक व दीर्घकाळ चाललेला नसला तरी तो तितकाच रोमहर्षक होता म्हणून म. गांधींचे चरित्रकार डी.जी.तेंडुलकर यांनी चंपारण्याच्या लढ्याचे महत्त्व विशद करणारे पुस्तक लिहिले. मराठीत या विषयावर पंढरपूरचे सामाजिक कार्यकर्ते दत्ता सावळे यांनीही पुस्तक लिहिले. या पुस्तकात सावळे यांनी या लढ्यात गांधींनी कोणती पद्धत वापरली, कोणती तंत्रे वापरली याचा परामर्श घेतला. या लढ्यात प्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या नेत्यांनी पण त्यावर पुस्तके लिहिली. या चळवळीत डॉ. राजेंद्रप्रसाद, आचार्य कृपलानी, पुंडलिक कातगडे हे नेते सामील झाले. खुद्द कस्तुरबा गांधींनी तेथे मोर्चा सांभाळला होता. या लढ्यास आता १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे या लढ्याची रोमहर्षक कहाणी ज्येष्ठ सर्वोदय कार्यकर्ते जयंत दिवाण यांनी ‘कहाणी चंपारण सत्याग्रहाची’ या पुस्तकात कथन केली आहे. दिवाण यांची निवेदन शैली प्रभावी आहे. ते आपल्या प्रतिपादनाचे सूत्र सुटू देत नाहीत. त्यामुळे वाचकांना या कहाणीमध्ये पुढे काय घडणार याबाबत उत्सुकता वाटू लागते. दिवाण यांनी या विषयावरचे सर्व महत्त्वाचे साहित्य वाचले असून, या सर्व साधनांचा त्यांनी पुस्तक लिहिताना मोठ्या कुशलतेने वापर केला आहे.
बिहारमधील निळीची शेती व त्यावर असणारी मळेवाल्यांची मक्तेदारी हा साम्राज्यशाहीचा व वसाहतवादाचा अत्यंत कुरूप असा आविष्कार होता. कारण मळेवाले व त्यांचे भारतीय हस्तक यांची मोठी दहशत होती. त्यातच पूर्वेकेडील राज्यात जमीनदारी जमीन व्यवस्था होती आणि या जमीनदारांशी मळेवाल्यांचा जवळचा संबंध होता. मळेवाल्यांजवळ आर्थिक व राजकीय ताकद होती. त्यांच्या विरोधात असणारे जे शेतकरी होते. ते संघटित नव्हते. अज्ञान, गरिबी व भीती यामुळे ते सर्व प्रकारचे अन्याय सहन करत होते. त्यांची ही परिस्थिती पाहून त्यांचा प्रश्न हाती घ्यावयास राजकीय नेते तयार नव्हते. कारण यशाची हमी नव्हती पण म. गांधींनी हे आव्हान स्वीकारले व खुद्द चंपारण्यात ठाण मारून त्यांनी अन्यायाविरुद्धचा लढा सुरू केला. म. गांधी यांनी आपल्या बरोबरच्या राजेंद्र प्रसादांसारख्या वकिलाला आक्रमक, पण अहिंसक चळवळीमध्ये सहभागी करून घेतले.
चंपारणच्या मळेवाल्यांचे वा कोठीवाल्यांचे वागणे सरंजामी पद्धतीचे होते. ते एखाद्या राजासारखे आपल्या इस्टेटीत राहत आणि अनेक सरंजामशाही प्रथा लोकांवर लादत. दिवाणांनी अशी माहिती दिली आहे की, मोतीहारी जिल्हयात एमेन नावाचा कोठीवाला होता आणि त्याने असा नियम केला होता की, त्या भागात राहणाऱ्या कोणाही गृहस्थाच्या मुलीला प्रथम ऋतुदशा प्राप्त झाली की, एक रात्र तिला एमेन साहेबाच्या कोठीवर पाठवावे लागे! रात्रभर तिला ठेवून घेऊन काही जुजबी दागिने घालून एमेनचे लोक तिला परत पाठवत असत. जो कोणी मनुष्य आपली मुलगी पाठवणार नाही, त्याच्या घराला आग लावली जाई. त्याला मारहाण केली जाई. सर्व सत्ता या मळेवाल्यांच्या हातात असल्यामुळे नाईलाजाने लोक आपल्या मुली पाठवत! सरंजामशाहीतील काही वाईट अवशेष मळेवाल्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मुद्दाम जिवंत ठेवले होते.
म. गांधींना मळेवाल्यांची दहशत आणि शेतकऱ्यांची भयग्रस्तता यांच्या विरोधात संघर्ष करायचा होता. प्रथम गांधींनी लोकांच्या मनातील भीती दूर करण्याचा, त्यांना निर्भय बनवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांना मळेवाल्याविरुद्ध तक्रार करण्यास उद्युक्त केले. प्रथम आपल्या अनुयायांना त्यांनी तयार केले. आपला लढा जर न्याय्य असेल तर आपण तुरुंगात जाण्याची पण तयारी ठेवली पाहिजे असे त्यांनी सांगितले. यापूर्वीचे देशभक्त न्यायालयात आपण कोणत्याही प्रकारचा अपराध केलेला नाही, त्यामुळे सरकारचा आरोप चुकीचा आहे, आपण निर्दोष आहोत असे म्हणत असत. म. गांधींनी यात बदल केला. त्यांनी तेथील न्यायालयात सांगितले की, ‘‘सरकारच्या कायद्याचे पालन करणारा मी मनुष्य आहे. पण कायद्याचे पालन केले तर कर्तव्य करणे शक्य नव्हते म्हणून मला हुकूम पाळणे शक्य नव्हते. या परिस्थितीत स्वाभिमानी माणसापुढे एकच मार्ग उपलब्ध आहे तो म्हणजे कायदेभंगाची शिक्षा अविरोध सहन करणे.’’ येथे म. गांधींनी अंत:करण प्रामाण्यास महत्त्व दिले व सविनय कायदेभंगाचा मार्ग सुचवला. येथे एक प्रकारे त्यांनी शासनसंस्थेच्या अधिमान्यतेस प्रश्नांकित केले. त्यांनी गुन्हा कबूल केला. न्यायाधीशास शिक्षा देण्याची विनंती केली आणि आपण जामीन घेणार नाही असे ही सांगितले. हा एक वेगळ्या प्रकारचा प्रतिकार होता.
ही चळवळ म. गांधींच्या सर्व चळवळींचा आरंभबिंदू होता आणि तिचा उद्देश लोकांच्या मनातील भीती दूर करून त्यांच्यावर होणारे अन्याय दूर करण्याचा होता म्हणून या चळवळीसाठी सात मार्गदर्शक तत्त्वे विकसित झाली आणि त्यांची अंमलबजावणी केली. ही मार्गदर्शक तत्त्वे खालीलप्रमाणे होती.
१) या चळवळीला उघड राजकीय स्वरूप द्यायचे नाही आणि त्यात काँग्रेस पक्षाचे नाव घ्यायचे नाही.
२) चळवळ करणाऱ्या कार्यकर्त्यांनी चळवळीची व्याप्ती त्यात इतर विषयांचा समावेश करून वाढू द्यायची नाही.
३) चळवळीचा उद्देश व कार्यक्रम गुप्त ठेवायचा नाही आणि त्याबाबतची सर्व माहिती जिल्हाधिकाऱ्यांना कळवायची.
४) अन्यायाचा प्रतिकार करीत असताना लढाईपासून माघार घ्यायची नाही आणि त्यासाठी जे काही क्लेश सोसावे लागतील त्यासाठी तयार राहायचे. त्यासाठी तुरुंगात जावे लागले तर तुरुंगात जावयाचे पण हे करीत असताना मळेवाल्यांबद्दल आपल्या मनात वैरभाव ठेवायचा नाही.
५) चळवळ करणाऱ्यांनी शेतकऱ्यांपासून अलग न राहता त्यांच्याबरोबर राहावे आणि स्वावलंबी जीवन जगावे. मं. गांधी किंवा इतर नेते पकडले गेले तर दुसऱ्या फळीतील नेत्यांनी चळवळ चालू ठेवावी.
६) चळवळीची उद्दिष्टे सुरुवातीस माफकच असावी. वाटाघाटीसाठी व समझोत्यासाठी आपण तयार असावे. त्यातून क्रमाक्रमाने आपले उद्दिष्ट साध्य होईल.
७) सत्याग्रहाबरोबरच कार्यकर्त्यांनी रचनात्मक कामात आपणास गुंतवून घेतले पाहिजे कारण सत्याग्रह आणि रचनात्मक कार्यक्रम या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.
म. गांधींनी चंपारण्याच्या जनतेत निर्भयतेचे बीज पेरले व जनता मळेवाल्यांच्या विरुद्ध उभी राहू लागली. गांधींच्या प्रयत्नामुळे मार्च १९१८ रोजी चंपारण शेती कायदा सरकारने संमत केला व त्यानुसार तीन कठियांचे करार रद्द करण्यात आले. नीळ लावण्याच्या बांधनातून शेतकरी मुक्त झाले. समझोत्यावर काही लोकांनी टीका केली, पण तीन कठिया पद्धत रद्द केल्यानंतर मळेवाल्यांची सद्दी संपेल व ते क्षेत्रातून माघार घेतील असे. म. गांधींचे मत होते, ते खरे ठरले. कारण त्यांनी निळीच्या अर्थकारणाच्या व मळेवाल्यांच्या मानसिकतेचा अभ्यास केला होता.
रचनात्मक कार्याचा भाग म्हणून म. गांधींनी तेथे आश्रम स्थापन केले. शाळा सुरू केल्या. या आश्रमात काम करण्यासाठी मुंबई राज्यातून - आजच्या गुजरात व महाराष्ट्र राज्यातून अनेक कार्यकर्ते आले. त्यात कस्तुरबा व देवदास गांधी, अवंतिका बाई व बबन गोखले, पुंडलिकजी कातगडे, क्षिरे, पारिख इत्यादी लोकांचा समावेश होता. गावच्या लोकांना शिक्षण देणे, त्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगणे त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणे इत्यादी कामे या कार्यकर्त्यांना करावयाची होती. पण हे आश्रम व शाळा आपल्या हुकूमशाही विरुद्धची प्रतिकाराची केंद्रे होऊ शकतात याची जाणीव मळेवाल्यांना झाली व त्यांनी त्यास विरोध करावयास सुरुवात केली. बेळगावचे ज्येष्ठ समाजसेवक पुंडलिकजी कातगडेही एक आश्रम चालवत होते आणि प्रत्यक्ष हिंसक प्रतिकार न करता, पुंडलिकजींनी या भागात लोकांना कसे हळूहळू उभे केले; याचे अत्यंत प्रत्ययकारक व रोमहर्षक वर्णन दिवाणांनी या पुस्तकाच्या २४ व्या प्रकरणात केले आहे. रचनात्मक कार्यासंबंधी गांधींच्या कार्यकर्त्यांच्या कामाची योग्य अशी दखल, दिवाण यांनी प्रथमच इतक्या चांगल्या प्रकारे घेतली याबद्दल त्यांचे अभिनंदन. पण चळवळ संपल्यानंतर ही प्रक्रिया सुरू राहिली नाही. कारण देशाच्या इतर भागातील कार्यकर्ते आपापल्या भागात परतले. पण त्यांनी सुरू केलेले काम हाती घेऊन ते पुढे नेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची तेथे वानवा होती.
‘स्वातंत्र्य लढ्याचा अहिंसात्मक शुभारंभ’ या शेवटच्या प्रकरणात दिवाण यांनी चंपारणच्या सत्याग्रहाचे महत्त्व थोडक्यात विशद केले आहे. हा गांधीजींचा पहिला सत्याग्रह होता. त्याबाबत दिवाण लिहितात ‘‘सत्य व अहिंसेची ताकद काय असते आणि अशिक्षित, निरक्षर रयतेच्या मदनीते काय केले जाऊ शकते याचे उदाहरण म्हणजे चंपारण्याचा सत्याग्रह होय.’’ गांधीजींची दृढता व उद्दिष्टसिद्धीवरील विश्वास देशाने चंपारण्यात पाहिला असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
आज साम्राज्यवाद व वसाहतवाद नष्ट झाला आहे व शोषणाचे प्रकार व आविष्कार बदलले आहेत. रयतेवर अन्याय होतोच आहे. या संदर्भात नव्या चळवळी उभ्या करणाऱ्या कार्यकर्त्यांना चंपारणचा इतिहास समजावून घेणे मोलाचे ठरणार आहे. हा इतिहास सोप्या भाषेत व प्रभावी पद्धतीने मराठीत वाचकांसमोर मांडल्याबद्दल मी जयंत दिवाण यांना धन्यवाद देतो आणि वाचक या पुस्तकाचे चांगल्या प्रकारे स्वागत करतील अशी उमेद व्यक्त करतो.
……………………………………………………………………………………………
कहानी चंपारण सत्याग्रहाची - जयंत दिवाण
अक्षर प्रकाशन, मुंबई
पाने : १३५, मूल्य - १५० रुपये.
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Amol Jarhad
Mon , 24 April 2017
खूप छान