‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
विकास पालवे
  • ‘रेघ’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Sat , 06 April 2024
  • ग्रंथनामा शिफारस रेघ Regh अवधूत डोंगरेAvdhoot Dongre

अवधूत डोंगरे हे कादंबरीकार म्हणून ख्यातकीर्त आहेत. ते आसपासच्या घटनांविषयी त्यांच्या ‘एक रेघ’ या ब्लॉगवर सजगपणे टिप्पणी करत असतात. त्यात सामाजिक-राजकीय घडामोडींचा समावेश असतो, तशीच भाषा आणि साहित्य व्यवहार यांचीही दखल घेतलेली असते. अशा गेल्या तेरा-चौदा वर्षांतल्या नोंदींचा एकत्रित स्वरूपातील ग्रंथ ‘रेघ’ या शीर्षकानिशी हल्लीच प्रकाशित झाला आहे.

‘माध्यमं’, ‘भाषावापर’, ‘साहित्य’ आणि ‘आजूबाजूचं’ काही अशा चार विभागांत हे लेखन समाविष्ट केलं गेलं आहे. डोंगरे सुरुवातीच्या मनोगतपर ‘सुरुवातीची नोंद’ या भागात लिहितात की, “मुख्यप्रवाही माध्यमांच्या व्यवहाराबद्दल उबग आल्यामुळे स्वतंत्रपणे पत्रकारी लेखन करायचा काही मार्ग असेल तर शोधावा, इतकीच खटपट होती... शिवाय आपल्याला पाठपुरावा करत राहावा वाटतो आणि तसं करायला जमतं त्याच विषयांपुरतं हे लेखन मर्यादित ठेवलं” (पृ. १४, १५).

लेखकाची लेखनाविषयीची भूमिका कोणती आहे आणि ब्लॉगवर नोंदी करण्यामागचा हेतू कोणता हे त्यांच्याच शब्दांतून स्पष्ट व्हावं, म्हणून हे इथे नोंदवलं. लेखकाला ‘मुख्यप्रवाही माध्यमांच्या व्यवहाराबद्दल उबग’ का आला असेल, याचा उलगडा वाचकाला ‘माध्यमं’ या विभागातील लेख वाचल्यानंतर होतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

१.

तर ‘माध्यमं’ या पहिल्या विभागाविषयी. ‘ख़बर वहीं जगजानी हैं’ या लेखात रजत कपूर यांच्या ‘आँखों देखी’ या सिनेमावर लिहिलंय, पण हे रूढार्थाने चित्रपट समीक्षण नाही. चित्रपटाचा जो मूळ गाभा आहे तो पकडून, ते आसपासच्या घटनांवर भाष्य करतात. माध्यमांच्या एकांगी, एककल्ली होण्यावर टिप्पणी करतात. सगळ्या गोष्टी काळ्या- पांढऱ्या रंगांत रंगवल्या जात आहेत आणि तद्दन ‘खोट्या’ बातम्यांचा मारा चोहींकडून करून त्या ‘खऱ्या’ आहेत, असं वाटायला भाग पाडलं जातंय. तर हा माध्यमांचा कावा हाणून पाडण्यासाठी सिनेमातल्या बाऊजीसारखं अनुभवांनाच प्रमाण मानायला हवं, असा संस्कार या लेखातून होतो.   

२०१३ साली ‘पेड न्यूज’च्या समस्येविषयी माहिती तंत्रज्ञान स्थायी समितीने एक अहवाल लोकसभेत सादर केला होता. त्याबाबत ‘ ‘पेड न्यूज’संबंधीच्या अहवालाचा सारांश’ या लेखात साद्यंत माहिती दिली आहे. मूळ प्रश्न, त्यातील गुंतागुंत, त्याचे विविध क्षेत्रांवरील परिणाम, उपाय अशा सूत्ररूप पद्धतीने ही माहिती दिलेली आहे.

यातून एक मुद्दा ठळकपणे पुढे येतो, तो म्हणजे माध्यमांमध्ये खाजगी कंपन्यांची कार्यपद्धती, मूल्यपद्धती शिरकाव करत गेली, तसे पत्रकारांचे पगार वाढले, पण त्यांनी त्यांचं स्वातंत्र्य मात्र गमावलं. आणि त्याचा परिणाम आजच्या पत्रकारितेच्या पतनाशी आपण जोडू शकतो. त्यांनी माध्यमांचं सरकारच्या तालावर काम करणं याबाबतीत ‘एक बातमी, एक बदली...’ या लेखात नोंद केली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आदी समाजमाध्यमांवरून होणारा जाहिरातींचा मारा, हा फेसबुकवापरकर्त्यांच्या व्यक्तिगत, खाजगी माहितीचा वापर करून, कशा पद्धतीने नियोजनपूर्वक होत असतो, हे ‘तुम्हीच जाहिरात आहात!’ या लेखात स्पष्ट केलं आहे. अशा मंचांवर जाहिरातीचं तंत्र कसं राबवलं जातं, हे आकडेवारीनिशी मांडलं आहे.

एडवर्ड बर्नेस यांच्या ‘प्रॉपगॅन्डा’ या पुस्तकाचा यथोचित धांडोळा ‘माध्यमांचा गोंगाट, गुंगी आणि एडवर्ड बर्नेस’ या लेखात घेतलेला आहे. पुस्तकातील महत्त्वाचे मुद्दे अग्रभागी ठेवून प्रॉपगॅन्डाचं महत्त्व उद्योगविश्वासोबतच राजकारणी लोकांनाही चांगलंच ठाऊक असतं आणि त्यात माध्यमांना अंकित करून लोकांना भुलवलं जातं, हे स्पष्ट केलेलं आहे.     

नोम चॉम्स्की यांच्या माध्यमांसंबंधीच्या एका लेखाचा अनुवाद ‘मुख्यप्रवाही माध्यमं असतात, तशी का असतात?’ या शीर्षकानिशी केलेला आहे. या लेखात अमेरिकी प्रसारमाध्यमांबाबत मतं मांडलेली असली, तरी ती आपल्याकडच्या आताच्या माध्यमसमूहांनाही तंतोतंत लागू होतील अशी आहेत. उदाहरणार्थ, मोठ्या माध्यमसमूहांवर मोठ्या कंपन्यांची मालकी आली की, प्रामाणिकपणे काम करता येत नाही. ती जागा सोडावी लागते, हे त्या प्रदेशातील वास्तव आज आपल्या इथे सर्रास दिसून येतं. सत्ता कशा पद्धतीने माध्यमांवर नियंत्रण ठेवू पाहते आणि बड्या भांडवलदारांच्या साहाय्याने सत्य सांगणाऱ्या माध्यमांवर कशी आफत आणली जाते, याचं विवेचन या लेखात सापडेल.

वर्तमानपत्री अग्रलेखांतील शेरेबाजीवर तत्काळ मतं बनवणं, हे किती अयोग्य ठरू शकतं हे त्यांच्या ‘ ‘रिअक्शनरावांच्या राड्या’वरची रिअक्शन’ या लेखातून कळतं. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांचा ४ जुलै २०१३ रोजीचा ‘रिअक्शनरावांचा राडा’ हा अग्रलेख इजिप्तमधील काही घडामोडींवर भाष्य करणारा होता. या अग्रलेखातील विस्कळीत शेरेबाजी तर डोंगरे दाखवून देतातच, पण ‘क्रांती’सारख्या घडामोडी (अण्णा आंदोलन) आणि इजिप्तमधला उठाव यांच्यात फरक आहे, हे सांगताना ते जो युक्तिवाद करतात, त्यातून त्यांचा अभ्यास, प्रश्न मुळातून समजून घेण्याची असोशी, चिकाटी, प्रश्नाच्या अनुषंगाने येणारा व्यासंग यांचा परिचय होतो.

डोंगरे अशा प्रकारच्या उथळ अग्रलेखांतून जनमानसाचा सोशल मीडिया, राजकारण यांबाबत चुकीचा ग्रह होऊन, भलत्या साधनांवर विसंबून राहण्याचं प्रमाण वाढेल आणि पदरी भ्रमनिरासच येईल, हे अधोरेखित करतात. त्यांची आत्मटीकेला सामोरे जाण्याची वृत्तीही या लेखातून जाणवते.

‘भाषा आणि सत्ता’ या विषयावर वाचलेला एका परिषदेतील निबंध ‘सत्याचं सातत्य की सत्तेचं सातत्य?’ या शीर्षकानिशी आलेला आहे. हा लेख मराठी मुद्रित माध्यमांची सद्य:स्थिती फार अभ्यासपूर्वक समोर आणणारा आहे. २०१४ सालच्या निवडणूक काळात ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘लोकमत’ या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या जाहिरातींचा संदर्भ देऊन माध्यमांच्या नफेखोर, काही वेळा पक्षपाती वाटणाऱ्या स्वरूपावर टिप्पणी केली आहे. डोंगरे वर्तमानपत्रांतील मजकूर, जाहिराती यांकडे किती बारकाईने, गांभीर्याने पाहतात हे लक्षात येतं.

अमेरिकेतील २०१६च्या निवडणुकीचे वार्तांकन करण्यासाठी ‘लोकसत्ता’ दैनिकाचे संपादक गिरीश कुबेर हे अमेरिकेत गेले होते. त्यांनी तिथून पाठवलेली वार्तापत्रं तेव्हा ‘लोकसत्ता’च्या पहिल्या पानावर प्रकाशित होत होती. पण त्यांत उथळ शेरेबाजीच अधिक होती, हे डोंगरे एका वाचकाचं त्याच दैनिकात प्रकाशित पत्र देऊन स्पष्ट करतात व लिहितात की, “...त्याच्या पत्रामध्ये जागतिक सत्तारचनेचं जे भान दिसतं, त्याची चुणूकही संपादकांच्या (म्हणजे गिरीश कुबेर यांच्या) लेखात दिसत नाही.” (पृ. १७२).

कुबेर यांच्या एका प्रसंगी अग्रलेख मागे घेण्याच्या भूमिकेवरही टीका केली आहे आणि त्यांची निवडक जात-वर्गाला प्राधान्य देण्याची प्रवृत्तीही उघड केली आहे. डोंगरे अनेक दाखले देऊन कुबेर यांचा वैचारिक उथळपणा, विषयाची नेमकी समज आणि अभ्यास नसताना शाब्दिक शेरेबाजी करण्याची सवयही अधोरेखित करतात. हे करताना ते अग्रलेखांतील वाक्यं, त्या वर्तमानपत्रातील अग्रलेखांत व्यक्त झालेल्या मजकुराच्या विरोधी जाणारा जाहिरातीतील मजकूर (‘स्वच्छ, स्पष्ट, साक्षेपी दिशादर्शन’), वाचकांच्या पत्रातील मजकूर यांचा धांडोळा घेतात, संदर्भ देतात. त्यांचा ‘ ‘पाडा’तले प्रश्न, पालघर, बारसू आणि पश्चिम पापुआ’ हा अत्यंत अभ्यासपूर्वक आणि संयत भाषेत लिहिलेला लेख आहे. इतका संयत की, ‘लोकसत्ता’च्या विद्वत्तेची झूल पांघरलेल्या संपादकांवर टीका करतानाही त्यांनी सौम्य शब्दांत कोरडे ओढले आहेत.

‘फलक तक चल साथ मेरे’ या लेखातून निवडणुकीच्या काळातील राजकीय पक्षांच्या जाहिराती करणाऱ्या फलकांवरील मजकुराची समीक्षा केली आहे. ‘सेन्सॉरलेली मनं...’ या लेखात २०१४ सालच्या निवडणुकांच्या काळात माध्यमं राजकीय नेत्यांना कशा पद्धतीचे प्रश्न विचारत होते, त्यांच्या प्रतिमा कशा तऱ्हेने घडवल्या जात होत्या, हे मोदी, राज ठाकरे यांच्या संदर्भातील घडामोडी सांगून कथन केलं आहे. त्या काळातील प्रिंट आणि वृत्तवाहिन्यांवरील पत्रकारांच्या भूमिका तपासल्या आहेत. आणि आणीबाणीतल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबतीतल्या एका फारशा चर्चेत नसलेल्या पुस्तकाचा संदर्भ देऊन चर्चा केली आहे.      

डोंगरे यांच्या लेखनाचा ठरीव असा साचा नाहीय. ते विषयाची निवड, मांडणी पारंपरिक पद्धतीने करतीलच असं नाही. त्यामुळे माधुरी दीक्षितच्या गाण्याचा संदर्भ घेऊन किर्केगादच्या पत्रकारांवरच्या टिप्पणीपर्यंत ते रपेट घडून आणू शकतात (‘माधुरी दीक्षित, घागरा, माध्यमं...’). गोरं दिसावं म्हणून होणाऱ्या क्रीमच्या जाहिरातींवर भाष्य करताना त्यांना लोहियांच्या गौरवर्ण-सावळेपणा यासंबंधी पुराणातील उदाहरणं देऊन केलेल्या विश्लेषणाचा दाखला त्यांना द्यावासा वाटतो आणि तो त्या जागी अस्थानी वाटत नाही (‘अवघा रंग एक झाला...’).

त्यांनी काही वाहिन्यांवरील जाहिरातींचं त्यांच्या आशयाच्या अंगाने विश्लेषण केलेलं आहे. त्यातून लिंगभेद, वर्णभेद कशा पद्धतीने प्रछन्नपणे प्रसृत होत असतो, हे सप्रमाण दाखवून दिलंय. जाहिरातींत उमटणारं स्त्रीचं चित्र प्रामुख्यानं तपासलं आहे. काही वेळा जाहिरातींच्या विश्लेषणातून कळीच्या प्रश्नांवर, महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केल्याचंदेखील दिसून येतं. मोबाईल वा टीव्ही माध्यमांच्या स्क्रीनवरील सातत्यानं होणारी दृश्यांची स्थलांतरं आपल्या कोणत्याही विषयांवरील प्रतिक्रिया ढोबळपणाकडे कशा वळवत आहेत, हे ‘दृश्यांची स्थलांतरं’ या लेखात अधोरेखित केलं आहे.

त्यांनी छोट्या स्तरावर आणि तेही नक्षलवादग्रस्त प्रदेशातील आदिवासी समूहासाठी व्यक्त होण्याचा मंच उभारणाऱ्या शुभ्रांशु चौधरी यांच्या कार्याची माहिती त्यांची मुलाखत घेऊन दिली आहे (‘खऱ्या सोशल मीडियाच्या शोधात’). चौधरी यांच्या कामाचा प्रभाव मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये कशा पद्धतीने उमटला, हे यातून कळतं. डोंगरे मुलाखतीच्या आधी चौधरी यांच्या कार्याबाबत छोटीशी टीप देतात. त्यामुळे मुलाखतीत आलेले काही कार्यविशिष्ट संदर्भ अधिक स्पष्ट होतात.

अमेरिकेच्या सुरक्षायंत्रणेकडून माध्यम-तंत्रज्ञान व्यवहारातील काही खाजगी कंपन्यांकडल्या ग्राहकांच्या माहितीचा वापर व तपासणी होणं, ही घटना उघड करणाऱ्या एडवर्ड स्नोडेन याच्या या कृत्याच्या निमित्तानं अधिक खोलात जाऊन तंत्रज्ञान, माध्यमं आणि सत्ता यांच्या एकत्रित येण्यातून काय घडतं वा घडू शकतं, याची चर्चा ‘अमेरिका, माध्यमं व एक पुस्तक क्रांतिकारी की पहारेकरी?’ या लेखात केली आहे. शीर्षकातील एक पुस्तक आहे – ‘सायफरपंक्स : फ्रीडम अँड द फ्युचर ऑफ द इंटरनेट’. या पुस्तकातील मुद्यांची ओळख करून देताना या पुस्तकातील लेखकांच्या मांडणीतले अपुरेपणही स्पष्टपणे नोंदवलं आहे.

या विभागातील काही लेख, मुलाखती या दहा-बारा वर्षांपूर्वीच्या असल्या तरी त्यांत चर्चा झालेले प्रश्न आजही कायम आहेत. आणि डोंगरे आवश्यक तेथे अधिक माहिती देणाऱ्या टिपा देतात. त्यामुळे विशिष्ट घटनेची आजची स्थितीसुद्धा स्पष्ट होते. या टिपांत अनेक महत्त्वपूर्ण वाटावीत अशी पुस्तकं, नियतकालिकं यांची नावं आलेली आहेत. ती अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरतील. तसेच हे लेख, मुलाखती या गोष्टी नव्याने या क्षेत्रात काहीएक आदर्श घेऊन दाखल होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आवर्जून वाचायला हव्यात. आजघडीला भ्रष्ट, नैतिक पतन होऊ घातलेल्या या क्षेत्राची नीट ओळख होण्यासाठी हे वाचन अनिवार्य आहे.  

२.

‘माध्यमं’ या विभागाला जोडूनच जर ‘आजूबाजूचं काही’ या विभागातील लेख वाचले, तर आजच्या सामाजिक स्थितीचं नेमकं चित्र उभं राहायला मदत होईल, असं वाटतं. या विभागातील ‘बिहारचे गांधी...’ हा लेख खूप महत्त्वपूर्ण आहे. यात बिहारमधील रणवीर सेनेच्या दलितांविरोधातील हत्याकांडांची माहिती दिली आहे. त्यातून या प्रदेशातील भीषण जातीय राजकारणाचा परिचय घडतो. हिंसाचाराच्या या प्रकारानंतर डोंगरे माओवादी आणि सरकार अशा दोन्ही बाजूंनी होणाऱ्या हिंसेचा शोध घेण्याचा प्रयत्नदेखील याच लेखात करतात.

ते दोन्ही बाजूंनी घडणाऱ्या हिंसाचाराची उदाहरणं देतात, पण माध्यमांकडून केवळ एकाच बाजूच्या हिंसेची तेवढी दखल घेतली जाते आणि त्याच्या मागे असलेल्या मूळ प्रश्नांकडे तर पाहिलंच जात नाही, अशी खंत व्यक्त करतात. ते तृणमूल स्तरावर काय परिस्थिती आहे, हे त्या भागातील लोकांना भेटून त्यांच्याशी बोलून जाणून घेतात व आपल्यापर्यंत पोहचवतात. त्यांनी २०१५ साली गडचिरोली येथे झालेल्या जनसंघर्षांच्या राष्ट्रीय परिषदेचा वृत्तान्त ‘आधीपासूनच्या लोकांचं काय झालं?’ या लेखात दिला आहे. या वृत्तांताच्या निमित्ताने नक्षलवादाची समस्या, आदिवासींचे प्रश्न, भांडवलदार-सरकार यांच्या संगनमताने गडचिरोली व आसपासच्या परिसरात होणारी नैसर्गिक संसाधनांची लूट, त्या विरोधात उभा राहणारा संघर्ष या सगळ्या विषयांची सविस्तर माहिती ते देतात.

२०१७ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गडचिरोली जिल्हापरिषदेत सदस्य म्हणून निवडून गेलेल्यांपैकी लालसू नोगोटी यांची डोंगरे यांनी घेतलेली मुलाखत ‘लालसू नोगोटी यांची मुलाखत’ या शीर्षकानिशी आलेली आहे. ही मुलाखत वाचल्यावर स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या या माणसाला असलेली लोकशाही, विकास या संकल्पनांची ओळख ही लाखो मतं मिळवून नंतर व्यक्तिगत आणि पक्षाची भरभराट करणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या उमेदवारापेक्षा अधिक आहे, हे आपल्या लक्षात येतं.      

नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून २०११ साली अटक झालेल्या सोनी सोरी यांच्यावर पोलिसांकडून भीषण अत्याचार झाल्याचं प्रकरण गाजलं होतं. सोनी सोरी यांनी २८ जुलै २०१२ रोजी रायपूरमधील तुरुंगातून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना उद्देशून लिहिलेल्या पत्राचा अनुवाद डोंगरे यांनी केला होता. तो या भागात ‘त्यापेक्षा फाशीची शिक्षा...’ या शीर्षकानिशी समाविष्ट करण्यात आला आहे. या पत्रातून पोलिसी व्यवस्थेचा क्रूर, अमानूचेहरा समोर येतो. 

‘ ‘पाडा’तले प्रश्न, पालघर, बारसू आणि पश्चिम पापुआ’ हा लेख अनेकार्थाने वाचनीय आहे. महामार्ग असो किंवा रिफायनरी असो किंवा आणखी कुठला प्रकल्प असो आणि तो कोणत्याही देशातील असो, सत्तेचं दडपशाही करणारं चरित्र सर्वत्र समानच असतं, हे या लेखातून स्पष्ट होतं. त्यांनी नैसर्गिक संसाधनांची लूट करून भांडवलदारांची धन करणाऱ्या सरकारांची जनताद्रोही वृत्ती या लेखातून उघड केली आहे.

अयोध्येतील राममंदिराच्या बांधकामाची पायाभरणी ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधानांच्या हस्ते झाली. त्यानंतर डोंगरे यांनी साधारण महिन्याभरानंतर ‘हाक अयोध्येची आणि टाकीबंद स्मृती’ हा लेख लिहिला. पंतप्रधानांच्या भाषणातील काही भाग देऊन हा सगळा प्रकार भारतातील बहुविधतेच्या परंपरेला धक्का लावणारा आहे हे सांगताना ते एकाच टाकीत साठवलेल्या पाण्याचं रूपक वापरतात. ते उजव्या विचारसरणीवर टीका करताना मोघम, ठरीव साच्यातील भाषा वापरून तीच ती टीका करत नाहीत.

उजव्या विचारसरणीचा प्रसार करणारं साहित्यदेखील ते वाचतात आणि त्यांचा संदर्भ देऊन टीका करतात. तसेच डाव्यांच्या दडपशाहीवरही आसूड ओढतात. दोन्ही बाजूच्या मंडळींना परस्परविरोधी मतं, विचारांतील अपुरेपणा दर्शवणारी मतं फारशी रुचत नाहीत आणि त्यातून विसंवाद होतो. या प्रक्रियेला डोंगरे टाकीबंद पाण्याची उपमा योजतात. दोन्ही बाजूने अशा आपापल्या विचारांच्या टाक्या बांधल्या जातात पण प्रवाही, वाहत्या पाण्याला महत्त्व दिलं जात नाही, अशी खंत ते व्यक्त करतात.     

भीमा कोरेगाव प्रकरणात आनंद तेलतुंबडे यांना झालेली अटक, त्या वेळी केले गेलेले दावे, कोर्टातले वादविवाद, त्यावर माध्यमांत उमटलेल्या प्रतिक्रिया यांचा आढावा ‘दोन टोकांदरम्यानचं अंतर’ या लेखात घेण्यात आला आहे.  

३.

 ‘भाषावापर’ या विभागातील लेख मराठी प्रमाण भाषा, बोली भाषा आणि या दोहोंसमोर आव्हान उभं करणारी इंग्रजी भाषा यांची समाजव्यवहारातील सद्य:स्थिती काय आहे, तसेच विविध क्षेत्रांत आणि माध्यमांत वापरली जाणारी मराठी भाषा योग्य पद्धतीने वापरली जाते वा नाही, अशा अनेक बाबींचा धांडोळा घेतात. ‘झोपडपट्टी, दादा आणि ताई’ या लेखात एका कायद्याच्या वर्तमानपत्रात आलेल्या मराठी भाषांतरातील एक शब्द कसा अयोग्य आहे आणि त्याऐवजी कोणता प्रतिशब्द वापरायला हवा, हे स्पष्ट केलं आहे. असं न करण्यामुळे एका विशिष्ट वर्गातल्या विशिष्ट ठिकाणी राहणाऱ्या लोकांबद्दल आधीपासूनच ‘इतर’ वर्गांच्या मनात जे पूर्वग्रह आहेत, ते अधिकाधिक बळकट कसे होऊ शकतात, हे सोदाहरण स्पष्ट केलं आहे. वर्तमानपत्रांचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यांत आलेला एखादा शब्द पटकन समाजात रुजतो. त्यामुळे त्यांतल्या भाषेची चिकित्सा जरुरीची होऊन बसते. डोंगरे या भाषेकडे खूप सूक्ष्मपणे पाहतायत असं दिसतं.

‘इंग्रजीची जादू आणि तलवार...’ या लेखात इंग्रजीचं छोट्या शहरांतदेखील वाढत असलेलं स्तोम आणि लोहियांच्या पुस्तकातून इंग्रजीविरोधी आलेली मतं, अभिजनांचं भाषाधोरण ठरवण्यातलं राजकारण, त्यातून टिकवलं जाणारं वर्चस्व यांचा परामर्श घेतला आहे.

महेश एलकुंचवार यांनी ‘मराठी शाळांसाठी मध्यमवर्गीयांनी पुढाकार घ्यावा’ असं विधान एका कार्यक्रमात केल्याची जी बातमी आली होती, तिचा धागा पकडून एलकुंचवार यांच्या मराठी भाषेकडे पाहण्याच्या दृष्टीतील उणिवा डोंगरे यांनी उजागर केल्या आहेत. एलकुंचवार यांनी २०१३ साली एका कार्यक्रमात ‘शिक्षणाचं माध्यम इंग्रजी चालेल, घरात मराठीत बोला’ असं एक विधान केलं होतं. या दोन्ही विधानांतील दोष, तसेच विसंगती ‘साहित्य संमेलन, शाळांचं अनुदान...’ या लेखात मांडल्या आहेत. त्यावर परखड टीका केली आहे.

दुसऱ्या विधानातील एका ठरावीक वर्गाला डोळ्यासमोर ठेवून सांगितलेला उपाय हा कसा अपुरा व हास्यास्पद आहे आणि त्यातून तुच्छतावाद कसा अधोरेखित होतो, हेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. या विभागातील काही लेख मात्र थोडे त्रोटक वाटले आणि त्यांतला मुद्दा अधिक विस्तार करून यायला हवा होता असं वाटलं. 

४.

‘साहित्य’ या विभागात काही लेखकांच्या मृत्यूनंतर तातडीने लिहिलेले, तर काही थोडा काळ उलटून गेल्यावर लिहिलेले लेख आहेत. तसेच काही लेख हे पुस्तक समीक्षण करणारे, तर काही प्रासंगिक घडामोडींनंतर लिहिलेले आहेत. काही लेखांतून काही लेखकांच्या ठरावीक भूमिकांवर, निवडक वक्तव्यांवर अभ्यासपूर्वक भाष्य केलेलं आहे.  

विलास सारंग यांच्या ‘मराठी साहित्य आणि जातिव्यवस्था’ या संबंधातील मांडणीची चिकित्सक समीक्षा ‘लेखकाचं क्षेत्र’ या लेखात केली आहे. सारंग यांच्या या संदर्भातील वक्तव्यांतील कमकुवत दुवे त्यांनी नेमकेपणे पकडले आहेत. तसेच सारंग यांच्या मांडणीतील काही भाग हा कसा त्यांनी मांडणी करायच्या दहा-पंधरा वर्षं आधीच शरद् पाटील यांच्या लेखनात येऊन गेला होता, पण सारंग या कामाचा वापर वा उल्लेखही त्यांच्या मांडणीत करत नाहीत, हेही साधार नोंदवलं आहे.

सारंग यांनी जातिविखंडन जर लिहिण्याच्या आड येत असेल, तर युरोपियन कादंबरीचं अनुसरण करून तात्त्विक बैठक असलेली कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न करायला हवा, असं म्हटलं होतं. हे विधान खोडून काढणारं विवेचन डोंगरे करतात. यातून त्यांची स्वतंत्र विचार करण्याची दृष्टी आणि क्षमता यांचा परिचय होतो.

असाच प्रत्यय भालचंद्र नेमाडे यांच्यासंबंधी लिहिलेल्या ‘अति मुलाखती आणि कंटाळा’ या लेखातही येतो. प्रवीण बांदेकर यांनी नेमाडे यांची घेतलेली मुलाखत ‘लोकसत्ता’ या दैनिकाच्या ‘लोकरंग’ या रविवार पुरवणीत ३० ऑगस्ट २०२० रोजी प्रकाशित झाली होती. त्या निमित्ताने डोंगरे यांनी हा लेख लिहिला आहे. नेमाडे यांच्या मांडणीतले अनेक अंतर्विरोध डोंगरे यांनी अतिशय अभ्यासपूर्वक नमूद केले आहेत. देशीवादाचं भूतकाळात अडकून राहणं, आक्रमक राष्ट्रवादाला पर्याय होण्यातल्या त्याच्या मर्यादा आदी बाबींची सखोल चर्चा केलेली आहे.

नेमाडे यांच्या मुलाखती, भाषणं यांतील शेरेबाजी करणाऱ्या विधानांचीही मर्यादा दाखवून दिली आहे. त्यासाठी सुधीर रसाळ यांच्या ‘समीक्षक भालचंद्र नेमाडे’ या पुस्तकाचा आधार घेतला आहे. आणि डोंगरे यांच्या चिकित्सक नजरेतून रसाळांच्या मांडणीतलेही अंतर्विरोध सुटलेले नाहीत.           

जयंत पवार यांच्या निधनानंतर लिहिलेल्या लेखात त्यांच्या एका कथेच्या मुख्य पात्रासमोरचे पेच हे एका बंगाली कादंबरीच्या नायकासमोरच्या पेचांशी कसे मिळतेजुळते होते, हे अधोरेखित केलं आहे. पवार यांच्या लेखनाची प्रमुख वैशिष्ट्यं डोंगरे यांनी या छोटेखानी लेखातही व्यवस्थित नमूद केली आहेत. सुगावा प्रकाशनाच्या विलास वाघ यांच्या निधनानंतर लिहिलेल्या ‘विलास वाघ - अच्छा!’ या लेखात वाघ यांच्या व्यावसायिक कामाविषयी लिहिलं आहेच, पण या सगळ्यातही त्यांनी जपलेली माणुसकी, स्वभावातील निर्मळपणा, व्यावहारिक गोष्टींतला पारदर्शीपणा व मोकळेपणा, मतभिन्नतेचा अवकाश देणारी उदार वृत्ती या गोष्टी तत्संबंधीच्या आठवणी देऊन नमूद केल्यायत.

पुरुषोत्तम बोरकर यांच्या निधनानंतर लिहिलेल्या ‘मेड इन इंडिया...’ या लेखात डोंगरे लेखकाच्या मृत्यूनंतर वर्तमानपत्रांत आलेल्या बातम्यांच्या मजकुराची समीक्षा करतात. त्यातून नकळत डोंगरे यांच्या साहित्याकडून कोणत्या अपेक्षा आहेत वा साहित्याकडे कोणत्या दृष्टीने पाहिलं जाऊ शकतं वा पाहिलं जायला हवं, या गोष्टीही उमटतात.

त्यांनी बोरकरांच्या ‘मेड इन इंडिया’ या कादंबरीच्या भाषेबद्दल गौरवपर लिहिलं आहे. या कादंबरीतील नायकाची ‘कोसला’च्या नायकाशी बरोबरी करणं कसं चुकीचं आहे, हेही मांडलं आहे. या कादंबरीच्या मुखपृष्ठाचाही बारकाईने विचार केलेला आहे. नामदेव ढसाळ या कवीच्या मृत्यूनंतर लिहिलेल्या ‘नामदेव ढसाळांच्या निमित्ताने...’ या लेखात ढसाळ, मनोहर ओक, तुलसी परब यांच्या काही समान विषयांवरील कवितांचा तुलनात्मक विचार केलाय आणि चळवळ या शब्दाची त्या काळाच्या अनुषंगाने असलेली व्याप्ती वा या शब्दाचा अवकाश किती होता, याचाही विचार केलेला दिसून येतो.

उद्धव शेळके यांच्या ‘धग’ या कादंबरीच्या इंग्रजी आवृत्तीत आणि ती प्रकाशित करणाऱ्या प्रकाशनसंस्थेच्या संकेतस्थळावर दिलेली शेळके यांची परिचयात्मक माहिती, जेव्हा डोंगरे यांनी वाचली, तेव्हा त्यांना त्यात काही बाबी खटकल्या. त्या त्यांनी प्रकाशकांना कळवल्या, त्यांनाही त्या पटल्या आणि त्यांनी तातडीने संकेतस्थळावरील माहितीत बदलही केले. पण या घटनेच्या निमित्ताने डोंगरे उद्धव शेळके यांच्या चरित्रात्मक तपशिलांच्या उपलब्ध स्रोतांवरून त्यांच्या जीवनाचं काहीएक चित्र उभं करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी शोध घेताना जे संदर्भ समोर येतात, त्यांतल्या उणिवाही ते नोंदवतात.

शेळक्यांच्या कमी लिहिलं वा बोललं जाणाऱ्या इतर काही कादंबऱ्यांचीही (‘पोटासाठी पॉप्युलर...’) नेमकी ओळख करून देतात. अनिल अवचट यांच्या लेखकीय कारकिर्दीचा विचार करताना ते ‘पत्रकार’ अवचट आणि ‘ललित’ अवचट (म्हणजे निखळ ललित स्वरूपाचं लेखन करणारे या अर्थाने) असे दोन भाग कल्पितात. यातल्या पत्रकार अवचटांचं काम मौल्यवान आणि टिकाऊ आहे, असं मांडतात. त्यांच्या अशा लेखनावर अनेकांनी टीका केली होती. ती टीका किती निराधार आहे, हे डोंगरे दाखवून देतात. त्याच वेळी अवचटांच्या ललित लेखनातील उण्या बाजूही समोर ठेवतात. या स्वरूपाच्या लेखनातील अंतर्विरोध, विसंगती उदाहरणासह दाखवून देतात.     

डोंगरे यांनी मनोहर कदम लिखित ‘भारतीय कामगार चळवळीचे जनक : नारायण मेघाजी लोखंडे’ या पुस्तकाचा परिचय ‘दहा जून आणि नारायण मेघाजी लोखंडे’ या लेखात करून दिला आहे. लोखंडे यांची कृती ही अंशतः तरी मार्क्स विचाराशी सुसंगत होती, असं डोंगरे यांनी म्हटलंय. पण माकपच्या ‘हिस्ट्री ऑफ द कम्युनिस्ट मूव्हमेन्ट इन इंडिया’ या ‘अधिकृत’ पुस्तकात लोखंड्यांचा पुसटसाही उल्लेख नाही, हे वास्तवही त्यांनी अधोरेखित केलं आहे.

भाकपच्या ‘युगांतर’ साप्ताहिकात प्रकाशित झालेल्या टिळकांवरील लेखात तथ्यांकडे दुर्लक्ष करून केलेल्या शेरेबाजीचाही समाचार घेतला आहे. ‘आंद्रे शिफ्रीन, पुस्तकांचा बाजार आणि मिसळ’ या लेखात शिफ्रीन यांच्या ‘द बिझनेस ऑफ बुक्स’ या पुस्तकातील प्रकाशन व्यवसाय किंवा एकूणच माध्यम व्यवहार यांविषयी आलेल्या मतांचं विश्लेषण केलं आहे. 

डोंगरे यांना शकु नी. कनयाळकर अशा टोपणनावाने अनुवाद झालेलं ‘थोडाबहुत काफ्का’ हे पुस्तक अवचित एका दुकानात सापडतं. या पुस्तकातील ‘द ट्रायल’ या काफ्काच्या कादंबरीचा अनुवाद जेव्हा डोंगरे इंग्रजी अनुवादाशी ताडून पाहतात, तेव्हा त्यात आशयाच्या संप्रेषणात बाधा आणतील इतक्या गंभीर चुका आढळून येतात. त्या कोणत्या हे एका लेखात डोंगरे उदाहरणांसह मांडतात. तसेच पुस्तकातील काही जमेच्या बाजूदेखील ते नोंदवतात. हे भाषांतर कोणी केलं असेल, या कुतूहलातून ते टोपणनावाआड दडलेल्या अनुवादकाचा शोधही घेतात.    

य. दि. फडके यांचे लेख, वर्तमानपत्रातील वादविवादात्मक स्वरूपातील लेखन यांचं पुस्तक वासंती फडके यांनी संपादित करून ‘वाद-प्रतिवाद’ या शीर्षकानिशी २०१२ साली प्रकाशित केलं होतं. डोंगरे यांनी २०२१ साली या पुस्तकावर नोंद लिहिली. ती ‘विरून चाललेले वाद-प्रतिवाद’ या शीर्षकानिशी ग्रंथबद्ध केलेली आहे. डोंगरे या लेखात फडक्यांच्या कष्ट घेऊन, मूळ कागदपत्रं तपासून, तथ्यांची चिकित्सा करून मांडणी करण्याचं कौतुक करतात, तसंच त्यांच्या विवेचनातील त्रुटीही नमूद करतात. गंभीरपणे संशोधन करणाऱ्या लेखकांची पुस्तकं वाचनव्यवहाराच्या, संस्कृतिव्यवहाराच्या केंद्रस्थानी येत नाहीत, याची खंत डोंगरे व्यक्त करतात. असं होण्यामागची कारणंही विशद करतात.

अरुण शौरी यांचं दोषपूर्ण, अपुऱ्या माहितीवर आधारलेलं, एकांगी लेखन आणि तरीही त्यांनी घडवलेली बुद्धिजीवी वर्तुळातील करिअर, राजकारणातील प्रवेश यांच्या तुलनेत निःपक्षपातीपणे इतिहास लेखन करणाऱ्या, शौरी यांना चोख प्रत्युत्तर देणाऱ्या फडक्यांची उपेक्षा झाली, त्यांची पुस्तकंही सहजी उपलब्ध होत नाहीत, हेदेखील ते खेदाने नमूद करतात. यातून मराठी विचारव्यवहार, वाङ्मय व्यवहार यांचा कोतेपणा, खुजेपणा तर दिसतोच, पण एका ठरावीक विचारधारेला चर्चेच्या अवकाशात खेळतं ठेवण्याचं राजकारणही दिसून येतं.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

५.

डोंगरे एकाच घटनेभोवती फिरणारे अनेक संदर्भ, वेगवेगळ्या माध्यमांतील दोन्ही बाजूंची मतमतांतरं जमवतात. त्यांच्या समोर असणाऱ्या पसाऱ्यातून त्यांना ठिपके जोडत जोडत व्यापक चित्र उभं करायचं असतं. पण हे काम तर साधा पत्रकारही करेल. डोंगरे यांच्या लेखनाचं वेगळेपण, वैशिष्ट्य, खुबी अशी की, असे ठिपके जोडून उभ्या केलेल्या चित्राचं जे विश्लेषण ते करतात, त्यामागे असलेली त्यांची कळकळ जाणवते; वैचारिक दृष्टिकोनातील स्वच्छता, पारदर्शीपणा दिसून येतो, न्याय्य, समताधिष्ठित समाजाचं स्वप्न, सामान्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीची आस वाक्यावाक्यांतून जाणवते.

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. हजारो करोडो रुपयांची उलाढाल असणाऱ्या वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी पाहता येणार नाहीत किंवा ज्या गोष्टी तिथे दाखवल्या जाणार नाहीत, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.

या पुस्तकाच्या प्रामाणिक वाचनानंतर आपल्या घरी येणाऱ्या वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांना मिळणारी जागा, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच आसपास घटित होणाऱ्या सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल. आणि हेच या पुस्तकाचं खरं यश आहे.

‘रेघ’ - अवधूत डोंगरे | शब्द पब्लिकेशन, मुंबई | पाने - ५६८ | मूल्य - ८५० रुपये.

..................................................................................................................................................................

लेखक विकास पालवे प्रकाशन व्यवसायात कार्यरत आहेत.

vikas_palve@rediffmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......