दिलीप माजगावकर मराठी प्रकाशनक्षेत्रात ‘मशागतीच्या माळीकामा’त रमले. त्यांनी वाचकांच्या मनात चांगल्या साहित्याची जाण पेरली
ग्रंथनामा - झलक
प्रशांत दीक्षित
  • ‘पत्र आणि मैत्र’, ‘वाणी आणि लेखणी’ या पुस्तकांची मुखपृष्ठं आणि दिलीप माजगावकर
  • Wed , 13 December 2023
  • ग्रंथनामा झलक दिलीप माजगावकर Dilip Majgaonkar राजहंस प्रकाशन Rajhans Prakashan पत्र आणि मैत्र Patra aani Maitra वाणी आणि लेखणी Vani aani Lekhani

राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर यांनी ११ नोव्हेंबर २०२३ रोजी वयाची ८० वर्षं पूर्ण करून ८१व्या वर्षांत पर्दापण केले. त्यानिमित्ताने ‘वाणी आणि लेखणी’ हे त्यांच्या निवडक भाषणांचं व लेखांचं पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आहे. यात मधू गानू, विजय तेंडुलकर, सुरेश द्वादशीवार, विजया मेहता, गिरीश कार्नाड, मंगेश पाडगावकर, सई परांजपे, भास्कर चंदावरकर, नरेन्द्र चपळगावकर, विनायकदादा पाटील इत्यादींविषयी निमित्तानिमित्ताने केलेल्या ३० भाषणांचा समावेश आहे. त्याचबरोबर कविवर्य मंगेश पाडगावकरांनी माजगावकरांना लिहिलेलं पत्र आणि माजगावकरांनी ज्येष्ठ बंधू श्रीगमा, बहीण कुमुद, विजय तेंडुलकर, पं. जितेंद्र अभिषेकी, वसंत सरवटे, अरुण साधू, आचार्य अत्रे, मंगेश पाडगावकर, अनिल बर्वे, बाबासाहेब पुरंदरे, भाऊसाहेब बांदोडकर यांच्याविषयी लिहिलेल्या लेखांचा समावेश आहे. प्रशांत दीक्षित, मंगला आठलेकर, रेखा माजगावकर, डॉ. सदानंद बोरसे, सारंग दर्शने या संपादक मंडळाने सिद्ध केलेल्या या ग्रंथाला प्रशांत दीक्षित यांनी लिहिलेल्या संपादकीय मनोगताचा हा संपादित अंश…

.................................................................................................................................................................

मराठी साहित्यक्षेत्रात गेली ६० वर्षे सजगपणे वावरणाऱ्या आणि त्यातील ४० वर्षे या क्षेत्रावर ‘राजहंस’ची मुद्रा ठसठशीतपणे उमटवणाऱ्या दिलीप माजगावकर यांनी विविध प्रसंगी दिलेल्या भाषणांचा व त्यांनी सुहृदांच्या कोरलेल्या शब्दशिल्पांचा हा संग्रह आहे. मागील शतकातील ४० वर्षे व या शतकातील २३ वर्षे माजगावकरांनी डोळसपणे पाहिली आहेत. नुसती पाहिली नाहीत; तर आपले क्षेत्र आखून घेऊन त्यात ते रमले आहेत, सहभागी झाले आहेत आणि प्रसंगी योग्य ते अंतर राखून त्यांनी या ६० वर्षांतील घडामोडींची मौज अनुभवली आहे. जशी मौज अनुभवली, तसेच चिंतनही केले आहे. त्यांनी अनेक लेखक पाहिले, मोजक्या मान्यवरांशी त्यांचे स्नेहबंध जुळले.

प्रकाशनव्यवसायात थोडी चाचपडत सुरुवात केल्यावर थोड्याच काळात वाचकांनी चकित व्हावे असे प्रकल्प यशस्वीपणे हाताळले, आर्थिक चणचणीतून हिमतीने बाहेर पडून पुढे कोट्यवधींच्या उलाढाली केल्या, केवळ लेखकच नव्हे, तर प्रकाशनक्षेत्राशी संबंधित अनेकांच्या खासगी आयुष्यातील चढउतारांमध्ये सहृदयतेने सहभाग घेतला; मात्र हे सर्व करताना त्यांचा चिंतनशील स्वभाव सुटला नाही.

दिलीपरावांचे लेखन, भाषणे, मुलाखती वाचताना जाणवणारे त्यांच्यातील महत्त्वाचे गुण म्हणजे त्यांची निरीक्षणशक्ती व चिंतनशीलता. यातील सातत्य विस्मयचकित करणारे आहे. ही निरीक्षणशक्ती व चिंतनशीलता व्यक्तीबद्दल दिसते, व्यवसायाबद्दल दिसते, साहित्याबद्दल दिसते आणि त्यापलीकडे अवघ्या समाजाबद्दल दिसते. दिलीपराव ही व्यक्ती त्यांच्या भिडस्त स्वभावामुळे स्वतःला लेखक मानत नसली, तरी त्यांच्या लेखनातून हे चिंतन अल्पाक्षरात आणि म्हणूनच रेखीवपणे प्रकट होत असते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

दिलीपरावांच्या अशा बहुपेडी व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देणे, हे या संग्रहांचे प्रयोजन. स्वत:बद्दल लेखन करणे किंवा स्वत:वर लिहून घेणे, हे त्यांच्या स्वभावात बसणारे नाही. यामुळे आत्मचरित्र वा चरित्र हे प्रकार बाद झाले. मग त्यांची पत्रे, त्यांची भाषणे व त्यांनी केलेले व्यक्तिचित्रण, तसेच त्यांनी दिलेल्या मुलाखती या दोन पुस्तकांमध्ये (‘वाणी आणि लेखणी’ व ‘पत्र आणि मैत्र’) संकलित करून त्यातून हे बहुपेडी व्यक्तिमत्त्व वाचकांसमोर ठेवण्याचा संकल्प झाला.

बऱ्याच प्रयत्नाअंती आणि वाचकांच्या सुदैवाने त्याला दिलीपरावांची संमती मिळाली. त्यातून ‘पत्र आणि मैत्र’ तसेच ‘वाणी आणि लेखणी’ हे दोन संग्रह वाचकांसमोर येत आहेत. भाषणे आणि व्यक्तिचित्रे या संग्रहात आहेत; तर दिलीपरावांनी लिहिलेली पत्रे, त्यांच्यावरील लेख आणि विस्तृत मुलाखत ही दुसऱ्या संग्रहात आहे. वर उल्लेख केलेल्या चिंतनशीलतेचा प्रत्यय या दोन्ही संग्रहांतून वाचकांना येईल. हे चिंतन शिष्टपणाने केलेले नाही व ते उपदेशामृत होत नाही, उलट अनौपचारिक गप्पांसारखे सहज होते, हे दिलीपरावांचे वैशिष्ट्यही यातून वाचकांच्या ध्यानी येईल.

जगातील ९५ टक्के माणसांची समस्या ही असते की, आयुष्यात काय करायचे आहे, याचा निर्णय ते शेवटपर्यंत घेऊ शकत नाहीत. आयुष्यात काय करायचे आहे, हे ठरवणे मुळात कठीण, ते ठरवल्यावर त्यानुसार आयुष्य आखणे त्याहून कठीण, त्यामध्ये यश येणे हे फारच कठीण आणि यश मिळाल्यानंतरही नम्रता राखून समाधानाने जगत राहणे सर्वांत कठीण.

दिलीपरावांच्या आयुष्यात या सर्व पायऱ्या पाहता येतात. दिलीपरावांच्या आयुष्यातील सुदैव असे की, या सर्व पायऱ्यांवर योग्य वेळी, योग्य असा मार्गदर्शक त्यांना भेटत गेला आणि मुख्य म्हणजे त्यांच्याकडून ते शिकत गेले. त्याचा आलेख व्यक्तिचित्रांत मिळतो, तसा भाषणांतही सापडतो.

.................................................................................................................................................................

*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*

वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...

पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा

https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166

.................................................................................................................................................................

‘माणूस’ साप्ताहिकातून दिलीपरावांच्या कामाची सुरुवात झाली. तेथे सर्व प्रकारचे काम ते करत होते. ‘माणूस’साठी मुंबईतून लेखक जमवण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडली आणि मराठी साहित्यक्षेत्रात पुढे नावाजलेले अनेक लेखक त्यांना जवळून पाहता आले. दिलीपरावांनी त्या वेळी अनुभवलेला काळ आणि त्यांना भेटलेली माणसे ही दोन्ही अद्भुत होती. ‘माणूस’साठी उत्तम साहित्य मिळवण्यात ते यशस्वी होत होते, तरीही दिलीपराव पत्रकारितेत रमले नाहीत. संपादक झाले नाहीत. हे आपले क्षेत्र नव्हे, हे त्यांना तरुण वयातच कळले. ‘माणूस’ साप्ताहिकाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रेस सुरू केला गेला. तो यशस्वी होऊनही दिलीपराव तेथेही रमले नाहीत. प्रकाशन हेच आपले क्षेत्र आहे, हे जाणवल्यावर त्यांनी त्या आवडीशी प्रतारणा केली नाही. उत्तम ललितलेखन करूनही एकदा कविता सापडल्यावर मंगेश पाडगावकरांचे प्रथम प्रेम ज्याप्रमाणे कवितेवर राहिले, तसेच दिलीपरावांचे प्रकाशनावर राहिले.

दिलीपरावांनी प्रकाशनाचा किती विविध अंगानी विचार केला आहे, हे या संग्रहातील प्रकाशनासंबंधी केलेल्या भाषणांतून लक्षात येईल. प्रकाशक होणे इतक्यापुरती दिलीपरावांची ध्येयनिश्चिती नव्हती, तर प्रकाशक का व्हायचे आहे, याबद्दलही मनाची खात्री होती. लेखक, मुद्रक व वाचक यांच्यातील महत्त्वाचा दुवा हे प्रकाशकाचे स्थान त्यांना माहीत असले, तरी स्थाननिश्चिती व त्यातून व्यवसायवृद्धी एवढ्यावर त्यांनी स्वतःला मर्यादित केले नाही.

ज्येष्ठ संपादक अनंत अंतरकर यांच्याबद्दल बोलताना दिलीपराव म्हणतात, ‘साहित्यक्षेत्रात अंतरकर मशागतीच्या माळीकामात रमले. त्यांनी वाचकांच्या मनात चांगल्या साहित्याची जाण पेरली.’ हे वर्णन अंतरकरांइतकेच दिलीपरावांनाही लागू आहे. एका अर्थाने दिलीपरावांनी अंतरकरांचा वसा पुढे चालवला, कारण दिलीपराव प्रकाशनक्षेत्रात नुकताच प्रवेश करत होते, तेव्हा अंतरकरांचे निधन झाले होते. साहित्याची मशागत, माळीकाम, पेरणी यांत अंतरकर आणि दिलीपराव यांच्यात साम्य असले; तरी एकूण साहित्यव्यवहारात आपले स्थान कोणते - लेखक, व्यवस्थापक, संपादक की प्रकाशक, याबद्दल अंतरकरांच्या मनात कायम द्वंद होते. दिलीपराव या झगड्यात सापडले नाहीत व इथे ते वेगळे उठून दिसतात.

कल्पक प्रकाशनातून मिळालेले उत्तम यश, त्याला मिळालेली लोकमान्यता व राजमान्यता गाठीशी असूनही दिलीप माजगावकर ही व्यक्ती पूर्वायुष्यातील यशात रममाण होणारी नाही. कालचा समृद्ध काळ मागे उभा असूनही हा माणूस ‘आज’चा आहे. ८०व्या वर्षीही या माणसाला ‘आज’ व त्याच्या गर्भावस्थेत असणारा ‘उद्या’ खुणावतो आहे. रोज नव्यानव्या रूपांत समोर येणाऱ्या ‘आज’ला आणि त्यातून घडत जाणाऱ्या उद्याला सामावून घेणारे साहित्य आपण निर्माण करू शकतो का, ही अस्वस्थता माजगावकरांना आजही सतावते.

आपण उत्तम लेखक होऊ शकतो, आपण कुशल संपादक होऊ शकतो, आपण चांगले व्यवस्थापक होऊ शकतो, हे वयाच्या तिशीतच सिद्ध केले असूनही प्रकाशक याच स्थानावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. समाजातील बदलती स्पंदने ओळखून विषय आणि लेखक शोधणे व त्याला लिहिते करणे, यावरच दिलीपरावांनी आपली मानसिक व आर्थिक शक्ती सर्वांत जास्त लावली. हे करताना प्रकाशनाशी संबंधित वर उल्लेखलेल्या अन्य कामांकडे त्यांनी दुर्लक्ष केले नाही. ती कामे उरकण्यासाठी त्यांनी सहकाऱ्यांचा संघ उभा केला. या संघाला कामाचे स्वातंत्र्य दिले, तरी सूत्रे आपल्या हातात ठेवली.

‘आम्ही प्रकाशकांनी प्रेस काढले; तिथे जितक्या सहजपणे आम्ही मशीनमध्ये गुंतवणूक केली, तशी गुंतवणूक माणसांमध्ये करण्यात आम्ही लक्ष दिले नाही. माणसांमधील गुंतवणूक ही मशीनमधील गुंतवणुकीपेक्षा अधिक महत्त्वाची असते, हे सूत्र आम्हाला समजले नाही’, असे माजगावकर एका ठिकाणी म्हणतात. हे विधान मराठी प्रकाशनविश्वासाठी बऱ्याच प्रमाणात खरे असले, तरी ‘राजहंस’साठी नाही. माणसांत गुंतवणूक करणे हे प्रकाशकाचे महत्त्वाचे काम असते, हे दिलीपरावांनी प्रथमपासून लक्षात घेतले. माणसांमधील ही गुंतवणूक फक्त लेखकांपुरती राहिलेली नाही. ‘राजहंस’शी संबंधित सर्वामध्ये ते गुंतलेले आहेत. ‘राजहंस’चे आजचे यश त्यामध्ये लपलेले आहे.

इथे ‘गुगल’ कंपनीतील एक प्रसंग आठवतो. सुंदर पिचाई यांच्याकडे गुगलची सूत्रे दिली, तेव्हा भारतात आनंदोत्सव झाला. भारतीयांना अभिमान वाटावा, अशी ही नेमणूक होती. सर्व जगावर राज्य करणाऱ्या कंपनीची सूत्रे पिचोई यांच्याकडे आली होती व ती त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वातून खेचून घेतली होती. मात्र पिचोई यांच्याकडे सूत्रे देताना गुगलचे निर्माते जे म्हणाले, ते महत्त्वाचे आहे. लेरी पेज व सर्जी ब्रिन म्हणाले की, ‘आम्ही आता पुन्हा एकदा आमच्या मूळ कामाकडे म्हणजे कल्पकतेने प्रॉडक्ट विकसित करण्याकडे वळणार आहोत. कल्पकतेला स्पेस मिळवून देण्यासाठी आम्ही रोजच्या धकाधकीतून बाहेर पडत आहोत.’ गुगलच्या यशाचे मर्म या वाक्यात आहे.

दिलीप माजगावकरांनी केलेल्या व्यक्तिचित्रणांच्या वैशिष्ट्यांबद्दल वेगळे सांगायची गरज नाही. ती आपल्याबद्दल बोलायला स्वयंसिद्ध आहेत. त्यांतून दिसणारी दिलीपरावांची निरीक्षणशक्ती आणि स्मृतीतील तपशील थक्क करणारे आहेत. ती शब्दशिल्पे आहेत. आपल्यासमोरील व्यक्तीला आपल्या स्वभावात पूर्ण मुरवून घेऊन दिलीपराव आपली छिन्नी चालवतात व व्यक्तीचे एक जिवंत शिल्प आपल्यापुढे उभे करतात. त्यात धूसरता नसते आणि त्या व्यक्तीला ठसठशीत करण्यासाठी कोणत्याही पार्श्वभूमीची गरज नसते. झपाटलेल्या व्यक्ती त्यांना आकर्षित करतात व त्यांचे वर्णन करण्यात ते रमतात. मात्र व्यक्तीची निवड आणि वर्णन याला विवेकाचा काटा लावलेला असतो. दिलीपरावांचे पत्रलेखन विपुल असले, तरी त्यातील मोजकेच शब्दशिल्पाचे धनी होतात. ही भाषणे, ही व्यक्तिचित्रे यांत दिलीपराव स्वतः डोकावतात; पण तेही एका अंतरावरून. असे अंतर राखणे, ही दिलीपरावांची खासीयत आहे.

गुगलच्या निर्मात्यांप्रमाणेच दिलीप माजगावकर यांनी आपल्या स्वभावातील कल्पकतेकडे कधीही कानाडोळा होऊ दिला नाही. प्रकाशनाशी संबंधित वितरण इत्यादी अन्य खात्यांवर काटेकोरपणे लक्ष ठेवताना, त्या खात्यांच्या कामगिरीचे यश आपल्या कल्पकतेवर स्वार होणार नाही, ही दक्षता ते आजही घेतात. कल्पकतेला आवश्यक असलेले स्वातंत्र्य व यशासाठी अत्यावश्यक असणारी व्यावसायिक शिस्त या दोन्हींचा उत्तम सांधा माजगावकरांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतो.

पुस्तक हे आपले ‘प्रॉडक्ट’ आहे, हे दिलीपरावांना माहीत आहे. मात्र ‘प्रॉडक्ट’ या शब्दाला चिकटलेल्या नफेखोरीपासून ते कटाक्षाने दूर ठेवले पाहिजे, हेही त्यांना माहीत आहे. व्यावसायिक यशापासून नफेखोरी वेगळी ठेवण्याचा विवेक त्यांच्यामध्ये आहे व त्यांच्या भाषणांतून तो लक्षात येतो. ‘सांस्कृतिकदृष्ट्या माणसांच्या व्यक्तिगत आयुष्यातील मोलाची गोष्ट म्हणजे पुस्तक; जी माणसांच्या मनाचे उन्नयन करते, त्यांना विचारी विवेकी बनवू शकते’, असे सांगून दिलीपराव म्हणतात, ‘ही विक्रीयोग्य वस्तू असूनही साबण व साडी यांपेक्षा वेगळी आहे.’ ‘अक्षरधारा’च्या राठिवडेकरांकडे हे भान आहे, असा उल्लेख दिलीपराव करत असले; तरी वस्तुतः ते भान त्यांनी स्वतः कायम जपलेले आहे, हे राजहंसच्या पुस्तकांवरून लक्षात येते.

पुस्तक व प्रकाशनाकडे दिलीपराव कसे पाहतात, हे विजया मेहता यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगीच्या भाषणातून कळते. ‘सर्व कला म्हणजे एक प्रकारे धादांत खोटेपणा आहे’, हे पिकासोचे वाक्य विजया मेहता यांनी ‘झिम्मा’ या आत्मचरित्रात उदधृत केले आहे. ते वाक्य पकडून दिलीपराव म्हणतात,

‘‘पुस्तक म्हणजे तरी अखेर काय, वीत-दोन वितींचा पसारा असलेल्या, दोन पुट्ट्यांमध्ये बांधलेल्या, दोन-तीनशे पानांची चळत. त्या पानांवर वेगवेगळ्या रंगांमध्ये, आकारांमध्ये, काही विशिष्ट क्रमांमध्ये मांडलेली काही चिन्हं असतात. पण हा दोन वित्तींचा पसारा वाचक हातात घेतो आणि लेखकाच्या फसवणुकीच्या कटात सामील होऊन जातो. तो लेखक, ते पुस्तक व तो वाचक त्या पुस्तकाचं शेवटचं पान मिटताना अनोख्या दुनियेची सफर करून आलेले असतात. त्यामुळेच पिकासो पुढे म्हणतो की, हे धादांत मिथ्यच आपल्याला अंतिम सत्यापर्यंत घेऊन जातं. हे सारं लटिकेपण वाचकाला वैश्विक सत्याच्या अधिक समीप नेणारं असतं.”

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

पिकासोच्या वैश्विक सत्याची झेप पेलवणारे कलावंत जगाच्या व्यासपीठावर हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच आहेत. राजहंसच्या पुस्तकांनी वा लेखकांनी ही झेप घेतली आहे, असे इथे दूरान्वयेही सुचवायचे नाही व असा दावा दिलीपरावांसारखा जाणता प्रकाशक कधीही करणार नाही. मात्र विजया मेहता यांच्या आत्मचरित्रातील नेमक्या या वाक्याकडे दिलीपराव जेव्हा लक्ष वेधतात, तेव्हा त्यांची दृष्टी कुठे स्थिर झालेली आहे, हे कळते. हा बिंदू स्पष्टपणे समोर असल्यामुळे व्यवसायाचा व स्वतःचा तोल दिलीपरावांनी उत्तम सांभाळला आहे.

वैश्विक सत्य आकळण्याची झेप आपल्या आवाक्यातील नसली, तरी समाजातील चांगुलपणाला उत्तेजन देण्याची कळकळ हा माजगावकर बंधू-भगिनींमधील एक महत्त्वाचा बंध आहे. श्री. ग. माजगावकर आणि निर्मला पुरंदरे यांच्या व्यक्तिचित्रांतून ते लक्षात येईल. दिलीप माजगावकरांनी केलेली पुस्तकांची निवडही याची साक्ष देतात. वेगळ्या वाटेने जाणाऱ्या व्यक्ती, लेखक त्यांना मनापासून आवडतात. काहीतरी वेगळे देऊन वाचकाला आकृष्ट करणे इतकाच उद्देश त्यामागे नसतो, तर अशा झपाटलेल्या व्यक्तींचे आकर्षण माजगावकर बहीण-भावांत आहे. याला जोड आहे, ती जीवनाबद्दलच्या अमाप कुतुहलाची.

भास्कर चंदावरकर यांच्यावरील ‘चित्रभास्कर’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी दिलीपरावांनी त्या पुस्तकाचे संपादक अरुण खोपकर यांच्या निरीक्षणाचा उल्लेख केला आहे. चंदावरकर यांच्याबद्दल खोपकर म्हणतात की, “भास्कर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रमुख अंग म्हणजे अवघ्या जीवनाविषयी त्यांना वाटणारे कुतूहल. संगीत हा त्यांच्या प्रेमाचा, चिंतनाचा विषय असला तरी त्याच्याभोवती फेर धरणाऱ्या अनेक विषयांत त्यांना रस होता, त्या विषयांबद्दल कुतूहल होतं आणि हे सगळं घेऊन ते त्यांच्या मूळ विषयाकडे पाहत असायचे.”

.................................................................................................................................................................

*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*

वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...

पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा

https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166

.................................................................................................................................................................

दिलीपरावांची कुतूहलशक्तीही अशीच व्यापक आहे व तेही अनेक विषयांत रस घेऊन प्रकाशन या आपल्या मूळ विषयाकडे पाहतात. ‘विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी’ हे राजहंसचे बोधवाक्य ही शब्दांची कारागिरी नाही, तर राजहंस प्रकाशनाचे व्यक्तिमत्त्व त्यातून वाचकांना दिसते व ते त्यांना पटतेही. जीवनाकडे अपार कुतुहलाने पाहून प्रकाशनाकडे वळण्याची माजगावकरांची दृष्टी, हे या पटण्यामागचे मुख्य कारण आहे.

भास्कर चंदावरकर यांच्याप्रमाणेच स्वतः दिलीपरावही आयुष्याला होकार देणारे माणूस आहेत. त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला हे जाणवते आणि पाठोपाठ आलेल्या दुर्धर आजारांतून त्यांनी ज्या सहजतेने स्वतःला बाहेर काढले, ते पाहून त्यांचा होकार मनावर ठसतो.

दिलीप माजगावकरांनी केलेल्या व्यक्तिचित्रणांच्या वैशिष्ट्यांबद्दल वेगळे सांगायची गरज नाही. ती आपल्याबद्दल बोलायला स्वयंसिद्ध आहेत. त्यांतून दिसणारी दिलीपरावांची निरीक्षणशक्ती आणि स्मृतीतील तपशील थक्क करणारे आहेत. ती शब्दशिल्पे आहेत.

आपल्यासमोरील व्यक्तीला आपल्या स्वभावात पूर्ण मुरवून घेऊन दिलीपराव आपली छिन्नी चालवतात व व्यक्तीचे एक जिवंत शिल्प आपल्यापुढे उभे करतात. त्यात धूसरता नसते आणि त्या व्यक्तीला ठसठशीत करण्यासाठी कोणत्याही पार्श्वभूमीची गरज नसते. झपाटलेल्या व्यक्ती त्यांना आकर्षित करतात व त्यांचे वर्णन करण्यात ते रमतात. मात्र व्यक्तीची निवड आणि वर्णन याला विवेकाचा काटा लावलेला असतो. दिलीपरावांचे पत्रलेखन विपुल असले, तरी त्यातील मोजकेच शब्दशिल्पाचे धनी होतात. ही भाषणे, ही व्यक्तिचित्रे यांत दिलीपराव स्वतः डोकावतात; पण तेही एका अंतरावरून. असे अंतर राखणे, ही दिलीपरावांची खासीयत आहे. दर्जेदार गोतावळ्याच्या संपन्नतेचे ते धनी असले तरी-

‘असे हजारांसंगे आहे,

जडलेले माझे नाते,

असेच आहे आणि तरीही,

अनोळखी मी सदाच राही,

मीपण भरले जयांत माझे,

जे आहे माझ्यापुरते’

या कुसुमाग्रजांच्या ओळी दिलीपरावांबद्दल विचार करताना नेहमी मनात घोळतात.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

कल्पक प्रकाशनातून मिळालेले उत्तम यश, त्याला मिळालेली लोकमान्यता व राजमान्यता गाठीशी असूनही दिलीप माजगावकर ही व्यक्ती पूर्वायुष्यातील यशात रममाण होणारी नाही. कालचा समृद्ध काळ मागे उभा असूनही हा माणूस ‘आज’चा आहे. ८०व्या वर्षीही या माणसाला ‘आज’ व त्याच्या गर्भावस्थेत असणारा ‘उद्या’ खुणावतो आहे. रोज नव्यानव्या रूपांत समोर येणाऱ्या ‘आज’ला आणि त्यातून घडत जाणाऱ्या उद्याला सामावून घेणारे साहित्य आपण निर्माण करू शकतो का, ही अस्वस्थता माजगावकरांना आजही सतावते.

‘आज’ जे काही चालले आहे, ते चिमटीत पकडणारे लेखक सापडतात का, याचा शोध त्यांची नजर सतत घेत असते. यशातून आलेले आर्थिक स्वास्थ व समाजाकडून होणारे कौतुक त्यांना सुखावत असले; तरी नवीन विषयांना भिडण्यात आपण कमी पडतो आहोत का, आपल्या यशाचा साचा बनतो आहे का, हा विचार त्यांना अस्वस्थ करतो. त्यांच्या आयुष्यात शिस्त असली, तरी साचेबद्धता त्यांना आवडत नाही. त्यांना वाटणारी अस्वस्थता म्हणजे व्यावसायिक चिंताग्रस्तता नव्हे, तर समाधानातून येणारी आकांक्षा आहे. माजगावकरांची भाषणे वाचताना या अस्वस्थतेमागील समाधानाचा पदर दृष्टिआड होऊ नये. त्यांच्या या भाषणात क्वचित काही पुनरुक्तीही झाली आहे. मात्र त्यातील कथनाचा ओघ आणि मुद्द्यांचे महत्त्व लक्षात घेऊन ही पुनरुक्ती कायम ठेवली आहे.

गिरीश कार्नाड यांनी आत्मचरित्रामध्ये कवी बेंद्रे यांची एक ओळ उदधृत केली आहे व तेच त्यांच्या आत्मचरित्राचे शीर्षक आहे. माजगावकरांनी आपल्या भाषणात त्याचा उल्लेख केला आहे. ती ओळ अशी-

‘बघता बघता दिनमान, खेळता खेळता आयुष्य,

खेळात दंगलो मी, जगण्याचे भान हरपले,

पकडला डाव खेळाचा, आयुष्य निसटूनी गेले....’

गिरीश कार्नाड यांनी स्वतःबद्दल म्हटलेली ही ओळ, त्यात डोकावणारी निराशेची छटा काढून टाकून दिलीपरावांबाबत थोडी बदलून घेतली पाहिजे-

‘खेळात दंगलो मी, जगण्याचे भान हरपले,

पकडला डाव खेळाचा, आयुष्य समृद्ध झाले…’

‘वाणी आणि लेखणी’ – दिलीप माजगावकर

संपादक – प्रशांत दीक्षित, मंगला आठलेकर, रेखा माजगावकर, डॉ. सदानंद बोरसे, सारंग दर्शने

राजहंस प्रकाशन, पुणे | पाने – २९७ | मूल्य – ५०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......