‘अ‍ॅनिमल’ : सद्य परिस्थितीशी संबंधित सामाजिक-सांस्कृतिक पडघम एखाद्या कलाकृतीच्या माध्यमातून ‘हुकुमी एक्क्या’सारखे कशा प्रकारे वापरले जात आहेत, याचे हा चित्रपट एक उत्तम उदाहरण आहे
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अनुज घाणेकर
  • ‘अ‍ॅनिमल’चं एक पोस्टर
  • Thu , 07 December 2023
  • कला-संस्कृती हिंदी सिनेमा अ‍ॅनिमल Animal संदीप रेड्डी वांगा Sandeep Reddy Vanga रणबीर कपूर Ranbir Kapoor

तेलुगू ‘अर्जुन रेड्डी’ या आणि हिंदी ‘कबीर सिंग’ या विवादित चित्रपटांचा दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा याचा ‘अ‍ॅनिमल’ हा पुढचा चित्रपट. साडेतीन तास लांबीचा आणि फक्त प्रौढांसाठी असलेला हा चित्रपट सध्या बॉक्सऑफिसवर कमाईचे विक्रम रचतो आहे.

नायक रणविजय एका हॉटेलमध्ये शस्त्रांची देवघेव करत असतो. त्या वेळी त्याची हत्या करण्यासाठी आलेल्या शेकडो मुखवटाधारी गुंडांना आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं मारून टाकतो. तितक्यात त्याला अजून २०० गुंड मागील दारानं येत असल्याची बातमी मिळते.

शस्त्रांची देवघेव करणारा विक्रेता त्याला विशालकाय मशीनगनसारखी एक बंदूक दाखवतो. तिच्यामुळे एकाच वेळी अनेकांची हत्या करणं सहज शक्य असतं. विक्रेता नायक रणविजयला अभिमानानं त्या शस्त्राचं वर्णन करताना सांगतो, ‘ही दिल्ली-बेंगलोर आणि महाराष्ट्रात घडलेली बंदूक आहे आणि म्हणूनच हा ‘आत्मनिर्भर भारत’ आहे’.

मग त्या बंदुकीच्या मदतीनं रणविजय त्या गुंडांचं हत्याकांड करतो आणि स्वत:सुद्धा घायाळ होतो. नंतर तो बरा होतो, परंतु एक ज्योतिषी त्याच्या कुटुंबियांना सांगतो की, याची आयुष्यमर्यादा कमी आहे आणि ती वाढवण्यासाठी एक होमहवन करावं लागेल. ते करताना मोठ्या दिमाखात बसलेल्या रणविजयला त्याची पत्नी गोमुत्र पिण्यास सांगते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

कथानक जसं पुढे जातं, तसं आपल्याला समजत जातं की, ज्या शेकडो लोकांचं नायक रणविजयने हत्याकांड केलं आहे, ते एका खलनायकानं पाठवले होते. मग त्या खलनायकाचं ‘मुस्लीम’ असणं त्याच्या नावातून, वेषभूषेतून, बहुपत्नीत्वातून, हिंसक पद्धतीनं मांस खाण्यातून, विवाह पद्धतीतून, त्याच्या दृशांच्या वेळी वाजणाऱ्या पार्श्वसंगीतातून दाखवलं जातं.

रणविजयचे वडील चालवत असलेल्या देशातल्या सर्वांत मोठ्या उद्योगसमूहाचं नाव आणि चिन्ह असतं- ‘स्वस्तिक’. रणविजय आपल्या सहकाऱ्याला एका प्रसंगात सांगतो की, नाझींचं स्वस्तिक उलटं होतं, पण आपलं मात्र सरळ आहे.

गंमत अजून पुढेच आहे. या तथाकथित मुस्लीम खलनायकाची पूर्वकथा सांगते की, त्याच्या वडिलांनी रणविजयच्याच हिंदू कुटुंबातून वेगळं होऊन धर्मांतर केलं आणि मुस्लीम धर्म स्वीकारला. इथं भारताच्या फाळणीचा वा पाकिस्तानच्या निर्मितीचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही, पण त्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. रणविजय खलनायकाला हरवण्यासाठी पंजाबमधील शीखधर्मीय कुटुंबीयांचं सहकार्य घेतो, हा राजकीय कोनदेखील विविध संदर्भांतून अधोरेखित केला जातो.

आपल्या वडिलांचं प्रेम मिळावं म्हणून पशुसारखा वेडा झालेला नायक रणविजय आणि ‘राष्ट्रप्रेमा’ची धुंदी चढून वाट्टेल ते करावं, अशी एक अपेक्षा असलेला भारतीय तरुण, यांतल्या सीमारेषा कुठे सुरू होतात आणि कुठे संपतात, हे प्रेक्षकांना सहजपणे कळू नये, यासाठी दिग्दर्शकानं प्रयत्नांची पराकाष्ठा केली खरी, पण ते चाणाक्ष प्रेक्षकांच्या लक्षात येतंच. कारण हेतू शुद्ध नसेल तर कलाकुसर कितीही बेमालूम असली, तरी ती बेगडीच ठरते.

.................................................................................................................................................................

*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*

वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...

पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा

https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166

.................................................................................................................................................................

रणविजयचं ‘पुरुष’ म्हणून वागणं, आजूबाजूच्या स्त्रियांना वेगवेगळ्या पद्धतीनं अपमानित करणं, त्यांच्यावर राज्य गाजवणं, कट्टर-धर्मांध पुरुषसत्ताक विचारधारेला साजेसंच. एका प्रसंगात तर नायक रणविजय आपल्या ध्येयापुढे प्रसूती होणार असलेल्या एका स्त्रीलासुद्धा दयामाया दाखवत नाही.

हा चित्रपट वरवर वडिलांकडून सतत दुर्लक्षित राहिलेल्या आणि त्यांचं प्रेम मिळावं म्हणून सतत झटणाऱ्या नायक रणविजयची धडपड, अशी कथा सांगतो. त्याच्या पौगंडावस्थेतील घटनांपासून म्हातारपणापर्यंत प्रवास घडवतो. मात्र प्रत्यक्षात ‘अल्फा मेल’ म्हणजे एक पारंपरिक समजला जाणारा सर्व शक्तिमान पुरुष कसा असू शकतो, याचं चित्रण या चित्रपटाचा मुख्य पैलू आहे.

रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, राश्मिका मंदाना अशा सेलिब्रेटी कलाकारांचा उत्तम अभिनय, प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवेल, अशी दिग्दर्शकीय कल्पकता आणि सादरीकरण, काही ठिकाणी तर्क सोडणारं पण रंजनानं भरलेलं कथानक आणि भुलवणारं प्रयोगशील संगीत व गाणी, अशा जमेच्या व्यावसायिक बाजू असल्यामुळे ‘अ‍ॅनिमल’ एक चित्रपट म्हणून चांगली कामगिरी करणार यात शंका नाही.

परंतु सद्य परिस्थितीशी संबंधित सामाजिक-सांस्कृतिक पडघम एखाद्या कलाकृतीच्या माध्यमातून ‘हुकुमी एक्क्या’सारखे कशा प्रकारे वापरले जात आहेत, याचे हा चित्रपट एक उत्तम उदाहरण आहे. अर्थात, हे पडघम या चित्रपटात उघडपणे दाखवलेले नाहीत, उलट ते सहजपणे लक्षात येणार नाहीत, यासाठी त्यांची पेरणी बेमालूम प्रकारे करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘काश्मीर फाईल्स’, ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटांच्या माध्यमातून जो ‘प्रोपगंडा’ प्रेक्षकांच्या सुप्त मनामध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला गेला, तसाच प्रयत्न हाही चित्रपट करतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

कलाकृती राजकीय असतात की नसतात, हा एक सनातन वाद आहे. ‘चित्रपटाकडे चित्रपट म्हणून बघा, उगाच वैचारिक समीक्षा नको’, असं थेट सांगणारा एक वर्ग आहे. आणि प्रस्थापित राजकीय, आर्थिक शक्तींना कवटाळून कथानक सांगणाऱ्या कलाकृती जन्माला येतात, असं मानणाराही एक वर्ग आहे.

गेल्या काही वर्षांत आलेल्या पुस्तकं, चित्रपट, लघुपट, वेबसिरिज अशा काही कलाकृती जर अभ्यासल्या, तर हिंदुत्ववाद, त्याला सद्यकाळात लाभलेलं कट्टरतेचं एक उग्र आणि अतिरेकी स्वरूप, त्या अनुषंगानं अपेक्षित असलेली पितृसत्ताक संस्कृती, ‘आम्ही विरुद्ध ते’ असा जाणूनबुजून रुजवला जात असलेला विचार, प्रस्थापित राजकीय पक्षांच्या विरोधात रंगवलेली राजकीय पात्रं, अशा विकृतींचा भडिमार पाहायला मिळतो.

एक कलाकृती म्हणून जर एखादा चित्रपट सरस असेल, तर तो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात यशस्वी होतो आणि त्याला जे म्हणायचं असतं, ते प्रेक्षकानं दिमाखात सांगतो. पण जर कलाकृती म्हणून तो मुळात चांगला नसेल, तर मात्र सपशेल आपटतो, हा तसा नेहमीचाच अनुभव आहे.

अलीकडची ‘गदर २’, ‘काश्मीर फाईल्स’, ‘द केरळ स्टोरी’ ही काही यशस्वी उदाहरणं, तर ‘आदिपुरुष’, ‘अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ ही काही अपयशी उदाहरणं. ‘अ‍ॅनिमल’च्या दुसऱ्या भागाची घोषणा आत्ताच केली गेली आहे. त्यामुळे विशिष्ट रंगानं माखलेल्या या चित्रपटांचा ओघ इतक्यात थांबण्याची शक्यता नाही. उलट त्यांना मिळणारं आर्थिक यश पाहून असे अधिकाधिक प्रयत्न होण्याची शक्यताच जास्त आहे.  

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

‘अ‍ॅनिमल’सारखा चित्रपट ‘प्रोपगंडा’ पसरवण्याचं काम सफाईदारपणाच्या आडून करतो. उघडपणे तो कुठल्याच कळीच्या मुद्द्यांना हात घालत नाही. हे सगळं फक्त व्यावसायिक नफ्याच्या उद्देशानं की, ठरवून समाजात विकृत विचार पेरण्यासाठी, या प्रश्नाचं उत्तर देणं काहीसं अवघड आहे. पण असं असलं तरी, सर्वच कलाकृती नितळ, पारदर्शी असतात, ‘प्रेक्षक म्हणून तुम्हाला जे समजायचं ते तुम्ही समजता’ असं मानण्याचे दिवस सध्या राहिलेले नाहीत, हेही तितकंच खरं.

नेहमीप्रमाणे ‘अ‍ॅनिमल’च्या निमित्तानंही कलाकृतीकडे ‘राजकीय चष्म्यातून’च बघायची गरज, आवश्यकता आहे का, केवळ चित्रपट म्हणून ‘अ‍ॅनिमल’चा आस्वाद घ्यायचा नाही का, असा प्रश्न काहींकडून नक्कीच उपस्थित केला जाऊ शकतो. एक प्रेक्षक म्हणून शक्य तितकी संतुलित भूमिका ठेवणं, हे त्याचं उत्तर असू शकतं.

मनोरंजन म्हणून ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट जरूर पाहायला हवा, परंतु त्याच्या आडून सांगितल्या जाणाऱ्या ‘विचारा’त नेमकी काय गडबड आहे, तो जाणीवपूर्वक बनवलेल्या एखाद्या योजनेचा वा प्रोपगंडाचा भाग तर नाही ना, याचीही खातरजमा करून घेतली पाहिजे. उत्तम दिसणारं पेय चवीलाही उत्तम असतंच असं नाही, त्यात ‘भेसळ’ही असू शकते. कधी कधी तर ते आपल्या निरोगी ‘शारीरिक स्वास्थ्या’च्या दृष्टीनं ‘अपायकारक’ही असू शकतं.

..................................................................................................................................................................

लेखक अनुज घाणेकर मानवशास्त्रज्ञ व समुपदेशक आहेत.

anujghanekar2@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......