‘चित्रपट-अभ्यास’ : चित्रपटाचा अभ्यास ही काहीतरी खुळचट कल्पना आहे, ही (आपल्याकडे तर अजूनही प्रचलित असलेली) समजूत मोडीत काढणारे हे पुस्तक आहे
ग्रंथनामा - झलक
अभिजित देशपांडे
  • ‘चित्रपट-अभ्यास’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 07 October 2023
  • ग्रंथनामा झलक चित्रपट-अभ्यास Chitrapat-Abhyas श्यामला वनारसे Shyamala Vanarse

ज्येष्ठ सिनेअभ्यासिका डॉ. श्यामला वनारसे यांचे ‘चित्रपट-अभ्यास’ हे नवे पुस्तक नुकतेच डायमंड पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात त्यांनी १२ ‘क्लासिक’ सिनेमांविषयी लिहिले आहे. या पुस्तकाला सिनेअभ्यासक प्रा. अभिजित देशपांडे यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...

.................................................................................................................................................................

‘To Study Cinema : What an absurd idea!’ - Christian Metz

चित्रपटाचा अभ्यास ही काहीतरी खुळचट कल्पना आहे, ही (आपल्याकडे तर अजूनही प्रचलित असलेली) समजूत मोडीत काढणारे हे पुस्तक आहे. अर्थात, क्रिस्तीयन मेटझ हे फ्रेंच अभ्यासक, जे स्वतः चित्रपटकलेचे एक महत्त्वाचे सिद्धांतनकार व भाष्यकार होते, त्यांना या विधानातून ‘चित्रपटाचा अभ्यास ही काहीतरी खुळचट कल्पना आहे’, असे खचितच म्हणायचे नाही. किंबहुना आत्यंतिक बौद्धिक शिस्तीने करायची ती गोष्ट आहे, हेच त्यांनी आपल्या सिद्धांतनांतून स्पष्ट केले, परंतु यातून 'समाजधारणा मात्र तशी नाही' असेच त्यांना सुचवायचे आहे.

आपल्याकडे शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे यांच्या अकादमिक चौकटीत चित्रपटाने आत्ता आत्ता कुठे चंचुप्रवेश केला आहे. त्याला उणीपुरी वीसेक वर्षे झाली असतील. रशिया - युरोप-अमेरिकेत चित्रपटाला ‘कला’ म्हणून (तुलनेने) लवकरच अधिमान्यता मिळाली आणि त्याचे वेगळेपण स्पष्ट करणारी व अभ्यासाच्या दिशा सूचित करणारी विविध भाष्ये उदयाला आली. त्यालाही आता कैक दशके लोटली. मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, सौंदर्यशास्त्र आदी अभ्यासशाखांतून पाठबळ मिळत, त्यांवर सिद्धांतने उभी राहिली, आणि सत्तरच्या दशकात स्वतंत्रपणे ‘चित्रपट-अभ्यास’ अशी ज्ञानशाखाच विकसित होऊन ती विद्यापीठीय ज्ञानविश्वात स्थिरावली.

पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये फिल्ममेकिंगव्यतिरिक्त ‘फिल्म अप्रिसिएशन’ अर्थात ‘चित्रपट रसास्वाद’ हा अभ्यासक्रम गेली अनेक वर्षे शिकवला जातो आहे, परंतु आता जागतिकीकरणानंतर, माध्यमस्फोटाच्या काळात, या गोष्टींचे महत्त्व हळूहळू रुजू लागले आहे. महाविद्यालये व विद्यापीठांतील संप्रेषण व प्रसारमाध्यमे आदी विभागांच्या नवनवीन अभ्यासक्रमांतून चित्रपट-अभ्यासाला थोडेबहुत स्थान मिळू लागले आहे. त्यासाठीच्या अभ्याससाहित्यासाठी मात्र अजूनही बहुतांशपणे रशिया- युरोप- अमेरिकेतील लेखनावरच अवलंबून राहावे लागते. ते स्वाभाविकही आहे.

सर्वाधिक चित्रपट निर्माण करणारा आणि सर्वाधिक चित्रपट पाहणारा देश असूनही एतद्देशियांनी मात्र एक अभ्यासविषय म्हणून चित्रपटाला फारसे गांभीर्याने घेतलेले नाही. भारतीय अभिजनांच्या भद्र इंग्रजीत यांविषयीची काही मोजकी पुस्तके आहेतही, आणि त्याखालोखाल बंगाली आणि मल्याळममध्येदेखील अशी पुस्तके काही प्रमाणात उपलब्ध आहेत. मराठीत अलीकडच्या काळात चित्रपटांविषयीच्या पुस्तकांचा आकडा लक्षणीय असला, तरी ती पुस्तके सहसा माहितीपर, रंजक किस्से व तत्सम जंत्रीने भरलेली, विश्लेषणाच्या नावाखाली आस्वादक व अभिनिवेशी शेरेबाजीने युक्त, अशी आहेत.

त्यांत चिकित्सक अभ्यासशिस्त, तात्त्विक मर्मदृष्टी क्वचितच आढळते. सन्माननीय अपवाद म्हणून अरुण खोपकर यांचे ‘गुरुदत्त : एक तीन अंकी शोकांतिका', प्रा. सतीश बहादूर यांच्या प्रदीर्घ लेखाचे भाषांतर असलेले ‘चित्रपटाचे सौंदर्यशास्त्र’, डॉ. श्यामला वनारसे यांचे ‘सत्यजित राय आणि भारतीय मन्वंतर’... आदी पुस्तकांचा उल्लेख करावा लागेल. या पुस्तकांमध्ये असलेली अकादमिक अभ्यासशिस्त क्वचितच अन्य मराठी पुस्तकांमध्ये आढळते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

प्रा. सतीश बहादूर यांनी खऱ्या अर्थाने भारतात चित्रपटविषयक अभ्यासशिस्त विकसित केली. मुळात अर्थशास्त्राचे प्राध्यापक असलेले बहादूर आग्रा विद्यापीठात अध्यापनाबरोबरच ‘आग्रा फिल्म सोसायटी’ चालवत. विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम चित्रपट दाखवून त्यांवर चर्चा घडवून आणत. एकतर्फी व्याख्यान देण्याऐवजी विद्यार्थ्यांसमोर संबंधित चित्रपटाबद्दल काही कळीचे प्रश्न उपस्थित करून त्यांना त्याविषयी विचार करायला भाग पाडत. त्यावर तर्ककठोर चर्चा तडीस नेत.

फिल्म सोसायटी चळवळीतले ते पहिल्या पिढीचे पाईक होत. त्या काळी देशोदेशीचे अनवट चित्रपट उपलब्ध करून ते रिळावर दाखवणे, हीच एक कर्मकठीण गोष्ट होती. पण प्रा. सतीश बहादूर तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी चित्रपट समीक्षा समजून घेण्यासाठी चित्रपटविषयक रशियन व युरोपियन मौलिक ग्रंथ धुंडाळून ते अभ्यासले, त्यांविषयी स्वतंत्र असे चिंतन केले आणि त्याआधारे चित्रपट - अभ्यासाची आपली अशी एक खास चौकट उभारली. त्याची टिपणे विकसित केली.

पुढे ते पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये ‘चित्रपट रसास्वाद’ या विषयाचे प्राध्यापक म्हणून दाखल झाल्यावरही याच टिपणांचा आधार राहिला. त्या विषयी त्यांनी प्रदीर्घ लेखन मात्र केले नाही. त्यांचे जे काही थोडेफार लेखन उपलब्ध आहे, तेही इतरांनी त्यांना लेखनास भाग पाडले म्हणूनच (बहादूर यांनी जे काही मोजके लेखन केले, ते हिंदी व इंग्रजीत. त्यांच्या एका प्रदीर्घ लेखाचे सुषमा दातार यांनी मराठीत केलेले भाषांतर ‘वास्तव रूपवाणी’ या मराठीतील चित्रपट अभ्यासविषयक नियतकालिकात लेखमालेच्या स्वरूपात क्रमशः छापले गेले. त्याचेच पुढे ‘चित्रपटाचे सौंदर्यशास्त्र’ हे पुस्तकरूप प्रकाशित झाले).

लेखन हा बहादूर यांचा पिंड नव्हताच कधी! ते रमले ते चित्रपट शिकवण्यातच. लेखनापेक्षा जिवंत संज्ञापन व अध्यापनावरच त्यांचा भर राहिला. फिल्म इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांपलीकडे अधिकांना सामावून घेणारा चित्रपट रसास्वादाचा उन्हाळी सुट्टीतला महिनाभराच्या पदविका अभ्यासक्रमाचा पाया बहादूर यांनीच घातला. १९७४पासून तो अभ्यासक्रम सातत्याने सुरू आहे. भारतभर दौरे करून चित्रपट रसास्वादाची शिबिरे त्यांनी घेतली.

नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला दूरचित्रवाणी माध्यमातील ‘कन्ट्रिवाईड क्लासरूम’ या शैक्षणिक प्रयोगाअंतर्गत बहादूरांनी ‘Understanding Cinema’ ही चित्रपट-अभ्यासाची दृक्श्राव्य मालिका केली. चित्रपटशिक्षणाचे काम बहादूर अखेरपर्यंत व्रतस्थपणे करत राहिले. यांतल्या बऱ्याचशा उपक्रमांत डॉ. श्यामला वनारसे त्यांच्यासोबत सहलेखिका - सहशिक्षिका- सहकारी म्हणून कार्यरत राहिल्या. बहादूरांनी भारतात चित्रपटशिक्षणाचा पाया घातला, आपली स्वतंत्र अभ्यासपद्धती व चित्रपटअध्यापनाची शैलीही विकसित केली आणि अनेक पिढ्यांचे चित्रपटशिक्षण केले. सातत्याने अनेक वर्षे त्यांनी हे निष्ठेने केले. या अर्थाने प्रा. सतीश बहादूर हे भारतीय चित्रपटशिक्षणातील एक ‘स्कूल’ आहेत, असे खात्रीपूर्वक म्हणता येते. त्यांच्यासोबत या क्षेत्रांत वावरलेल्या, त्यांच्यासोबत निकटपणे काम करणाऱ्या श्यामलाताई आजघडीला ‘बहादूर-परंपरे’तल्या एकमेव बौद्धिक वारसदार आहेत.

विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय असलेल्या श्यामलाताई मानसशास्त्रज्ञ आहेत. चित्रपटांइतकाच संगीत, नाट्य, नृत्य यांविषयीचा त्यांचा अभ्यास आहे. ‘घाशीराम कोतवाल या नाटकाविषयी त्यांचा समीक्षाग्रंथ प्रकाशित झाला आहे. संगीत व अन्य कलांविषयी त्यांनी विविध नियतकालिकांतून विपुल लेखन केले आहे. त्यांचे ‘सत्यजित राय आणि भारतीय मन्वंतर’ हे पुस्तक म्हणजे राय यांच्या चित्रपटांतून दिसणाऱ्या समाजाचे आणि सामाजिक बदलांचे विश्लेषण आहे. चित्रपटाच्या समाजशास्त्रीय अभ्यासाचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

प्रा. सतीश बहादूर यांच्या ‘Textual Study of a Trilogy’ या पुस्तकाच्या त्या सहलेखिका आहेत. बहादूर यांनी कर्नाटकातील हेग्गोडू येथील ‘निनासम’ संस्थेअंतर्गत चित्रपट रसास्वादाचे अभ्यासक्रम राबवले, त्यातही श्यामलाताई यांचा बरोबरीने सहभाग होता. हिंदी-इंग्रजी- मराठीतून होणाऱ्या चित्रपट रसास्वादाच्या कार्यशाळा, शिबिरे यांतून त्या आजही सातत्याने अध्यापन करत असतात. बहादूरांच्या धर्तीवर त्यांनी मराठीत चित्रपट रसास्वादाची व्हिडिओ व्याख्यानेही तयार केली आहेत. त्यांचे प्रस्तुत लेखन ‘वास्तव रूपवाणी’ या चित्रपट अभ्यासविषयक नियतकालिकात लेखमालेच्या रूपाने प्रकाशित झाले.

दैनिके व लोकप्रिय नियतकालिके यांतून सहसा चित्रपटाविषयी स्फुट परीक्षणे प्रकाशित होतात. अमुक चित्रपटात काय आहे, त्याचे थोडक्यात वर्णन व त्या विषयी शेरेबाजी करत तो चित्रपट पाहा किंवा पाहू नका, असा आदेशवजा सल्ला त्यात असतो. आपल्या एरवीच्या गप्पांमध्येही चित्रपटाविषयी अशीच चर्चा रंगते. मासिके, पाक्षिके, वार्षिकांक आदी नियतकालिकांमध्ये काही दीर्घ लेख असले, तरी त्यांचा भर सहसा माहिती देणे, आशयाबद्दल शेरेबाजी करणे (त्यातही तार्किक शिस्त असतेच असे नाही), व्यक्ती अथवा कलाकृतीचे अभिनिवेशयुक्त महिमामंडन करणे, यांवरच दिसतो. पुस्तकेच्या पुस्तके याच धर्तीवर लिहिली जातात. मराठीतील चित्रपटविषयक लेखन हे बहुतांशपणे असे आहे.

चित्रपटसमीक्षा वा चित्रपटविषयक शोधनिबंध हा मात्र गंभीरपणे व विशिष्ट अभ्यासशिस्तीने करावयाचा मामला असतो. विशिष्ट तार्किक परंपरेला अनुसरून निकषांच्या आधारे वस्तुनिष्ठपणे केलेली ती चिकित्सा असते. चित्रपट अभ्यास (Film Studies) ही आजघडीला एक विकसित ज्ञानशाखा आहे. विविध ज्ञानपरंपरांतून उदयाला आलेली सिद्धांतने, विशिष्ट ऐतिहासिक संदर्भ व चिकित्सादृष्टी यांआधारे चित्रपटांचा अभ्यास करणे, यांत अपेक्षित असते.

ह्युगो मन्स्टरबर्ग, लेव कुलेशोव, सर्गेई आयझेन्स्टाईन ते थेट आन्द्रे बाझ, क्रिस्तीयन मेटझ्, डेव्हीड बोर्डवेल, लॉरा मुल्वे, वॉल्टर बेन्जामिन, सिगफ्रिड क्रॉकॉर, नोएल कॅरॉल आदी अनेकांनी ही ज्ञानशाखा आपल्या सिद्धांतने व भाष्यांनी विकसित केली आहे. आन्द्रेई तारकोवस्की, फ्रान्स्वां त्र्युफाँ, ज्याँ लुक् गोदार्द, सत्यजित राय आदींनी आपल्या कलाकृतीच्या अनुषंगाने जे लेखन केले, त्यातूनही या अभ्यासशाखेला मार्मिक दृष्टी मिळाली. भारतात चिदानंद दासगुप्ता, मारी सिटन, प्रा. सतीश बहादूर यांनी आपल्या लेखनातून गंभीर चित्रपटचर्चेचा पाया घातला.

बहादूर यांचे चित्रपटअध्यापन व टिपणे नोंदींचे लेखन प्रामुख्याने १९६०च्या दशकापासून सुरू झाले. साहित्य वा अर्थशास्त्रासारखा मानव्यविद्येतील विषय शिकवणे वेगळे आणि चित्रपट शिकवणे वेगळे! बहादूरांनी आपल्यासमोरील विद्यार्थीवर्ग, शिक्षणपद्धती, भारतीय मानसिकता आदी लक्षात घेऊन चित्रपट शिकवण्यासाठीचे आपले खास असे तंत्र विकसित केले. एकतर्फी व्याख्यानाऐवजी परस्परसंवादावर त्यात भर असे. त्यात वर उल्लेख केल्याप्रमाणे, चित्रपटाविषयी प्रश्न उपस्थित करून विद्यार्थ्यांनाच नेमक्या दिशेला वळवणे, विचारप्रवण करणे, बोलते करणे, मूळ गाभा न सोडता प्रश्न - उपप्रश्नांच्या शृंखलेतून चर्चेचा व आकलनाचा विस्तार करणे, ही पद्धती ते अवलंबत असत.

त्यासाठी खडू-फळा असो की कागद पेन, त्यावर कळीचे शब्द लिहून, आकृत्या काढून, एकेक मुद्दा तपासत, क्रमश: पुढे जात; विविध मुद्द्यांतील परस्परसंबंध उलगडून व सहसा किचकट परिभाषा टाळून विश्लेषणावर त्यांचा भर असे. मूल्यमापनावर उडी न मारता, संकल्पना समजून घेत, आपले पूर्वग्रह व मते बाजूला ठेवून, वस्तुनिष्ठ उलगडा करण्याला ते अधिक महत्त्व देत असत. त्यांची टिपणे, नोंदीदेखील अशाच अध्यापनकेंद्री गरजेतून निर्माण झाल्या आहेत. याला त्यांचे हिंदी-इंग्रजी लेखनही अपवाद नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

श्यामलाताई बहादूर यांच्या मुशीत घडलेल्या व ‘बहादूर स्कूल ऑफ फिल्म अप्रिसिएशन’च्या परंपरेत काम करणाऱ्या आहेत. त्यामुळे त्यांच्या लेखनातही वरील बहुतांश वैशिष्ट्ये ठळकपणे दिसून येतात. त्यांनी बहादूर यांचे हे ऋण वेळोवेळी मान्यही केले आहे. या पुस्तकातील पहिल्याच लेखाच्या सुरुवातीला त्या म्हणतात, “आपल्याकडील ‘फिल्म स्टडीज’ या नावाने जे अभ्यासक्रम चालतात, त्यातील पद्धतीला पायाभूत असे काम प्रा. सतीश बहादूर यांनी केले. परंतु त्यांचे लेखन 'विद्यार्थ्यांना दिलेली टिपणे' या स्वरूपातच राहिले. या लेखमालेत त्यांची पद्धत वापरून केलेला उलगडा मांडण्याचा उद्देश आहे. त्यांनी त्यांचे विश्लेषण सादर केल्यानंतर मूल्यमापनात्मक विधान केले नाही. ते विद्यार्थ्यांच्या विचाराला चालना देऊन स्वत:चा विचार करायला प्रोत्साहन देत असत. हे सूत्र धरून ही लेखमाला सादर करण्याचा प्रयत्न आहे.”

कलाकृतीचा आशय आणि कलाकृतीची संरचना (कलाकृती काय सांगते आणि कसे सांगते) हे वेगळे काढता येत नाही, तेव्हा कलाकृतीच्या आकृतिबंधाचा उलगडा केल्यानेच तिचा नेमका आशय हाती लागतो, ही धारणा बहादूर व श्यामलाताई यांच्या चित्रपटविश्लेषणाच्या मुळाशी आहे. तेच त्यांच्या लेखनाचेही सूत्र राहिले आहे.

प्रस्तुत पुस्तक म्हणजे चित्रपटाची संरचना व तिचे विशिष्ट कार्य उलगडत केलेला संहिताअभ्यास आहे. चित्रपट ही एक संहिता (Text) आहे. त्या संहितेचे विश्लेषण (Textual analysis) म्हणजे त्यातील रचनेचे विश्लेषण. अशा १२ विविध चित्रपटसंहितांचे विश्लेषण म्हणजे हे पुस्तक.

‘वास्तव रूपवाणी’ या मराठीतील चित्रपट अभ्यासविषयक नियतकालिकात श्यामलाताईंचे हे लेख २०१५ ते २०१८ या काळात लेखमालेच्या स्वरूपात प्रकाशित झाले. त्याचेच हे पुस्तकरूप. या लेखमालेसाठी त्यांनी निवडलेले चित्रपटही वैशिष्ट्यपूर्ण आहेत-

१) बॅटलशिप पोटेमकिन (रशिया, १९२५, दिग्दर्शक सर्गेई आयझेन्स्टाईन)

२) द ग्रेट डिक्टेटर (अमेरिका, १९४०, दिग्दर्शक चार्ली चाप्लीन)

३) वाईल्ड स्ट्रॉबेरीज (स्विडन, १९५७, दिग्दर्शक इंगमार बर्गमन)

४) सिटीझन केन (अमेरिका, १९४१, दिग्दर्शक ऑर्सन वेल्स)

५) पाथेर पांचाली (भारत / बंगाली, १९५५, दिग्दर्शक सत्यजित राय)

६) राशोमोन (जपान, १९५०, दिग्दर्शक अकिरा कुरोसावा)

७) हिरोशिमा-मॉन आमोर (फ्रान्स, १९५९, दिग्दर्शक अलेन रेनेस)

८) बायसिकल थिव्हज (इटली, १९४८, दिग्दर्शक व्हिट्टोरिओ डि सिका)

९) रोमन हॉलिडे (अमेरिका, १९५३, दिग्दर्शक विल्यम वायलर)

१०) साऊंड ऑफ म्युझिक (अमेरिका, १९५९, दिग्दर्शक रॉबर्ट वाइझ)

११) स्टॉकर (रशिया, १९७९, दिग्दर्शक आन्द्रेई तारकोवस्की)

१२) कूर्मावतार (भारत / कन्नड, २०११, दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली)

या यादीतील बहुतेक चित्रपट प्रामुख्याने १९४० ते १९६० या कालखंडातले आणि ‘अभिजात’ (Classic) या जातकुळीत गणले जाणारे आहेत.

जी कलाकृती आपल्या अंगभूत गुणवैशिष्ट्यांनी आपल्या काळाच्या टप्प्यावर त्या कलापरंपरेत एक परमावस्था आणि एकूण काळाच्या पटलावर आपली एक अमीट छाप निर्माण करते, अथवा ज्या कलाकृतींची कलात्मक गुणवत्ता काळाच्या पटलावर निःसंशयपणे सिद्ध होणारी आहे, त्यांना सहसा ‘अभिजात कलाकृती’ असे म्हटले जाते. इथे अशा अभिजात चित्रपटांचीच निवड केलेली दिसते.

अशा चित्रपटांचे विश्लेषण करण्याने कलात्मक उत्तमाची एक सखोल जाण आपसूकच निर्माण होते. त्यांतील व्यापक व सूक्ष्म अशा जीवनदर्शनाने प्रगल्भता वाढीस लागते. हा हेतू इथे आहेच, पण व्यावसायिक गरजेतून जो कचरा या माध्यमात प्रत्यही तयार होत असतो, तो सहजी ओळखून, तो ओलांडून श्रेष्ठत्वाची जाणकारी विकसित होण्याला मदत व्हावी, हाही एक अंतःस्थ, अध्याहृत हेतू या निवडीमागे दिसतो. श्रेष्ठ तेच समोर ठेवल्याने क्षुद्रत्वाविषयी बोलण्याची अर्थातच गरजही राहत नाही.

वरील यादीतील बहुतेक चित्रपट ‘ऑतेअर’ दिग्दर्शकांनी केलेले आहेत. ‘ऑतेअर’ ही चित्रपटक्षेत्रात दिग्दर्शकाला (निव्वळ तंत्रज्ञ वा कारागिराचा नव्हे, तर) द्रष्ट्या कलावंताचा दर्जा देणारी व दिग्दर्शकाचे या कलेतील केंद्रवर्ती स्थान अधोरेखित करणारी संकल्पना आहे. वरील यादीतील सर्गेई आयझेन्स्टाईन, व्हिट्टोरिओ डि सिका, चार्ली चाप्लीन, अलेन रेनेस, सत्यजित राय, अकिरा कुरोसावा, आन्द्रेई तारकोवस्की, हे असे ‘ऑतेअर’ दिग्दर्शक आहेत. त्यांनी या माध्यमात सातत्याने आणि अनेक श्रेष्ठ, दर्जेदार कलाकृती निर्माण केल्या. त्यांच्या अशा एकेका कलाकृतीची चिकित्सा इथे सविस्तरपणे केलेली आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

श्यामलाताईंचे प्रस्तुत लेखनात आढळणारे वेगळेपण हे की, त्या अमेरिकन व्यावसायिक पठडीतल्या चित्रपटांनाही त्याच चिकित्सक दृष्टीने भिडल्या आहेत. ‘सिटीझन केन’, ‘रोमन हॉलिडे’, ‘साऊंड ऑफ म्युझिक’, हे व्यावसायिक बाज सांभाळूनही हॉलिवुड स्टुडिओ सिस्टीममध्ये निर्माण झालेले उत्तम चित्रपट आहेत. विशेषत: ‘रोमन हॉलिडे’, ‘साऊंड ऑफ म्युझिक’ यांच्या रचनातंत्राचे विश्लेषण करताना त्यांतील व्यावसायिक प्रयुक्त्याही त्यांनी सहजपणे उघड्या पाडल्या आहेत.

‘स्टॉकर’सारखा अमूर्ताकडे झेपावणारा काव्यात्म विज्ञानपट, पण त्याचीही गुंतागुंत श्यामलाताई उलगडतात. गिरीश कासारवल्ली हे काही रूढ अर्थाने ‘ऑतेअर’ दिग्दर्शक नाहीत किंवा त्यांचा ‘कूर्मावतार’ हा चित्रपटदेखील रूढ अभिजात पठडीतला नाही, तरीही त्याही चित्रपटाच्या विश्लेषणाकडे श्यामलाताईंनी आपला मोर्चा वळवला आहे. एका बाजूला त्यांनी ‘बहादूर स्कूल ऑफ फिल्म अप्रिसिएशन’ची संरचना-विश्लेषणाची वाट सोडलेली नाही, पण दुसऱ्या बाजूला त्या नव्या शैली, नवे दिग्दर्शक, नवे विषय यांनाही सामोरे जाऊ पाहत आहेत. बहादूर यांच्याच वाटेचा त्यांनी केलेला हा आधुनिक विस्तार आहे.

मूल्यमापनापेक्षा रचनाविश्लेषणावर व त्यातून उलगडणाऱ्या आशयावर भर, हे या लेखनाचे सूत्र आहे. पण ते करतानाच त्यांनी रचनाविश्लेषणाच्या पलीकडे जाऊन अन्य मर्मदृष्टींचेही सूचन केले आहे. उदा., ‘बॅटलशिप पोटेमकिन’, ‘द ग्रेट डिक्टेटर’ यांना असणारे राजकीय ऐतिहासिक संदर्भ, ‘वाईल्ड स्ट्रॉबेरीज’च्या विश्लेषणाच्या मानसशास्त्रीय दिशा, ‘राशोमोन’च्या विश्लेषणाच्या तत्त्वज्ञानात्मक दिशा, ‘रोमन हॉलिडे’च्या व्यावसायिकतेची चिकित्सा, ‘कूर्मावतार’चा समकालीन सामाजिक संदर्भ इत्यादी.

यांतील प्रत्येक चित्रपटाचे अन्यही विविध अभ्यासपद्धती व मानव्यविद्याशाखांतील मर्मदृष्टींनी विश्लेषण करणे शक्य आहे. सत्यजित राय यांच्या चित्रपट-अभ्यासात श्यामलाताईंनी असे समाजशास्त्रीय विश्लेषण केलेले आहे. परंतु प्रस्तुत अभ्यास कलाकृतीच्या कलात्मकतेचा व आशयाचा रचनाविश्लेषणाच्या आधारे केलेला संहिताअभ्यास आहे. ही मूलभूत अभ्यासपद्धती टाळून खऱ्या विश्लेषण वा मूल्यमापनाकडे जाताच येणार नाही, हे गृहीतक या लेखनाच्या मुळाशी आहे. त्यामुळेच महत्त्वाच्या अशा १२ कलाकृतींचा संहिताअभ्यास समोर ठेवून श्यामलाताईंनी त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर ‘मुळातला अभ्यास करण्यासाठीचा पहिला गंभीर धडा’ या पुस्तकाच्या रूपाने उपलब्ध करून दिला आहे...

मराठीपुरते बोलायचे तर, चित्रपटाच्या आस्वादक चर्चेकडून चिकित्सक समीक्षेकडे जाणारी वाट या पुस्तकाने निश्चितपणे निर्माण केली आहे.

‘चित्रपट-अभ्यास’ - डॉ. श्यामला वनारसे

डायमंड पब्लिकेशन्स, पुणे | पाने - २२४ | मूल्य - ३०० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/products/chitrapat-abhyas

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......