अजूनकाही
गांधीअभ्यासक रमेश ओझा, श्याम पाखरे यांनी लिहिलेली ‘नोआखाली : माणुसकीचा अविरत लढा’ ही कादंबरी नुकतीच मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली आहे. सध्याच्या अत्यंत निराशाजनक परिस्थितीत या कादंबरीच्या रूपाने ‘नोआखाली पर्वा’चे स्मरण करून आपल्या सर्वांना मानवतेच्या रक्षणासाठी प्रेरणा मिळावी, या उद्देशाने लेखकद्वयांनी ही कादंबरी लिहिली आहे. या लेखनामागची भूमिका नेमकेपणाने स्पष्ट करणारे हे त्यांचे मनोगत…
.................................................................................................................................................................
आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या भीषण दंग्यांची जेव्हा चर्चा होते, तेव्हा नोआखालीचे नाव आवर्जून घेतले जाते. नोआखाली हा आजच्या बांगलादेशमधील नदीनाल्यांनी वेढलेल्या अत्यंत दुर्गम अशा प्रदेशात वसलेला जिल्हा. १६ ऑगस्ट १९४६ रोजी मुस्लीम लीगने पुकारलेल्या प्रत्यक्ष ‘कृती दिना’च्या निमित्ताने कोलकाता येथे भीषण साम्रादायिक दंगे भडकले. त्याची धग कोलकातापासून ४०० किलोमीटर दूर नोआखाली जिल्ह्यापर्यंत जाऊन पोहोचली.
१९१५ साली दक्षिण अफ्रिकेतून भारतात परतल्यानंतर गांधीजींनी तीन दशके सत्य, अहिंसा आणि मानवता, ही मूल्ये भारतीय जनमानसांत रुजवण्याचा अथक प्रयत्न चालवला होता. धार्मिक उन्मादामुळे सद्सद्विवेकबुद्धी हरपलेल्या लोकांनी त्या मूल्यांना कोलकात्यात पायदळी तुडवले. तेथील गल्लीबोळात कुजणाऱ्या मानवी मृतदेहांचे लचके तोडणाऱ्या गिधाडांच्या थव्यांचे छायाचित्र आजदेखील मानवतेच्या अधःपतनाच्या स्मृतींना जिवंत करते.
या घटनांमुळे खुद्द गांधीजींना नैराश्याने घेरले होते. तरीदेखील नोआखालीतील अल्पसंख्य हिंदूंचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ७६ वर्षांचे वयोवृद्ध गांधीजी तेथे चार महिने जाऊन राहिले. हे चार महिने त्यांच्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळ होता. तीन दशके भारतीय जनमानसावर एकहाती सत्ता गाजवणाऱ्या या महात्म्याला, तेथे आयुष्याच्या संध्याकाळी प्रचंड अहवेलना आणि अपमानाचा सामना करावा लागला. पाच दशके सततच्या शारीरिक श्रमाने थकलेले शरीर आणि मन व बुद्धीला नैराश्याच्या गर्तेत खेचणाऱ्या परिस्थितीचा सामना करत, मानवतेवर अढळ विश्वास ठेवून, जीवाची पर्वा न करता गांधीजी तेथे जाऊन राहिले.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
नोआखाली हे गांधीजींसाठी एक अग्निदिव्यच होते. तेथे त्यांना केवळ बाह्य परिस्थितीशीच नव्हे, तर स्वतःच्या अंतर्मनाशीदेखील संघर्ष करावा लागला. तो अंतर्मनातील संघर्ष त्यांच्यासाठी अधिक कठीण होता. अखेर जेथे मनुष्याने नृशंसतेचे लाजीरवाणे प्रदर्शन केले, तेथे त्यांनी मानवतेचा सर्वोच्च आविष्कार केला.
गांधीजींवर टीका करणारे, मग ते कोणत्याही विचारसरणीचे असोत, त्यांनी या नोआखालीपर्वाचा अभ्यास जरूर करावा. गांधीजींचे संपूर्ण जीवन हे मानव कल्याणासाठी धगधगणारे यज्ञकुंड होते. ग. त्र्यं. माडखोलकरांनी लिहिले आहे की, येथे हा अद्वितीय याजक स्वतःच यज्ञ होऊन गेला.
या याजकाच्या पूर्णाहुतीची सुरुवात नोआखाली येथेच झाली आणि अंत दिल्लीमध्ये. मानवाच्या इतिहासात सत् आणि असत् शक्तिंमध्ये अखंड चाललेल्या संघर्षात चिरंतन सत् मूल्यांच्या रक्षणासाठी गांधीजींचे नोआखालीत जाऊन राहणे, यास फार मोठे महत्त्व आहे. त्यांनी तसे केले नसते, तर तो मानवतेचा पराभव ठरला असता.
गांधीजींचे वैयक्तिक सचिव प्यारेलाल यांनी स्वानुभव आणि ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारावर लिहिलेल्या द्विखंडीय अंतिम पर्वामधील नोआखालीप्रकरण वाचताना डोळ्यांच्या कडा आपोआप ओलावतात. हिमालयाएवढ्या आव्हानाचा सामना करत गांधीजींनी मानवाच्या असीम आत्मबलाचा अत्युच्च मानबिंदू कसा प्रस्थापित केला, याची कहाणी नवीन पिढीला कळावी, हा ही कादंबरी लिहिण्यामागचा उद्देश आहे. फाळणीनंतरदेखील सांप्रदायिकतेची समस्या जिवंत आहे.
आज आपला समाज स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वांत कठीण आव्हानाला सामोरा जात आहे. पुन्हा एकदा मानवतेच्या अस्तित्वापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केवळ या वर्षांचा विचार केला, तर महाराष्ट्रात अमळनेर, त्र्यंबकेश्वर, कोल्हापूर आणि पुसेसावळी येथे सांप्रदायिक तणाव निर्माण झाला. हरयाणातील नुह येथे सांप्रदायिक दंगे झाले. दंगे भडकावणारे आणि त्यात भरडल्या जाणाऱ्या लोकांच्या स्वरूपात काहीही बदल झालेला नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
पाच महिन्यांपासून मणिपूर जळत आहे. एका वृत्तपत्रात आलेले एक व्यंगचित्र फारच बोलके होते. गांधीजींच्या पुतळ्यासमोर उभा राहून एक लहान मुलगा त्यांना प्रश्न विचारतो आहे, ‘नोआखालीपासून इम्फाळला पायी जाण्यासाठी १३२ तास लागतील. बापू, आपण निघूया का?’
‘साधना’ साप्ताहिकाच्या ऑगस्ट महिन्यातील एका अंकात ‘शिलाँग टाइम्स’च्या संपादक पॅट्रिशिया मुखीम यांची मणिपूरसंदर्भात मुलाखत प्रकाशित झाली. मुलाखतीच्या शेवटी त्या म्हणतात, “...हा संघर्षच मुळात राजकारणामुळे आलेला आहे. त्यामुळे राजकारणामधून तो घाव भरून काढणारा स्पर्श मिळू शकेल, अशी अपेक्षा तुम्ही करू शकत नाही. त्यामुळे मणिपूरला वाचवू शकेल अशी व्यक्ती पूर्णपणे अराजकीय असली पाहिजे, तिला मानवतावादाची आस्था असली पाहिजे. ती व्यक्ती शांतता प्रस्थापित करणारी आहे असा तिचा सिद्ध झालेला पूर्वेतिहास असला पाहिजे. आता आज अशी व्यक्ती आम्ही कुठे शोधावी?”
मुखीम यांनी विचारलेला प्रश्न हा नागरीक समाजासाठी एक आवाहन आणि आव्हानदेखील आहे.
अशा अत्यंत निराशाजनक परिस्थितीत या कादंबरीच्या रूपाने नोआखाली पर्वाचे स्मरण करून आपल्या सर्वांना मानवतेच्या रक्षणासाठी प्रेरणा मिळावी, अशी आमची नम्र इच्छा आहे.
‘नोआखाली’ - रमेश ओझा, श्याम पाखरे
मनोविकास प्रकाशन, पुणे | मूल्य - २७० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment