लेखक-दिग्दर्शक राही बर्वे हे नाव ‘तुंबाड’ या बहुचर्चित सिनेमामुळे सर्वांना परिचयाचे झाले आहे. हा सिनेमा अनेकविध कारणांसाठी लोकप्रिय ठरला. आंतरराष्ट्रीय सिनेस्तरावरही तो वाखाणला गेला. परंतु जितका भव्यदिव्यतेने हा सिनेमा पडद्यावर साकारला गेला, त्याहूनही कितीतरी पटींनी जास्त तो बनण्याचा प्रवास क्लिष्ट होता. केवळ दिग्दर्शक म्हणूनच नव्हे, तर एक माणूस म्हणूनही राही यांच्या धीर-संयमाची कसोटी पाहणारा होता. एकीकडे सिनेमा बनवण्याच्या खटपटी, तर दुसरीकडे आईचे असाध्य आजारपण... ‘श्वासपाने’मध्ये राही यांनी त्यांचा हा सबंध प्रवास अत्यंत प्रवाहीपणे सांगितला आहे. या पुस्तकाला प्रसिद्ध अभिनेते आणि कवी किशोर कदम उर्फ सौमित्र यांनी लिहिलेली ही प्रस्तावना…
..................................................................................................................................................................
“Shallow people demand variety but I've been writing the same story throughout my life, and every time trying to cut nearer the aching nerve.”
- August Strindberg
मुलं बोलायला नक्की केव्हा लागतात?
स्वप्न पाहायला लागतात त्यांची त्यांची, तेव्हा त्यांचं काय वय असतं? चालू लागतात, तेव्हा आयुष्यातलं पहिलं पाऊल पडताना त्यांची दिशा ठरवून जातं का?
आयुष्यातला पहिला गोड पदार्थ खाल्ल्यानंतर त्या चवीची आठवण त्यांना नक्की कशी असते?
पहिल्या कडू चवीचं नेमकं काय वाटतं किंवा कळतं त्यांना?
पोट भरल्याची पहिली जाणीव म्हणजे काय, हे त्यांना केव्हा समजतं? भूक लागली आहे, ही जाणीव... शाळेत पहिला ‘अ’ लिहिला तो- तेव्हाचा क्षण मुलांना आठवत असतो का?
पहिलं खोडलेलं अक्षर आठवतं का त्यांना?
कवितेसारखं पहिलं पहिलं लिहिलेलं काही... पहिलं वाचलेलं पुस्तक... पहिलं आवडलेलं कॅरेक्टर... पहिला आवडलेला लेखक... पहिला सिनेमा... पहिला दिग्दर्शक... दिग्दर्शन म्हणजे काय, याची पहिली जाणीव त्यांना कधी होते? ती कुणाला होते? आणि अशी मुलं कोण असतात?
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
इथं मी थांबतो; कारण मला राही बर्वे या दिग्दर्शकाबद्दल बोलायचं आहे. त्याच्या ‘श्वासपाने’ या पुस्तकाच्या त्र्याहत्तराव्या पानावर एखाद्या उत्तम सिनेमामध्ये एखादा ‘अॅब्रप्ट कट’ यावा, तसं मध्येच त्याची आई त्याला सांगू लागते....
“फुलू (म्हणजे त्याची सख्खी बहीण... सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक फुलवा खामकर) वर्षाच्या आतच बोलू लागली. तू मात्र साडेतीन वर्षांचा होईपर्यंत एक शब्द बोलला नव्हतास. मला आणि अनिलला वेड लागायची पाळी आली… एक वाक्य नाही, ‘आई’ नाही, ‘बाबा’ नाही, काही नाही. फारतर ‘यममयम’ असं क्वचित काहीतरी. वर डॉक्टरांना तुझ्यात कुठलाच दोष दिसेना. आम्हाला काय करावं, कुठे जावं समजेना. एकदा आम्ही तुम्हाला संभाजी पार्कात नेले. तिथे तू हत्ती पाहिलास. रात्री सारे घरी येऊन झोपलो. मध्यरात्री मला जाग आली, तर तू मला हलवत होतास. म्हणालास, ‘आई, मला हत्तीची भीती वाटते.’ माझा माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. मी धडपडत अनिलला उठवलं. तेव्हा तू पुन्हा ते अख्खं वाक्य म्हणालास, ‘आई, मला हत्तीची भीती वाटते.’ त्या रात्रीनंतर तू हळूहळू बोलायला लागलास. म्हणूनच बाबांनी तो लाकडी हत्ती घरात आणला.”
जो मुलगा वयाच्या तीन साडेतीन वर्षं बोलत नव्हता, तो पुढे जाऊन सिनेमाच्या वेगळ्या भाषेत बोलणार आहे, वडिलांप्रमाणेच लेखक होणार आहे, हे त्याच्या आईला कुठे माहीत होतं?
राजकारण्याच्या मुलाने राजकारणात जायचं, उद्योगपतीच्या मुलाने उद्योग सांभाळायचा, फिल्ममेकरच्या मुलाने फिल्मच बनवायची, या नियमानुसार लेखकाच्या मुलाने लेखकच व्हायचं, हे गृहीतक कितीही खरं असलं किंवा खोटं असलं तरी राही बर्वे हा अनिल बर्वे नावाच्या ग्रेट लेखकाचा मुलगा काहीतरी लिहिता झाला नसता, तर नवलच होतं!
त्याने आतापर्यंत एक कथासंग्रह व एक कादंबरी लिहिली आहे आणि आता हे ‘श्वासपाने ’ हे त्याचं तिसरं पुस्तक.
‘श्वासपाने’ या शब्दातच त्याला हे सगळं का लिहावंसं वाटलं, हे शोधण्याचा प्रयत्न केल्यास मला काही जाणवलं. आपण समुद्रकिनारी, बागेत, हिल स्टेशनला जातो, तेव्हा घेतलेला श्वास आणि एखाद्या हॉस्पिटलमध्ये घेतलेला श्वास यात जमीन-अस्मानाचा फरक असतो. कारण समुद्रकिनारी, बागेत, हिल स्टेशनवर खूप मोकळी जागा असते, मोकळा परिसर असतो. वर विस्तीर्ण ‘अवकाशाभाळ’ पसरलेलं असतं. माणसं आनंदी असतात. अंतरा अंतराने असतात. त्यामुळे तिथे भरपूर श्वास घेता येतो. आपल्या नकळत आपण भरपूर श्वास घेत असतो, आणि आपल्या शरीरात मोकळेपणा, निसर्ग, आकाश आणि आपली मनःस्थिती एकमेकांत मिसळून भरपूर भरपूर होत जात असतात. पण एखाद्या हॉस्पिटलमध्ये अनेक पेशंट, औषधांचे वास, लोकांच्या चेहऱ्यावरले भाव, त्यांच्या हालचालींतून प्रतीत होणारी अस्वस्थता, वॉर्डमध्ये, आयसीयूमध्ये नाकातोंडात, हाताच्या शिरांमध्ये शिरलेल्या आयव्हीज् आणि कफनाचा पांढरेशुभ्रपणा मिरवत संपूर्ण वॉर्ड आणि हॉस्पिटलभर फिरणारे डॉक्टर्स, नर्सेस आणि अॅडमिट केलेल्या प्रत्येक पेशंटची एक एक श्वास घेण्याची धडपड.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
या सगळ्या वातावरणामुळे एक गुदमरणारा गंध आपसूकच तिकडे भरून येतो आणि संपूर्ण हॉस्पिटलभर डॉक्टर, नर्सेससकट पेशंटना भेटायला आलेले नातेवाईक आणि पेशंट, सगळ्यांनाच श्वास घेताना, नेटवर्क नसल्यावर समोरच्याचा आवाज जसा किंचित तुटत तुटक ऐकू येऊ लागतो, तसं श्वासांचं होत जातं, कारण तिथे प्रत्येक जण प्राण शोषून घेत असतो. कारण हॉस्पिटलमध्ये प्रत्येकाला त्याची जास्त गरज असते.
श्वास म्हणजे ‘प्राण’ असं बऱ्याच ठिकाणी लिहून ठेवल्याचं मी वाचलेलं आहे. आपण एक-एक श्वास घेतो, म्हणजे प्रत्येक श्वासागणिक आपण आपल्यात एक-एक प्राण घेत असतो. आणि म्हणूनच आपण ‘असतो’. जेव्हा आपल्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो आणि हळूहळू आपला श्वास सुईसारखा होत होत सूक्ष्म होत जातो आणि शेवटी थांबतो, तेव्हा आपण ‘नसतो’.
राहीनेही म्हणूनच या पुस्तकाला ‘श्वासपाने’ असं नाव दिलं असावं. कारण या पुस्तकातलं प्रत्येक वाक्य न् वाक्य लिहिताना एखादा ध्यानधारणा करणारा माणूस जाणीवपूर्वक जसा प्रत्येक श्वास घेतो, दीर्घ श्वास घेतो आणि सोडतो तसं लिहिलं असावं किंवा त्याच्या अवतीभवती जे घडत होतं, ज्याने त्याला गुदमरायला होत होतं, ज्यामुळे त्याला प्रत्येक श्वासागणिक त्यानं लिहिलेल्या प्रत्येक श्वासाची जाणीव होत गेली असावी.
किंवा गुलज़ार साहेब म्हणतात तसं, ‘साँस लेना भी कैसी आदत जीये जाना भी क्या रवायत हैं’, तसं सगळं सहन करताना सवयीप्रमाणे श्वास घेतच राहून तो पानोपानी मोकळा होत गेला असावा. म्हणूनच प्रत्येक श्वास म्हणजे एक पान असावं किंवा प्रत्येक पान म्हणजे एक श्वास असावा. खरं तर तीनशे सदतीस पानांच्या या संपूर्ण ऐवजाला आपण ‘श्वासपाने’ऐवजी ‘प्राणपाने’ ही म्हणू शकू.
तो सुरुवातीच्या मनोगतात म्हणतो, “मी गेली बरीच वर्षे फक्त स्वतःसाठी लिहितो आहे. ह्यात ‘इगो’ वगैरे काही नाही. कधी डोके रिकामे होते. कधी स्वतःच्या चुकीच्या वर्तणुकीकडे वळायचे झाल्यास महिन्या-वर्षांपूर्वीचा पुरावा शिल्लक राहतो.”
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
हे जरी असलं तरी ते लिहिताना त्याच्या सभोवताली जे घडत होतं, ते सहन करण्याची शक्ती या कोऱ्या पानांनी त्याला दिली असावी. त्याची आई; जिला डिटेक्ट झालेला स्टेज फोर ब्रेन ट्यूमर, सर्वार्थाने आपण अपयशी ठरलो असल्याची जाणीव व त्याच्या आईचं त्याही परिस्थितीत त्याच्या मागे भक्कम उभं राहणं, रात्री अपरात्री वेदनेनं त्याच्या आईचं विव्हळणं आणि कधीतरी रात्री घरातल्या घरात त्याला ते ऐकू न येणं, आपल्याला एका कानानं ऐकू येतं की नाही; ही शंका येऊन डॉक्टरकडे गेल्यावर, खरंच त्याच्या एका कानात काहीतरी प्रॉब्लेम आहे, हे कळणं आणि एक मायनर सर्जरी करायला दुसऱ्या दिवशी जाणं आणि सर्जरी फेल होऊन त्याचं निम्मं बहिरं होणं, तिकडे ‘तुंबाड’साठी जिवाचा स्ट्रगल चालू असणं, यातच बाहेरचा सगळा कोलाहल कमी कमी ऐकू येत असताना, मनातला कोलाहल वाढत जाणं आणि त्यातूनच समोर असलेल्या कोऱ्या पानांना जवळ करणं आणि तो संपूर्ण कोलाहल कागदावर उतरवून स्वतःला ऐकण्याची धडपड करणं हेच राहीचं झालं असणार.
पान २२वर तो लिहितो, “१९९३ साली माझ्या जाड्या मित्राने नागझिराच्या जंगलात, रात्री सगळे जण झोपल्यावर ती धारपांची अतिसामान्य कथा ‘हिंस्र’ ऐकवून माझ्या गोट्या अशा कपाळात घातल्या की, ती साडेसाती २०११पर्यंत वाढत वाढत ‘तुंबाड’ बनून माझे अख्खे जग व्यापून बसली.”
एखाद्या कलाकृतीला एखाद्या दिग्दर्शकाने किती पॅशनेटली भिडावं, त्यासाठी त्याचा स्वतःवर आणि त्या भावी कलाकृतीवर किती विश्वास असावा, याचं अतिशय प्रत्ययकारक चित्र राहीनं ‘श्वासपाने’मध्ये मांडलं आहे, जे वाचताना आपल्याला हबकून जायला होतं.
मी कुठेतरी एका महान दिग्दर्शकाचं स्टेटमेंट वाचलं होतं, “माझ्या चित्रपटात सुरुवात, मध्य आणि शेवट असतीलच; पण ते त्याच क्रमानं असतील याची शाश्वती मी देऊ शकत नाही.” तसंच राहीच्या या पुस्तकाला सुरुवात, शेवट, मध्य असं काही नाही. काहीही ठरवून किंवा आराखडा बांधून न लिहिता मनाचा प्रवाह वाहता ठेवून, त्याच्यात अजिबात अडथळा न आणता त्याने त्याला मनमुक्त वाहू दिलं आहे. त्यामुळे घटना पुढून मागे, मागून पुढे, इकडून तिकडे, तिकडून पलीकडे, पलीकडून चहूकडे अशा भिरभिरत राहतात. म्हणूनच राहीच्या मनातला भिरभिरता कोलाहल आपल्यापर्यंत जसाच्या तसा भिरभिरतच पोहोचत राहतो.
एके ठिकाणी तो म्हणतो, “१९९६पासून २००५पर्यंतचा सारा खडतर प्रवास पुसून टाकला आणि पुढल्यासाठी पाटी कोरी केली. टळटळीत दुपार होती. स्टुडिओतून बाहेर रस्त्यावर आलो तेव्हा पंचवीस वर्षांचा होतो. डोक्यावर गरम सूर्य, पण मन शांत होते. आईला फोन करून सांगितलं, ‘From now on I'll be on my own. आपले घर चालते राहील, पैशाअभावी अडणार नाही इतकं पाहीन, पण इथून पुढे नोकऱ्या नाहीत. Only on my own always!’ ती फक्त हसली आणि ‘काँग्रॅट्स’' म्हणाली.”
हे वाचल्यावर मला वाटलं, निघाल्याशिवाय ‘निघणं’ किती सोपं असतं, हे आपल्याला कळतच नाही. निघण्याआधी आपल्या मागे उभं असलेलं सारं एखाद्या महाकाय सावलीसारखं आपल्याला भेडसावत असतं. आणि आपण अचानक चालू लागलो की, त्या भूतकाळाची अजस्र सावली अचानक आपल्या मागोमाग येऊ लागते. हळूहळू आपल्यावरून ती मागे मागे सरकायला लागते. आणि एक दिवस असा उजाडतो की, आपण कुठून तरी लख्ख बाहेर पडतो आणि तेव्हा लक्षात येतं की, आपण समजत होतो तितकं ‘निघणं’ काही कठीण नव्हतं.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
तिथून निघून राही सरळ तारकर्लीला जातो आणि समोर असलेल्या विस्तीर्ण समुद्रात स्वतःला झोकून देतो. ते जणू आयुष्याच्या समुद्रातच बेदिक्कत झोकून देणं असतं. कारण राहीला माहीत असतं की, तो पोहू शकतो आणि पोहणं त्याला आवडतं. आता पोहणं आवडणारा माणूस नक्की का पोहत असतो? याची वेगवेगळी कारणं असतात. पण काहींचं स्वतःला समुद्रात झोकून देणं हे अतिशय सिम्बॉलिक असतं. त्याच्या मागे काही नसतं, पुढे काही नसतं आणि या दोघांच्या मध्ये त्याचं ‘असणं’ फक्त तरंगत असतं व शरीराखाली एक प्रचंड समुद्र असतो. तरंगत राहायचं म्हटल्यावर हात-पाय मारावेच लागतात.
राहीनं खूप हात-पाय मारले असावेत, कारण त्याला स्वतःला थकवायचं असावं. ‘ओल्ड मॅन अँड द सी’मधला सँटियागो म्हातारा देवमाशाची शिकार करून तो अख्खाच्या अख्खा मासा जसाच्या तसा किनाऱ्यावर आणता आणता त्या प्रचंड माशाचा फक्त सांगाडाच उरतो. कारण इतर मासे तो खाऊन टाकतात. पण तो मासा किनाऱ्यापर्यंत आणण्याची जिद्द म्हाताऱ्याला इतकी थकवून टाकते की, तो किनाऱ्यावर आल्याआल्या किनाऱ्यावरच्या वाळूतच पडतो, गाढ झोपी जातो आणि मग हेमिंग्वे त्याच्या कादंबरीचं शेवटचं वाक्य लिहितो, ‘द ओल्ड मॅन वॉज ड्रीमिंग अबाउट द लायन्स.’
तसं राहीनं स्वतःला खूप थकवून झोपवलं असावं आणि त्यानंतर एका रात्रीत सटासट ‘मांजा’ सिनेमा लिहून टाकला, असं तोच लिहितो. 'मांजा' संपल्यानंतर त्यावर त्याची स्वतःचीच प्रतिक्रिया अशी आहे की, ‘‘मला अजिबात कलाकारांना नीट डिरेक्ट करता आलं नाही. मी सारा फोकस फक्त व्हिजुअल्सवर ठेवला. लॉजिकचा तर फिल्मशी कसलाच संबंध शिल्लक उरला नव्हता... मी बाप जन्मात स्वतःच्या फिल्म्स स्वतः बसून एडिट करता कामा नये...” इतकी तो स्वतःच्या कामाची स्वतःच अतिशय परखड चिकित्सा करतो.
आईचं आजारपण, स्वतःचं बहिरेपण, त्यावरचे उपाय, त्या खत्रुड डॉक्टरवरची चिडचिड, ‘तुंबाड’चं पुन्हा स्टॉल होणं, निर्मात्यांबरोबर आठवड्यातून दहा-बारा वेळा होणारी क्रिएटिव्ह डिस्कशन्स, अचानक निर्मात्याचं गायब होणं, त्याच्या सिनेमासाठी अनुराग कश्यपची चाललेली धडपड, पुन्हा हॉस्पिटल, पुन्हा घर, आईचं विव्हळणं, वेदना आणि नंतर तो लिहितो, “I am bleeding money at a shocking rate आणि जन्मभर माझ्या उधळेपणावर लक्ष ठेवून शांत धीराने सेव्हिंग्ज जुळवणारी माझी शहाणी, आभाळउबेची आई ५ ऑगस्टला दुपारी अडीचच्या सुमारास तिसऱ्या सिझरसोबत हिंदुजाच्या गेटजवळ नेहमीसाठी नाहीशी झाली. एका भर दुपारी हिंदुजा हॉस्पिटलखाली आईचं आभाळ कोसळणं आणि त्याही परिस्थितीत पिसाट आतून उमलून पाठीचा कणा भक्कम करण्याचं सेल्फ रिलायझेशन.”
तो पुढे लिहितो, “तो भरवशाचा कणा मोडला पण आपण मोडलो नाही. कारण त्वेषा-द्वेषाशी संबंध नसलेले काहीतरी फार सुंदर शांत खोल आतून अचानक उमलून आले. ते स्वतःत आहे, ह्याची जन्मात कल्पना नव्हती. ते नेमके काय होते ते ठाऊक नाही, पण त्याने रक्षण केले. नंतर पुढे कित्येक दिवस रस्त्याने येणारी जाणारी अनोळखी माणसेदेखील किती छान हसली. तेव्हाही समजले होते की, हे जे काही उमलून बाहेर आलंय, त्याला पुन्हा हळुवार विषारी काळ छळाने ठेचत ठेचत मारणार हेही त्यांनेच मला समजावले. गरज सरल्यावर शांत ज्योतीसारखे विझले.”
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
हे सगळं घडून गेल्यानंतर तो श्वासपानांशी बोलतो. तो म्हणतो, “श्वासपानांनो, धन्यवाद! मनापासून धन्यवाद! मला गरज असताना तुम्ही ऐकून घेतलं. आता सर्व ठीक आहे. मी ठीक आहे. काल लाखातले एक जावे इतकी शांत सुंदर हळुवार माझ्या बहिणीच्या नजरेसमोर आमच्या आईची चेतना संपली. इतकी सुंदर निर्जीव झाली की मला क्षणभर खरंच आनंद झाला. मी टाळ्या वाजवल्या. शिट्या मारल्या. सुयशला म्हणालो, ‘शी इज गॉन, फार सुंदर गेली.’ साऱ्यांना वाटले, माझे डोके फिरले. इतका मी आनंदी झालो. लाखातले एक इतके नाजूक हळुवार वेदनारहित संपते.”
या संपूर्ण प्रवासात आंद्रे तार्कोव्हस्की, आंद्रे रूब्लेव्ह, स्टॉकर, द रिटर्न, ‘देअर विल बी ब्लड’मधला ऑइल मॅन, कितीतरी लेखक, कादंबऱ्या त्याच्या सोबत होत्या म्हणूनच त्याचा प्रवास थोडासा सुखकर झाला. तार्कोव्हस्की नावाच्या दिग्दर्शकाचा त्याच्यावर फार खोलवर परिणाम झालेला दिसतो. तार्कोव्हस्कीनं त्याच्या मनावर केलेला पहिला तडा त्याला आठवतो. तो लिहितो, “बावीस वर्षांचा होतो, तेव्हा पहिला बारीक तडा गेला. कधी हा कंटाळवाणा पिक्चर संपतोय, असं पहिल्या वीस मिनिटांत वाटायला लावलेल्या मधल्या एका मायनर टेकनं माझ्या गारगोटी डोळ्यांवर पहिले शिंतोडे उडवले. मी खुर्चीतच उडाल्यासारखा झालो… तिथून माझी उघड्या डोळ्यांच्या वाटचालीला चाचपडत सुरुवात झाली. सम वन विल ऑल्वेज सेल यु फॉर थर्टी ऑफ सिल्वर.”
राहीचा ‘तुंबाड’ आठ वेळा स्टॉल झाला. त्याला तो स्वतःच्या कन्व्हिक्शनवर, त्याला स्वतःला वाटेल तसा, त्याला हवा तसा बनवायचा होता. हे परफेक्शन त्याच्यात बहुतेक तार्कोव्हस्कीच्या क्रिएटिव्ह प्रोसेसमधून आलं असावं. तार्कोव्हस्कीच्या ‘स्कल्पटिंग इन टाईम’ची पारायणं त्याने केली होती. ती करताना एक दिवस अचानक त्याची नजर अडली आणि जीएंच्या पायथागोरस प्रमेयाप्रमाणे त्याच्यात एकदम काहीतरी लख्ख उजळून स्पष्ट झालं.
“You were walking along the street and your eyes met those of someone who passed you. There was something startling in his look, it gave you a feeling of apprehension. He influenced you psychologically, put you in a certain frame of mind.
If all you do is reproduce the conditions of that meeting with mechanical accuracy, dressing with actors and choosing the spot for shooting with documentary precision, you still won't achieve the same sensation from the film sequence as you had from the meeting itself. For when you filmed the scene of the meeting you ignored the psychological factor, your mental state which caused the stranger's look to affect you with that particular emotion. And so for the stranger's look to startle the audience as it did you at the time, you have to prepare for it by building up a mood similar to your own at the moment of the actual meeting. This means additional work by the director and additional script material.
मला मजल-दरमजल करत शक्यतो तिथेच पोहोचायचे आहे. त्याने उल्लेखलेल्या नजरेजवळ, तो सांगतोय ते दाखवायला तो फिल्मच्या मार्गाने धडपडला. तसे पाहायला गेले तर सगळेच कलावंत आपापल्या कलांच्या मार्गाने स्वतःला खोल आत भिडलेले समोरच्यावर कुठेतरी खोल आत उमटवायला धडपडत असतात. कलावंतच का कसल्याही कलेशी बादरायण संबंध नसलेला संवेदनशील साधा माणूस पण सतत ह्यासाठीच प्रयत्नशील असतो. परीसस्पर्श लाभलेल्या कलावंतांना एक्स्टर्नल टूल्स हाताशी असल्यामुळे सामान्य माणसापेक्षा ते थोडे सोपे जात असावे. त्यात कलावंताचे कलावंत म्हणून कितीही कौतुक असो, पण माणूस म्हणून एका मर्यादेपलीकडे कौतुक करायचे कारण नाही. पण स्वतःला भिडलेले सारे वेगळ्या मानवी मनात तसेच्या तसे निर्मू शकणे फार कमी जणांना शक्य होते.”
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
राही हेच साधण्याचा आटोकाट प्रयत्न करत असावा आणि स्वतःच्या मनात उमललेलं जसंच्या तसं निर्मित करण्याचा ध्यास हेच ‘तुंबाड’चं यश आहे, असं म्हणावं लागतं. ‘तुंबाड’साठी पुन्हा पुन्हा अपयश येत असताना स्वतःच त्याचा त्याला तो समजावत राहिला. भुकेत जीव जातेवेळी पुढ्यातील त्या श्वापदामागे धपाप धावायचे नसतं. अशा वेळी संयमानं स्वतःची ताकद टिकवून दबा धरून बसायचं असतं. तरच या नष्टचर्यात अखेरीस काहीतरी पोटभरीचं मिळण्याची शक्यता निर्माण होते, हे त्याला कळतं आणि मग तो स्वतःलाच दरडावतो, “उगाच धपाप धावू नकोस. मरशील. दबा धर.”
‘श्वासपाने’ वाचताना राहीच्या मनात लिहिते क्षणी प्रवाह जिथे जिथे वळत होता, तिथे तिथे त्यानं तो वळू दिला. त्या प्रवाहातलं पाणी इतकं नितळ होतं, इतकं चपळ होतं की, त्या प्रवाहातल्या पाण्याने मध्येच कुठल्या खडकावरून, कुठल्या झाडावरून, कुठल्या डोंगरावरून कुठे उडी मारली याचंही त्याला भान नव्हतं. नाईलचा उगम ज्या ठिकाणी होतो तिथून दोनतीनशे मैलांवरच समुद्र आहे. ती अटलांटिक किंवा हिंदी महासागरात सहज जाऊ शकत होती. पण हजारो मैल प्रवास करून ती उत्तरेकडे भूमध्य सागरात संपते. खुद्द तिलाच या गोष्टीचं गूढ नवल वाटलं असेल.
तसंच राही लिहिताना कुठून सुरुवात करतो आणि कुठे घेऊन जातो, याची वाचकाला कल्पनाच नसते. हे म्हणजे आपल्या जगण्यासारखच असतं. आपण कितीही ठरवलं, तरी आपल्याला कुठे आपलं अंतिम ठिकाण नक्की माहीत असतं? वर सांगितल्याप्रमाणे ‘श्वासपाने’ वाचता वाचता आपण अनेक सिनेमे, अनेक व्यक्तिरेखा, अनेक पुस्तकं, अनेक आठवणी, अनेक कोट्स, अनेक घटनांनी झिगझॅग फिरत राहतो. पण एकदा त्या झिगझॅगमध्ये बसल्यावर आपण कितीही गरगरलो, कितीही गुदमरलो, कितीही घाबरलो तरी आपल्याला मधेच उतरता येत नाही. अपरिहार्यपणे आपल्याला राहीसोबत त्याची पानं श्वासावीच लागतात.
‘चाकांचे सारे आरी मध्यबिंदूला मिळतात, पण त्या आऱ्यांमधल्या ज्या रिकाम्या जागा असतात; खरा अर्थ त्यांना असतो. भांडी मातीची बनवली जातात, पण भांड्यांतल्या रिकाम्या जागेनेच भांड्याला अर्थ प्राप्त होतो. खिडक्यांसकटच्या भिंती, भिंतींमधली दारं हे सगळं ठीक; पण भिंतींमधल्या, रिकाम्या जागांमध्येच खरा अर्थ असतो’, असं लाओ त्सु म्हणतो.
राहीमध्ये आणि वाचणाऱ्यांमध्ये वाचता वाचता सुटत गेलेल्या आणि निर्माण झालेल्या रिकाम्या जागांचा अर्थ म्हणजे ‘श्वासपाने’ असावं. जे खरं तर ‘प्राणपाने’ असू शकत होतं.
असो. ‘श्वासपाने’ वाचणं हा एक सर्जनशील अनुभव आहे, हे मी खात्रीनं सांगू शकतो.
‘श्वासपाने’ - राही अनिल बर्वे
पॉप्युलर प्रकाशन, मुंबई | पाने - ३५७ | मूल्य - ५०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment