जगण्याशी रोज दोन हात करणाऱ्या फाटक्यातुटक्या माणसालाही चार हत्तींचं बळ जमवून विपरीत परिस्थितीशी कसं झुंजता येतं, याची प्रचिती देणारं आत्मचरित्र!
ग्रंथनामा - झलक
अशोक ढवळे
  • नरसय्या आडम आणि त्यांचं आत्मकथन ‘संघर्षाची मशाल हाती’चं मुखपृष्ठ
  • Mon , 10 July 2023
  • ग्रंथनामा झलक संघर्षाची मशाल हाती Sangharshachi Mashal Hati नरसय्या आडम Narsayya Adam

सोलापूरमधील सामाजिक कार्यकर्ते आणि आमदार नरसय्या आडम यांचं ‘संघर्षाची मशाल हाती’ हे आत्मचरित्र नुकतंच समकालीन प्रकाशनतर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्यूरो सदस्य डॉ. अशोक ढवळे यांनी लिहिलेली ही प्रस्तावना…

..................................................................................................................................................................

आचार्य अत्र्यांनी या माणसाला पाहिलं असतं तर ‘पहाड’, ‘भव्य’, ‘बुलंद’ अशा विशेषणांनीच त्यांनी नरसय्या आडम यांचं वर्णन केलं असतं. एका अर्थी अतिशयोक्तीही फिकी पडावी, असं आयुष्य जगलेला हा माणूस. आडम मास्तरांच्या जणू पाचवीला संघर्ष पुजलेला. त्यांचं जगणं कुणाही सामान्य माणसासारखं सर्वसाधारणच. पण त्या सामान्यांतून हा माणूस असामान्यतेच्या जवळ कसा पोहोचला, हे त्यांच्याच शब्दांत वाचणं ही एक पर्वणीच. त्यांच्यातील असामान्य गुण फुलले, ते काही त्यांच्या एकट्याच्या कर्तृत्वाने नव्हे. त्या असामान्यत्वाचे त्यांच्याइतकेच मानकरी आहेत त्यांचे असंख्य सहकारी. त्या असंख्यांची स्वप्नं, आकांक्षा आणि बळ ज्याने आपलंसं केलं आणि आपलं जगणं त्यांच्या जीवनाचा अतूट हिस्सा आहे असं मानलं, माणूस म्हणजे नरसय्या आडम, म्हणजेच ‘आडम मास्तर’.

त्यांच्या या आत्मकथनातून दिसतो, तो असा अचाट मनुष्य. एका राईतून पर्वत उभा करू पाहणारा. अणूच्या अंतरंगात शिरून आभाळ पाहण्याची दुर्दम्य आकांक्षा बाळगणारा. अस्सल कम्युनिस्ट कार्यकर्ता काय चीज असते, हे पाहायचं असेल तर हे आत्मवृत्त प्रत्येकाने वाचलंच पाहिजे. जगण्याशी रोज दोन हात करणाऱ्या फाटक्यातुटक्या माणसालाही चार हत्तींचं बळ जमवून विपरीत परिस्थितीशी कसं झुंजता येतं, याची प्रचिती देणारं हे प्रेरणादायी आत्मचरित्र आहे.

कम्युनिस्ट आणि संघर्ष हे समानार्थी शब्दच. पण संघर्षाच्याही प्रती असतात. त्यांची प्रखरता व्यक्तिगणिक आणि प्रश्नागणिक कमी-अधिक असू शकते. मात्र, काही माणसांचं सारं जीवन अखेरपर्यंत संघर्षाच्या मुशीतच उलगडत जातं. त्याचा लालिमा तिळमात्रही कमी होत नाही. आडम मास्तरांचं जगणं तसंच. रशियन कम्युनिस्ट क्रांतीच्या पार्श्वभूमीवरील ‘हाऊ द स्टील वॉज टेम्पर्ड’ नावाची कादंबरी आहे. क्रांतीच्या समरात लोखंडासारख्या ओबडधोबड माणसांतूनही पोलादी व्यक्तिमत्त्वं कशी घडतात, याचं दर्शन त्या कादंबरीतून होतं. तसंच आर्थिक पिळवणूक, सामाजिक अन्याय आणि अत्याचार नष्ट करण्यासाठी सामान्य माणसाचंही धारदार शस्त्रात रूपांतर होण्याची कहाणी म्हणजे आडम मास्तरांचं हे आत्मचरित्र.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

कुणीही विधाता जनतेचे नायक जन्माला घालत नाही. जो खऱ्या अर्थाने सामान्यातला सामान्य बनत जातो, तोच असामान्यतेच्या पदवीला गवसणी घालून नायक बनतो. आडम मास्तर सोलापूरच्या कापड गिरणीतील नारायण आडम या कामगाराचा मुलगा. त्या काळातील इतर असंख्य माणसांप्रमाणेच स्वतःची खरी जन्मतारीखही त्यांना माहीत नाही. स्वातंत्र्याच्या उंबरठ्याच्या अलीकडे आणि पलीकडे होरपळ हाच बालजीवनाचा अनुभव होता. दिवसाला तीन-चार रुपड्यांची कमाई, आठ-दहा जणांच्या हातातोंडाची गाठ घालायची आणि तरीही आल्या पाहुण्याला रिकाम्या पोटी पाठवायचं नाही, ही रीत अंगीकारलेली.

अशा घरात जन्मलेल्या मुलाला पूर्णवेळ शिक्षण ही चैन लाभत नाही. बालपणीच मजुरीचा अनुभव पदरी पडतो. तसा तो बाल नरसय्याच्या पदरी पडला. चार पैशांसाठी मिळेल ते काम करत, खुराड्यासारख्या घरात राहत, शिक्षण पूर्ण होणं अवघडच. नरसय्याच्या बाबतीतही तेच घडलं. त्यानेही शाळा मध्येच सोडून जगण्याच्या विश्वात उडी घेतली.

या धबडग्यात नरसय्याही समाजसागरातील एक अनामिक थेंब असता तर कुणाला आश्चर्य वाटलं नसतं. पण अशा थेंबांतून मोती घडवण्याची बनून गेला प्रक्रिया त्या जनसागरातच घडत असते. समाजघडणीला उपक्रमशीलता लागते, सर्जनशील कल्पकता लागते. ती काही व्यक्तींच्या रूपात व्यक्त होते, जशी ती नरसय्याच्या रूपात व्यक्त झाली. आर्थिकदृष्ट्या कुचंबलेल्यांच्या जगात ‘दादागिरी’ ही नेतृत्वाची प्राथमिक पायरी असते. तेच प्रशिक्षण समाजाने त्यांना सहजगत्या दिले. त्या खाचखळग्यांतून गेल्याशिवाय मोठेपणीचा ‘दबंगपणा’ त्यांच्यात विकसित झाला नसता. पण त्या दबंगपणाचं रूपांतर हिंस्त्रतेत न होता एका सुजाणतेत झालं, त्याचं कारण त्यांच्यावरील घरातल्यांचे, विशेषतः आईचे संस्कार. (गॉर्कीच्या आईचं मूळ प्रतिमान भारतीय आई असावं.) तिने आणि बऱ्याच अंशी वडिलांनीही शिकवलेल्या माणुसकीला कल्पकतेचे पंख फुटले. जग आपल्या रंगाने रंगवलं पाहिजे, अशी मनीषा जागी झाली. म्हणून पतंगविक्रीसोबतच मोहरमचे वाघ रंगवण्याचा उद्योगही त्यांनी आपल्या कामाचा भाग बनवला. ते वाघ रंगवता रंगवताच वाघासारखं जगायची जिद्द त्यांच्यात जागवली गेली असावी.

वडील कामगार आणि कम्युनिस्ट कामगाराने जगण्याच्या ओघात सहजपणे कम्युनिस्ट बनण्याचे ते दिवस. त्यामुळे त्या पित्याला आपल्या मुलाने मोठा होऊन कमवायला लागावं, अशी कनिष्ठ मध्यमवर्गीय आस न लागता त्याने कम्युनिस्ट व्हावं, असं वाटणं साहजिक होतं. त्यामुळे मार्क्सवादाचं, कम्युनिझमचं शिक्षण घरातच सुरू झालं.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

आडम मास्तरांची वडिलांसोबत मार्क्सवादाबद्दल झालेली चर्चा रोचक आणि प्रबोधक आहे. त्यांच्या आत्मकथेतील हा भाग म्हणजे मार्क्सवादाच्या अभ्यासवर्गातील एक धडाच शोभावा. खरं तर असे अनेक धडे या क्रांतीच्या पुस्तकात सामावलेले आहेत. त्यामुळे ‘समई’, ‘कमळ’, ‘रांगोळी’ असे शब्द ज्या सहजपणे मध्यमवर्गीयांच्या बालवयात आत्मसात केले जातात, त्याच सहजतेने डोळ्यांत अपार उत्सुकता असलेल्या नरसय्याने लाल सलाम, क्रांती, मार्क्स, कॉम्रेड, मालक, कामगार, शोषण, नफा हे शब्द आत्मसात केले. हे शब्दच पुढे त्यांच्या स्वतःच्या आणि त्यांच्यासारख्याच इतर सामान्यजनांच्या जगण्याच्या लढाईतील आयुधं बनणार होते...

गुंड होऊ शकणाऱ्या या दबंग पोराला माणसांत आणायला हे कम्युनिस्ट अभ्यासवर्ग कारणीभूत झाले. स्वतःचं शिक्षण सुटलं असलं, तरी इतर मुलांवर तशी वेळ येऊ नये, यासाठी नरसय्या वस्तीतल्या मुलांच्या शिकवण्या घेऊ लागला. नववी नापास झालेला हा मुलगा हळूहळू ‘मास्तर’ म्हणून नावारूपाला आला. इतका की, आता सोलापुरात काय किंवा विधानसभेच्या सभागृहात काय, ‘मास्तर’ हा शब्द उच्चारला की हटकून ‘आडम का?’ असंच कुणीही विचारावं!

इतक्या प्रशिक्षणानंतर नरसय्यांचा राजकारणाच्या पटावर प्रवेश झाला नसता, तरच ते नवलाचं झालं असतं. कामगार चळवळ केवळ आर्थिक लढ्यांच्या चौकटीत कधीच बंदिस्त राहू शकत नाही. वडील कामगार चळवळीतील कार्यकर्ते होते आणि तेच नरसय्याचे रोल मॉडेलही होते.

तो काळ कम्युनिस्ट पक्षातील वैचारिक संघर्षाचाही काळ होता. त्यातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. तरुण नरसय्याला सोलापुरातील कामगार चळवळीचं अंतरंग समजून घेण्याची जिज्ञासा असल्याने तो तिचं मर्मग्राही विश्लेषण करू लागला. त्यात बी. टी. रणदिवे यांनी घेतलेल्या पंधरा दिवसांच्या प्रदीर्घ अभ्यासवर्गातून समाजाच्या, राजकारणाच्या विश्लेषणाचं आणि शोषणमुक्त, असा समाजवादी समाज घडवू पाहणाऱ्या लढ्याचं वैचारिक शस्त्रभांडारच त्यांच्या हाती लाभलं. त्या वेळी त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं निशाण खांद्यावर घेतलं, ते कधीही खाली न ठेवण्यासाठी.

आता सुरू झाला होता त्यांच्या धडाडत्या जीवनसंघर्षातला नवा सर्ग... आडम मार्क्सवाद शिकले, पण त्यांचं खरं शिक्षण झालं कामगारलढ्यांच्या मैदानात. त्यांनी जन्माला घातलेल्या, नेतृत्व केलेल्या आंदोलनांची मालिका पाहिली की, कुणाचीही छाती दडपून जावी आणि प्रत्येक लढ्याला असलेली कल्पकतेची जोड पाहून तोंडात बोटं घालावीत.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

पहिलाच मोर्चा त्यांच्या कल्पकतेची साक्ष देतो. नववी नापास झालेल्या या तरुणाने कलेक्टरलादेखील जीवनाचे धडे कसे दिले हे मुळातच वाचण्यासारखं आहे. तसंच शिक्षण त्यांनी पुढे परिवहन अधिकाऱ्यांचं केलं आणि केंद्रीय सचिवांचंदेखील. लढे करता करता हे ‘मास्तर’ स्वतः शिकलेच, पण प्रशासनाचं विद्वत्तापूर्ण शिक्षण घेतलेल्यांनाही ते शिकवत राहिले आहेत. त्यामुळे या चळवळ्या माणसाविषयी महानगरपालिकेच्या प्रशासकापासून ज्येष्ठ नेते शरद पवारांपर्यंत सर्वांनाच आत्मीयता वाटते.

आडम मास्तरांचा सामान्य माणसाप्रती असलेला प्रांजळ प्रामाणिकपणा हीच शिदोरी त्यांनी आजन्म साठवली. त्या शिदोरीची असंख्य उदाहरणं या आत्मकथेच्या पानोपानी वाचायला मिळतात.

या साऱ्या समरात ‘छीन के लेना पडता हैं’ हे त्यांचं परवलीचं ध्येयवाक्य राहिलं आहे. कायद्याने दिलेलं वा न दिलेलं जनसामान्यांच्या ताकदीच्या जोरावर कमावता येतं. त्यासाठी त्या जनसामान्यांनाच नायक बनवण्याची किमया करावी लागते. हे जननायक असतात यंत्रमाग कामगार, विडी कामगार, रिक्षावाले, हॉस्पिटल कर्मचारी, झोपडपट्टी रहिवासी आणि हातावर पोट असलेले कित्येक. अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतूनही उद्दिष्ट साध्य करण्याची एक जादुई शक्ती या माणसात असावी, याचं प्रत्यंतर आपल्याला पानोपानी येत राहतं. चाळीस हजार बेघरांना हक्काचं घर मिळवून देण्याची भीष्मप्रतिज्ञा घेणारा योद्धा, ही त्यांची प्रतिमा समाजाच्या मनावर कायमची कोरलेली आहे. इतक्या सामान्य माणसांनी केलेली ही किमया हा एक जागतिक विक्रम आहे आणि त्याच्या आराखड्यापासून अंतिम रचनेपर्यंतचा मास्टरमाइंड हा ‘मास्तर’ आहे!

हे करताना त्यांनी ना तुरुंगाची भीती बाळगली, ना आपल्या प्राणांची पर्वा केली. त्यांच्यावर अनेक हल्ले झाले. विरोधकांच्या गुंडांनी त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. पोलिस तर पहिल्या आंदोलनापासून, आणीबाणी आणि पुढे कोविडकाळात जनतेच्या हक्कासाठी हा मनुष्य रस्त्यात उतरला म्हणून पिसाटून त्याच्या पाठी लागले. शेकडो पोलीस केसेस अंगावर घेत, कित्येक वेळा तुरुंगाच्या वाऱ्या करत, विविध प्रकारच्या कटकारस्थानांना आणि बदनामीच्या मोहिमांना हिमतीने सामोरे जात हा कॉम्रेड निश्चलपणे उभाच राहिला.

खिश्यात छदाम नसतानाही, केवळ लढाऊ फौजेच्या जोरावर महानगरपालिकेचा नगरसेवक ते तीनदा विधानसभेतील आमदार म्हणून आडम मास्तरांची कारकीर्द कम्युनिस्टच नव्हे, तर कुठल्याही राजकीय-सामाजिक कार्यकर्त्याला प्रेरणादायी ठरेल. कित्येक राजकीय कार्यकत्यांची उमेद निवडून येईपर्यंतच नष्ट होते. खरी कसोटी निवडून गेल्यावर कायद्याचा, त्याच्या अंमलबजावणीचा लाभ जनतेला मिळवून देण्यात असते. एक लोकप्रतिनिधी म्हणून आडम मास्तरांची कामगिरी खूपच प्रभावी आहे. विधानसभेत त्यांनी उठवलेल्या आवाजाचे पडसाद या आत्मकथेतूनही आपल्या कानी पडतात. वैधानिक कामकाजाची सखोल माहिती, अभ्यासपूर्ण विवेचन आणि प्रभावी वक्तृत्वशैली यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची प्रत्येक कारकीर्द संस्मरणीय ठरली आहे.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

लोकशाही निवडणुकांमध्ये जय-पराजय ही नित्याचीच गोष्ट असते. पराजयानंतर खचून घराच्या बाहेर न पडणारे कित्येक राजकारणी आपण पाहत असतो, पण विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यावरही मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशीच लढ्याच्या मैदानात उतरणारे लढवय्ये अपवादानेच आढळतील. त्यापैकी सर्वांत वरच्या श्रेणीत आडम मास्तरांचा समावेश करावा लागेल. अशा पराभवांचं चिंतन करताना ती विजीगीषू वृत्ती पानापानांमध्ये आढळून येते.

आपल्या सर्व कार्यांत शेवटी प्राधान्य कम्युनिस्ट पक्षालाच, ही शिकवण आडम मास्तरांनी आयुष्यभर पाळली. याची अनेक प्रेरणादायक उदाहरणं या आत्मचरित्रात आहेत. एका सामान्य गरीब कामगार कुटुंबातील फारसा न शिकू शकलेला कार्यकर्ता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सोलापूर शहरातील एका शाखेपासून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात करतो आणि महाराष्ट्र राज्य कमिटीच्या सर्वोच्च सचिव पदावर निवडला जातो, पक्षाच्या सर्वोच्च केंद्रीय कमिटीवर निवडला जातो, ही बाब आडम मास्तर आणि कम्युनिस्ट पक्ष या दोहोंना भूषणावह आहे. त्या जबाबदाऱ्या ज्या नेकीने आणि पोटतिडकीने त्यांनी पार पाडल्या याचे आम्ही सर्वजण साक्षीदार राहिलो आहोत…

या आत्मकथेच्या पानापानांवर एका प्रांजळ माणसाचं दर्शन होतं. त्यांना अनेकांनी जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला. राजकीय वैर धरलं. दूरच्यांनी धरलं, तसं जवळच्यांनीही धरलं. ते कधी राजकीय युक्त्या - प्रयुक्त्यांचेही शिकार झाले. पण या साऱ्या समरप्रसंगांत ते डगमगले तर नाहीतच, परंतु त्यांनी त्याविषयी कधी कटुताही मनात धरली नाही. अगदी कायमचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याशी वैयक्तिक वा त्यांच्या कुटुंबीयांशीही ते कटुत्वाने वागले नाहीत. शक्य असूनही त्यांनी धनाच्या राशी जमवल्या नाहीत. जमवली मानवी संपत्ती. हा ऐषारामात रमणारा जीव नाही. माणसांसाठी, त्यांच्या प्रतिष्ठेसाठी प्राणांची कुरवंडी करायला सदैव सिद्ध असणारा साधक आहे.

राजकारणात, तेही शोषणमुक्त समाजव्यवस्था निर्माण करायच्या राजकीय लढाईत उतरणाऱ्यास सामाजिक हालअपेष्टा आणि विरोध यांना तोंड द्यावं लागतंच. ते लीलया पचवण्याची क्षमता असल्याशिवाय यशस्वी नेतेपण प्राप्त होत नसतं. आडम मास्तरही त्याला अपवाद नाहीत. पण त्यांना कौटुंबिक जीवनातही अनेक प्रकारच्या हालअपेष्टांतून आणि नको तसल्या मानहानीच्या प्रसंगातून जावं लागलं.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध केलेल्या लग्नाला विषारी फळ लागण्याचे भोग त्यांना भोगावे लागले. पत्नीशी झालेला बेबनाव, त्याचं घटस्फोटात झालेलं पर्यवसान, पक्षात आणि पक्षाबाहेर झालेली बदनामी, वडिलांसोबतच्या नात्यात आलेला दुरावा, आईच्या मायेची मनस्वी आंतरिक ओढ आणि ते छत्र हरपल्यानंतर झालेली सैरभैर अवस्था, वडिलांचा व्यथित करणारा दुर्दैवी अंत, त्यांच्या तथाकथित ‘प्रमादा’साठी पक्षाने दिलेली शिक्षा निमूटपणे भोगण्याची तयारी, या साऱ्यांनी त्यांच्या या जीवनकहाणीला एक शोकात्म अस्तर लाभलं आहे. या आघातांमुळे औदासीन्यात न जाता, ते पुन्हा पुन्हा नव्या दुर्दम्य उभारीने कसे उभे राहतात, हे वाचून वाचक चकित झाल्याशिवाय राहत नाही.

वरून रांगडा दिसणारा हा माणूस स्वप्नाळू आहे, निर्मळ अंतःकरणाचा आहे, कोमल भावना जपणारा आहे. हॉस्पिटल कामगारांच्या संपात भेटलेल्या, गुंडांच्या जीवघेण्या हल्ल्यातून आपले प्राण वाचवणाऱ्या नर्सच्या प्रेमात पडून बेदरकारपणे विवाहास उभा राहणारा नेता, हे एक विलक्षण रसायन असल्याचं दिसतं. प्रेम हा क्रांतिकारकाच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग असतो, असं मानणाऱ्या चे गव्हेराचे आडम मास्तर हे सच्चे अनुयायी ठरतात. त्या विवाहानंतरही त्यांच्या वाईटावर टपलेले त्यांची पाठ सोडत नाहीत. आमदार असूनही मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत एखाद्या कनिष्ठवर्गीय कुटुंबाचेच भोग पदरी पडतात. अशा प्रकारे त्यांच्या संपूर्ण आत्मकथेत एका कादंबरीचा ऐवज सामावलेला आहे.

खरं तर आडम मास्तरांच्यात एक कविवृत्तीचा मनुष्यही दडलेला आहे. त्यांच्या भाषणात ओजस्वी वाक्यरचना आणि अलंकारिक शब्दांची पखरण असते, नाट्यमय संवादाची फेक असते. ही काव्यमयता, ओजस्वी शब्दांची अभिव्यक्ती, प्रसंगातील नाट्य पकडण्याचं कसब या आत्मकथेतही जागोजागी दिसून येतं.

हे आत्मकथन कुणाला दूषणं देत नाही की, कथनकाराच्या दोषांवर पांघरूण घालत नाही. त्यात समाजातील रंजल्या-गांजलेल्यांना आत्मीयतेने भिडण्याची ऊर्मी आहे, तशीच स्वतःला कठोरपणे तपासून पाहण्याची तटस्थताही आहे. १९७०च्या दशकापासून देशात, विशेषतः महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय स्थित्यंतराचा हा वेधक दस्तावेज आहे, तसंच राजकारणात भेटलेल्या व्यक्तींचं मनोज्ञ चित्रण आहे. पंचाहत्तरी उलटून गेलेल्या नेत्याने आजवर केलेल्या कामाचं विलोभनीय सिंहावलोकन आहे. तसंच आपण पाहत असलेलं स्वप्न हे मृगजळ नसून वास्तवात आणण्याचा प्रकल्प आहे याचा अदम्य विश्वास आहे. प्रत्येक कम्युनिस्ट कार्यकर्त्यांसोबतच एक मानवी समाज निर्माण करू पाहणाऱ्या प्रत्येकाला आत्मशोधाची प्रेरणा देणारी ही एका बुलंद वादळाची आत्मकथा आहे!

‘संघर्षाची मशाल हाती’ – नरसय्या आडम

समकालीन प्रकाशन, पुणे | पाने – ३०४ | मूल्य – ४०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......