ही माझ्या पत्रकारितेची केवळ गोळाबेरीज नव्हे, तर मला अनेक प्रश्नांनी कसं डोळस भान निर्माण करून दिलं, त्याची मुशाफिरी आहे!
ग्रंथनामा - झलक
राही भिडे
  • ‘माध्यमाच्या पटावरून’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Sat , 08 July 2023
  • ग्रंथनामा झलक माध्यमाच्या पटावरून Madhyamachya Patavarun राही भिडे Rahi Bhide

ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांचं ‘माध्यमाच्या पटावरून’ हे आत्मकथन नुकतंच शब्द पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकातल्या एका प्रकरणाचा हा संपादित अंश… यातून मराठी वर्तमानपत्रांत महिला पत्रकार म्हणून काम करताना आलेले अनुभव आणि बदललेली पत्रकारिता, या दोन्हींवर प्रकाशझोत पडतो…

.................................................................................................................................................................

पत्रकारितेत भोवतालची पडझड आणि त्याचा एकूणच राजकारण-समाजकारणावर झालेला परिणाम बघतच मला लेखणी परजावी लागली. गेली तीस वर्षं या क्षेत्रात वेगवेगळ्या गोष्टींना तोंड देत उभं राहणं, तसं सोपं नव्हतं. अर्थात राजकीय पत्रकारिता करणाऱ्या साऱ्याच स्त्रियांना या परीक्षा देऊन टिकून राहावं लागतंच. इथे स्त्री असल्याची कुठलीच मुभा घेता येत नाही. अर्थात ती घेऊही नये. त्यात आपल्या इथल्या साऱ्याच राजकीय यंत्रणा पुरुषसत्ताक अधिपत्याखाली. आजही सत्तेत एखाद-दुसरीच स्त्री सहभागी करून घेतली जाते. सत्तेत राहून निर्णयप्रक्रियेत स्त्रियांचं स्थान तसं गौणच! सर्वच क्षेत्रांत पन्नास टक्के आरक्षण हे गरजेचं आहेच, पण यासाठी इथल्या परंपरावादी मातीतून घडलेल्या पुरुष मानसिकतेत जोवर बदल घडून येत नाही, तोवर काहीच शक्य नाही.

पुरुषप्रधान समाजव्यवस्थेमध्ये सर्वच क्षेत्रं अर्थातच पुरुषांनी व्यापून टाकली आहेत, पण समाजसुधारकांनी केलेल्या अथक प्रयत्नांतून आणि महात्मा जोतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी दिलेल्या योगदानातून महाराष्ट्रात मोठी क्रांती झाली. सर्व क्षेत्रांमध्ये महिलांनी मुसंडी मारली आहे. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी हळूहळू शिरकाव केला आणि सर्व क्षेत्रं महिलांसाठी खुली झाली.

पत्रकारितादेखील त्याला अपवाद राहिली नाही. जगभरात अत्याधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगतीचा फायदा वृत्तपत्र व्यवसायानेदेखील करून घेतला. खिळ्यांनी पानावर गॅलीज लावण्याचे छपाईतंत्र कधीच इतिहासजमा झालं. आता संगणकीय डिजिटल तंत्रज्ञानाने आश्चर्यकारक झेप घेतली आहे. तसंच महिला पत्रकारांनी केवळ डेस्कवर काम करायचं. आणि रिपोर्टिंग करायचंच असेल तर महिला मंडळांची चर्चासत्रं, महिलांचा कार्यक्रम, मुलांची शिबिरं किंवा फुलांची प्रदर्शनं यांचंच वार्तांकन करायचं, या बाळबोध भूमिका मागे पडल्या असून राजकारण, मंत्रालय, विधिमंडळ, न्यायालय, गुन्हेगारी या क्षेत्रांमधील घडामोडींची वृत्तांकनं करण्यासाठी महिला धडाडीने पुढे येऊ लागल्या आहेत. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या सर्व क्षेत्रांमध्ये महिला हिरिरीने भाग घेऊ लागल्या आहेत, ही या शतकातली फार मोठी क्रांती म्हणावी लागेल.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

पत्रकारिता क्षेत्रात टिकण्यासाठी महिलांचा संघर्ष आजही अव्याहतपणे सुरूच आहे. २५-३० वर्षांपूर्वी ज्या महिलांनी पुरुषी वर्चस्वाला टक्कर देऊन आपलं आगळंवेगळं स्थान निर्माण केलं, त्यामुळेच तमाम महिलांना इथे जागा मिळू शकली, याची नोंद घेणं आवश्यक आहे. गेली २५-३० वर्षं पत्रकारितेतल्या परिस्थितीत सकारात्मक बदल होऊ लागला आहे, पण हा बदल धीम्या गतीने होत आहे. इंग्रजी वृत्तपत्रांमधील महिलांमध्ये असलेली धडाडी मराठी वृत्तपत्रांमध्ये आलेली नाही. सर्व बीट्सवर रिपोर्टिंग करण्याची क्षमता असूनही महिलांना अद्यापही पुढे येऊ दिलं जात नाही किंवा त्यांना डावललं तरी जातं.

महिला पत्रकारितेबाबत दोन पातळ्यांवरून विचार करावा लागेल. महिलांची पत्रकारिता आणि महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी वृत्तपत्रं व प्रसारमाध्यमांनी घेतलेली भूमिका. महिलांची पत्रकारिता ही मराठी वृत्तपत्रजगतात उशीराने सुरू झाली. १९६०-७०च्या दशकात तुरळक असलेली महिला पत्रकारांची संख्या १९७५ साली आंतरराष्ट्रीय महिला वर्ष घोषित झाल्यापासून वाढत गेली. आणि १९८०-९०च्या दशकात या क्षेत्रामध्ये काम करू इच्छिणाऱ्या महिलांमध्ये स्वतःची क्षमता आणि पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची आणि ज्ञानार्जनाची जिद्द याबाबत जागृती निर्माण झाली. या क्षेत्रात करियर करता येईल, आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करता येईल याची जाणीव झाली.

‘मराठा’ वृत्तपत्रातल्या शिरीष पै, पुष्पा त्रिलोकेकर, ‘लोकसत्ते’च्या लता राजे यांनी तमाम मराठी महिला पत्रकारांसमोर आदर्श घालून दिला. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊनच पत्रकारितेत आम्ही महिला पत्रकार मोकळेपणाने वावरू लागलो. अर्थात वृत्तपत्राच्या व्यवस्थापनाचा आणि संपादकांचा भक्कम पाठिंबा असेल तरच तुम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकता, अशी परिस्थिती जी सुरुवातीला होती, ती आजही कायम आहे.

महिला पत्रकार नाइट ड्यूटी काय करणार? या प्रश्नापासून झालेली सुरुवात ती अमुक बीट कसं सांभाळणार? तिला जमणारच नाही या नकारघंटेपर्यंत येऊन थांबत असे. पण महिला पत्रकार मागे हटल्या नाहीत. अगदी ६०-७०च्या दशकातही पुष्पा त्रिलोकेकरने नाइट ड्यूटी करून दाखवली. लता राजे, नीला उपाध्ये यांनी तर पुरुषी वर्चस्वाला आणि स्त्री-पुरुष भेदाभेदाच्या मानसिकतेतून झालेल्या कोंडीला समर्थपणे तोंड देऊन आपली निर्विवाद गुणवत्ता सिद्ध करून दाखवली.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

मुंबईत ‘लोकसत्ता’, ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘मराठा’, ‘नवाकाळ’, ‘नवशक्ती’; तर पुण्यात ‘केसरी’, ‘सकाळ’ ही वृत्तपत्रं होती. ग्रामीण भागात जिल्ह्यांच्या ठिकाणाहून काही वृत्तपत्रे काढली जात होती. मात्र त्यात महिलांचा सहभाग नसे. आजही तेथील वृत्तपत्रांमध्ये महिलांचा सहभाग नगण्य आहे. मुंबईमध्ये ‘लोकसत्ता’तील वसुंधरा पेंडसे-नाईक या ‘लोकप्रभा’ आणि नंतर ‘नवशक्ती’च्या काही काळ संपादिका होत्या. रेखा देशपांडे, अरुणा अंतरकर, उज्ज्वला पाटील, संजीवनी खेर आदींनी आपलं स्थान टिकवून ठेवलं.

पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणाऱ्या ‘महाराष्ट्र टाइम्स’सारख्या वृत्तपत्रामध्ये एकेकाळी महिला पत्रकारांना ‘नो एन्ट्री’ होती. ‘महिला पत्रकार नकोच’ अशी ताठर भूमिका घेण्यात आली होती. नीला उपाध्ये ही पहिली महिला अशी निघाली की, तिने म.टा.त प्रचंड आत्मविश्वासाने आणि गुणवत्तेने पुरुषी वर्चस्वाला हादरे दिले. ते पाहून तर पुन्हा कडवेपणाने पुढे ‘महिला नकोच’ अशी अतिरेकी आणि संकुचित भूमिका त्या वर्तमानपत्राकडून रेटण्यात आली.

याचा फटका मलाही बसला. माझे इंग्रजी पत्रकारिता अभ्यासक्रमाचे अध्यापक पातंजली सेठी. हे ‘टाइम्स ऑफ इंडिया’त होते. त्यांनी माझी मातृभाषा मराठी असल्याने ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये नोकरीसाठी अर्ज करण्यास सांगितलं. ते ‘टाइम्स ऑफ इंडिया’त असल्यामुळे स्वतःच माझा अर्ज घेऊन गेले. एक लेखही लिहून घेतला, तोही नेऊन दिला. एक प्रकारे त्यांचा मला वशिलाच लाभला होता. मला लेखी परीक्षेला बोलावतील, असं त्यांनी सांगितलं. पण एके दिवशी ते म्हणाले, ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या संपादकांनी निर्णय घेतला आहे की, त्यांना ‘महिला नको!’सेठींनाही तो आश्चर्याचा धक्का होता, पण आज याच वृत्तपत्रामध्ये क्रांती झाली आहे. इथली मुलींची संख्या इतर वर्तमानपत्रांच्या मानाने सर्वाधिक आहे, ही समाधानकारक बाब आहे.

सुरुवातीच्या काळात मोठ्या वृत्तपत्रांमध्ये महिलांनी येऊच नये, यासाठी काही पुरुष पत्रकारांनी कंबर कसली होती. महिलेला नियुक्ती मिळालीच, तर तिचं खच्चीकरण सुरू व्हायचं. त्या वेळी पत्रकारितेत आलेल्या महिलांनी वेळोवेळी आपले अनुभव बोलून दाखवले आहेत आणि लिहिलेदेखील आहेत. 'लोकसत्ते'तील ज्येष्ठ पत्रकार संजीवनी खेर यांनी तर, काही संपादक मर्जीतल्या स्त्रीलाच भरपूर वेळ ‘ट्रेनिंग’ देत बसत, असं धाडसी विधान केलं आहे. महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन निकोप नसल्याचंच हे द्योतक आहे. त्या आकर्षित करू शकल्या किंवा झाल्या, तरच त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रकार तेव्हाही होता आणि आजही आहे.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

इलेक्ट्रॉनिक्स प्रसिद्धीमाध्यमांत करिअर करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या एका वार्ताहर मुलीला मुलाखतीच्या वेळी वरिष्ठांनी विचारलं की, ‘तुझी काहीही करायची तयारी आहे का?’ त्यांच्या या प्रश्नाने गांगरून गेलेली ती मुलगी पुन्हा तिथे गेलीच नाही. समाजातील अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रातच जर महिलांकडे बघण्याचा, असा दृष्टीकोन असेल, तर इतर क्षेत्रांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ज्या महिलांनी संघर्ष करून निष्ठेने आणि जिद्दीने पत्रकारितेत आपलं स्थान निर्माण केलं, अशा महिलांना संपादक पातळीवरील पदं देण्यास टाळाटाळ केली जाते, हे सत्य साऱ्यांनाच ठाऊक आहे. त्यामुळे वृत्तपत्राच्या निर्णयप्रक्रियेत महिला पत्रकारांचा सहभाग नसतो. ‘दि इंडियन एक्स्प्रेस ग्रुप’ने लता राजे यांच्यासारख्या विद्वान महिला पत्रकाराला संपादक केलं, पण ‘लोकसत्ता’चं नव्हे, तर ‘सांज लोकसत्ता’चं! संपादक तर केलं, पण ‘सांज लोकसत्ता’ बंद कसा पडेल, याचा यशस्वी प्रयत्न केला. शेवटी त्यांना राजीनामा द्यावा लागला.

वृत्तपत्रं असोत की, इलेक्ट्रॉनिक्स प्रसारमाध्यमं - महिलांना राजकारण, मंत्रालय, गुन्हेगारी, क्रीडा अशा बीट्सवर अनेकदा काम करण्याची संधी मिळत नाही किंवा अनेकदा इच्छा असूनही वरिष्ठांचा वरदहस्त नसल्याने या बीट्सवर त्यांना काम करता येत नाही. बहुसंख्य महिलांना आजही कार्यालयात डेस्कवर बसूनच काम करावं लागतं. घरसंसार सांभाळून अनेक जणी रिपोर्टिंगचं काम करताना दिसतात. पण प्रोत्साहन असेल, तर कोणतंही काम महिला पत्रकार आवडीने करतील.

राजकीय बातम्यांसाठी पुरुष पत्रकार लॉबिंग करतात, रात्रीच्या वेळी राजकारण्यांना गाठून त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ राहून ते बातम्या काढतात, तसं महिला पत्रकारांना जमत नाही. पण स्त्री-पुरुष भेदाभेदाची मानसिकता बाजूला सारून निव्वळ पत्रकारितेचे उद्दिष्ट समोर असेल, तर स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने काम करणं तसं कठीण नाही.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

मी, वैजयंती कुलकर्णी, सुजाता आनंदन, मीना मेनन, कुमुद संघवी चावरे आम्ही आमच्या पुरुष सहकाऱ्यांसोबत केव्हाही राजकारण्यांच्या भेटीगाठी घेत असू. काही वेळा आम्ही महिला पत्रकार एकट्याच जात असू. खास मुलाखतीसाठी आम्ही एकेकटे जात असू. आजही मुली बातमीसाठी अथवा मुलाखतीसाठी एकेकट्या जातात त्यात गैर काय? ही स्तुत्य भूमिका आहेच. आम्हाला त्यात कधीच वावगं वाटलं नाही. प्रत्येक वेळी बातमी मिळतेच असं नाही. बातमीसाठी रात्री-अपरात्री गेलं पाहिजे, असंही अजिबात नाही. बातमी काढणं हा कौशल्याचा भाग आहे, प्रत्यक्ष भेटी न घेताही अनेकदा फोनवरदेखील बातमी मिळविता येऊ शकते.

मी स्वतः ‘लोकमत’मध्ये एकवीस वर्षं काम केलं. त्यात राजकीय घडामोडींची वृत्तांकने, ‘मुक्काम पोस्ट मुंबई’ नावाचं सदर, निवडणूक वृत्तांकने, वार्तापत्रे, मुलाखती इत्यादी सर्व प्रकार मी हाताळले. राजकीय बीटवर काम करताना व्यवस्थापनाचा विशेषतः स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा, विजय दर्डा, राजेंद्र दर्डा यांच्यासह बाबा दळवी, मधुकर भावे या संपादकांचं मला विशेष प्रोत्साहन मिळालं.

त्याशिवाय राज्यातील राजकीय नेते आणि कार्यकर्ते यांच्याकडून नेहमीच मला सन्मानाची वागणूक मिळाली. महाराष्ट्रातील राजकारण्यांबाबतचा माझा अनुभव अतिशय चांगला आहे. महिला पत्रकारांना योग्य सन्मान देऊन त्यांना सहकार्य करण्याचा त्यांचा दृष्टीकोन असतो. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत पत्रकारिता करणाऱ्या महिलांची संख्या अद्याप वाढत नाही, हेही तेवढंच खरं!

राजकारणाचा दर्जा घसरल्यामुळे महिला पुढे येत नाहीत का? की महिलांना या क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन मिळत नाही? यावर खूप गंभीर चर्चा होऊ शकेल. पण या क्षेत्रात येण्यासाठी एक वेगळं धाडस लागतं. आणि जर या क्षेत्रात काही मुली येत असतील, तर त्यांच्याविषयी खूप सकारात्मक दृष्टीकोन बाळगायला हवा. त्यांना व्यवस्थापन आणि संपादकांनी प्रोत्साहन द्यायला हवं.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

मुंबईत झालेली दंगल, बॉम्बस्फोट यांचं मी घटनास्थळावरून जे वृत्तसंकलन केलं होतं, ते ‘लोकमत’च्या संपादकांचं व व्यवस्थापनाचं सहकार्य असल्यामुळेच! शिवसेना-भाजपा युती सरकारच्या काळात शासकीय मागासवर्गीय महामंडळाचे सहा कोटी रुपये बुडीत गेलेल्या अवामी मर्कंटाइल बँकेत जमा करून तेथून ते लंपास करण्यात आले होते आणि त्याचा ठपका तत्कालीन समाजकल्याण मंत्र्यांवर ठेवण्यात आला, यासंबंधीची मालिकाच मी चालवली होती. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार यावर आसूड ओढण्याचं आणि वाईट प्रवृत्तीला लगाम घालण्याचं महत्त्वपूर्ण काम मी वरिष्ठांच्या सहकार्यानेच करू शकले होते. त्यामुळेच जास्तीत जास्त महिलांनी राजकीय पत्रकारितेत यावं, ती एक समाजस्वास्थ्याची गरज आहे, असं मला मनापासून वाटतं.

पत्रकारितेत महिला आल्या खऱ्या, पण वृत्तपत्रांमध्ये सर्वसाधारण महिलांच्या प्रश्नांना, त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला, त्यांच्यासमोर पुरुषी वर्चस्वाने उभ्या केलेल्या समस्यांना, त्यांच्यावरील अन्याय-अत्याचारांना कितपत वाचा फोडण्याचं काम होतं अथवा वर्तमानपत्रात त्यासाठी जागा मिळते का, हा मोठाच प्रश्न आहे. सामाजिक समस्यांबाबत महिला पत्रकारांमध्ये संवेदनशीलता असली तरी वर्तमानपत्रं आणि प्रसारमाध्यमांचे प्राधान्यक्रम आता बदलले आहेत. तर दुसरीकडे स्त्रियांच्या प्रश्नांना वृत्तपत्रात स्थान देण्यासाठी महिला पत्रकारांना म्हणावा तसा अवकाश आणि लिहिण्यासाठीची जागा मिळवून देणंही गरजेचं असतं, जी त्यांना कधीच मनासारखी मिळत नाही.

वृत्तपत्रांची धोरणं ठरवण्याच्या निर्णयप्रक्रियेत महिला पत्रकारांना स्थान मिळत नाही. मराठीच्या तुलनेत इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये स्थिती बरीचशी अनुकूल आहे. सर्व बीट्सवर तिथे महिला पत्रकार काम करतात, निवडणुकीसहित सर्व प्रकारचे घातपात, अपघात, दंगलींचे वृत्तसंकलन करण्यासाठी हिरिरीने त्या भाग घेतात. महिला पत्रकारांना संपादक मंडळावर बढत्या दिल्या जातात. दीना वकील या महिला पत्रकार अनेक वर्षं ‘टाइम्स ऑफ इंडिया’सारख्या प्रथितयश इंग्रजी वृत्तपत्राच्या संपादक राहिल्या आहेत, पण मराठी वृत्तपत्रांमध्ये हे चित्र फारसं दिसत नाही.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

माझी पत्रकारितेची सुरुवात आणि एकूणच भारतीय राजकारणात ‘मंडल’विरोधात ‘कमंडल’वादाने इथल्या राजकारणाची सर्वच समीकरणं कशी बदलायला लागली होती, इथून सुरू झाली. एकीकडे पुरोगामी चळवळींचा आवाज थोडा क्षीण होऊ लागला होता, सांस्कृतिकता राजकारणाच्या मध्यभागी आणून देशात सरळसरळ दोन भाग पडले होते. एक तर तुम्ही परंपरावादी असाल, तरच तुम्ही ‘हिंदुत्ववादी’ होण्याच्या परीक्षेत पास व्हाल आणि तुम्ही ‘पुरोगामी’ असाल तर तुम्ही कडव्या संस्कृतीच्या विचारधारेविरोधात उभे आहात; हे टोकाचे वारे वाहू लागलेले असतानाच मी पत्रकारितेची पायवाट निवडली होती.

आज मागे वळून बघताना आणि देशाच्या एकूण परिस्थितीवर नजर फिरवताना या तीस वर्षांत एकूणच भारतीय राजकारणाचा चेहरामोहरा बदललेला आढळून येतोय, पण एके काळी ज्या राजकारणाला इथल्या चौथ्या स्तंभाची भीती वाटत होती, त्याची पडझडही मी या तीस वर्षांत खूप जवळून बघितली. एके काळी पत्रकारिता हे अत्यंत जबाबदारीचं माध्यम होतं, पण नव्वदनंतर जागतिकीकरणाचा परिणाम या क्षेत्रावरही झाला. पत्रकारितेला पुरोगामित्व टिकवण्यापेक्षा वर्तमानपत्राला एक ‘प्रॉडक्ट’ म्हणून बाजारपेठीय मूल्य आलं. या नवभांडवली व्यवस्थेमध्ये स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मालक लोकांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पत्रकारांपासून ते संपादकांपर्यंत सर्वांचाच वापर करण्यास सुरुवात केली.

पूर्वी मार्केटिंगमध्ये असणारे लोक जाहिराती आणि त्यांचं व्यवस्थापन करायचे, पण जागतिकीकरणाच्या रेट्यात पत्रकारितेला मार्केटिंग विभागासोबत जोडण्यात आलं. मग संपादकाची भूमिकाही ‘बाजारकेंद्री’ अर्थव्यवस्थेशी जोडली गेली. एके काळी महाराष्ट्रात संपादकांची तेजस्वी परंपरा होती, समाजाच्या जडणघडणीत संपादकांची भूमिका महत्त्वाची होती; पण गेल्या तीस वर्षांत हळूहळू संपादकाला वर्तमानपत्राच्या अर्थकारणातही सहभागी करून घेण्यात आलं. संपादकांच्या ओळखी, त्यांचे संबंध, सर्व क्षेत्रांशी असलेला परिचय यांचा वर्तमानपत्राला लाभ कसा मिळेल, यावर भर देण्यात आला.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

मुख्यमंत्र्यांसह महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री, बडे उद्योगपती अशा सर्वांकडून जाहिराती मिळवून घेणं, भूखंड मिळवणं, निवडणूक प्रचाराचं पॅकेज घेणं, यासाठी संपादकांचा पुरेपूर वापर करून घेतला जातो. मालकांची ही धडपड मी स्वतः अनुभवली आहे. आपण चौथ्या स्तंभाच्या अत्यंत आदरापोटी या क्षेत्रात येतो आणि नकळतपणे या बाजारपेठेत आपला वापर करण्यात येतो. एका अर्थी आपण एक वस्तू होऊन इथल्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मदत करतो. पण मालकांच्या डोक्यात मात्र बाजारपेठी गणितांचा हिशेब पक्का असतो. जोवर तुम्ही त्यांच्या फायद्याचे करणार तोवर तुमचा उपयोग असतो. ज्या दिवशी तुमचा फायदा संपणार, तेव्हा नव्या हितसंबंधांची गरज भासते. आजच्या बाजारपेठी मूल्यात उपभोक्ता जोवर त्यांचा ‘गिऱ्हाईक’ किंवा ‘वाचक’ असतो, तोवर त्याची काळजी घेतली जाते. ही ‘कस्टमर केअर सिस्टिम’ आता इथेही आली आहे.

फक्त पारंपरिक भाषेत रूढार्थाने वापरले जाणारे शब्द तेच राहिले आहेत. उदाहरणार्थ, संपादक, पत्रकार, वाचक, चौथ्या स्तंभाची ताकद वगैरे. बाकी आमूलाग्र बदल झालेत. पूर्वी वसा घेतलेली पत्रकारिता होती, नंतर त्याला व्यवसायाचं स्वरूप आलं आणि आता तर हा धंदा झाला आहे. ‘पेड न्यूज’ याचं उत्तम उदाहरण.

बाजारकेंद्री प्रवृत्तीवर टीकात्मक हस्तक्षेप नोंदवता नोंदवता आपलाच कसा वापर झाला याचीही जाणीव झाली अन् हा कटू अनुभव मोठ्या हिंमतीने पचवावा लागला. मालकांच्या अडचणीच्या वेळी, सरकारी धोरणांमुळे धंद्यावर परिणाम होत असल्याने त्यांच्या फायद्यासाठी त्यांना मदत करायची भूमिका मी स्वतः घेतली होती; परंतु गरज संपल्यानंतर बाजारकेंद्री प्रवृत्तीचा अस्सल नमुना मलाही अनुभवास आला.

या तीस वर्षांत बातमीच्या शोधातील वार्ताहर ते मुख्य संपादक या पदापर्यंत पायऱ्या चढल्या. अनेकदा सुखावले, तर कधी आतलं चैतन्यच विरून जायचं, तर कधी कधी आतलं विद्रोहाचं पाणी चौखूर उधळत वर येऊ बघायचं. रोजच नवनव्या राजकीय डावांची झिंग, षडयंत्र बघितली. कित्येक नवे पक्ष आणि नेतृत्व घट्ट पाय रोवून उभे राहिले.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

याच काळात दुडक्या चालीने मयसभा उधळणारे, वर वर शांत दिसणारे, त्यांच्या आतल्या डोहातला एकही तरंग बाहेर उमटू न देणारे जबर नेते जवळून बघितले. त्यांचे डावपेच, शह-काटशहाचे राजकारण समजून घेत ते अनुभव वाचकांपर्यंत पोहोचवलेत. भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात मंत्र्यांच्या दालनातील महापुरुषांचे फोटो उतरवल्याचे प्रकरण असो; त्यानंतरचा गोंधळ, आरोप-प्रत्यारोप, बातमी सिद्ध करून दाखवण्यासाठी झालेली माझी दमछाक आजही आठवते.

रमाबाई आंबेडकर नगर गोळीबार प्रकरण, सिरोंचाच्या जंगलात माझ्यासमोर नक्षलवाद्यांनी केलेला बॉम्बस्फोट, बाबरी मशिदीच्या पतनानंतर मुंबईत उसळलेली दंगल, त्यातील जीवघेणे प्रसंग, वांद्रे येथे माझ्या दिशेने आलेल्या हातबॉम्बचा प्रसंग असे कितीतरी चित्तथरारक प्रसंग अनुभवले.

‘लोकमत’चे बाबूजी आरोग्यमंत्री असताना त्यांच्याच विभागाशी संबंधित कर्मचाऱ्यांवरील अन्यायाची मालिका, त्यावरून विधिमंडळात झालेला गोंधळ, बाबूजींच्या राजीनाम्याची मागणी आणि पत्रकारांनी आपलं काम करावं, असा बाबूजींनी दिलेला दिलासा कायम स्मरणात राहिला. पत्रकारितेतील जीवघेणे प्रसंग, घालमेल, दमछाक, बातमीचा आनंद, लेखांचे, नियमित सदरांचे कौतुक, वंचित घटकांसाठी, त्यांच्यावरील अन्यायाविरुद्ध उठवलेला आवाज, महिलांच्या प्रश्नांना अनेकविध प्रकारांनी वाचा फोडण्याचं केलेलं काम अन् त्या अनुषंगाने झालेले सन्मान यामुळे कामाचं समाधान मिळाले.

ही केवळ अनेक वर्षांची पत्रकारितेची गोळाबेरीज नव्हे, तर मला अनेक प्रश्नांनी कसं डोळस भान निर्माण करून दिलं, त्याची मुशाफिरी आहे. अर्थात ही हरफनमौला फकिरी पुरुषसत्ताक मक्तेदारी असलेल्या राजकीय पत्रकारितेच्या आखाड्यात करता आली, याचं समाधान खूप मोठं आहे.

‘माध्यमाच्या पटावरून’ – राही भिडे

शब्दांकन – श्यामल गरुड | शब्द पब्लिकेशन, मुंबई | पाने – २२४ | मूल्य – ५५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......