अजूनकाही
पिंपरी-चिंचवड येथील निसर्गकन्या बहिणाबाई प्राणिसंग्रहालयाचे सलग २३ वर्षं संचालक म्हणून काम केलेल्या अनिल खैरे यांचं ‘सोयरे वनचरे’ हे पुस्तक नुकतंच समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. प्राण्यांसोबतच्या निखळ नात्याची ही कहाणी आहे. या पुस्तकाला खैरे यांनी लिहिलेले हे मनोगत…
..................................................................................................................................................................
तसा मी अगदी साधा माणूस. लहानपणीही फार काही हुशार वगैरे नव्हतो. पण एक खरं, लहानपणापासून मला कुठल्याही रूटीन कामापेक्षा वेगळं काम करण्याची किंवा कुठलंही काम इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने करण्याची खोड होती. कुठल्याही गोष्टीत झोकून देण्याचा स्वभाव होता. अभ्यासातही तसा ‘बरा’ होतो. पण पुढे काय करायचं वगैरे ठरलेलं नव्हतं. नाही म्हणायला एके वर्षी पायलट बनण्याचं स्वप्न मनात रुजलं होतं; पण ते वर्षभरच टिकलं असेल. एका अपघातात हात मोडला आणि ती वाट बंद झाली.
मी कॉलेजमध्ये असतानाची गोष्ट. ते साल होतं १९७६. एका अपघातामुळे वडिलांना मानाच्या सरकारी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागली. मी घरातल्या धाकट्या भावंडांपैकी एक. त्यामुळे मला शिक्षण थांबवून कामाला लागण्याची गरज नव्हती. पण नेमकी त्याच वेळी टेल्को कंपनीतल्या अप्रेंटिसशिपची जाहिरात वाचण्यात आली. त्या काळी टेल्कोमधली नोकरी म्हणजे जन्माचं कल्याण असं मानलं जायचं. मी अर्ज केला, परीक्षा-मुलाखती दिल्या आणि चक्क माझी निवडही झाली.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
टेल्कोच्या नोकरीला महत्त्व होतं ते चांगला पगार- सुरक्षितता वगैरे कारणांमुळे. माझ्यासाठी मात्र वेगळ्याच कारणांनी भाग्याची ठरली. याचं कारण या अप्रेंटिसशिपसाठी मी निसर्गरम्य परिसरात उभारलेल्या टेल्कोच्या होस्टेलमध्ये दाखल झालो आणि आयुष्याचा सांधाच बदलला. दोन वर्षांच्या या हॉस्टेलच्या मुक्कामात माझं निसर्गाशी मैत्र जुळलं. कॉलेजमध्ये असताना सापांशी दोस्ती झाली होती, ती इथे आणखी घट्ट झाली.
मी सापांचा अभ्यास करायला सुरुवात केली. नाना प्रकारचे पक्षी पाहिले. सरडे-विंचू हाताळले. एकुणात, पुढे आयुष्यात काय घडणार याची दिशाच या दोन वर्षांच्या मुक्कामात आपसूक ठरून गेली- वन्य जीव आणि त्यातही सरपटणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास आणि संवर्धन करण्याची.
त्याच काळात पुणे विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागामधील विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि प्राध्यापक मंडळींशी ओळख झाली. अधिव्याख्यात्या डॉ. मीना काटदरे, प्रा. मनमोहन जोशी आणि विभागप्रमुख डॉ. सोहन मोडक या ऋषितुल्य गुरुजनांनी मोठ्या आस्थेने मला ‘सायंटिफिक नोट’ बनवायला शिकवलं. त्यांच्याच मदतीने, मार्गदर्शनाने आणि प्रोत्साहनामुळे माझे काही ‘रिसर्च पेपर’ वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले. पुढे प्रा. जयंत नारळीकर आणि प्रा. सोहन मोडक यांच्या प्रोत्साहनपर आग्रहानुसार ‘इंडियन हर्पेटॉलॉजिकल सोसायटी’ म्हणजेच ‘भारतीय सर्पविज्ञान संस्थे’ची स्थापना झाली. संस्थेच्या माध्यमातून साप, सरपटणारे प्राणी, सर्पदंश, सापांचं प्रजोत्पादन अशा अनेक विषयांवर संशोधन करण्याची संधी मिळाली. मी प्राण्यांच्या विश्वाकडे कसा वळलो, हे कळावं यासाठी थोडक्यात हा इतिहास सांगितला.
त्यानंतर १९९० साली माझ्या आयुष्याला वळण देणारी घटना घडली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सहयोगाने सर्पोद्यान आणि पक्षालयाच्या उभारणीचं शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी माझ्याकडे आली. पुढे निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं समर्पक नाव मिळालेल्या या प्राणिसंग्रहालयाची धुरा मी तब्बल दोन तपं वाहिली.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
प्राणिसंग्रहालयाचा संचालक हे मोठं जोखमीचं पद आहे. तसं बघायला गेलं तर निसर्ग आणि प्राणी संवर्धन हे सेवाभावी, झोकून देऊन करण्याचं काम. आर्थिक लाभ आणि प्रसिद्धी वगैरेंचं स्थान त्यात दुय्यमच. अशा कामात कार्यालयीन कामकाजाच्या ठराविक वेळा, साप्ताहिक आणि नैमित्तिक सुट्या अशा कुठल्याही सुविधांचा अंतर्भाव नसतो. बारा महिने चोवीस तास ‘रेड अलर्ट’!
शिवाय वन्य प्राण्यांबद्दल शास्त्रीय माहिती व अभ्यास, त्या त्या प्रजातीचा स्वभाव, त्यांची कौटुंबिक-सामाजिक व्यवस्था अशा अनेक बाबींचं सखोल ज्ञान-अभ्यास आणि निरीक्षणशक्ती असणं आवश्यक असतं. त्यामुळे अशा स्वरूपाचं काम करताना वैयक्तिक आयुष्य असं काही उरतच नाही. पण त्याचबरोबर प्राणिसंग्रहालयातील प्राणी-पक्षी आपल्या आयुष्यात सामावून जात आपल्या कुटुंबाची व्याप्ती वाढवतात.
माझ्याही वाट्याला हाच अनुभव आला. तब्बल २४ वर्षं निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय हेच माझं जग होतं, तेच माझं कुटुंब होतं. त्याआधी आणि त्यानंतरही प्राण्यांच्या गोतावळ्यातच मी वाढलो, रमलो. माकडं, बिबटे, मगरी, साप इथपासून अगदी बेडकांपर्यंत अनेक प्राण्यांचा आणि नाना पक्ष्यांचाही सहवास मला लाभला. त्यांच्या संवेदना जाणवण्याएवढं मैत्र लाभलं. आपण आणि ते वेगळे नाहीच, असं वाटण्याएवढं प्रेम मिळालं. या सहप्रवासात अनेक गमतीदार, चमत्कारिक, हृद्य अनुभवांची शिदोरी माझ्याकडे जमा होत गेली.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
मित्र-मैत्रिणी आणि आप्तेष्टांच्या बैठकीत अशा सुखद-दुःखद प्रसंगाचं वर्णन मी साभिनय करत असे. लोक ते ऐकताना रंगून जात. त्या गोष्टींमधले प्राणी म्हणजे आपले आप्तच आहेत, असं त्यांनाही वाटू लागे. त्यामुळे या अनुभवांवर मी पुस्तक लिहायला हवं, असं सर्वप्रथम माझ्या बायकोने, प्रतिभाने सुचवलं. मित्र-मंडळींनीही या विचाराला खतपाणी घातलं. त्यातूनच हा पुस्तकप्रपंच करण्याचं ठरवलं.
लिखाण सुरू असताना एकदा अचानक अनिल अवचटांची भेट झाली. ते प्रख्यात लेखक. मी लेखक म्हणून पूर्ण नवखा. त्यामुळे धाडसानेच त्यांना मी लिहिलेलं एक प्रकरण वाचून दाखवलं. ते ऐकून झाल्यावर त्यांनी एकदम चुटकी वाजवली आणि म्हणाले, ‘जेवणाचं ताट वाढून होण्यापूर्वीच मला चव दाखवलीस. आणि खरोखरीच जेवण चविष्ट आहे रे भावा!’ त्यांची पसंती मिळाल्यामुळे मी खूष झालो आणि लिखाण पूर्ण केलं. पुढे माझे गुरूवर्य मित्र निरंजन घाटे यांनीही हे लिखाण वाचून अनेक सूचना केल्या.
या माझ्या प्राण्यांच्या गोतावळ्यात तुमचंही स्वागत. हे सगेसोयरे माझ्याप्रमाणेच तुम्हालाही लळा लावतील, अशी आशा आहे.
‘सोयरे वनचरे’ - अनिल खैरे
समकालीन प्रकाशन, पुणे | पाने – १८४ | मूल्य – २५० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment