तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक प्रदीप गोखले यांच्या ‘धर्म ते धम्म : एक विचारयात्रा’ या पुस्तकात धर्मसंकल्पना, धर्मचिकित्सा आणि धम्म या तीन संकल्पनांची सविस्तर मांडणी केली आहे. हे तिन्ही विभाग जवळपास १०० पानांचे आहेत. पहिल्या विभागात प्रास्ताविकासह आठ प्रकरणे, दुसऱ्यात प्रास्ताविकासह पाच प्रकरणे आणि तिसऱ्यात प्रास्ताविकासह पाच प्रकरणांचा समावेश आहे. देशना, अॅन इन्स्टिट्यूट ऑफ बुद्धिस्ट अँड अॅलाईड स्टडीज, पुणे यांच्या तर्फे हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला गोखले यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश…
.................................................................................................................................................................
हा लेखसंग्रह म्हणजे लेखांचे तीन गुच्छ एकत्र बांधून तयार केलेला एक मोठा गुच्छ आहे. पण ते तीनही गुच्छ म्हणजे विचारांची स्थितिशील नोंद नाही. त्यात एक वाटचाल आहे व एका उद्दिष्टाकडे घेऊन जाणारा वैचारिक विकास आहे. त्यामुळे या पुस्तकाला मी ‘विचारयात्रा’ असे नाव दिले आहे. याला नुसतेच ‘वैचारिक प्रवास’ न म्हणता ‘विचारयात्रा’ म्हटले आहे, याला एक कारण आहे. ‘यात्रा’ शब्दाचा अर्थ ‘प्रवास’ असाच असला तरी ‘यात्रा’ हा शब्द बऱ्याचदा ‘तीर्थाशी’, पवित्र क्षेत्राशी जोडला जातो. माझ्या वैचारिक प्रवासातही एक पावित्र्याचा व उदात्ततेचा भाव आहे, असे मी मानतो. यात जरी धर्मचिकित्सा असली, धर्मातीततेचाही दृष्टीकोन असला तरी तो नुसताच कोरडा निधर्मीपणा नाही, तर त्यात एका व्यापक अर्थाने धार्मिकता आहे, एकूण मानवजातीच्या कल्याणाच्या मार्गाचा घेतलेला शोध आहे; असा मार्ग जो बुद्धीलाच नव्हे, तर उदात्त भावनेलाही आवाहन करेल, अशा कल्याणमार्गाचा घेतलेला शोध आहे आणि म्हणून या विशिष्ट अर्थाने ही ‘वैचारिक यात्रा’च आहे, असे मी मानतो.
ही यात्रा मी तीन टप्प्यांमध्ये विभागली आहे. पहिल्या टप्प्यावर धर्म ही संकल्पना - रिलिजन या अर्थाने समजून घेण्याचा प्रयत्न आहे. हे करताना धर्माकडे एक बंदिस्त स्थितिशील, प्रस्थापित तत्त्व म्हणून पाहिलेले नाही, तर एक खुली संकल्पना, एक परिवर्तनशील वास्तव म्हणून पाहिले आहे. तसेच धर्माकडे केवळ वास्तवनिष्ठ दृष्टीने नव्हे, तर मूल्याभिमुख दृष्टीनेही पाहिले आहे. म्हणजेच, या धर्माचे काय करावे?, धर्माच्या पलीकडे जाता येते का?, धर्मसुधारणेचे काय काय दृष्टीकोन असू शकतात? व त्यात बरोबर दृष्टीकोन कोणता? या प्रश्नांची चर्चा करणारे निबंध या टप्प्यावर समाविष्ट केले आहेत.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
..................................................................................................................................................................
दुसऱ्या टप्प्यावर धर्मचिकित्सा करणारे लेख आहेत. अर्थात मी स्वतः जन्माने हिंदू असल्याने ही चिकित्सा मुख्यतः हिंदू धर्माच्या संदर्भात केली आहे. दुसऱ्या टप्प्याचे जे प्रास्ताविक आहे, त्यात हिंदूधर्म चिकित्सेची सर्वसाधारण भूमिका स्पष्ट केली आहे. तर या टप्प्यात जे लेख समाविष्ट केले आहेत, त्यात हिंदू धर्मातील काही कळीच्या सिद्धान्तांची चर्चा केली आहे. हे सिद्धान्त म्हणजे अद्वैतवेदान्त, ईश्वरवाद, कर्मसिद्धान्त व पुनर्जन्म. याखेरीज हिंदू धर्माच्या सामाजिक समताविषयक दृष्टीकोनाचीही चिकित्सा काही हिंदू धर्मचिंतकांच्या विचारांचा आढावा घेऊन केली आहे. हा टप्पा ‘मी हिंदू का नाही?’ याचे स्पष्टीकरण देणारा टप्पा मानता येईल. अर्थात हा केवळ हिंदू धर्मालाच नकार नाही, तर आत्मा, परलोक आणि परमेश्वर मानणाऱ्या प्रत्येक धर्माला नकार देणारा हा टप्पा आहे.
पारंपरिक परलोकवादी धर्माचा चिकित्सापूर्वक त्याग केल्यावर जे पर्याय समोर येतात, त्यात मला गौतम बुद्धांनी दिलेल्या दिशेने जाणारा, डॉ. आंबेडकर व सत्यनारायण गोएंका यासारख्यांनी पुनरुज्जीवित केलेला ‘धम्म’ हा पर्याय अतिशय मोलाचा वाटतो. हा धम्म रूढ अर्थाने धर्म नाही, पण पूर्णपणे अधार्मिकही नाही. याला मी सीमारेषीय अर्थाने धर्म म्हणतो की, ज्यामुळे या ‘धर्माचा’ इतर धर्मांशीच नव्हे, तर निधर्मी, इहवादी जीवनपद्धतींशीही अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित होऊ शकतो. या अर्थाने पारंपरिक धर्माला धम्म हा एक श्रेष्ठ पर्याय आहे, असे मी मानतो. या पर्यायाची चर्चा या विचारयात्रेच्या शेवटच्या टप्प्यावर केली आहे.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
...............................................................................................................................................................
विचारयात्रेचे हे तीन टप्पे मी वैचारिक / तात्त्विक दृष्टीकोनातून तीन अलग टप्पे म्हणून कल्पिले आहेत व त्या दृष्टीकोनातून पुस्तकाची रचना केली आहे. ते तंतोतंतपणे माझ्या जीवनात कालानुक्रमाने आलेले तीन टप्पे आहेत असे नाही. विशेषतः पहिले दोन टप्पे माझ्या जीवनात एकमेकात मिसळलेले आहेत- एकाच कालखंडात हातात हात घालून पुढे गेले आहेत. या टप्प्यांची जडणघडण १९७४ ते ८५ या काळात झाली व तिचे पडसाद नंतरच्या काळातही उमटत राहिले. तिसऱ्या टप्प्यावरील लेख तुलनेने नंतर (१९८४ नंतर) लिहिलेले आहेत. ८४-८५च्या सुमारास माझी धम्माकडे वाटचाल सुरू झाली, असे म्हणता येईल.
पहिल्या दोन टप्प्यांवर मी जेव्हा धर्मचिकित्सेचा दृष्टीकोन पुढे मांडत होतो, तेव्हा माझा कल मुख्यतः चार्वाकाकडे होता. आजही चार्वाकाचा भौतिकवाद - याला मी ‘लोकप्रसिद्धानुमानवादी चार्वाकाचा दृष्टिकोन’ म्हटले आहे - हा भारतीय तत्त्वज्ञानातील एक सर्वोच्च महत्त्वाचा दृष्टीकोन मला वाटतो. त्यामुळे चार्वाकाचे भारतीय तत्त्वज्ञानातील महत्त्व अधोरेखित करणे, हे मला एक माझे ‘मिशन’ वाटत होते व त्यातून ‘तत्त्वचिंतक चार्वाक’ हे माझे पुस्तक तयार झाले, याचे मला समाधान आहे. अर्थात पारंपरिक धर्मावरील टीका म्हणून चार्वाकमताचे महत्त्व अबाधित असले तरी एक मूल्यगर्भ दृष्टीकोन या दृष्टीने विचार करता भौतिकवादी चार्वाकाचा दृष्टीकोन मला अपुरा वाटतो.
चार्वाकाचा भौतिकवाद परलोकवादी मूल्यविचाराचा रस्ता बंद करतो व बाकीचे पर्याय आपल्यासमोर खुले ठेवतो. या पर्यायवैविध्याला मर्यादित करून मानवहिताची नेमकी दिशा आपल्यासमोर ठेवण्याचे कार्य धम्म करतो. १९८४नंतरच्या काळात हळूहळू माझ्या धम्मविचाराला स्पष्टता येत गेली व ती अनेक लेखांमधून व्यक्त होत गेली. माझ्या विचारांनी गाठलेला हा आजचा टप्पा आहे.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
आज मी मागे वळून पाहतो, तेव्हा हे टप्पे माझ्या आयुष्यात कसकसे आले, त्याचा आलेख स्पष्ट होऊ लागतो. हे टप्पे घडवण्याचे ‘श्रेय’ अनेक व्यक्तींकडे जाते, ते त्यांना या निमित्ताने दिले पाहिजे असेही वाटते. ईश्वरवाद, देवदेवता, कर्मकांड, जातीय जाणीव, पूर्वजन्म-पुनर्जन्म, भूतपिशाच्च यांबाबतच्या श्रद्धा माझ्यावर लादू पाहणारी नातेसंबंधांची चौकट (त्यात माझ्या आईचा व तिच्या सद्गुरूंचा वाटा सगळ्यात महत्त्वाचा) मला लाभली नसती, तर कदाचित त्यावर प्रतिक्रिया म्हणून महाविद्यालयीन काळातच मी कट्टर नास्तिक झालो नसतो.
अर्थात माझी नास्तिकता केवळ प्रतिक्रियात्मक होती, असे म्हणता येत नाही. माझा चिकित्सक स्वभाव आणि सत्य शोधण्याची धडपड, या गोष्टी मला आज ना उद्या याच नास्तिकतेकडे घेऊन गेल्या असत्या असे वाटते. अर्थात माझी नास्तिकता कठोर असली तरी कोरडी नव्हती. तिला अध्यात्मसाधनेची झालर होती. अध्यात्मसाधना ही कल्पना येथे स्पष्ट केली पाहिजे.
‘अध्यात्म’ किंवा ‘spirituality’ याकडे बऱ्याचदा ‘शाश्वत आत्मतत्त्वाचा शोध’, ‘आत्म्याचे परमात्म्यात विलयन’, ‘ईश्वरप्राप्तीची साधना’, ‘ब्रह्मसाधना’ अशा दृष्टीने पाहिले जाते. असा कोणताही अर्थ मला अभिप्रेत नाही. स्वतःच्या शरीरांतर्गत घडणाऱ्या घडामोडी, मनोविकार, विचार, आंतरिक शक्ती आणि दुर्बलता या साऱ्यांचा अंतर्मुखपणे शोध होणे, स्वतःमधल्या ऊर्जास्रोतांना नवे वळण देणे, स्वतःच्या मानसिक नैतिक शक्तींची जडणघडण करणे, त्यांचा विकास करणे, आत्मा, ईश्वर असे काही न मानताही मनःशांतीची, चित्तशुद्धीची साधना करणे, या साऱ्याला मी ‘अध्यात्मसाधना’ म्हणतो. अध्यात्म, यात जरी ‘आत्मा’ हा शब्द अंतर्भूत असला, तरी तेथे त्याचा अर्थ शाश्वत आत्मतत्त्व असा नसून ‘मी स्वतः’ एवढाच आहे. संस्कृतमध्येही ‘आत्मन्’ हा शब्द या सर्वनामाच्या अर्थाने वापरला गेला आहे.
तेव्हा एकीकडे आत्मा, परमात्मा, ईश्वर या कल्पना नाकारत असतानाच, दुसरीकडे वर दिलेल्या व्यापक अर्थाने मी अध्यात्मसाधनाही करत होतो. कोणी आध्यात्मिक गुरू म्हणून न पत्करता, योग, मंत्रसाधना यासारख्या गोष्टींचे स्वतःवर प्रयोग करून आंतरिक बदलांचा शोध घेत होतो. एका अर्थाने अध्यात्मसाधना हे माझे सत्याचे प्रयोग होते, तसेच दुःखमुक्तीचे आणि सुखप्राप्तीचेही प्रयोग होते. पण आसन, प्राणायाम, ध्यान, मंत्रोच्चार यांचे देहमनावर काही परिणाम होतात, हे मान्य करूनही हे परिणाम स्वीकारण्यासाठी आत्मा, पुनर्जन्म, कर्मसिद्धान्त, ईश्वर यातले काही मानण्याची गरज नाही, ही धारणा पक्की होत होती.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
..................................................................................................................................................................
हिंदू धर्माची सामाजिक बाजू म्हणजे वर्णजातिव्यवस्था. तीही मला मान्य नव्हती. स्वतःची ब्राह्मण ही ओळख मला पुसायची होती. जानवे तोडले होते. विवाह करीन तर आंतरजातीयच असेही ठरवले होते.
या साऱ्यातून हिंदू धर्माची तात्त्विक बाजू आणि सामाजिक बाजू या दोन्हींना नकार देण्याची पार्श्वभूमी तयार झाली. याच काळात ‘धर्म ही अफूची गोळी आहे’, ‘धर्म, मानवी मूल्ये, नैतिकता, संस्कृती हा सारा वरचा डोलारा आहे’, ‘आर्थिक प्रश्नच खरे प्रश्न आहेत’, असे सांगणारा मार्क्सवाद खुणावत होता. दि. के. बेडेकर, गं. बा. सरदार, रा. प. नेने, राम बापट यांचा वैचारिक प्रभाव वातावरणात होता. व्यवस्थेवर आगपाखड करणारे अनेक अस्वस्थ मित्र आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक मित्र मार्क्सवादाने प्रभावित होते. अशा रितीने भारतीय तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात चार्वाकमताशी जवळीक आणि पाश्चात्य संदर्भात मार्क्सवादाचा प्रभाव यातून माझा ‘निधर्मी’ दृष्टीकोन पुष्ट होत होता, पण मन पूर्णपणे निधर्मी व्हायला तयार नव्हते.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
...............................................................................................................................................................
समाजव्यवस्था आणि समाजपरिवर्तन या संदर्भात आर्थिक रचनेला जसे पायाभूत महत्त्व आहे, तसे मानवी मनालाही पायाभूत महत्त्व आहे, असे मला सातत्याने वाटत आले आहे. त्यामुळे मूलभूत मानवी विज्ञाने दोनच आहेत- अर्थशास्त्र आणि मानसशास्त्र. ती परस्परांवर प्रभाव पाडणारी आहेत, तसेच काहीशी स्वतंत्रही आहेत. तसेच धर्मसंस्था ही मोठ्या प्रमाणावर उफराट्या जाणिवेचे, माणसाच्या काल्पनिक उल्लंघनशीलतेचे मूर्त रूप असली तरी उदात्त मूल्यांची जोपासना आणि मी जिला ‘अध्यात्मसाधना’ म्हणतो, तीही धर्मसंस्थेच्या आधाराने होत आली आहे. त्यामुळे एका व्यापक अर्थाने धार्मिकता ही मानवी मनाच्या संगोपनाचा एक महत्त्वाचा घटक आहे.
‘ऊर्ध्ववास्तू’ किंवा ‘डोलारा’ म्हणून सहजपणे उडवून लावण्याची किंवा अप्रस्तुत ठरवण्याची ती गोष्ट नाही. त्यामुळे मला चार्वाकवाद चुकीचा नव्हे, पण अपुरा वाटत होता आणि मार्क्सवाद हे परिपूर्ण विज्ञान असल्याचा मार्क्सवाद्यांचा दावा फोल वाटत होता. या पार्श्वभूमीवर माझ्या धर्मचिंतनाला येऊन मिळालेला बौद्ध विचारांचा प्रवाह नवी संजीवनी देणारा ठरला. बौद्ध विचारांचा प्रवाह सर्वप्रथम येऊन मिळाला, तो मी तत्त्वज्ञानात एम. ए. करत असताना. पुढे पीएच. डी. करत असताना तो रुंदावत गेला. त्यानंतर त्याला आणखी दोन विचारप्रवाह मिळाले व तो व्यापक होत गेला. बौद्ध विचारधारेच्या या तिहेरी प्रवाहाचा पहिला भाग होता बौद्ध तर्कशास्त्राचा, दुसरा आंबेडकरी विचाराचा आणि तिसरा विपश्यनासाधनेचा.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
मी तत्त्वज्ञानात एम. ए. करत होतो, तेव्हा माझे तत्त्वज्ञान विषयाचे ‘गॉडफादर’ डॉ. सुरेंद्र बारलिंगे यांचे ‘A Modern Introduction to Indian Logic’ हे पुस्तक वाचनात आले. त्यांच्या प्रभावातून तसेच त्यावेळी पाश्चात्य तसेच भारतीय तर्कशास्त्र शिकवणारे डॉ. मो. प्र. मराठे त्यांच्या व्याख्यानांतून जो बौद्ध तर्कशास्त्रावर भर देत असत, त्याच्या प्रभावातून भारतीय तर्कशास्त्रातील बौद्धांच्या योगदानाची विशेषत्वाने दखल घ्यावीशी वाटली. पण पुढचा प्रवास बराचसा स्वतंत्रपणेच झाला. दिङ्नाग व धर्मकीर्ती यांचे भारतीय तर्कशास्त्राला जे नेमके योगदान आहे, असे डॉ. मराठे व त्यांच्या शिस्तीत तयार झालेले त्यांचे विद्यार्थी यांना वाटत होते, त्यापेक्षा ते बरेचसे वेगळे आहे, अशी माझी ठाम समजूत होती व आहे.
मग ते नेमके काय आहे? ते पीएच.डी.च्या प्रबंधातून तसेच नंतरच्या काही निबंधातून मी मांडले. ‘मराठे स्कूल’च्या मतांचा प्रतिवाद करणारे लिखाणही मी केले. पण त्यांच्याकडून त्याची दखलच घेतली गेली नाही व चर्चा पुढे जाऊ शकली नाही. पण दिङ्नाग व धर्मकीर्ती यांचे तत्त्वज्ञान व तर्कशास्त्राला योगदान होते, ते सामाजिक दृष्ट्याही महत्त्वाचे होते. त्यामुळेच असेल कदाचित, माझ्या बौद्ध तर्कशास्त्रविषयक लिखाणाची कॉम्रेड शरद पाटलांनी खूपच आस्थेने दखल घेतली. कॉग्रेड शरद पाटील यांच्याबरोबर झालेल्या संवाद-विसंवादातून माझ्या बौद्ध धारणेची बाजू स्पष्ट होत गेली.
धर्मकीर्तीचे तर्कशास्त्रीय चिंतन मला खूप मोलाचे वाटले, पण त्याची सर्वच मते स्वीकार्य नव्हती. उदाहरणार्थ, पारंपरिक बौद्ध मताचा पाईक या नात्याने त्याने पुनर्जन्मसिद्धान्त स्वीकारला होताच. एकूणच बौद्ध तत्त्वज्ञान वैदिक परंपरेच्या विरोधात उभे राहिलेले सगळ्यात प्रभावशाली तत्त्वज्ञान असले, तरी पुनर्जन्म व परलोक या कल्पनांनी त्याला मर्यादा पडत होत्याच. याला उत्तर मिळू शकत होते आंबेडकरवादाने. म्हणून माझ्या बौद्ध विचारात अंतर्भूत झालेला दुसरा महत्त्वाचा प्रवाह होता आंबेडकरवाद.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
..................................................................................................................................................................
विलास वाघांनी ‘विषमतेचा पुरस्कर्ता मनू’ या पुस्तकाचे लेखन करायला मला प्रवृत्त केले, त्याच वेळेला आंबेडकरवादाकडे गंभीरपणे पाहण्यासही प्रवृत्त केले असे म्हणता येईल. डॉ. आंबेडकरांनी बौद्ध तत्त्वज्ञानाची जी मांडणी केली, त्यात त्यांनी कर्म आणि पुनर्जन्म या सिद्धान्ताची पारंपरिक मांडणी नाकारून इहवादी पुनर्मांडणी केली होती. माझ्यातल्या चार्वाकवाद्याला भावणारे हे बौद्ध धर्माचे रूप होते. सर्वधर्मसमभावाला विरोध करणारा आंबेडकरांचा धर्मचिकित्सावाद, त्यांनी हिंदू धर्माला दिलेला स्पष्ट नकार आणि बौद्ध धम्माची केलेली नवी मांडणी या साऱ्यांचे स्वागत करणारे, आकलन करून घेणारे माझे लिखाण अनेक इंग्रजी व मराठी निबंधातून ‘The Philosophy of Dr. B. R. Ambedkar’ या पुस्तकाच्या संपादनापर्यंत विकास पावले. त्यानंतरही हा शोध सुरूच आहे.
माझ्या बौद्ध विचारात सामील झालेला तिसरा महत्त्वाचा प्रवाह होता आणि आहे विपश्यनासाधनेचा. नास्तिकतेची चौकट स्वीकारूनही मी धडपडत, चाचपडत जी ‘अध्यात्मसाधना’ करत होतो. माझ्या साधनेला शिस्त नव्हती, नेमकी दिशा नव्हती. आजूबाजूला जे आध्यात्मिक गुरू होते, ध्यानगुरू होते, योगाचार्य होते, त्यांचा ईश्वरवाद, आत्मवाद पटत नव्हता. या पार्श्वभूमीवर माझे मित्र श्रीकांत बहुलकर यांनी जेव्हा स्वानुभावाच्या आधारे विपश्यनाशिबिराची माहिती सांगितली, तेव्हा आत्मा-ईश्वर-ब्रह्म अशा पूर्वग्रहांशिवाय स्वतःचा शोध घेण्याची, शांतिसुखाचा शोध घेण्याची शिस्तबद्ध साधना शक्य आहे, असा आशावाद निर्माण झाला. विपश्यनेचे दहा दिवसांचे शिबिर पूर्ण केल्यावर हा आशावाद दृढ झाला. विपश्यनासाधनेमुळे जीवनाचे सर्व प्रश्न सुटले असे नाही, संघर्ष मिटले असे नाही. पण एक दिशा सापडली. सारे प्रश्न आणि संघर्ष वर्तमानाच्या पटलावर आणून त्यांना तोंड देण्याची शैली प्राप्त झाली. यशस्वी जीवनाचा हाच अर्थ असू शकेल, असेही वाटले.
विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंका जरी श्रावकयानाला अनुसरून पूर्वजन्म-पुनर्जन्मावर विश्वास ठेवत असले, तरी विपश्यनासाधकाने हे सारे मानण्याची अनिवार्यता नाही, असेही ते म्हणत. गोएंका गौतम बुद्धांकडे धर्मसंस्थापक म्हणून पहात नसत, तर एक शास्त्रज्ञ, एक मनोवैज्ञानिक म्हणून पहात. आंबेडकरही बुद्धांच्या धम्माचा विज्ञान-संगत अर्थ लावत होते. आंबेडकरवादी असणे आणि विपश्यनासाधक असणे, यांत मला तरी विसंवाद दिसत नव्हता. पण विचारवंत आणि कार्यकर्त्यांमध्ये या विषयावर दोन तट होते आणि आहेत.
डॉ. यशवंत मनोहरांसारखे आंबेडकरवादी विचारवंत विपश्यनासाधना ही आंबेडकरवादाच्या विरोधी मानतात, तर रत्नाकर गायकवाडांसारखे ज्येष्ठ प्रशासक असे मानतात की, आंबेडकरांना विपश्यना मान्यच होती. या टोकाच्या दोन्ही मतांमध्ये अडचणी आहेत. आंबेडकरी ‘नवयान’ आणि गोएंकांचे ‘विपस्सनायान’ यांच्यात शत्रुभावी विरोध नाही. दोघांचे वेगळेपण जपणे आणि तरीही दोघांमध्ये समन्वय घडवणे, संवाद घडवणे शक्य आहे, असे मला वाटते. अशा प्रकारचा संवाद व्यक्ती आणि समाज दोन्हींच्या हिताचा आहे, असा माझा दावा आहे.
‘धर्म ते धम्म : एक विचारयात्रा’ – प्रदीप गोखले
देशना, अॅन इन्स्टिट्यूट ऑफ बुद्धिस्ट अँड अॅलाईड स्टडीज, पुणे | पाने – ३४२ | मूल्य – ६०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment