‘पालकनीती’ हे पालकत्वाला वाहिलेले मासिक पुण्यातून १९८७पासून नियमितपणे प्रकाशित होत आहे. या मासिकातल्या १९८७ ते २०१४पर्यंतच्या निवडक लेखांचे ‘निवडक पालकनीती भाग १ व २’ हे दोन संग्रह ज्योत्स्ना प्रकाशनातर्फे २९ एप्रिल २०२३ रोजी पुण्यात समारंभपूर्वक प्रकाशित झाले. पहिल्या भागाची प्रस्तावना ‘अक्षरनामा’वर २७ एप्रिल रोजी प्रकाशित झाली होती. आता ही दुसऱ्या भागाची प्रस्तावना...
.................................................................................................................................................................
‘निवडक पालकनीती’चा हा दुसरा भाग रचताना आनंदासह मनात काही विचार येतात. पहिल्या भागात अगदी मूलभूत प्रश्नांवरची, उदाहरणार्थ पालकत्व, त्यातल्या चिंता, मुलांचा विकास, भाषामाध्यम आणि लैंगिकता यावरची चर्चा आपण पाहिली. या दुसऱ्या भागात थोड्या व्यापक अर्थाने सामोर येणारे मुद्दे - शिक्षण, कलाशिक्षण, जीवनविचार आणि अनुभव या विषयावरचे लेख आहेत. या सगळ्यामधून पालकत्वाच्या गाभ्याची काही सूत्रं आपल्याला मिळू शकतील, अशी आमची कल्पना आहे.
‘पालकनीती’ म्हणजे केवळ आपल्या मुलांचं संगोपन, शिक्षण, इत्यादींपुरता विचार नाही, तर आपल्या आधीच्या पिढ्यांची काहीएक जबाबदारी आणि आपल्या परिसरातल्या गरज असलेल्या बालकांचं पालकत्व घेणं, हेही त्यात येतं. याशिवाय आपल्या स्वतःच्या पालकत्वाचा विचारही येतो; म्हणजे फक्त आर्थिक नाही, तर आपल्याला माणूस म्हणून आयुष्यात काय करायचं आहे त्याचा, आपल्या संकल्पनांचा, धारणांचा, कामांचा आणि जबाबदाऱ्यांचाही विचार त्यात आहे, असायलाच हवा आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
एका अर्थी तो आपला आपण करायचा असतोच. पण अनेकदा आपण तो पूर्णपणे करत नाही. ‘आमच्या पालकांनी हे आमच्यासाठी केलं नाही आणि त्याचे परिणाम आज आम्हाला भोगावे लागत आहेत’, ही सबब आयुष्य जगायला पुरेशी होत नाही. स्वतःचं आणि शक्य असलं, तर त्यात सोबतीला असलेल्यांचंही पालकत्व आपल्याला घ्यावं लागतं, मुख्य म्हणजे त्यातही आपल्यासहीत प्रत्येक व्यक्तीचं स्वातंत्र्य अबाधित ठेवणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच त्यातून खऱ्याखुऱ्या आनंदाची निर्मिती होईल.
प्रत्येकाला हवा तसा साधन उपलब्धतेच्या चौकटीत विकास करायची संधी तर मिळायलाच हवी. या चौकटी मोडून त्या पलीकडे पोचायलाही हरकत नसावी. ते अर्थातच अवघड असतं, म्हणूनच पालक म्हणून आणि माणूस म्हणून शक्य तेवढं प्रोत्साहन आणि मदत करणं हे आपलं काम आहे.
भारतीय समाजरचनेत आसपासच्या जगाशी असलेल्या नात्याचा विचार करण्याची सवड आणि सवय एकंदरीत कमीच आहे. प्रत्यक्षात वर्तमान चहूबाजूंनी येऊन आपल्यावर आदळत असतं. समाजात काय घडतं आहे, त्याचा विचार आपापल्या पातळीवर करत राहायला लागतो. आपला सहभाग काय आहे, आपल्या धारणा काय आहेत, भूमिका काय आहेत, त्या तशा का आहेत, याचा सुस्पष्ट विचार आपण टाळून चालणार नाही. त्यासाठी अगदी जमेल तितकं खोलवर स्वतःला खोदून बघावं लागलं तरी हरकत नाही.
कुमारवयापासूनच, आपण कोण आहोत हे समजू लागल्यापासून आपण हा विचार करायला लागतो. आपल्याला नक्की काय काय करायचं आहे? या प्रश्नाची उत्तरं प्रत्येकाची वेगवेगळी किंवा काही प्रमाणात समानही असतात. उदा. शिकायचं आहे, आनंदानं जगायचं आहे, आपल्या अवतीभवतीचं जग सुंदर करायचं आहे, काही प्रश्नांना उत्तरं शोधायची आहेत, ते आयुष्यातले प्रश्न असतील किंवा माणसाला आजवर न सुटलेली कोडी असतील वगैरे वगैरे. त्यात प्रामुख्यानं एक अडचण असते. परंपरा. ती आपल्याला काही तयार उत्तरं देते. इथेच ती अडचण असते, या उत्तरांकडे फार सतर्कपणे बघायला लागतं. प्रत्येक उत्तर स्वीकारावं की नाही, हा ज्याच्या त्याच्या स्वातंत्र्याचा प्रश्न असला तरी ती न स्वीकारण्याचाही आपल्याला हक्क आहे, याची आठवण ठेवून विचार करावा, असं आमचं मागणं आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
आयुष्यात खूप काही घडत असतं. अपघात असतात, आपल्या हातात नसलेल्या काही गोष्टी घडत असतात. त्यामुळे ठरवलेल्या गोष्टी घडतात किंवा घडत नाहीतही. वेगळ्याच घडून जातात. या सगळ्यात आपल्याला प्रियजनांशी आणि ओळखीच्यांशी आणि अनोळखी लोकांशीही संवाद करायचा असतो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, कुणाकुणावर प्रेम करायचं असतं, त्यात कुणावर संतापायचं असतं, कुणाचा हेवा वाटून घ्यायचा असतो, कुणावरून जीव ओवाळून टाकायचा असतो, कधी वेदनेनं, दुःखानं पिळवटून निघावं लागतं.
हे सगळे जीवनाचे आवश्यक आणि अटळ भागच आहेत. त्यामुळे बावरून न जाता त्यांचाही स्वीकार व्हावा. मात्र आपलं मन शक्य तितकं आपल्या ताब्यात राहावं, परिस्थितीतल्या शक्य-अशक्यतेच्या मर्यादा ओलांडून जाण्याची क्षमता आपल्या मनात राहावी, यासाठी आपल्या मनावर आणि स्वीकारांवर आपलं आणि आपलंच नियंत्रण असेल असं आपल्याला पाहावं लागतं. परंपरा, सल्ले आणि शिस्त-नियम आपल्या मनजीवनाला मर्यादा घालत नाहीयेत ना, याची खात्री सतत आणि सजगपणे आपल्याला करत राहावीच लागते. त्यावरून आपला हात निसटला की पश्चात्तापाखेरीज काही उरत नाही.
आपल्याला मूल हवं आहे का, असलं तर आपण सर्वांगानं ते कसं वाढवू हा विचार आणि कृती आपल्यालाही घडवत असते. तेव्हा ‘आपल्याला मूल हवं तर ते कशासाठी?’ हाही विचार आपल्याला करायला हवा. माणूसप्राणी म्हणून पुनरुत्पादनाची, म्हणजे जनुकांच्या जपणुकीची आणि त्यांच्या वाढविकासाची आपल्याला नैसर्गिक प्रेरणा असते, असं संशोधक म्हणतात. अगदी खूप पूर्वी नाही दोन-तीन पिढ्यांआधीपर्यंत आपल्या इथे तरी - मूल, त्यातही शक्यतो मुलगा ही ‘म्हातारपणची काठी’ म्हणून जन्माला घालण्याची पद्धत होती.
या विचारांपासून आपण काहीसे पुढे आलो आहोत, परिस्थिती बदलते आहे. एक विनंती आहे, म्हातारपणची काठी ही मुलांकडून असलेली अपेक्षा शक्य तितक्या लवकर आपण बाद करायची गरज आहे. आपण फक्त स्वतःकडून अपेक्षा करू शकतो. बालपणाचा एकवार पुन्हा आनंद आणि अनुभव आपल्याला मिळावा, जीवनाला तोही अर्थ यावा म्हणून आपल्याला मूल सांभाळायचं असतं.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
मात्र आपल्याइतकाच जगायचा अधिकार असलेला एक नवीन जीव आपण या जगात आणणार आहोत, ती सहज नकळत घडणारी गोष्ट नसून एक मोठी जबाबदारीही आहे. आपण वाढवत असलेल्या मुलांच्या जीवनात आपण एका वयापर्यंत संपूर्ण निर्णयकारी असतो, पण एका टप्प्यावर ती भूमिका आपल्याला पूर्णपणे सोडायची आहे, याची जाणीव आपल्याला आहे ना, आठवण पालकनीतीनं आजवर आपल्याला आवर्जून केलेली आहे. मूल आपल्या आयुष्यावर अक्षरशः ‘छा’ जातं, याची आठवण मूल होण्यापूर्वी आपल्याला असावी म्हणजे आपण त्यासाठी मनानी तयार असू. मग तो सगळाच अनुभव भद्र आणि सुभग होईल.
आपल्या वैयक्तिक पालकत्वावर प्रभाव टाकणारे अनेक मुद्दे आहेत. ५०-६० वर्षांच्या प्रचंड प्रयत्नांनंतरही मुलगा किंवा मुलगी हे खऱ्या अर्थानं एका स्तरावर आलेले नाहीत. त्यातही मुलगा की मुलगी, याच दुपेडी स्तरावर आपण आहोत, स्त्रीमनधारी किंवा पुरुषमनधारी, ट्रान्स, क्कीअर इत्यादी संकल्पना अजून हवेत तरंगत आहेत, समाजसंवादात त्या क्वचित दिसतात, पण मनात शिरलेल्या नाहीत. तिथे त्या शिरल्या, झिरपल्या की भाषेतही येतील आणि मग समाजात, कायद्यात आणि प्रथांमध्येही खऱ्या अर्थानं बदल होतील. आपलं मूल वेगळा लिंगभाव घेऊन आलेलं असेल तर त्याचा सहज सरळ स्वीकार करता यावा असं सामाजिक वातावरण प्रत्यक्षात येईल.
स्त्री-पुरुषांचं लग्न आणि लग्नानंतर मूल ही परंपरा आजही आहे. मात्र ती स्वतःसाठी स्वीकारायची की नाही, हा सर्वस्वी ज्यांचा त्यांचा निर्णय असतो हे म्हणायला साजेसा काळ आता सुरू झालेला आहे, यापूर्वीही तो निर्णय ज्यांचा त्यांचाच होता, पण परंपरेशी (आणि त्यातून आलेल्या कायद्याशी लढणं अवघड असे आणि त्याच परंपरेत वाढल्यामुळे आपल्या मनाला ‘ते आपलंच मत आहे’ असं सहजपणे पटतही असे. त्याशिवाय इतर विचार करणं आणि त्यासाठी संघर्ष करणं अवघड असे, सहसा होत नसे. आता शक्य होईल एवढ्या संघर्षात - प्रयत्नात जमू शकणार आहे.
म्हातारपणची काठी किंवा नैसर्गिक प्रेरणा हे मुद्दे विचारांनी बाजूला ठेवायला आपण तयार असलो, तर त्यापलीकडे मूल वाढवणं, ते वाढताना बघणं, त्याचं शिकणं अनुभवणं हा सगळाच भाग अत्यंत आनंदाचा असतो. त्यांच्या सुखदुःखात सामील होणं, सर्व प्रकारे त्यांची काळजी घेणं, पाठीशी उभं राहणं यातही अतुलनीय आनंद आहे, आपल्या स्वतःच्या दृष्टीनं आणि समाजहिताच्याही. मात्र ह्यात आनंद वाटणं हे व्यक्तिसापेक्ष आहे. त्यामुळे तसं वाटत नसेल, तर मूल वाढवण्याची जबाबदारी न घेणं हेही, तितकंच उचित आहे, हे आवर्जून सांगावंसं वाटतं.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
विसावं आणि त्यापेक्षा अधिक एकविसावं शतक मानवी संस्कृतीसाठी विशेष महत्त्वाचं आहे, असं वाटतं. आजच्या काळात तंत्रं आणि माध्यमं इतक्या जवळ येऊन आयुष्यात शिरली आहेत की, आपण सजगपणे त्यांना वेळ द्यावा लागतो आहे किंवा नको असतील तर दूर करण्यासाठीही तेवढाच वेळ जातो आहे. नवी पिढी आधीच्या पिढीपेक्षा अधिक सहजपणे नवं तंत्रज्ञान हाताळते आहे.
यात आपली सोय आहे की हा धोका आहे? यंत्र-तंत्रं निर्माण झाली तरी आधीचे प्रश्न कमीदेखील झाले नाहीत. धार्मिक विद्वेष वाढत आहे... वाढवला जात आहे. त्यात वैविध्य असणं साहजिक आहे पण आता दुष्टावा वाढत चालला आहे. जगभरच, मात्र भारत त्यात अजिबात मागे नाही. स्थलांतरे वाढत आहेत. वरच्या दर्जाच्या जीवनासाठी परदेशांत स्थलांतरं होतात, त्याबद्दल आपण बोलत नाही आहोत. पोटाची खळगी भरण्यासाठीदेखील कायमची तसेच हंगामी स्थलांतरं मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. विभक्त कुटुंबातली माणसं, मुलंदेखील एकेकटी राहत आहेत. लांब अंतरावरची नाती, घटस्फोट, एकल पालकत्व यांचं प्रमाण वाढलं आहे. अनेक उदाहरणांमध्ये हे अजिबात वाईट नाही असंही दिसतं, पण बालकांच्या जीवनात त्यामुळे ताण निर्माण होतात.
एकविसाव्या शतकाचा सर्वांत मोठा म्हणावा इतका प्रश्न पर्यावरणाचा आहे.... त्याचा दाह जाणवू लागला आहे. यानंतरच्या पिढ्यांना नक्कीच त्याला तोंड द्यावं लागणार आहे. त्याचा वणवा होऊ नये, याची सोय तरी आताच करायला हवी आहे. त्याची जबाबदारी घ्यावीच लागणार आहे.
या सगळ्या संदर्भात ‘पालकनीती’ची आवश्यकता उत्तरोत्तर वाढती आहे. मुलाबाळांचं, माणसांचं आयुष्य सुखासमाधानात जावं ही सर्वांचीच इच्छा असते. आजच्या मुलांचा वर्तमान आणि भविष्यकाळ इतका वेगळा असणार आहे की, त्याचे आडाखे बांधणंही कठीण आहे. त्यांचा भवताल, पर्यावरण, तंत्रज्ञान, रोजगार त्यांच्यावर असणारे प्रभाव, दबाव, आकर्षणं, व्यसनं, त्यातून तरून नेण्याच्या क्षमता, आधार, सगळं काही बदलत्या रूपात असेल. मात्र त्यांनी त्या त्या प्रसंगी शहाण्यासारखं वागावं, कणखरपणे संकटांना तोंड द्यावं, यासाठी त्यांचा वाढविकास योग्य दिशेनं होतो आहे ना, पुरेशी ताकद आणि मैत्र ते मिळवू शकतील, यासाठीचे प्रयत्न आपण जरूर करू शकतो. त्यासाठी या विषयात ‘पालकनीती’नं जे काम करून ठेवलेलं आहे, त्याचा संदर्भ घेऊ शकतो.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
‘पालकनीती’नं सभोवतालची परिस्थिती आणि तिचा आपल्यावर आणि मुलांवर होणारा परिणाम समजून घ्यायचा प्रयत्न केला. माणसांच्या जगात असायला हवी, अशा नीतीबद्दल आवर्जून संवाद साधला. ती नीतीतत्त्वं चिरंतन आहेत, पण बदलत्या काळात आपल्या जीवनाशी ती कशी जोडून घ्यायची, जीवन अधिक मानवी होईल, यासाठी नेमकं काय आणि कसं करायचं, या प्रश्नांची उत्तरं प्रत्येक काळात शोधावी लागणारच आहेत.
‘निवडक पालकनीती’ तयार होताना खूप विचार करून काही लेख निवडले, तरी अनेक निवडता आले नाहीत. त्यामुळे काही कमतरता या निवडीतही दिसते आहे. विशेषतः सामाजिक संस्थांनी किंवा व्यक्तींनी वंचित गटांसाठी केलेल्या कामांबद्दल काहीही या दोन्ही भागांमध्ये समाविष्ट केलेलं नाही. काय घेता आलं नाही ही मोठी यादी आहे. ती सांगत बसत नाही, वाचकांना ते समजेलच.
अर्थात सुरुवातीपासूनचे अंक http://www.palakneeti.in या वेबस्थळावर उपलब्ध आहेत. ते पाहता येतील. मासिक ‘पालकनीती’ सुरू असणारच आहे. आता त्यात नव्या पिढीतल्यांचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे नव्या प्रश्नांचा विचार तिथे प्राधान्यानं येईल. तीस वर्षांत आम्ही शिकलेल्या, समजून घेतलेल्या काही गोष्टी आपल्यासाठी या ‘निवडक पालकनीती’च्या रूपानं सादर करत आहोत.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment