‘पालकनीती’ ही एक वैचारिक चळवळ आहे, मात्र तिचं स्वरूप संघर्षाचं नाही, जिव्हाळ्यातून आलेल्या जाणिवेचं आहे. त्यामागचा हेतू - मुलं माणूसपणानं वाढावीत - इतका मूलगामी आणि साधा आहे
ग्रंथनामा - झलक
संजीवनी कुलकर्णी
  • ‘निवडक पालकनीती भाग १ व २’ची मुखपृष्ठं
  • Thu , 27 April 2023
  • ग्रंथनामा झलक पालकनीती पालकत्व मुलं

‘पालकनीती’ हे पालकत्वाला वाहिलेले मासिक पुण्यातून १९८७पासून नियमितपणे प्रकाशित होत आहे. या मासिकातल्या १९८७ ते २०१४पर्यंतच्या निवडक लेखांचे ‘निवडक पालकनीती भाग १ व २’ हे दोन संग्रह ज्योत्स्ना प्रकाशनातर्फे २९ एप्रिल रोजी समारंभपूर्वक प्रकाशित होत आहेत. हा कार्यक्रम पुण्यात अक्षरनंदन शाळेत सायंकाळी साडेपाच वाजता होईल. त्यानिमित्ताने या संग्रहांच्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश…

.................................................................................................................................................................

‘पालकत्व’ हा विषय विचार करण्याचा आहे, हे आम्हाला त्यात उतरल्यावर म्हणजे मूल वाढवायला लागल्यावर कळलं. हे आधी का कळलं नाही, या प्रश्नाला काहीच उत्तर नाही. ‘तशी पद्धत नव्हती’, ‘मनात तसं आलंच नाही’, अशा सबबी सांगता येतील फक्त. पण कळायला हवं होतं, अशी जाणीव झाल्यावर, निदान आतातरी त्याबद्दल वाचन करू म्हणून मराठीत काही लेखन, काही पुस्तकं आहेत का, असं शोधायचा प्रयत्न केला. मागच्या पिढीतल्या ताराबाई मोडकांची चार पुस्तकं, ‘शिक्षक-पालक संघा’चं एक त्रैमासिक आणि शोभाताई भागवतांचं ‘आपली मुलं’, अशा हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या, दर्जेदार म्हणाव्यात अशा गोष्टी सापडल्या.

त्यामानानं इंग्रजीत खूपच साहित्य उपलब्ध होतं. ते तोपर्यंत वाचनात आलेलं नव्हतं. शिवाय त्याचा उपयोग मर्यादितच होता, कारण आपल्या सामाजिक-सांस्कृतिक संदर्भांना धरूनही ते नव्हतं. आपण नाही, पण आपल्या आसपासचे लोक काही वाचतात का, विचार करतात का, असं बघितलं तर आरोग्य, आहार, असे विषय सोडून पालकत्वाबद्दल आवर्जून फारसं काही वाचताहेत असंही दिसलं नाही. अशा वेळी ‘पालकत्व’ या विषयावर सहज उपलब्ध होणारं, आणि उपदेश न करता विचार करायला लावणारं, असं काही असावं अशी गरज दिसली.

या गरजेतून ‘पालकनीती’ मासिक २६ जानेवारी १९८७ला सुरू झालं. आपण हे करू शकू, असा आत्मविश्वास सुरुवातीला तर अजिबात नव्हता. पण त्या निमित्ताने चर्चा होत, वाचन होई, विचार केला जाई, त्यावर अंक निघत असे. आपला वकूब लक्षात घेऊन १९९० साली एका बैठकीत हे मासिक पुढे चालवावं की नाही, असा प्रश्न मांडला होता. बरीच मित्रमंडळी आली होती. सर्वांनी या मासिकाची आवश्यकता आहे, ते बंद करू नये, असाच निर्वाळा दिला. प्रा. देवदत्त दाभोळकर सरही आले होते. ते म्हणाले, ‘‘हे बघ, तू जे काम निवडलं आहेस ना, ते इतक्या सहज प्रतिसाद मिळवणारं नाही. पण त्याची आवश्यकता निश्चित आहे. दहा वर्षं मान खाली घालून काम कर, मग बोल.’’ आता पर्यायच नव्हता.

मात्र यातून, निदान आपण रास्त मार्गावर आहोत एवढा विश्वास मनात धरून काम करत राहिलो. दहा वर्षं थांबावं लागलं नाही, हळूहळू ‘पालकनीती’चा संपादक-गट आकार घ्यायला लागला. त्यात थोडी ये-जा असे, तरी काहीसं स्थैर्य येऊ लागलं, तेव्हा १९९६ साली आम्ही ‘पालकनीती परिवार’ या न्यासाची स्थापना केली. ‘पालकनीती’च्या संपादकपणाचा एक वेगळाच फायदाही झाला, जिवाला जीव देणाऱ्या, आयुष्यभराच्या मित्रमैत्रिणी यातून मिळाल्या. त्यांचा उत्साह एवढा होता की, त्यांनी मासिकापुरतं काम मर्यादित न ठेवता ते वेगवेगळ्या प्रकारे वाढवायला सुरुवात केली. त्या कामांचा आढावा पुढे येणारच आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

‘पालकनीती’ तसं साधंसुधं मासिक. लेखनाची सवय अशी काही नसलेलेच आम्ही बहुतेक जण. पालकनीतीत काम करणाऱ्या जवळपास कुणालाही मासिक चालवायची काहीही माहिती नव्हती. आपण विचार करू शकतो, बोलू शकतो, तर ते लिहू; या वृत्तीनं संपादकीय गटातून लेखन चाले. यामुळे लेखनात रंजकता कमी असे; पण तेही वाचकांनी चालवून घेतलं.

संपादकगटात आलेल्या एकेकानं त्यामधल्या विषयांत, रूपरंगात बदल सुचवले आणि केले. विनय कुलकर्णी आणि वंदना कुलकर्णी तर घरातलीच माणसं, तेव्हा अंक तयार होण्यात त्यांच्या मदतीचा भाग मोठा असे. काही अडचण आलीच, तर लगोलग लेख लिहून देण्यापासून, अंकाच्या घड्या घालून ते पोस्टात नेण्यापर्यंत सर्व कामं या मदतीमध्ये येत.

नीलिमा सहस्रबुद्धेचा जोर वैज्ञानिकतेवर आणि त्यासाठी आवश्यक तिथे भाषांतरित लेख जरूर घ्यावेत असा असे. शिवाय अंक बिनचूक असण्यावर तिचा विशेष रोख होता. शुभदा जोशींनी शिक्षण हा विषय बाजूला ठेवायला नको, असा आग्रह धरला. अंक बरा दिसावा - त्याला मुखपृष्ठ असावं असा तिचा हट्ट असे. रमाकांत धनोकर तर दृश्यमाध्यमातलाच, चित्रकार. तो गटात आला आणि तेव्हापासून अंकाच्या देखणेपणाची जबाबदारी त्यानं जवळजवळ एकहाती घेतली.

आता ‘मिळून साऱ्याजणी’ची संपादक असलेली गीताली वि.मं. अनेक वर्षं या गटात होती. तिनं आणि वंदना भागवतनी मानवी हक्क आणि समताधिष्ठित समाजाचा मुद्दा प्रामुख्यानं अंकात येईल, असं बघितलं. पुढे प्रिया बारभाई ही तंत्रस्नेही मैत्रीण गटात आली आणि तिनं ते काम हाती घेतलं, शिवाय एकंदर रचना बिनचूकपणानं आणि सहजपणे चालावी अशा व्यवस्था तयार करून दिल्या. याशिवाय सुनीती सु.र., विनय र.र., डॉ. सुनंदा गंदगे, डॉ. सुहास कोल्हेकर, सदानंद घासकडवी, सुषमा दातार, अशा अनेकांनी कमी-अधिक काळ ‘पालकनीती’च्या संपादकगटात योगदान दिलेलं आहे. त्याशिवायही अनेकार्थानं सहकार्य करणारेही आहेत - प्रीती केतकर, उर्मिला पुरंदरे, भारती पागे, वृषाली वैद्य, विद्या साताळकर, नीला आपटे आणि अनेक यामध्ये आहेत.

‘पालकनीती’ मासिक बाजारू जगापासून लांब होतं आणि आहेच, त्यामागचा हेतू - मुलं माणूसपणानं वाढावीत - इतका मूलगामी आणि साधा आहे. न्याय, ऋजुता, समता अशा मानवी मूल्यांवर या मासिकाची बैठक आधारलेली असावी हे सुरुवातीपासून मानलेलं तत्त्व या अनेकांनी त्याच वृत्तीनं स्वीकारलं. त्यात बदल झाला नाही.

सुरुवातीला चार पानी, तर पुढे १६-२० पानी पत्रिका हेच मासिकाचं स्वरूप होतं, अजूनही आहे. दिवाळीच्या निमित्तानं काढलेला जोडअंकच जरासा घसघशीत. समविचारी मासिकांमध्ये केलेल्या परस्पर जाहिराती सोडल्या, तर ‘पालकनीती’ची जाहिरात आजही कुठंही केली जात नाही. संपादक गटानं (तेव्हाच्या आणि आताच्याही) कधी मानधनापुरतेही पैसे घेतले नाहीत. दिवाळीअंकाशिवायच्या लेखकांनाही मानधन दिलं जात नाही. या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच, पण, आता तोट्यात जाईल, असं वाटून ‘पालकनीती मासिक बंद करावे’, अशी वेळ मात्र कधीही आली नाही. विशेष म्हणजे तेव्हापासून आत्तापर्यंत महिन्याचा अंक तयार झाला नाही, असा अपवादही घडलेला नाही. अशा प्रकारच्या मासिकासाठी ही अभिमानाची गोष्ट म्हणावी लागेल.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

सुरुवात जरी बहुशः एकीनं केली, तरी कुणी ना कुणी सुरुवातीपासून साहाय्याला आले. त्यांनी ‘पालकनीती’ हृदयाशी धरली. बंद पडू दिली नाही. उलट त्यातला अर्थ आपल्या कृतीला लावून, करत असलेल्या कुठल्याही कामामध्ये ऋजू न्यायबुद्धी ठेवली. ‘पालकनीती’चा अर्थ स्वतःसाठी आणि इतरांसाठीही स्पष्ट केला.

वाचकांची मोलाची साथही होतीच. कुणाची आयुष्यं सरळ रेषेवार तर कुठे दगडधोंड्यांची काट्याकुट्यांची वाट होती. लग्न, जोडीदार, मुलं, नोकरी यात कुणाला अडचणी होत्या, तर काहींना फारशा नव्हत्या. मूल वाढवताना अडचणी कधी जाणवल्या होत्या, कधी ‘पालकनीती’ वाचल्यावर त्यांची जाणीव झाली. आपण मूल जन्माला घालताना पुरेसा विचार केला होता का आणि समजा नसला केला तरी आता जन्माला घातल्यावर आपली जबाबदारी आहे ना, ती आपल्याला मुळातून कळलेली आहे का, आपण ती निभावतो आहोत का, असे प्रश्न अनेकांना पडत होते. त्यातून आपण आपल्या मुलांवर आणि त्याहून अधिक स्वतःवर आणि पर्यायानं सगळ्यांवरच अन्याय करतो आहोत, अशी जाणीव व्हायला लागे.

अशा वेळी ज्यांच्या हाती ‘पालकनीती’चा अंक पडला, त्यातून - आपलं जे हुकतंय असं वाटतंय, त्याच्या उत्तराची दिशा हे मासिक आपल्याला सांगतंय - असा विश्वास मिळाला आणि ते ‘पालकनीती’चे सगेसोयरे झाले. आम्हाला सर्वांनाही अनपेक्षित कौतुकाचं एक उदाहरण म्हणजे एका मैत्रिणीनं आपल्या स्त्रीधनाची वाटणी लेकीसुनांना करताना त्यात ‘पालकनीती’चाही वाटा गृहीत धरला.

कुणी म्हणालं, ‘‘ ‘पालकनीती’ वाचल्यामुळे माझं माझ्या मुलांशी असलेलं नातं फाटत का जातंय, हे समजलं आणि त्याला वेळेवर टाका कसा घालता येईल हेही माझ्या लक्षात आलं’’, ‘‘ ‘पालकनीती’ माझ्या आयुष्यात आलीच नसती, तर मी फार मोठ्या सुखा-आनंदाला मुकलो असतो.’’ आजवरच्या आयुष्यात स्वतःपुरतं पाहायला शिकलेली कुणी पालकनीती वाचून आपल्या पोराच्या वयाच्या आजूबाजूच्या चार-दहा पिल्लांना गोळा करून त्यांना चित्रं काढायला, पुस्तकं वाचायला, मातीत खेळायला आणू लागली... हेदेखील संचितच आहे.

‘पालकनीती’ला २५ वर्षं पूर्ण झाल्यावर, आता संपादक मंडळ बदलायला हवं, हे मासिक सुरू ठेवायचं, तर नव्या दमाचे, नव्या विचारांचे लोक यायला हवेत, असं संपादक मंडळाला वाटलं. मग एक प्रयोग म्हणून काही संस्थांनी जबाबदारी घेऊन पाहावी असा विचार झाला. याला प्रतिसाद म्हणून कमला निंबकर ‘बालभवन’ (२०१५) आणि ‘क्वेस्ट’ (२०१६) अशा दोन वेगळ्या मित्रसंस्थांनी प्रत्येकी एकेक वर्षं अंक तयार करण्याची जबाबदारी घेतली आणि अतिशय दमदारपणे निभावली. आता तर सहा-सात तरुण मित्रमैत्रिणींचा एक नवा-ताजा गट ‘पालकनीती’च्या संपादक मंडळात आला आहे. हे मासिक आवश्यकच आहे, ते सुरू ठेवायला हवं या उद्देशानं. ते पुण्यातले नाहीत इतकंच काय महाराष्ट्रातलेही आहेतच असं नाही, पण तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं त्यांचं काम निर्वेध सुरू आहे.

संपादक मंडळातील या बदलापूर्वीच्या, म्हणजे डिसेंबर २०१४पर्यंतच्या निवडक लेखांचं हे संकलन आहे. असं संकलन पुस्तकरूपात प्रकाशित करावं, ही सूचना अक्षरशः अनेकांकडून आली. त्यामध्ये आता आपल्यात नसलेल्या सदा डुम्बरे या संपादकमित्राचा विशेष आग्रह होता. त्यांचं म्हणणं होतं, ‘‘नवा गट येईल, पण आजपर्यंत झालेल्या कामाचंही खूप महत्त्व आहे. बदलत्या काळानुसार परिस्थिती काहीशी बदलेलही, पण ‘पालकनीती’नं हा विषय समाजसंवादात आणला, त्याबद्दल विचार करण्याची सवय लावली, ते आधीच्या काळातले लेख आजच्या वाचकांनाही आवश्यक आहेत, ते उपलब्ध असायला हवेत’’.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

सत्तावीस वर्षांच्या अंकांमधून लेखांची निवड करणं आमच्यासाठी मुळीच सोपं नव्हतं. आम्हाला ते जमतच नव्हतं. मग मुकुंद टाकसाळे या नामांकित लेखक मित्रानं, आणि ‘पालकनीती’च्या अगदी सुरुवातीपासूनच्या शुभचिंतकानं, लेखांच्या निवडीची जबाबदारी घेतली, ज्योत्स्ना प्रकाशनाच्या मिलिंद परांजपे यांनी त्यानंतरच्या छपाई-प्रकाशनाची जबाबदारी घेण्याचं मान्य केलं. केवळ त्यामुळेच हे काम तडीस गेलेलं आहे. त्यात मध्ये लॉकडाऊन वगैरे अडचणी आल्या, त्यामुळे बराच उशीर झाला. मुकुंद टाकसाळे आणि मिलिंद परांजपे यांचे मनापासून खूप आभार.

पालकांची नीती म्हणून पालकनीती, तर मग पालकत्व नेमकं कुणाचं असा प्रश्नन समोर येतो. सामान्यपणे ते आपल्या घरातल्या मुलाबाळांचं, असा अनेक जण मानतात ते खरंच आहे, पण पुरेसं नाही. आपल्या घराबाहेरच्या वास्तवात वावरणाऱ्या अनेक बालकांच्या पालकत्वाचीही जबाबदारी आपल्यावर असते. तेवढंच नाही, तर आपल्या सख्यासोबत्यांचेही आपण पालक असतो. मुख्य म्हणजे या धकाधकीच्या जीवनात परिस्थितीला शरण न जाता सशक्तपणे उभं राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या आपल्या प्रत्येकाचे, स्वतःचेही, पालक आपणच असतो. प्रौढ होण्याचा एक अर्थ आपलं पालकत्व आपलं आपल्याला घ्यावं लागतं असाही आहे, असं मला वाटतं.

‘पालकनीती’ची सुरुवात झाली, तेव्हा पालकत्व ह्या विषयावर सांगणारं, बोलणारं, आधाराला येणारं काही साहित्य उपलब्ध नसे, आज तशी परिस्थिती नाही. समाजसंवादात या विषयाला जागा मिळालेली आहे. त्याबरोबर अनेक नवे प्रश्न, तंत्रयंत्र, पर्यावरण, आजार, मानसिक समस्या अशा वेगवेगळ्या कारणांनी समोर उभे ठाकलेले आहेत. त्यामुळे ‘पालकनीती’ची आवश्यकता आजही असल्याचं नव्या गटानं या मासिकाची जबाबदारी घेताना मांडलं, ते पटण्यासारखं आहे. ‘पालकनीती’ ही एक वैचारिक चळवळ आहे, मात्र इतर चळवळींपेक्षा तिचं स्वरूप वेगळं आहे, ते संघर्षाचं नाही, जिव्हाळ्यातून आलेल्या जाणिवेचं आहे.

बालविकासाच्या आड येणाऱ्या रचना-व्यवस्था बदलवण्यासाठी संघर्षाची गरज पडतेही, पण मुख्यतः इथे आपल्याला संघर्ष करावा लागतो, तो आपल्याच मनाशी, आपल्या मनमानी वृत्तीशी किंवा परिस्थितीपुढे सवयीनं मान तुकवण्याशी. इथे हार-जीत आपल्याच हातात असते, त्यामुळे मनापासून प्रयत्न केले, तर यशाची निश्चित खात्री देणारा हा संघर्ष आपल्या अस्तित्वाच्या प्रवासात फार महत्त्वाचा असतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

मुलांचं शिकणं-वाढणं हे काही फक्त त्यांच्या त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंबाच्या परिघात मावत नाही. मूल घरात वाढतं, तसंच ते शाळेत, शेजारपाजाऱ्यांच्या सहवासात, नातेवाईक-मित्र-मैत्रिणींमध्ये असतानाही शिकत-वाढतच असतं आणि जसजसं मोठं होतं, तसतसं विस्तारलेल्या समाजगटांशी जोडलं जातं. त्यामुळेच पालकत्व निभावणं म्हणजे मुलांचं संगोपन, आरोग्य, आजारपण, शाळेत घालणं, शिस्त, वर्तन इतकं मर्यादित राहत नाही, राहू नये, यासाठी ‘पालकनीती’नं मुलाचं वाढणं समजावून घ्यायला आजवर मदत केली, पालकांना विचार करायला भाग पाडलं. तशीच मदत यापुढेही व्हायला हवी, यासाठी या संकलनाची तुम्हाला मदत होईल अशी आशा आहे.

या संकलनात आजवर ‘पालकनीती’त आलेले शिस्त, शिक्षा, स्पर्धा, आनंदशिक्षण, गुणवत्ता, लैंगिकतेची समज यासारखे मुलांच्या जीवनाशी थेट भिडणारे विषय दिसतील. आणि त्याचबरोबर सण-उत्सवांचे स्थान, साजरीकरणातून डोकावणारा चंगळवाद याचीही कारणमीमांसा सापडेल. लिंगाधारित भेदभावाच्या, जाती-धर्माच्या प्रश्नांना दिलेली स्त्री-पुरुष समतेच्या आणि सामाजिक न्याय-समतेच्या आग्रहाची उत्तरं वाचायला मिळतील. धार्मिक-राजकीय परिस्थितींवर केलेली टिप्पणी वाचायला मिळेल. पर्यावरण, स्त्रीवादी भूमिका, कला-साहित्य, वंचितांचे प्रश्न, अशा मुद्द्यांचा ऊहापोह केलेला आढळेल.

या विषयांचा संबंध पालक होण्याशी कसा काय लागतो, असा प्रश्न तुम्हाला हे पुस्तक वाचताना कदाचित पडेल, आम्हाला तो थेट विचारलाही गेला आहे. याचं उत्तर ‘पालकनीती’च्या ‘नीती’ या शब्दात सापडतं. मुलांच्या बौद्धिक, भावनिक विकासाचा विचार करताना तो नियमानुसार कायद्याच्या वाटेनं, असा आखीव असत नाही, तिथे नीती लागते. त्यावर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या वातावरणाचाही परिणाम असतो. तेव्हा त्या परिस्थितीची जाण आपल्याला ठेवावी लागते.

प्रत्येक पालक वेगळा, त्यांचे स्वभाव-आचार-विचार वेगळे, अनुभव वेगळे. त्यामुळे ‘पालकनीती’मध्ये वागणुकीचे काही संकेत सापडतील, दिशादर्शक - प्रसंगी तर्काधारित तत्त्वज्ञान असेल; पण सगळ्यांनी ‘अमुकच पद्धतीनं वागावं’, किंवा ‘मुलांशी वागताना पाळायच्या २१ गोष्टी’ अशा प्रकारांचा संपूर्ण अभाव दिसेल.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

इतक्या वर्षांत आपल्या सर्वांच्या भोवतालची परिस्थिती बदलत गेलेली आहे. तंत्रज्ञान वाढवाढून त्या सोबतीनं विचारांची दिशा, मानवी नात्यांचे संदर्भ, इतकंच काय आयुष्याची साफल्यकल्पना बदलली आहे, हे अगदी डोळ्यादेखत घडलं आहे. पण याच परिस्थितीकडे दुसऱ्या बाजूनं बघितलं तर ‘काहीएक बदललेलं नाही’ असंही आपल्याला दिसत आहे. मुलामुलींवर घरात शाळेत समाजात शारीरिक-मानसिक आक्रमण होतंच आहे, बोकाळलेल्या स्पर्धात्मकतेत टिकून राहण्यासाठी वेगळी वाट न काढता बुरे-भले मार्ग वापरले जात आहेत, धर्मजातींच्या आग्रहांचा मुद्दा लोक अजूनही सोडून देत नाहीयेत...

अशा परिस्थितीत ‘आपली वाट आपण कशी काढायची’ हे जाणून घ्यायला ‘पालकनीती’चा आश्वासक तरीही अनाग्रही आधार आजच्या पालकांसाठीही हाताशी असावा म्हणून या ‘निवडक पालकनीती’चा घाट घातला आहे.

आपल्या मनातल्या विचारांचा अवकाश नेमकेपणानं रचायला सोईचं पडावं, म्हणून या पुस्तकसंचात वेगवेगळे विभाग केलेले आहेत. मात्र एक गोष्ट आधीच सांगावीशी वाटते की, यात वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं असा विभाग नाही. उत्तरं अखेर आपली आपणच शोधायची असतात, नुसती शोधून पुरत नाही, तर निभवायचीही असतात. पण आजवरच्या अनुभवातून एक म्हणता येईल की, पालकत्वातल्या प्रश्नांच्या वाटेवर चालताना ‘पालकनीती’ एक मैत्रीण म्हणून निश्चित साथीला असेल.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

drsuvarnadandhya dhumal

Thu , 27 April 2023

सर ,महत्वाचे मासिक.फक्त आपल्या मुलांची नाही तर आजूबाजूच्या साऱ्या मुलांची आपल्यावर जबाबदारी असते.याच विचाराने सर्वांनी यात खारीचा वाटा उचलायला हवा. पालकनीतीच्या संपूर्ण team चे अभिनंदन!

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......