अजूनकाही
‘ओवळी’ हे विद्या प्रभू यांच्या ललितलेखांचं पुस्तक नुकतंच ग्रंथालीतर्फे प्रकाशित झालं आहे. ओवळी म्हणजे मालवणी मुलखातली मुलुखगिरी. या पुस्तकाला माजी शिक्षण सहसंचालक आणि कवी, समीक्षक रोहिदास पोटे यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश...
.................................................................................................................................................................
कोकणच्या भूमीचे कवी माधव यांनी फार सुंदर वर्णन केले आहे-
‘सह्याद्रीच्या तळी शोभते
हिरवे तळकोकण
राष्ट्रदेवीचे निसर्गनिर्मित
केवळ नंदनवन...’
अशा या नंदनवनात ‘ओवळी’ या पुस्तकाद्वारे आपल्याला घेऊन जात आहेत, लेखिका विद्या प्रभू. त्यातून त्या आपल्याला दक्षिण कोकणचे उत्कट दर्शन घडवतात. कोकण म्हटले की, सागरकिनारा, उंच माड, नारळी-पोफळीच्या बागा, हिरवेगार डोंगर, गर्द झाडी, तांबडी पायवाट, नागमोडी रस्ते अन् गर्द झाडीतून धावणारी लालपरी एस्.टी. हे विलोभनीय दृश्य पाहून मन तृप्त होते.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
विद्या प्रभू यांनी यापूर्वी ‘मालवणी भाषेतील म्हणी’, ‘अबोली’, ‘शब्दसौरभ’, ‘कोकणातील लोककथा आणि गजाली’ व ‘मालवणी भाषेतील वाक्प्रचार व हुमाणी’ अशी पाच पुस्तके लिहिली आहेत. या सर्व लेखनातून त्यांचे कोकणभूमीवरील उत्कट प्रेम व मालवणी बोलीविषयी आत्मीयता दिसून येते.
विद्या प्रभू या ‘शब्दप्रभू’ आहेत. ‘ओवळी’मधील लेख वाचल्यावर त्याची प्रचिती येते. रसिकता, एकरूपता, तादात्म्य व भावसौंदर्यवृत्ती इत्यादी गुण अंगी असल्याशिवाय असे लेखन करता येत नाही. कोकणला एक रूप आहे, एक रंग आहे, कोकणची एक प्रतिमा आहे. एक संस्कृती आहे. तेथील एक भाषा आहे. एक बोली आहे. तेथील जीवनाची एक रीत आहे. तेथील जीवनाचे एक गीत आहे. एक पद्धती आहे. आहार-विहार व आचार-विचार यांचा एक बाज आहे. कोकणी माणसाच्या स्वभावात एक साज आहे. त्यांची एक शिस्त आहे. एकूणच त्यांच्या जीवनशैलीत एक रंग आहे. तेथील निसर्गामुळे जगण्यात एक चैतन्य निर्माण होते.
कोकणचा समुद्रकिनारा, मासेमारी, ताड-माड व पोफळी, काजू, करवंदे, रातंबा अशी निसर्गाची देणगी. कोकणचा आंबा म्हणजे फळांचा राजा. हापूसची तर जगप्रसिद्धी. फणसाची गोडी. कापा व बरका, या दोन्हींची अनोखी चव. काटेरी फणस, मात्र आतील गोड गोड गरे अन् शहाळ्यांचा थंडावा, फणसासारखा कोकणी माणूस.
अशा या कोकणभूमीविषयी विद्या प्रभू यांनी या पुस्तकातून सतरा लेखांद्वारे कोकणी माणूस, निसर्ग, पाने, फुले, बोली आणि भात व मासे असे विविधरंगी, विविध ढंगी मार्मिक वर्णन केले आहे. ‘ओवळी’ म्हणजे ‘बकुळी’. लेखिकेच्या मनाच्या ओवरीतील ही ओवळी म्हणजे हळुवार भावनांचा सुंदर निसर्गआविष्कार. बकुळीच्या फुलांचे रंग, गंध, रूप आणि दरवळ यांतून सुंदर भाव चित्रित केले आहेत.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
यात पहिला लेख ‘ओवळी’ आहे. यातून बकुळीचे चित्रण करताना आपल्या कल्पनाशक्तीने वैशिष्ट्यपूर्ण चित्र साकार केले आहे. सौंदर्यानुभूतीने भरलेली ओंजळ रिती करताना त्यातून गंध दरवळतो आहे. त्या गंधाने रसिक वाचक तृप्त होऊन जातो. विद्या प्रभू यांना निसर्गाचा ध्यास व पाना-फुलांचा हव्यास आहे. त्या निसर्गाने झपाटून गेल्या आहेत. बकुळीच्या रंग, रूप व गंध या त्रिमितीत एक भावसरगम निर्माण केला आहे. हा बकुळ फुलांचा शब्दझुला अन् शब्दगंधातला भाव रेखाटला आहे. विद्यार्थ्याने दिलेले ‘ओवळी’चे रोप पाहून लेखिकेच्या मनात अनेक आठवणींची गर्दी जमली. भूत व वर्तमान यांची सांगड घालत त्या चित्रणात एक रंगत निर्माण करतात. बकुळीच्या झाडाचे/बकुळ फुलांचे सुरेख चित्र रेखाटताना त्या लिहितात-
“बकुळीचं फूल साधारण पंधरा-सोळा पाकळ्यांचं, सुरेख आणि सुवासिक. इतकं रेखीव फूल बहुधा दुसरं नसावं. पाकळ्या मुळाशी किंचित रुंद, पण पुढे निमुळत्या होत शेवटी टोकदार झालेल्या. फुलणं सांजवेळेला. तेव्हापासून फुलून रात्रभर भुईवर उतरणं चाललेलं. फुलताना थोडी पांढुरकी छटा, पण जसजसा वेळ जातो, तशी ती थोडी बदलते आणि फुलं मातट दिसू लागतात. मात्र, त्यांच्या सुवासाला ढळ पोहोचत नाही. पुढे फुलं सुकली तरी, गंध त्यांची साथ सोबत सोडीत नाही.”
इतकं सुंदर वर्णन फक्त विद्या प्रभूच करू शकतात. हे सगळे वाचताना ओवळीचा गंध मनात दरवळत राहता. अन् मन कसे आतून फुलून येते, उमलून येते, जणू काही बकुळफुलांचा वर्षाव आपल्या अंगावरच होत आहे. मग काय? घमघमाट!
‘खालाटची बाय’ या दुसऱ्या लेखात त्या वलाटी-खालाटीचा केवळ अर्थ सांगून थांबत नाहीत, तर मालवणी बोलीतच एक सुंदर उखाणा सांगून लोकसाहित्य व लोकसंस्कृतीचे दर्शन घडवतात-
‘वलाटचो बाबा खालाटची बाय।
बावाक बाय रेटीत जाय ।।’
‘वलाटी’ म्हणजे समुद्रापासून थोडा दूर चढणीचा, सह्याद्रीच्या पायथ्याकडचा प्रदेश. तर समुद्रकिनाऱ्याच्या गावांना ‘खालाटी’ म्हणतात. वलाटीला मुख्यतः भात पिकतं म्हणून ‘वलाटचो बाबा’ म्हणजे तांदळाचा भात. तर खालाटीला मासळी मिळते, म्हणून ती ‘खालाटची बाय’. भात (पुरुष) आणि मासळी (स्त्री) या आधारे लोकांनी बाबा आणि बाय अशी छान जोडी जमवली. खालाटच्या बायची हुकूमत अशी की, ती वलाटच्या बाबाला घशाखाली भराभर लोटीत राहते! म्हणजे माशामुळे भाताचे घास पटकन घशाखाली उतरतात. लेखिका एवढेच सांगून थांबत नाहीत, तर इरडाची चटणी, पेडव्याचं तिकलं, बांगड्याची उडदामेथी यांच्या रेसिपी उत्तमरित्या सांगतात. खाऱ्या पाण्यातील व गोड्या पाण्यातील माशांची एक यादीच त्या देतात. रेसिपी व माशांची नावे वाचून तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
‘तारली व्हकाल आणि बांगडो न्हवरो’ हा लेख एका लोकगीताचा संदर्भ घेऊन लिहिला आहे. यात माशांचे लग्न कसे लागते, याचे रसभरीत वर्णन आहे. ‘तारली’ नवरी व ‘बांगडा’ नवरा, असे हे अफलातून लग्न. या शीर्षकातच काव्य आहे. लग्नात माशांची लगीनघाई, प्रत्येकाने आपापली जबाबदारी कशी पार पाडली, हे वाचणे म्हणजे एक पर्वणीच आहे. लेखिकेची कल्पनाशक्ती वाचकांना खिळवून ठेवते. रीतिरिवाज व लोकपरंपरेचा लेखिका समर्थपणे उपयोग करते. हा लेख अतिशय सुंदर झाला आहे, तो मुळातून वाचणेच महत्त्वाचे.
‘मालवणी मराठीची एक समृद्ध आणि चैतन्यपूर्ण बोली’ या लेखात मालवणी शब्द, म्हणी, वाक्प्रचार यांचा सुलभतेने परिचय करून दिला आहे. मालवणी बोलीची भाषिक वैशिष्ट्ये व तिचा लहेजा यांचे विशिष्ट ढंगातील विवेचन मनात घर करून जाते. विद्या प्रभू मुळात शिक्षिका व मुख्याध्यापिका आहेत. त्यात त्या भाषेच्या शिक्षिका. त्यामुळे त्यांनी मालवणी बोलीचे वैभव व समृद्धी तर सांगितली आहेच, शिवाय व्याकरणिक विवेचनही अभ्यासपूर्ण केले आहे.
‘मत्स्यसूक्त’ या लेखात त्यांचे भाषिक कौशल्य दिसून येते. माशांवरून पडलेल्या म्हणी व वाक्प्रचार यांचे विलोभनीय दर्शन त्यांनी घडवले आहे. मालवणी बोली किती समृद्ध आहे, याचा प्रत्यय येतो. तिच्यातला गोडवा लळा, जिव्हाळा निर्माण करतो. इतरांनाही ती ऐकतच राहावी असे वाटते. ‘आचार्यदेवो भव’ यात गुरुप्रेम व गुरुभक्ती सांगून कृतज्ञता व्यक्त केली आहे.
‘गजाल लोकवाङ्मयाचा एक प्रकार’ या लेखात गजालीचे स्वरूप व तिची खासीयत यांची समर्पक शब्दांत महती सांगितली आहे. ‘जिवाभावाची चवथ’ या लेखात गणेशोत्सवाचे भक्तिभावाने वर्णन केले आहे. ‘गोष्ट एका छत्रीची’मध्ये हरवलेल्या/ विसरलेल्या छत्रीवरून सुंदर ‘छत्रीपुराण’ कथन केले आहे. ‘गटारी की दीपअमावास्या’ या लेखात आषाढ अमावास्येला ‘गटारी’ का म्हणतात हे सांगून दीपपूजनाचे महत्त्व विशद केले आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
‘एक तरी वारी अनुभवावी’ व ‘आठवणीतला सप्ता आणि त्याचं लळीत’ या दोन्ही लेखांत भक्ती व नामस्मरण माहात्म्य कथन केले आहे. त्यातून लोकसंस्कृती व अध्यात्म यांची एकरूपता सुंदरपणे व्यक्त केली आहे. ‘आज धयकाल्याचा दिस’ या लेखातून लोककलेचे सुंदर दर्शन घडवले आहे.
या सतरा लेखांतून अत्तराची शिंपणी केली आहे. त्यात भाव आहे. गंध आहे. संस्कृती आहे. स्वाद आहे. आस्वाद आहे. लोक आहेत, लोकांचे छंद आहेत. त्यांच्या मनाचे विविध कंगोरे आहेत. मालवणी बोली आहे. मालवणी माणूस आहे. त्या बोलीचे व माणसांचे स्वभावविशेष आहेत. लेखिकेचा भाषिक अभ्यास आहे. वाचनाचा व्यासंग आहे. लोकसाहित्य व लोककलेची उत्तम जाण आहे. तांबड्या मातीचा गुण आहे. जन्मभूमीचे ऋण आहे. त्यातून निर्माण झालेला लळा, जिव्हाळा आहे.
विद्या प्रभू या विद्याव्यासंगी, त्यामुळे त्यांच्या शब्दांत लय आहे. शब्दांच्या अर्थात सौंदर्य आहे. भूत व वर्तमानाची सांगड घालून त्या एखादा विषय वाचकांना रसिकांना यथार्थ सांगतात. त्यात केवळ रुक्ष माहिती नसते, तर वर्ण्य विषयातून आनंद व चैतन्य ओसंडून वाहते. ही अभिनव कला त्यांच्या लेखणीत आहे. विद्या प्रभू यांची लेखणी अशी हिकमती व देखणी आहे. त्यातूनच त्यांच्या लेखनाचा साज आणि बाज ठरतो. विषयाचा तोल आणि ताल त्या सांभाळतात. त्यातून एक भावसरगम तयार होते.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
‘ओवळी’ म्हणजे मालवणी मुलखातील मुलुखगिरी आहे. निसर्गाचे सूक्ष्म निरीक्षण, निरीक्षणातून जीवनचिंतन, तत्त्वचिंतन व अभिव्यक्तीतील अचूकता यामुळे त्यांच्या लेखनाला एक धार प्राप्त होते, ती वाचकांच्या काळजात आरपार जाते. एखादे स्तोत्र ऐकावे आणि ब्रह्मानंदी समाधी लागावी, असे वाचल्यानंतर रसिक भारावून तर जाईलच, परंतु त्याला ब्रह्मानंद मिळाल्याशिवाय राहणार नाही.
लेखिकेची भाषाशैली साधी, सोपी आणि सुगम आहे. त्यात नावीन्याचा उगम आहे. शब्दांची व वाक्यांची आतषबाजी नाही, मात्र नेमकेपणाने वर्ण्य विषयाची नस पकडण्याचे कसब लेखिकेकडे आहे. भाषेत गोडवा आहे. चैतन्य आहे. रसिकता आणि औचित्य यांचा सुरेख संगम झाला असल्याने वास्तव व कल्पना एकमेकांच्या बरोबरीने कलाकृतीचे सौंदर्य वाढवतात. साहित्यिक लिहितो व एखादी साहित्यकृती हातावेगळी करतो तेव्हा ती स्वतंत्र व स्वायत्त बनते. तिला स्वतःचे असे व्यक्तिमत्त्व मिळते.
‘ओवळी’ला असे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व लाभले आहे. अशी साहित्यकृती सर्वांची होऊन जाते. तिचा लेखकाशी काही संबध राहत नाही. कलाकृतीचे हे स्वतंत्र अस्तित्वच तिचा दर्जा ठरवत असते. या दृष्टीने ‘ओवळी’ ही मालवणी मुलखाची एक वेगळी धाटणी असलेली साहित्यकृती आहे.
‘ओवळी’ – विद्या प्रभू | ग्रंथाली, मुंबई | पाने – २८० | मूल्य – ३५० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment