मी स्वतःला लेखक, कवी, नाटककार मानतो, पण आपण किती खुजे आहोत, हे पहिल्यांदाच मला त्या सर्वोच्च शिखरावर उभे असताना लक्षात आले...
ग्रंथनामा - झलक
प्रल्हाद जाधव
  • ‘हिमाक्षरे’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ... पाठीमागे हिमालय...
  • Sat , 15 April 2023
  • ग्रंथनामा झलक हिमाक्षरे Himakshare प्रल्हाद जाधव Pralhad Jadhav हिमालय Himalaya

जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि लढाखमधील भ्रमंती तसेच गिर्यारोहणाचे अनुभव ललितरम्य स्वरूपात व्यक्त करणारे माजी माहिती संचालक, ललितलेखक आणि नाटककार प्रल्हाद जाधव यांचे ‘हिमाक्षरे’ हे पुस्तक नुकतेच ग्रंथालीने प्रकाशित केले आहे. ‘ट्रॅव्हलॉग’ आणि ‘ट्रॅव्हल लिटरेचर’ यांचा अनोखा संगम असणारे हे एक आगळे पुस्तक म्हणता येईल. त्यातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश…

.................................................................................................................................................................

सकाळ झाली. बाहेर आलो. आजूबाजूला बागिनीचे विस्तीर्ण पात्र. तिच्या वाहत्या पाण्याचा धीरगंभीर आवाज. वर अथांग निळे आकाश. पूर्वेच्या क्षितिजापाशी ढगांची गर्दी. त्यातून गाळून खाली येणारे विविधरंगी प्रकाशकिरण. हवेच्या शीतल झुळुका. स्वप्नात आहोत की काय असे क्षणभर वाटले. थोड्या वेळाने तोंड धुण्यासाठी छोट्या छोट्या टबमधून गरम पाणी आले. पुढच्या सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे शिस्तीत पार पडल्या. अभी आणि जितेंद्र बाजूला एका उंचवट्यावर बसून फोटोग्राफी करण्यात गुंतले. क्षितिजापाशी ढग आणि सूर्यकिरण यांच्यात जणू लपाछपीचा खेळ सुरू होता. अशा घडामोडींचे क्षण कॅमेऱ्यात कैद करताना जितेंद्र नेहमी म्हणायचा, ‘उधर बहुत बडा ड्रामा चल रहा हैं.’ मला त्याचे हे वाक्य खूप आवडायचे. कारण खरोखर निसर्गात क्षणोक्षणी वेगवेगळ्या घटना-प्रसंगाचे महानाट्य सुरू असायचे.

चहापान आटपून सारे ‘गरुड बेस-कॅम्प’च्या दिशेने रवाना झालो. ही रोजची भटकंती आता जणू सवयीचा भाग झाली होती. आज पुढे काय वाढून ठेवले आहे याची नेमकी कल्पना नव्हती. पण ‘खडतर परिश्रमास पर्याय नाही’, याचा अंदाज आला होता. यतीन म्हणाला ‘आता पुढे खडी चढण नाही, फक्त नदीतून वर वर चालत जायचे आहे’. हे ऐकून हायसे वाटले. पण प्रत्यक्ष प्रवासाला सुरुवात केली, तेव्हा छोटी-मोठी टेकाडे, उभे-आडवे भूभाग पार करत आम्हाला वर जावे लागत होते. प्रत्येक टप्पा नवनवे आव्हान उभे करत होता. अनेक ठिकाणी रस्ता असा नव्हताच. नीट जागा शोधून तेथे पाऊल ठेवायचे आणि मग पुढचे पाऊल उचलायचे. या पद्धतीने सहा-सात तास चालावे लागणार आहे, याची आधी नीट कल्पना आली नव्हती.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

चालताना मी आणि रेखा एकमेकांच्या काळजीपोटी सर्वांत शेवटी आणि यतीन आमच्या काळजीपोटी आमच्या मागे असायचा. त्याच्याशी माझ्या अधूनमधून गप्पा सुरू असायच्या. अशा ठिकाणी बडबड न करता शांत राहणे शहाणपणाचे असते, पण माझ्यातील ऊर्जा मला स्वस्थ बसू देत नसे.

नदीच्या दोन्ही अंगांनी आणि पात्रात सर्वत्र लहान-मोठे दगड-गोटे, खडी, वाळूचे ढिगारे. ऊन, थंडी, पाऊस आणि हिमाच्या परस्पर विरोधी टोकदार माऱ्याने स्थितप्रज्ञ होऊन वेडेवाकडे पडलेले शिलाखंड. तांब्याचे आणि चांदीचे रंग अंगावर मिरवणारे अगणित दगड-धोंडे-माती. त्यांच्यावर पडलेले ऊन अधूनमधून परावर्तित व्हायचे. ती चमक नजरेत भरत राहायची, कधी खुपायची!

कित्येक लाख वर्षांपूर्वी सृष्टीमध्ये झालेला उत्पात, त्यातून जन्माला आलेली ही दुनिया. हिमालयाचा जन्म झाला तेव्हा वर आलेला हा समुद्रतळ. त्यातच अवशेषरूपाने आपल्या आठवणी ठेवून गेलेले विविध प्रकारचे जिवाश्म. भूगर्भातून वर आलेली दगड-माती-खडकांची, इंच इंच सरकत राहणाऱ्या बर्फ-कड्यांनी आजूबाजूला ढकलून दिलेली किंवा खाली वाहून नेलेली आदिम दुनिया... आणि या सगळ्या उदध्वस्त धर्मशाळेतही जीवनसातत्याचा संदेश देणारी सुंदर सुंदर फुले. छोटी छोटी रंगीबेरंगी झुडपे, वेली, पाणी धरून ठेवणाऱ्या जाड पानांच्या चिवट काटेरी वनस्पती. चिकाटीने जगण्याचा संदेश देणारे, उत्पत्ती स्थिती आणि लय यांचे एकाच दृष्टिक्षेपात घडणारे लालस दर्शन. आयुष्याविषयी खूप काही शिकवून जाणारे आणि त्याचवेळी माणसाच्या क्षुद्रत्वाची जाणीव करून देणारे! 

चालता चालता कधी मी स्वतःच्या आतही खोल खोल जात होतो. पुन्हा बाहेर येत होतो. आजूबाजूची विविध रंगांची, विविध आकारांची फुले मनावर गारुड करत होती. कधी एकटी-दुकटी तर कधी समूहाने फुललेली. कधी एका रांगेत, कधी गोलाकार, कधी नागमोडी, कधी चौकोनी, कधी त्रिकोणी अशा मुक्त अवस्थेत आविष्कृत होणारी... मंत्रमुग्ध करून टाकणारे असे हजारो-लाखो क्षण सोबत करत होते. एका गोलाकार दगडाच्या भोवती अंबाड्यावर वेणी माळावी तशी निसर्गाने पिवळ्या फुलांची एक वेणी माळली होती. क्षणभर तेथे थांबलो, ते रूप डोळ्यात साठवून घेतले... ठिकठिकाणी वेगवेगळ्या फुलांचे गुच्छ डोलत होते. जणू आमचे स्वागत करत होते. पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ होता का? जमिनीतून जणू ओसंडून वर यावा तसा एक गुच्छ एकदम समोर आला. डोलू लागला, जणू काही तो माझ्यासाठीच जन्माला आला होता. मी मंत्रमुग्ध होऊन त्याला ‘हाय’ केले...

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

वेगवेगळ्या रंगांची, वेगवेगळ्या आकाराची फुले मी पाहत होतो. त्यांच्याशी बोलत होतो. ‘तुम्ही छान आहात, सुंदर आहात, मला आनंद दिलात. मी तुमचा आभारी आहे थँक्यू सो मच’, असे मी त्यांना सांगत होतो. एकहार्ट टोले यांनी म्हटले आहे की, ‘तुम्ही पहात असलेल्या फुलाला जरूर सांगा ते किती सुंदर आहे; नाहीतर त्याला ते कोण सांगणार?’ आनंद हा मुक्कामाच्या ठिकाणी असतो की, प्रवासाच्या मार्गावरच शोधायचा असतो? मी मलाच प्रश्न करत होतो आणि त्याची उत्तरे शोधत होतो.

वर जाताना, खाली उतरताना, वळताना, तोल सावरताना, फुलापानांची निरीक्षणे करताना, डोंगरदर्‍या नजरेत साठवून घेताना मी जणू निसर्गाचाच एक भाग होऊन गेलो होतो. कधी उन्हाचे चटके, कधी प्रसन्न हवेच्या झुळका, कधी भौतिकाचे विस्मयचकित करणारे दर्शन, तर कधी अलौकिकाचा भास आणि सोबत ती खडतर रपेट. शरीराची आणि मनाची जणू झाडाझडती घेतली जात होती.

गंमत म्हणजे शरीरात अनावश्यक वाढ झालेल्या अनेक ग्रंथी या प्रवासात आपोआप विरघळून गेल्या. मनातील जळमटे निघाली. सगळे कानेकोपरे कळत-नकळत स्वच्छ होत गेले. मनातील मृतप्राय संवेदनांचे तळ लख्ख झाले. आतील पाझर पुन्हा मोकळे झाले. मुक्त, मोकळे, स्वतंत्र वाटायला लागले. ओठावर चक्क गाणी येऊ लागली. मी काही गायक नाही. सूर-तालाचे मला ज्ञान नाही. तरीही मी गाऊ लागलो. मला कोणी थांबवू शकत नव्हते. सुचतील ती गाणी मी प्रसन्नचित्ताने म्हणत, त्यांची मजा घेत चालत होतो… काही ठरावीक ओळी हट्टाने पुनःपुन्हा ओठी येत होत्या. ‘गा विहगानो माझ्यासंगे, सुरावरी हा जीव तरंगे…’ ही त्यातलीच एक. ‘या भवनातील गीत पुराणे…’ ही दुसरी.

मध्येच मी एकदम कुमारांच्या भजनांकडे खेचला जात होतो. ‘गगन मे आवाज हो रही हैं झिनी झिनी’ आणि ‘अवधूता, गगन घटा गहरानी रे ऽऽऽ’ या ओळींनी जणू माझा ताबा घेतला होता. यामागे कसले काही संदर्भ नव्हते की, काही तर्कशास्त्र नव्हते. पण जे सुचेल ते मी म्हणत होतो. खरे तर त्या क्षणी मला कुणाची फिकीरसुद्धा वाटत नव्हती. मी स्वतःवर खूश होतो. मधूनच पानाफुलांशी बोलत होतो. त्या क्षणी माझा तो सहजोद्गार होता. त्या क्षणी मी फक्त माझा होतो. जणू मी मला सापडलो होतो...

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

लहान-मोठे चढउतार पार करता करता जीव अगदी मेटाकुटीला आला. युगानुयुगे चालतच आहोत असे वाटत होते.करता करता एका शिखरमाथ्याशी म्हणजे अर्थातच पुढील नव्या शिखराच्या पायथ्याशी 'बंगाली बेस कॅम्प'वर पोहोचलो. सभोवती उंच उंच शिखरे. मधील खोलगट भागात पाच-पन्नास माणसे बसू शकतील, अशा तऱ्हेची सपाट जागा. दूरवर खाली कुठेतरी पाण्याची सोय. त्यामुळे गिर्यारोहक येथे कॅम्प लावणे पसंत करतात. तेथे सर्वांनी आडवे होणे पसंत केले. जागा मिळेल तिथे पाठ-पिशवी उशाखाली घेऊन, तोंडावर रूमाल टाकून प्रत्येकजण आडवा झाला. ऊन मी म्हणत होते. चटके बसत होते.

थोडी विश्रांती झाली, पण फार वेळ बसून चालणार नव्हते. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा होता. क्षितिजाजवळची पर्वतरांग खुणावत होती. तेथून निघताना आठवण म्हणून चेंडूएवढा एक पांढराशुभ्र जड दगड मी सोबत घेतला. दगड कसला एक प्रकारचा धातूचा गोळाच तो!

आपण पैशांच्या श्रीमंतीसाठी जगतो की अनुभवाच्या हे एकदा ठरवून घेणे प्रत्येकासाठी आवश्यक असते. मागे लडाखला गेलो असता सिंधू नदीच्या भारतातील प्रवेशस्थळी आम्ही सारे थांबलो होतो. तेथून निघताना अनेकांनी त्या नदीतील छोटेमोठे रंगीबेरंगी दगड आठवण म्हणून सोबत घेतले. दगड ही आठवण असू शकते का? का नाही? इतरांसाठी ते दगड असतील, पण जो तेथे जाऊन आला आहे त्यासाठी ती लाख मोलाची आठवण असते! तो दगड त्याच्यासाठी रत्नाच्या मोलाचा. अनुभवांची श्रीमंती म्हणतात ती हीच! ती कधी पैशांनी मोजता येत नाही.

पुढे निघण्याची वेळ झाली. ‘छोटी छोटी पावले उचलत चाला म्हणजे दम लागणार नाही’, असे यतीन सांगत होता. पण ते तंत्र काही अंगवळणी पडत नव्हते. दगड-धोंड्यातून चालताना पाऊले वेडीवाकडी पडत होती. शेवटी शेवटी तर एखादे पाऊल उचलणेही अवघड झाले. कमरेपासून आपण लुळे झालो आहोत की काय, अशी स्थिती झाली. दोन्ही हातांनी एक पाय उचलावा आणि पुढे ठेवावा, मग दुसरा उचलावा आणि पुढे ठेवावा अशी वेळ आली. आमची ही अवस्था बघून यतीन म्हणायचा ‘आता अगदी थोडे राहिले’, पण थोडे या शब्दाला तिथे काहीच अर्थ राहत नाही, हे आजवरच्या अनुभवावरून आधीच लक्षात आले होते. जवळ वाटणारे ते ‘थोडे अंतर’ कायम पुढे पुढेच सरकत असते आणि जीवनाचा प्रवाससुद्धा असाच नाही का?

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

एवरेस्टवीरांच्या अनेक आठवणी मी वाचल्या आहेत. त्यांच्या चित्रफिती पाहिल्या आहेत. वर अखेरच्या टप्प्यात हिलरी-स्टेपजवळ पोचल्यानंतर शब्दशः एक पाऊल उचलायचे, थांबायचे, श्वास घ्यायचा. दुसरे पाऊल उचलायचे, थांबायचे, श्वास घ्यायचा... अशा पद्धतीने चालावे लागते. एव्हाना आमचीही अगदी तशीच स्थिती झाली होती. पण हिम्मत गोळा करत, धडपडत, फरपटत अखेर कॅम्पवर पोहोचलो. शिखरावरचा एक छोटासा गवताळ-ओला, भाग देबूने कॅम्पसाठी निवडला होता. उजव्या हाताला दगड-मातीचा एक मोठा ढिगारा.

मी चंदेरी दगड-मातीच्या त्या ढिगाऱ्यावर बसून राहिलो. अंगातील सारे त्राण नाहीसे झाले होते. खाली पाहिले, तर दरीच्या तळाशी पाचूच्या रंगाचे पाणी साठलेले. एकाग्रचित्त होऊन त्या पाण्याला मी जणू नजरेने स्पर्श केला... ‘पाहताना फक्त पहायचे, ऐकताना फक्त ऐकायचे...’ हेच वर्तमानात राहणे... समाधी-अवस्थेत गेलो. तोवर तंबू लागले होते. चहापान तयार होते. काहीतरी गरम गरम खाल्ले चहा घेतली. पुन्हा तरतरी, पुन्हा हुरूप, पुन्हा नवे चैतन्य, पुन्हा नवे शिखर गाठण्याची आस…

आता आम्ही समुद्रसपाटीपासून पंधरा हजार फूट उंचीवर आलो होतो. आम्हाला गाठावयाचे बागिनीतील सर्वोच्च शिखर मात्र वरच्या बाजूला अजून थोडे दूर होते. जवळपास तीनशे फुटांचे अंतर चढून जायचे होते. पण ते तीनशे फूट म्हणजे भूगोलाच्या पुस्तकातील एखादे पान उलटण्याइतके सोपे नव्हते. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे आज येथे मुक्काम करून, विश्रांती घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी तेथे जायचे होते. पण अमित आणि त्याच्या मित्रांनी आजच तिकडे जाऊन येऊया अशी सूचना केली. कारण पूर्ण संध्याकाळ हाताशी रिकामी होती. तिथे जाऊन यायला दीड-दोन तास लागणार होते.

एवढा वेळ येथे बसून राहण्यापेक्षा वर जावे, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी ‘गरूड कॅम्प’वरूनच परतीचा प्रवास सुरू करता येईल, असा निर्णय झाला. तो योग्यही होता. कारण पुन्हा एकदा द्रोणागिरी येथील ती भयंकर दरी उतरून जायची कल्पना छातीवर दडपण आणत होती. थोडा मोकळा वेळ हाताशी असणे सर्वांच्याच हिताचे होते. मग साऱ्यांनी वर जाण्याची तयारी सुरू केली. महिलावर्गाच्या उत्साहाचा कणा पूर्णपणे मोडून पडला होता. आता आणखी पुढे जाणे म्हणजे आगीतून फुफाट्यात पडण्यासारखे आहे, असे त्यांना वाटत होते. कॅम्पवर थांबणे त्यांनी पसंत केले. आम्ही पुढे निघालो.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

पुढील चढाईचे नेतृत्व देबूने आता बिपिनकडे सोपवले होते. तोही जिद्दीचा आणि तयारीचा लीडर. बर्फ फोडण्याची कुऱ्हाड (आईस सॅक) दोरखंडाचे एक वेटोळे आणि दोन सहाय्यक मदतीला घेऊन तो पुढे निघाला. त्याच्यामागून आम्ही निघालो. आता मी ‘चद्दर ट्रेक’साठी घेतलेला ओव्हरकोट घातला होता. त्याला डोक्यावरून घालायचे टोपरे जोडलेले होते. पाऊस आणि हिमवृष्टी झाल्यास त्यापासून आता माझे नीट रक्षण होणार होते. हळूहळू सारे वर निघालो. दिशा अंधारून आल्या होत्या. पाऊस पडत होता, पण आता थांबायला वेळ नव्हता. हिमनदी आणि मोरेन अशा दोन्हींचे मिश्रण असणाऱ्या तिरप्या तीव्र डोंगर उतारावरून पुढे पुढे सरकत, वाहणारे नाले, ओहोळ पार करत शेवटच्या टप्प्यात प्रवेश केला. तेथे समोर ते शेवटचे सुमारे शंभर फुटाचे उंच टेकाड खुणावू लागले. त्यावर पोचायचे होते. तिथे आमच्या चढाईचा पूर्णविराम होणार होता. हौशी गिर्यारोहकांसाठी बागिनि ग्लेशियर्सचा एका अर्थी तो ‘डेड एंड’ होता. 

हवेतील प्राणवायू कमी झाल्याचे स्पष्टपणे जाणवत होते श्वासोश्वासाची गती वाढली होती, नाका-तोंडातून वाफा बाहेर पडताना ‘दिसत’ होत्या. दर दोन-चार पावल्यानंतर थांबावे लागत होते. एकेक पाऊल उचलणे कठीण जात होते. कोणीतरी एक अज्ञात शक्ती हळूहळू पुढे खेचत नेत असल्यासारखे आम्ही वरवर चाललो होतो. त्या शिखरावर पोहोचणे हा जणू जन्म-मरणाचा प्रश्न झाला होता. आम्हाला ते शिखर ‘सर’ करायचे नव्हते तर गाठायचे होते. निसर्गात काही सर करू पाहणे हा मूर्खपणा तर नम्रपणे त्याला सामोरे जाणे हा शहाणपणा… पण तेही का? कशासाठी? काय प्राप्त होणार होते त्यामुळे? एका एव्हरेस्टवीराला कोणीतरी प्रश्न विचारला, तुम्ही त्या शिखरावर का गेलात? तर त्याने एवढेच उत्तर दिले की, ‘ते तेथे आहे म्हणून!’

वर चढण्यासाठी रस्ता असा नव्हताच. पाऊल ठेवण्यापुरती जागा शोधून तेथे पाऊल ठेवत वर जायचे एवढेच हाती होते. शरीर आणि मन जणू बधिर झाले होते. धडपडत, घसरत, बसत-उठत, सरकत-सरकत वर निघालो. पाऊस होताच त्यात वाराही तुफान सुटलेला. सर्वांत शेवटी मी आणि माझ्या मागे यतीन. आणि अखेर एका क्षणी वर पोहोचलो. येस, ‘जितम् मया…’ १५०९३ फूट! त्या अस्पर्श कुवार माथ्यावर स्वतःला झोकून दिले. पुन्हा उठलो. अंगात नवा जोम संचारला होता… मला एकदम आनंदाचे भरते आले. मी नाचायचा बाकी राहिलो. खूप एक्साईट झालो होतो. आयुष्यातील एक स्वप्न पूर्ण झाले होते. गाडीत बसून यापूर्वी यापेक्षा अधिक उंच शिखरांवर गेलो होतो. पण त्यात अशी मजा नव्हती, स्वतःचे कर्तृत्व काही नव्हते. रुईंगपासून सुमारे आठ हजार फूट चढत चढत वरती येणे, हे एक वेगळेच साहस होते… वर पंधरा-वीस जणांना सामावून घेईल एवढी हत्तीच्या पाठीसारखी सपाट जागा होती

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

अभीने पिशवीतून तिरंगा काढला. एकेकाने तो हातात घेऊन फडकवला. सर्वांनी उस्फूर्तपणे राष्ट्रगीत म्हटले. आता ते केवळ राष्ट्रगीत नव्हते तर आमच्या आत्मशोधाचे, आमच्यातील ध्येयासक्तीचे, आमच्यातील ‘अनंत-आशे’च्या अम्लान निर्झराचे प्रतीक ठरले होते. 

मी वर पाहिले. काळ्या-पांढऱ्या ढगांनी भरलेले अथांग आकाश. ढगांच्या मागे हात धुवून लागल्यासारखी तुफानी हवा. दूरवर नजरेच्या टप्प्यात सगळीकडे पसरलेला बर्फ. समोर दुणागिरी, चांगभांग आणि कलंका यांची गगनचुंबी शिखरे. खाली खोल खोल दरी. दरीत अधूनमधून साठलेले पाचूच्या रंगाचे हिमजल.

४० ते ५० लाख वर्षांपूर्वी भारत आणि तिबेट यांचे भूस्तर सरकत सरकत एकमेकांवर आदळले. त्यांच्या त्या गळाभेटीत दोघांच्याही मध्ये असणारा सागरतळ वर उचलला गेला आणि शिखरांच्या स्वरूपात भूमीवर आला. लक्षावधी वर्षांपूर्वीचे दगडधोंडे, वाळू, माती, जीवाश्म, जीवजंतू, झाडझाडोरा, ज्ञात-अज्ञात खनिजे वर आली. वर येऊन विसावली. एका भयंकर उत्पातातून पुन्हा एकदा एका चिवट निर्माणाचे दर्शन घडवणारा, ‘उत्पत्ती-स्थिती आणि लय’ हा धडा पुन:पुन्हा गिरवणारा नवा विराट प्रवास सुरू झाला… भारतभूच्या पश्चिमेकडे ३५० आणि पूर्वेकडे १५० कि.मी. रुंदी असणारी २४०० किलोमीटर लांबीची त्रिस्तरीय पर्वतरांगांची पश्चिम-पूर्व चंद्रकोर जन्माला आली - अर्थात हिमालय!

दरवर्षी अंदाजे पाच मि.मी.इतकी उंची वाढणारा, ६० मि.मी. पुढे सरकणारा, १२००० हिमनद्यांना जन्म देणारा, पाच हजार मीटर उंचीची एक हजाराहून अधिक शिखरे आपल्या अंगाखांद्यावर मिरवणारा, आठ हजार मीटर उंचीच्या चौदा शिखरांचा मनसबदार, आणि ८८४८ मीटर उंचीच्या जगाचा मनदंड असलेल्या एव्हरेस्टचा जन्मदाता, पृथ्वीचा तिसरा ध्रुव - हिमालय! कित्येक संस्कृत्यांचा निर्माता, त्राता, धात्रा आणि विनाशकर्तासुद्धा! या क्षणी आम्ही त्याच्या खांद्यावर उभे होतो, हे कर्तृत्व काय थोडे होते?

सृष्टीनिर्मितीच्या अतर्क्य आणि अद्भुत खेळामधील एका आगळ्या प्रवेशाचे नेपथ्य माझ्या समोर प्रकाशित झाले होते. या नेपथ्याच्या पार्श्वभूमीवरच माणसाच्या पुढील चाळीस ते पन्नास लाख वर्षांच्या तथाकथित कर्तृत्वाचे विविध नाट्यप्रवेश येथे सादर होत राहिले. पुढेही होत राहतील. त्यात कोणती नवी वळणे असतील, त्याचा उत्कर्षबिंदू कोठे असेल, तो उत्कर्षबिंदू नक्की केव्हा येणार, ते अगम्य अतर्क्य महानाट्य किती अंकी असेल हे सांगणे, समजून घेणे मानवी बुद्धिमत्तेच्या पलीकडचे! मी स्वतःला लेखक, कवी, नाटककार मानतो, पण आपण किती खुजे आहोत, हे पहिल्यांदाच मला बागिनीतील त्या सर्वोच्च शिखरावर उभे असताना लक्षात आले...

आपण सतत ‘मी मी’, ‘माझे माझे’ करत फिरत राहतो. कितीतरी गोष्टी छातीशी कवटाळून बसतो. आयुष्यभर तडफड, धडपड, किती भानगडी, किती खून-खराबा, किती कोर्ट-कचेऱ्या, करत बसतो त्याचा हिशेब नाही... आणि या सगळ्याचा शेवट काय, तर शून्य! शेक्सपियरने म्हटले आहे- ‘nothing will come out of nothing’. अभावातून काहीतरी निर्माण होत आहे, असे मानण्याचा केवळ एक भ्रम! बालिशपणा! ‘पूर्णात पूर्णमिदम सर्वं’ ही वेदातील प्रार्थनाही हेच सांगते. कशात काहीही मिळवा, कशातून काहीही वजा करा बाकी शून्य!

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

शिव-शंकराची ती दंतकथा त्या क्षणी आठवली. त्याच्या दर्शनाला जायचे तर एकेक आसक्ती सोडत वर जायचे असते. इथवर पोहोचेपर्यंत ‘मी’ आणि ‘माझे’ या किती क्षूद्र गोष्टी आहेत, हे लक्षात आले होते. माझे शहाणपण, माझा पैसा, माझी प्रॉपर्टी, माझी माणसे, माझे गाव या सर्वांच्या पलीकडे जाऊन, या सगळ्याची आसक्ती सोडून आपण या विश्वाचा एक भाग आहोत, हे लक्षात घेणे अधिक महत्त्वाचे आहे, हे लक्षात आले. किती साधी पण किती मोठी गोष्ट होती ही!

आता आणखी समजून घेण्यासारखे, सोडण्यासारखे काय उरले होते माझ्याजवळ? हळूहळू मी जणू सूक्ष्मात जाऊ लागलो. ‘गगन मे आवाज हो रही हैं झिनी झिनी’च्या तंद्रित बुडून गेलो… त्या सुरांच्या लपेटित अधिकाधिक आकसत अगदी अणुपेक्षा थोकडा होत गेलो. सरणारा एकेक क्षण नवनवे भान मुखर करू लागला. तुला जे तुझे वाटते ते तुझे नाही. तू जे गाणे गातोस ते तुझे नाही. तू ते फक्त ऐकत आहेस आणि पुढे पाठवत आहेस. सावध हो. वर्तमानक्षणात जग. क्षणिक गोष्टींच्या पाशात अडकू नको. साऱ्याचा शेवट दुःखद आहे हे लक्षात घे. इथे तुझे असे काहीच नाही. येताना तू काही घेऊन आला नाहीस आणि जाताना काही घेऊन जाणार नाहीस. निरर्थक गोष्टींसाठी जीव पाखडू नकोस. हाती असलेले क्षण निरपेक्ष आनंदाने जगण्याचा प्रयत्न कर... तुझ्या येथे असण्याची खरी ओळख म्हणजे तू या सगळ्याच्या पलीकडे असणारे एक आदिम भान आहेस! ‘सुप्रीम अवेअरनेस’!!

आतील पाझर आता पूर्णपणे उमलले होते. सत्यदर्शनाच्या तहानेने मी व्याकूळ झालो होतो, पण तहान भागवण्यासाठी जे पाणी मी बाहेर शोधत होतो ते माझ्या आतच होते. मी आतून भरून येऊ लागलो होतो, तुडुंब होऊ लागलो. वर ढगांनी भरून आलेले आकाश. आणि खाली तुडुंब भरून आलेला मी. दोन तुडूंब अस्तित्वे एकमेकांच्या जवळ आली आणि एकमेकात विलीन झाली. जणू जीवाशिवाची भेट! ‘अवधूता, गगन घटा गहरानी रेऽऽऽ’ या भजनाने मनाचा ताबा घेतला. ही भैरवी की नांदी? एकूणच प्रवासाचा शेवट की प्रारंभ? की उत्पत्ती-स्थिती आणि लय या त्रांगड्यातील त्रिशंकू अवस्था? काहीही असो, त्या क्षणी मी केवळ एक सूर होऊन गेलो… त्याची कंपने माझ्यातून बाहेर पडत हळूहळू आसमंतात विरून नाहीशी होऊ लागली…

सृष्टी निर्माण झाली, तेव्हा प्रारंभी काहीच नव्हते. आदी-अंत नव्हता, आकाश-अंतरिक्ष नव्हते, सत्य-असत्यही नव्हते. डोक्यातील भजनाचे सूर अधिक गहिरे होत आसमंतात विरघळून चालले... एक अज्ञात पोकळी मला आपल्या आत ओढून घेऊ लागली. माझ्यापाशी आता माझे असे काहीही उरले नव्हते.मी माझा उरलो नव्हतो. उरले होते फक्त काही शब्द,काही कल्पना! ‘नासदीय सूक्ता’त म्हटले आहे की, सृष्टीचा जन्म ‘कवी-कल्पने’तून झाला! ‘कवयो मनीषा…’ त्या आत्मसाक्षात्कारी जाणिवेचा लखलखाट झाला. इतका की, जणू तिन्ही लोक उजळून निघाले. आता माझ्या चेहऱ्यावर हसू होते. मी का हसत आहे, हे कुणालाही कळणार नव्हते. मग हळूहळू ते हसूही आसमंतात विलीन होत गेले. शेवटी उरले ते केवळ अनादी-अनंत आकाश आणि त्याची गूढ निळाई!

‘हिमाक्षरे’ - प्रल्हाद जाधव | ग्रंथाली, मुंबई | पाने – २४४ | मूल्य – ३५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......