ही कहाणी पुढे जमीन केव्हा दिसेल याची शाश्वती नसताना, अथांग सागरात झोकून देण्याची इच्छा, दुर्दम्य आशावाद, साहसे, संकटे, यशापयश यांची पर्वा न करणाऱ्या वेड्या पीरांची आहे!
ग्रंथनामा - झलक
अनुराग लव्हेकर
  • ‘वसुंधरेचे शोधयात्री : पृथ्वी धुंडाळणाऱ्या शोधनायकांची गाथा’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Mon , 10 April 2023
  • ग्रंथनामा झलक वसुंधरेचे शोधयात्री Vasundhareche Shodhayatree अनुराग लव्हेकर Anurag Lavekar

‘भूगोलाच्या रंगमंचावर इतिहासाचेनाट्य सादर होत असते’ या विधानाची प्रचिती देणाऱ्या, आपल्या शोधयात्रांमधून नवा इतिहास घडवणाऱ्या शोधनायकांची गाथा म्हणजे ‘वसुंधरेचे शोधयात्री’ हे नवे पुस्तक. डॉ. अनुराग श्रीकांत लव्हेकर लिखित या पहिल्यावहिल्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच राजहंस प्रकाशनाने केले आहे. या पुस्तकाला लेखकाने लिहिलेल्या प्रस्तावनेचा व प्रास्ताविकाचा हा एकत्रित संपादित अंश...

.................................................................................................................................................................

“Not all those who wander are lost.” - J. R. R. Tolkien

(भरकटलेले सारेच वाट चुकत नाहीत! - जे. आर. आर. टॉलकीन)

‘जग एक खेडे झालेले आहे’ असे आज म्हटले जाते आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात पावलोपावली प्रत्यय येतो. कोणत्याही लहानसहान बाबींसाठी संपर्काची कैक साधने आपल्या हाताशी सहजगत्या उपलब्ध असतात. टपाल, पत्रे, ट्रंककॉल, लँडलाइन, कॉर्डलेस, पेजर, मोबाईल, सोशल मीडिया आदी गोष्टींचा अतिशय झपाट्याने प्रसार झाला आणि संपर्कक्रांती झाली. सगळ्या जगातील कोणत्याही प्रकारचे ज्ञान एका क्लिकवर आपल्यासमोर हजर होते. थ्री जी, फोर जी, आता फाइव्ह जी येऊ घातले आहे! अजून किती ‘जी’ येतील सांगता येणार नाही. टी. व्ही., फेसबुक, व्हॉटस्अॅपमुळे क्षणार्धात लाखो लोकांशी संपर्क साधला जाऊ शकतो. विमानसेवा, मेट्रो, बुलेट ट्रेनमुळे अंतरे कमी झाल्याचे भासते. कुठलाही प्रवास आता खडतर तर सोडाच, साधा कंटाळवाणाही राहिला नाही. सॅटेलाइटमुळे खंड तर राहोच, पण एखादा छोटा दगडही कॅमेऱ्याच्या नजरेतून सुटत नाही.

जग जवळ आल्याचा अनुभव आपण नित्यनेमाने घेत असतो. ही प्रगती सुपरफास्ट असली, तरी एकेकाळी यातली कोणतीच गोष्ट अस्तित्वात नव्हती. संपर्काची, दूताबरोबर पत्रव्यवहाराखेरीज कोणतीही साधने उपलब्ध नसताना दुर्दम्य उत्साह आणि धाडस अंगी असलेल्या काही माणसांनी केवळ होकायंत्र घेऊन पृथ्वीला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यात ते यशस्वीही झाले होते!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

आज जग जवळ आले आहे, हे त्या धाडसी सफरींचेच फलित आहे, असे मला वाटते. त्यांच्या त्या प्रयत्नांना प्रत्येकच वेळी यश आले, असे झाले नाही. अनेकांना दारुण अपयशाचेही धनी व्हावे लागले. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. एके ठिकाणी जायचे, तर काही जण भलत्याच जागी पोचले आणि त्यातून तत्कालीन जगाला अज्ञात अशा अनेक प्रदेशांचे शोध लागले. काही जणांची इतिहासाने दखल घेतली, तर काही वीर अज्ञात राहिले!

विंदा करंदीकरांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास ‘चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे, वेड्या मुसाफिराला सामील सर्व तारे’! वर्तमानातील अनेक धागे इतिहासात गुंतलेले असतात आणि भविष्यात होऊ घातलेल्या घटनांचे आडाखे त्यायोगे बांधता येतात. एकेकाळी आपल्या लगतच्या भूप्रदेशाबद्दल अनभिज्ञ असणाऱ्या माणसाने चंद्रावर पाऊल ठेवले आणि आता त्याला मंगळ खुणावतो आहे! आजचे दिवस हे या वेड्या मुसाफिरांच्या खटपटी आणि त्यातून लागत गेलेले नवनवीन भूप्रदेशांचे शोध यांचेच फलित आहे, असे मला वाटते.

शाळेत असताना मी माझ्या वर्गमित्रांबरोबर नकाशा खेळत असे आणि जगातील वेगवेगळी ठिकाणे नकाशात कुठे आहेत हे शोधून काढत असे. मग त्या त्या ठिकाणी घडलेल्या ऐतिहासिक घटना, त्या ठिकाणची महत्त्वाची आणि कर्तबगार माणसे, तिथल्या नद्या, जंगले, पर्वत यांची माहिती मिळवायचा प्रयत्न करत असे. नकळत इतिहास धुंडाळत असे आणि त्याची वर्तमानाशी सांगड घालत असे. जसजशी समज आणि ज्ञान वाढले, तसतसे हा माझा छंदच झाला व तासन्तास मी नकाशांमध्ये स्वत:ला हरवून बसू लागलो. पुढे वैद्यकीय शिक्षण सुरू झाल्यावर प्राथमिकता बदलली. आणि मी इतिहास-भूगोलापासून दुरावलो, काही काळ!

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

माझा पाच वर्षांचा मुलगा मिहीर याला एकदा ताप आला होता. त्याचा वेळ जावा, म्हणून मी त्याला गोष्टी सांगत होतो. सांगता सांगता त्याला कोलंबस, वास्को द गामा, मॅगेलान यांनी केलेला प्रवास, प्रवासाचा मार्ग, दिशा, त्यांना आलेल्या अडचणी हे सगळे नकाशावर त्यांच्या समजावून सांगितले. ते सांगत असताना बऱ्याच वेळाने लक्षात आले की, मी, मुलगा मिहीर आणि पत्नी डॉ. सौ. अमरजा आम्ही सगळेच त्यात पार हरवून गेलो होतो! मुलाची जिज्ञासा, कुतूहल यामुळे माझीही या विषयातील आणि गोष्टी सांगण्यातील रुची वाढत गेली. आणि हे पुस्तक आकाराला आले.

या दर्यावर्दी मंडळींमुळे जगाचा इतिहास आणि भूगोल कसा बदलला, हा एका स्वतंत्र पुस्तकाचा विषय होऊ शकतो. परंतु हे खलाशी कसे होते, त्यांना कोणत्या अडचणी आल्या, त्यावर त्यांनी कशी मात केली, ते कुठे अयशस्वी झाले, याबद्दलची माहिती देणारे पुस्तक मराठीत उपलब्ध असावे असे वाटत होते. मुळात ‘त्याची गरजच काय?’ असाही प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो; परंतु वर्तमानाचे धागे नेहमीच इतिहासात गुंतलेले असतात आणि भूगोल समजल्याशिवाय इतिहास समजून घेता येत नाही. आकाशात नक्षत्रे आणि हातात होकायंत्र याशिवाय दुसरे कोणतेही साधन नाही असे असताना, या खलाश्यांनी सागराला गवसणी घालण्याचे वेडे साहस केले. संपत्ती, सोने, गुलामांची प्राप्ती यांच्याखेरीज स्वतःच्या जिवावर उदार होण्याइतकी कोणती प्रेरणा त्यांना उद्युक्त करत असेल? या सगळ्या वेड्या पीरांची कहाणी म्हणजे, पुढे जमीन केव्हा दिसेल याची शाश्वती नसताना, अथांग सागरात झोकून देण्याची इच्छा, दुर्दम्य आशावाद, साहसे, संकटे, यशापयश यांची कहाणी आहे! त्या खलाश्यांप्रति आदर व्यक्त करण्याचा एक भाग म्हणून हे पांढऱ्यावर काळे!

खलाशी, नाविक, त्यांनी धुंडाळलेले सागर, त्यात त्यांना आलेल्या असंख्य अडचणी, शोधलेले नवनवीन प्रदेश, त्यातून व्यापाराच्या निमित्ताने फोफावलेला वसाहतवाद आणि साम्राज्यवाद, त्याचे संपूर्ण जगावर झालेले परिणाम या विषयांवर इंग्रजी व इतर भाषांमध्ये विपुल लिखाण झालेले आहे. मराठीमध्ये या विषयाचा परिचय करून देणार मांडणी सुटसुटीतपणे करण्याचा हा प्रयत्न आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

जागतिकीकरण, व्यापार, अर्थकारण यांना जोरदार चालना देणाऱ्या घडामोडींचा थोडा इतिहास, थोडा भूगोल आजच्या पिढीतील मराठी वाचकास माहिती - या भूमिकेस कृतीतून मिळालेले समर्थन या पुस्तकरूपाने वाचकांपर्यंत पोचवण्यात विशेष समाधान आहे. या पुस्तकावाटे या विषयासंबंधी काही थोड्या वाचकांचे कुतूहल चाळवले गेले व ते त्या अनुषंगाने या विषयावरील पुढील अभ्यासास उद्युक्त झाले, तरी ते या पुस्तकाचे यश असेल, असे मी मानतो.

पुस्तकलेखनाचा हा प्रवास अर्थातच सरळ, सोपा नव्हता. मराठी टंकलेखनापासून सुरुवात कशी करावी, यातच नमनाला घडाभर तेल गेले. मराठी भाषेत बोललेल्या गोष्टींचे मोबाईल व्हॉट्सअॅपवर लिप्यंतर करून घेणे हा त्यातल्या त्यात सोपा प्रकार बऱ्याच खटपटीनंतर सुचवला गेला. तोही लहानग्या मिहीरकडून! त्याचा अवलंब करून प्राथमिक टंकलेखन करणे, त्यातील असंख्य चुका परत-परत दुरुस्त करणे व ते किमान वाचण्यायोग्य दर्जाचे करणे ही पुढची पायरी. मोबाईल, टॅब, लॅपटॉप, कंप्युटर यांपैकी उपलब्ध असलेले कोणतेही साधन यासाठी वर्ज्य नव्हते. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अनेक बाबी खूप सुलभ झाल्या असल्या, तरी शून्यापासून सुरुवात करणाऱ्या माझा प्रारंभीचा बराच काळ तंत्राशी जुळवून घेण्यातच गेला. एकदा सुरुवात केल्यानंतर विषयाचा अफाट आवाका, तपशिलातले बारकावे, त्यांची जुळवाजुळव या गोष्टी वैद्यकीय शिक्षण, व्यवसाय व काही प्रमाणात कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून करणे जरा जडच गेले.

‘लग्न पाहावे करून, घर पाहावे बांधून’ या उक्तीप्रमाणेच ‘पुस्तक पाहावे लिहून’ हीपण एक नवीन उक्ती माझ्याबाबतीत खरी ठरली आहे! मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच चाललेले आणि पाच वर्षे रखडलेले हे काम अनेकदा हतोत्साहित करणारे ठरू शकले असते. पण सत्य हे कल्पनेपेक्षाही अद्भुत असते, याची वारंवार प्रचिती देणाऱ्या ज्या अद्भुत घटना, व्यक्ती यांच्यावर हे लेखन बेतले आहे, त्या सर्व व्यक्तिरेखांनीच उत्साह टिकवून ठेवून काम चालू ठेवण्याची सतत प्रेरणा दिली.

लेखनाच्या प्रांतात माझी ही पहिलीच मुशाफिरी! कुतूहल आणि धाडस अंगी भिनलेल्या ‘वेड्या मुसाफिरांची मुशाफिरी’ मराठी वाचकांपुढे मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तो आपण गोड मानून घ्याल, ही आशा.

मध्ययुगीन कालखंडातील जगाच्या शोधमोहिमा मुख्यतः युरोपामधूनच सुरू झाल्या आहेत. त्यातही पोर्तुगाल व स्पेन या दोन देशांचे वर्चस्व शंभर वर्षांपेक्षाही जास्त काळ टिकून होते. डच आणि ब्रिटिशांनी त्यात नंतर उडी घेतली. या सागरी शोधमोहिमांची सुरुवात कशी झाली, विस्तार कसा झाला, त्यातून जगाच्या वेगवेगळ्या भूभागांचे आणि सागरी मार्गांचे शोध कसे लागले व यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या प्रमुख व्यक्तिरेखा कोणत्या होत्या यांचा आढावा घेणारे हे लेखन आहे. सदर लेखनाचे पाच भाग केले आहेत.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

भाग एक : पार्श्वभूमी

या शोधमोहिमा सागरी मार्गाने सुरू होण्यास कारणीभूत ठरलेल्या बाबी म्हणजे, ख्रिश्चन आणि मुस्लीम यांच्यात झालेली धर्मयुद्धे, त्यात कॉन्स्टँटिनोपलवर मुस्लिमांचा ताबा! कॉन्स्टॅटिनोपल, जे ऑटोमन साम्राज्यात इस्तंबूल म्हणून ओळखले जाऊ लागले, ते खुष्कीच्या मार्गाने युरोप व आशिया यांना जोडणारे व्यापारी मार्गातील महत्त्वाचे ठाणे होते. त्यावर तुर्कांच्या उत्तरोत्तर वाढत गेलेल्या प्रभावामुळे नंतर उस्मान गाजी या तुर्काचा (यालाच पाश्चिमात्य भाषांमध्ये ‘ऑटोमन’/‘ओथमन’ असे म्हटले जाते.) अंमल सुरू झाल्यामुळे, व्यापारासाठी पर्यायी मार्ग शोधणे निकडीचे झाले. पूर्वेकडील देशातली संपत्ती, मसाल्याचे पदार्थ, रेशीम, यांचे युरोपियन देशांमध्ये प्रचंड आकर्षण होते. त्यामुळे पर्यायी व्यापारीमार्ग शोधमोहिमांना चालना मिळाली. ही सगळी पार्श्वभूमी शोधमोहिमांकडे वळण्यापूर्वी पहिल्या भागात सांगितली आहे.

भाग दोन : आफ्रिकेचा धांडोळा

युरोपमधून सागरी मार्गाने पूर्वेकडे येणे, हे काही एकाच मोहिमेत साधले नाही. आधी अटलांटिक समुद्रामधील बेटे (मॅकॅरोनेशियन बेटे), टप्याटप्याने आफ्रिकेचा पश्चिम किनारा, पूर्व किनारा... अशा मोहिमा व शोध पुढे सरकत गेले. या भागात, हेनरी व हेनरिकन खलाशी यांनी आफ्रिकेच्या ‘केप ऑफ गुड होप’ या दक्षिण टोकापर्यंत मारलेली मजल यांचा आढावा घेतला आहे.

तत्पूर्वी, तेराव्या शतकात मार्को पोलो हा युरोपमधून खुश्कीच्या मार्गाने चीनला पोचला होता. त्याचा प्रवास जलमार्गाने जरी नसला, तरी रोमांचकारी होता आणि युरोप-आशिया यांच्या आपसातल्या व्यापारावर, सांस्कृतिक देवाणघेवाणीवर दूरगामी परिणाम करणारा असल्याने त्याचा समावेश करणे इष्ट ठरेल, असे वाटून त्यावर चार शब्द लिहिले आहेत. तसेच पंधराव्या शतकात पेड्रो डी कोव्हिला हा आशियाच्या, मुख्यत्वे भारताच्या सर्वेक्षणासाठी येऊन गेला होता. हीदेखील महत्त्वपूर्ण घटना असल्याने, तो नाविक किंवा खलाशी नसला, तरी त्याचाही समावेश केला आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

भाग तीन : भारतात आगमन

भारताचा शोध आणि घडामोडी यांबद्दल आपल्याला विशेष उत्सुकता असणार, हे लक्षात घेऊन, केवळ शोधावरच न थांबता, पुढे युरोपियनांचा भारतातील साम्राज्यविस्तार घडामोडींचा धावता आढावाही घेण्याचा प्रयत्न केला आहे.

भाग चार : अज्ञात खंडाचा अनपेक्षित शोध - अमेरिका

अमेरिका हा उत्तर व दक्षिण असा विभागला गेलेला विशाल खंड आहे. त्याच्या पूर्व किनारपट्टीवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दर्यावर्दी येऊन धडकले. पुढे अमेरिकेचा भूभाग ओलांडून पॅसिफिक समुद्राचे प्रथमदर्शन युरोपियन खलाशी बाल्बोआ याला झाले. नंतर अटलांटिक, पॅसिफिक, हिंदी महासागर अशी पृथ्वी प्रदक्षिणा झाली. या सगळ्याचा समावेश चौथ्या भागात केला आहे.

भाग पाच : उर्वरित भूमीचा शोध व दोन्ही ध्रुवांपर्यंत मजल

अतिपूर्वेकडील फिलिपीन्स, टास्मानिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड वगैरेंचा समावेश शेवटच्या पाचव्या भागात केला आहे. अंटार्क्टिका खंड बहुतांशी बर्फाच्छादित समुद्राने व्यापलेला असला, तरी काही भागात जमीन आहे. तिच्या शोधाचा थोडक्यात आढावा, या शेवटच्या भागातच समाविष्ट केला आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

सदर लिखाण करताना, अनुक्रम कालानुसार असावा की, खंडांनुसार असावा, हे ठरवणे अवघड झाले. कारण काही वेळा, एकाच कालखंडात अनेक घडामोडी झाल्या होत्या, असे दिसून येते, तर काही वेळा एकाच व्यक्तीकडून दोन वेगवेगळ्या दिशांच्या भूखंडात कामगिरी झाली आहे, असे आढळते. (उदा. कॅब्राल. याने ब्राझीलचा शोध, शिवाय भारतात महत्त्वपूर्ण कामगिरी. तसेच टास्मान. मॉरिशस व टास्मानिया, न्यूझिलंड या विरुद्ध दिशांच्या भूभागांचा शोध.)

शेवटी भूभागांचा शोध आणि त्या लावणाऱ्या व्यक्ती यांची सांगड घालत या लिखाणाचे भाग केले आहेत. असे करताना कालानुक्रम राखण्याचा प्रयत्न केला आहे, पण काही ठिकाणी तो मागेपुढे होणे अपरिहार्य आहे.

‘वसुंधरेचे शोधयात्री : पृथ्वी धुंडाळणाऱ्या शोधनायकांची गाथा’ – डॉ. अनुराग श्रीकांत लव्हेकर

राजहंस प्रकाशन, पुणे | पाने – ३५६ | मूल्य – ५०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......