जावेदजी आपलं वय, स्थान, बिरुदं या कशाचाही अडसर येऊ न देता, ते आपलं म्हणणं मांडत राहातात. उलट हिरिरीनं त्यात उतरून आपला मुद्दा मांडतात...
ग्रंथनामा - झलक
मंगला गोडबोले
  • ‘जावेद अख्तर : नव्या सूर्याच्या शोधात’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि जावेद अख़्तर
  • Sat , 01 April 2023
  • ग्रंथनामा झलक जावेद अख्तर : नव्या सूर्याच्या शोधात Javed Akhtar - Navya Suryachya Shodhat मंगला गोडबोले Mangla Godbole जावेद अख्तर Javed Akhtar

सलीम-जावेद या जोडगोळीने एके काळी एकाहून एक सरस आणि यशस्वी चित्रपट दिले. नंतरच्या काळात जावेद अख़्तर गीतलेखनाकडे वळले. त्यातही त्यांनी आपलं स्वतंत्र, वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केलं. अलीकडच्या काळात ‘पब्लिक इंटेलेक्च्युअल’ म्हणून देशभर सतत चर्चेत असतात. त्यांच्या या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारं ‘जावेद अख्तर : नव्या सूर्याच्या शोधात’ हे चरित्रपर पुस्तक प्रसिद्ध विनोदी लेखिका मंगला गोडबोले यांनी लिहिलं आहे. नुकतंच ते राजहंस प्रकाशन, पुणेतर्फे प्रकाशित झालंय. त्यातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश…

.................................................................................................................................................................

१.

- मी एथेइस्ट नास्तिक आहे.

- मी ‘सेक्युलर’ म्हणजे धर्मनिरपेक्ष आहे.

- मग माझ्या मुसलमान असण्याचं काय करायचं? चलाऽ, मी एक सेक्युलर मुस्लीम, धर्मनिरपेक्ष मुसलमान आहे, असं म्हणूया.

- मी भारतीय आहे आणि त्याचा मला अभिमान आहे.

- आय अॅम इक्वल अॅपॉर्च्युनिटी एथेइस्ट हू इज अगेन्स्ट ऑल फेथ्स. (मी 'सर्वांना समान संधीचं' तत्त्व मानणारा नास्तिक आहे.) मी कोणतीही धार्मिक विचारधारा, निष्ठा मानत नाही.

- मी विवेकवादी आहे.

ही आहेत जावेदजींनी जाहीरपणे केलेली काही तडाखेबंद विधानं. अशी इतरही अनेक सापडतील. कारण त्यांची अनेक विषयांवर परखड मतं आहेत आणि ती जाहीरपणे मांडायला ते कचरत नाहीत.

एक अत्यंत लोकप्रिय चित्रपटलेखक या नात्यानं त्यांना आपल्याकडल्या सर्वसामान्यांचे विचार, अभिरुची, प्रचलित मतप्रवाह, हळव्या जागा हे निश्चितपणे चांगलं माहीत असणार. एरवी आपल्याकडल्या अक्षरशः करोडो प्रेक्षकांचं समाधान करणारे चित्रपट त्यांना किंवा अन्य कोणालाही लिहिता आलेच नसते. एकूण जनाभिरुचीचा लसावि त्यांना अवगत असणं ही तर त्यांची प्राथमिक व्यावसायिक गरज म्हणता येईल. असं असताना या जनाभिरुचीला धक्का लावणारे, आव्हान देणारे, फेर-विचाराला चालना देणारे मुद्दे ते उपस्थित करताहेत. वेळप्रसंगी आपलं पद, प्रतिष्ठा, सामाजिक स्थान यांना झळ पोचेल असे विचारही उच्चरवाने मांडताहेत.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

ही गोष्ट सोपी नाही, सहज दुर्लक्ष करण्याजोगी नाही. कोणतीही किंमत द्यायची तयारी ठेवून एखादी समंजस व्यक्ती असे विचार मांडते, तेव्हा मुळात तिचा त्यांच्यावर गाढ विश्वास असतो किंवा ते मांडणं, हे तिला आपलं कर्तव्य वाटत असतं. व्यवहारात असं काहीही व्यक्त न करता मूग गिळून बसणं शक्य असतं, भले-भले महाभाग तसं करताना दिसतात. पण ही सुरक्षित वाट चोखाळावी, असं जावेदजींना वाटत नाही. ‘लावा’ या संग्रहामध्ये पृष्ठ तेरा-चौदावर असलेल्या एका ग़ज़लमध्ये त्यांनी याबाबतची त्यांची एक प्रकारची ‘मजबूरी’ नोंदवून ठेवलीये. तिच्यात ते म्हणतात :

‘जिधर जाते हैं सब, जाना उधर अच्छा नहीं लगता

मुझे पामाल रस्तों का सफ़र अच्छा नहीं लगता । (पामाल = घिसेपिटे)

ग़लत बातों को ख़ामोशी से सुनना, हामी भर लेना

बहुत हैं फ़ायदे इसमें, मगर अच्छा नहीं लगता ।।’

उगाचच चार लोक म्हणतात म्हणून त्याला दुजोरा देणं, माना डोलावणं त्यांना आवडत नाही. असल्या हुजरेगिरीचे बरेचसे फायदे असले, तरीही त्यांना ती करवत नाही. तात्कालिक फायद्यांसाठी आत्मनिष्ठा गमावणं, विवेकाशी फारकत घेणं, लाचारी करणं, त्यांच्या तत्त्वांमध्ये बसत नाही. त्यामुळे त्या त्या वेळी आपलं म्हणणं मांडायला ते हिरिरीने पुढे येत असतात.

वास्तविक एक सिनेक्षेत्रीय व्यक्ती म्हणून अनेक अन्य विषयांवर व्यक्त होण्याची जबाबदारी त्यांच्यावर नाहीये. तशी त्या क्षेत्राची पूर्वपरंपराही नाहीये. हिंदी सिनेमावाल्यांपैकी कोणाला भारतीय राजकारणानं विशेष गांभीर्यानं घेतल्याचा इतिहासही नाही. खुद्द जावेदजीही आपल्या कार्यकाळाच्या सुरुवातीला फारसं वेळ मतप्रदर्शन करत नव्हते. शक्यता आहे की, तेव्हा त्यांना तेवढी सवड, मिळत नसेल किंवा अनेक सामाजिक-राजकीय प्रश्नांचं तेवढं गांभीर्य जाणवलं नसेल. सुमारे २००० सालानंतर एकीकडं प्रसारमाध्यमांची संख्या आणि प्रभाव वाढला, तर दुसरीकडं जावेदजींची सिनेक्षेत्रातली व्यग्रता थोडी कमी झाली. त्यामुळे त्यांची मतं अनेक माध्यमांमधून वरचेवर लोकांना ऐकू येऊ लागली.

त्यामुळे आजचं चित्र असं तयार झालं आहे की, जावेदजींचं चित्रपटक्षेत्रातलं योगदान जेवढं निर्विवाद आहे, तेवढीच त्यांची अनेक वक्तव्यं वादग्रस्त आहेत. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला भरभरून दाद देणाऱ्या अनेकांनी त्यांच्या काही विचारांचा, विधानांचा खरपूस समाचार घेतला आहे. त्यांच्या धर्मावरून, त्यांच्या निष्ठांवरून, त्यांच्या कुवतीवरून, त्यांच्या अधिकारांवरून, त्यांच्या हेतूंबद्दल अनेक शंका व्यक्त केल्या गेल्या आहेत. ते निष्कारण वादांना खतपाणी घालतात, असंही म्हटलं गेलंय.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

जावेदजी यामुळे जराही माघार घेत नाहीत. विरोधकांकडे दुर्लक्ष करण्यापासून त्यांच्यावर तुटून पडण्यापर्यंत, कोणताही, त्या-त्या वेळी योग्य वाटणारा पवित्रा घेतात. पण पुन्हा तोच मुद्दा, तेच मत, त्याच तीव्रतेनं मांडायला कचरत नाहीत.

त्यांची अनेक विषयांवर मतं असतात. आपल्या हाताशी लागेल त्या माध्यमांमधून, ती मांडल्याशिवाय त्यांना राहावत नाही. या सडेतोडपणामुळेही असेल कदाचित, पण त्यांना देशभर, वेगवेगळ्या निमित्तानं, वेगवेगळ्या प्रकृतीच्या सभासंमेलनांमध्ये बोलण्यासाठी आमंत्रित केलं जातं. याखेरीज मुक्त माध्यमांमधला वावर असतोच. त्यामुळे आकाशवाणी, दूरदर्शन, सांस्कृतिक मेळावे, विविध भाषिक साहित्य संमेलनं, जश्न-ए-रेख़्ता यांसारखे उर्दू साहित्यविषयक कार्यक्रम, नाना ठिकाणच्या मुलाखती, वार्तालाप यांतून जावेदजी सतत जनसमुदायांना सामोरे जातात. देशात आणि परदेशातही त्यांना ‘मागणी’ असते.

२.

आज बहुसंख्य ज्येष्ठ व्यक्ती शक्यतो ‘पोलिटिकली करेक्ट’ ठरणारंच बोलताना दिसतात. व्यक्ती जितकी सांस्कृतिक, सामाजिक स्तरावर प्रभावशाली, तितकी ती गुळगुळीत, मोघम बोलणार हे गृहीत असतं. जावेदजी याला अपवाद. आपलं वय, स्थान, ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’सारखी बिरुदं या कशाचाही अडसर येऊ न देता, ते आपलं म्हणणं मांडत राहातात. कितीही नाजूक- संवेदनशील विषय असला, तरी तो टाळत तर नाहीतच. उलट हिरिरीनं त्यात उतरून आपला मुद्दा मांडतात. शक्यतो हसतमुखानं, खेळीमेळीच्या भाषेत; पण वेळेला शब्दांचे आसूड ओढायलाही कमी करत नाहीत. निर्णायक मत द्यायला, त्याची जबाबदारी घ्यायला, वेळ पडल्यास किंमत मोजायला ते तयार असतात. एका असंग्रहित नज़्ममध्ये त्यांनी म्हणून ठेवलंय :

‘जो बात कहते ड़रते हैं सब, तू वो बात लिख

इतनी अंधेरी थी न कभी पहले रात, लिख

जो वाक़ियात हो गए उनका तो ज़िक्र हैं

लेकिन जो होने चाहिये, वो वाक़ियात लिख’

ही नज़्म ते अलीकडं अनेक सभांमध्ये पेश करतात. जे होऊन गेलं, त्याचा ‘ज़िक्र’ म्हणजे उल्लेख करणारे बरेच लोक निघतात. पण अमूक अमूक व्हायलाच हवं, म्हणून त्याविषयी लिहावं - असं वाटणारे लोक फारसे नसतात. जावदेजींनी तसं होण्याची धडपड आरंभलेली दिसते. बाहेरचं जग दिवसेंदिवस जास्तच अंधकारमय होऊ लागलंय. त्याला सामोरं तर जावंच लागणार. डोळ्यावर पट्टी ओढून घेऊन त्याबाबत बेदखल राहणं फार काळ परवडणार नाही. हे कदाचित उतारवयातलं शहाणपणही असू शकेल. आजवरच्या खोट्या स्वप्नांमधून बाहेर येण्याची, भ्रमनिरासामधून सावध होण्याची आंतरिक गरज भासत असेल. निदान पुढच्यांना तरी सावध करावंसं वाटत असेल.

ते काहीही असलं, तरी जे होऊन गेलं त्याविषयी बोलण्याइतकंच जे व्हायला हवंय, ज्या गोष्टींमध्ये समाजाचं भावी हित आहे, त्यांच्याविषयी बोलायला आपण बांधलेले आहोत, असं जावेदजी मानतात. वक्तृत्वाचं वरदान त्यांना आहेच. खुबीदार मांडणी करत सभांमध्ये प्रभावी भाषणं करणं, केवळ वक्तृत्वाच्या बळावर सभा जिंकणं हे त्यांच्यासाठी नवीन नाही. महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी ही हातोटी मिळवलेली आहे. बहुतेक ठळक विषयांवर साधार बोलता येईल एवढं वाचन, व्यासंग आयुष्यभर केला आहे. कोणताही मुद्दा नसताना शब्दांचे बुडबुडे उडवणारं पोकळ वक्तृत्व त्यांना खरं तर जमेल एवढं शब्दसामर्थ्य, शब्दांवरचं प्रभुत्व त्यांच्यापाशी नक्कीच आहे. मात्र त्यावर ते समाधान मानणार नाहीत. श्रोत्यांना खडबडून जागं करणारं, श्रोत्यांना भ्रमातून बाहेर काढणारं थेट वक्तव्य करण्यात ते रमतात. काही विषय त्यांच्या बोलण्यात वारंवार येतात. उदा. १) चित्रपटसृष्टीतलं भलंबुरं, २) उर्दू भाषेचा गौरव, ३) आपल्या धर्मविषयक धारणा, ४) लेखकाचं श्रेयस आणि प्रेयस आणि ५) श्रद्धा, अंधश्रद्धा आणि समाजजीवन.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

यांपैकी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचं उभं आयुष्य गेलेलं आहे. गेल्या पाच-सहा दशकांचा भारतीय व मुख्यत्वे हिंदी चित्रपटांचा चालताबोलता कोश असल्यासारखे अनुभव व माहिती ते बाळगून आहेत. साहजिकच चित्रपटसृष्टीबाबत वरवरच्या किंवा अपुऱ्या माहितीतून कोणी उठवळ विधानं केली की, ते तुटून पडतात. चित्रपटसृष्टीतली माणसं भ्रष्ट आहेत, इथं फक्त घराणेशाही चालते, चित्रपटसृष्टी समाजाला बिघडवते, असं तिच्याबाहेरचे लोक म्हणत असतात; तर ‘आमचा काही दोष नाही, जे विकलं जातं ते आम्ही देतो, आम्ही प्रकाशात असल्यानं आमच्या लहानशा कृत्यांचीही मोठी चर्चा होते, बोभाटा होतो’, असं सिनेसृष्टीच्या आतल्या गोटातले लोक म्हणतात. यापैकी खरं काय?

जावेदजी चित्रपटसृष्टीच्या घनिष्ट नात्यातले आहेत, म्हणून ते नेहमी असं एकपदरी उत्तर चित्रपटसृष्टीला आरोपांपासून वाचवायला बघतात, याबाबत देता येत नाही. कारण चित्रपटसृष्टीच्या उणिवाही ते योग्य वेळी दाखवतातच. मात्र शेवटी हाही एक व्यवसाय आहे, हे लोकही समाजाचे घटक आहेत, त्यांनाही सन्मानानं जगण्याची ओढ आहे, त्यांचं आणि समाजाचं नातं बारकाईनं बघायला हवं, असं काहीसं ते सुचवू बघतात.

गुरुदत्तसारखा आयकॉनिक निर्माता-दिग्दर्शकही ‘मिस्टर अँड मिसेस ५५’ हा सिनेमा करतो. ‘चोली के पीछे क्या हैं’ हे गाणं समाजच डोक्यावर घेतो. एक आधुनिकोत्तर ‘महानगरी’ सिनेमा आला, बरा चालला की, तशाच सिनेमांचा भडिमार होतो. या गोष्टी नजरेआड कशा करायच्या? असा त्यांना प्रश्न पडतो. म्हणून सिनेसृष्टीच्या काळ्या-पांढऱ्या छटांचा तोल सांभाळत ते बोलतात. ‘सिनेमासृष्टी म्हणजे सर्व व्यसनांचं, गुन्हेगारीचं, अंडरवर्ल्डचं माहेरघर, तिथं अनैतिकता माजणारच!’ असं मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यातल्या कोणाही व्यक्तीचं वागणं, आचारविचार, खुलेपणाने बघणं, स्वीकारणं सरासरी लोकांना जमत नाही. त्या तारांकित जीवनाचं प्रचंड आकर्षण तर आहे, पण ते डागाळलेलंच आहे, हा पूर्वग्रहही समाजमनात पक्का आहे. यातून अशी उथळ शेरेबाजी केली जाते. जावेदजी तिचा साधार समाचार घेतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

शेवटी सिनेमासृष्टीतली माणसं हीही माणसंच आहेत. समकालीन वास्तवाचा एक भाग आहेत. या वास्तवाच्या झळा इतरांसारख्या त्यांनाही लागणारच. कोणीतरी बदनामी ओढवून घेणारच. पण एखाद्या बदनाम उदाहरणावरून सर्वांना सारखंच बदनाम ठरवणं, त्यांच्या विरोधात तडाखेबंद विधानं करणं जावेदजींना पटत नाही.

३.

सिनेमांमुळे समाज बिघडतो हा एक लोकप्रिय समज आहे. जावेदजींना तो मान्य नाही. ‘सिनेमा सुधारा म्हणजे समाज सुधारेल’, हे विधान त्यांना अज्ञानमूलक वाटतं. उलट समाज जेवढा सुधारेल, अभिरुचीसंपन्न होईल, तेवढे चित्रपटही अर्थपूर्ण निघतील, असं ते सांगतात. उलटा कार्यकारणभाव जोडतात. त्यांच्या मते, सिनेमा बघून समाज बिघडावा एवढ्या संख्येनं, एवढ्या प्रमाणात आपल्याकडल्या बहुजन समाजाला मुळी सिनेमा बघायलाच मिळत नाहीत. तामिळनाडू, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, केरळ, महाराष्ट्र या राज्यांमध्ये पुष्कळ चित्रपटगृहं आहेत हे खरं, पण तीही बहुधा त्यातल्या महानगरांमध्ये केंद्रित झालेली आहेत. फार लहान गावांपर्यंत अनेक सिनेमे पोचतच नाहीत. जिथे पोचतात, तिथे सिनेमा सहज बघण्याची सर्वांची ऐपत असते असंही नाही. त्यामुळे संस्कारक्षम वयात उठसूट सिनेमा बघायला मिळणारा वर्गच मर्यादित आहे. फिरत्या तंबूसारख्या हलक्या थिएटरसाठी ‘सी-ग्रेड’, ‘डी-ग्रेड’ सिनेमे तयार करण्याची पद्धत आहे. त्यातले बरेच सिनेमे कोणताही परिणाम करण्याच्या योग्यतेचे नसतात. सिनेमात दाखवलेल्या जीवनापेक्षा तिथलं वास्तव जीवन जास्त क्रूर, ‘क्रूड’, बटबटीत, शोषण आणि अन्यायावर आधारलेलं असतं. त्यामुळे सिनेमा बघून त्यातल्यासारखी गैर-वाईट वागण्याची वेळ त्यांच्यावर येत नाही.

खरी गोष्ट जावेदजींना अशी वाटते की, समाज अभिरुचीच्या रसातळाला गेला, म्हणून ‘तसे’ सिनेमे निघतात. आजच्या अनेक तरुणांना आयता मिळणारा पैसा आणि बेधुंद चैन या गोष्टीचं सर्वाधिक आकर्षण आहे. कठोर वास्तवाला सामोरं जाण्यापेक्षा एक काल्पनिक रम्य जग त्यांना हवंय. म्हणून करण जोहरच्या सिनेमांच्या पठडीतले सिनेमे निघतात, हिट होतात. ज्यात प्रत्येक व्यक्तिरेखा ही मनात येता क्षणी, जगभरात कुठंही जाऊ शकते. तिथल्या निसर्गसौंदर्याचा, सुखासीन जीवनाचा आस्वाद घेऊ शकते. एके काळी मजदूर, किसान, गिरणी कामगार यांच्यातले नायक निवडून त्यांच्यावर सिनेमे केले गेले. आजच्या हिंदी, व्यापारी चित्रपटात अशा नायकांना सहसा केंद्रस्थान मिळत नाही. त्यांची दु:खं, दारिद्र्य, वंचना, त्यांच्यावर होणारे अन्याय दाखवावेत, त्यांच्या बाबतीत जनमानसात सहानुभूती जागवावी ह्याकडं कोणाचाही कल नाही. आज सहानुभूतीपेक्षा अनुभूती विकण्याचे दिवस आले आहेत. अनुभूती सुखसमृद्धीची... अनुभूती चैनीची, चंगळ करण्याची.... अनुभूती एका अपरिमित सुखासीन जगण्याची.

जावेदजींचा असा दावा आहे की, आजच्या बदलत्या प्रेक्षकाला चित्रपटातून सामाजिक समस्या बघण्यामध्ये रसच नाही. आजचा प्रेक्षक पूर्वीपेक्षा वेगळा किंवा बदललेला आहे, असं ते कशावरून म्हणतात? तर, दोन निकषांवरून १) प्रेक्षकाचा बदललेला आर्थिक स्तर आणि २) प्रेक्षकाचं घटलेलं वय.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

आज अनेक प्रेक्षक, निदान महानगरी प्रेक्षक सहजपणे मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट बघायला जातात. तिकिटाला चार-पाचशे रुपये मोजतात. सोबत खाणं- पिणं, सुखासन, गारवा वगैरेंची चैन विकत घेतात. एवढे पैसे खर्चून गरिबी बघण्यामध्ये त्यांना काहीही रस नसतो. एके काळी शहरी निर्माता, दिग्दर्शक ‘दो बिघा जमीन’ काढू धजले. कारण हा सिनेमा महानगरांमध्येही ‘चालेल’ असा त्यांचा विश्वास होता, तो पुढं खरा ठरला. हे आज घडणार नाही. कलेनं जीवनाला खोलवर स्पर्श करावा, प्रेक्षकांना त्या दर्शननानं अस्वस्थता आणावी तिच्याबाबत अशी एके काळी धारणा होती. जीवनाची दाहकता बघायला, खोल सहानुभूती जागी होऊ द्यायला त्या काळातले प्रेक्षक तयार होते. आज लोकांची अपेक्षा उलट आहे. ‘जीवनाच्या दाहकतेपासून सुटका मिळवण्यासाठी कला’ या दृष्टीनं ते कलांकडे बघतात, चित्रपटांकडे तर बघतातच.

हे वास्तव बघत असतानाच जावेदजी उथळ, उडतपगडे सिनेमे तयार करणाऱ्यांचे प्रमाद मात्र नजरेआड करत नाहीत. सिनेमासारख्या एका महत्त्वाच्या माध्यमाचा केवळ स्वार्थासाठी पोरखेळ करणारी माणसंही आसपास असतातच. त्यामध्ये कोणी जावेदजींचे हितसंबंधीही असू शकतात. पण माध्यमांच्या हितापुढं ते स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थ किंवा लागेबांधे यांची तमा बाळगत नाहीत.

४.

जावेदजींच्या मते चांगलं प्रॉडक्ट, उत्पादन स्वतः साठी स्वत:ची स्वतंत्र बाजारपेठ, मार्केट निर्माण करतं. शेवटी बाजारालाही दर्जेदार माल विकण्याची, यशस्वी व्यावसायिक ठरण्याची आकांक्षा असतेच. तेव्हा ‘बाजारासाठी आम्ही तडजोडी करतोय, केल्यात’ असं म्हणणं फजूल आहे. प्रत्येक वेळेला भव्यता विकली जात नाही. आपली सर्व बुद्धी, संवेदनशीलता एकवटून उत्कट पण साधासा चित्रपट केला, तरी तो किमान काही लोकांना तरी भिडू शकतो. सर्वांना, सर्वकाळ, निरपवादपणे खूष करणारा चित्रपट हा कधीच, कुठंच कोणाकडूनच होत नसतो. मग निदान स्वतःला खूश करणारा चित्रपट तरी का करून बघू नये? समांतर संवेदना असणाऱ्या कोणा ना कोणापर्यंत तरी तो पोचेल, असा सल्ला ते अनेक नवोदितांना देतात. स्वतःशी प्रामाणिक राहायला सांगतात.

‘खपाऊ’ किंवा ‘विकाऊ’ सिनेमा करणाऱ्या सिनेमावाल्यांकडून आणखी एक समर्थन नेहमी होतं. ते म्हणजे- ‘जो यूथ चाहता हैं, वही हम बनाते हैं । हमें यूथ की माँग पूरी करनी पडती हैं।’

हा यूथ म्हणजे कोण? फक्त देहानं तरुण असणारा या देशातला वर्ग? मग तो तर देशभर नाना रूपांमध्ये विखुरलेला आहे. मूठभर उच्चभ्रू तरुणांची पसंती म्हणजे सगळ्या ‘यूथ’ची निवड असू शकत नाही. ‘यूथ’ हे नावीन्याचं किंवा सर्जनशीलतेचं प्रतीक असंही निर्णायकपणे म्हणता येत नाही. कारण अत्यंत कृतिशून्य तरुणही आजच्या समाजात खूप दिसतात. त्यामुळं ‘आम्ही यूथला आवडावं म्हणून हे असं दाखवतो’, हे म्हणणं म्हणजे पळवाट आहे, असंही जावेदजी सुचवतात. शेवटी यूथ किंवा तारुण्य हे फक्त शरीराचं नसतं, मनाचं जास्त असतं. तरुणपणाची जिज्ञासा, नावीन्याची भूक, नवनिर्मितीची ओढ सत्यजित राय किंवा अकिरा कुरुसावामध्ये खूप उतारवयातही टिकली होती. म्हणूनच कुरुसावा यांचा ‘ड्रीम्स’ हा चित्रपट ते वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी करू शकले किंवा सत्यजित राय यांनी ‘आगंतुक’ हा चित्रपट अगदी उतारवयात केला. या दोघांचा जीवनोल्हास, स्वत:वरचा विश्वास म्हातारपणातही टिकून होता. म्हणून त्यांना आबालवृद्धांच्या पसंतीला उतरणारे चित्रपट करता आले.

असं असलं, तरी दर वीस-पंचवीस वर्षांनंतर ताजेपणाची एक लाट चित्रपटसृष्टीत येते, यावर जावेदजींची श्रद्धा आहे. विसाव्या शतकाच्या चौथ्या दशकातल्या पी.सी.बरुआंचा मोठा प्रभाव सहाव्या दशकातल्या सलीम-जावेदप्रणीत सिनेमांवर पडला. पुढं आताच्या ‘मिलेनियल’ दिग्दर्शकांनी त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन पण ‘आजचा’, ‘अनिवासी भारतीय’ होऊ बघणाऱ्यांचा चित्रपट बनवला, ज्याचे उर्ध्वयू करण जोहर, आदित्य चोप्रा वगैरे आहेत. मागच्यांपासून प्रेरणा घेऊन प्रत्येकानं आपला नवा रस्ता घडवला. तसंच पुढंही होत राहील, याबद्दल जावेदजी निश्चिंत आहेत. आपल्यानंतर, आपल्या दर्जाचा सिनेमा कोणीच करू शकणार नाही, असं ते कधीही दूरान्वयानेही सुचवत नाहीत. कारण सिनेमा, चांगला सिनेमा, हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

‘जावेद अख्तर : नव्या सूर्याच्या शोधात’ – मंगला गोडबोले

राजहंस प्रकाशन, पुणे | पाने – २०८ | मूल्य – २७० रुपये

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......