अजूनकाही
प्रसिद्ध कादंबरीकार डॉ. अरुण गद्रे यांची वैद्यकीय व्यवसायातील गैरव्यवहारांचा समाचार घेणारी ‘ऱ्हासचक्र’ ही नवीकोरी कादंबरी नुकतीच देशमुख आणि कंपनीतर्फे प्रकाशित झाली आहे. या कादंबरीला लेखकानं लिहिलेलं हे मनोगत...
.................................................................................................................................................................
गोष्ट सांगणं हा माणसाचा स्थायीभाव आहे. आदिमानवाच्या काळापासून गुहेबाहेर शेकोटीभोवती आपल्या आजूबाजूला जमलेल्यांना असं सांगणं की - “अरे, हे असं असं घडलं, घडत आहे, घडणार आहे बरं का!” या कादंबरीत मी अशीच एक गोष्ट सांगतो आहे; आदिमानवासारखीच. काळ आणि माध्यम वेगळं आहे, जगण्याची व्यामिश्रता वेगळी आहे, पण आपण माणसं आजही तशीच आहोत अंतर्बाह्य, आणि आपली गोष्ट सांगायची अन् ऐकायची आवडसुद्धा तशीच आहे.
कुणाही माणसाची जाणीव समुच्चित अशा गाठोड्याचे संचित असते. प्रत्येकानं त्याच्या आयुष्यात केलेली मार्गक्रमणा, त्याचे आकलन, मानसिक आंदोलने, ती व्यक्ती आणि समाज यांच्यातील अटळ संघर्ष, आणि त्या व्यक्तीच्या जन्मजात एकाकीपणाचं कोंदण, या सर्वांनी त्या व्यक्तीची जाणीव घडत असते, झंकारत असते. होता होता ही आंदोलनं स्वतःमध्ये सामावून घेणं अशक्य होत जातं आणि ती शब्दांत उतरतात, कादंबरीचा जन्म होतो.
‘ऱ्हासचक्र’ अशीच उतरली, जेव्हा आतून धडका देणाऱ्या अस्वस्थतेला बाहेरची वाट देणं, ही माझी व्यक्तिगत गरज बनली.
पौगंडावस्थेतच सुमती क्षेत्रमाडेंचं - आफ्रिकेत वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. अल्बर्ट स्वाइट्झरवर मी वाचलेलं पुस्तक, त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयात घेतलेला प्रवेश, १९८०च्या आसपासचे तिथले मंतरलेले दिवस, डॉ. प्रकाश आमटेंकडे हेमलकसाला दिलेली १९७८ मधली भेट, सहचारिणी भूलतज्ज्ञ डॉ. ज्योतीबरोबर आधी आदिवासी भाग किनवट आणि नंतर ग्रामीण भाग लासलगाव इथे यथाशक्ती नैतिकतेनं आणि गरिबाला परवडेल, अशी स्त्री-रोगतज्ज्ञ म्हणून केलेली २० वर्षांची खासगी सेवा, झपाट्यानं झालेल्या बाजारीकरणापुढे अगतिक शरणागती पत्करून पुण्याला केलेलं स्थलांतर, आणि वैद्यकीय क्षेत्राच्या बाजारीकरणाला आळा घालण्यासाठी जमेल तसा, सुचेल तसा केलेला प्रयत्न, या सगळ्याची स्पंदनं साचत गेली.
भारतातील माझ्यासारख्याच अस्वस्थ असलेल्या डॉक्टरांचं काही काळ कार्यरत झालेलं एक नेटवर्क, त्याच्या मदतीनं भारतभर केलेली भटकंती आणि डॉक्टरांच्या घेतलेल्या भेटीगाठी, यामुळे मला हा एक मोठा दिलासा मिळाला की, मी एकटाच मला वाटतो, तसा या वाटेवरचा विक्षिप्त वाटसरू नाही. या अनेक डॉक्टरांची अस्वस्थता माझ्यासारखीच आहे. सर्वसाधारणपणे माझ्या वयोगटातली ही डॉक्टर मंडळी बाजारीकरणाला विरोध करत, आपापल्या क्षेत्रात यशस्वी जरूर झाली आहेत, पण या सर्वांमध्ये तीव्र खंत हीच आहे की, “अरे, गेल्या तीस-चाळीस वर्षात आपलं, हे नोबल प्रोफेशन कुठून कुठं आलं आहे?”
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
डॉक्टरांच्या या वैषम्याबरोबरीनं माझ्यापर्यंत पोहोचल्या त्या बाजारीकरणाच्या वणव्यात होरपळलेल्या आणि दारोदार न्याय मागत वर्षानुवर्षं फिरणाऱ्या चाळीस-पन्नास पेशंटच्या/त्यांच्या नातेवाईकांच्या सत्यकथा. हॉरर कथा.
वैद्यकीय व्यवसायात व्यक्तिगत स्खलनशीलतेनं सुरू झालेली गैरव्यवहारांची पाऊलवाट बघता बघता कशी एक सर्वव्यापी त्सुनामी झाली, आपल्या पायाखालची वाळू कशी सरकून गेली, हे मलाच नव्हे, तर अनेकांना समजलंही नाही. व्यक्तिगत पातळीवर आम्ही आपापले किल्ले लढवत असताना, आजूबाजूला मात्र नैतिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पातळीवरच जग इकडचं तिकडे झालं.
या बदलत्या जगानं आम्हा डॉक्टर्सना विक्रेता बनवलं आणि पेशंट्सना ग्राहक! चोख पैसे मोजून दिली-घेतली जाणारी बाजारातली एक वस्तू झाली आमची वैद्यकीय सेवा. त्यात रोज नवनवीन टेक्नॉलॉजी अत्यावश्यक होत गेलेल्या, पण न झेपणाऱ्या खर्चामुळे तसेच वाढत गेलेल्या रिअल इस्टेटच्या किमतींमुळे हळूहळू हॉस्पिटल सुरू करणं आणि ते चालवणं एकट्यादुकट्या डॉक्टरच्या हातातून निसटलं. भांडवलाची आणि अनुषंगानं आलेल्या पाशवी कॉर्पोरेट तत्त्वज्ञानाची मजबूत पकड आमच्या वैद्यकीय व्यवसायावर आली. या बदलत्या झंझावातानं एक हताशा, अगतिकता आम्हा डॉक्टरांमध्ये आली. अनेकांना मी विचारलं, ‘या विषयावर कादंबरी लिहीत आहे’, तर पटकन प्रतिक्रिया आली – ‘लिही, ही काळाची गरज आहे.’
नेहमीसारखी, सुरुवात करताना मनात भीती होतीच की, ही कादंबरी लिहिता येईल ना? यातली पात्रं उभी राहतील का स्वतंत्र अशी? पण हळूहळू नेहमीसारखंच या कादंबरीतसुद्धा एक एक पात्र स्वतःहून समोर येत गेलं, स्वतःलाच घडवत गेलं. एका टप्प्याला जाणवलं की, हे चरित्र आहे ते वैद्यकीय क्षेत्राचं. एका अर्थानं ‘कालाय तस्मै नमः’ या नियमानं हा पट उलगडत गेला १९८० ते २०२२मध्ये खासगी वैद्यकीय क्षेत्राच्या झालेल्या प्रवासाचा.
ही डॉक्युमेंटरी नाही, कादंबरी आहे. ‘कथा–कादंबरी’ आणि ‘डॉक्युमेंटरी’ यात एक महत्त्वाचा फरक असतो, तो म्हणजे लेखकाच्या काल्पनिक अवकाशाचा. देशमुख आणि कंपनीनं प्रकाशित केलेली ‘एक होता फेंगाड्या’ ही माझी एक संपूर्ण काल्पनिक कादंबरी, कारण तिचा कालखंडच आदिमानवाच्या काळातला. माझ्या आजच्या अनुभवातलं काहीच त्या काळातल्या नायकाला उभं करायला उपयोगी नव्हतं, किंबहुना माझं आजच्या काळाचं आकलन हा त्या कादंबरीसाठी मोठा अडथळा होता. त्या कादंबरीसाठी माझ्याकडे उपलब्ध होती ती फक्त कल्पनाशक्ती आणि आदिमानवापासून माझ्यापर्यंत पोहोचलेली मूलभूत मानवतेची जाणीव. माझ्या इतर कादंबऱ्या या अर्थातच अनुभव आणि कल्पनेचा मेळ आहेत.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
अनुभव कायिक असतो, मानसिक असतो आणि वाचनातूनसुद्धा येत असतो. तो तात्कालिक असतो, अनेक वर्षं साचत गेलेला असतो. तो जखमी करणारा असतो अन् फुंकर मारणारासुद्धा असतो. तो अंतर्मुख करणारा असतो अन् अस्वस्थतेचा शाप देणारासुद्धा असतो. अनुभवाच्या तरल लाटांवर कादंबरीकार पूर्णपणे काल्पनिक, स्वायत्त अवकाश उभं करत असतो, ते एक कादंबरी म्हणून, जणू एक स्वतंत्र प्रतिसृष्टीच उभी राहत असते. एका काळाच्या पट्टीवर स्वायत्त पात्रं आपापलं जगणं जगत असतात. कधी कधी तर ही पात्रं लेखनाची सूत्रं आपल्या हातात घेतात आणि लेखकाकडून तेच लिहून घेतात, जे त्यांना त्यांच्या आयुष्यात घडावं असं वाटतं. लेखकासाठी हा स्तिमित करणारा अनुभव असतो.
कादंबरीतली पात्रं त्यांच्या काल्पनिक अवकाशात जशी वागतात, घटना जशा घडतात, त्यात जी स्थळं असतात, ते सर्व कदाचित आजमितीला कुठेही अजिबात घडत नसतं… कुठे तुकड्या तुकड्याने घडत असतं किंवा चक्क अजून ते पुढे घडायची वाट बघत असतं. कादंबरीच्या कल्पित अवकाशातील भासमय खेळात वास्तव निसटसा स्पर्श करतं - एखाद्या स्वप्नाला वास्तवानं करावा तसं.
कुठलीही कादंबरी नेहमीच काहीतरी ‘सत्य’ मात्र आग्रहानं सांगत असते. लेखक कादंबरीच्या खेळातून त्याला आजूबाजूच्या घटितातून जे उमगत असतं, त्या सत्याला भिडायचा त्याच्या परीनं प्रयत्न करत असतो. या अर्थानं ‘सत्य निष्कर्षता’ हा कथा-कादंबरीचा पाया असतो, जसा लय कवितेचा आणि भासमयता नाटक/सिनेमाचा. कादंबरीतील ‘सत्य’ हे लेखकाला जाणवलेलं ‘सत्य’ असतं. कादंबरीचं काम असतं, ते या दाखवलेल्या सत्यासंबंधानं वाचकांना त्यांचं सत्य शोधायला उद्युक्त करण्याचं, हे सत्य पारखण्यासाठी त्यांना त्यांच्या ‘कम्फर्ट झोन’मधून बाहेर काढण्याचं.
लेखकाचा आग्रह/धारणा हा कादंबरी लेखनाचा दृश्य-अदृश्य कणा असतो. या कादंबरीतील विषयाबद्दलसुद्धा माझी ठाम नैतिक धारणा आहे. एक व्यक्ती आणि एक डॉक्टर म्हणून गेल्या चाळीस वर्षांच्या जगण्यातून ‘माझं’ म्हणून आलेलं काही आकलन आहे. माझ्या या आकलनाचा आणि माझ्या नैतिक धारणेचा प्रभाव या कादंबरीत असणं स्वाभाविक आहे, नव्हे कादंबरीची ती एक मुख्य गरज आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
माझी नैतिक धारणा ही आहे की, माणसाच्या वेदना आणि जीवन-मरणाच्या सीमारेषेवर उभं असणारं वैद्यकीय क्षेत्र ही बाजारात विक्रीला असणारी ‘वस्तू’ असूच शकत नाही. पण दुर्दैव आहे की, आज ती तशी बाजारात विक्रीला ठेवलेली वस्तू झाली आहे. एवढंच नव्हे, तर आज बाजारानं वैद्यकीय व्यवसायाला ताब्यात घेतलं आहे. बाजाराची ही पाशवी पकड पेशंटसाठी तर एक भयावह असं वास्तव झालीच आहे, पण डॉक्टरांसाठी सुद्धा ही पकड त्यांना रोबो बनवणारी आणि त्यांच्यातलं माणूसपण संपवणारी ठरत आहे.
अजून एक माझी धारणा अशी आहे की, आदिमानवाच्या काळापासून प्रत्येक माणसात एक श्वापद, एव्हिल, अमंगळ, दुष्ट लपलेलं असतं, आणि जेव्हा या श्वापदाला ताब्यात ठेवणाऱ्या सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, सामाजिक आर्थिक आणि कौटुंबिक व्यवस्था कोसळत जातात, तेव्हा एरवी क्वचित आणि एखाद्या-एखादीमध्येच बाहेर पडणारं, हे श्वापद आता मोकाट फिरू लागतं, आपल्या दैनंदिन पर्यावरणाचा एक भाग होतं. आणि असं जेव्हा होतं, तेव्हा फार थोडेच जण व्यक्तिगत पातळीवर त्याचा सामना करू शकतात. अर्थात असं जेव्हा घडतं, तेव्हा एका ऱ्हासचक्राची अटल सुरुवात होते.
हे मला दिसलेलं ‘ऱ्हासचक्र’ जर वाचकांना माझ्या एवढ्याच तीव्रतेनं भिडलं, तरच माझं ते लेखक म्हणून यश असेल.
‘ऱ्हासचक्र’ – डॉ. अरुण गद्रे
देशमुख आणि कंपनी, पुणे | पाने – ३८६ | मूल्य – ५५० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment