‘यशवंत बाळाजी शास्त्री’ : एका ‘रोमांचक’ पुस्तकाची गोष्ट!
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
प्रवीण बर्दापूरकर
  • ‘यशवंत बाळाजी शास्त्री’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ. मध्यभागी नलिनी शास्त्री, यशवंत बालाजी शास्त्री आणि ग. त्र्यं. माडखोलकर
  • Tue , 28 March 2023
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो यशवंत बाळाजी शास्त्री ग. त्र्यं. माडखोलकर तरुण भारत

ही नोंद एका पुस्तकाच्या गोष्टीची आहे. ते पुस्तक वाचायला मिळालं कसं, त्याचीही एक गोष्ट आहे, पण ती नंतर सांगतो.

पुस्तकाचं नाव आहे ‘यशवंत बाळाजी शास्त्री’. लेखकाचं नावही तेच आहे. खरं तर, या पुस्तकाला नाव (Title)च नाही. मुखपृष्ठावर आहे, ते केवळ लेखकाचं नाव! यशवंत बाळाजी शास्त्री हे नाव मी सर्वप्रथम नागपूरला ऐकलं. १९७७ साली मी पत्रकारितेत आलो आणि २६ जानेवारी १९८१ रोजी पुढील पत्रकारिता करण्यासाठी नागपुरात डेरेदाखल झालो.

नागपूरच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांतच यशवंत बाळाजी शास्त्री हे नाव आणि त्यांच्याविषयीच्या धाडसी, तसंच काहीशा रंगतदार कथा ऐकायला मिळाल्या. ते कट्टर संयुक्त महाराष्ट्रवादी होते, हे कळल्यावर तर त्यांच्याविषयी ऐकण्यात उत्सुकता वाटत असे. कधी कधी त्या कथा दंतकथा वाटत, इतका भक्तीभाव संगणाऱ्याच्या बोलण्यात असे.

यशवंत बाळाजी शास्त्री यांच्या आठवणी सांगणाऱ्यात ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाचे आमचे तत्कालीन मुख्य वार्ताहर, कसदार बालसाहित्य लिहिणारे लेखक म्हणून तेव्हा ओळखले जाणारे दिनकर देशपांडे यांच्यापासून ते बुजुर्ग दि. भा. उपाख्य मामासाहेब भुमरे अशा अनेक मान्यवरांचा समावेश होता.

यशवंत बाळाजी शास्त्री या पुस्तकाची प्रथम आवृत्ती डिसेंबर १९७५मध्ये प्रसिद्ध झाली. म्हणजे हे पुस्तक प्रकाशित झाल्याला आता जवळजवळ ४८ वर्षे होत आहेत. ज्या पुण्याच्या प्रेस्टिज पब्लिकेशन्सने हे पुस्तक प्रकाशित केलं, ती प्रकाशन संस्थाही आता बंद झाली आहे. २१८ पानांच्या या पुस्तक वाचनाचा अनुभव एका शब्दांत सांगायचा, तर ‘रोमांचित’ करणारा आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

११ जानेवारी १९११ रोजी जन्मलेल्या यशवंत शास्त्री यांचं हे आत्मचरित्र म्हणजे अनेक अफलातून आठवणींचा खच्चून भरलेला खजिनाच आहे. मध्य प्रदेशातल्या सागर जिल्ह्यातल्या देवरी या छोट्याशा गावी यशवंत शास्त्री यांचा जन्म झाला. त्यांचं शिक्षण विदर्भात झालं. मुंबई, पुणे, नागपूर अशा तीन ठिकाणी त्यांनी पत्रकारिता केली. याशिवाय अनेक क्षेत्रात त्यांचा वावर होता. चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या कामाच्या निमित्ताने उत्तर भारत आणि पाकिस्तानातही ते भरपूर फिरले. तेव्हाच्या महागड्या हॉटेलात त्यांनी वास्तव्य केलं. त्यांना भेटलेली सगळीचं माणसं माझ्या पिढीला नावानिशी माहिती आहेत, पण  त्यापैकी अनेकांना प्रत्यक्ष भेटता आलेलं नाही. यशवंत शास्त्री मात्र त्या अनेकांना केवळ भेटलेच नाही, तर त्यांच्यासोबत त्यांनी कांही केलं.

त्यात आचार्य अत्रे, नानासाहेब परुळेकर, पांडोबा भागवत यांच्यासारखे संपादक आहेत; मीनाकुमारीपासून अनेक अभिनेत्री-अभिनेते, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक आहेत.

महत्त्वाचं म्हणजे ती सर्व माणसं आणि त्या काळात आलेल्या अनुभवांना यशवंत बाळाजी शास्त्री अतिशय धाडसानं सामोरे गेलेले आहेत. खरं तर काही अनुभवांच्या बाबतीत रंगेलपणे सामोरे गेले, असंही म्हणता येईल, कारण केवळ धूम्रपान आणि मद्यपानच नव्हे, तर आयुष्यात आलेल्या स्त्रिया आणि काहींच्या ‘उत्कट सहवासा’विषयीसुद्धा यशवंत बाळाजी शास्त्री यांनी अतिशय नितळपणे लिहिलं आहे. किती नितळपणे, तर त्यांच्यावर एका स्त्रीकडून झालेल्या बळजोरीची हकिकतही ‘स्त्रीकडून पुरुषावर झालेला बलात्कार’ म्हणून त्यांनी सांगून टाकली आहे. कुठलीही लपवाछपवी केलेली नाही. 

महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या (दुसऱ्या) पत्नी शालिनी शास्त्री यांच्या केवळ पुढाकारानंच नव्हे, तर त्यांच्या निवेदनासह हे पुस्तक यशवंत बाळाजी शास्त्री यांच्या मृत्युपश्चात प्रकाशित झालेलं आहे. शालिनी आणि यशवंत शास्त्री या दाम्पत्याच्या परस्परांतील विश्वास, सामंजस्य आणि खुलेपणाचा एक प्रातिभ आविष्कार म्हणूनही या पुस्तकाकडे पाहता येईल.

‘मी धर्मश्रद्ध आहे, पण धर्मांध नाही. ईश्वरावर माझा विश्वास आहे, पण मी मूर्तिभंजक नाही. मला माणसाचे दैन्य पाहावत नाही. कारण मी दारिद्रयाचा अनुभव घेतला होता,’ अशी भूमिका (पृष्ठ ४३) मांडत यशवंत बाळाजी शास्त्री व्यक्त झालेले आहेत. उल्लेखनीय म्हणजे व्यक्त होण्याच्या त्यांच्या या भूमिकेविषयी ते ठाम आहेत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

ज्या नागपूरच्या ‘तरुण भारत’ दैनिकासाठी यशवंत बाळाजी शास्त्री यांनी दीर्घकाळ पत्रकारिता केली, ते दैनिक तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र नव्हतं. ‘तरुण भारत’ संघाचं मुखपत्र कसं झालं, याची यशवंत बाळाजी शास्त्री यांनी दिलेली माहिती वाचनीय आहे. ती देताना यशवंत बाळाजी शास्त्री म्हणतात, ‘मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी आकस नाही. आयुष्यात वेळ मिळाला असता, तर कदाचित मी संघाचा स्वयंसेवकही झालो असतो. ’ हे सांगून रा.स्व. संघ एखादी संस्था ताब्यात कशी घेतो, त्याचे तंत्रही सांगून यशवंत शास्त्री मोकळे होतात.

प्रख्यात साहित्यिक ग. त्र्यं. माडखोलकर यांनी सुरू केलेलं  ‘तरुण भारत’ हे दैनिक संघाचं मुखपत्र कसं  झालं, हे कथन करतांना त्यांनी म्हटलं आहे- ‘‘एखादी संस्था संपूर्ण हस्तगत करावयाची झाल्यास, त्यासाठी संघाचे तंत्र मोठे मासलेवाईक असते. संघाची माणसे एका मागून एक अशी त्या संस्थेत  शिरकाव करून घेतात आणि हा हा म्हणता शिरजोर होतात. बाळासाहेब देवरस (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक) यांच्या हाती ‘तरुण भारत’ची सूत्रे गेली आणि द्रुतगतीने ‘तरुण भारत’चे स्वरूप पालटत गेले. संघाचे तंत्र आणि मंत्र उपयोगात आणला जाऊ लागला.’’ (पृष्ठ ११६)

एक मोठी अदभुत म्हणावी अशी घटना यशवंत बाळाजी शास्त्री यांनी कथन केली आहे. शेवटचे मोगल सम्राट आणि गझलकार बहाद्दूर शहा जफर यांची अजरामर ‘ना मैं किसी की आँख का नूर हूँ, न किसी के दिल का करार हूँ’ ही गझल यशवंत बाळाजी शास्त्री यांच्या हाती कशी पडली आणि पुढे अमीनाबाई यांनी ती गाऊन प्रसिद्धीचे ‘चार चाँद’ कसे, ही सविस्तर हकिकत (पृष्ठ ७६) मुळातूनच वाचण्यासारखी आहे.

आणखी एक मोठी खळबळजनक घटना यशवंत बाळाजी शास्त्री यांनी कथन केली आहे आणि ती आहे, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर झालेल्या हल्ल्याची. (या घटनेविषयी नागपुरातील ज्येष्ठ संपादक-पत्रकारांनी आम्हाला अनेकदा सांगितलं आहे, पण प्रत्येकाच्या सांगण्यात तपशील वेगळे असत. नेमकी घटना या पुस्तकात आहे.) १२ मार्च १९५५ रोजी नागपुरात ही घटना घडली होती. ‘भारत सेवक समाजा’च्या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी पंडित जवाहरलाल नेहरू नागपूरला आले होते. विमानतळावरून पंडित नेहरू राजभवनाकडे जात असताना जेल रोडवर रहाटे कॉलनीनजीक बाबुराव कोचरे या इसमाने त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला लगेच पकडले. ही घटना अर्थातच खळबळजनक तसंच आंतरराष्ट्रीय महत्त्व असणारी होती.

पंतप्रधानांच्या दौऱ्याचं वृत्तसंकलन करण्यासाठी त्यांच्या ताफ्यातील एका मंत्र्याच्या कारमध्ये तेव्हा असलेले यशवंत बाळाजी शास्त्री या घटनेचे एक पत्रकार म्हणून हे एकमेव साक्षीदार होते. नागपूर आणि परिसराची संदेश वहन यंत्रणा खंडित होण्याच्या आत यशवंत बाळाजी शास्त्री यांनी ती बातमी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी ‘ब्रेक’ केली, हे सर्व तपशील असलेली ती हकीकत केवळ पत्रकारांनीच नाही, तर सर्वांनीच ‘जर्नालिस्टिक थ्रीलर’ म्हणून वाचण्यासारखी आहे. (पृष्ठ १३९)

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांच्यासोबत घडलेल्या ‘जर्नालिस्टिक चकमकी’सह अशा अनेक आठवणींचा खजिना म्हणजे यशवंत बाळाजी शास्त्री हे पुस्तक आहे. अर्थात यशवंत बाळाजी शास्त्री यांच्या सर्वच मतांशी सहमत होता येत नाही, हेही तेवढंच खरं.

राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याच्या कृतीवर टीका करणारा माझा ब्लॉग प्रकाशित झाला आणि ट्रोल्सनी धुमाकूळ घातला. नेमक्या त्याच काळात ‘यशवंत बाळाजी शास्त्री’ वाचताना मला धैर्य आणि बळ मिळालं. पुस्तकं सच्चे सोबती कसे असतात, जणू याचाच प्रत्यय या पुस्तकानं दिला.

...............................................

हे पुस्तक कसं प्राप्त झालं याचीही एक गोष्ट सांगायलाच हवी – अद्याप भेट न झालेले माझे एक वाचक मित्र आहेत. पृथ्वीराज चव्हाण हे त्यांचं नाव. (माजी मुख्यमंत्री नव्हेत! माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेही पुस्तकांत रमणारे खूप चांगले वाचक राजकारणी आहेत.) हे पृथ्वीराज चव्हाण मूळचे साताऱ्याचे  आणि आता पुण्याला स्थायिक आहेत. शिक्षणानं अभियंता तसंच व्यवस्थापनशास्त्राचे पदवीधारक म्हणजे उच्च विद्याविभूषित आणि एका खाजगी उद्योगात उच्चपदस्थ आहेत. त्यांच्या घराण्याची नाळ सत्यशोधक चळवळीशी जुळलेली असल्याची परंपरा आहेत. त्यांचे पणजोबा नारायणराव चव्हाण या चळवळीचे एक नेते होते. त्यांनी सातारा जिल्ह्यातील वाईचं नगराध्यक्षपदही भूषवलं आहे. वडील शिक्षक होते. पृथ्वीराज यांच्यावर वाचनाचा संस्कार त्यांच्या आई-वडिलांकडून झाला. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या महाविद्यालयीन जीवनापासून म्हणजे, १९८८-८९पासून ते माझ्या लेखनाचे वाचक आहेत. अधून-मधून आम्ही फोनवर संपर्कात असतो. 

‘यशवंत बाळाजी शास्त्री’ हे पुस्तक प्रकाशित करणारी प्रेस्टिज पब्लिकेशन्स ही सर्जेराव घोरपडे यांनी सुरू केलेली एकेकाळची आघाडीची पुण्याची प्रकाशन संस्था. डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या लेखनाचे अनुवाद, गोविंदराव तळवलकर यांची, अशी असंख्य महत्त्वाची पुस्तकं प्रेस्टीजनं अतिशय देखण्या स्वरूपात  प्रकाशित केलेली आहेत. आता ही प्रकाशन संस्था बंद झाली आहे. प्रेस्टिजची काही पुस्तकं पृथ्वीराज चव्हाण यांच्या हाती लागली. ‘यशवंत बाळाजी शास्त्री’ हे एक. हे पुस्तक वाचल्यावर त्यांना माझी आठवण झाली. हे पुस्तक भेट म्हणून पाठवताना पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे- ‘‘My pleasure to send autobiography of a journalist to a journalist whom I like and respect .’’

अशी पुस्तकं पाठवणारे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे ग्रंथप्रेमी मित्र सगळ्यांना लाभोत. कुणाला जर ‘यशवंत बाळाजी शास्त्री’ हे पुस्तक हवं असेल, तर त्यानं पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी ९८६०५१०००१ या सेलफोनवर सकाळी १० ते सायंकाळी ६ ही कार्यालयीन वेळ वगळून संपर्क साधावा.

.................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. ‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......