‘मोनोक्रोम’ ही कादंबरी-नाटककार आणि दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी नवीकोरी कादंबरी नुकतीच पपायरस प्रकाशनातर्फे प्रकाशित झालीय. ‘कोबाल्ट ब्लू’ ह्या बहुचर्चित कादंबरीनंतर वीस वर्षांनी प्रकाशित होणारी कुंडलकर ह्यांची ही दुसरी कादंबरी. ‘कोबाल्ट ब्लू’पेक्षा जास्त व्यापक कथासूत्र आणि मानवी वेदनेची खोल जाणीव बाळगणारी. ‘मोनोक्रोम’ ह्या दीर्घ कथासूत्राचा हा विलक्षण असा पहिला भाग - ‘रेशीम मार्ग’ आहे. या कादंबरीतला हा एक वानोळा...
.................................................................................................................................................................
चेन्नईहून मुंबईला परत आल्यानंतर निशिकांतचे पाय घरातून निघेनात. तो दाराची बेल वाजली की, धावत जाऊन दार उघडत असे. प्रत्येक वेळी दारावर श्रीनिवास सोडून वेगळंच कुणी आलेलं पाहून त्याच्या कपाळावर एक आठी येत असे. त्याने आतल्या खोलीमध्ये स्वतंत्र करून ठेवलेले दोन पलंग एकत्र करून जोडले. एक आठवडा उलटून गेला आणि स्वतःच्या जगातून गायब झालेला श्रीनिवास त्याच्या जगात आला नाही, तेव्हा निशिकांतची झोप सावकाश कमी होऊ लागली. त्याला अपरात्री कोणत्याही आवाजाने जाग येऊ लागली. सतत घरातला फोन वाजत आहे, असे भास त्याला रात्री होऊ लागले. तो रात्री वारंवार घराचं दार उघडून रातकिड्यांच्या आवाजाने भरलेल्या घरासमोरच्या निर्जन वाटेकडे तासनतास पाहत उभा राहू लागला. असं अनेक रात्री घडू लागलं, तेव्हा त्याने निशिकांतची घरी बसून वाट पाहण्यासाठी घेतलेली सुट्टी रद्द करून वर्गात शिकवायला जायचं ठरवलं.
वर्ग संपला आणि सर्व मुलं बाहेर जाऊ लागली, तेव्हा निशिकांतला त्याच्या घरी आलेला देखणा मुलगा वर्गात एकटाच बसून राहिलेला दिसला. जणू त्याच्या डोळ्यांमध्ये निशिकांतसाठी निरोप होता. निशिकांत आपली पुस्तकं गोळा करून दाराकडे जाऊ लागला, तेव्हा त्याला देखण्या मुलाचा मागून आवाज आला- “मी आज संध्याकाळी सात वाजता ब्लॅटन्टमध्ये आलेलो असेन.” त्याच्याकडे पुन्हा न पाहता निशिकांत वर्गाबाहेर पडला.
तो डिपार्टमेंटमधून कॅम्पसवरील त्याच्या घराकडे जाताना पिवळ्या फुलांनी तरारलेली झाडं त्याच्याकडे रोखून पाहू लागली. निशिकांतने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. आपण वयात येताना त्यांच्या तावडीत खोलीमध्ये एकटे सापडलो नाही. आपण कपडे बदलताना दरवेळी खिडकीवरचा पडदा सारला. मग त्या झाडांनी आपला सूड घ्यायला निखिलला आपल्या खांद्यावर खेळवलं. त्याच्या मजबूत हातांनी आपल्या फांद्या तोडून घेतल्या. त्याच्या निळ्या खिडकीपर्यंत आपल्या लांब फांद्या नेऊन त्यांनी निखिलचं शरीर पाहायचा आनंद घेतला. आपल्या बहिणीला आणि निखिलला एकमेकांच्या उष्ण वेढ्यात अडकलेलं त्या झाडांनी पाहिलं. आपण हॉस्टेलच्या खोलीत शिवच्या कुशीत निजू लागलो, तेव्हा ही झाडं गुलमोहराला मागे सारून हिरिरीने आपल्या खोलीपर्यंत पोचली. आपण बाल्कनीचं दार रात्री लावून घेऊ लागलो. त्यांना जे हवं होतं ते तेव्हाही पाहू दिलं नाही. ह्यांना आता श्रीनिवासचा घास हवा आहे का?
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
तो डिपार्टमेंटमधून घरी पोचला तेव्हा त्याला दिसलं की, त्याने सकाळी लावलेलं कुलूप घराच्या दाराला नव्हतं. सकाळी लिहून ठेवलेली ‘डिपार्टमेंटमध्ये शिकवायला जातो आहे,’ अशी चिठीसुद्धा दारावर नव्हती. दार नुसतंच लोटलेलं होतं. त्याच्या मनात सावकाश समाधान उमलून आलं. निशिकांत दार सावकाश ढकलून घरामध्ये आला. आतमध्ये सामसूम होती. त्याने श्रीनिवासला हाक मारली. तो बेडरूममध्ये, बाथरूममध्ये कुठेही नव्हता. आपण इथे नसताना कुणीतरी इथे येऊन गेलं असल्याची खात्रीलायक जाणीव निशिकांत झाली. त्याने खिडकीबाहेर पाहिलं. मेटॅलर्जी डिपार्टमेंटच्या अंगणातल्या झाडाची पिवळ्या फुलांची फांदी त्याच्या बेडरूमच्या खिडकीच्या दिशेला वळली होती. त्याने पटकन खिडकीचा पडदा सारला. तो अस्वस्थपणे घरामध्ये येरझाऱ्या घालू लागला. त्याने ड्रॉवरमधून श्रीनिवासचं लाल पेन बाहेर काढून कोरे कागद आपल्या पुढ्यात ओढले. त्याच्या घामाचे थेंब कोऱ्या कागदावर पडू लागले. तो आवेगाने तसाच लिहीत सुटला. तो तास दोन तास घामेजून जाऊन, पेन बोटांमध्ये घट्ट पकडून आकारविहीन असं काहीतरी कागदावर उतरवत राहिला. आपल्याला गेल्या अनेक दिवसांत रडू आलेलं नाही, हे त्याच्या लक्षात येऊ लागलं. आतून मन तापून गेलं की, शर्ट भिजून जाईल, असा घाम येतो, पण रडू येत नाही. आपल्याला श्रीनिवासला घट्ट जवळ घेऊन पुष्कळ रडायला हवं आहे.
त्याचा श्वास शांत झाला, तसा तो लिहायचा थांबला. त्याने लिहिलेल्या कागदांची चळत ड्रॉवरमध्ये ठेवून दिली. त्याने घामाने भिजून गेलेला अंगातला टी शर्ट काढून टाकला. पॅण्ट काढून भिरकावून दिली आणि अर्धा तास तो गरम पाण्याच्या शॉवरखाली उभा राहिला. त्याने लंडनहून परत येताना आपल्या बॅगेत जे श्रीनिवासचे कपडे आणि अंतर्वस्त्रं आणली होती, ती घातली. दार नुसतंच लोटलं. चेन्नईच्या घरातून आणलेले लाल मोजे पायात घातले. दारावर ‘ब्लॅटन्ट’ असं लिहिलेली नोट लिहून चिकटवली आणि तो बूट घालून बारमध्ये पोचला.
देखणा मुलगा बार काउंटरपाशी बसला होता. त्याच्या हातामध्ये बिअरचा ग्लास होता. निशिकांत त्याला ओलांडून म्युझिक कन्सोलपाशी गेला. त्याने सीडीजने भरलेला ट्रे आपल्याकडे ओढून घेतला. आता वाजत असलेली मॅक्स रिश्टरची सीडी त्याने इजेक्ट केली. त्याने जॉर्ज गेवनचा अल्बम उघडून सीडी आतमध्ये ढकलली आणि बार काउंटरपासून लांब असलेल्या एका कोपऱ्यातल्या टेबलापाशी तो जाऊन बसला. तो हे सगळं करताना देखणा मुलगा एकटक त्याच्याकडे पाहत होता. निशिकांतने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही.
‘ब्लॅटन्ट’मध्ये त्याला काय हवं आहे, हे सांगावं लागत नसे. थोड्याच वेळात थंडगार पाणी, काळी रम, लिंबाची चकती आणि टॅपिओकाच्या वेफर्सने भरलेली बशी त्याच्यासमोर आणून ठेवली गेली. ग्लासमध्ये तो आपलं ड्रिंक तयार करताना रव्यामध्ये खरपूस तळलेला चोणक माशाचा काप त्याच्यासमोर आला. देखण्या मुलाच्या डोळ्यात अजूनही निरोप होता. निरोप किंवा बातमी.
काही वेळ निशिकांत आणि तो एकमेकांकडे पाहत राहिले. अचानक तो मुलगा बार काउंटरजवळून उठला आणि निशिकांतच्या टेबलापाशी येऊ लागला. त्याने बसायची परवानगी न मागता निशिकांतच्या शेजारची खुर्ची ओढली. त्याने खिशातून सिगारेटचं पाकीट काढून निशिकांतसमोर धरलं. निशिकांत पेटलेल्या काडीपाशी आपली सिगरेट नेण्यासाठी हलकेच त्याच्याजवळ आला. त्या मुलाने निशिकांतच्या खांद्याला स्पर्श केला. सिगरेट पेटवताना निशिकांतने त्याच्या डोळ्यांत पाहिलं आणि काही क्षणात तो पुन्हा त्याच्यापासून लांब झाला.
स्पिकरमधून लिओनार्ड बर्नश्टाईनने कंडक्ट केलेली ‘ऱ्होप्सोडी इन ब्ल्यू’ सावकाश झिरपत होती. जुना कृष्णधवल हॉलिवुडपट सुरू होताना मखमली लाल खुच्यांमध्ये मनाची जी तगमग होते, तसं काहीसं वातावरणात उमटू लागलं. मनातलं सगळं आयुष्याच्या क्षमतेपेक्षा मोठं होऊ लागलं. निशिकांतला देखण्या मुलाचं नाव नको होतं. त्याने ते अजिबात सांगू नये, असं त्याला काठोकाठ वाटत असतानाच त्याने ते सांगितलं. निशिकांतने तो पुढे काही बोलायच्या आधी आपलं एक बोट ओठांपाशी उभं करून त्याला शांत बसायची खूण केली.
..................................................................................................................................................................
या कादंबरीविषयीची फेसबुकवरील एक प्रतिक्रिया, संपादित स्वरूपात…
.................................................................................................................................................................
“मला जॅझ ऐकायची आवड आहे. कारवारजवळच्या एका छोट्या गावातून मी आलो आहे. गावात एक पुरातन देखणं चर्च आहे. फादरच्या घरी जॅझ रेकॉर्ड्सचा मोठा संग्रह होता. ते दणकून व्यायाम करत आणि उत्तम पोर्क शिजवत. त्यांच्या घरातल्या रेडिओवर बीबीसीचं स्टेशन ट्यून केलेलं असे. त्यावर ते मला शेक्सपिअरच्या नाटकांची वाचनं ऐकवत. तुम्ही आत्ता जॉर्ज गेवींन का ऐकता हे मला समजत आहे. तुम्हाला रडायचं आहे पण रडू येत नाही. फादर माझ्याकडून चर्चमधला ऑर्गन वाजवून घ्यायचे. गावाच्या मागे मोठी खोल दरी आणि ताकदवान धबधबा होता. चर्चमधील ऑर्गनचा आवाज धबधब्याच्या आवाजात मिसळून जात असे. जेव्हा रविवारी सगळं गाव सुट्टीचं जेवण जेवून गाढ झोपलेलं असे, तेव्हा मी आणि फादर धबधब्यात भिजायला जात असू. ते चाळीस वर्षांचे असतानाच गेले. तेव्हापासून मी सिगरेट पिऊ लागलो. त्यांच्या सर्व जॅझ रेकॉर्ड्सचं कलेक्शन माझ्याकडे आहे. तुमच्या घराचं कुलूप उघडून मी आज त्या रेकॉर्ड्सचा एक गठ्ठा तुमच्या पलंगाखाली ठेवून आलो आहे. मला माणसं आवडू लागली की, मी त्यांच्या घराच्या कुलुपाची एक डुप्लिकेट किल्ली बनवून घेतो. फादरच्या घराची होती. आता तुमच्या घराची मी बनवून घेतली आहे. आज मी तुमच्या घरामध्ये जोडलेले दोन पलंग पाहिले. एरवी तसे नसतात. तुम्ही वर्गातलं शिकवणं संपवून घरी येता, तेव्हा मी कितीतरी तास तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या खिडक्यांबाहेरून नेमाने पाहत आलो आहे. तुम्ही टेबलाशी बसून लिहिताना, तुम्ही स्वयंपाक करताना, तुम्ही तुमचे कपडे बदलताना.”
..................................................................................................................................................................
या कादंबरीविषयीची फेसबुकवरील एक प्रतिक्रिया, संपादित स्वरूपात…
.................................................................................................................................................................
निशिकांत छतावरील झुंबराकडे पाहत सावकाश रमचे घोट घेत होता. काही न बोलता प्रसन्न एकटक त्याच्याकडे पाहत होता. निशिकांत उठला. त्याने बाहेर पडताना काही नोटा बारच्या काउंटरवर सरकवल्या.
त्याची पावलं बारबाहेर पडल्यावर कॅम्पसकडे वळली नाहीत. तो शांतपणे चालत राहिला. त्याला किती तास गेले असावेत ह्याची जाणीव झाली नाही. त्याचे कान, त्याचे नाक थिजून गेल्यासारखे झाले. त्याच्या डोक्यात नुकत्याच ऐकलेल्या संगीतातले ट्रम्पेट्स आणि ड्रम्स वाजत राहिले. रस्ता ओलांडताना अचानक त्याचा हात धरला गेला. रस्ता ओलांडून झाल्यावर त्याने पाहिलं, तर तो हात नलिनीचा होता.
“अजून किती वर्षे तू माझ्यावर रागावणार आहेस? आता पुरे. रागावून बसलेल्या माणसाला मदत तरी कशी करणार? किती त्रास सहन केलास? तुझा राग, तुझा त्रागा शांतपणे समजून घेणारं तुला कुणी भेटलं नाही. असहाय होऊन तू रागावलास की, तुला चाबकाचे फटके न मारता, उलटपक्षी डोक्यावर शांत थोपटून निजवणारं कुणी आपल्या आजूबाजूला उगवलेलं नाही. सगळे तुला सातत्याने चाबूक मारीत बसले. रक्ताळून दमून निजलास की, उघड्या अंगावर मिठाचं पाणी ओतून पळून जाऊ लागले. मी पाहिलं आहे हे सगळं. राग आणि वेदनेनं भरलेलं तुझं शापित एकटेपण. आतातरी ह्यापुढे भिंतीवर डोकं आपटून घेणं बंद करशील ना? बंद करून घे स्वतःला खोलीत, नको पर्वा करू कुणाचीही आणि भरपूर ताजं लिहीत राहा. लिहून काढलंस की, वेदनेला आकार येईल. आकार आला की तिची ताकद कळेल आणि मग तिच्याशी जमवून घेणं सोपं जाईल. लिहायचा थांबू नकोस.”
निशिकांतने मान डोलावली. त्याचा हात आपल्या मऊ हातात घेऊन नलिनी त्याच्यासोबत शांतपणे चालत राहिली. तिच्यासाठी हे अनोळखी शहर होतं. दोघं ह्या शहरात कधी एकत्र चालले नव्हते.
समोर समुद्राचा विस्तार आला, तेव्हा तो चालायचा थांबला. त्याच्या कपड्यांना धुराचा आणि धुळीचा वास येत होता. त्याचा घसा कोरडा पडला होता. तो बांद्र्याच्या किल्ल्याच्या बुरुजावर उभा होता. पहाटेचे चार वाजले होते. बारमधून निघाल्यापासून तो सलग सहा तास चालला होता. समुद्रावरून येणारा खारा वारा त्याने अंग ताणून शरीरावरून जाऊ दिला. त्याने मागे वळून पाहिलं. प्रसन्न त्याच्यापासून काही अंतरावर किल्ल्याच्या जुन्या दगडी पायऱ्यांवर उभा होता. निशिकांतने त्याच्याकडे पाहताच तो शांतपणे कुठेसा निघून गेला आणि काही वेळाने एक पाण्याची बाटली आणि दोन कपांत चहा घेऊन आला. समुद्राकडे पाहत निशिकांत चहाचे घोट घेत राहिला, तसा प्रसन्न त्याच्या शेजारी हळुवारपणे येऊन गप्प बसून राहिला.
..................................................................................................................................................................
या कादंबरीविषयीची फेसबुकवरील एक प्रतिक्रिया, संपादित स्वरूपात…
.................................................................................................................................................................
“मी चार वर्षांपूर्वी मुंबईला शिकायला आलो, तेव्हाच हे ठरवलं की, परत आपल्या गावी कधीही परतून जायचं नाही. इथे शहरातल्या गोंधळात राहणाऱ्या सगळ्यांना हेवा वाटावा, असं आमचं समुद्रकिनाऱ्यावरचं गाव आहे. कारवारपासून अर्ध्या तासाच्या मोटरप्रवासावर. आम्ही जंगलाच्या वेढ्यात लपून वाढलो. गावातल्या विहिरींनासुद्धा नारळपाण्याची गोडी आहे. नद्यांमध्ये, समुद्रात ओंजळ धरली की, हातात मासे येतात. जमीन फारच सुपीक आहे. गावात आमची एकूण आठ घरं आहेत. मी आमच्या घरात राहणाऱ्या बायकांपासून पळून आलो. आमचं घर जमीनदारांचं. सर्वांत मोठ्या काकाने लग्न करून जी बायको घरी आणली, ती गोरीपान, धिप्पाड आणि मजबूत मनगटाची होती. तिने घरात येताच घरातल्या सर्व पुरुषांचं पाणी लगोलग ओळखलं आणि आपल्या नात्यागोत्यातील तरुण बहिणींशी आमच्या घरातील तरुण मुलांची लग्नं लावून द्यायला सुरुवात केली. माझी आई माझ्या मोठ्या काकूची सख्खी बहीण आहे. ह्या सर्व बायका उत्तर कर्नाटकातील. दिसायला सुंदर. नाकात ठसठशीत चमकी. रोज ताजा मोगऱ्याचा गजरा आणि भरपूर देवपूजा. घरकामात आणि घरकामाचं भांडवल करून पदरात सहानुभूती पाडून घेण्यात तरबेज. एकाही बाईने शाळासुद्धा पूर्ण केलेली नाही. ह्या सर्व बायकांचे आजोबा चिक्कोडीजवळील एका संपन्न मठाचे अधिपती होते. ते सिद्धेश्वरस्वामी गेल्यानंतर त्यांच्या चांदीच्या पादुका बनवून ह्या मुलींच्या वडिलांनी तो मठ ताब्यात ठेवला. सिद्धेश्वरस्वामी असेपर्यंत मठात फक्त आध्यात्मिक उठाठेव चालत असे, पण ते जाताच त्यांच्या मुलाने, परमपूज्य श्रीकृष्णमहाराज ह्यांनी, आजूबाजूची गावं, शेतीवाडी, आजूबाजूच्या निवडणुका, राजकारण यांवर अंमल मजबूत करायला सुरुवात केली. माझ्या काकूंचे आणि आईचे वडील असलेले परमपूज्य श्रीकृष्णमहाराज हे आता त्या मठाचे अधिपती आहेत. आमच्या घरातील सुना त्यांनी मठातील विविध स्त्रियांपासून जन्माला घातल्या आहेत. ह्या मुली एक एक करून आमच्या गोतावळ्यात येताच, आमच्या शांत कोवळ्या गावात मठातील माणसांची वर्दळ वाढू लागली. ही माणसं दिवसा गावातल्या डोंगरांवर, समुद्रकिनाऱ्यांवर कसलीतरी मोजमापं घेत, रीतसर परवानग्या न घेताच मजूर लावून उत्खनन करताना दिसत. पोलिसांनी हटकलं की, ते आमची सोयरीक सांगत.
“आमच्या घराण्यात पिढ्यानपिढ्या संगीत, वादन, चित्रकला, फोटोग्राफी ह्यांची आवड सर्वांना होती. घरात जातीबंदी नव्हती. गावातल्या सर्व स्तरांतील सर्व धर्मांच्या लोकांना मोकळा प्रवेश होता. माझी मोठी काकू घरात येईपर्यंत आमच्या बाबांचा फोटोग्राफर मित्र मार्सेल घरी दुपारच्या पंगतीला नेहमी असायचा. काकू घरी आली आणि घरातील वातावरण बदलू लागलं. गोठा, देव्हारा, स्वयंपाकघर आणि दागदागिने यांपलीकडे तिची बुद्धी जात नाही असं दिसत असलं तरी असल्या गावरान चाणाक्ष बायकांच्या अंगी असतं ते विषारी कपट तिच्या मनात तिच्या वाडवडिलांनी पूर्ण भरून मगच तिचं लग्न लावून दिलं असावं. काकाचं लग्न होईपर्यंत आठ घरांपैकी कोणत्या तरी एकाच घरी रात्रीचा स्वयंपाक होत असे. सर्व कुटुंब त्या घरी एकत्र जमत असे. जेवणाआधी सारंगीवादन, व्हायोलिनवादन होई. कुणी कुठल्या नवीन पुस्तकाचं वाचन केलं असेल, तर त्याबद्दल चर्चा होई. आमची आजी घोडेस्वार होती. तिची तेलपाणी केलेली तलवार होती. असं सांगतात की, आजी त्या काळात लग्न करून घरी आली, तेव्हा आजोबांच्या प्रोत्साहनाने शाळा शिकली. ती अतिशय प्रेमळ आणि धोरणी होती. आजोबा कोर्टाच्या कामासाठी मुंबईला किंवा विलायतेला जात, तेव्हा शेतीवाडीचा सगळा हिशोब आजी पाहायची. ती माणसांची मनं दुखवायची नाही. कुणासमोरही रडायची नाही. फार शूर आणि खंबीर होती. मोठ्या काकूने फार पद्धतशीरपणे आजी मरून जाताच मठातील आपल्या सख्ख्या आणि सावत्र बहिणी आमच्या घरी लग्न करून आणल्या आणि त्या आठही बायकांनी आमच्या गोतावळ्याचा नाश केला. माझी आईसुद्धा त्यातलीच. प्रत्येक बाईने फार पद्धतशीरपणे आपापल्या नवऱ्याच्या मनात असलेला निवांतपणा, कलासक्ती, शांतता आणि आत्मविश्वास यांचं खच्चीकरण केलं. माझे वडील जलरंगात चित्रं काढत. आमच्या कुणाच्याही मनात घड्याळ नव्हतं. भल्यामोठ्या घरात पडणाऱ्या सूर्याच्या कवडशांवर आम्ही वेळेची वरवर समजूत करून घेत असू. आमच्या मालकीचे सात डोंगर आणि मोजता येणार नाही इतकी जमीन होती. वडिलांनी पोटापाण्यासाठी कधी बाहेर जाऊन काम केलं नव्हतं. आमच्या मालकीच्या एका डोंगराखाली मँगेनीजचा साठा आहे, असा सुगावा आमच्या आईच्या माहेरच्या मठाला लागला. परमपूज्य श्रीकृष्णमहाराज ह्यांनी माझ्या आईला डोंगर फोडायचा आदेश दिला. ही बातमी कानावर येताच माझे वडील खो खो हसले. मला अजुनी तो दिवस आठवतो. माझी आई ओसरीवर मातीच्या भांड्यात ताक घुसळत बसली होती. बाबा श्रीकृष्णमहाराजांची चेष्टा करीत हसताच आईच्या हातातील काकणं वाजायची थांबली. तिने वडिलांकडे पाहिलं, तेव्हा तिच्या डोळ्यांचा रंग बदलल्यासारखा झाला. माझ्या वडिलांचा नाश करायचं, तिने कोणत्या क्षणी ठरवलं ह्याचा विचार मी अनेक वर्षे करतो. पण आज मला तो क्षण आठवला की, उत्तर मिळतं. तिच्या माहेरच्या मठाचा निव्वळ गोष्टींचा करावा, तसा उल्लेख माझ्या वडिलांनी केला, तोच तो क्षण. रात्री निजानीज झाली की, ह्या आठही बहिणी आपापल्या घरातून बाहेर पडून विहिरीजवळ चंद्रप्रकाशात पानसुपारीचे डबे घेऊन खलबतं करायला बसत. माझ्या वडिलांनी आत्महत्या करण्याआधी मला एक चिठ्ठी लिहिली. तेव्हा मी बारा वर्षांचा होतो.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
“वेळ साधताच ह्या बायकांच्या जंजाळातून पळून जा. मठाचा विषारी विळखा आपल्या घराला घट्ट बसला आहे. कारुण्यपूर्ण भाबडा पारंपरिक चेहरा करून ह्यापैकी कोणत्याही बाईने तुला घरात थांबायची गळ घातली, तुझं खाणंपिणं, आजार आणि गोड बालपण साजरं केल्याची आठवण करून दिली, तरी त्या साधेपणाला बळी पडू नकोस. वरवर भाबड्या वाटणाऱ्या भारतीय साधेपणात इतर कोणत्याही समाजात सापडणार नाही असं क्रौर्य असतं.”
वडिलांनी विंचू चाववून घेऊन स्वतःला संपवलं.
मी गावातल्या चर्चमध्ये ऑर्गन ऐकला आणि फादरना भेटलो. त्यांच्या ऑर्गनने आम्हाला एकत्र आणलं. माझ्या शरीराला पहिला फुलोरा आला, तोच फादरच्या कुशीत. त्या भुकेल्या वयात त्यांनी दिवस-रात्री हवं तितक्या वेळा मोठ्या लाडाने मला शांत केलं. माझ्यावर प्रेमाचं पांघरूण पसरलं.
“तुम्हाला जॅझ आवडतं. आपण गुलामच आहोत सगळे. आपलं संगीत आहे ते. कुणी समजून न घेतल्याने बाजूला फेकले गेलेल्या गुलामांचं संगीत. तुमचं, माझं, फादरचं संगीत. तुम्ही तासनस मन लावून लिहीत असता. तुमच्या वर्गात बसलेलो असलो की, माझ्या मनात संगीत वाजू लागतं. तुम्ही नुसतं माझ्याकडे पाहिलंत, तरी मला फार मऊ वाटतं.”
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
मुंबईच्या करड्या रंगाच्या मृत समुद्राकडे पाहत बसलेल्या निशिकांतच्या पाठीवर सावकाशपणे सूर्य उगवला. त्याने घातलेला श्रीनिवासचा शर्ट घामाने त्याच्या पाठीला चिकटला होता. बॅण्डस्टॅण्डवर जॉगिंगला येणाऱ्या माणसांची गर्दी सुरू झाली. निशिकांतने उठून रिक्षाला हात केला. रिक्षा येऊन थांबताच निशिकांतने प्रसन्नकडे पाहिलं आणि त्याला रिक्षात बसायची खूण केली. उपनगराकडे चौकात सिग्नलला रिक्षा थांबली…
‘मोनोक्रोम’ (भाग १ - रेशीम मार्ग) – सचिन कुंडलकर
पपायरस प्रकाशन, कल्याण (प.)
पाने – ११८ | मूल्य – ३२५ रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment